"मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - वसंत बापट - भरत.
मी कॉलेजात होतो , तेव्हा पॉकेट मनीची पद्धत फार नव्हती. अडल्यानडल्याला म्हणून थोडे पैसे दिलेले असत. पार्ल्यात जानेवारी महिन्यात मॅजेस्टिक गप्पा असत आणि त्याला जोडून त्यांचं पुस्तकप्रदर्शनही असे. जवाहर बुक डेपोवालेही त्याच्या मागे पुढेच पुस्तकप्रदर्शन लावीत. अशाच एका पुस्तकप्रदर्शनात दुपारी मंडपात कोणीही चिटपाखरू नसताना भरपूर वेळ पुस्तकं चाळत , त्यातल्या त्यात कमी किंमतीची आवडलेली पुस्तकं विकत घेतली. त्यात वसंत बापटांची मानसी (किंमत पाच रुपये) प्रवासाच्या कविता ( किंमत सोळा रुपये) सकीना (किंमत बारा रुपये) ही पुस्तके घेतली. इंदिरा - मृगजळ आणि कुसुमाग्रज - वादळवेल हीदेखील.