चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू,
लापता लेडीज मध्ये - एक कुठलं तरी स्टेशन येते, दिपक बाथरूमला जातो.
बरीच लोकं उतरतात तसे पंकजची आई (तीच जी दहेज मध्ये काय) सांगते तिच्या फॅमिलीला बसून घ्या. तर फुल खिडकीत सरकते, तर हा पंकज जावून बसतो फूलच्या बाजूला, आणि सीटच्या काठाला जया बसते. तोवर दिपक येतो.
मस्त वाटला मूवी.

आयुष्यात वाराणसी ते कोलकत्ता जायला ट्रेन घेतली. कुठलही टिकीट असो, इतका मवाली पब्लिक , सीटवर येवून बसणार कोणाचीही असो.
त्यात, गोरखपूरची ती भैया टोळकी कुठेही घुसतात कि रामा… त्यात तो राईच्या तेलाचा वास… नकोसे होते..

कॉमिक्स चा प्रवास हा फार लहानपणी सुरू झाला. आजोबांची बँक डेक्कन ला होती, तिथून येताना कॉमिक्स घ्यायचं हा शिरस्ता. सुरवातीला बरीचशी कॉमिक्स स्टार अन् डीसी ची सुपरमॅन अन् बॅटमॅन ची होती. त्यात सुपरमॅन माझा लाडका असल्यानी ती जास्त. एक दोन सुपर डॉग वाली पण होती.
मग इंद्रजाल ची फँटम ची काही आणली. शाळेच्या लायब्ररी मधे एक वर्ष डिस्ने ची डायजेस्ट यायची. त्यात मिकी डोनाल्ड सोबत चिप डेल च्या ही गोष्टी असायच्या. पुढे देशी डायमंड ची चाचा चौधरी ची कॉमिक्स आली. ही आणायला रेल्वे स्टेशन वर पण चकरा मारल्या आहेत. यानंतर राज कॉमिक्स नी मार्वल चे हीरो देशी रूपात आणले. त्यात आयर्नमॅन बेस्ड सुपर कमांडो ध्रुव ची काही कॉमिक्स आणली. पण इथून कॉमिक्स चा छंद कमी झाला. घर शिफ्ट करताना बरीच कॉमिक्स रद्दीत घातली.

सुपरहिरो सिनेमे मात्र नंतर कधीच तितके भावले नाहीत. मार्वल नी अती करून माती केली असं वाटतं. त्यांचे आयर्नमॅन चे पहिले दोन सोडून बाकी काहीही पाहिलं नाहीये.

Fall (2022) पाहिला. खिळवुन ठेवणारा व थरारक आहे.
यावर आधीच लिहिले असावे कुणी म्हणुन ओळख करून देत नाही परत.
चित्रपटात उंचावरुन पडताना/पडतात की काय दाखवणे याची मला पूर्वी कधी भीती, anxiety वाटली नव्हती पण हा चित्रपट पाहताना दोनदा आता पडणार की काय यावरून वाटली.

माझं मत असं होतं की स्कार्लेट पिंपरनेलची तुलना थोडी अस्थानी आहे. अर्थात दोन identities बाळगणारा तेवढंच ते साम्य आहे. साधारण सुपरहीरो अन्यायाचे परिमार्जन करतो. स्कार्लेट पिंपरनेलला उमरावांवर झालेला अन्याय वाटतो आणि तो आपले बळ, चातुर्य वापरून त्यांची सुखरूप सुटका करतो. पहिल्यांदा लहानपणी हे पुस्तक वाचलं तेव्हा एकदम त्याच्या चलाखी आणि शौर्यामुळे भारावून जायला झालं. पण नंतर लक्षात आलं की तो ज्यांच्यासाठी आपले प्राण संकटात घालतो ते खरंच तितके worthy आहेत का? Lord Tony's Wife या स्कार्लेट पिंपरनेलच्या श्रुंखलेतील पुस्तकात तो उमराव केवळ आपल्या रानात कबुतरे पकडली म्हणून एका अर्धपोटी शेतकर्‍याला फासावर चढवतो. त्यामुळे संतापून त्या शेतकर्‍याचा होणारा मेव्हणा त्याला जाब विचारायला त्याच्या लोकांवर हल्ला करतो. तो मेव्हणा हातात मिळत नाही त्यामुळे चिडून तो उमराव त्याच्या निरपराधी बापाला फासावर चढवतो. अशा लोकांना सोडवण्यासाठी स्कार्लेट पिंपरनेल वेषांतर करून फ्रान्समधे येतो. पहिल्या पुस्तकात त्याची पत्नी मार्गारेट ही सर्वसामान्य फ्रेंच नागरिक असते. तिच्या भावाचे एका उमरावाच्या मुलीवर प्रेम बसते आणि तो तिला प्रेमपत्र पाठवतो. त्यामुळे तो उमराव तिच्या भावावर गुंड पाठवून त्याला बेदम मारहाण करतो. राज्यात उठाव झाल्यावर तो चेचायला परराष्ट्राशी संगनमत करतो. मार्गारेटला याचा सुगावा लागल्यावर ती लोकनेत्यांना कळवते आणि मग देशातून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या त्या उमरावाला पकडून गिलोटीनखाली दिले जाते. स्कार्लेट पिंपरनेलला याचेच प्रचंड वाईट वाटते आणि मार्गारेटला तो त्या उमरावाच्या मरणाला कारणीभूत धरून तिच्याशी अबोला धरतो. त्याच्या कुठल्याच पुस्तकात तो सर्वसामान्य फ्रेंच नागरिकांना काही मदत करतो आहे असे दिसत नाही. त्यामुळे त्याला हीरो म्हणता येणार नाही हे माझे वैयक्तिक मत Happy

चीकू काही अंशी सहमत पण फ्रेंच राज्यक्रांती कडे आता आपण मागे वळुन पाहताना जे जाणवते ते तसेच त्या काळी लोकांना जाणवत होते असे वाटत नाही. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजात उलथापालथ झाली की सुक्या बरोबर ओले जळतेच नेहमी. त्यांचे चटके ब्रिटन मधल्या त्यांच्या ज्या आप्तेष्टांना बसले तेच साहित्यात रस घेणारे, साहित्यादि कलांना आश्रय देणारे इ. होते. ह्याच सुक्या बरोबर ओले जाळण्याच्या पार्श्वभूमीवर डिकन्स ने एक शोकांतिका लिहिली. स्कार्लेट पिंपरनेल त्या पराधिन भावनेला झुगारून देण्यासाठी निर्माण झाला आणि म्हणुनच खुप लोकप्रिय पण झाला.

बाकी जनसामान्यांच्या हाल अपेष्टांची मुळात ब्रिटीश अभिरुची संपन्न इ. वर्गातील लोकांना काही पडलेली होती असे दिसत नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा साधा उल्लेखही जेन आॅस्टिन, आर्थर कॉनन डॉइल, ऍगाथा ख्रिस्ती ह्या त्यावेळच्या लोकप्रिय लेखकांनी केलेला दिसत नाही. नाही म्हणायला एमा (बहुतेक नक्की आठवत नाही) ह्या जेन आॅस्टिन च्या सर्वगुणसंपन्न नायिकेला नायकाच्या घरी आश्रित म्हणून रहात असताना, कुटुंब प्रमुखाच्या अफ्रिकेतिल अत्याचारांचे सुतोवाच करतील अशी काही चित्रं का लिखाण सापडते. पण त्या प्रसंगाचा उपयोग ही तिचे नको त्या वेळी नको त्या ठिकाणी असणे अधोरेखित होण्यासाठी आणि ती नायकाच्या वडिलांच्या 'बॅड बुक्स' मध्ये जाण्यासाठीच फक्त आहे.

अशा मंडळींच्या नायक स्कार्लेट पिंपरनेल सारखा विचार करतो ह्यात नवल ते काय.

छान चर्चा. बॅटमॅन सिनेमे पाहिले नाहीत. मागच्या वर्षी आलेला पाहिला पण काहीच संदर्भ माहिती नसल्याने पुर्ण सिनेमाभर चाचपडायला झालं.

पर्णिका सहमत आहे पण निरपराध सर्वसामान्य जनतेला जर पिंपरनेल मदत करताना दाखवला असता तर तो आज relatable राहिला असता. त्याने वाचवलेल्या उमरावांमधेही कोणी दयाळू, गरिबांची कणव असलेला असाही नाही. सगळे स्वतःला उच्च समजणारे. Lord Tony's Wife ची नायिका उमरावाची मुलगी. तिचे वर्णन करतानाच 'she was taught to treat all peasants like inhuman dogs' असा उल्लेख आहे. ती अहंकारी, गर्विष्ट आहे. आपल्या बापाने कितीही अन्याय केला असला तरी ती त्याला लगेच माफ करून टाकते. आपल्या बापामुळे ज्याचे कुटुंब उध्वस्त झाले त्या शेतकर्‍याविषयी तिला काडीचीही सहानुभूती नाही. आणि अशा नायिकेला वाचकांनी समर्थन द्यावे अशी अपेक्षा आहे.
निदान ते उमराव जरा कमी अहंकारी, थोडे पाय जमिनीवर असलेले दाखवले असते तर त्यांना सहानुभूती मिळाली असती.

नाही म्हणायला एमा (बहुतेक नक्की आठवत नाही) ह्या जेन आॅस्टिन च्या सर्वगुणसंपन्न नायिकेला नायकाच्या घरी आश्रित म्हणून रहात असताना, कुटुंब प्रमुखाच्या अफ्रिकेतिल अत्याचारांचे सुतोवाच करतील अशी काही चित्रं का लिखाण सापडते. >>> जेन ऑस्टिनच्या कुठल्यात कादंबरीत असा प्रसंग नाही. तुम्ही म्हणत आहात तो Mansfield Park या सिनेमात आहे. मूळ कादंबरीत तसं काही नाही.

माझं मत असं होतं की स्कार्लेट पिंपरनेलची तुलना थोडी अस्थानी आहे. अर्थात दोन identities बाळगणारा तेवढंच ते साम्य आहे. साधारण सुपरहीरो अन्यायाचे परिमार्जन करतो >> ह्याच्याशी सहमत. पिंपरनेल च्या लेखिकेच्या बालपणात घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब त्यात दिसते. अर्थात ती सुखवस्तू घराण्यातून आलेली असल्यामूळे तिचा सुपरहिरो तिच्या वर्गातल्या लोकांना वाचवणारा आहे. ह्याबाबत पर्णिकाला अनुमोदन. पिंपरनेल हा पहिला सुपरहिरो हे स्टॅन ली मूळे जास्त रुढ झाले.

बहुधा हे पाहताना या सिरीजचे फॅन म्हणून तुम्ही एका विशिष्ठ मोडमधे जाउन हे पिक्चर पाहणे अपेक्षित आहे. नाहीतर हा इतका fuss कसला आहे असा प्रश्न पडतो. >> फस आहे तो कॅरॅक्टर डेव्हलपमेंटचा नि नोलान ने ज्या तर्‍हेने स्टोरी मांडली आहे नि त्यात सहजपणे कॅरॅक्टर्स डेव्हलप होत गेली आहेत ( हे एका सिनेमा पुरते मर्यादित नाही तर तिन्ही एकत्र सलग गुंफलेले आहेत) ह्याबद्दल आहे. सुपरहिरो, कॉमिक्स , कूल गॅजेट्स , स्टंटस वगैरे टीपीकल भाग बाजूला ठेवून सुद्धा सिनेमा जबरदस्त एंगेजिंग आहे. मी कुठे तरी हेही वाचलेले कि इतर सुपर हिरोंसारखे बॅटमन अजून पुढे न नेता तीन सिनेमांमधे नीत वळणाअवर आणून संपवला हे पण कौतुकास्पद आहे. Happy

पाहिला पूर्ण "द डार्क नाइट राइजेस". एंगेजिंग होता शेवटपर्यंत. आता मला आधीचा पुन्हा पाहावासा वाटत आहे. पण त्या आधी जोकर बद्दल आणखी माहिती व्हावी म्हणून "जोकर" पाहायला सुरूवात केली. तो चांगला वाटतोय. थोडाच पाहिला आहे - त्या सबवे किलिंग सीन पर्यंत. तेथेच त्याचे ट्रान्सफॉर्मेशन होते असे दिसते. किंवा त्याची सुरूवात.

जोकर सुद्धा नोलानचा आहे असे मी समजत होतो. पण त्याचा दिग्दर्शक टॉड फिलिप्स निघाला. त्याचा "रोड ट्रिप" धमाल होता.

हो मॅन्सफिल्ड पार्क मधला सीन मला पण आठवतोय पण मुळ पुस्तकातही एक अंधुक संदर्भ आहे असे मला अतिशय अंधुक आठवतेय पण खात्री नाही कारण वाचुन खुप वर्षे झालीत.

बाकी ही सगळी पुस्तके वाचुन ह्या उमराव वर्गाबद्दल कुतुहल खुप वाटायचे. इस्टेट आहे अथवा नाही, असल्यास कुणाची किती आहे ह्यावर चर्चा करण्यासाठी ही मंडळी उठसुठ पार्ट्या करत बसली असती आणि ह्याचा कंटाळा आला तर एकमेकांकडे चहा ला जाऊन चालु विषयांवर गॉसिप. इतकी रिकामटेकडी जनता बहुदा नंतर एकता कपूर आणि तिथुन पुढे सगळ्या सिरियल्स मध्येच फक्त दिसली.

फारएण्ड
batman trilogy मधल्या दुसऱ्या भागात The Dark Night. मध्ये जोकर हा खलनायक आहे. हीथ लेजर ने काम केले आहे. हा नोलान चा सिनेमा आहे. तुम्ही बहुतेक जोकर (२०१९) बघत आहात.
batman trilogy आपले मतपरिवर्तन झाले आहे असे मी समजतो.

आता मला आधीचा पुन्हा पाहावासा वाटत आहे. पण त्या आधी जोकर बद्दल आणखी माहिती व्हावी म्हणून "जोकर" पाहायला सुरूवात केली. >> दोन्हींचा एकमेकांशी संबंध नाहीये रे. वेगवेगळे(च) पाहा.

फा - वाकीन फिनिक्स चा जोकर हा ओरिजिनल गोष्टीवर आधारित एक फॅन फिक्शन अशा अर्थाने बघावा मला वाटते. कॉमिक्स मधल्या बॅटमॅन सीरीज मधल्या जोकर ची माहिती मिळवण्यासाठी फारसा उपयोग नाही होणार बहुतेक.

इथे दिलेल्या त्या लिंक मध्ये जोकर चे सर्व पिक्चर्स अगदी वेगवेगळे आहेत आणि कोणताही आधी बघा, कोणताही बघू नका, फरक पडत नाही म्हटलंय.(त्यामुळे मी 2019 चा फिनिक्स चा बघून थांबते आहे.)

पायस : हा असा व्यासंग करण्याची इच्छा आहे माझी Proud तू आणि साने गुरूजी माझे आदर्श आहात.

हा नोलान चा सिनेमा आहे. तुम्ही बहुतेक जोकर (२०१९) बघत आहात. >>>
दोन्हींचा एकमेकांशी संबंध नाहीये रे. वेगवेगळे(च) पाहा. >>> हो ते आज समजले. मी काल ज्या लॉजिकने तो लावला त्याबद्दल लिहीले होते Happy

वाकीन फिनिक्स चा जोकर हा ओरिजिनल गोष्टीवर आधारित एक फॅन फिक्शन अशा अर्थाने बघावा मला वाटते >>
इथे दिलेल्या त्या लिंक मध्ये जोकर चे सर्व पिक्चर्स अगदी वेगवेगळे आहेत आणि कोणताही आधी बघा, कोणताही बघू नका, फरक पडत नाही म्हटलंय >>> हो आले लक्षात.

फस आहे तो कॅरॅक्टर डेव्हलपमेंटचा नि नोलान ने ज्या तर्‍हेने स्टोरी मांडली आहे नि त्यात सहजपणे कॅरॅक्टर्स डेव्हलप होत गेली आहेत >>>
batman trilogy आपले मतपरिवर्तन झाले आहे असे मी समजतो. >>> थोडेफार, हो Happy मी बॅटमॅन बिगिन्स व डार्क नाइट हे दोन्ही इतक्या इंटरेस्टने पाहिल्याचे आठवत नाही. इतका गाजावाजा कसला हे चेक करायला पाहिले होते व कसेबसे पूर्ण केले असावेत असे काहीतरी लक्षात आहे. पण आता जोकर (वेगळा असला तरी सुरूवात केलीच आहे तर) पाहून मग पहिला डार्क नाइट परत बघायचा आहे.

पण "थोडेफार" असे लिहीले कारण तुम्हा काही लोकांची इमर्शन लेव्हल जितकी आहे तितकी माझी एक दोन दिवसांत येणार नाही. बरेच संवाद मात्र खूप भारी आहेत यातले.

आता काही निरीक्षणे
- ब्रूस वेन त्या गोल तुरूंगातून वर येतो तेव्हाचे शूटिंग जयपूर्/उदयपूरचे आहे का? मागचा किल्ला तसा वाटतो व आजूबाजूचा परिसरही. दूरवर निळे ताडपत्री टाइप छत वाली घरे दिसतात
- त्या बेन ने शहर काबीज केल्यावरचे "लोकांना" सत्ता परत देण्याचे क्लेम्स वगैरे हे विसाव्या शतकातील कम्युनिस्ट क्रांती टाइप वाटते.
- गोथॅम शहर या हल्ल्यातून वाचून पुन्हा उभे राहील वगैरे वक्तव्ये अटलांटा एअरपोर्टची आठवण करून देतात. तेथे टर्मिनल्सच्या खाली ट्रेन व वॉकवे आहेत तेथे एका वॉकवे मधे अटलांटाबद्दल सुरेख भित्तीचित्रे व वर्णने आहेत. त्यात सिव्हिल वॉरमधे झालेल्या हानीतून इथे एक शहर उभे राहील वगैरे तेव्हाची वक्तव्ये तशीच वाटतात.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा साधा उल्लेखही जेन आॅस्टिन, आर्थर कॉनन डॉइल, ऍगाथा ख्रिस्ती ह्या त्यावेळच्या लोकप्रिय लेखकांनी केलेला दिसत नाही. >>> पर्णिका हे भारी आहे.

डाउनटन अ‍ॅबी मधेही त्यातला तो "श्रिंपी" मुंबईला जातो वगैरे उल्लेख आहेत पण भारताच्या लढ्याचा उल्लेख नाही. अर्थात खुद्द ब्रिट्नमधल्या सर्वसामान्य लोकांचे सुद्धा फार क्वचित उल्लेख आहेत तेव्हा यात आश्चर्य नाही.

त्यात एक सीन आहे. ते सगळे जण लंडन मधे काही दिवस आलेले असतात तेव्हा मधे त्यांचे नोकर लोक एक दिवस सुट्टी काढून बीचवर जातात. तो बीच म्हणजे ब्रायटनचा किनारा. त्या सिरीजमधल्या कालावधीनुसार ते लोक तेथे १९२४ च्या आसपास आलेले असतात. आपल्याला जुन्या काळातील वाटणारी ही सिरीज. पण तो एपिसोड बघताना हे जाणवत होते की त्याच्याही काही वर्षे आधी त्याच किनार्‍यावर आसपास कोठेतरी सावरकरांनी 'ने मजसी ने' रचले होते! तो संदर्भ आपल्याला एकदम वेगळाच फील देतो.

इतकी रिकामटेकडी जनता बहुदा नंतर एकता कपूर आणि तिथुन पुढे सगळ्या सिरियल्स मध्येच फक्त दिसली. >>> Lol

माझ्याकडून काही उणे अधिक झाले असेल तर एक डाव माफी करावी. >>> केकु - आप तो शरमिंदा कर रहे है! Happy काय झाले?

पिंपळनेरकर >>> हपाने एकदम त्याला उमरावांमधून माणसांत आणले Happy

भारी चर्चा ...
खूप जण खूप जणांची वाक्यं कोट करून त्यापुढे तीन ग्रेटर दॅन खुणा टाकून पुढे काय काय लिहितायत... त्याचा डोक्यातला ट्रॅक पकडून ठेवताना तारांबळ उडतेय Proud

rmd, हपा Biggrin

Pages