चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर
स्कार्लेट पिंपरनेल ची लेखिका
Baroness Emma Magdolna Rozália Mária Jozefa Borbála “Emmuska” Orczy de Orci
(September 23, 1865 – November 12, 1947)
आणि मूवी लिंक्स
https://youtu.be/TpBkJ0Xb6ME
https://youtu.be/jvtVrQb5DTY
एक १९८२चा आणि एक १९३४ चा आहे.
Enjoy!

- ब्रूस वेन त्या गोल तुरूंगातून वर येतो तेव्हाचे शूटिंग जयपूर्/उदयपूरचे आहे का? मागचा किल्ला तसा वाटतो व आजूबाजूचा परिसरही. दूरवर निळे ताडपत्री टाइप छत वाली घरे दिसतात
<<<<<<
बरोबर, राजस्थानातलंच लोकेशन आहे. जोधपुरातला मेहरानगढ किल्ला आहे तो!

यारा दिलदारा एकदाचा पाहायला सुरूवात केली. या पिक्चरमधल्या कुठल्याही एका घटनेचा कुठल्याही दुसर्‍या घटनेशी काहीही संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सुरूवातीलाच एका दुकानदाराकडे काही रँडम लोकं येऊन नये साल का चंदा मागतात. तेवढ्यात दुसर्‍या दिशेने अजून काही रँडम लोकं येतात. मग कळतं की या दोन टोळ्या आहेत. पहिली टोळी शक्ती कपूर कडे जाते आणि तो डायरेक्ट हातगाडीवर उडी मारून सुपरमॅन स्टाईल जायला लागतो. समोरून दुसर्‍या टोळीचा हेड हेडला अरब स्टाईल काळा रूमाल बांधून येतो आणि ढॅण! एकदम गाणं सुरू होतं. कट!
परत तोच दुकानदार, त्याच टोळ्या, तोच वाद. मग कुठूनसे अमजद खान आणि कादर खान येतात. ते म्हणे पोलिस असतात. मग दोन्ही टोळ्या अंताक्षरी खेळल्यागत गाणी म्हणायला लागतात. वैतागून दोन्ही पोलिस त्यांना हाकत हाकत नेतात. कट!
मग एक रोहिणी हट्टंगडी असते. झी च्या मालिकांसारखे हिच्याकडे काहीतरी पेपर्स सही करायला आणतात. मग कळतं की अरे यावर नवर्‍याची पण सही लागणारे. नवरा जाफ्री वॉक करून येतायेता कोणाची तरी बिघडलेली गाडी दुरूस्त करून देतो आणि उशीरा परततो. मग हाताला ग्रीस, बायकोने टाकलेला तुक आणि असिफ शेखचे आईला दिलेले शहाणपणाचे धडे यातून कळतं की हट्टंगडी नसती तर जाफ्रीबाबा अतिसामान्य आणि मेकॅनिक राहिले असते. कट!
एक साधारण अपार्ट्मेंट कॉम्प्लेक्सच्या पार्काच्या साइजची बाग असते. तिथे आगाऊ असिफ फिरत फिरत जातो. तिथे एक मुलगी केस उडवता उडवता पिंजर्‍यातले पक्षी उडवून लावत असते. नजरानजर होते. कट!
एक बार असतो. त्यात बेर्डे असतो. मगाशी पाहिलेली केसउडवी वेट्रेस म्हणून काम करत असते. सगळ्या टेबलांवरची सगळी लोकं तिच्यावर लाईन मारत असतात. तिचा बाप डेंजर असतो म्हणे. मग दारूडा अशोक सराफ येतो. तोच तिचा बाप. मग एक सो कॉल्ड फनी सीन होतो ज्याच्या शेवटास आपल्याला कळतं की शक्ती कपूरला तिच्याशी लग्न करायचं आहे. कट!
परत तीच अकॉपा साइजची बाग येते. परत दोघे समोर येतात. नजरानजर. कट!
केसउडवी मैत्रीणीला विचारते ये प्यार क्या होता है? तर म्हणे इंतजार असेल तर तेच प्यार. मग केसउडवी आगाऊ आसिफला इंतजार करायला लावते. तो संध्याकाळभर इंतजार करतो. तेवढा वेळ ही बया लपून त्याचा इंतजार पहात राहते. मग रात्र होते, पाऊसपण येतो म्हणे. मग आसिफ कारमधे बसून इंतजार मोड ऑन करतो. ती एकटीच पावसात नाचते. कट!
हट्टंगडी थेट डीएस्पी ला कॉल करून बेटा रातभर घर आयाच नही म्हणून तक्रार करते. बेट्याच्या गाडीवर केसउडवी 'मी आले होते' अश्या अर्थाचं काय काय लिहून गेलेली असते. हे लिहावं लागणार हे माहिती असल्याने ती पार्कमधे जातानाच पिवळा, केशरी, गुलाबी असे क्रेयॉन घेऊन गेलेली असते. कट!
कादर आणि अमजद चौकीत फालतूपणा करत असतानाच त्यांना आसिफला शोधायची डूटी लागते. मग ते त्याला शोधून त्याच्या हातांना दोरी बांधून त्याला चौकीत न्यायला लागतात. मग समोरून एक हिजड्यांचा ग्रूप येतो. कट!
एक डीएस्पी असतो. तो विजू खोटे असतो. कादर आणि अमजद त्याच्या समोर उभे राहतात. तो विचारतो हट्टंगडी पुत्र कुठे आहे? ते दोघे बाजूला होतात आणि त्यांच्या मागून तो मगाचचा ग्रूप येतो. त्यात असिफही निळा-गुलाबी घागरा चोली घालून असतो. मग हे सगळे एक पॅरडी गाणं म्हणतात. कट!

आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय. बाकी लिहीतेच सावकाश.

आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय. बाकी लिहीतेच सावकाश.
>>
ह्याट्ट
यारा दिलदारा वर लिहिताना बिन तेरे सनम चा उल्लेखही नाही...
ई बात कुछ हजम नाहीं हुई...

आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय >> Lol
ती हिरवीन केसाला रिबिनी बांधते आणि 36 तास झोपून उठल्या सारखे सुजीतकुमार नयन घेऊन वावरते... तीच ना?
गरीबांची सोनू वालिया

अशा चित्रपटांसाठी (वेगळा धागा नको असेल तर) इथे ऐच्छिक सोय आहे.
https://www.maayboli.com/node/84724

आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय. बाकी लिहीतेच सावकाश. >> तुझे ठीक आहे ग पण रोहिणी हट्टंगडीचा असा काय नाईलाज झाला होता ह्यात काम करायचा ते शोध Happy बिन तेरे सनम बघूनही तुला सिनेमा बघावासा वाटला कसा ?

पाहिले पहिले गाणे, भयंकर आहे ! काय तो हिरो, काय ती हिरवीण, काय तो काळा स्लीवलेस बनियान , काय ते एडिटिंग, एकमेकाशी संबंध नसलेले दोन सिनेमे घेऊन प्रत्येकी एकेक मिनिट मिक्स केले असावेत असे वाटते. याला टाईम डोमेन मल्टिप्लेक्सिंग म्हणतात किंवा पायथॉन मध्ये झिप फन्क्शन !

‘बिन तेरे सनम’ माझे अगदी लाडके गाणे आहे. तेव्हाही आवडायचे, आताही आवडते. तेव्हा खुप हिट झाले होते.

हा पिक्चर पहायची काहीही मजबुरी नाही. मलाच पहायचा होता. पण गेली कित्येक वर्षं मुहूर्त लागत नव्हता तो लागला एकदाचा. म्हटलं बघावं इतकं सुश्राव्य गाणं ज्या पिक्चर मध्ये आहे तो कसा आहे? आणि पाहायला लागल्यावर इथे शेअर करणार नाही असं होईल का? Happy

यारा दिलदारा वर लिहिताना बिन तेरे सनम चा उल्लेखही नाही..>>>> आत्ताशी फक्त अर्धा तास झालाय आणि पात्र परिचय चालू आहे. इतक्या सुरुवातीलाच हुकुमाचा एक्का घालायला ते लोक काय येडे आहेत का? Proud

विकु, फक्त गाण्यातले कपडे पाहून असं म्हणतात, उरलेल्या पिक्चरला काय म्हणाल? आसिफ ने मोठ्ठे तारे असलेला टीशर्ट घातलाय एंट्रीलाच. हिरविणीने शाळेतला पिनाफोर घातलाय चक्क एका सीन मध्ये. पांढरा शर्ट आणि डार्क निळा पिनाफोर!
सईद जाफरी, जो दुनियाका सबसे महान मेकॅनिक है, तो लवकरच त्या कपड्यात दिसेल याची मला खात्री आहे Proud

इतक्या सुरुवातीलाच हुकुमाचा एक्का घालायला ते लोक काय येडे आहेत का?
>>
म्हणून काय हीरो ला छक्का बनवायचं Uhoh
(त्यात असिफही निळा-गुलाबी घागरा चोली घालून असतो)

मेन गाणं बघायला आलेल्यांना मोकळं करायचं ना
नाहीतर बाकी सिनेम्यात त्यांना झोप आली तर गाणं मिस व्हायचं
अन् तसंही प्री यूट्यूब एरा मधे गाण्याचा व्हिडिओ बघायला फारसा स्कोप नसायचा (छायागीत अन् चित्रहार सोडता)

सईद जाफरी, जो दुनियाका सबसे महान मेकॅनिक है,
>>
हे मी दौड मधल्या चाको च्या टोन मधे ऐकलं

यारा दिलदारा म्हटलं की तीनच गोष्टी आठवतात - ‘बिन तेरे सनम‘, ‘तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह‘ आणि बिन तेरे सनम मधलं, ‘यह जानकर बलमजी Happy

बिन तेरे सनम>> फार रोमँटीक वाटतं ऐकायला. कित्येक दिवस मला वाटायचं ओरिजनल गाणं वेगळंच असेल हे असिफ शेख वालं स्पुफ आहे Lol

बरोबर, राजस्थानातलंच लोकेशन आहे. जोधपुरातला मेहरानगढ किल्ला आहे तो! >>>> धन्यवाद श्रद्धा.

तर लोकहो, मी जोकर पूर्ण पाहून मग पुन्हा पहिला डार्क नाइट पाहिला. आणि आधी पाहिला होता त्यापेक्षा नक्कीच जास्त एंगेजिंग वाटला.

बाय द वे, त्यातील MCU चा उल्लेख मेजर क्राइम युनिट म्हणून असला तरी तो मार्व्हल ला कोपरखळीसारखा आहे ना? आणि त्या दोन्ही बाजूला "हेड" असलेल्या नाण्याचे ओरिजिन बॅटमॅन कॉमिक्स मधेच आहे का? आपल्याकडे शोले मधे त्याचा चपखल वापर आहेच.

यारा दिलदारा मधले गाणे गेल्याच आठवड्यात ऐकले होते.
असाच आणखी एक सिनेमा होता. सातवां आसमान. तो एका मुलीबरोबर (गफ्रे नाही) पाहिला होता Proud
त्या आधी तिच्याच मोठ्या बहीणीबरोबर ( तिच्याबरोबर जायला आईला वेळ नव्हता म्हणून) शशीकपूर नंदाचा परदेसियोंसे ना अखिया मिलाना गाणे असलेला चित्रपट पाहिला होता. Proud
दोघींवर लाईन मारत असलेलं पब्लीक एव्हढासा नाही तर या नजरेने बघायचं बरेच दिवस.
बरेच दिवस सेलेब्रिटी म्हणून वावरलो त्या वयातच.

तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह>>>
हे ऐकायला आवडायचे त्याकाळी. पाहिले होते का नाही आठवत नाही..

दोन्ही पाहिली आता. उगीच पाहिली. पण ‘बिन तेरे सनम’ वर्ड बाय वर्ड लक्षात आहे मला नी नवऱ्याला पण. अशीच अल्गो लक्षात राहती तर…

सातवां आसमान >>> विवेक मुश्रन नी मनुषा कोईरालाचा ना? त्यातलं एक गाणं पण वाजवून वाजवून फेमस केलं होतं तेव्हा.

गरीबांची सोनू वालिया >>>> मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर.

- ‘बिन तेरे सनम‘, ‘तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह‘ आणि बिन तेरे सनम मधलं, ‘यह जानकर बलमजी >> चौथी गोष्ट अ‍ॅड कर त्यात - हमारे पापा और हम - अमित कुमार ने अशक्य धुमाकूळ घातलाय त्या गाण्यात.

असाम्या, पिक्चर आला होता तेव्हा कॅसेट वगैरे घेतली होतीस की काय? Proud
तसं पिक्चर सुरू होता होता एक बरं गाणं आहे 'अब तो तुम्हे है दिखाना हम में है कितना दम' असं काहीतरी. पण त्यात शक्ती कपूर आणि गँग आणि रायव्हल गँग इतकी पपलूगिरी करतात की गाण्याला पश्चात्ताप झाला असेल.

इच्छुकांसाठी टीप : रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. Proud

टोटल फोमो आल्याने थोडा पाहिला यारा दिलदारा. काय भीषण फालतू पिक्चर आहे! कादर, अमजद, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे - इतके कॉमेडीचे एक्के वाया घालवले आहेत. विजू खोटेने शोलेची परतफेड करायला अमजदचा बॉस म्हणून काम स्वीकारलेले दिसते.

गरीबांची सोनू वालिया >>>> मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर. >>> Lol खरे म्हणजे रोहिणी हट्टंगडीच शार्प दिसते तिच्यापेक्षा यात. ती हिरॉइन सुचित्रा सेन ते बबिता अशा विविध अभिनेत्रींचे मिश्रण वाटते. सईद जाफ्री कोणत्यही अँगलने मेकॅनिक वाटत नाही. आता कधीही तो बासमती तांदूळ किंवा तत्सम "शाही जायकेदार" कसलीतरी जाहिरात करेल असे वाटते.

र्म्द, आता तुझी पोस्ट नीट वाचली. धमाल लिहीले आहे. सगळे सीन्स आठवले.

या पिक्चरमधल्या कुठल्याही एका घटनेचा कुठल्याही दुसर्‍या घटनेशी काहीही संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. >>>
एक साधारण अपार्ट्मेंट कॉम्प्लेक्सच्या पार्काच्या साइजची बाग असते. >>>
हे लिहावं लागणार हे माहिती असल्याने ती पार्कमधे जातानाच पिवळा, केशरी, गुलाबी असे क्रेयॉन घेऊन गेलेली असते. >>> Lol फुटलो.

खरेच त्या बागेबद्दल संशोधन केले पाहिजे. अगदी इतक्याच कोपर्‍यात काय ते सीन्स घ्या असे ठरल्यासारखे सीन्स आहेत. एकतर असे कोण तरूण पोरं रॅण्डमली एकटे एखाद्या बागेत जातात? त्यात "त्याने मान वळवली व तेथे ती केस उडवत, पक्षी उडवत, लाजताना दिसली" अशी काहीतरी पटकथा असावी. पण त्या आधी काही सेकंद तो तेथूनच चालत येतो. तेव्हा त्याला ती समोर दिसायला हवी तेव्हाच. पण मग तो मान वळवायचा शॉट घ्यायचा मतलबच राहिला नसता.

झी च्या मालिकांसारखे हिच्याकडे काहीतरी पेपर्स सही करायला आणतात >>> Happy हे ही भारी. आणि काय ते ग्रीस. हात धुवायचा शोध तेव्हा लागला नसावा. तेव्हापासून कोणीही जेवायला बसले की रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली.

आसिफ ने मोठ्ठे तारे असलेला टीशर्ट घातलाय एंट्रीलाच >>> त्याला बहुधा कोणीतरी तुझी स्टार पॉवर यात दाखव म्हंटले असावे Happy

तेव्हापासून कोणीही जेवायला बसले की रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली. >>> Lol
झाले आता लोक यारा दिलदारा ला (गेम्स्टॉप च्य स्टॉकसारखे) मीम हिट बनवणार का?

बासमती तांदूळ किंवा तत्सम "शाही जायकेदार" >>> "हाहा:
स्टार पॉवर >> हा सुप्पर होता.
रमडची पोस्ट पण भारी.

रमडची पोस्ट वाचताना हे आधी वाचलेले आहे असे वाटून गेले. नंतर आठवले कि हा पिक्चर गेल्या आठवड्यात सुरू केला होता.
आता मेंदूत असा लोच्या झालेला आहे कि जे पाहिलेय ते वाचले असे वाटते आणि जे वाचलेय ते पाहिलेय असे वाटते.

हा सिनेमा नक्की पाहणार. बॅटमॅन बघण्यात वेळ दवडण्यात अर्थ नाही.

यारा दिलदारा पुढे चालू. कालच्या टीपेत भर म्हणजे पिक्चरमधे नुसता घटनांचा संबंधच हरवला नाहीये तर एकाच सीन मधल्या घडणार्‍या गोष्टींचा पण आपसात संबंध नाहीये.

पॅरडी गाण्यातून अमजदचे आडनाव देदे आणि कादरचं आडनाव लेले आहे यापलिकडे काहीही हाती न लागल्याने पिक्चर पुढे सरकतो. हट्टंगडी काकू पोराला फैलावर घ्यायचा निष्फळ प्रयत्न करताना दिसतात. आगाऊ आसिफ उर्फ राजेश तो कसा प्रेमात पडलाय पण त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही हे सांगतोय. इथे कलात्मकता पहा. आसिफच्या प्रत्येक वाक्यानंतर केसउडवी उर्फ रजनी तिच्या मैत्रिणीला हे असलंच काहीतरी सांगतेय. कट् टू अकॉपा साइजची बाग. आज इथे ठायी ठायी कपल्स दिसताहेत. राजेश आणि रजनी दोन ध्रुवांवर दोघे आपण स्टाईलने उभे राहून एक्मेकांशी प्यार का इजहार करतायत आणि लिटरली वीत वीत मोजत एकमेकांच्या जवळ येतायत. मेरे बिन रहा नही गया ना असं त्याचं वाक्य ऐकून मनातल्या मनात मला बरं वाटलं की आता बिन तेरे सनम लागणार. पण नाही! इथे तुमही हमारी हो मंझिल माय लव्ह चालू होतं.

गाणं ऐकायला सुंदर आहे पण बघायला... काऊबॉय पोषाखातला राजेश, घोडे, हॅमॉक, आग, त्यावर टांगलेली किटली असा निरर्थक जामानिमा आहे. रजनी कपात किटलीतला द्राव ओतते. तर इकडे राजेश फावड्याने गवताचे भारे तिच्या अंगावर टाकतो. हिरवीण आहे का घोडी ? त्यातलं बरंच वैरण तिच्या कपात पडतं वगैरे वगैरे. गाणं संपताना शेवटच्या कडव्याला सर्वत्र न्यू इयरला करतात तसे डेकोरेशन दिसतं. आत्तापर्यंतच्या प्रसंगांत ही एकच कंटिन्यूइटी! आठवा - सुरूवातीला ते गँगवाले न्यू इयरचा चंदा गोळा करत असतात नाही का?

रात्रीची वेळ असते. डोक्याला अरब स्टाईल काळा रूमाल वाल्याची (याचं नाव जॉनी आहे) गँग बहुतांश हिंदी पिक्चरांमधे असलेल्या मंदिराच्या पायर्‍या उतरते आहे आणि 'कोणीतरी अकेली आहे चल पळवूया' अश्या गप्पा मारते आहे. तर खाली एक लाल रंगाची गाडी आहे. ती चोरायचा त्यांचा प्लॅन नक्की होतो. तेवढ्यात गाडीच्या पलिकडून शक्ती कपूर (याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा?) आणि गँग उगवतात आणि आम्ही गाडीवर रूमाल टाकलय म्हणतात. मग असं ठरतं की कबड्डी खेळून गाडी कोणाची होणार हे ठरवायचं. परदेस काढायच्या आधी घईने या पिक्चरचा अभ्यास केला होता हे मला माहिती नव्हतं. कबड्डी संपल्यावर मारामारी सुरू होणार इतक्यात तिथे लेले-देदे येतात. ती गाडी म्हणे लेलेचीच असते. आणि तो गाडीचं दार उघडतो तेव्हा आतून गुड्डी मारूती निघते! ही देदे ची बहिण. मागच्या सीटवरून लेलेचा भाऊ पण गाडी बाहेर निघतो. यांच म्हणे प्रेम असतं एकमेकांवर! आणि त्या दोन टोळ्या कबड्डी खेळत होत्या तुमची गाडी पळवण्यासाठी तेव्हा काय पॉपकॉर्न खात मॅच बघत होते की काय हे? तर ते असो. यांचं लग्न इथे पक्कं होतं.

कालच्या अपडेट मधे बेर्डे बद्दल डीटेल्ड लिहीलं नव्हतं. पण तो परत परत दिसत राहणारे हा धोका आज माझ्या लक्षात आला. याला रजनीशी लग्न करायचं आहे. आधीचा जो फनी सीन होता तो याच संदर्भात होता. आता बेर्डे एक रिमोट वाली कार चालवतोय. कार पकडायला अशोक सराफ धावतोय. मग तुम्हारे बेटी की शादी मुझसे कर दो वरना मै तुमपे गुंड सोडूंगा वगैरे होतं. गुंड काका तयारच असतात तिथे. ते अशोकचा गळा धरून बदडणार इतक्यात तिथे येतो रामय्या वस्तावय्या. तो अशोकला वाचवतो आणि स्वतः तीच टेप लावतो - रजनीशी लग्न करून दे अशी. आता रजनी येते आणि म्हणते मला इज्जत असलेल्या माणसाशी लग्न करायचं आहे. तुझी है का भौ इज्जत? रामय्याला समजतं की हिला अमिरोंवाली इज्जत पाहीजे. तो तात्काळ मारूतीरायाच्या चरणी शरण जातो की मला इज्जत मिळवण्यासाठी आशिर्वाद दे आणि बॅग घेऊन चल दियेऽऽऽऽ (कुठे? कोण जाणे! त्याला 'इथे किलोवर इज्जत मिळेल' अशी पाटी असलेलं दुकान माहिती असावं)

हिरवीणीला ऑलरेडी इज्जत असलेला राजेश माहिती असल्याने ती त्याच्यासोबत पतंग उडवायला जाते. मागून careless whisper चं म्युझिक. खूप वारा आहे. गोदीच्या पदरासारखा तिचा फ्रॉक उडतोय आणि गुडघ्याच्या वर जातोय थोडाथोडा. इथे जरा कन्फ्युजन आहे. मधेच राजेश तिचा फ्रॉक उडू नये म्हणून धरतो. निदान सुरूवातीला आपल्याला तसं वाटतं. मग असं २-३ वेळा झाल्यावर तो फ्रॉक धरतोय की अजून वर करतोय ते समजेनासं होतं. ते त्यांनाही कळलं नसल्याने ते एकदम जमिनीवर लोळण घेतात. पुन्हा फ्रॉकचं टोक धरण्याचा प्रयत्न. आता मात्र रजनी विव्हळते - नही राजेश. तिला नेमकं काय झालं हे राजेशलाही कळत नाही आणि आपल्यालाही. तर म्हणे मै अब तुमसे और दूर नही रह सकती. त्यावर तो लग्नाचं विचारून टाकतो. उत्तरादाखल हाँ असं अजून विव्हळणं ऐकू येतं. अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला?

पुढचा भाग ब्रेक के बाद!

विजू खोटेने शोलेची परतफेड करायला अमजदचा बॉस म्हणून काम स्वीकारलेले दिसते.
बासमती तांदूळ किंवा तत्सम "शाही जायकेदार"
"अपने हाथ धो ले"
>>>> Rofl अगदी अगदी!

असाम्या, पिक्चर आला होता तेव्हा कॅसेट वगैरे घेतली होतीस की काय? >> तुला कसं कळलं ? Lol यारा दिलदारा/खिलाडी हे भयंकर पॉप्युलर काँबो होते जतिन ललित साठी. हे सिनेमाबद्दल थांबव नाहितर फोमो येऊन बघायला लागेल Wink

हिरवीण आहे का घोडी ? >>>
याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा? >>>
त्याला 'इथे किलोवर इज्जत मिळेल' अशी पाटी असलेलं दुकान माहिती असावं >>>
गोदीच्या पदरासारखा तिचा फ्रॉक उडतोय >>>
अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला? >>> Lol

मस्त चाललाय रिव्यू. येऊदे अजून

Pages