टॉप टेन / ट्वेन्टी / ++ गाजलेले आयकॉनिक संवाद / सीन्स

Submitted by रघू आचार्य on 14 September, 2023 - 12:17

भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.

त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).

बेदरकार नजर, शांत पण करारी चेहरा, थंड डोळ्यातून धुमसणारी आग, सिगारेटचं थोटुक चघळत हात न लावता ते फूक मारून फेकण्यात दिसलेली बेफिकिरी आणि त्या सुप्रसिद्ध आवाजात येणारा हा अजरामर डायलॉग
तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे, और मै तुम्हारा यहा पर इंतजार कर रहा था..

या संवादाच्या मागे हप्ता मागणारे, त्यांची दहशत, मधेच शशीकपूरचे नोकरी न मिळण्याचे सीन्स (ज्यामुळे प्रेक्षक आपलेच विश्व पडद्यावर दिसतेय म्हणून हरखून जातो) , त्याबद्दलचा असंतोष आणि त्या असंतोषाला वाचा फोडत नायक म्हणतो..

"रहीम चाचा, पिछले पचास सालों मे जो नही हुआ , वो अब होने जा रहा है.
अगले हप्ते फिर एक कुली हप्ता देने से इन्कार करने वाला है "

सलीम जावेद चे हे जळजळीत संवाद. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वाक्य जिथे सोडलंय त्यावर गझलेच्या नियमाप्रमाणे पहिल्या ओळीचा कल्पनाविस्तार किंवा विरोधाभास किंवा धक्कातंत्र असायचे. ही शैली जावेदची. लाह्या फुटावेत तसे संवाद निखार्‍यांवर तडतडायचे. नाट्य फुलवायचं काम सलीमचं.

नुसते असे संवाद लिहून जमायचं नाही.
त्या डायलॉगची डिलीव्हरी करण्यासाठी बेदरकार नजर, दमदार आवाज, खर्जातला स्वर आणि श्वासावरचं कमालीचं नियंत्रण असलेला ताकदीचा अभिनेता लागायचा.

अशा संवादांसाठी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना पर्यायच नव्हता.

शेरोशायरी, उच्च अभिरूची असलेली भाषा आणि अमिताभ , शत्रू सारखीच संवादफेक पण काव्यात्म संवादफेक म्हणून जानी राजकुमारची लोकपियता सुद्धा बुलंदीला होती. राजकुमार कधीच क्रमांक एकला नव्हता किंवा कधीच पिछाडीलाही नव्हता. तो राजकुमारच होता. त्याच्या संवादफेकीसाठी सिनेमे गाजलेले आहेत.

"चिनाय सेठ जिनके अपने घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर फेका नही करते"
किंवा
अगदी हळुवार प्रेमिक बनून
" आपके पैर देखें , हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे"

संवादफेक ही कला आहे हे फिल्म इंडस्ट्रीला शिकवणारे आद्य संवादफेकर म्हणजे दिलीप कुमार.

"कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिये पिता है "
https://www.youtube.com/watch?v=Lf2Gc14434U&t=408s

मराठी चित्रपटांमधे निळू फुले यांच्या संवादफेकीला तोड नाही.
त्यांचा लक्ष्मी या चित्रपटातला " मास्तर शाळा कुणाची ? पोरगं कुणाचं ? मंग पास का नापास ते कोण ठरवणार ?" हा संवाद एके काळी तुफान गाजला होता. हल्लीच्या पिढीला त्यांचा "बाई वाड्यावर या" एव्हढाच डायलॉग माहिती आहे. बेरकी नजर, ओठ घट्ट मिटून खालचे दोन्ही जबडे गोल फिरवत व्यक्त केलेला संताप आणि नंतर केलेली संवाद फेक हे अजब रसायन होतं. निळूभाऊंना तोड नाही.

सीन्स "

एरीअल व्ह्यू ने खाली गाव दिसतो. क्रेन खाली येते तसा गावातला बाजार , बाहेरून येणारा रस्ता हे टप्प्यात येतं. बाजाराच्या एका टोकाला कापूस पिंजारी कापूस पिंजत बसलाय. त्याचा वाद्यासारखा येणारा आवाज, कॅमेरा पुढे जातो तसा तो आवाज क्षीण होत घणाचा आवाज ऐकू येतो तसा लोहाराचा भाता दिसतो, मग विक्रेत्यांचा गोंगाट, एक जण दगडाला टाके मरत बसलाय... हळू हळू प्रत्येक जण काही न काही करत असलेला दिसतो... त्यांचे वेगवेगळे ऐकू येणारे आवाज आता एकत्र ऐकू येऊ लागतात. सुरूवातीला ते वेगवेगळे ऐकवलेले असल्याने आता गोंगाटातही त्यांचे अस्तित्व कानाला जाणवते. एक लहान मूल आईला सोडून रस्त्यावर धावतं...

आणि इतक्यात डाकू घोड्यांवरून गावात घुसतात..

हा सीन एव्हढा जबरदस्त आहे. तो क्रमाक्रमाने हायपॉईंटला नेला जातो. डाकूंच्या पुढे झुकलेले गावकरी. ठाकूरचं येणं...
त्याच्या असहाय्यते वर हसणारे डाकू आणि क्षणार्धात सीन पलटतो आणि वेग पकडतो. शोले चं हे वैशिष्ट्य या सीनमधे दिसतंच दिसतं. या सीननंतरचा गब्बरचा आयकॉनिक सीन. त्याची सर शाकाल ला सुद्धा नाही आली.

अशा डायलॉग डिलीव्हरीची आणि अशा आयकॉनिक सीन्सची टॉप टेन किंवा टॉप ट्वेन्टी किंवा कितीही अशी यादी बनवायची झाली तर तुम्ही कोणत्या संवादांना / सीन्सना प्राधान्य द्याल ?

( लिंक्स देण्याची आवश्यकता नाही. दिले तरी काहीच हरकत नाही. तितकीच मजा येईल ).

यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गब्बर के ताप से... >>> एक्झॅक्टली! शोले च्या पटकथेतील भाषा हा एक वेगळाच चर्चेचा विषय आहे. उत्तरेकडच्या एखाद्या गावातील स्थानिक वाटतील असे बरेच शब्द वापरलेले आहेत. "वही उसका टेटवा दबा देता" ई Happy

हिंदीतील म्हणीं व रोजच्या बोलीभाषेतील वाक्प्रचार यांचा भरपूर वापर आहे. "काला अक्षर भैंस बराबर", "आज आया है ऊंट पहाड के नीचे", "आम के आम गुठलियोंके भी दाम" ई म्हणी. तसेच चोर, डाकू, पोलिस व अ‍ॅक्शनच्या रणधुमाळीत एकदम अस्सल घरगुती वाटणारा संवाद - जय शी बोलताना अनेक पावसाळे व अनेक व्यसनी लोक पाहिलेली लीलामौसी म्हणते "मुझ बुढिया को समझा रहे हो बेटा, ये आदते किसीकी छुटी है कभी". त्या धमाल विनोदी सीन मधे जय एकेक अतरंगी खुलासे देतोय पण ही अगदी एखादी जबाबदार मावशी जसे रिअ‍ॅक्ट करेल तशीच करत आहे. त्यामुळे तो सीन आणखीनच मजेदार झालाय.

हिंदी भाषिकांत "नाहीतर असं व्हायचं" अशा अर्थाने गमतीने "पता चला" असे वापरतात. त्याचाही यात संजीव कुमार व जया यांच्या त्या होली च्या सीन मधे वापर आहे. "तिथे तर तुझी काही ट्रिक नाही ना? नाहीतर आम्ही दोघेही रंगाने भरलेल्या पिंपात उभे आहोत असे व्हायचे" असा काहीतरी संवाद आहे संजीव कुमारच्या तोंडी.

When you marooned me on that God foresaken spit of land, you forget one very important thing mate

..

..
..
I'm captain Jack Sparrow

Pages