भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, भरत
धन्यवाद ! !
मूळ संदर्भ उत्तम आहे.
..
पण मराठी माणसाचे सरसकट असे वर्णन पटलं नाही +११११
जगामध्ये कुठल्याही प्रकारची सजातीय मंडळी (अपवाद वगळता ) एकमेकांशी दीर्घ संपर्क आल्यामुळे अशीच वागत असतात ! फक्त मराठीच असे असतात असे समजायचे काही कारण नाही. Happy
वै म
" अतिपरिचयात अवज्ञा.."

कावीळ ( रोग)
याचे किती समानार्थी असावेत पाहा :

कावीण, कामीण / न , कामिणी , काकय, कामला, कामळ ,
कांबील, कौळिक, काऊर, कायकोळ, कऊळ , कवळ , कवळी.

निचोड
मराठी शब्दकोशात सापडला नाही मग हिंदी पाहिला तेव्हा मिळाला :
= सारांश, मुख्य तात्पर्य

संदर्भ वाक्य असे आहे :
.. मानवी अनुभवातून आलेल्या शहाणपणाच्या निचोडामुळे..

कोण लिहितं असं वाक्य? धुतलेले कपडे पिळण्यालाही हिंदीत निचोडना म्हणतात. असं लिहिणार्‍याला निचोडून काढलं पाहिजे.

एलकुंचवार विदर्भातले आहेत ना? हिंदीचा प्रभाव त्यामुळे असावा.
बोलीच्या लहजात असे शब्द खपून जातात - नव्हे कानाला गोडही लागतात. पण लेखनात खड्यासारखे टोचतात खरे!

काही इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय आता अनेकजण वापरतात, विशेषत: सरकारी कागदपत्रात. काही योग्य वाटतात, काही ओढूनताणून आणलेले :

Generalisation = सरसकटीकरण

Presentation = सादरीकरण

Documentation = दस्तावेज़ीकरण

Improvisation= दर्जोन्नती

Replacement rate = प्रतिस्थापना दर

काही अगदीच न जमलेले (माझे मत) :

Impossibly beautiful = अशक्य सुंदर

Concreting = कॉंक्रेटीकरण

मला तो लोकार्पण सोहळा शब्द पण जरा विचित्र वाटतो. का ते नाही सांगता येणार. बहुतेक समासांतर्गत लोक शब्द आला तर माझा मेंदू तो भूलोक, भुवर्लोक वगैरे अर्थ लावतो त्यामुळे असेल.

काही योग्य वाटतात, >>> +१
त्याच धर्तीवर
सार्वत्रिकीकरण ( ? Universalisation) असावा.
( जागतिकीकरणच्या पुढची पायरी )


.... लोकार्पण सोहळा....

शब्द सोडा, जनतेच्या / करदात्यांच्या पैश्यातून उभारलेले प्रकल्प लोकप्रतिनिधींनी जनतेलाच 'लोकार्पण' करणे हे विसंगत आहे.

स्वतःच्या पैश्यातून एखादी सुविधा निर्माण करून ती सार्वजनिक वापरासाठी खुली केली तर त्याला 'लोकार्पण' योग्य वाटेल.

Concreting = कॉंक्रेटीकरण
>>>> जाऊ द्या, सारवून घेऊ यापेक्षा वाटलं. Lol

निचोडना Lol

>>> जनतेच्या / करदात्यांच्या पैश्यातून उभारलेले प्रकल्प लोकप्रतिनिधींनी जनतेलाच 'लोकार्पण' करणे हे विसंगत आहे.
अर्घ्य आहे म्हणजे ते. Happy

'दर्जोन्नती' शब्दाबाबत मला एक टेक्निकल शंका आहे. 'दर्जा'मधला आकार आणि 'उन्नती'मधला उकार यांचा संधी 'ओ' होणं बरोबर आहे का? 'औ' व्हायला हवा ना?
(अशा प्रकारचं दुसरं उदाहरण आठवायचा प्रयत्न करते आहे.)
शिवाय Improvisation चा दर्जाशी काय संबंध? उत्स्फूर्त बदलांना इम्प्रॉव म्हणतात ना?

हो, मलाही वाटते, दर्जाचा काय सबंध improvisation मध्ये?
आहे त्या स्थिती पेक्षा अधिक चांगले करणे म्हणजे improv ना?
सुधारणा जवळपास जाईल असे वाटते.

आणि, लोकार्पण पेक्षा जनार्पण कसा वाटेल मग?

Improvisation साठी दर्जोन्नती?? काहीही! मी गुगल translate करून पाहिलं, पण तिथेही सुधारणा असा शब्द येतो आहे, तो बरोबर नाही.
"उत्स्फूर्त अभिव्यक्ती" म्हणता येईल का?

उत्स्फूर्त बदलांना इम्प्रॉव म्हणतात ना? >> हो, पण दर वेळी बदलच असतील असं नाही. शास्त्रीय संगीतात सर्वच आलापी आणि ताना या improvised असतात.

"उत्स्फूर्त अभिव्यक्ती" म्हणता येईल का?
हो. हे चांगले वाटते.
नाटकाच्या प्रयोगांच्या संदर्भात देखील हा शब्द वापरला जातो . कुठल्यातरी एका प्रयोगाला मूळ संहितेत नसलेले एखाद दुसरे वाक्य नट अचानकच वापरतो तेव्हा.

“दर्जोन्नती” संदर्भ सांगतो :

राज्याच्या अर्थसंकल्पात शासकीय रुग्णालयांच्या दर्जोन्नतीसाठी xxxx रुपयांची तरतूद.

English version आहे त्यामधे improvisation आणि modernisation आलटून पालटून वापरलेय.

असेच women empowerment साठी महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण आलटून पालटून वापरलेले दिसते. कोणते योग्य?

**सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण
>>>
या प्रत्येकात वेगळी छटा असली तरी दोन्ही योग्य वाटतात. विशिष्ट विषयाच्या संदर्भानुसार योग्य तो शब्द वापरता येईल.

Pages