खिडकी आणि ती

Submitted by Grups on 9 August, 2022 - 02:59

खिडकी आणि ती

समोर अथांग समुद्र, त्याचे निळंशार पाणी, अंगावर झेपावणाऱ्या त्या लाटा, पाण्याचे टपोरे थेंब असे अंगावर झेलत,एकमेकांच्या हातात हात गुंफून बसलोय! ती आणि मी त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं एकमेकांच्या डोळ्यात अगदी हरवून गेलोय. तिचे निरागस आणि त्यातून फक्त आणि फक्त प्रेमच ओसंडून वाहणारे डोळे! मी तिच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं आणि तिनं लाजून मान खाली घातली. माझ्याकडे बघून तिने मानेनं जवळ ये असे खुणावलं. आता मात्र पुढे काय होणार ह्याचा विचार करून माझ्या अंगावर एकदम रोमांच आले. तिने आपल्या नाजूक बोटांनी अलगद माझे डोळे बंद केले. अखेरीस ज्या क्षणाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो आता अगदी जवळ येऊन ठेपला होता. तिनं माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ ओढून घेतला. म्हटलं, आता झालंच आपलं स्वप्नं पूर्ण! धडधड अजूनच वाढू लागली होती. आत्ता प्रेमाची सर्वोत्तम अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळणार आणि ती जवळ आली आणि ..... जोरात कानात एक आवाज आला! मी एकदम दचकलो आणि धाडकन डोळे उघडले! वरती सिलिंगवर गरगर फिरणारा फॅन जणू काही माझ्याकडे बघून हसत होता. माझ्या मनातली ‘ती’ बघता बघता एकदम हरवली आणि सकाळचा सहाचा गजर झाला आणि माझा परत स्वपनातल्या मोहक दुनियेतून भूतलावर प्रवेश झाला.

एव्हाना तुम्हाला कळलं असेलच की हाच कथेचा हिरो आहे. लेखिका म्हणून त्याचा थोडा परिचय करून देते. तर हा आहे अर्णव. चारचौघांसारखा तरुण. वय २८ वर्षे म्हणजे साधारण ज्या वयात सर्वसाधारण घरातले आईबाप लग्नासाठी मागे धोशा लावतात तोच वयोगट. आय टी क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीमध्ये नोकरीला आहे. दिसायला काही हॅन्डसम हंक नसला तरी, चारचौघात ऊठून दिसण्या इतका स्मार्ट आहे. अहो, कथेतला प्रत्येक मुलगा हुशार, कर्तबगार, राजबिंडा असायलाच हवा असा काही नियम नाही, नाही का? ह्याला रोज मुलुंड ते मुंबई असा प्रवास करावा लागतो. वडील एका खाजगी कंपनी मध्ये तर आई बँकेत नोकरी करते. एकुलताएक मुलगा असल्याने खूपच लाडाकोडात वाढलेला आहे. हे वयचं असं आहे त्यामुळे थोडा हट्टी आणि स्वतःला हवं तेच करणारा आहे. आजकालच्या भाषेत म्हणायचे तर #loveyouzindagi#chill !

“अर्णव .. अरे लवकर ये, पोहे थंड होतील आणि मलाही ऑफिसला जायला उशीर होतोय… अर्णवचा सकाळच्या स्वप्नाचा हँगओव्हर काही उतरलेला नव्हता. तो कानात पॉड्स घालून एड शिरानचे “परफेक्ट” हे song ऐकत होता. आता अर्णव आटपून बाहेर आला थोड्याश्या नाराजीनेच झाकून ठेवलेले जवळपास थंडगार होत आलेले ते पोहे खाल्ले आणि मग आपला डबा घेऊन ट्रेन पकडण्यासाठी निघाला. त्याची नेहेमीची ९.०५ ची ठाण्याहून येणारी फास्ट लोकल होती आणि नेहेमीचा ग्रुप होता मित्रांचा. हे एक मुंबईच्या ट्रेनचं वैशिष्ठ्य आहे इथे जणू एक वेगळी संस्कृतीच नांदते. पु. ल. देशपांड्यांनी जर ट्रेनने प्रवास केला असता तर त्यांना अशी असंख्य आणि अनोखी व्यक्तिचित्रे साकारता आली असती.

अर्णव ट्रेनमध्ये उडी मारून चढण्याच्या तयारीत होता. फर्स्टक्लासचा डब्बा जसा टप्प्यात आला तशी त्याने मधल्या खांबाला धरून एखाद्या जिम्नॅस्टिक्सच्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे आत उडी मारली. त्याचे नेहेमीचे मित्र होतेच, जे ठाण्याहून बसून आले होते. सहा जण आणि अर्णव सातवा असा तो ग्रुप होता. गेली ३ वर्षे सगळे ह्याच गाडीने आणि त्याच डब्यातून प्रवास करायचे. भेटल्यावर सगळ्यांनी एकमेकांना गुडमॉर्निंग केले आणि मग प्रत्येकजण वीकएंड कसा घालवला ते सांगू लागला. अर्णव त्यांचे बोलणे ऐकत होता पण तरीही त्याच्या मनात मात्र अजून सकाळी पडलेलं स्वप्नंच रूंजी घालत होतं. थोड्या वेळात दादर येऊन गेलं आणि एकदम ट्रेनमधली गर्दी कमी झाली मग कधी नव्हे ते अर्णवला मस्त विंडोसीट मिळाली.

खिडकीमधून मस्त छान वारा येत होता त्यामुळे अर्णव परत आपल्या विचारांमध्ये रमला. तो मनाशी विचार करत होता की आईनेसुद्धा मागे लग्नाचा धोशा लावलाच आहे, रोज संध्याकाळी घरी गेलं की ती कुठलंतरी स्थळ आले आहे, अरे जरा बघ तरी मुलीचा फोटो! असे म्हणून मागे लागते आणि मग काही सोयरसुतक नसल्यासारखे अर्णव ते बघून चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव न आणता एखाद्या यंत्राप्रमाणे तो फोटो बघतो. ह्या सगळ्यामध्ये आईचा हेतू स्तुत्य असला तरीपण मला हे arranged marriage मान्य नाही हेही तितकेच खरं.

अर्णव पुन्हा आपल्याच विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला तोच मुळी मित्रानं हाक मारली म्हणून, तो पुन्हा भानावर आला. त्याने उठून मित्राला बसायला जागा दिली आणि तो पुन्हा त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला. ट्रेन सिग्नलला थांबली आणि एक हलकासा धक्का बसला आणि अचानक त्याचं लक्ष समोरच्या लेडीज कंपार्टमेन्टमधल्या विंडोसीटवर बसलेल्या एका चेहऱ्यावर गेलं. इतका निरागस आणि सुंदर चेहरा होता तो. अर्णव तिच्याकडे सगळे देहभान विसरून एकटक पाहतच राहिला. इतका वेळ आपलं लक्ष इकडे कसं गेलं नाही ह्याची खंत वाटून तो अधिकच कुतूहलाने बघू लागला. नितळ थोडासा सावळा चेहरा, सतेज कांती, नीट बांधलेले केस, साधासाच पण आकर्षक असा डाळिंबी कलरचा ड्रेस, अर्णव डोळ्याची पापणीही न लवता बघतच होता. तेव्हढ्यात एक परत छोटासा धक्का बसला आणि थांबलेली ट्रेन पुन्हा मार्गी लागली. हा धक्का जणू काही अर्णवला ' वास्तवात ये ' असा इशाराच देऊनगेला. आपण इतका वेळ त्या मुलीकडे बघतोय हे अर्णवला जाणवलं आणि त्यानं एकदम नजर दुसरीकडे वळवली. बरं,ह्या सगळ्यात ज्या सुंदर चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती तिला मात्र काहीच कल्पना नव्हती. मुंबईच्या लोकल ट्रेन मधला फर्स्टक्लास म्हणजे जणू अलिखित समीकरणच होतं 'येथे नाती जुळतात'. अहो ह्या आणि अशा असंख्य लोकांच्या काही पूर्ण तर काही अधुऱ्या प्रेम कहाण्या ह्या ट्रेननी पहिल्या असतील. ट्रेनमध्ये पुढील स्टेशनची घोषणा झाली आणि मग अर्णवच्या काळजाची कालवाकालव होऊ लागली. तिने हसून आपल्या सगळ्या मैत्रिणींना खुणेनंच बाय केलं आणि ती स्टेशनवर उतरण्यासाठी दरवाज्यापाशी येऊन उभी राहिली. अर्णवची बेचैनी वाढतच होती. आत्ता ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली आणि काही क्षणातच थांबली. ती सुंदर मुलगी उतरली आणि काही कळायच्या आत गर्दीमध्ये दिसेनाशी झाली. अर्णव मात्र जागेवर थिजल्यासारखासारखा झाला होता. इतक्या वेगानं गोष्टी घडल्या की अर्णव काहीच करू शकला नाही.थोडासा गोंधळलेला अर्णव ट्रेनमधून खाली उतरला आणि मित्रांना औपचारिकपणे हात हालवत बाय करून गर्दीमधून वाट काढत पुढे चालत राहिला. मनात नुसतं प्रश्नांचं काहूर माजलं होतं. तो संपूर्ण दिवस त्याचे कशातही लक्ष लागत नव्हतं. उद्या भेटली नाही तर ह्या विचारांनी मनाला नुसती हुरहूर लागली होती.

अखेर कसातरी तो दिवस भरून पुन्हा अर्णव घराच्या दिशेने निघाला. अर्णवचे काहीतरी बिनसलंय हे एव्हाना आईच्या लक्षात आले होते. जेवणं झाली आणि मग अर्णव झोपायला त्याच्या खोलीत गेला. बेडवर पडल्यावर झोप डोळ्यावर आली होती पण मन शांत नव्हतं, डोळे मिटले की तो सुंदर चेहरा, ते मधाळ डोळे, वाऱ्याने अलगद गालावर रुळणारे केस, ती छोटीशीच पण मोहक जिवणी, सगळं कसं अगदी आत्ता समोर असल्यासारखेच वाटत होते! असेच विचारांच्या जाळ्यात गुरफटून अर्णवला कधी झोप लागली ते कळलेच नाही.जाग आली तेव्हा सकाळचे ७ वाजले होते. आज आपल्याला परत ती दिसावी ह्या जबरदस्त ईच्छेने त्याने पटापटआवरायला सुरवात केली.

आज डब्यात थोडी गर्दी होती त्यामुळे अर्णवला त्या खिडकीच्या जवळ लगेच तरी पोचता येणार नव्हतं. मनाची उत्कंठा दर क्षणाला वाढत होती. ती दिसेपर्यंत बहुदा आपलं मन उडी मारून बाहेर येईल की काय असं अर्णवला वाटत होतं.त्याचा ग्रुप तिथंच बसला होता,तिथे पोचायला त्याला अजून १० मिनिटं गेली. आज कोणालाही गुडमॉर्निंग करण्याची तसदी न घेता त्याची नजर “ती” दिसतेय का हे बघत होती. अखेर... तोच चेहरा, खिडकीतून कोवळं ऊन येत होतं आणि त्यामुळे जणू सोन्याची झळाळी आली होती. महिन्याच्या अखेरीस पगार बँकेत आला की कसं मन गारगार होतं, बस वही सुकून मिला! आता मात्र अर्णव थोडा शांत झाला.

एव्हाना मित्रांनी अरे लक्ष कुठाय याचे असे करून त्याला प्रश्न विचारून पार भंडावून सोडलं होतं. अर्णवला अजूनही आपल्याला नक्की काय झालंय ह्याचा काहीच अंदाज नव्हता. थोड्या वेळानी नजर पुन्हा तिच्यावर. अचानक त्या मुलीनं सहज मान वर केली आणि समोर बघितलं. अर्णवच्या डोळ्यांमध्ये तिने काही क्षण का होईना आपली नजर रोखली आणि मग काही सेकंदातच काय होतंय हे दोघांच्याही लक्षात आलं आणि मग एकमेकांनी नजर दुसरीकडे वळवली. अर्णवच्या मनात तर एकदम गुदगुल्या झाल्यासारखेच झालं. हे आता झालं ते खरंच झालं का ह्यावरही त्याचा विश्वास बसेना. पुन्हा अर्णवने नजर तिच्यावर रोखली आणि एकटक बघू लागला. आता त्याचा धीर वाढला होता. पुन्हा थोड्या वेळाने त्या दोघांची नजरानजर झाली आणि आता मात्र अर्णवचा आत्मविश्वास दुणावला. ती आपल्याला हळूहळू प्रतिसाद देतेय हे बघून अर्णवचा उत्साह अजूनच वाढला. आता ट्रेनमध्ये शेवटच्या स्टेशनची घोषणा झाली आणि अर्णवला वास्तवाचं भान आलं. आजच जाऊन बोलूका की नको अश्या द्विधा मनस्थितीमध्ये अर्णवने निर्णय घेतला की घाई नको. मग तेवढ्यात स्टेशन आलं आणि ती कालच्यासारखीच गर्दीमध्ये दिसेनाशी झाली. पुढले काही दिवस हे असेच फक्त एकमेकांकडे चोरून बघण्यातच गेले, जणू तिला ही ह्याचे हे बघणं आवडत होतं.

त्याच आठवड्यात त्याचा ट्रेनमधला एक मित्र शनिवारी लंचला भेटला आणि मग दोघांच्या खूप गप्पा रंगल्या. त्या मित्राने अर्णवला सहज विचारलं की काय मग तिला कधी विचारणार? तुझ्या मनातले कधी सांगणार? त्यावर अर्णवने त्याला माहित नाही असे उत्तर दिलं. मुळात ह्या प्रश्नांने अर्णवला विचार करायला तरी प्रवृत्त केलं. आपल्याला वाटतं ते फक्त आकर्षण आहे की प्रेम! तिला अजिबात ओळखता, कधीही एक शब्दही न बोलता, ती एक दिवस दिसली नाही तर मनाची होणारी तडफड म्हणजेच प्रेम का? मला तिला हे सांगायला हवं पण त्या आधी मला नेमके काय वाटतं हे तरी नक्की आहे कां? हे आणि असे अनेक प्रश्न कुठल्याही नुकत्याच कोवळ्या प्रेमात पडलेल्या मुलाला पडतील तसेच अर्णवलाही पडले.त्या दिवशी घरी आल्यावर अर्णव त्याच विचारात गढून गेला होता.

सोमवारी नेहेमीप्रमाणे ट्रेन पकडली आणि मित्रांच्या घोळक्यात अर्णव गप्पांमध्ये रमला. मनात एकीकडे तिला कसे आणि कुठे बोलूया याचाच विचार चालू होता. आज तिने आकाशी रंगांचा खूप सुंदर ड्रेस घातला होता, तिच्यावर तो रंग खुलून दिसत होता. तिची एक खास मैत्रीण असते जी तिच्या बाजूला नेहेमी पुस्तक वाचत असते. अर्णवला हळूहळू कळलं होतं की तिला पुस्तके खूप आवडतात. कायम मराठी किंवा इंग्लिश पुस्तक हमखास असतंच प्रवासात. तशी थोडी अबोल असावी कारण कधी फारशी कोणाशी बोलताना बघितलेलं नव्हतं त्याने. हे सगळे तिच्याबद्दलचे आडाखे अर्णवने बांधले होते. आज तिने बघितलं तसं अर्णव तिच्याकडे बघून हसला, त्यावर तिनेही स्मित हास्य केले. आता मात्र अर्णवला नक्कीच खात्री पटली की आपल्या दोघांनाही सारखंच वाटतंय. त्याला तिच्याशी जाऊन बोलायला अजूनच प्रोत्साहन मिळाले. आता कधी एकदा ट्रेन पोचतेय आणि मी तिच्याशी बोलतोय असे त्याला झालं होतं. ट्रेन थांबायच्या वेळी ती उतरली तिच्या मैत्रिणीसोबत तसेच लगबगीनं अर्णवसुद्धा उतरला आणि तिच्यामागे भरभर चालू लागला. पुढे प्लॅटफॉर्म संपल्यावर थोडी मोकळी जागा मिळाली तसा अर्णव तिच्या बाजूला गेला. त्याला असे अचानक आलेलं बघून ती खूप दचकली आणि तिने आपल्या मैत्रिणीचा हात घट्ट पकडला. मैत्रिणीलाही अचानक काय करावं सुचेना. मग अर्णव तिला म्हणाला “एक मिनिट जरा थांबाल का? मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. जास्त वेळ नाही घेणार पण खूप महत्वाचे आहे.” त्यावर त्या दोघी अजूनही थोड्या गोंधळलेल्या होत्या पण तरीही थांबल्या. अर्णव पुढे तिला म्हणाला “आपण खूप दिवसापासून एकमेकांना बघतोय, मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे, आपण कधी बोलूया, इथे असे स्टेशनवर नाही, मला तुमच्याबद्दल जे वाटतं ते मला तुम्हाला सांगायचे आहे." ह्यावर तिने तिच्या मैत्रिणीकडे पाहिलं, अर्णवला वाटले आता ही काहीतरी बोलेल पण तसे काहीच घडले नाही, आणि तिनं आपल्या मैत्रिणीचा हात ओढला आणि ती पटापट चालत पुढे पळतच गेली. जे झाले त्यावर अर्णवचा विश्वासच बसेना. जी मुलगी आज माझ्याकडे बघून हसली, तिचा हा प्रतिसाद पाहून अर्णवला थोडा धक्का बसला. तिच्या मागे जाणंही बरोबर नाहीअसा विचार करून तो ऑफिसच्या दिशेनं चालू लागला. त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तो दिवस जरा उदासवाणाच गेला. तिचं न बोलता जाणं त्याच्या मनाला हूरहूर लावून गेलं होतं. उद्या बघू बोलतेय का ते. मनात हीच आशा बाळगून तो उद्याची स्वप्नं बघतच झोपला.

दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये चढताक्षणी त्यानं बघितलं तर ती आज नव्हती,तिच्या ऐवजी तिची ती मैत्रीण तिथे बसली होती. अर्णवकडे बघून तिनं पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं. अर्णवची नजर तिला शोधत होती पण ती आज आलीच नव्हती. आता मात्र अर्णवला टेन्शन आलं. ट्रेन शेवटच्या स्टेशनला आली आणि अर्णवला खाली उतारावंसं वाटतंच नव्हतं. तो शेवटीच उतरला तर समोरच तिची मैत्रीण उभी. अर्णवला आश्चर्यच वाटलं तिला बघून. ती पुढे आली आणि अर्णवला म्हणाली “काल तुम्ही बोलायला आलात आणि आम्ही तसंच न बोलता निघून गेलो, तुम्ही चांगले आहात म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण द्यावेसे वाटले. तुमच्याकडे वेळ असेल तर आपण पुढे जाऊन बोलू." त्यावर अर्णवने मान डोलावली आणि ते दोघे पुढे गर्दीतून वाट काढत पुढे गेले. मग थोड्या मोकळ्या जागेशी थांबून तिने बोलायला सुरवात केली. “काल निहीराने मला ओढून नेलं आणि तिची इच्छा नसताना काहीही बोलणे मला बरोबर वाटले नाही. तुमच्या दोघांमध्ये जी काय देवाणघेवाण चालू होती त्याची मी साक्षीदार आहे. तुमचा कुठलाही गैरसमज होऊ नये म्हणून मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगते." अर्णवला कळलं की त्या सुंदर मुलीचं नाव “निहीरा” आहे. आता सगळे प्राण कानात एकवटून अर्णव तिच्या मैत्रिणीचे बोलणे ऐकत होता. तिने पुढे सांगायला सुरवात केली“ निहीरा तुम्ही समजता तशी मुलगी नाही. तुम्ही असे काही अचानक विचाराल ह्याची पुसटशी कल्पना तिला नव्हती त्यामुळे ती खूप घाबरली. ज्या मुलीला देवाने इतके सुंदर रूप दिले आहे पण मन व्यक्त करायला आवाज दिला नाही, ती काय तिचं मत व्यक्त करणार आणि केलंच तरी ते तुम्हाला कसे समजणार?” आता अर्णवला काहीच कळत नव्हतं. तो जे ऐकत होता त्यानं मती गुंग झाली होती. हे कसे शक्य आहे? मला कधीच कसं जाणवलं नाही? कळलं असतं तर मला जे वाटतंय ते नसते वाटलं का? अर्णवच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला त्याची थोडी दयाच आली. ती म्हणाली “निहीरा जन्मापासून मुकी नाहीय आणि तिला बऱ्यापैकी ऐकूही येतं. तिला कॉलेजमध्ये असताना विजेचा शॉक बसला आणि त्यानंतर तिच्या vocal chords वर परिणाम झाला आणि त्यामुळे तिची वाचा गेली. पण जवळ जवळ १६ वर्षापर्यत ती एका सर्वसाधारण मुलीसारखीच होती. दुर्दैव म्हणायचे दुसरं काय! आता मात्र अर्णवच्या घशाला कोरड पडली, त्याला काय बोलावं तेच सुचेना. ती पुढे सांगू लागली “निहीरा उत्तम शिकलेली आहे. ती एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीही करते. स्वतःच्या पायावर उभी आहे आणि खूप स्वाभिमानी मुलगी आहे. तुम्ही तिला अचानक विचारल्यावर तुम्हाला हे सगळे कसे सांगावे हे कळले नाही, तिची भाषा सर्वांना समजत नाही आणि मग लोकं तिचा अपमान करतात, हसतात म्हणून तिनं उत्तर द्यायचं टाळलं. तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटतंय हे तुम्ही ठरवा पण मी तिची लहानपणापासूनची मैत्रीण आहे, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टीची कल्पना दिली. तिला मी आज सांगेन की मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. पुढे तुम्ही काय ते ठरवा. ”अर्णवचे कपाळ गरम झालं, त्याला असं वाटलं की आपल्याला चक्कर येतेय. त्यानी कसेबसे स्वतःला सावरले आणि मैत्रिणीला धन्यवाद दिले. आपल्या पायातली शक्तीच संपली आहे असे अर्णवला वाटले. आत्ता कुठे त्याला कळलं होतं की तो ह्या सुदंर मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तेच तो तिच्याकडे व्यक्त करणार होता तर हे काय झालं अचानक! अर्णव मनाशी विचार करू लागला, “मला नक्की धक्का कसला बसलाय आपले ज्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे ती मुकी आहे ह्याचा की तिच्या ह्या शारीरिक व्यंगामुळे ती माझं प्रेम स्वीकारणार नाही ह्याचा?” कितीतरी वेळ अर्णव तसाच सुन्नपणे तिथल्या एका बाकावर बसून होता.

आता मन आणि मेंदू यांच्यात जोरदार युद्ध चालू झालं होतं. अर्णवचं मन त्याला सांगत होतं की तुझे तिच्यावर प्रेम आहे, एक दिवस ती दिसली नाही तर इतका बेचैन झाला होतास तू. व्यक्ती तीच आहे फरक एवढाच आहे की आता कळलंय की तिला बोलता येत नाही. प्रेमाची परिभाषा काय आहे तुझी? व्यंग आहे म्हणून त्याला प्रेम करण्याचा हक्कच नाही कां? दुसरीकडे अर्णवचा मेंदू त्याला वेगळंच सांगत होता की कितीही प्रेमअसलं तरी अशा शारीरिक व्यंग असलेल्या मुलीबरोबर लग्न करणं हे जितकं वाटतं तितकं अजिबात सोप्पं नाही. मुळात कुठल्याही सुखी संसारामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर संवाद हा खूप महत्वाचा असतो, आता निहिरा मुकी असल्याने तो संवाद कसा साधला जाणार? जर एकाला दुसऱ्याच्या मनातलं काही कळणारच नसेल तर मग लग्न करून काय ऊपयोग. हे लग्न घरच्यांना मान्य होईल का? प्रेमाचं रम्य भावविश्व आणि वास्तवादी सत्य या दोन्हीमध्ये अर्णव कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हता.

आज ट्रेन आली आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं अर्णवने गाडीमध्ये उडी मारली. आता मित्रांच्या घोळक्यात त्यांच्या नेहेमीच्या गप्पा रंगू लागल्या. एक नजर निहिरावर ठेवून अर्णव आपण गप्पांमध्ये सहभागी असल्याचे भासवत होता. निहिरा नेहेमीप्रमाणे पुस्तक वाचत होती पण आज ती बऱ्याचदा समोर अर्णवच्या दिशेने बघत होती, हा बदल अर्णवलाही जाणवला. त्याच्या मनाला थोडेसं हायसं वाटलं. आशा पल्लवित झाल्या. त्याचा जो खास मित्र होता त्याने हे सगळं बघितलं आणि मग हळूच कानात अर्णवला म्हणाला “छान आहेत वहिनी!” आणि त्याला डोळा मारला. अर्णव थोडासा लाजला आणि मग त्याला म्हणाला “कसलं काय? इथे कशाचा पत्ता नाही, तू काय वहिनी वहिनी करतोयस!” मग अर्णवने काल झालेला सगळा प्रसंग त्याला सांगितला. मग मात्र मघाशी चिडवणारा त्याचा मित्र गप्प झाला. आता अर्णव आज ट्रेनमधून उतरल्यावर सगळ्यात आधी निहिराशी बोलणार होता आणि तिचा फोन नंबरही घेणार होता. मनात तिच्याशी काय बोलायचं ह्याची जुळवाजुळव करण्यात तो मग्न झाला. ट्रेन थांबली आणि निहीरा आणि तिच्या मैत्रिणी मागोमाग अर्णवही चालू लागला. त्याच्या चालीत एक आत्मविश्वास होता. निहीराला कळलं होतं की अर्णव त्या दोघींच्या मागेच चालतोय पण तरीही त्यांनी आपल्या चालीचा वेग वाढवला नाही, जणू त्यांनाही आता पुढे काय होणार आहे ह्याची कल्पना आली होती. पुढे थोडी गर्दी कमी झाल्यावर अर्णव निहिराच्या समोर अतिशय आत्मविश्वासाने उभा राहिला. त्याने निहिरासमोर हात पुढे केला आणि म्हणाला “हॅलो निहिरा, मी अर्णव. आपण रोज एकाच ट्रेनने प्रवास करतो. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला माहित आहे की तू माझ्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ शकत नाहीस पण शब्दांनी न बोलतासुद्धा भावना व्यक्त कर तायेतात. माझं फक्त एकदा ऐकून घे आणि मग तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो घे. मी तुला request करतोय, माझ्याशी बोलशील का?” निहिरानी अर्णवचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग मान हलवून होकार दिला. प्रथम अर्णवला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की तिने खरंच होकार दिला आहे. अर्णवचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानं मी भेटायची वेळ आणि ठिकाण तुला कळवतो असे सांगितलं त्यावरही तिने होकारार्थी मान हलवली. मग तिच्या मैत्रिणीला आपण निघूया कां असे तिने खुणेने विचारले आणि मग अर्णवला बाय म्हणून हात हलवला आणि पुढे चालू लागली. ती गेल्यानंतर काही क्षण आपण स्वप्न तर बघत नाहीना असा विचार करत असतानाच गाडीचा हॉर्न जोरात वाजला आणि अर्णव एकदम भानावर आला. जणू युद्धच जिंकल्याच्या अविर्भावात तो पावलं टाकत ऑफिसच्या दिशेने चालू लागला.

ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या डोक्यात तेच विचार चालू होते की कुठे भेटू या आणि किती वाजता. अखेर एक जागा सापडली, स्टेशनपासून जवळच होती. तिथे आधी फोन केला आणि टेबल रिझर्व्ह केलं आणि मगच त्याने निहिराला मेसेज केला आणि रेस्टॉरंटचे नाव आणि वेळ कळवली. आता जशी संध्याकाळ होऊ लागली तशी पुन्हा अर्णवच्या मनाची धडधड वाढू लागली.
जसजशी वेळ उलटून जायला लागली तसतशी अर्णवच्या मनात पुन्हा धाकधूक होऊ लागली. आता ठरलेल्या वेळेच्या पुढे अर्धा तास होऊन गेला तरी हिचा पत्ता नाही. आता मात्र फोन करावाच ह्या तयारीने तो फोन लावणार एवढ्यात त्याची नजर समोर गेली तर तिथे निहिरा आणि तिची ती मैत्रीण दोघी उभ्या. त्या अर्णवला शोधतच होत्या. अर्णवचा जीव भांड्यात पडला. पण ही एकटी का नाही आली, मैत्रीण कशाला हवी इथे, ह्या विचारांनी तो थोडा नाराज झाला.

पुढची काही सेकंद अशीच शांतता होती, शेवटी निहिराच्या मैत्रिणीने शांततेचा भंग करत म्हटलं “सॉरी हं! आम्हाला यायला थोडा उशीरच झाला आमच्या दोघीचे काही ठरत नव्हतं म्हणून त्यात वेळ गेला.” तिने पुढे बोलायला सुरुवात केली “त्याचं काय झालं ना, निहिराला बोलता येत नसल्यामुळे आणि तुम्हाला साइन लँग्वेज येत नसल्यामुळे मी दुभाष्या म्हणून यावं असं निहिराला वाटत होतं, त्यावर मी तिला म्हटलं की हे तुमच्या दोघांमधलं आहे त्यामुळे मी यावं असं मला बरोबर वाटत नाही. पण निहिरानी मला सांगितले की मी तिच्याबरोबर आले नाही तर ती जाणारच नाही. तशी ती खुणा करून बोलते पण हा विषय नाजूक कुठेही गैरसमज व्हायला नको म्हणून तिला मी बरोबर यावं असं वाटलं. तुम्हाला जर वाटत असेल की मी इथे असू नये तर मी जाते." हे ऐकून निहिरानं तिच्याकडे थोडंसं रागानेच बघितलं आणि तिचा हात घट्ट धरला. अर्णव जरा विचारातच पडला, ज्या मुलीसमोर मला माझं मन मोकळं करायचं आहे तिलाच असं वाटतंय की मी तिच्याशी संवाद साधू शकणार नाही. तो स्वःताशीच म्हणाला “बेटा, अब तुम्हारे इम्तिहान की घडी आगयी है! आज जर तिला हा विश्वास देऊ शकलास तरच पुढे काहीतरी होण्याची शक्यता आहे. हीच ती संधी आहे, माझं प्रेम व्यक्त करायला मला शब्दांची गरज नाही!” असा विचार करून अर्णव निहिराकडे बघून म्हणाला, “निहिरा, मी एक सांगू का?” त्यावर तिनं नुसतंच मानेनं होकार दिला. अर्णव पुढे म्हणाला, “मला माहित आहे की तुझी साइन लँग्वेज मला येत नाही पण मी जे बोलणार आहे त्यासाठी शब्दांची नाही,भावनांची गरज आहे आणि त्या व्यक्त करायला शब्द हे एकच माध्यम नाही. तुला वाटणारी भीती मी समजू शकतो पण तू मला एक संधी तरी दे. तू काहीही बोलली नाहीस तरी तुझे डोळे खूप बोलतात. तुझ्या हातांची हालचाल सगळं काही सांगतेय. त्यातून मी असं सुचवतो की तुला भीती वाटत असेल तर आपण हिला दोन टेबलं सोडून बसायला सांगू. तुला कुठल्याही क्षणी असं वाटलं तर ती येईल की लगेच. म्हणजे आपल्यालाही बोलता येईल आणि तुला टेन्शनही येणार नाही. काय पटतंय का?” त्यावर निहीरानी हसून होकार दिला. अर्णवने बोलायला सुरुवात केली,“निहिरा, आपण खूप दिवसांपासून एकमेकांकडे बघतोय आणि मला असं वाटतंय की जे मला तुझ्याबद्दल वाटतंय तेच तुलाही माझ्याबद्दल वाटतंय. माझे बोलणं पटलं तर मानेनं होकार किंवा नकार दे.” त्यावर तिने होकारार्थी मान हलवली. माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, तुला पहिल्यांदा बघितलं त्या क्षणापासूनच मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. ह्याची जाणीव मला ज्या दिवशी तू काहीही न बोलता निघून गेलीस त्या दिवशीच झाली. तुला वाटत असेल की आपण तर एकमेकांना धड ओळखतही नाही मग असंकसं अचानक प्रेम वाटू शकते? तू कशी आहेस, तुला बोलता येतं की नाही, ऐकू येतं की नाही या गोष्टी माझ्यासाठी दुय्यम आहेत.” त्यावर पटल्यासारखे तिने पुन्हा होकार दिला आणि आश्वासात्मक हसली म्हणजे जणू काही तिला पडलेले प्रश्न अर्णव तिने एकही शब्द न बोलता बरोबर ओळखून त्याची उत्तरं देत होता. खरं तर इतके कोणाचे विचार आपल्याशी एकही शब्द न बोलता कसे जुळू शकतात ह्याचेही तिला मनोमन आश्चर्य वाटत होतं. अर्णव कॉफीचा घोट घेत पुढे बोलू लागला, “तू मला काहीही उत्तर लगेच द्यावं अशी माझी काहीही अपेक्षा नाही आणि तशी घाईही मी करणार नाही. तू मला ओळखत नाहीस तसेच मीही तुला नाही. त्यामुळे कुठलाही निर्णय न घेता आपण सध्या तुझी इच्छा असेल तरच भेटू आणि एकमेकांना जाणून घेऊ. त्यामुळे तू आत्ता कुठलेही दडपण घेऊ नकोस.” त्यावर पुन्हा निहिरानी हसून मान डोलावली आणि थोडीशी लाजली सुद्धा. ती मनाशी पुन्हा विचार करू लागली, “हा कोण कुठून आलाय, ह्याला माझ्या मनात काय चाललंय हे एकही शब्द न बोलता कसं समजतंय! आपली वेव्हलेंग्थ इतकी सुंदर ह्या आधी कोणाबरोबरही इतकी छान जुळली नव्हती." जाता जाता हळूच अर्णवने तिला विचारलं “तुला मला काही सांगायचं आहे का?” त्यावर निहिराने लाजून तिने स्वतःकडे बोट ठेवून तोंडानी “I” असं बोलून मग आपल्या हृदयाच्या दिशेनी हात नेला आणि खूण केली, “love” आणि मग अर्णवकडे बोट नेलं आणि पुढे काही बोलायच्या आत आपला चेहरा ओंजळीमध्ये झाकून घेतला. ह्यावर अर्णव इतका खुश झाला आणि त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि काही क्षण तसेच धरून ठेवले जणू तो तिला न बोलता हेच सांगायचा प्रयत्न करत होता की मी तुझा हात कधीच सोडणार नाही आणि सदैव तुझ्या सॊबतच असेन.

असेच एक दिवस ते दोघे मरीन ड्राईव्हला बसले होते, निहिराचा मूड थोडा उदास होता. अर्णव काही बोलायच्या आत तिनं अर्णवच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं आणि त्याला खुणेनी मला खूप टेन्शन आलंय असे म्हणाली त्यावर अर्णवने तिला काय झालं असं विचारलं त्यावर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागलं. अर्णवने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला आणि हाताने डोळे पुसले आणि तिच्याजवळ आला आणि तिला मानेनं काय झालं म्हणुन विचारलं त्यावर आपले डोळे आणि लाल झालेलं नाक पुसत, तिने अर्णवला खुणेने सांगितलं की माझे वडील माझ्या लग्नासाठी प्रयत्न करतायत. मला त्यांना आपल्याबद्दल सांगायला हवं. पण त्या आधी तुझ्या घरच्यांशी तुला बोलायला हवं ना? हा प्रश्न ऐकून अर्णवला पण थोडे टेन्शनच आले. निहिरा पुढे त्याला हे ही चिडून सांगत होती की तिला येणारी सगळी स्थळं ही कर्णबधिर किंवा कुठले तरी व्यंग असलेलीच आहेत. तिला ह्या गोष्टीचा प्रचंड राग येत होता आणि भीतीही वाटत होती की घरचे आपलं लग्न ठरवून टाकतील. आता अर्णवला गोष्टीचे गांभीर्य जाणवलं. आता अर्णवची खरी परीक्षा होती. प्रेम करण्यापेक्षा निभावणं कठीण आहे ह्याची त्याला जाणीव झाली.

त्या दिवशी घरी आल्यानंतर अर्णव थोडा गप्पगप्पच होता. अर्णव बाबांना म्हणाला, “बाबा, मला तुम्हाला काही सांगायचे आहे.” त्यावर टीव्हीवरून आपली नजर जराही न वळवता बाबांनी हातांनीच त्याला बोल अशी खूण केली, त्यावर अर्णव म्हणाला, “बाबा, माझे एका मुलीव रप्रेम आहे, आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे." त्यावर बाबांनी “व्वा, उत्तमआहे! असे म्हणून thumbs up केलं. त्यावर अर्णव त्यांना परत म्हणाला ”बाबा ऐकताय का तुम्ही नीट, मला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे ती मुकी आहे."हे वाक्य ऐकताक्षणीच बाबांच्या हातातून रिमोट निसटला आणि दाणकन जमिनीवर आपटला. मग एक दीर्घ श्वास घेत बाबांनी त्याला विचारलं, “मग पुढे काय करायचं ठरवलं आहेस? ”त्यावर अर्णवने त्यांना “लग्न” असं उत्तर दिले. त्यावर कपाळावर हात मारून घेत ते म्हणाले, “ते एव्हाना कळलं आहे नाही कां? पण आईला पटेल का हे? तिच्या मताचा काही विचार? की तू सगळं ठरवूनच आला आहेस?” त्यावर अर्णवने बाबांना सांगितले की मला खात्री आहे की तुम्ही मला समजून घ्याल आणि मग आईशीही बोलाल. तुमचं काय मत आहे प्रथम मला सांगा." त्यावर बाबांनी पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, “मुलगी मुकी आहे म्हणून मी कधीच विरोध करणार नाही पण आपल्याकडे समाज अजूनही तितकासा पुढारलेला नाही, असं लग्न झाले तर काही लोक टोचून बोलतील, चेष्टा करतील, अगदी माझी आणि आईचीसुद्धा, हे सगळं सहन करण्याची दोघांचीही तयारी आहे का? माझा व्यक्तिशः ज्योतिष, भविष्य ह्यावर विश्वास नाही पण तुमच्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून घ्या.” त्यावर अर्णवने तिच्या संपूर्ण कुटुंबाविषयी तसेच निहिराविषयी सगळी माहिती बाबांना सांगितली. मग तो बाबांना म्हणाला “तुम्ही बोलाल ना मग आईशी?" त्यावर हसून बाबा म्हणाले, “हे बघ बाबा, ही तुझी लढाई आहे आणि ती तूच लढायचीस आणि जिंकूनही दाखवायची, काय? तेव्हा आईशी तुलाच बोलावे लागेल आणि तेही आजच." आईशी बोलावे लागणार असलं तरी बाबा आपल्या बाजूनी आहेत हे कळून त्याला खूप मोठा आधार वाटला.

थोड्या वेळाने आई घरी आली. मग संधीचा फायदा घेत अर्णव तिच्या बाजूला बेडवर बसला आणि म्हणाला, “आई, मला तुला काही सांगायचंय पण तू दमली असशील तर उद्या बोलू.” तेवढ्यात बाबाही आत आले. आईनी अर्णवला पुढे बोलायला सांगितलं. त्याने पहिले थोडी प्रस्तावना दिली, “आई, तू खूप दिवसापासून माझ्या लग्नाच्या मागे आहेस, खूपशी स्थळेही तू मला दाखवलीस पण आई खरं सांगू कां, मला arranged marriage करायचे नाही. असं दोन तासात मुलगी बघून पूर्ण आयुष्याचा प्रश्न कसा सोडवायचा, मला हे मान्य नाही. दरम्यानच्या काळात माझी भेट निहिराशी झाली आणि मी तिच्याशीच लग्न करण्याचे ठरवलं आहे.” आता आईने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि पूर्णपणे ती अर्णवचं बोलणे ऐकू लागली. मग अर्णवने तिला निहिराच्या बाबतीत सगळं सविस्तर सांगितलं. बराच वेळ आई काही बोललीच नाही. शेवटी त्या शांततेचा भंग करत अर्णवची आई म्हणाली, “अर्णव, तू एक खूप विचारी आणि हुशार मुलगा आहेस. आतापर्यंत तुझ्या आयुष्यातले सगळे निर्णय हे तुझे तूच घेतलेस आणि ते घेण्याचे स्वातंत्र्यही आम्ही तुला नेहेमीच दिलं आहे. पण लग्न ही अशी गोष्ट आहे जिथे दोन वेगळी घरं, वेगळे विचार त्यांच्या भिन्न संस्कृती एकत्र येतात, त्यामुळे हा निर्णय सर्वानुमते झाला पाहिजे.अरे जिथे हातीपायी धडधाकट असलेल्या माणसांचे विचार जुळत नाहीत तिथे निहिरा मुकी असल्याने तुमच्यात संवाद कसा घडणार आहे ह्याचा तू विचार केलास कां? मला आणि बाबांना ह्या लग्नाला पाठिंबा देण्याआधी निहिराला आधी आणि मग तिच्या घरच्यांना भेटायचं आहे.” त्यावर बाबानी होकारार्थी मान हलवली. आई पुढे म्हणाली, “निहिराला बोलता येत नाही ह्यामुळे तू तिच्याशी लग्न करू नयेस असे आमचे मत नाही पण जर अन्य कुठल्याही कारणाने आम्हाला असे वाटलं की लग्न जुळणार नाही तर तशी तू तुझ्या मनाची तयारी ठेव. आईचं बोलणं ऐकून अर्णवला थोडं बरं वाटलं, तिने अगदीच नकार दिला नव्हता आणि तिचे म्हणणे योग्यच होते. आता त्याला टेन्शन होतं निहिराच्या घरी हे सगळं कसे स्वीकारले जाईल.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर निहिरा आणि अर्णव दोघेही नेहेमीसारखे भेटले. भेटल्या भेटल्या अर्णवने निहिराला मूक बधिरांच्या भाषेत हातवारे करत “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?” असं विचारलं. निहिरानेही त्याच भाषेत उत्तर देत प्रतिसाद दिला. तिला अचानक लक्षात आलं की अर्णवला ही भाषा कशी कळली? त्यावर तिने पुन्हा हातवारे करून त्याला विचारलं,अर्णवनेही तिला तसंच उत्तर दिलं. त्यावर निहिराच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ह्याच्या इतका समजूतदार जोडीदार तर आपल्याला मिळणंच शक्य नाही याने आपल्यासाठी आपली भाषा देखील शिकून घेतली. तिने अर्णवला सांगितलं की ती आज घरी वडिलांशी बोलून त्याला कळवेल कधी भेटायला यायचे ते. मग ते दोघे त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने कितीतरी वेळ हातात हात गुंफून भावी आयुष्याची स्वप्ने बघण्यात रमले.

आता अर्णव निहिराच्या दाराबाहेर उभा होता. दरवाजा निहिरानेच उघडला. तिच्या आई बाबांना त्याने वाकून नमस्कार केला, तेव्हा आईच्या मनात ”संस्कारी आहे हो मुलगा!“ असे काहीसे भाव दाटले होते. निहिराच्या आईबाबांना इम्प्रेस करण्याची एकही संधी तो वाया जाऊन देणार नव्हता. आता निहिराच्या बाबांनी अर्णवला प्रश्न विचारायला सुरुवात केली. निहिराने आणलेली कॉफी छान झाली आहे असे अर्णवने तिला तिच्या सांकेतिक भाषेत सांगितले त्यावर वडिलांना खूपच आश्चर्य वाटले, त्यांनी लगेच विचारले, “तुला ही भाषा कशी येते? निहिरानी शिकवली का?” त्यावर अर्णवने सांगितले की मी ठरवलं की आपण ही भाषाही शिकून घ्यायची. माझे निहिरावर अतोनात प्रेम आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी तिला जी भाषा कळते ती मला शिकायची आहे.” अर्णवचे हे उत्तर ऐकून तिचे वडील एकदम भावविवश झाले, आणि अर्णवला म्हणाले, “आजच्या जगात जिथे फक्त तुम्ही दिसता कसे ह्यालाच महत्व दिले जातं अशा काळात तुझ्यासारखा एक तरुण एका शारीरिक व्यंग असलेल्या मुलीची नुसती निवडच करत नाही तर तिला खऱ्या अर्थाने साथ करण्यासाठी धडपड करतो आहे , हे बघून मन भरून आलं. आज जिथे माणसे फक्त बाह्य रूपाला महत्व देतात तिथे तू मात्र माणसाच्या मनालाच महत्व दिलंस.” निहिराच्या आईवडिलांचा होकार ऐकून अर्णव आणि निहिराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. कधी एकदा निहिराला घट्ट मिठीत घेतोय असे अर्णवला मनोमन वाटत होतं. निहिराने बहुदा अर्णवच्या मनातले ओळखले असावे तिने आईला आम्हाला जरा बोलायचे आहे आम्ही माझ्या खोलीत थोडा वेळ बसून बोलू का असे विचारलं त्यावर आईने त्यांना होकार दिला. निहिराने अर्णवला हाताला धरून आपल्या खोलीत नेलं. खोलीचं दार बंद केलं आणि तेवढ्यात मागून अर्णवने तिला आपल्या मिठीत घेतलं. त्या दोघांचा आनंद ओसंडून वाहत होता. ज्या गोष्टीची ते वाट बघत होते तो होकार त्यांना मिळाला होता. निहिरालाही असंच ह्या मिठीतुन कधी बाहेर पडूच नये असं वाटत होतं. तिने डोळे बंद केले होते आणि ती त्या क्षणांचा आनंद घेत होती. अर्णवने निहिराला मारलेली ही पहिलीच मिठी. तो स्पर्श आणि तिच्या श्वासाचा उबदारपणा त्याला असाच आयुष्यभर अनुभवायचा होता. तिने कायम असंच त्याच्या मिठीतच राहावं असं त्याला वाटले नाही तर नवलच. पहिल्या प्रेमाचा अनुभव हा पहिल्या पावसासारखा असतो, थोडी थंड झालेली हवा आणि ओल्या मातीचा सुगंध ह्यानी जसं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं, तीच जादू ह्या पहिल्या वाहिल्या प्रेमाची असते. त्या प्रेमाच्या स्पर्शाने मन मोहरून जातं. अर्णवने अलगद निहिराच्या गालाचे हलकंसं चुंबन घेतलं आणि ती जी काय लाजली त्याला काही तोडच नाही. लाजून ती अर्णवच्या मिठीत अजूनच घट्ट शिरली. काळा वेळाचे भानच जणू हरपलं होतं. आपण असे आयुष्यभर एकमेकांच्या सहवासात आता राहू शकतो ह्या विचारांनीच दोघे सुखावले होते.

अर्णवने असं ठरवलं होतं की येत्या रविवारी दोन्ही कुटुंबांनी कुठल्यातरी रिसॉर्टला भेटायचे. मग मुंबईपासून जवळच असलेल्या एका रिसॉर्टमध्ये भेटायचे ठरलं. दोन्ही घरातली मंडळी एकमेकांशी छान गप्पा मारत होती. हे दृष्य बघून निहिरा आणि अर्णव दोघेही मनातून खूपच समाधानी होते. आता एकदम अर्णवच्या आईने निहिराला खाणाखुणा करून विचारलं की तुझे पुढे शिकण्याचे काही विचार आहेत कां? निहिराने आपल्या सांकेतिक भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. अर्णव ते उलगडून आईला सांगू लागला. निहिराने आईला सांगितले की मला पुढे मास्टर्स करायची इच्छा आहे आणि लग्नानंतर मला शिकायला आवडेल. तिचं हे उत्तर ऐकून आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. मग अर्णवच्या बाबांनी सगळ्यांना लग्नाबद्दलचे काय विचार आहेत असे विचारले. त्यावर अर्णवने आणि निहिराने आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार असल्याचे सांगितलं. अर्णवने सगळ्यांना सांगितलं की लग्नाचा खर्च एवढयासाठी वाचवायचा आहे कारण ते पैसे आम्ही मूकबधिरांच्या एका संस्थेला तरुण मुलामुलींच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी देणार आहोत. त्यावर सगळ्यांनीच ह्या कल्पनेचं स्वागत केलं आणि पाठिंबाही दिला.

इथे थोरली मंडळी गप्पामध्ये रंगली असताना, अर्णव आणि निहिरा बाजूला असलेल्या बागेमध्ये फिरायला गेले. तिथे एक मस्त छोटा बाक होता, तिथे बसले. छान वारा सुटला होता आणि त्यामुळे पानांची सळसळ ऐकू येत होती. त्या दोघांनी मस्त एकमेकांच्या हातात हात गुंफले होते आणि आता शेवटी एकदाचे आपलंलग्न ठरले हा आनंद मनात साठवून ठेवत होते. त्या दोघांनाही जितके हे सगळे कठीण वाटलं होतं तितके काही हे अवघड नव्हतं, अर्थातच त्याचे सगळं श्रेय हे दोन्ही कुटुंबातल्या मोठ्या मंडळींना जातं. प्रत्येक घरात जर आई वडिलांनी आपल्या मुलाचे सुख आणि हित कशात आहे हे लक्षात घेऊन लग्न जुळवले तर, त्यासारखी दुसरी मोठी गोष्टच नाही. लोकं फक्त पैसा आणि देखाव्याच्यामागे भुलून जातात त्यापेक्षा आपली मुलं कशात आनंदी राहतील ह्याचा विचार केला तर मुलांना पळून जाऊन लग्न करावी लागणार नाहीत. कुठल्याही मुलाला आपल्या आई वडिलांच्या इच्छेनेच लग्न व्हावे असे वाटत असते. सुदैवाने अर्णव आणि निहिराचे पालक मात्र खूपच समजूतदार होते. आता दोघेही आपल्या पुढच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहण्यात गढून गेले.

अखेर ज्या दिवसाची आतूरतेने अर्णव वाट बघत होता तो क्षण आज जवळ येऊन ठेपला होता, आज अर्णव आणि निहिराचे लग्न रजिस्टर पद्धतीने होणार होतं. आज निहिराचं सौंदर्य काही औरच दिसत होतं. पाचूच्या हिरव्या रंगाचा आणि त्याला सोनेरी काठ असलेला सुंदर शालू तिने नेसला होता. हातभर घातलेला हिरवा चुडा आणि त्याला शोभून दिसतील अशा सोन्याच्या बांगड्या अगदी खुलून दिसत होत्या. गळ्यात आईने दिलेली सोन्याची माळ, तन्मणी असे दागिने घातले होते. नाकात मोत्याची नथ आणि केसांचा खोपा घालून नवरी सुंदर नटली होती. अर्णवने जेव्हा निहिराला वधूच्या वेशात साडी नथ घातलेले पहिले तेव्हा त्याचं भानच हरपलं. इतकी सुंदर दिसत होती निहिरा की डोळे तिच्यावरच खिळून राहिले होते. तेवढ्यात कोणीतरी अहो नवरेबुवा, इकडे सही करा असं कोणीतरी बोलले तेव्हा एकदम ओशाळल्यागत झालं अर्णवला. मग रीतसर सह्या झाल्या दोघांच्या, त्यानंतर साक्षीदार म्हणून आईवडिलांनी सह्या केल्या. मग अर्णवच्या आईने त्याच्या हातात सोन्याचे मंगळसूत्र दिलं ते त्याने तिच्या गळ्यात घातलं आणि घालताना हळूच तिच्या कानात ”I love you” असे म्हणाला. त्यावर निहिरा इतकी लाजली. अर्णव आणि निहिराने दोघांचा आशीर्वाद घेतला आणि अर्णवबरोबर निहिरा त्याच्या घरच्या दिशेनं निघाली.

अर्णवच्या घरी येताच माप ओलांडण्यासाठी दोघे उभे होते, तेवढ्यात कोणीतरी निहिराला उखाणा घे असे सांगितले, त्यावर निहिराचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. मग अर्णवने लगेच तिची बाजू सांभाळत, मी दोघांच्या वतीने उखाणा घेतो असे सांगत मस्त उखाणा घेतला आणि सगळ्यांची मनं जिकून घेतली. त्याने निहिराकडे बघून त्याचा हात पुढे केला आणि तो धरूनच माप ओलांडलं. त्याला हेच सांगायचे होते की काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर नेहेमीच असेन. ज्या रात्रीची स्वप्ने प्रत्येक तरुण मुलगा आणि मुलगी बघत असतात ती रात्र आज अर्णव आणि निहिराच्याही आयुष्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी ते दोघे हनिमूनसाठी मॉरिशसला निघणार होते. अर्णवने तिला तुला काही हवाय कां असं विचारलं त्यावर तिने खुणेने “तू” असे उत्तर दिलं. अर्णव तिच्याजवळ आला आणि तिला मिठीत घेतलं. आज त्या मिठीमध्ये एक आश्वासकता होती की मी सदैव तुझ्याबरोबर असेन तुला काळजी करण्याची गरज नाही. अर्णवने हलकेच तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि हलकेच चुंबन घेतलं. आपले ज्याच्यावर प्रेम आहे असा साथीदार आपल्याला आयुष्यभरासाठी लाभला ह्याचा त्याला खूपच हेवा वाटत होता. पुढची सगळी रात्र एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत, ते दोघेही खऱ्या अर्थाने एकरूप झाले.

समोर मॉरिशसचा अथांग समुद्र, त्याचे निळंशार पाणी, अंगावर झेपावणाऱ्या लाटा, पाण्याचे टपोरे थेंब असे अंगावर झेलत, एकमेकांच्या हातात हात गुंफून बसलेले आम्ही दोघं! त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं एकमेकांच्या डोळ्यात अगदी हरवून गेलो. तिचे निरागस डोळे आणि त्यातून फक्त आणि फक्त ओसंडून वाहणारं प्रेम. मी तिच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं आणि तिनं लाजून मान खाली घातली. माझ्याकडे बघून तिने मानेनं जवळ ये असे खुणावलं. आता मात्र पुढे काय होणार ह्याचा विचार करून माझ्या अंगावर रोमांच आले. तिने आपल्या नाजूक बोटांनी अलगद माझे डोळे बंद केले. समुद्राचा गार वारा अंगावर येऊन एकदम मस्त वाटत होतं. तिनं माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ ओढून घेतला. धडधड अजूनच वाढू लागली होती. आत्ता प्रेमाची सर्वोत्तम अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळणार आणि ती जवळ आली आणि अखेरीस माझ्या ओठांवर तिचे उष्ण ओठ तिने टेकवले आणि प्रेमाची अनुभूती मिळाली….अखेरीस आज माझे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण झालं!
……..रुपा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप गोड गोष्ट
अशा सकारात्मक गोष्टी वाचल्या की बर वाटत
लिहित रहा