एखाद्या प्रदेशाचे भौगोलिक स्थान, तिथले हवामान, उपलब्ध असणारी साधन सामुग्री, तिथे पिकणारी अन्नधान्ये अशा अनेक गोष्टीनुरूप तिथली खाद्य संस्कृती फुलत असते, प्रांतीय वैशिष्ट्य जपत असते. जागतिकीकरणाच्या प्रचंड रेट्यात ही प्रांतीयता हरवत चालली आहे ह्याच कधी दुःख वाटत तर कधी हे अटळ आहे, हे होणारच असा विचार करून मनाची समजूत घातली जाते. कोकणात महिना महिना भातावर राहणाऱ्या आमचं ही हल्ली पोळी शिवाय पान हलत नाही ही वस्तुस्थिती आहे. तिन्ही त्रिकाळ पोळ्या लागतातच. अगदी नाग पंचमी ला ही खांडवी बरोबर पोळ्या केल्या जातातच. ह्या प्रचंड रेट्यात ही आज पाय रोवून घट्टपणे उभ्या असणाऱ्या कोकणातल्या एका पदार्था विषयी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचं नाव आहे “ वेस्वार “.
नाव तस पहायला गेलं तर अगदीच रुक्ष आहे आणि नावावरून हा पदार्थ काय असेल ह्याची जरा ही कल्पना येणार नाही. ह्या नावाशी थोडे साधर्म्य सांगणारा “येस्सार” नावाचा एक मसाला पीठा सारखा पदार्थ मराठवाड्याची खासियत आहे ज्यापासून येस्सार आमटी हा झणझणीत तोंडाला पाणी सुटणारा रस्सा केला जातो आणि तो भात किंवा भाकरी बरोबर अक्षरशः ओरपुन खाल्ला जातो त्या भागात. उच्चारात साधर्म्य ह्या पलीकडे वेस्वार आणि येस्सार ह्यात काहो ही साम्य नाही.
वेस्वार हा मेतकूट आणि मसाला या दोन्ही सारखा वापरला जातो. म्हणजे पत्त्यातल्या जोकर सारखा हा कुठे ही लावला जातो. पत्त्यातल्या हुकमाच्या पाना सारखा सैपाकात काही कमी असेल तर तिथे कुठे ही वेस्वार अगदी चपखलपणे बसतो.
कोकणातील पदार्थ असल्याने ह्याचा मुख्य घटक अर्थातच तांदूळ आहे. कोकणात पूर्वी दळणवळणाची साधने कमी आणि हातात पैसा ही जवळ जवळ नाहीच त्यामुळे बाजारातून वस्तू विकत आणून काही करणे परवडणारेच नव्हते. घरी जे काय असेल त्यातूनच कोंड्याचा मांडा केला जाई. त्यामुळे ह्याचे बाकीचे घटक अगदी मोजकेच आहेत. लवन्गा, मिरी, दालचिनी असा कोणताही मसाल्याचा पदार्थ किंवा कोणती डाळ ही लागत नाही वेस्वार करायला. तांदूळ गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. त्यात जेवढे तांदूळ तेवढ्याच लाल मिरच्या भाजून घालायच्या . वाटीभर तांदळाला चमचाभर मेथी आणि मोहोरी भाजून घालायचं आणि ते सरसरीत दळायच की झाला गुलाबी रंगाचा स्वादिष्ट वेस्वार तयार.
दुधी, पडवळ, फणस ह्यासारख्या कोकणातल्या भाज्या आणि कुळथाची उसळ ह्यात वेस्वारच घातला जातो आणि त्यामुळे भाज्या फारच रुचकर बनतात. वेस्वार घातला की मसाला नाही घालायचा. वेस्वार आणि मसाला दोन्ही घालण्याची उधळमाधळ कोकणात कधी ही होणार नाही. ☺ कडधान्यांच्या कळणात ही चवीसाठी आवर्जून घालतो आम्ही वेस्वार. फोडणीच्या भातात तिखटा ऐवजी वेस्वार घातला तर वेगळाच स्वाद येतो भाताला. अगदी वांग्याच्या वगैरे रस्सा भाजीत जरी घातला वेस्वार तरी त्यातल्या तांदुळामुळे रश्श्याला दाट पणा येतो आणि मेथीमुळे स्वाद ही वाढतो. दही पोहे ,दही भात ह्यात ही छान लागतो वेस्वार . वेस्वारात तेल किंवा दही घालून कालवलं तर एक झटपट तोंडीलावण तयार होत. गरम भातात तूप मीठ आणि वेस्वार घालून ही मस्तच लागतं मेतकूट भातासारखं
इतका स्वस्त आणि तरी ही स्वादिष्ट असलेला वेस्वार कोकणात ही सगळीकडे केला जात नाही. आमच्या देवगड भागातच तो जास्त पॉप्युलर आहे . तसंच मेतकूट जसं सगळीकडे विकत मिळत शहरात तसा नाही मिळत हा विकत कुठे फार. वेस्वाराशी साम्य असणारी दक्षिण भारतातली चटणी पुडी देशात सर्वत्र मिळते. मेतकूट ही सर्व दुकानात विकत मिळत पण वेस्वार मात्र नाही मिळत त्यामुळे बिगर कोकणी लोकांना हा माहीतच नाहीये. मला खात्री आहे मार्केटिंग नीट केलं तर नक्कीच पॉप्युलर होईल वेस्वार सर्वत्र.
इतके वर्षात मी स्वतः एकदा ही केलेला नाहीये पाकृ माहीत असली तरी कारण वेस्वार मेटकुटाच्या पुड्या कोकणातून आम्हा मुंबईकरांनाच नाही तर परदेशात रहाणाऱ्याना ही आवर्जून पोचत्या केल्या जातात. परदेशात अगदी दुधीच्या भाजीत नाही तरी तिकडच्या कुर्जेटच्या भाजीत आवर्जून वेस्वार घातला जातो. आमची परदेशातील पुढची पिढी ही वेस्वार भात मिटक्या मारत खाते. आमचा हा कोकणचा वारसा अश्या प्रकारे पुढच्या पिढीकडून ही जपला जात आहे ह्याचा सार्थ अभिमान ही वाटतो.
वेसवार पण फ्रीजमधे वर्ष दोन
वेसवार पण फ्रीजमधे वर्ष दोन वर्ष आरामात राहते आणि मला घरीही करावं लागत नाही, गावाहून येतं बरेचदा. >> सेम हिअर . मी पण वेस्वार मेतकूट फ्रीज मध्येच ठेवते . दोन दोन वर्षे सुद्धा काही होत नाही.
अंजू पराठयांची आयडीया मस्तच. आता कधी पाऊस वैगेरे असेल त्या दिवशी करून बघते.
रश्मी लिंक मस्तच आहे. बाकी इतर ही खूप मसाले आहेत .
पुस्तक सध्या लॉक डाऊन मुळे ठप्प. पण निघालं की इथे नक्कीच सांगीन.
Pages