सुमारे ऐंशी वर्षापूर्वी डॉ फ्रेड अर्कहार्ट या एका कॅनेडियन संशोधकाने मोनार्क या अतिशय सुंदर व नावाला अनुरूप, राजबिंड्या फुलपाखरांचा अभ्यास सुरु केला. कडाक्याच्या थंडीत ही फुलपाखरे कुठे जातात? हा लहानपणापासून त्याला पडलेला प्रश्न! कीटक विषयात डॉक्टरेट मिळवून त्यांनी व त्यांच्या पत्नी नोराह यांनी या फुलपाखरांच्या स्थलांतराचा शोध चालू ठेवला. फुलपाखरांच्या एकत्र येण्याबद्दल ब्रिटिश कीटक शास्त्रज्ञ सी.बी. विल्यम यांनी १९३० मध्ये एक पुस्तक लिहिले होते. पण मोनार्क फुलपाखरे कॅनडा व अमेरिकेतून थंडीच्या ऋतूत नक्की जातात कुठे? हे गूढ उकलले नव्हते. फ्रेडनीं फुलपाखरांना बिल्ला (tag ) लावून त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेण्यास सुरवात केली. अनेक स्वयंसेवकांचे जाळे विणले. ९ जानेवारी १९७५ मध्ये, म्हणजे यावर काम सुरु केल्यापासून तब्बल चाळीस वर्षांनी फ़्रेंडचा फोन खणाणला. आनंदाची बातमी होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते. मेक्सिको मध्ये त्यांना या कामात मदत करणा-या त्यांच्या अमेरिकन सहकारी केन ब्रूगर व त्याच्या मेक्सिकन पत्नी कॅथे अग्वादो यांना हजारो नाही तर लाखो मोनार्क फुलपाखरांनी व्याप्त अशा मेक्सिकोमधील पर्वतरांगातील जागांचा शोध लागला होता. म्हणजे कॅनडामधून ही फुलपाखरे जवळजवळ चार हजार किलो मीटरचा प्रवास करून मेक्सिकोमध्ये आली होती. फ्रेड व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे आता सिद्ध झाले होते. जगाला थक्क करून सोडणारी ही माहीती पुढे नॅशनल जिओग्राफिक मासिकाने छापली. सुमारे चार इंच लांब पंख असणारी ही नाजूक फुलपाखरे एवढा प्रवास करून इथे कशी आली? त्यांनी कधीही न केलेला प्रवास कसा सुरु केला असेल? त्यांना पत्ता व दिशा कशी समजली? ती मुळात एकत्रच कशी व का आली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यावर आणखी खूप अभ्यास सुरु झाला. नागरीकांच्या मदतीने बिल्ले लावून (tagging ) ,अशा तऱ्हेने टॅग लावलेली फुलपाखरे दिसल्यास संकेत स्थळावर माहिती देण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले. मग असे लक्षात आले की मूळ मॅक्सिकोहून निघालेली पिढी,मॅक्सिको, उत्तर अमेरिका व मग कॅनडा असा प्रवास करते. या प्रवासात दोन पिढ्या नष्ट होतात आणि तिसरी पिढी कॅनडात पोहोचते. या पिढीतील मादी कॅनडामध्ये अंडी घालते व ह्या चौथ्या पिढीतील ही 'सुपर फुलपाखरे' प्रतिकूल वातावरणाचे संकट टाळण्यासाठी उपजत प्रेरणेने मेक्सिकोला जाण्यासाठी आपला प्रवास सुरु करतात. हा प्रवास दिवसाला सुमारे ८० किलोमीटर प्रतिवेगाने, दोन महिन्यात पूर्ण करून मेक्सिकोला पोहोचतात. ह्या घटनेमुळे ही जागा जगातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरले असून तेथील स्थानिक लोकांना ह्यामुळे रोजगार मिळण्यास खूप मदत होते. आपले पितर फुलपाखरांच्या रूपाने येतात असा तेथील काही लोकांचा समज असल्याने त्यांचे गावामध्ये जोरदार स्वागत होते. मात्र अवैध वृक्ष तोड झाल्याने या फुलपाखरांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
भारतात अशा प्रकारच्या फुलपाखरांच्या जमावाचा (congregation) व स्थलांतराचा अभ्यास थोड्याफार प्रमाणात झाला आहे. दक्षिण भारतात फुलपाखरांचा पश्चिम घाट ते पूर्व घाट असा , पावसाळ्यातील संभाव्य प्रतिकूल हवामान टाळण्यासाठी होणाऱ्या डार्क ब्लू टायगर , ब्लू टायगर, कॉमन क्रो इत्यादी मिल्कविड फुलपाखरांच्या स्थलांतरा विषयी डॉ कृष्णमेघ कुंटे यांचा महत्वाचा शोधनिबंध आहे. पेन्टेड लेडी, इमिग्रंट ही भारतात आढळणारी फुलपाखरे स्थलांतर करतात. दक्षिण भारतात फुलपाखरांना बिल्ला लावून स्थलांतराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
युबीसीजी (अर्बन बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन ग्रुप) या आमच्या निसर्गप्रेमी गटाने नोव्हेंबर २०१६ मध्ये स्ट्राइप टायगर या फुलपाखरांचे थवे ठाणे शहराजवळ जंगलामध्ये बघितले. हेमंत ऋतूचे आगमन झाले होते. मुख्यत्वे सदा हरित झाडांचा हा भाग होता. पाणी नसलेला झरा, त्याबाजूला करंज, जांभूळ, आंबा, एक्झोरा इत्यादी इत्यादी झाडे व त्यावरून गुळवेल इत्यादी वेलींचे जाळे अशा जागेत ती आली होती. तापमान १९ डिग्री सेल्सियसच्या ही खाली गेले होते. इथला अधिवास त्यांना नैसर्गिक छत्रीसारखा आडोसा आणि झाडांची उब देत असावा. एक्झोरा अजून पूर्ण फुलला नव्हता. वेली वाळल्याने नुसत्या लांब दोऱ्या सारख्या वाटत होत्या. त्यावर व आजूबाजूच्या सदाहरित झाडांवर अंदाजे हजार ते बाराशे फुलपाखरे एकमेकांच्या जवळ पंख मिटून दाटिवाटीने बसली होती. वाळलेल्या पानासारखी वाटत असल्याने प्रथम दर्शनी कुणालाही समजलच नाही की इथे एवढी फुलपाखरे आहेत. आश्चर्य म्हणजे नोव्हेंबर २०१७ व पुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये याच जागेवर याच प्रजातीच्या फुलपाखरांच्या जमावाने पडाव टाकल्याचे (congregation) दिसून आले. इथून पुढे ती कुठे जातात? हा संशोधनाचा विषय असू शकतो.
यात आमच्यासाठी आश्चर्य करण्यासारख्या दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांचे दरवर्षी त्याच जागेवर येणे. फुलपाखरांच्या जीवनचक्रामध्ये अंडी, अळी , कोष व प्रौढ फुलपाखरु अशा अवस्था असतात. विशिष्ट प्रजातीची मादी एका विशिष्ट प्रजातीच्या झाडावरच अंडी घालते. आपल्या पायावर असणारी स्पर्शेन्द्रिये वापरून फुलपाखरे झाड अचूक ओळखतात. म्हणून त्यांना उत्तम वनस्पती शास्त्रज्ञ म्हणतात. उदाहरणार्थ कॉमन बॅरन हे फुलपाखरू आंब्यावर, लाइम फुलपाखरू लिंबाच्या झाडावर , कॉमन मॉरमॉन- कडीपत्ता, टेल्ड जे -खोटा अशोक वर अंडी घालतात. अंड्यातून अळी बाहेर येते व त्याच प्रजातीच्या झाडाची पाने खाते. अळी कोष बनवते व त्यातून फुलपाखरू बाहेर येते. बहुतांशी फुलपाखरे फुलातील मधुरस सेवन करतात. याचा अर्थ त्यांना आवश्यक अधिवास, पूरक हवामान व खाद्य वनस्पती उपलब्ध असणे जरुरी असते. फुलपाखरे व त्यांच्या अळ्या हे अनेक पक्षी, कीटक, खेकडे, सरडे, कोळी इत्यादींचे अन्न आहे. फुलपाखरे परागीभवनातही मदत करतात. पर्यटनामध्येही त्यांचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून त्यांच्या अधिवासाचे संवर्धन होणे अतिशय आवश्यक आहे. फुलपाखरांसाठी अन्न व उपयुक्त क्षार मिळवणे , प्रजननासाठी प्रयत्न पूर्वक आपला सहचर मिळवणे, अंडी घालणे व हे सर्व करण्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवणे हेच त्यांचे जीवन म्हणता येईल. त्यांचा जीवन कालावधी (प्रजातीप्रमाणे वेगवेगळा असला तरी ) अंदाजे चार ते पाच अठवडे असू शकतो. म्हणजे आम्ही दर वर्षी बघणारी फुलपाखरे ही पुढच्या पिढीतली असणार! मग ह्यांनी हा पत्ता कसा शोधला असेल? त्यांना दिशा कशी समजली? याचे कुतूहल वाटते.
यातील दुसरे आश्चर्य म्हणजे एकाच प्रजातीच्या फुलपाखरांनी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणे! वास्तविक फुलपाखरू हे एकटे वावरणारे कीटक. पक्षांसारखे ते कधी थव्यामध्ये फिरताना सहसा दिसत नाहीत. त्यांना एकत्र येण्याची उत्तेजना मिळत असावी. फुलपाखरे स्थलांतरापूर्वी मुळात एकत्रच का येतात हे एक कोडे आहे. त्यांच्या ह्याच वर्तनाचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञ करत आहेत.
फुलपाखरे वास्तविक अनेक कारणांनी एकत्र येतात. काहीच प्रजाती एकत्र येऊन मग स्थलांतर करतात. स्थलांतर करताना सूर्याचे स्थान, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, त्यांच्या मेंदूतील नैसर्गिक घड्याळ, वा-याची दिशा व वेग इत्यादींचा योग्य वापर ती करत असावीत असे शोध शास्त्रज्ञानी लावले आहेत. एकत्र येण्याचे एक कारण म्हणजे खाद्य वनस्पतींची उपलब्धतता. बहुतांशी फुलपाखरे फुलातील मधुरस सेवन करतात आणि मग अशा फुलझाडांमध्ये एकत्र विहार करताना दिसतात. फुलपाखरांची अळी एका विशिष्ट प्रजातीच्या झाडाची पाने खाऊन मोठी होते. बाकीचे आवश्यक क्षार व खनिजे मिळवण्यासाठी ओलसर मातीमध्ये शेकड्याने फुलपाखरे बसलेली तुम्ही पहिली असतील. याला "मड पडलिंग" असे म्हणतात. कॅल्शियम, फॉस्फेट, सोडियम आणि नायट्रोजन इत्यादी शोषून घेतात व आपल्या शरीरात साठवतात. नर-मादीच्या मिलनात नर शुक्राणूंबरोबर ही पोषक द्रव्ये मादीला भेट म्हणून देतो. पुढची पिढी सुदृढ होण्यासाठी ते पोषण आवश्यक असते. त्याचप्रमाणे क्रोटोलारिया (खुळखुळा), हेलिओट्रॅपिअम आणि अजिरेटम या वनस्पतींवर टायगर जातीची नर फुलपाखरे "पायरोलिझीडीन अल्कलॉइड" शोषून घेण्यासाठी गर्दी करतात. हे रसायन त्यांना मादीला आकर्षित करण्यासाठी आवश्यक (सेक्स फेरोमोन) मिलन-संकेती गंधद्रव्य बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र एका विशिष्ट टायगर पतंगाच्या सुरवंटाने पाने कुरतडल्यावरच हे रसायन स्त्रवते. हे सुरवंट नसतील तर या झाडांवर फुलपाखरे येत नाहीत. याचा उल्लेख डॉ राजू कसंबे यांच्या 'महाराष्ट्रातील फुलपाखरे' या पुस्तकात आला आहे.
जेफरे बिल यांनी १९५३ मध्ये कॅबेज व्हाईट या फुलपाखरांचे टेकडीवर होणाऱ्या एकत्रीकरणा विषयी लिहिले आहे. एकाच दिशेने जाणारी फुलपाखरे टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या वाऱ्याच्या जास्त वेगामुळे अडवली जातात व एकत्र येतात असे अभ्यासकांनी म्हटले आहे. बॉब यिरका यांनी (phys.org/news/2012-03) या संकेत स्थळावर टायगर लॉंगविंग ही फुलपाखरे स्वसंरक्षणासाठी एकत्र येतात असे आपल्या लेखामध्ये म्हटले आहे. तसे एकत्र येण्याने त्यांच्यावर भक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्याची शक्यता कमी होते असे लक्षात आले आहे. कधीकधी अळ्यांना भरपूर खाद्य वनस्पती मिळाल्यामुळे फुलपाखरांच्या संख्येचा प्रकोप होतो व काही ठिकाणी एकाच प्रजातीची फुलपाखरे जास्त प्रमाणात एकत्र उडताना दिसतात. अतिशय गरम हवामानामुळे सुद्धा फुलपाखरे एकत्र येतात व दुसरीकडे स्थलांतर करू शकतात.
प्रतिकूल हवामान, जास्त संख्या आणि परिणामी होणारी अन्नाची कमतरता, दुष्काळ, अति थंड हवामान या अनेक कारणांनी येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे कीटकांना निष्क्रियतेच्या अवस्थेमध्ये (diapause) रहावे लागते. ही अवस्था टाळण्यासाठी काही कीटक स्थलांतर करतात. आम्हाला दिसलेले फुलपाखरांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे थवे हे स्थलांतरासाठी असावेत. विश्रांतीसाठी ही फुलपाखरे थांबली असावीत. आम्ही ते सुंदर दृश्य पहातच राहिलो. थंडीने जंगल गोठून गेले होते. सूर्योदय होणार होता आणि चित्र बदलणार होते. जणू हा कुठलासा नयनरम्य उत्सव चालू होता. लांबलचक उंच दोरी सारख्या वेलींवर फुलपाखरे दाटीवाटीने एकाखाली एक बसली होती. त्यांच्यावर सूर्य किरणांची सोनेरी झालर असल्या सारखी दिसत होती. झाडे जणू फुलपाखरांच्या माळेच्या आरासेने सजली होती. दुसरीकडे झाडांवरही फुलपाखरांचे थवे बसलेले दिसले. हळूहळू सूर्य वर आला आणि फुलपाखरं जागी होतायत असं वाटू लागलं. कधी कधी पोपट असे एकत्र येऊन बसतात आणि जायची वेळ झाली की एक पोपट एक विशिष्ट प्रकारे शीळ वाजवतो आणि उडतो. त्यामागे मग इतरही उडतात. इथेही तसंच काहीस झालं. एक फुलपाखरू उडाले, खूण पटली आणि त्यामागे क्षणाचाही विलंब न करता दुसरे आणि मग हा-हा म्हणता इतर सर्व फुलपाखरानी एकाचवेळी आकाशात चहूकडे झेप घेतली आणि त्यांचा पंखन्यास चालू झाला. मोत्याची माळ तुटावी आणि मोती पसरावेत तशी फुलपाखरे सर्वत्र पसरून गेली. सूर्यकिरणांना आलिंगन देण्यास ती आतुर होती. सुमारे तीन ते चार आठवड्याच्या विश्रांती नंतर पुढचा पल्ला गाठायचा होता. त्या कुठल्यातरी निसर्गातील संकेताची वाट बघत तिथे थांबली होती. वैयक्तिक स्तरावर मिळालेल्या उपजत असलेल्या प्रेरणेने ती एकत्र आली असावीत. त्यांच्या या अशा एकत्र येण्याचे रहस्य पूर्णपणे उलगडायचे आहे. यावर अजून अभ्यास सुरु आहे.
झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे फुलपाखरांचे अधिवास नष्ट होत आहेत. म्हणूनच मोनार्कच्या स्थलांतरामध्ये फुलपाखरांना बिल्ला लावण्यासाठी व त्यांच्या मार्गात येणाऱ्या शहरांतून, बिल्ला लावलेली फुलपाखरे शोधण्यासाठी, लहानथोर नागरिकांचा सहभाग फार मोलाचा वाटतो. फुलपाखरे तापमान, आर्द्रता आणि अधिवास या विषयी फारच संवेदनशील असतात. हे अधिवास नष्ट झाले तर काय? ती कुठे जातील? फुलपाखरांचे एकत्र येणे व तदनंतरचे स्थलांतर यांच्या अभ्यासाने पर्यावरण विषयक अनेक महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. भारतातही या विषयी अनेक संशोधक व अभ्यासक सक्रिय आहेत. त्यामुळे फुलपाखरांच्या अधिवासांचे संवर्धन होण्यास नक्कीच मदत होईल आणि ही एक आनंदची बाब ठरेल.
काय सुंदर लेख आहे. निवडक १०
काय सुंदर लेख आहे. निवडक १० त.
व्हरमाँटमध्ये ही मोनार्क खूप दिसत. व्हरमाँटचे साउथ बर्लिन्ग्टन हे कॅनडाअचय function at() { [native code] }इनिकट असल्याने ही स्थलांतरीत फुलपाखरे दिसत असावीत.
सुंदर माहिती. मला पण देवकी
सुंदर माहिती. मला पण देवकी सारखाच प्रश्न पडलाय. उडताना त्रास होत नाही का बिल्ल्याचा? जड होत नाही का?
Pages