क्षण वेचताना

Submitted by व्यक्त अव्यक्त on 21 June, 2018 - 09:04

ऋतू बदलतोय, भिजतोय. आपले कठीण रुक्ष रूप सांडून कोवळा कोवळा होतोय. रंग बावरे वेल्हाळ रूप सांडून रुजवातीच्या जबाबदाऱ्या

पेलू पहातोय.

  इतके दिवस करपून, कोळपुन गेलेल्या भुईवर वळवाचे चार थेंब काय पडले, उत्साहाने ती रोमांचित झाली आहे.

दाटून येणाऱ्या नभात ती उद्याच्या आशेचे चित्र पाहतेय. थोडीशी उन्हाची तलखी कमी होत आहे म्हणताच जराश्या सरीनन्तर ती परत वाढते. कुमारावस्थेतून यौवनात येण्याचा काळ जसा चिंतामिश्रित कुतूहलाचा असतो तसाच हा परिवर्तनाचा दोन ऋतूंच्या मधला हा काळ, हुरहुरीचा, नवीन अनुभव घेण्याचा. काया बदलून नव्या उत्साहाने तरारून उठण्याचा. लगबगीचा.

तशी लगबग आपल्या अंगातच भिनुन आलेली असते जणू. ती अनुभवायची असेल तर गर्दीतील एका कोपऱ्यात उभे राहून गर्दी न्याहाळावी. असंख्य पावले अन असंख्य माणसं. गर्दीलाही स्वतः चा एक चेहरा असावा. वेगवेगळी सुखदुःखे घेऊन वावरणारा.रस्ता , रस्त्याच्या कडेला लावलेले पथदीप, कडेने उभी झाडं यांची प्रत्येकाची काहीतरी वेगळी कथा असेल. पहिले तुषार अंगावर झेलताना समाधानाचे निश्वास सोडताना मी त्यांना पाहिलंय. नवा थेंब झेलताना झाडाच्या अंगावरून सरसरून काटा येताना पाहिलाय.अनेक टक्केटोणपे खाऊन दगडी झालेली मने सहनुभूतीच्या चार थेंबानी मृदू मऊ बनताना पाहिलीत. उंचावरून न्याहाळताना जग आपोआप स्वप्नील बनतं पाहणारा दृष्टीक्षेपातल्या प्रत्येक झाडाचा आत्मा बनतो, पाण्यातून वाहतो, अन उन्हातून स्त्रवतो.

 या सगळ्याची मग कविता बनते, रिते होण्यातले आसुसलेपण, ओला क्षण टिपण्यासाठी पानांचा झालेला आतुर टिपकागद, भिनत जाणाऱ्या ओलाव्याने चढत जाणारी हिरवी नशा शब्दा- शब्दांतून उतरते.

    हे ओढाळपण, हे नवथर अल्लड प्रेम चहूबाजुनी उतू जायला थोडासाच अवकाश उरला आहे. आपण ते घ्यावे फक्त. पावसाच्या थेंबाईतके क्षणभंगुरत्व कुठे नसेल. त्याचा इतिहास व भविष्य हे अज्ञाताच्या प्रांतात विरघळून गेलेले असतात. क्षण जगण्या पुरतीच इतिकर्तव्यता असते त्याला. जीवनाबद्दलच्या ओढीने ओतप्रोत भरलेला तो क्षण. भुईवर अवतरला तर नवा जन्म घेतो, नाहीतर आपल्यासारख्याच कैक जणांत अस्तित्व मिसळून टाकत लोप पावतो. मागे उरते त्याची कहाणी.ग्रीष्मानंतर वर्षा येणारच ही हमी दरवर्षी देणारी कहाणी. दरवर्षी ती पुनः पुन्हा नव्याने जन्म घेते. खेडोपाडीच्या शेता शिवारांमध्ये बीज जोजवते. चातक पक्ष्याच्या आतुरतेने आळवली जाते.

नवतीचा सुगावा अन परतीचीच घाई 

आभाळभर चित्तचांदणी 

जशी धाव घेई

ओल्या पेरत्या खाचराना

ऊन सावलीचे बळ

मातीला भूल पडे कोणी केले सायवळ

 हे सायवळ दरवेळचेच. अन हे भाळणेही. दरवळणेही. खूप खूप काही. पालटून टाकणारे, हवेहवेसे वाटणारे. कायम वस्तीला येणारे, पुनः पुन्हा नव्या रुपात, नव्या आकांक्षा घेऊन

ऊन कोमटसे होइ

घन कोंडे दिशा दाही

पर्णपटांवरून अवघी कविता

आता होईल प्रवाही

तो येतोय........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults