शेवटची प्रेमकथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 24 January, 2017 - 06:50

आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेषणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.

दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.

ती मात्र घाबरली नाही.कारण तो बोलला होता असंच होणार अन ती विश्वास ठेवायची त्याच्या प्रत्येक वाक्यावर. सारा गाव रस्त्याच्या दिशेने पळू लागलेला. तिला मात्र जायचं होतं दुSर- सुर्य उगवतो त्या टेकडीच्या पाठीमागे. तिथेच तर ते भेटायचे. तिथली झाडं साक्ष होती त्यांच्या प्रेमाची. ती जवळ नसली की तो झाडांशी गप्पा मारायचा.

“तू झाडांशी का बोलतो?” तिने एकदा विचारलं होतं.

“कारण ते माझे मित्र आहेत. मला कळते त्यांची भाषा. मीपण त्यांच्यातलाच एक बनणार एक दिवस.” तो स्वप्नाळू डोळ्यांनी सांगायचा.
तिला हे पटायचं, पण लोकांना नाही.वेडा म्हणायचे सगळे त्याला, हसायचे खूप. पण त्याला कुठं होती पर्वा!

विचार करता करता पोहोचली ती टेकडीच्या मागे. सूर्य तापून लाल झाला होता एव्हाना. इथपर्यंत ती कशी पोहोचली हाच मोठा प्रश्न. कदाचित प्रेमामुळे असेल. याच प्रेमापोटी तिने त्याला जायची परवानगी दिली होती. तो बोलला होता,मी येईल तुझ्याजवळ कायमचा. विश्वास ठेव.
याच शब्दांपोटी तिने पिऊन टाकले होते सगळे अश्रू.
“एक दिवस संपेल हे जग पापी माणसांचं. राज्य येईल तेव्हा झाडांचं. तेव्हा तू ये इथेच, या टेकडीमागे. लाल रंगांची फुलं घेऊन उभा असेन मी तुझं स्वागत करायला.”
त्याचं सगळं बोलणं स्पष्ट आठवत होतं तिला; पण श्वासाची लय आता तुटक होऊ लागली होती, उरले होते फक्त काही क्षण. तिने शरीराच्या सगळ्या अणुरेणुंसकट आवाज दिला त्याला. पिसाटल्यागत धावली ती त्याला शोधायला; पण तो नव्हता कुठंच. तो वचन विसरला का? नाही असं कसं होईल? तिला ग्लानी आली, भान हरपू लागलं झपाट्यानं. अखेर ती कोसळलीच. पण अजूनही तिच्या शरीरातला कण अन कण प्राणवायुविना नाही तर त्याच्याविना तडफडत होता.

हळूहळू नजरेसमोरचं सगळं पुसट होत गेलं. जगण्याचं बळ संपलं…पण मरणसुद्धा एवढं सोपं नसतं हुलकावणी देतंच तेसुद्धा एखाद्याला. तिच्या मदतीला वायूंचा राजा आला धावून.नाकातोँडातून घुसून प्रवेश केला शरीरात चैतन्यानं.प्राणवायु दौडू लागला तिच्या नसानसांतून.

तिचे मिटलेले डोळे उघडले.समोर खरोखरच तो उभा होता, लाल रंगांची फुलं घेऊन. तिच मूर्ख होती,त्याला ओळखायला चुकली होती. तो लालज़र्द रंगांची फुलं अंगाखांद्यावर लेऊन जमिनीत आपली भक्कम मु़ळं रोवून उभा होता; आपले फांद्यांचे हात पसरवून तिला बोलावंत होता.
ती विरहिनी वाहत गेली लाटेसारखी. घट्ट बिलगली त्याच्या खोडाला.
आसवांचा पूर वाहू लागला, लाल फुलांच्या वर्षावात तिचा देह न्हाऊ लागला.
----------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल्पनिकतेच्या तिरावर दुनिया जेव्हा बदलली असेल... अशा कोणत्या काळी माणसं झाडात रुपांतरीत होतात. आणि अशा कोणा प्रेमिकांची ही कहाणी आहे. आशय खरं तर पोहचला नाही. कथेचा पायाच शोधता सापडत नाही....
नुसतं प्रेम आहे म्हणुन कळतंय बाकी तो कोण ती कोण काय कसं कधी केव्हा कुठे हे तर गायबच आहे...

त्या गाळलेल्या जागा भरुन काढल्या तर चांगल्या कल्पनेच सार्थ होईल....
लेखक बघा यावर विचार करुन....

ऍस्ट्रोनॉट विनय कथा कोणत्या ग्रहावरची आहे. सायफाय कथा आहे की काय???

कल्पना चांगली आहे आहे पण...विस्तार आणि मांडणी चुकलेय...
लालसुर्य, प्राणवायु न सोडणारी झाडं, माणसांच झाडात रुपांतर....

क्रमशः वैगरे आहे का नाय?...
व्यवस्थित जर लिहली तर....जमेल....बघा विचार करुन...

कथेची मांडणी आणि रचना अगदी बरोबर आहे. ही fantasy आहे त्यामुळे फक्त कल्पनेत शक्य असलेल्या गोष्टी इथे घडल्या. पण या कल्पनेलासुद्धा logic आहे. कथालिखाणाचा प्रकार flash fiction असा आहे. लघुकथेप्रमाणे इथे प्रत्येक गोष्टीच explaination दिलं जात नाही. डोक्याला ताण देऊन वाचक जेवढा आणि जसा विचार करतील तशीतशी त्यांना कथा उलगडत जाईल, नवीन शक्यता आणि अर्थछटा सापडतील. सगळीच उत्तरं आयती न देता वाचकांना कामाला लावणे हा उद्देश्य. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी कथेत अव्यक्त स्वरूपात दडलेल्या आहेत. त्यामुळे गाळलेल्या जागा भरण्याची आवश्वायकता नाही. कथा क्रमश: केल्यास फील निघून जाईल.

ही कथा अमेरिकेच्या FantasyFlash या मासिकात ( english version), लखनऊच्या विग्यान कथा त्रैमासीकात (हिंदी), आणि पुण्याच्या प्रभात दीपोत्सव या दिवाळी अंकात छापून आली आहे.

कथा थोडक्यात explain करतो-
तो आणि ती एकमेकांवर प्रेम करत असतात. त्याला झाडांची भाषा कळते अन तिला त्याच्यावर विश्वास असतो. झाडं त्याला सांगतात की आम्ही photosynthesis ची नवीन पद्धत शोधलीये आणि काही दिवसांनंतर ऑक्सिजन बनवणार नाही. तू आमचा मित्र आहेस म्हणून तुला आम्ही आमच्यातलाच एक बनवू, तू अमूक दिवशी अमूक ठिकाणी ये. तो तसंच करतो पण जातांना तिला hint देऊन ठेवतो की असं असं होणार आहे आणि तू मला आपण नेहमी भेटतो तिथे भेटायला ये.
ती जाते तेव्हा तो झाड बनून तिथे उगवलेला असतो. (ज्याने कुणी त्याला झाडात रूपांतरित केलं त्याला तो बोलला असेल की मला लाल फुलांचं झाड बनव. (कारण ती त्यांची ओळखीची खूण असते) तिला बघितल्यावर तो ऑक्सिजन न बनवायचा संकेत धूडकावून लावतो. यासाठी त्याला शिक्षा मिळेल किंवा तिलासुद्धा तो झाड बनवेल. प्रश्न तो नाही. कथेचा मु़ळ उद्देश्य निरपेक्ष प्रेम दाखवणे हा आहे. प्रेमात जो विश्वास आणि त्याग हवा असतो तो इथे आहे.
आता झाड कधी बोलेल का किंवा मग माणसाला झाडात रूपांतरित करता येईल का वगैरे प्रश्नांवर विचार करू नये कारण ही fantasy आहे. (पण या कल्पनेलासुद्धा आधार आहे. जगदीश बोसांच्या मते झाडांची एक भाषा असते आणि एक दिवस असा येईल की आपण ती समजू शकू. माणसाच्या DNA मध्ये त्याचं अख्खं स्वरूप साठवलेलं असतं. दोन वेगवेगळ्या प्राण्यांपासून तिसरा वेगळाच प्राणी तयार केल्याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. मग एक पाऊल पुढं जाउन DNA वेगळा करून एखाद्या झाडाच्या RNA सोबत blend करता येईल का ही कल्पना डोक्यात आली..असं झाल्यास मनुष्य असलेला वृक्ष किंवा वृक्ष असलेला मनुष्य तयारही होऊ शकतो. कुणी सांगावं. अर्थात सध्याच या कल्पनेला वैज्ञानिक आधार नसल्याने मी sci-fi न म्हणता fantasy म्हटलं.

आणि त्याचं नाव काय, तिचं नाव काय, काळ कोणता आहे, गाव कोणतं आहे ह्या गोष्टी मांडण्याची खरंच गरज आहे का? तसं दिलं असतं तर ती फक्त त्या नावाच्या दोन लोकांची गोष्ट झाली असती. मला ती प्रेम करणाऱ्या सर्वांची गोष्ट बनवायची होती.
Hope u got it __/\__ Happy

कमी शब्दात एवढ जबरदस्त कथानक !!!
बऱ्याच दिवसांनी वेगळं, छान, कल्पक वाचायला मिळालं, त्याबद्दल धन्यवाद!!
अजून अशा कथा वाचायला नक्कीच आवडतील. पु.ले.शु.

कथा छान आहे...
पण,मला वाचताना असं वाटलं कि काहीतरी मिसिंग आहे...
याचा पुढचा भाग होऊ शकतो,असं मला वाटतय ...
बाकी लेखन छान केलेलं आहे...
पु.ले.शु.

__/\__

कथा आवडली. फॅन्टसी मस्त.
त्याला महित होते कि एक दिवस येइल जेव्हा झाडे ऑक्सिजन निर्माण करणार नाहीत, म्हणून तिच्यासाठी तो झाड बनला, जेणेकरुन ऑक्सिजन निर्माण करुन तिचा जिव वाचवू शकेल.

कथा आवडली...
आणखी जास्त शब्द अथवा उलगडण्याची गरज नाही वाटत अजिब्बात...
पुढील लेखनाला शुभेच्छा..

Explain karayachi garaj navhati khartar. Story self explanatory ahe.

Fantasy mhanun story awadali.
Pan science fiction asel tar zadanchyatala badal kasa ghadu shakel hyavar thod bhashya garajech ahe - ASA maza opinion.

मजा आली. ही सुद्धा आवडली.. येऊद्या अजून. जरा हटके मिळतेय वाचायला.
आणि हो, जमल्यास प्रत्येक प्रतिसादाला ईतके एक्स्प्लनेशन नका देऊ. भले यामागे वाचकांना मान द्यावा असा आपला सदहेतू असला तरीही.. जरा गंमत कमी होते, बाकी काही नाही.. वैयक्तिक मत Happy

आन दो और ..

आणि हो, कथेच्या मध्याला मला वाटले होते की तो झाडांशी त्यांच्या भाषेत बोलून सेटींग लावतो त्याच्यापुरते ऑक्सिजन पुरवण्याची. आणि झाडेही आपल्या या वृक्षप्रेमी मित्राची मदत करायला तयार होतात. पण हा शेवट आवडला.

Pages