सावट

Submitted by मोहना on 3 April, 2016 - 20:18

प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं. दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्‍या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.
"चित्रा, शक्य झालं तर मला माफ कर." झटकन मान फिरवून तो पुन्हा वळला. ती तशीच उभी राहिली. गोठल्यासारखी. हे काय नवीन? प्रथम काय म्हणाला? माफ कर? का पण? ओढणी सावरत ती फाटकाच्या दिशेने धावली. पण उशीर झाला होता. प्रथमची गाडी धुरळा उडवीत नाहीशी झाली होती. अंगातलं त्राण गेल्यागत ती मागे वळली. प्रथमच्या शब्दांचा काही केल्या अर्थ लागत नव्हता. फोन करावा? की तो येईपर्यंत वाट पाहायची? त्याचं बाहेर काही? दुसरा संसार? मूल? तिला त्याचा रागच आला. हे काय, माफ कर म्हणे. काहीतरी तुटक बोलून डोक्याला भुंगा लावून द्यायचा.

ती वेगाने प्रथमच्या खोलीत शिरली. टेबलावरचे कागद उलट सुलट करून त्यातून काही मिळतंय का शोधत राहिली. हातात येईल तो कागद पाहून ती भिरकावून देत होती. विचारांच्या नादात खोलीत झालेला कागदांचा पसाराही तिच्या लक्षात आला नाही. टापटिपीच्या बाबतीत काटेकोर असणारी चित्रा उन्मळून गेल्यासारखी खोलीतल्या कागदांवर स्वत:ला झोकून देत हमसून हमसून रडत राहिली. काहीवेळाने तिची तीच स्वत:ला सावरत उठली. खोलीचं दार बंद करुन पसारा नजरेआड टाकत दिवाणखान्यात आली. निरर्थक इकडे तिकडे पाहात राहिली. तिचं लक्ष कोपर्‍यातल्या टेबलाकडे गेलं. तिने दागिन्यांच्या नक्षीचे नमुने ठेवले होते त्यावर व्यवस्थित ठेवलेला लिफाफा उठून दिसत होता. चित्राला हसायला आलं. चित्राच्या हातात सहजासहजी पडावा या हेतूने त्याने तिच्या कामाच्या जागी तो लिफाफा ठेवला होता. तिने मात्र त्याच्या खोलीचा नक्षाच बदलून टाकला. तिचा अंदाज खरा होता तर. प्रथमला लेखणीचा आधार घ्यावा लागला होता. म्हणजे पुढचं सारं तिला शंका आली होती तसंच? कधी लिहिलं असेल त्याने हे पत्र? माफ कर म्हणाला म्हणजे काहीतरी अस्वस्थ करणारंच असणार. त्याची मनोवस्था जाणवली कशी नाही? तिने घाईघाईने पत्र उघडलं. उभ्या उभ्या वाचायला सुरु केलेल्या पत्रातल्या ओळी तिच्या नजरेसमोर अंधुक व्हायला लागल्या. चित्रा खुर्चीचा आधार घेत बसली. अंदाज चुकला म्हणून आनंद मानायचा की जे घडत होतं ते थांबवायचा प्रयत्न करायचा? खरंच होतं ते तिच्या हातात? तिचं तिलाच समजेना. पण मन मात्र घडत असलेल्या, घडून गेलेल्या घटनांचा, प्रसंगांचा आपोआप पुन्हा धांडोळा घ्यायला लागलं.

चित्रा पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. कथेतले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहत होते. एकदम कुणीतरी पुस्तक ओढलं तसं तिने दचकून पाहिलं. प्रथम वैतागून तिच्याकडे पाहत होता.
"किती हाका मारायच्या चित्रा?"
"लक्षातच आलं नाही." ती एकदम ओशाळून म्हणाली.
"चल ना, भटकून येऊ या कुठेतरी." रविवारची दुपारची निवांत झोप काढून तो ताजातवाना झाला होता. तिला खरं तर घेतलेली गोष्ट वाचून पूर्ण करायची होती. पण तिने मोडता घातला नाही. पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. स्वत:चं आवरुन प्रथम बरोबर निघाली. बाहेर पडल्या पडल्या प्रथमला कुणी ना कुणी ओळखीचं भेटत राहिलंच. चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवून चित्राही प्रत्येकाबरोबर होणार्‍या त्याच्या गप्पा ऐकत होती. प्रथम गपिष्ट तर चित्रा तशी अबोलच. त्याचं धबधब्यासारखं कोसळत राहणं तिला मनापासून भावायचं, त्याच्या लोकसंग्रहाचं कौतुक वाटायचं. ती कौतुकाने त्याच्या प्रत्येकाशी होणार्‍या गप्पा कान देऊन ऐकत होती. रहदारीचा भाग काही वेळात संपून दृष्टीक्षेपात येणारा गडनदीचा पूल गप्पागोष्टींमुळे नजरेत यायला दहा पंधरा मिनिटं लागली. तो दिसायला लागल्यावर मात्र कधी एकदा पुलाच्या कठड्याला टेकतो असं होऊन गेलं चित्राला. प्रथमच्या बरोबरीने ती चालत असली तरी आता तिला त्या पुलाचीच ओढ लागली. नदीजवळच्या पुलाजवळ येऊन दोघं उभे राहिले. पुलाखालून वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे चित्रा पाहात राहिली. नदीच्या पाण्याचा आणि पाठीमागून रस्त्यावरुन जाणार्‍या एखाद्या गाडीचा आवाज इतकंच काय ते संगतीला आहे असं वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. प्रथमने तिच्या तंद्रीचा भंग केला,
"उभ्या देवापर्यंत जाऊ या?" वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट, डाव्या हाताला वळत गेलेल्या रस्त्यावर झाडामधून नजरेला पडणारी पण झटकन नाहीशी होणारी एखादी सायकल, आणि मध्येच संध्याकाळच्या येणार्‍या प्रकाशाची तिरीप डांबरी रस्त्यावर पडून काहीतरी चकाकल्यासारखा भास हे सारं अनुभवण्यात ती गुंग होती. प्रथमच्या शब्दांनी ती भानावर आली.
"चालेल." ती लगेच वळून चालायला लागली. प्रथमच्या हातात हात गुंफून मावळतीचा प्रकाश अनुभवत संथपणे चालत राहिली.
"काय काय येतं नाही नजरेच्या टप्प्यात या पुलावरुन? गडनदी, हळवलला जाणारा रस्ता, आर्यादुर्गेचं देऊळ. मला आवडतं हे दृश्य पाहायला. पण पुलावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या गाड्यांची भिती वाटते. फार जोरात चालवतात." तिने नुसतीच मान हलवली. प्रथमनेही गप्पा मारण्याची इच्छा आवरली आणि शांतपणे तो तिच्याबरोबरीने चालत राहिला.

गर्द झाडीच्या रस्त्यावरुन पायवाटेवरुन थोडं आत चालत गेलं की विस्तीर्ण वृक्षांच्या सावलीतला उभा देव तिला आजूबाजूच्या वातावरणात गूढता निर्माण करणारा वाटायचा. पायाखालच्या पानांची सळसळ, लांबवरुन ऐकू येणारी एखादी हाक, नदीच्या आसपास कपडे धुण्याचा येणारा अस्पष्ट धपधप आवाज असं सगळं कानावर झेलत दोघं तिथल्या भल्या मोठ्या शीळेवर बसले. हाताच्या अंतरावर शांतपणे वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे दोघं मूकपणे पाहत राहिले.
"तुला पश्चाताप होतोय का चित्रा?" अचानक प्रथमने विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
"कशाबद्दल?"
"या आडगावात येऊन राहिल्याचा." चित्राने हसून मानेने नकार दिला.
"नक्की?" त्याने पुन्हा विचारलं.
"नाही रे. पश्चाताप कसला. तुला आवडतंय ना मग झालं तर."
"हेच, हेच मला आवडत नाही तुझं. मला आवडतं म्हणून तू करतेस का सारं?"
"नाही, असंच काही नाही."
"तू आनंदी दिसत नाहीस. चित्रा, मला ठाऊक आहे तुला यायचं नव्हतं रत्नागिरी सोडून. माझ्यासाठी म्हणून आलीस तू. खरं ना?"
ती काहीच बोलली नाही.
"इतका त्याग, कुढेपणा बरा नव्हे चित्रा."
"अरे, काहीतरीच काय बोलतोस?"
"मन मारुन तू काही करावंस अशी माझी इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगतोय. पण तुझ्या मनाचा थांगच लागत नाही कधीकधी."
काही न बोलता चित्राने त्याच्या हातात हात गुंफला.
"तुझं काहीतरीच. आणि आता आलोय इथे आडबाजूला तर बसू या नं निवांत. डोळे मिटून इथला शांतपणा अंगात अलगद झिरपू द्यावा असं वाटतंय. आपणही ह्या शांततेचा, गूढतेचा भाग व्हावा असं काहीसं." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटलेच. तो ही नाईलाज झाल्यासारखा संथ वाहणार्‍या पाण्यावर नजर खिळवून बसून राहिला. एकमेकांना चिकटून बसलेल्या त्या दोघांची मनं मात्र दोन दिशेला भरकटली होती. प्रथमच्या मनात चित्राला बोलतं कसं करायचं याचा विचार चालू होता तर चित्राच्या डोळ्यासमोर कणकवलीला कायमचं यायचं ठरायच्या आधीचे दिवस तरळत होते.

त्या दिवशी कणकवलीहून तो आला संध्याकाळी. चित्राने नुकतंच काही दागिन्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यातली रंगसंगती, आकार ती पुन्हा पुन्हा निरखून पाहत होती. दुबईतल्या व्यावसायिकाला दागिने आवडले तर वर्षभर पुरेल इतकं काम हाताशी येणार होतं. ते काम तिलाच मिळेल याची तिला खात्री होती. थोडेफार बदल सुचवले तर ते करायची तयारी तिने मनात आधीच केली होती. आता फोटो काढून पाठवून द्यायचं एवढंच राहिलं होतं. प्रथम आल्या आल्या उत्साहाने ती बांगडी आणि हाराची नक्षी दाखवणार तितक्यात घरात शिरल्या शिरल्या तोच म्हणाला.
"चित्रा, खूप दिवसांपासून मनात काही घोळतंय. तुला केव्हा वेळ असेल तेव्हा बोलूया."
"महत्वाचं आहे? त्याच्या स्वरातला गंभीरपणा तिला जाणवला. तिने हातातले नक्षीचे कागद आणि दागिने बाजूला ठेवले.
"अगदी तसंच नाही. पण थोडी धाकधूक, शंका आहे मनात. तुझ्याशी बोलता बोलता मलाच उत्तरं सापडत जातात."
"मग बोल की आत्ताच. आहे वेळ मला. पण निदान हात पाय धू, काहीतरी खाऊन घे. यमुनाबाईंना सांगू का काहीतरी करायला?"
"नको. निघायच्या आधी खाल्लंय."
"ठीक आहे." चित्राने यमुनाबाईंना त्याचं सामान आत नेण्याची खूण केली आणि ती बसली.
"मी कणकवलीला कायमचं जायचं ठरवतोय." एक क्षणभर चित्राला तिचे कान लाल झाल्यासारखे वाटले. पण स्वत:ला सावरुन तिने विचारलं,
"असं अचानक? म्हणजे कधी ठरलं तुझं? आणि माझं काय?" तिच्या स्वरात शांतपणा असला तरी नकळत आवाज किंचित उंचावलाच. पण तिचं तिलाच जाणवल्यासारखं ती म्हणाली,
"नाही म्हणजे शेवटी तू विचार करुनच काय ते ठरवलं असशील म्हणा."
"आबा थकलेयत. विश्वासू माणसाच्या शोधात आहेत पण मलाच वाटायला लागलंय मीच घ्यावं आता हातात काम." तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत प्रथम बोलत होता,
"म्हणजे कुणाचाच तसा आग्रह नाही. अजून एखादं वर्ष रेटतील ते कारभार सुरळितपणे. पण कामं स्वीकारुन बसले आहेत. फक्त कणकवलीतली नाही तर आजूबाजूच्या गावातली. त्यांच्यासारखं काम कुणी करत नाही अशी ख्याती आहे ना त्यांची. आपल्या दृष्टीने साध्या नावाच्या पाट्या बनवायच्या असल्या तरी त्यात कलात्मकता पाहिजेच यावर ठाम आहेत ते. खरं सांगायचं तर हातात घेतलेलं काम झेपेल की नाही या विचाराने त्यांच्या मनावरचा ताण वाढतोय असं जाणवलं मला. तसाही मी अधूनमधून मदतीला जात असतोच. मग तिथेच बस्तान हलवलं तर? माझ्याशिवाय आहे कोण त्या दोघांना? आणि मुख्यं म्हणजे तू पण त्यांना काही कल्पना देऊ शकशील."
चित्रा काही बोलली नाही. एकदा वाटलं आपल्या कामाचं कारण पुढे करावं. पण कशाला? त्याबाबतीत काय करता येईल हे तिलाही ठाऊक होतंच की. पण त्याने हे ठरवूनच टाकलं आहे की तो विचारतोय? तिच्या मनातलं कळल्यासारखं प्रथम हसला.
"मी काही ठरवलेलं नाही. पण आज परत येताना जो अस्वस्थपणा आला त्यातून मोकळं व्हायचं होतं मला. तुझं म्हणणं ऐकायचं होतं. जो निर्णय घेऊ तो दोघांनी मिळून घेतलेला असेल. मी म्हणतोय म्हणून ते झालं पाहिजे असा माझा मुळीच अट्टाहास नाही. आणि लगेच काही ठरवायचं आहे असंही नाही. तू विचार कर. मग बोलूच आपण. जे माझ्या कामाच्या बाबतीत तेच तुझ्याही. तुझं काम सुदैवाने तिथेही करु शकतेस." त्याने तिच्या केसावर थोपटल्यासारखं केलं. आतून यमुनाबाईंची ताटं वाढल्याची हाक ऐकू आली तसं दोघंही उठलेच.

नकार द्यायचा? रत्नागिरीतलं सुरळीत आयुष्य सोडून पुन्हा घडी बसवायला जायचं कणकवलीला? तो जसा त्याच्या आई वडिलांचा विचार करतोय तसा मलाही माझ्या करायला नको का? आई तर एकटी राहतेय. कधी ना कधी आपल्याकडे येऊन राहायचा विचार तिच्या मनात डोकावला तर? येईल ती कणकवलीला? का जाईल बाबांकडे? पण नाही म्हणणं इतकं खरंच सोपं आहे? त्याच्या मनात जायचं असेलच तर मग वाद, भांडणं सुरु होतील. टोक गाठलं जाईल. म्हणजे अजून पर्यंत तसं कधी झालेलं नाही. समजूतदार आहे प्रथम. पण आई, वडिलांसाठी तो हा निर्णय घेतोय आणि आपण नाही म्हणायचं? उगाचच अडवण्यात काय अर्थ? ती एकदम लहान मुलीसारखी रडायला लागली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. त्या खोलीत वावरणारे आई, बाबा दिसायला लागले. आसपास वावरायलाच लागले ते तिच्या.

"गेंड्याचं कातडं पांघरलंय तुम्ही. किती काही बोललं तरी आपलं तेच खरं." बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खेचत आई म्हणाली.
"उत्तर दिलं नाही म्हणजे गेंड्याचं कातडं? तेच तेच ऐकून कंटाळतो म्हणून काही बोलत नाही. "
"बोलू नका हो. करुन दाखवा."
"ते दाखवतोच आहे. तुला दिसत नाही त्याला मी काय करु?" दोघांचे आवाज वाढायला लागले तसं तिथेच अभ्यास करत बसलेल्या चित्राने वहीत जोरजोरात काहीतरी खरडायला सुरुवात केली. आईने तिच्या पाठीत धपाटा घातला, हातातली वहीदेखील ओढली.
"चित्रा, काय हे गिरमिट करुन टाकलं आहेस. आणि किती जोर लावायचा तो. वही फाटेल." चित्रा तिथून पळालीच. स्वयंपाकघरात जाऊन तिने पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. घशाला पडलेली कोरड गेली तरी पडद्याच्या आडून ऐकू येणार्‍या आवाजांनी तिच्या काळजाचे ठोके वाढले. ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात भिंतीला टेकून ती शरीराचं मुटकुळं करुन बसली. आई इतकी का चिडते? बाबा सगळं शांतपणे ऐकत राहतात. बाबा नक्की काय चुकीचं करतात म्हणून दोघांचे सारखे वाद होतात? खरं तर नेहमी आईच त्यांच्यावर चिडते. याचा अर्थ तेच चुकत असणार. आई चिडली की तेही वाद घालतात. आई ऐकून घेत नाही हे लक्षात आलं की दारामागच्या खुंटीवर अडकवलेला शर्ट घालून निघून जातात. आई ते दाराबाहेर पडेपर्यंत बडबड करत राहते. आताही चित्राला माहीत होतं त्याचक्रमाने सारं पार पडलं. चित्रा आई स्वयंपाकघरात कधी येईल त्याची वाटच पाहत होती. तिने आल्याआल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली. न चिडता, आदळआपट न करता आई तिच्याकडे पाहत राहिली. रोजच्या वागण्यापेक्षा आईचं हे वागणं वेगळं होतं. ती चित्राच्या बाजूला येऊन बसली आणि गुडघ्यात डोकं खुपसून रडायला लागली. चित्रा बावचळली. आईला रडताना ती प्रथमच पाहत होती. ती एकदम शांत झाली. मोठं होत तिने आपल्या आईला कुशीत घेतलं.
"रडू नको ना." स्वत:चे डोळे पुसत चित्रा आईला समजावीत होती. चित्राच्या केविलवाण्या चेहर्‍याकडे पाहात आईने अश्रू रोखले. काही न बोलता ती तशीच बसून राहिली.
"तू बाबांवर का चिडतेस? मला नाही आवडत."
"माझं चिडणं डोळ्यावर येतं. त्यांचं वागणं नाही दिसत कुणाला."
"काय करतात ते?"
"पिल्लू, तू फार लहान आहेस गं. नाही समजायचं तुला आता काही."
"सांग ना."
"तुझे बाबा कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत म्हणून चिडते मी."
"म्हणजे?"
"हे बघ, आजोबा मदत करतात आपल्याला. त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तु्झे बाबा दर दोन चार वर्षांनी वेगवेगळ्या कल्पना मनात घेऊन नवीन काहीतरी व्यवसाय करायला निघतात. एकाचवेळी दोन तीन गोष्टी. त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. धंद्यात पैसा खेळता ठेवायला लागतो हे मान्य. पण हाताशी पैसा नसताना दुसरं काहीतरी सुरु करायचं कशाला?" चित्राला काडीचंही समजलं नाही. पण तरी तिने विचारलं.
"बाबा सांगतात आजोबांकडून पैसे आणायला?"
"नाही. जाऊ दे. तुला नाही समजायचं." आईने विषय संपवला. चित्राचा गोंधळ आणखीनच वाढला. तिने बाबा नाहीतर आजोबांनाच आईच्या म्हणण्याचा अर्थ विचारायचं ठरवलं.

पण ठरवलं तरी तसं झालं नाही. बाबा खूप उशीराच यायचे घरी. त्यात हल्ली हल्ली आणखी उशीर व्हायला लागला होता. आले की इतके कसल्यातरी विचारात असायचे की समोर जायलाच भिती वाटायची चित्राला. बर्‍याचदा चित्रा झोपेतून जागी व्हायची ती दोघांच्या आवाजाने. आजही तसंच झालं. मात्र आईच्या ऐवजी बाबांच्या आवाजाने ती दचकून उठली. आणि तशीच पलंगावर बसून राहिली. पडद्याच्या आडोशातूनही बाबा काय बोलतायत ते स्पष्ट ऐकू येत होतं.
"घरी आलो की तुझं सुरु. तुझ्या करवादण्याने सतत भेदरल्यासारखी वागत असते चित्रा. मी तिच्यासाठी गप्प बसतो. "
"खरं वाटेल कुणाला." आई खिजवल्यासारखी हसली. म्हणाली,
"माझा शब्द खाली पडू देत नाही तुम्ही."
"वाटतं ते सांगायचा प्रयत्न करतो. पण तुझं चालूच राहतं. मग गप्प बसतो. पण सततची धुसफुस, भांडणं, वाद याचा चित्रावर परिणाम होतोय ते कसं लक्षात येत नाही तुझ्या?"
"इतकी काळजी आहे तर ही वेळच येऊ न देण्याची खबरदारी का नाही घेतलीत? सगळे धडे मला."
"मी काही केलं तरी तुला समाधान मिळायला हवं ना."
"समाधान मिळेल असं कर्तुत्व गाजवा की. कुणी नको सांगितलंय."
"अगं बाई, तुझ्या या अशा बोलण्याचं सतत दडपण असतं माझ्या मनावर. दोन तीन व्यवसाय एकावेळी मी नीट सांभाळतो तरी सतत टोचून बोलतेस. बरं आपल्याला काही कमी आहे का? नाही. पण एकहाती तू मागशील तेवढी रक्कम ताबडतोब हजर करता येत नाही या एकाच मुद्यावर सतत कटकट असते तुझी. व्यवसायात पैसा फिरता राहतो हे कितीवेळा तुला सांगायचं तेच समजत नाही."
"तो फिरता पैसा पुरवावा लागतो माझ्या वडिलांना."
"मी गेलोय कधी त्यांच्याकडे मागायला? गेलोय कधी?"
"तुम्ही नसाल गेला. पण वापरता ना त्यांनी दिलेले पैसे."
"मी वापरत नाही. तुझ्याकडे असतात ते पैसे. मी घेऊ नको सांगूनही तू घेतेस. पुन्हा सांगतोय, माझ्या अंगात संसार चालवण्याची धमक आहे."
आई काही बोलली असली तरी चित्राच्या कानापर्यंत ते पोचलं नाही. पण एकदम ओरडण्याचा आणि रडण्याचाच आवाज यायला लागला. कधी नव्हे ते बाबा तारस्वरात ओरडत होते.
चित्रा घाबरुन थरथरायला लागली. तिला बाबांच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं. ती जवळ असली की बाबा एकदम शांत होतात ते ठाऊक होतं तिला. पण बाबांचा इतका चढलेला आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. ती तशीच बसून राहिली. बाजूची चादर तिने अंगावर ओढून घेतली. भिंतीला टेकून ती कानावर आदळणारे शब्द झेलत राहिली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक पण आई खासकन पडदा बाजूला करुन बाहेर आली. कपाट उघडून तिने आतल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. चित्राच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं तिच्याकडे न पाहताच आई ओरडली,
"ऊठ लगेच. आपल्याला जायचंय इथून."
"कुठे जायचंय?"
"आजोबांकडे."
"बाबा पण येतायत?"
"नाही. एकही प्रश्न विचारु नकोस आता. कृपा कर." चित्रा बाबांच्या दिशेने धावली. बाबा खुर्चीत मान खाली घालून बसले होते. तिने त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांनीही तिला आवेगाने जवळ घेतलं.
"मला नाही जायचं आजोबांकडे." ते काही न बोलता तिला थोपटत राहिले. आई पायात चप्पल घालून दारात उभी राहिली तसं बाबांनीच चित्राला खूण केली. तेही उठले.
"जाऊ नकोस. उद्या शांतपणे बोलू आपण. इतक्या रात्री आलेलं पाहून घाबरतील घरातली." आई सरळ पायर्‍या उतरायला लागली तसं बाबाच त्या दोघींबरोबर खाली आले. रिक्षा थांबवून दोघींना बसवून देत ते तिथेच उभे राहिले.
"तुम्ही उद्या मला न्यायला या बाबा. शाळा चुकवायची नाहीये मला." रिक्षा सुरु झाली तसं तिने बाहेर डोकं काढत रडत म्हटलं. बाबांनी मान डोलावली. आईने हाताने तिला आत ओढलं आणि ते घर कायमचं सुटलं.

बाबा न्यायला येतील या आशेवर होती चित्रा. तिला वाटलं तसं बाबा आलेही दुसर्‍यादिवशी. पण तिच्याकडे लक्ष देण्याच्या मन:स्थितीत कुणीच नव्हतं. बाबा सतत आजोबांशी काहीतरी बोलत होते. आई मध्ये पडली की आवाज चढत होते. आजी मात्र तिला तिथे फिरकूच देत नव्हती. त्या दिवशी चार पाच तास तरी असेच गेले असावेत. निघायच्या आधी बाबा तिला भेटले ते आता ती इथेच राहील, तिची शाळा बदलेल पण ते तिला भेटत राहतील हे सांगण्यापुरतं. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवस आईने रडून काढले. चित्राचंही नवीन शाळेत लक्ष लागत नव्हतं. ती शाळेतून आली की पुस्तकात डोकं खुपसून बसे. गोष्टींमध्ये जीव रमवायचा प्रयत्न करी. मनात आई, बाबांबद्दलचा राग साठत चालला होता. तो वागण्यातही डोकावायला लागला. उलट उत्तरं, निष्काळजीपणा हे नित्याचं झालं. कधी घरकोंबड्यासारखं वागायचं तर कधी शाळेतल्या वाचनालयात जितक्या उशीरापर्यंत बसता येईल तितका वेळ तिकडेच काढायचा. वाचनालयात झालेल्या ओळखीतून बाहेर उंडारत रहायचं. विचित्र वळणावर चित्राचं आयुष्यं खेचलं गेलं. घरातलं वातावरणही बदललं. सुरुवातीला रडून दिवस काढणारी आई, आजोबांच्या व्यवसायात मदत करायला लागली. बराचसावेळ ती तिकडेच घालवे. चित्रामधलं लक्ष काढून घेतल्यासारखं वागत असली तरी चित्राच्या सार्‍या गरजा भागवत होती ती, मागेल ते देत होती. फक्त तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न आईकडून होत नव्हता. लेकीसाठी वेळ देता येत नव्हता. बाबा अधूनमधून उगवत. तिला घेऊन बाहेर जात. बाहेर जेवण, आइसक्रीम ती जे मागेल ते मिळे. चित्राला आत्तापर्यंत जे मिळालं नव्हतं ते विनासायास हजर होत होतं, म्हटलं तर भौतिक सुख कधी नव्हे ते आपणहून चालून येत होतं. पण अधूनमधून मिळणारा सुखाचा घास तेवढ्यापुरता आवडला तरी आई, बाबांच्या सहवासाला ती आसुसली होती. प्रत्येकवेळी बाबा सोडायला आले की तिला वाटायचं, सगळ्यांनी मिळून पहिल्या घरी जावं. पुन्हा तिथल्या शाळेत जावं, मैत्रिणींना भेटावं. पण आई, बाबा स्वतंत्ररीत्या कितीही तिला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करत असले तरी एकत्र आले की वाद विवादाच्या फैरी झडत. आता यात आजोबांचाही समावेश झाला होता. आजी या सगळ्याला कंटाळली आणि एक दिवस नेहमीचं नाटक सुरु झाल्या झाल्या तिने चित्राला बोलावलं.
"हिच्या समोरच ठरवा काय करणार आहात पुढे. फार झाली ओढाताण तिची. इथे येऊनही वर्ष होऊन जाईल. दोन्ही डगरीवर पाय देऊन उभं राहणं दोघांनीही थांबवा." काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले,
"चित्रा, तुझ्यावर अन्याय होतोय याची कल्पना आहे. माफी तरी कुठल्या शब्दांनी मागू? पण याला अंत नाही. आतापर्यंत म्हटलं तर आम्ही दोघंही प्रयत्न करत राहिलो. पण प्रेम, तडजोड यापेक्षा अहंकार वरचढ झालाय. या क्षणी माघार कुणीही घेतली तरी ती तात्पुरतीच असेल. प्रत्येक वेळच्या यातनामरणापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लागणं उत्तम. आमचे मार्ग इतके बदलले आहेत की ते पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही." बाबांचं बोलणं समजायला कठीण जात असलं तरी त्यातला अर्थ चित्राला व्यवस्थित कळला. घटस्फोट. आई - बाबा घटस्फोट घेणार. तिला रडावंसं वाटत होतं. पण घरातल्या मोठ्यांसमोर रडण्यात अपमानही वाटत होता. ती बाबांच्या नजरेला नजर देत तशीच बसून राहिली. आईने काही न बोलता चित्राचा हात हातात धरला. चित्राने तो झिडकारलाच. धावत ती आजीच्या खोलीत शिरली. धाडकन पलंगावर अंग टाकून रडत राहिली. पाठीवर फिरत असलेल्या हातानेच आजी खोलीत आल्याचं तिला कळलं. हळूहळू ती शांत झाली.
"वेगळे होणार का गं आई बाबा?"
"तेच या परिस्थितीत योग्यं नाही का चित्रा? वर्षभर वाट पाहिली. पण काही बदलेल असं वाटत नाही. घरी तेच इथे येऊनही तेच. कुणालाच सुख नाही."
"आजी, माझ्या संसारात मी नाही असं वागणार. ही वेळच येऊ देणार नाही. का असं वागतात गं दोघं? माझं चुकलं की ओरडायचे, मला फटके मिळायचे लहान असताना. ठाऊक आहे ना?"
"हो."
"मला पण दोघांवर आरडाओरडा करावंसं वाटतंय. फटकावून काढलं पाहिजे दोघांनाही."
"चित्रा..." आजीच्या स्वरातला कठोरपणा जाणवला तशी चित्रा गप्प झाली.
"कुणाचं आणि काय चुकलं, चुकतंय ही चर्चा निरर्थक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं. पण यातून सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. तुझी आई, आजोबांना मदत करेल. तिला आता स्वत:च्या पायावर उभं राहणं जितकं गरजेचं आहे तितकीच आवश्यकता तुझं वागणं बदलण्याची आहे चित्रा."
"मी काय केलं? चुकतंय ते त्या दोघाचं."
"त्यांच्या चुकीची शिक्षा तू त्यांना भरकटल्यासारखं वागूनच द्यायला हवी असं आहे का?"
"पण मी..."
"लहान नाहीस तू आता. तुला चांगलं कळतंय मला काय म्हणायचं आहे ते." चित्रा काही न बोलता बसून राहिली. आजी उठून पुन्हा बाहेर निघून गेली. पण नाकारायचं म्हटलं तरी आजीचं बोलणं तिला पटत होतं. निदान स्वत:च्या आयुष्याचा ताबा तिने स्वत:च घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे काय करायचं? ती जास्तीत जास्त आजीच्या आसपास घालवायला प्रयत्नपूर्वक शिकली. विस्कटलेली घडी सुरळीत व्हायला चार पाच वर्ष लागली. प्रत्येकाची दिशा वेगळी असली तरी निदान मार्ग हाती गवसले होते. इथपर्यंत पोचेतो सर्वांनीच बरंच काही गमावलं होतं त्यामुळे आता हातातून काही निसटू न देण्याची खबरदारी मन आपोआप घ्यायला शिकलं होतं. आजीच्या पंखाखाली चित्राला सुरक्षित वाटत असतानाच अचानक आजी गेली. काहीही हासभास नसताना गेलेल्या आजीचं जाणं चित्राला पचवणं फार जड गेलं. पण जाता जाता आजीने विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवून दिली होती. चित्राही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती घडी आता विसकटू देणार नव्हती. बाबा अधूनमधून घरी येत राहिले. आले की आजोबांशी बोलत बसायचे. आईच्या स्वतंत्र बाण्याचं कौतुक करायचे. थकल्या डोळ्यांनी आजोबाही बाबांच्या यशाचं कौतुक करायचे. आई फारशी बोलत नसली तरी बाबा आले की तिचा चेहरा खुलायचा. गुण दिसायला, कर्तुत्व पटायला खरंच लांब जावं लागतं एकमेकांपासून? चित्राच्या घराबाबतीत तरी निदान तसं झालं होतं. पाहताना चित्राला वाटायचं, आजी हवी होती. खूश झाली असती. हल्ली हल्ली तर तिला वाटायला लागलं होतं आई, बाबांनी पुन्हा एकत्र यावं. नाहीतरी आता किती छान जमतं दोघांचं. मनातला विचार ओठावर येईतो आजोबांनी आजीच्या वाटेवर पाऊल टाकलं. आता तर चित्राला आईला बाबांच्या आधाराची खरी गरज आहे असं प्रखरतेने वाटत होतं. शेवटी एकदा धाडस करुन तिने विषय काढला.
"बाबा, आता तुम्ही इकडेच का राहत नाही? आईला मदत हवीच आहे तिच्या कामात." आईने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं.
"अगं काय बोलतेयस तू चित्रा? तुझ्या बाबांना वाटेल मीच बोलले हे तुझ्याशी. कुठून हे वेड घेतलंस?"
"वेड? नाही गं. मला तीव्रपणे वाटलं तेच करतेय. आई, मला तुम्ही दोघंही हवे आहात गं. आता काही मी लहान नाही. लवकरच शिक्षणही संपेल माझं. जुने दिवस आठवते तेव्हा तुमच्या दोघांचं वागणं, माझं तुमच्याबरोबर बदलत गेलेलं नातं हे जसं लक्षात येतं तसं त्यावेळची तुमची मन:स्थिती, तुमच्या दोघांची ओढाताण हे मला आता कळतं. बाबांच्या मनातलं कायमचं एक अपराधीपण आणि तुझं सततचं वैतागलेपण. कोण बरोबर, कोण चुक याचा हिशोब या नात्यात नाहीच करता येत. तुम्ही वेगळं व्हायचं ठरवलंत त्याची नक्की कारणं माहीत नसली तरी अंदाज आहे मला. दोघांची बाजूही आता समजू शकते मी. नात्याचा ताण तुम्हाला झेपला नाही हेच खरं. घटस्फोट झाल्यावर, दूर गेल्यावर कसं सगळं सुरळीत झालंय. तुमचं तुम्हालाही हे जाणवलं असेलच ना? तुमच्या दोघांच्या वागण्याची झळ मला लागत होतीच, तुम्हालाही ते समजत असणारच. बाबा, तुम्ही माझ्या वाट्टेल त्या मागण्या पूर्ण करायचात ते त्यावेळेस आवडायचं मला. आई, तुला वेळ द्यायची इच्छा असूनही जमायचं नाही आणि त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची तुझी. त्या त्या वेळेस राग यायचा पण आता तुम्ही एकमेकांना समजून घेताना दिसता ना, तेव्हा सगळं विसरुन जावंसं वाटतंय. आणि आई, मी इथून गेले की तू अगदी एकटी पडशील गं." चित्रा आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहात राहिली. पोटच्या मुलीमध्ये आलेलं प्रौढपण पाहता पाहता आईच्या चेहर्‍यावर हसू उमटलं,
"तुझं तू जमवलं आहेस का कुठे? ते सांगण्यासाठी हा मार्ग?" चित्रा गडबडीने म्हणाली.
"नाही गं. म्हणजे ते ही सांगायचं आहेच. पण आत्ता जे बोलले नं मी ते खरंच आतून आतून जाणवलेलं मला. आजी, आजोबा गेल्यानंतर तुमच्यातला सुसंवाद जाणवतो, आवडतो मला म्हणून मी मागे लागले आहे."
"बरं, बरं, आता मुद्यावर या." बाबा हसून म्हणाले.
" हो, प्रथमशी तुमची भेट कधी घालून देऊ ते दोघांनी सांगा मला." चित्रा पुटपुटली.
"हं, आता खरं बाहेर पडलं. चित्रा, प्रथमला भेटूच आम्ही. पण आमचं दोघाचं पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे बेटा. आहे तेच चालू राहणं योग्यं. आता तुझी आई काय, मी काय पुन्हा लग्न करु असं वाटत नाही. पण तुटलेला संसार, मनं सांधताना जी कसरत करावी लागते त्याची तयारी नाही माझी. तुझी आई आता माझी मैत्रीण आहे. ती तशीच राहू दे. त्यातच जास्त सुख आहे. हे माझं मत. तुझ्या आईला काय वाटतं ते नाही ठाऊक मला."
"अगदी तेच म्हणणं आहे माझं." दुजोरा देत आई म्हणाली.
"आता पुन्हा हा विषय नको. प्रथमला केव्हा आणते आहेस भेटायला? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला." प्रथमचं नाव काढल्यानंतर चित्रा त्या दोघांची झालेली भेट, त्याच्या घरची मंडळी या बद्दल बोलण्यात रंगून गेली.

प्रथमला चित्रा घरी घेऊन आली आणि तो मग येतच राहिला. शिक्षण पूर्ण होऊन, स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर लग्न होईतो मध्ये तीन चार वर्ष गेली. लग्न झाल्यावर मुंबई सोडून रत्नागिरीला जायचं आहे हे ठाऊक असूनही प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा चित्रा थोडीशी भांबावली पण वाटलं तितकं रत्नागिरीत स्थिर होणं जड गेलं नाही. रत्नागिरीला येऊन दोन वर्ष झाली आणि प्रथमने कणकवलीला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. अर्थात तिच्याच संमतीने. कणकवलीला येऊनही वर्ष झालं होतं. प्रथमच्या आई, बाबांनी त्या दोघांचा संसार स्वतंत्र राहिल याची काळजी घेतली होती. गावातच पण वेगळा संसार होता दोघांचा. असं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच प्रथमने असं का करावं? लाल झालेले डोळे चोळत ती त्याने लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायला लागली.

प्रिय चित्रा,
गेलं वर्षभर मी झगडतोय. नक्की काय करावं ते समजत नाही. तुझ्याशी बोलायचं धाडस नाही म्हणून हे पत्र. पत्र लेखन बरं असतं. एकतर्फी असतं. मनातलं सारं लिहिता येतं. चेहर्‍यावरचे भाव निरखीत शब्द बदलावे लागत नाहीत. जे शब्द मी अनेकदा ओठावर येऊनही गिळून टाकले ते इथे लिहितोय. लिहिताना तुझा चेहरा समोर येतोय. तुला माझ्या शब्दांमुळे किती धक्का बसेल याची कल्पनाही करवत नाही. पण मला वाटत नाही आपलं जमेल. मला कल्पना आहे मी किती दुखावतोय तुला. जे आपल्या दोघांच्या बाबतीत कधीही होऊ नये याची तू आपल्या संसारात दक्षता घेत आलीस त्याच परिस्थितीत मी तुला ढकलतोय. मला ठाऊक आहे, तुझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला त्या वाटेवर कधीही पाऊल टाकायचं नाही असा तुझा निर्धार आहे पण त्या निर्धाराचं सावट आपल्या संसारावर पडतंय हे लक्षातच आलं नाही तुझ्या. खूप प्रयत्न केला मी. पण आहे या परिस्थितीत बदल होईल असं वाटत नाही. तू स्वत:ला हरवून बसली आहेस चित्रा. म्हणजे तसं सगळं छान आहे. पण जिथे मतभिन्नतेचा प्रश्न येतो तिथे सारं बदलतं. मतभेद होताच कामा नयेत याची काळजी घेण्याचा तुझा खटाटोप असतो. विचार करतो तेव्हा वाटतं, तुझ्या आई, वडिलांच्या सततच्या वाद विवादाला कंटाळली होतीस तू. त्याचाच हा परिणाम असेल का? म्हणजे तसं तू कधी सांगितलं नाहीस त्यामुळे कदाचित ठरवून नसेलही होत तुझ्याकडून पण वाद टाळतेस तू हे अगदी स्पष्ट जाणवतं. एक दोन वेळा मी विचारलंही तुला कारणांबद्दल. पण धड उत्तर नाही देता आलं तुला. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मला तुझा सहभाग हवाय. नुसतं हो ला हो नको चित्रा. आपण एकमेकांचे जोडीदार आहोत. तू माझी गुलाम नाहीस. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्टीला मान तुकवलीच पाहिजे असं कुणी सांगितलं तुला? गेल्या दोन वर्षात एकही गोष्ट मला आठवत नाही ज्याला तू विरोध केलायस. तुझ्या डोळ्यात नाराजी उमटते पण ती तू शब्दात व्यक्त होऊ देत नाहीस. असं का? मी नाना तर्‍हेने हे तुझ्यापाशी खरं तर बोललोय. कितीतरी वेळा अगदी सष्टपणे. असं वागू नकोस म्हणून बजावलं आहे, समजावलं आहे. जर माझं ऐकायचं असंच ठरवलं आहेस तर मग हे का ऐकत नाहीस? भांड ना कडकडून माझ्याशी. आवडेल मला. कितीतरी वेळा तू वाद घालावास म्हणून मी निरर्थक विधानं केली पण आपल्या दोघांमध्ये वादाला जागाच द्यायची नाहीस हे तुझ्या मनात पक्कं ठसलेलं आहे. चुकीचं आहे ते. सांगून सांगून थकलो मी आता. दोन माणसं एकत्र आली की तडजोड करावी लागतेच पण त्यालाही मर्यादा असते. अस्तित्व हरवून गेलेली कळसूत्री बाहुली नकोय मला चित्रा. हाडामांसाचं माणूस हवंय. चिडणारं, रडणारं, हट्ट करणारं, वेळ प्रसंगी कान उपटणारं. आणि नेमकं तेच या लग्नाने मी हरवून बसलोय आणि म्हणूनच चित्रा, मला वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय.

चित्राने हातातल्या कागदाचा बोळा केला. रडत रडत ती ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात गुडघ्यात डोकं घालून बसली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. चुरगळलेल्या कागदाचा बोळा तिने थरथरत्या हाताने पुन्हा उघडला. ज्या शब्दाला आयुष्यात कधीच थारा नाही असा विश्वास होता चित्राला तोच शब्द तिच्या डोळ्यासमोर पुन्हा नाचत होता, प्रथमचा पत्रातून उतरलेला आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता. घटस्फोट. मला घटस्फोट हवाय!

’अनुराधा’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा. संपादकांच्या परवानगीने.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुम्ही नातेसंबंधांवर सुंदर लिहिता. गोष्टी अगदी रीलेट होतात. आवडतात.
ही पण आवडली.
पण प्रथमने सगळं काही समजुन उमजुनही एकदम घट्स्फोटाचं टोक गाठलं ते पटलं नाही.

तुम्ही नातेसंबंधांवर सुंदर लिहिता. गोष्टी अगदी रीलेट होतात. आवडतात.>>+१
कथा आवडलीच पण माझ्या मनात त्यापुढची कथा पण आपोआप गुंफली गेली. आणि शेवट गोड होऊनच संपली. Happy
त्यामुळे हुरहुर लागली नाही.

कथा आवडलीच पण माझ्या मनात त्यापुढची कथा पण आपोआप गुंफली गेली. आणि शेवट गोड होऊनच संपली.>>>+१ मी पण पुढचा सुखांत इमॅजिन केलाच Happy

कथा आवडली.

पण प्रथमने सगळं काही समजुन उमजुनही एकदम घट्स्फोटाचं टोक गाठलं ते पटलं नाही.>>> मलापण

ओ माझ्या एका कादंबरीचे शीर्षक सावट आहे राव! क्षणभर वाटले मी मोहनाही आहे की काय! Wink

अवांतराबद्दल दिलगीर! वेळ मिळाला की लगेच वाचतो. शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

आवडली कथा. आई-वडिलांच्या घटस्फोटाचे होणारे परिणाम अस्वस्थ करुन गेले, मला पण प्रथमने सगळं काही समजुन उमजुनही एकदम घट्स्फोटाचं टोक गाठलं ते पटलं नाही.

भान्डत नाही म्हणून लगेच घटस्फोट ...जरा पटले नाही...पण आई-बाबान्च्या तणावाचा परिणाम चान्गला मान्डला आहे