यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 March, 2016 - 16:43

विषय तसा नेहमीचाच आहे.

दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.

पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.

माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.

गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.

फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..

हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..

...............................................................

यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॠनम्या -
मी थोर बिर नाही . मी पण तुझ्या सारखाच साधासुधा (हा उपरोध नाही, तू आहेचेस साधासुधा) माणूस आहे. मला तसेच राहू दे.
तू लिहितोस सुरेख जे लिहिलेयस ते मला पाठव व्हॉट्सअ‍ॅप वर Happy

इथे काही लोकांनी हिंदूंचे सण, परंपरा राखायला हव्यात असा मुद्दा मांडला आहे. पण प्रत्यक्ष परंपरेचे आयुष्य नक्की किती लोकांना ठाऊक आहे? त्यांच्या स्मृतीत किंवा फारतर त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीत असलेली क्रियाकांडे हीच परंपरा असेच बहुतेक सगळे मानतात. त्यातही कित्येकदा 'आमच्या काळी असे नव्हते ब्वॉ' हा सूरही असतोच. मग 'त्यांच्या' काळी काय होते? हेच रंग होते? हेच पाइपातून पाण्याचे झोत होते? हेच प्लास्टिकचे फुगे होते? हेच ड्रम होते? अगदी डिट्टो तसेच आजही असेल तर ही परंपरा साधारण ऐंशी वर्षे जुनी आहे असे मानता येईल. त्यापूर्वी काय होते? किती पाणी वापरले जात होते? काही लिखित कथा आहेत का? त्या आधीच्या दोनशे-पाचशे वर्षांत कशी साजरी होत होती होळी? फाल्गुनाची गाणी (फाग)सांगतात की कृष्ण गोपींसवे रंग खेळत असे. पण ही गाणी किंवा होरी, चैती वगैरे कधी रचली गेली? हजार वर्षांपूर्वी काय होते? ही परंपरा नक्की कुठून सुरू झाली? मुळात एखाद्या क्रियाकांडाला 'परंपरा' हा शब्द योजता येण्यासाठी नक्की किती काळ जावा लागतो? त्या काळाच्या आधी जे घडत होते, त्याला परंपरा मानावे की नाही? की 'खंडित परंपरा' मानावे? परंपरा अशी लोप पावू शकते? बदलू शकते? मग सध्याची परंपरा बदलली तर काय होईल? धर्म बुडेल? मग या आधी परंपरा लोप पावल्या तेव्हा का नाही बुडला?

Pages