आनंदयात्री

Submitted by सुमुक्ता on 16 December, 2014 - 10:18

"आनंदयात्री मी आनंदयात्री" -- कधीतरी लहानपणी वाचलेली मंगेश पाडगावकरांची कविता मध्यंतरी पुन्हा एकदा वाचनात आली आणि शाळेतल्या न-कळत्या वयातला न उमगलेला कवितेचा अर्थ मनाला भिडला. विशेषतः कवितेचे शेवटचे कडवे.

हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

पायात काटे रुतले तरीही विव्हळत बसण्याऐवजी माझ्या स्वरांना मी स्वप्नाचा साज चढविला. काळ्या मिट्ट रात्रीचा जेव्हा स्वीकार केला तेव्हा लख्ख चांदणे पडलेले दिसले. अमावस्या असल्यामुळे तर चांदणे अधिकच खुलून आले आणि प्रकाशाचे गाणे सहजच माझ्या ओठांवर आले. दुःख कसे स्वीकारावे हे पाडगावकरांनी इतक्या सुंदर शब्दात सांगितले आहे की दोन क्षण मला प्रश्न पडला की सुखापेक्षा दुःखच चांगले असते की काय? दुःख मनापासून स्वीकारले की आपोआपच कळते की दुःखाचीही मजा काही औरच असते .

ही कल्पनाच मला इतकी आवडली आणि मनात विचार आला ----- अरे!! हे मी कधीच का नाही केलं?? मी तर सतत विव्हळतच बसले . त्यापेक्षा दर्दभरला आर्त सूर लावला असता तर ते काटे बोचले म्हणून ईश्वराचे आभार तरी मानले असते. काळी रात्र स्वीकारायची सोडून प्रकाशाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आणि रात्रीचे अमाप सौंदर्य कुठेतरी हरवून गेले. मी माझे दुःख, माझा संघर्ष कधी स्वीकारलेच नाही. नशिबाला बोल लावत बसले आणि त्या संघर्षातील मजा मला कधीच अनुभवता आली नाही.

माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी "दुनिया में कितना ग़म है, मेरा ग़म कितना कम है" या उक्तीनुसार मनाची समजूत घालत गेले. पण मी दुःखाचा कायम तिरस्कारच केला. त्याचे अस्तित्व नाकारत राहिले किंवा ते दूर व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना करत राहिले. दुःखाचे सहर्ष स्वागत केले असते तर त्याची तीव्रता कमी झाली असती, त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्याची गोडी कळली असती, हे मला कधी कळलेच नाही

पाडगावकरांची कविता जेव्हा पुन्हा एकदा वाचली तेव्हा मला आजपर्यंत सुख आणि दुःखाचा नेमका अर्थच कळला नाही असे वाटायला लागले. मी सरसकट सुख म्हणजे "जे मला हवे ते" आणि दुःख म्हणजे "जे मला नको ते" असे वर्गीकरण करत राहिले. पण आयुष्य इतके कंटाळवाणे कधीच नसते. संघर्ष करण्यातच आयुष्याची खरी मजा आहे. संघर्षामुळेच तर जगण्याची (आणि जिंकण्याची सुद्धा) आशा तग धरून आहे. जर सगळेच सहज सोपे असते, तर मग जगायचेच कशाला? दुःख भोगलेच नाही, संकटे आलीच नाहीत, संघर्ष केलाच नाही तर मी अनुभवसमृद्ध कशी होणार? आणि हे अनुभव सुद्धा फार सुंदर असू शकतात हे ह्या कवितेने मला शिकविले. फक्त वाट्याला जे येईल त्याचा मोकळ्या मनाने आणि हसत स्वीकार करता आला पाहिजे.

आजपर्यंत सुख मिळविण्यासाठी मी कोणत्या न कोणत्या तरी घटनेची वाट पहात राहिले. शिक्षण पूर्ण होण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी, मनासारखे काम मिळण्यासाठी, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, पदोन्नतीसाठी……. ही यादी कधी थांबलीच नाही. सगळी सुखे मिळून सुद्धा मी पुढच्या सुखाची आशा करत पुन्हा पुन्हा दुःख करत राहिले. त्यामुळे वाट्याला आलेले सुख सुद्धा मनाला कधी भावलेच नाही. मग मी दुःख कसे स्वीकारणार होते? दुःख स्वीकारण्यासाठी लागणारे धैर्य आणि सुख स्वीकारण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा हे माझ्यात कधीच नव्हते.

पण आता मला ही जाणीव झाली आहे की मला सुख शोधत कुठेही धावत बसायची गरज नाही. आनंदाचा झरा माझ्याच मनाच्या गर्भात आहे. त्या स्वच्छंद झऱ्याला बांध घालणारे अनेक खडक असतीलही, पण त्यांना वळसा घालून खळाळत पुढे धावण्यासाठी त्या खडकांचे अस्तित्व मला मोकळ्या मनाने स्वीकारलेच पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचन पूर्ण होता क्षणीच मनी एकच विचार आला....माणूस खरंच जे सुख मिळाले आहे त्यात समाधान न मानताही त्या सुखाची वृद्धी कशी आणि कधी होईल याची जी वाट पाहात बसतो वास्तविक त्यात तो एका अदृश्य दु:खाची बिजे रोपत आहे...हे त्याला कळत नाही ? कळत असले तरी त्याला त्यापासून परावृत्त करायचे असेल तर क्रमप्राप्त असलेले दु:ख सोसण्याची किमान हिंमत तो कशी मिळवेल ?

लेखात "....सगळी सुखे मिळून सुद्धा मी पुढच्या सुखाची आशा करत पुन्हा पुन्हा दुःख करत राहिले...." असे एक सत्यवाक्य आले आहे....सगळी सुखे मिळाली असे मी म्हणतो तरीही माझ्या हृदयी असलेली ही अधिक सुखाची तृष्णा का शमलेली नाही ? अधिक सुख म्हणजे तरी काय शेवटी ? होंडा सिटी कार दारात आहेत पण बीएमडब्ल्यू नाही म्हणून रात्री उशी कुरतडत तो पडला आहे....बीएमडब्ल्यू आल्यानंतर सुखाची परमावधी झाली म्हणून होईल तो शीतल ? नाही, मग त्याला रोल्सरॉईस खुणावत राहील. हे दुष्टचक्र न संपणारे आहे असेच वाटत राहाते. अशावेळी....

"...प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री....." ~ म्हणजे नेमके काय याचे ज्ञान जर त्याला झाले तर तुम्ही म्हणता तसा "आनंदाचा झरा माझ्याच मनाच्या गर्भात आहे....." हेच अंतिम सत्य...

फक्त तो झरा सापडला पाहिजे.

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद अशोक!! तुमचे म्हणणे पटले. अधिक सुखाची तृष्णा शमत नाही आणि दुष्टचक्र कधी संपत नाही!!