उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच रेस्पी आहे हो!! भन्नाट का काय म्हणतात तश्शी!!...........
सगळ्या कमेंट्स म्हणजे...:हहगलो:
(इतकी दुर्मिळ रेस्पी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार्स!! :डोमा:)

१) तांब्या (एक प्रकारचे भांडे) नसले तर ग्लासचा ग्लास वापरला तर चालेल का?
२) ही पाकृ पनीर वापरून करता येईल का?

Proud

LOLz :p

हे फारच कॉम्प्लेक्स आहे. आजकाल सोप्प्प्प्या पाकृंचा जमाना आहे. तेव्हा बर्फ करण्याची सोपी पाकृ लिहावी कृपया. पुणे-मुंबईकरांच्या खवचट कॉमेन्ट्स ना न जुमानणारा, विदर्भीयांच्या जेथे तेथे खटकण्याला पुरून उरणारा, सोलापूरकरांच्या कोणत्याही अर्थाच्या धपाट्याबरोबर, तर नाशिककरांच्या मकाजी-कोंडाजी, सावजी किंवा पारले-जी बरोबर चालणारा व कोल्हापूरकरांचा नाद करणारा बर्फ असेल तर सांगा.

बर्फाऐवजी गारा घालून हे करता येइल का?

पारंपारीक पाककृतींच जतन करण्याचे शिवधनुष्य सहजी पेलून ; ‘हेतरआमच्यापुर्वजानाठाउकचहोत’ या ब्रॅन्ड नावानी , गारेगारबर्फघरी करायच , किट अमेझॉनवर मिळतय. तांब्या , किरमिजी ट्रे , श्लोकाची सिडी अन डिहायड्रेटेड पाण्याचा सॅशे !
:जनहितार्थ रिक्शा:

तांब्या नसल्यास काय करावं? माझ्याकडे एक खजुराच्या झाडाचे चित्र असलेला पिवळ्या रंगाचा डबा आहे. ॲंटिक पीस म्हणून जपून ठेवलाय. तो काढू का कपाटातून? या निमित्ताने वापरला जाईल. डब्यासह सेल्फी काढून फेबुवर मिरवतासुद्धा येईल. पण पाकृ बिघडणार तर नाही ना? पहिल्यांदाच इतकी कॉंप्लिकेटेड पाकृ ट्राय करत असल्याने भीती वाटते.

माझ्या मते सुरक्षिततेसाठी हँड ग्लवज् घालावेत. बर्फ हाताळताना कोल्ड बर्न चा धोका आहे. शिवाय पाणी सांडले तर फ्लडिंग होऊ नये म्हणून ड्रेन मोकळे ठेवावेत.

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
>>>

माझा रेफ्रिजरेटर सभ्य आहे. त्याला चालू कसे बनवावे?

तब्बल दहा वर्षे झाली तरी आजही जगभरात घरी बर्फ बनवण्यासाठी हीच रिसीपी वापरली जाते. माझा फ्रिज तर नुसता चालू नाही महाचालू आहे, तिसऱ्या स्टेप ला अत्यंत काळजीपूर्वक ट्रे आत सरकवून दार लावले रे लावले की लगेच ट्रे मधला एक भाग तिरका होऊन त्यातले अर्धेअधिक पाणी खालच्या ट्रे मध्ये साचते.

Pages