निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, आधी तूला आठवण करून द्यायला हवी होती. १२ ते १४ एप्रिलला आपल्याकडे पूर्वाचलात ऑर्किड महोत्सव असतो. तू अजून त्या भागात गेलेला नाहीस.

ह्या धाग्याच्या हेडर मध्ये टाकलेल्या फुलाचे नाव मिळाले होते का?
Elaeocarpus reticulatus (बहुतेक). हे शांकलीने म्हटल्या प्रमाणे रुद्रक्षाच्या कुळातले झाड आहे. नर्सरीतला माणसाने माहीती दिली. तो नाव Elaeocarpus एवढेच घेत होता. त्यामुळे पुढचे reticulatus नेट वर शोधून असावे असे वाटते.
मला हे चक्क मिळाले बँगलोरला. नंतर फोटो टाकेन.

जिप्सी, 'मी तर रमते प्रभूचरणासी होऊन त्यांची दासी, का उगा पतंगा जळसी', माझं अतिशय आवडतं गाणं, शांताराम नांदगावकर यांचे आणि बहुतेक पुष्पा पागधरे यांनी गायलंय, नांदगावकर यांनी त्याचे विश्लेषणपण छान सांगितलं एकदा, त्यांना ते शमा- परवाना ह्या रूपकापेक्षा ज्योत ही देवासाठी असते असं आपण मानतो हे जास्त योग्य वाटलं, बहुतेक टीव्हीवर एकदा सांगितलं होतं त्यांनी.

<<<<<<<<<<<<<ध्रुवीय प्रदेशात वाढणारी काही छोटी रोपे तर सूर्यफूलासारखा दिवसभर सूर्याचा पाठलाग करतात.
एकंदर बीजप्रक्रियेसाठी त्यांना थोडीफार उष्णता हवी असते.

तसा बडा खयाल थंड प्रदेशातील झाडांना परवडत नाही.>>>>>>>>क्या बात है.....दिनेश़ खरंच या निसर्गाच्या करामती!
हे समजल्यापासून इथे दिसणारी झाडं (म्हण्जे खराट्याला आलेली फुलं).... नव्याने समजताहेत मला. त्यांचं कौतुक वाट्तंय.... हातात आहे त्या काळात फुलून घेण्याचं!

जिप्स्या, जाण्यापूर्वी अविनाश बिनीवाले यांचे "पूर्वाचल" हे पुस्तक अवश्य वाच. प्रत्येक शहराबद्दल लिहिलेय त्यांनी. मी तर या पुस्तकाची पारायणं केलीत. ( त्यातल्या रेखाचित्रांच्या जागी तू काढलेले फोटो असावेत, असे वाटतेय. )

मानुषी.. निसर्ग कठोर शिक्षक आहे. आपण अनेकदा पाहतो पक्षीच नव्हे तर फुलपाखरेही स्थलांतर करतात. ते अंतर अनेकदा हजारो किलोमीटर्स असते. पण अगदी पहिल्यांदा ते अंतर तेवढे नव्हते कारण त्या काळात हिमयूग होते. युरपच्या दक्षिणेपर्यंत बर्फ होता.
पुढे जसजसे हिम आक्रसत गेले तसतसे त्यांचे स्थलांतराचे अंतर वाढत गेले. तसाच त्या छोट्या जीवांचा वातावरणाचा अभ्यास, दिशाज्ञान, समूहभावना, अन्नसाठ्यांचा अभ्यास, त्याचे प्लानिंग, पिल्लांचे पोषण या सगळ्यात अचूकता येत गेली. किंवा हे ज्यांना जमले तेच टिकले.

जिप्सी, 'मी तर रमते प्रभूचरणासी होऊन त्यांची दासी, का उगा पतंगा जळसी', माझं अतिशय आवडतं गाणं, शांताराम नांदगावकर यांचे आणि बहुतेक पुष्पा पागधरे यांनी गायलंय,>>>>>अन्जू, हे गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायलंय. अल्बमचे नाव (बहुतेक) "गीतगंधा" (टि सिरीज).

यात अजुन काही गाणी होती. जशी
१. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने, तुझ्या नी माझ्या भेटीमधुनी फुलती धुंद तराणे
२. चंद्र वाटेवरी एकटा चालतो, चालताना खुणावून का हासतो
३. मी अशी हि बांधलेली
(विषयांतराबद्दल क्षमस्व, पण गाण्यांचा विषय आला तर माहित असलेल्या गोष्टी शेअर केल्याशिवाय रहावत नाही. Happy )

दिनेशदा, नक्कीच Happy

खुप विलक्षण ( आपल्याला माहीत नसलेल्या ) गोष्टी आहेत त्यात. भारतभरात सर्व नद्या पवित्र मानल्या जातात.
त्यांच्यावर अंघोळीसाठी घाट असतातच. पण ब्रम्हपुत्र वर असा घाट नाही. इतकेच नव्हे तर त्यात स्नान करण्याचीही प्रथा नाही. ( त्याचे कारणही पुस्तकात आहे.)

नदीमधले आणि मानवी वस्ती असणारे जगातील सर्वात मोठे बेट, माजूली हे पण तिथे आहे... पुस्तक तातडीने मिळव.

जिप्सी, मूळ गाणे अनुराधा पौडवालने नाही म्हटलंय बहुतेक, ओके मी यु ट्यूबवर आहे का बघते ओरीजीनल, मी लहान असताना रेडियोवर लागायचे.

खुप विलक्षण ( आपल्याला माहीत नसलेल्या ) गोष्टी आहेत त्यात. भारतभरात सर्व नद्या पवित्र मानल्या जातात.
त्यांच्यावर अंघोळीसाठी घाट असतातच. पण ब्रम्हपुत्र वर असा घाट नाही. इतकेच नव्हे तर त्यात स्नान करण्याचीही प्रथा नाही. ( त्याचे कारणही पुस्तकात आहे.) >>>>> ते पुस्तक मिळेल तेव्हा पाहूच पण सध्यातरी ते कारण आम्हाला कळू द्या की ...... Happy

परशुरामाने मातेचा वध केल्यानंतर त्या पाण्यात परशु धुतला म्हणून ते अपवित्र झाले, हे पौराणिक कारण.
पण ब्रम्हपुत्र प्रचंड खोल आहे आणि तिला वेगही आहे. काठही ठिसूळ आहेत हे खरे कारण. कुणी बाहेरचा अंघोळ
करु लागला तर स्थानिक लोक मनाई करतात.

पण तिथेच परशुराम कुंड आहे. ते पवित्र मानतात आणि त्यात स्नान केल्यास मातृऋणातून मुक्ती मिळते असे मानले जाते.

ब्रम्हपुत्र "ती" नदी नाही तर "तो" नद आहे. भारतातली एकमेव पुल्लिंगी नदी म्हणुन नद असे मी कुठेतरी वाचलेय. Happy

http://www.onlinesivasagar.com/wildlife/brahmaputra.html

इथे अजुन माहिती मिळेल ब्रम्हपुत्राची.

हो साधना, पुस्तकात पण तसाच उल्लेख आहे. त्या भागात जाऊन आलेली तू एकटीच माझ्या ओळखीची Happy
आणि आपली ठमादेवी पण !

जिप्सी, मूळ गाणे अनुराधा पौडवालने नाही म्हटलंय बहुतेक>>>>ओह्ह, म्हणजे आता ओरीजनल गाणं शोधावं लागणार. धन्यवाद अन्जू.

ब्रम्हपुत्र "ती" नदी नाही तर "तो" नद आहे. भारतातली एकमेव पुल्लिंगी नदी म्हणुन नद असे मी कुठेतरी वाचलेय>>>>>माझ्यासाठी हि नविन माहिती. Happy

पूर्वापार ती पुत्र म्हणूनच ओळखली जाते. इंग्लिश स्पेलिंगवरून आपण चुकीचा उच्चार करु लागलो.
तिचे एक नाव लोहित पण आहे ना ? लोहित किनारे अशी एक छान दूरदर्शन मालिका होती. वेगवेगळ्या कथा होत्या. रोहिणी हट्टंगडी एका भागात होती.

ब्रह्मपुत्रेला नद म्हणतात नदी नाही. 'लोहित किनारे' हि सिरीयल दाखवली होती पूर्वी दूरदर्शनवर त्यात ब्रम्हपुत्रेच्या आसपासच्या भागावर केलेल्या कथा होत्या त्यात मला पहिल्यांदा कळलं की ब्रह्मपुत्रेला 'नद' म्हणतात.

त्याच पुस्तकातले आणखी काही उल्लेख..

गुवाहाटी म्हणजे सुपारीचा बाजार. आगरतळा म्हणजे जिथे अगर ( धूप ) ची झाडे भरपूर आहेत तो भाग. आसाम नाही तर असम हा खरा उच्चार. कारण तो सर्व प्रदेश उंचसखल आहे.
चाक हौ नावाचा एक खास सुगंधी तांदूळ तिथे पिकतो. कोमल चावल तर शिजवावाही लागत नाही. जंगली सफरचंदाची खूप झाडे आहेत. फणसाची पण आहेत. आंबे मात्र पिकण्यापूर्वीच सडतात.
घटोत्कचासाठी मांडलेला सारीपाट अजून तिथे आहे. ( म्हणजे काय आहे ते वाचाच. )

असम हाच उच्चार आहे कारण तो भाग अ-सम आहे (मग सरळ विषम नाव ठेवायचे ना... Happy )

ब्रम्हपुत्रावरुन जाताना मात्र मी जराशी तंतरलेले... Happy खाली पडले तर काय??

खरेतर मराठी लोकांना, जे फारसे बाहेर गेले नाहीत त्यांना, नदी किती विशाल असु शकते याची कल्पना येणे खुप कठिण आहे. इथल्या बहुसंख्य नद्यांच्या या काठावर उभे राहिले असता पलिकडचा काठ आरामात दिसतो, बहुतेक ठिकाणी इतका जवळ असतो की आपण दोन काठांवर उभे राहुन आरामात गप्पा मारु शकतो.

पण उत्तरेच्या नद्या मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत अतीविशाल म्हणायला हव्यात.काठावर उभे राहिले की फक्त क्षितीज दिसते. दुसरा काठ कुठे असतो ते बोटीने गेल्याशिवाय नकळे. असल्या अतीविशाल नद्यांमध्ये मी प्रथम पाहिली तीच ब्रम्हपुत्र. माझे डोळे आश्चर्याने बाहेर यायचेच बाकी राहिलेले. मला तो समुद्र वाटलेला. Happy आमच्या सोबत जे असमीया गृहस्थ होते त्यांनी सांगितले अ-सम म्हणजे काय ते.

(रच्याकने, मी ब्रम्हपुत्र पाहिलाय हे मी स्वतःच विसरलेले. आता तुम्ही लिहिले ते वाचुन मला आठवले की मी गुवाहाटी व्हाया कोलकाता करुन आलेय Happy )

भरुच जवळचे नर्मदेचे पात्र पण असेच विशाल आहे. रेल्वेचा पूल संपता संपत नाही.

पण सर्वात मोठी अमेझॉन.. बहुतेक मला नीट आठवत असेल तर आकाराने तिच्या नंतरच्या आठ नद्यांचे पाणी एकत्र केले तरी तिची बरोबरी होऊ शकत नाही, असे मी वाचले होते.

नदीवरच्या चर्चेस अनुमोदन. पोटोमॅक टाडल बेसिन. इथे चेरी ब्लॉसम फेस्ट्ला काल गेलो होतो. आम्हाला जरा उशीरच झाला होता. पण थोडा ब्लॉसम पहायला मिळाला. ब्लॉसम वॉज रियली ऑस्सम!
खूप फोटो काढलेत. इथे खूपच जागा जाईल म्हणून सध्या नदीतली बदके!

ब्रम्हपुत्र नदीवर स्नानासाठी घाट नसण्याचे पौराणिक कारण दिनेशदांनी सांगितले आहे. मलाही माहीत नव्हते हे.
लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात ब्रम्हपुत्रा नदी सतत तिचा प्रवाह बदलते असे वाचल्याचे आठवते. तेव्हा नदीवर / नदावर घाट नसण्याचे हेही एक कारण असू शकेल.

भरूचजवळ नर्मदेचे पात्र, वा काय आठवण काढलीत दिनेशदा, खूप एन्जॉय केलंय लहानपणी, रेल्वेचा पूल संपू नयेच असं वाटायचं आणि त्या नर्मदेत नेहेमी सुट्टी नाणी टाकायचो. बडोद्याला आजोळी जातांनाचा मार्ग. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.

अन्जू, बडोद्याच्या भाज्या, पेरू, तुरीच्य शेंगा... अजून आठवताहेत. तिथल्या जेलरशी माझ्या मावस आत्ये बहिणीचे लग्न झाले त्या लग्नाला गेलो होतो. किती मस्त हवा ना !

रात्रीचे साडेआठ वाजलेत. आमच्याकडे मोठे वादळ सुरु आहे. गॅलरीत घोटाभर् पाणी साचलेय. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे असे वाटतेय.
उद्या रस्त्यात पाणी... मज्जा !

Pages