मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती.. बाजूला पाहिले तर त्याची बायको कसलीही चिंता नसल्यासारखी शांतपणे झोपली होती. ना तिला या प्रकाशाने जाग आली होती ना कसल्या आवाजाने... नक्की काय प्रकार होता हा..
पुन्हा समोरून आवाज आला, "अरे असा गोंधळून काय जातोयस, मी आयकर विभागाचा अधिकारी आहे. आमच्या धाडी अश्या रात्रीच असतात. आम्हाला खबर लागली आहे की तू गावाकडच्या जमिनीचा दामदुप्पट भावाने सौदा करून बक्कळ काळा पैसा कमावला आहेस.."
हे ऐकून सदाची बोबडीच वळायची बाकी होती....
पण पाठोपाठच हसण्याचा आवाज आला...
"जराशी गंमत केली रे राजा, लगेच असा घाबरू नकोस.. मी यातला काही नाही.."
"मग आहेस तरी तू कोण?" सदाने हिंमत करून विचारले.
"मी तोच आहे ज्याची तू आयुष्यभर सुखप्राप्तीसाठी आराधना करत आला आहेस, सुखाची प्राप्ती झाल्यावर भले विसरला असशील मात्र संकटाच्या क्षणी न चुकता ज्याची आठवण काढत आला आहेस. मी तोच तुझा देव आहे. आज फक्त तुझ्यासाठी म्हणून इथे आलोय. तू कुठल्याही स्वप्नात वा भ्रमात नसून प्रत्यक्षात मला बघत आहेस. मी फक्त तुलाच दिसत आहे, फक्त तुलाच ऐकू येत आहे. कारण मी इथे आलो आहे, ते तुझी त्रासलेल्या आयुष्यापासून सुटका करायला...
"काय ???" .. सदा किंचाळलाच.. "त्रासलेल्या आयुष्यापासून सुटका?? देवा काय बोलत आहेस हे.. अजून अर्धेही आयुष्य जगलो नाही रे मी..
देव : (हसतच, जीभ चावल्यासारखे करत) जराशी गंमत केली रे राजा, मी इथे आलो आहे, ते तुझ्या आयुष्यात असलेल्या त्रासांपासून तुझी सुटका करायला..
सदा : खर्रच का देवा.. तसे असतील तर खूप उपकार होतील बघ.. आता माझे त्रास तुझ्यापासून काय लपलेत.. गावची जमीन मुबलक आहे, पण ती विकायची म्हटले तर सतरा भानगडी.. तिथे जाऊन राहायचे तर आता शहर सोडून जावेसे वाटत नाही.. प्रेमविवाह करून असा फसलो कि सासर्याने हुंडा म्हणून काही दिले नाही.. जे आहे त्यात कसाबसा संसार रेटायचा म्हटलं तर बॅंकेच्या नोकरीचा पगार पुरत नाही.. आधी थोडीफार चिरीमिरी तरी सुटायची, पण ती देखील आता नवीन मॅनेजर आल्यापासून बंद झाल्यातच जमा आहे.. त्यात मध्येच उचल खाणारा आईवडिलांचा आजार, औषधपाणी, दर महिन्याचा डॉक्टरचा खर्च.....
देव : अरे हो हो राजा.. जरा दमाने.. तुझी त्रासांची लिस्ट काही संपायची नाही.. त्यापेक्षा असं करूया का, मी तुला तीन वर देतो, त्यात माग तुला हवे ते..
सदा : (जणू याची वाटच बघत असल्यासारखे, उतावीळपणे) देवा, सर्वात पहिले तर मला आयुष्यभर पुरतील एवढे पैसे देशील आणि आमचा तो नवा बॅंक मॅनेजर, लगोलग त्याचाही काटा काढशील...
वर म्हणताच वरचाखालचा काही एक विचार न करता सदाने मागायला सुरूवात केली..
देव : तथास्तु !
सदा आजूबाजुला पाहू लागला... तसा देव हसून म्हणाला, "अरे वेड्या, इथे तिथे काय बघतोस.. असा छप्पर पाडून पैश्यांचा पाऊस फक्त सिनेमांच्या पडद्यावर पडतो. उद्या उठशील तेव्हा आयुष्यभर पुरतील इतके पैसे तुझ्या बॅंकेत जमा झालेले दिसतील, तसेच तुझ्या मॅनेजरच्या बदलीची ऑर्डर निघाल्याचे देखील समजेल.
सदा : पण देवा आयुष्यभर पुरतील म्हणजे नक्की किती पैसे.. वाढत्या महागाईचा विचार केला आहेस ना..
देव : हो रे राजा, किती अविश्वास दाखवशील.. चल आता तिसरा वर माग..
सदा : (थोडा वेळ विचार करून) देवा माझा तिसरा वर असा आहे की मला अजून तीन वर हवे आहेत..
देव : (मंदस्मित करत) माफ कर मित्रा, टर्मस अॅंड कंडीशन अप्लाय ! असा वर तू मागू शकत नाहीस, पुन्हा अशी ज्यादा हुशारी करायचा विचार जरी केलास तरी पुढचा वर रद्द करण्यात येईल..
सदा : गंडलो कि रे मग देवा.. त्या मॅनेजरची बदली उगाच मागितली.. एक वर फुकट गेला त्याच्यात.. आता काय मागू एकाच वरात कळेनासे झालेय..
देव : काही घाई नाहीये, आठव आरामात, कशात तुझे सुख आहे ते माग..
सदा : तसे देवा पैसे मागितले आहेच तर पैश्याने सारी सुखे विकत घेता येतातच की..
देव : मग असे एखादे सुख आठव जे पैश्याने विकत घेता येत नाही.. नाहीतर एक काम कर ना, निरोगी आणि सुदृढ दिर्घायुष्य माग.. पैश्याचे सुख उपभोगायचे असेल तर ते उपभोगायला मोठे आयुष्य तर हवेच ना..
सदा : हे मात्र अगदी एक नंबर बोललास देवा.. मग मला तिसर्या वरात शंभर वर्षांचे आयुष्यच देशील..
‘तथास्तु’ म्हणायच्या आधी देवाने एकवार शेजारी झोपलेल्या त्याच्या बायकोकडे कटाक्ष टाकला, आणि म्हणाला,
"बायको पोटुशी दिसते राजा तुझी. कितवा महिना चालू आहे?"
सदा: आता तुझ्यापासून काय लपलंय देवा, पाच गेलेत अन चार राहिलेत.
देव : तिच्यासाठी आणि तिच्या पोटच्या पोरासाठी काही नाही मागणार का रे?
सदा : आता त्यांच्यासाठी आणि काय वेगळं मागायची गरज आहे का देवा.. जे माझं आहे ते त्यांचेच तर आहे, जाताना त्यांनाच तर देऊन जाणारेय..
देव : लेका स्वतासाठी दिर्घायुष्य मागितलस, पण तुझं लेकरू अल्पायुषी आहे हे तुला ठाऊक नाहिसे दिसतंय..
सदा : (चिंतातूर होत) मला नि ते कसे ठाऊक असणार देवा. आधी कळलं असतं तर एखादा वर मागितला असता त्याच्यासाठी सुद्धा..
देव : एक मार्ग आहे गड्या, तुला १०० वर्षांचे दिर्घायुष देणार आहे त्यातील थोडे आयुष्य मी त्याला देऊ शकतो, पण तुझी इच्छा असेल तरच हं..
सदा : (थोडा वेळ विचारात पडून..) तसं त्याचं आयुष्य आहे तरी किती देवा?
देव : नाही ब्वा, ते आम्ही कोणाला सांगू शकत नाही..
सदा : पण हे एकच लेकरू माझ्या नशिबी लिहिलेय की आणखी आहेत हे तरी सांगशील?
देव : नाही म्हटलं ना, आम्हालाही काही रुल्स एंड रेग्युलेशन पाळावे लागतात गड्या. असे भविष्यातले सिक्रेट्स उलगडता येत नाहीत..
सदा : ह्म्म ते ही असेलच.. पण मग देवा निदान हा पोरगा आहे की पोरगी हे तरी सांगशील..
देव : त्याने आनि काय फरक पडणारेय..
सदा : पोरगा असेल तर तेवढा सांभाळेल म्हातारपणाला, पोरगी मात्र दुसर्याच्या घरला निघून जाईल.. तिला नी माझ्या वाटणीचे जास्तीचे आयुष्य देऊन काय साधणार.. तसेच हल्ली पोरी सांभाळायच्या म्हणजे जिकीरीचे काम.. तुझ्यापासून काय लपलेय देवा, तुला आजूबाजुची परिस्थिती ठाऊक असेलच.. तसेच काहीसे वंगाळ घडून तिच्या आयुष्याचेच मातेरं झाले, तर काय करणार ती दिर्घायुष्याचे.....
.
.
इतक्यात अचानक खोलीतला प्रकाश धूसर होऊ लागला.. देवाच्या चेहर्यावरील तेज निस्तेज होत चेहरा काळवंडू लागला.. बघता बघता समोरील द्रुश्य भेसूर दिसू लागले..
सदा : काय झाले देवा, आता हे आणि तुझे कोणते नवीन रूप?
देव : नवीन नाही रे, हेच माझे खरे रूप आहे.. मी देव नसून यमदूत आहे.. तुला न्यायला आलो आहे.. चुकून वेळेच्या आधी येऊन पोहोचलो तर विचार केला टाईमपास म्हणून जराशी गंमत करूया..
सदा : देवा.. यमदूता.. महाराजा.. ग्ग ग्ग गंमत .. अस्सली क्कसली रे गम्मत.. (सदाची बोबडी आता खरोखरच वळली होती.)
यमदूत : जे नशीबात लिहिले आहे ते बदलू नाही शकत राजा, तरी अजून पाच मिनिटे आहेत आपल्याकडे, काही शेवटचे बोलायचे असेल तर बोल.. संकोच नको !
सदा : आता काय बोलू देवा, आयुष्यच संपत असेल तर बोलून काय फायदा.. पण यावर काही उपाय नाही का महाराजा, जसे मगाशी माझे आयुष्य माझ्या पोरांना देण्याबद्दल बोलत होतास तसे माझ्या बायकापोरांचे थोडेफार आयुष्य मला नाही का देता येणार.. माझ्यासाठी नाही रे, त्यांच्यासाठीच.. माझ्यापाठी त्यांचे काय होणार.. माझे होणारे मूल तर जन्म व्हायच्या आधीच अनाथ झाले रे.. काहीतरी जुगाड जमव देवा..
यमदूत : नाही राजा, असे ठरवूनही एखाद्याचे आयुष्य दुसर्याला देता येत नाही.. तसेही तुझ्या बायकोला खरेच आधाराची गरज असेल तर ब्रह्मदेवाने तिच्या नशीबात दुसरे लग्न लिहीले असेलच.. चिंता नसावी !
सदा : महाराजा, मग दुसरा कुठलाच मार्ग नाही का रे?
यमदूत : आहेत ना, बरेच मार्ग आहेत.. कमीत कमी ट्रॅफिक लागेल अश्याच मार्गाने घेऊन जातो तुला.. काळजी नसावी !
सदा : कुठे घेऊन जाणारेस?
यमदूत : मृत्युलोकात.. आणखी कुठे !
सदा : महाराजा, कसली ही अघोरी चेष्टा करतोयस रे?
यमदूत : चेष्टा नाही रे, गंमतच.. आणि ती देखील तुझ्या फायद्याचीच..
सदा : माझा फायदा? तो आणि कसा?
यमदूत : बरं असतं राजा, मरायच्या आधी समजले की आपली लायकीच नव्हती जगायची, तर तेवढाच जीवाला त्रास कमी होतो....... कळलं, चल आता मुकाट्याने.. दिरंगाई नको !
.
.
अंह.. स्वप्न नव्हते बरं का हे.. यमदूत खरंच घेऊन गेला सदाला !
- अंड्या उर्फ आनंद
आहेत ना, बरेच मार्ग आहेत..
आहेत ना, बरेच मार्ग आहेत.. कमीत कमी ट्रॅफिक लागेल अश्याच मार्गाने घेऊन जातो तुला >>> धो डाला
मस्त लिहिलयसं अंडोबा !
मस्त लिहिलयसं अंडोबा !
चांगलं लिहिलं आहेस रे.
चांगलं लिहिलं आहेस रे.
अंह.. स्वप्न नव्हते बरं का
अंह.. स्वप्न नव्हते बरं का हे.. यमदूत खरंच घेऊन गेला सदाला ! >> हे पण भारी
धन्यवाद सर्व प्रतिसाद, सहज
धन्यवाद सर्व प्रतिसाद, सहज गंमतीत काहितरी विचार डोक्यात आला अन कागदावर उतरवलेला.. बस्स जराशी गंमत म्हणूनच..
भारी गंमत आहे हो. शेवटचा
भारी गंमत आहे हो. शेवटचा विचार भावला. बरं असतं राजा, मरायच्या आधी समजले की आपली लायकीच नव्हती जगायची, तर तेवढाच जीवाला त्रास कमी होतो....... > +१०० ... अस प्रत्येकाला कळलं असतं तर... पण कदाचित तितकीही लायकि नसावि कित्येकांची किंवा तो जरा जास्तच बिझी असावा.
(No subject)
आवडले
आवडले
देशमुखसाहेब, डॉकटरसाब,
देशमुखसाहेब, डॉकटरसाब, स्वातीताई ... धन्यवाद
व्वा अण्डेश्वर मस्तच
व्वा अण्डेश्वर मस्तच
अंड्या, मस्तच रे!!! आवडेश
अंड्या, मस्तच रे!!!
आवडेश
जराशी केलेली गम्मत मस्त
जराशी केलेली गम्मत मस्त होती...झक्कास
ह्याच गमतीला थोडं अजुन जास्त
ह्याच गमतीला थोडं अजुन जास्त ताणलं तर कादंबरी होईल हो...........
छान आहे ही जराशी गंमत!
छान आहे ही जराशी गंमत!
ह्याच गमतीला थोडं अजुन जास्त
ह्याच गमतीला थोडं अजुन जास्त ताणलं तर कादंबरी होईल हो...........
>>> कादंबरी ?? या एवढ्याश्या गंमतीची ..
बाकी आयडीया वाईट नाही. तो सदा आणि यमराजच्या संभाषणात विक्रम वेताळसारख्या कथा टाकायच्या. प्रश्नोत्तरे, तत्वज्ञान आणि निष्कर्श काढत राहायचे. शेवटाला कुठेतरी पहाटे सदाला समजणार आपली जगायची लायकीच नव्हती, त्याचा जगण्याचा मोह संपणार, आणि तेव्हा यमराजाला ध्यानात येणार की अरे आपण चुकीच्या माणसाला न्यायला आलो आहोत, याचे आयुष्य तर १०० वर्षे आहे
आवडली....
आवडली....
सापडली गंमत...
सापडली गंमत...
तो मृत्युवरचा लेख वाचला आणि याची आठवण आली..
म्हटलं वर काढूया.. टॅक्सी फिरवूया
छान लिहिले आहे अंड्या..
छान लिहिले आहे अंड्या..
धन्यवाद ऋन्मेष धागा वर णल्याबद्धल...
गम्मत आवडली.. मस्तय
गम्मत आवडली.. मस्तय
आपल्याच आयडीचा लेख वर
आपल्याच आयडीचा लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद कसे स्विकारू च्रप्स... पापात ढकलून नका. अन्यथा तो चित्रगुप्त पुढची चिठ्ठी माझ्या नावाची काढायचा
छान लिहिलय.
छान लिहिलय.
छान लिहिलय.>>>.+१.
छान लिहिलय.>>>.+१.
मृणाली, देवकी धन्यवाद
मृणाली, देवकी धन्यवाद