भाग मिल्खा भाग
चित्रपट पाहिला नसेल तर हे वाचू नका, कारण हा चित्रपट आवर्जून बघा अशी विनंती आहे.
शाळेत असताना जनरल नॉलेजच्या स्पर्धांची वगैरे तयारी करताना एक हमखास विचारला जाणारा प्रश्न होता, "फ्लाईंग सीख असे कोणाला म्हणतात?" उत्तर पाठ करून ठेवलं होतं "मिल्खा सिंग, भारताचा धावपटू" पण हा मिल्खा सिंग कोण आणि काय आहे ते काल राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा भाग मिल्खा भाग हा चित्रपट बघून समजलं.
आपल्याकडे "भावना दुखावणे" हा एक प्रकार असतो, कुणीही कुठल्याची ऐतिहासिक व्यक्तीविषयी अथवा घटनांविषयी चित्रपट अथवा अन्य एखादी कलाकृती काढायची ठरवली की कुणाच्या ना कुणाच्या तरी भावना दुखावतात. मग त्या समाजाला खुश ठेवण्यासाठी कलाकृतीमधे तडजोड करावी लागते. दुसराप्रकार म्हणजे पूर्ण रीसर्च न करता आपल्या कविकल्पनेने ठोकून दिलेली ऐतिह्हासिक सत्ये. जिथे "दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य" अशी सूट घेऊन वाट्टेल त्या पद्धतीने घटना दाखवल्या जातात. या दोन टोकाच्या मतभेदांमुळे आपल्याकडे इतिहासाशी प्रामाणिक राहणारे चित्रपट बनतच नाहीत. आणि बनले तरी ते पूर्ण प्रामाणिक असत नाहीत. त्यातही अवघड विषय म्हणजे बायोपिक. एखादी व्यक्ती अशी का घडली, कशामुळे घडली या कारणांचा मागोवा घेणारे चित्रपट फार थोडे. राकेश ओमप्रकाश मेहरांचा भाग मिल्खा भाग हा या अशा थोड्या चित्रपटांपैकी एक.
भाग मिल्खा भाग ही भारताचा अव्वल धावपटू मिल्खा सिंग याची कहाणी. पण मेहरा नुसती इथे घटनांची जंत्री मांडत नाहीत, तर हलकेच मिल्खा सिंग ही व्यक्तीरेखा उलगडत जातात. चित्रपटात "काय घडतं अथवा कसं घडतं" त्याला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते घडल्यानंतर मिल्खा सिंग या व्यक्तीवर होणारे परिणाम, आणि त्या परिणामाच्या ठोक्यातून साकारणारी अजूनच ठाशीव होत जाणारा मिल्खा सिंग. आयुष्यात सतत चढ उतार पाहणार्या, स्वतःच्या चुकांमधून स्वतःच शिकत जाणारा, स्वतःवर प्रचंड विश्वास असणारा, दुर्दम्य आशावाद असलेला मिल्खा प्रत्यक्ष मनामधून मात्र फार दुबळा आहे. त्याचं शरीर जितकं कणखर आहे तितकंच त्याचं मन नाजूक आहे. आणि त्यचं कारण म्हणजे लहानपणी डोळ्यासमोर घडलेल्या घटना.
मिल्खाची ही कहाणी फक्त रेस आणि त्याच्या जिंकण्याहरण्याची कहाणी नाही. तर ती आहे, स्वत:शीच चाललेल्या स्वतःच्या झुंजीची. स्वतःच्याच शरीराला मिळालेल्या निसर्गदत्त देणगीतून स्वत:लाच अधिकाधिक पुश करण्याची(मराठी शब्द सुचवा). मेहनत, अधिक मेहनत आणि त्याहून अधिक मेहनत करून मिल्खा सिंग वेगात धावतो. साधने तुटपुंजी आहेत, जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध नाहीत याचा तो विचारदेखील करत नाही. आहे त्यामधेच "आय अॅम द बेस्ट" हे लक्ष्य तो ठेवतो आणि तो धावतो.
रोम ऑलिम्पिक्सधे धावताना रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. मिल्खा हरतो. चौथ्या नंबरवर येतो, भारताला कुठलेही पदक मिळत नाही. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते. देशाचे पंतप्रधान आपल्या शेजारच्या देशासोबत संबंध चांगले व्हावेत म्हणून एका स्पोर्ट्समीटचे आयोजन करतात. आणि भारताचा लीडर म्हणून मिल्खासिंगचे नाव घेतात, पण मिल्खा तिथे जायला उत्सुक नाही, जिथे आपल्या आईवडलांची प्रेतं सडली तिथेच परत जायचं?
इथून सुरू होते मिल्खाची कहाणी. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या वडलांनी मारलेली "भाग मिल्खा भाग, भाग यहांसे भाग मिल्खा भाग" ही आरोळी सत्यात उतरते. निर्वासितांच्या छावणीमधे हात मागून मागून मिळवलेले रोटीचे तुकडे मोडणारा मिल्खा, मोठ्या बहिणीच्या सावलीमधे थोडातरी सावरतो. पण आयुष्यापासून सतत धावत असलेला मिल्खा गुन्ड बनतो, मोठ्या बहिणीव्यतिरीक्त अजून कसलीही माया न मिळालेला अनाथ मिल्खा चक्कूछुरी चलानेवाला बनत जातो. पण या अंधारामधे कायमचा गुडुप होण्याआधी तो बिरोच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करायला काहीतरी उत्पन्नाचं साधन हवं म्हणून आर्मीत येतो. इथे आर्मीमधला मिल्खा सिंग धावपटू बनतो. कशासाठी तर दूध आणि अंड्याच्या खुराकासाठी, धावत राहतो. आधी इंडियाचा कोट मिळवण्यासाठी, नंतर पदक मिळवण्यासाठी. भारतासाठी सीलेक्ट व्हावं म्हणून तो जखमी अवस्थेतदेखील जीवाची बाजी मारून पळतो आणि नॅशनल रेकॉर्ड तोडतो. जिच्यासाठी तो आर्मीत आला ती त्याला मिळत नाहीच, पण धावणं मात्र त्याच्या आयुष्यामधे कायमचं येऊन राहतं. तरूण मिल्खा मेलबर्न ऑलिम्पिक्समधे भाग घेण्यासाठी निवडला जातो. प्रत्यक्षामधे तिथे जाऊन एका मुलीकडे आकर्षित होतो, रेस हारतो आणि स्वतःच्याच नजरेतून उतरतो.
या क्षणापर्यंत मिल्खासिंगचा त्याच्या आयुष्यावर काहीही कंट्रोल नाही, इथून पुढे तो कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. आणि त्याचं आयुष्य त्याला हव्या त्या वेगामधे घालवतो. ४०० मीटर रेसचे वर्ल्ड रेकॉर्ड तोडतो, त्यासाठी मेहनत घेतो. कॉमनवेल्थ गेम्समधे पदकं जिंकतो. पण एवढं जिंकूनसुद्धा, इतकी मेहनत करूनसुद्धा मिल्खा आतून खळबळ घेऊनच जगतोय. त्याला पाकिस्तानात जावं लागतं. तिथे गेल्यावर मुद्दाम मिल्खा स्वतःच्या जन्मगावी जातो, तिथे जाऊन ज्या आठवणींपासून आयुष्यभर लांब पळतोय त्या आठवणींपासून मुक्त होतो, तिथे जाऊन आईच्या आठवणींनी तो मनसोक्त रडतो, त्याला हवं असणारं क्लोजर तिथे मिळतं. मिल्खा सिंग आता मनामधून देखील तितकाच शांत आहे. कारण, जिथे त्याच्या आईची नातेवाईकांची प्रेतं टाकली होती, ज्या प्रेतांच्या गराड्यामधे तो स्वतः अडकला होता, तिथे अजूनही चालू असलेल्या जीवनप्रवाहाची आताजाणीव आहे. मित्राचा फुललेला संसार बघून त्याला समाधान मिळतं. आणि मग त्या स्पोर्ट्समीटच्या रेसमधे मिल्खा बेभान धावतो. कुणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला जिंकण्यासाठी. पण यावेळेला नुसता धावपटू मिल्खा धावत नाही, तर तो छोटा मिल्खादेखील धावतो. इतके दिवस जीव वाचवण्यासाठी धावणारा छोटा मिल्खा आज पहिल्यांदा आनंदी होऊन धावतो. धावपटू मिल्खा त्याच्याकडे पाहून हसतो. छोटा मिल्खा मुक्तपणे हसतो. धावपटू मिल्खा ती रेस जिंकतो. नुसती ती रेसच नव्हे तर भारत पाकिस्तानमधल्या प्रत्येक माणसाचं हृदय तो जिंकतो. शिवाय स्वतःपासूनच इतके दिवस धावणारा मिल्खादेखील स्वतःशीच जिंकतो. जिथे त्याच्या आयुष्याचीच नासाडी झाली त्याच देशामधे धावपटू मिल्खा "फ्लाईंग सीख" ही उपाधी मिळवतो. आता छोटा मिल्खा धावत नाही, त्याच्या आयुष्यातलं जगण्यासाठीचं वणवण धावणं संपलंय. आता धावपटू मिल्खा भारताची शान होतो, त्याच्या विजयाच्या खुशीमधे पूर्ण भारताला सुट्टी दिली जाते. मिल्खाचं धावणं मात्र संपत नाही.
विषयाचा एवढा अतिप्रचंड कॅनव्हास असताना राकेश मेहरा नेमक्या घटना मांडत जातो. त्याचं डिटेलिंग अणि वातावरण निर्मिती अचूक आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून राकेश मेहराने मिल्खासिंग उभ केला आहे. प्रसून जोशीने कथा पटकथा लिहिताना चित्रपट मिल्खाच्या वास्तव आयुष्याची सनावळ न मांडता घटनांचे मर्म जाणून घेत लिहिली आहे. सिनेमाची कथावस्तू पाहता सिनेमाचा पेस थोडा रेंगाळल्यासारखा घेतलाय तो पूर्णपणे योग्य वाटतो. काही गाणी मात्र असून नसून सारखीच आहेत, ती श्रवणीय आहेत, पण त्यांची कथेमधे खरंच गरज नव्हती. झिंदा, भाग मिल्खा भाग सारखी गाणी जिथे पटकथा पुढे सरकते, अशी गाणी जास्तीत जास्त असायला हवी होती.
सिनेमाचे छायाचित्रण अफलातून आहे, ट्रेन स्टेशनवर टीसीने टिकीट मागितल्यानंतरचे दृश्य तसेच रेसची सर्व दृश्ये उत्तमरीत्या चित्रीत झाली आहे. फाळणीच्या निर्वासित छावणीमधील दृश्ये, मिल्खाच्या लहान्पणाची दृश्ये परिणाम कारक रीत्या घेतली आहेत. संवादलेखन मात्र "इंग्रजीतून लिहून मग हिंदी ट्रान्स्लेट" केल्यासारखे वाटत होते मला. पंजाबी संवाद मात्र ठिकठाक आहेत. खटकेबाज संवाद नाहीत हे एका अर्थाने बरंच आहे. या चित्रपटात आवश्यकता पण नव्हती. सोनम कपूर आणि त्या ऑस्ट्रेलियन मुलीची वेशभूषा मात्र मला नव्वदच्या दशकांतली असल्यासारखी वाटली. चुभूदेघे.
राकेश मेहराने या सिनेमासाठी सर्वात उत्तम काय केले असेल तर फरहान अख्तरला मिल्खा सिंग म्हणून कास्ट करणे. फरहान अख्तर मिल्खा सिंगचा अभिनय करत नाही, तो मिल्खा सिंग बनून जगतो. चेहर्याने, डोळ्यांनी, शब्दांतून अभिनय करनारे बरेच आहेत, फरहान अख्तर हे सर्व तर करतोच, पण तो देहबोलीतून अभिनय करतो. बिरोच्या मागे लागलेला रोमँटिक मिल्खा आणि मेलबर्न ऑलिम्पिक्समधल्या वन नाईट स्टँडमधला मिल्खा ते पेरीझादला "ये मेरी खुदसे लडाई है" सांगणारा मिल्खा त्याने जिवंत केलाय. मेल्बोर्न ऑलिम्पिकमधे हरल्यावर स्वतःच्याच फटाफट कानाखाली मरून घेणारा फरहान अख्तर बीलीव्हेबल वाटतो. धावपटूची देहबोली, धावण्याआधी त्यने घेतलेला पवित्रा आणि रेस्ट्रॅकवर फिरणारी त्याची नजर. धावतानाचे ब्रीदिंङ टेक्निक त्याने सहजगत्या अवगत केलंय. हॅट्स ऑफ टू फरहान. मुळात मिल्खा सिंग ही व्यक्तीरेखा त्याने नुसती सिक्स पॅक अॅब्ज बनवून आणि बायसेप, ट्रायसेप्स फुलवून उभारलीच नाहीये. त्या व्यक्तीरेखेचा त्याने केलेला अभ्यास, त्यावर केलेले चिंतन आणि अशा व्यक्तीरेखा समजून घ्यायची त्याची वैचारिक कुवत या सर्वांच्या मिलाफातून मिल्खा सिंग आपल्यासमोर येतो.
फरहानइतकाच हा सिनेमा जबतेजसिंगच्या छोट्या खांद्यांनी पेलून धरलाय. छोट्या मिल्खाचा एकाकीपणा, त्याची निरागसता आणि नंतर आलेला वांडपणा त्याने उत्तमरीत्या साकारला आहे. छोटा मिल्खा घरी आल्यावर घसरून पडतो ते दृश्य तर अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. फालणीच्या त्या दिवसांमधे अशा कित्येक मिल्खांची बालपणं अवेळीच करपली ते परमेश्वरालाच माहिती.
पवन मल्होत्रा आणि दिव्या दत्तासारखे कलाकार फार कमी सिनेमांमधून दिसतात. पवन मल्होत्रा तर एकाएका दृश्यामधे सुद्धा अख्खा सिनेमा खाऊन टाकू शकेल असा माणूस आहे. भाग मिल्खा भाग मधे त्याचे काम सुंदर झालेच आहे, शिवाय मिल्खा सिगचा कोच असलेला योगराज सिंगचे काम देखील ग्रेट. अभिनेता म्हणून याआधी कुठे बघितल्याचे आठवत नाही मला. पण सिनेमामध्ये कोच म्हणून त्याचे काम अस्सल वाटलंय. खास करून वर्ल्ड रेकोर्डसाठी मिल्खाला ट्रेन करताना. प्रकाश राज पण छोट्या भूमिकेत छान काम करतो. कास्टिंगम्धे सर्वात जास्त चुकलेले पात्र पंडित नेहरूंचे आहे. दलिप ताहिल नेहरूंसारखा दिसत नाही, त्याच्याकडे नेहरूंचा रूबाब, ग्रेस आणि स्टाईलदेखील नाही. संवादपण तो बातम्या दिल्यासारख्या एकाच सुरात म्हणतो, टोटल मिस्फिट.
सोनम कपूर थोडाच वेळ दिसते जितका वेळ दिसते तितकावेळ सुसह्य आहे. तिने या सिनेमासाठी अवघे अकरा रूपये चार्ज केले आहेत म्हणे. पैशापेक्षा उत्तम सिनेमा निवडण्याची बुद्धी तिला आहे असं समजायला हरकत नसावी. इतर नायिका कथा पुढे नेण्यास हातभार लावण्याइतक्याच आहेत. दिव्या दत्तासाठी हा रोल अगदी टेलरमेड असाच आहे, आणि तिने तो अगदी व्यवस्थितरीत्या निभावला आहे. मिल्खाच्या नायिकांपेक्षा जास्त काम तिच्या वाटयाला आले आहे. दिव्या दत्ता ही फार गुणी अभिनेत्री आहे तिला अशा स्पोर्टिंग रोल्समध्ये बघून कंटाळा आलाय. तिच्या पोटेन्शियलला वाव देणार्या अजून भूमिका तिला मिळायला हव्यात.
हा चित्रपट नुसती मिल्खाची जीवनकहानी नाही. त्यापलीकडे जाउन ही प्रत्येक जिद्दी खेळाडूची कहाणी आहे, प्रत्येक निर्वासिताची कहाणी आहे, स्वत:च्या क्षमतेवर विश्वास असणार्या प्रत्येक व्यक्तीची ही कहाणी आहे. चित्रपट पाहिल्यांम्तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून गेली, आजवर आपल्याला अॅथलेटिक्समधे ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही, ज्या दिवशी ते पदक भारताला मिळेल त्या दिवशी मिल्खा सिंग यांना खरी मानवंदना दिली जाईल.
नुकताच पुण्यात मिल्खा सिंग
नुकताच पुण्यात मिल्खा सिंग यांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला. नव्वदीच्या घरात आहे हा माणूस अजूनही कसला तडफदार बोलतो. मी पोराला मुद्दाम घेऊन गेलो होतो.
ट्रूली इन्स्पायरींग.
सगळ्यांनी शेवटी स्टँडीग ओव्हेशन दिले....टाळ्यांचा नुसता कडकडाट...
Pages