आखाजी- सासुरवाशीणींचा सण!
आज अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेउन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देउन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेउन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबर्यावर उमटवत आणी एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर/ आता गॅसवरच 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासुन आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.
खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!
इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली.
माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.
चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड
माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना, झुयझुय पानी व्हायं वं
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो
बन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं
झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.
वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय
इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.
गौराई नारय तोडी लयनी
वं माय तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा
वं माय देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या
वं माय मीठ मिरच्या
सासरानी सांगी तंबाखु
वं माय तंबाखु
देरनी सांगा झिंगी भवरा
वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा
वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा
वं माय पान पुडा
या संसारले हात जोडा
वं माय हात जोडा
आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला येतो. माहेरचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते. नवर्याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.
गडगड रथ चाले रामाचा
नि बहुत लावण्ण्याचा
सोला साखल्या रथाला
नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक
बापसे बारीक
बायनी लावली सुपारी
बापसे बेपारी
गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते. आईबाबांची लेकीला माहेराहुन देण्यासाठी पापड, कुरड्या, शेवया,लोणचं अशा सामानाची बांधाबांध. इकडे आपली गौराई पण हुश्शार! ती स्वत:च शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.
काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी
सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."
आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई
सौजन्यः http://books.google.co.in/books?id=xTi0iaalLXcC&pg=PA429&lpg=PA429&dq=ah...,
इंटरनेटवरुन साभार!!
छान वाटलं वाचायला ! अशी भाषा
छान वाटलं वाचायला !
अशी भाषा त्या लहेजासकट ऐकल्याशिवाय त्यातली गंमत कळणार नाही.
व्वा!! आर्यातै भरुन आलं गं
व्वा!! आर्यातै भरुन आलं गं एकदम!!!
छानच लिहिलयेस
छानच लिहिलयेस
छान लिहिलंय. आम्हा पश्चिम
छान लिहिलंय. आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना अगदी अपरिचित असलेल्या या सणाविषयी माहिती मिळाली.
आर्यातै आठवणी जाग्या केल्यास
आर्यातै आठवणी जाग्या केल्यास गं... लहानपणी गावी गेल्यावर आखाजीला खापरवरच्या पुरण्यापोळी खाणे.. खुप आठवते गं
झोक्यावर बसुन मोठ्यामोठ्यांने आथानी कैरी... गायचो आम्ही
अजुन एक बाकी सगळिकडे पत.न्ग
अजुन एक बाकी सगळिकडे पत.न्ग स.न्क्रातिला उडवतात, खान्देशात 'आखाजिला'.
मयुरे...आम्ही पण मे
मयुरे...आम्ही पण मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो की अंगणातल्या गुलमोहराला झोके बांधुन 'आथानी कैरी....'म्हणायचो. आताशा शहराच्या जवळ आमराया राहिल्या नाहीत. ती मजा ही गेली.
पण गल्लीमधे इथुन तिथुन मोठाल्ले झोके बांधलेले अजुनही कुठे कुठे दिसतात.
व्वा ! आखाजीची गाणी गोड आहेत.
व्वा ! आखाजीची गाणी गोड आहेत. मस्त लिहिले आहे. धन्यवाद आर्यातै.
छान लिहिलंय. आम्हा पश्चिम
छान लिहिलंय. आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना अगदी अपरिचित असलेल्या या सणाविषयी माहिती मिळाली. >>> +१००...
रोजच्या वाचनातल्या श्रीगजानन
रोजच्या वाचनातल्या श्रीगजानन विजय या पोथीत अक्षय तृतीयाचे वर्णन येते. वर्हाडात हा मोठा सण असतो. या दिवशी कान्हवले केले जातात इ. त्याचे प्रत्यक्ष दर्शन या लेखात झाले.
पण गल्लीमधे इथुन तिथुन
पण गल्लीमधे इथुन तिथुन मोठाल्ले झोके बांधलेले अजुनही कुठे कुठे दिसतात.<< हो का नशिब म्हणायचे.. नाहीतरी घरातली म्हातारी मंडळी म्हणतच असतात 'आते काय पहील्यासारखी मजा रायनी नै'
आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या
आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना अगदी अपरिचित असलेल्या या सणाविषयी माहिती मिळाली. >> +१.
मयुरे... धन्यवाद
मयुरे...
धन्यवाद मित्रमैत्रीणींनो!!!
श्रीगजानन विजय पोथीत चिंचवणी
श्रीगजानन विजय पोथीत चिंचवणी नावाचा चिंचेपासुन बनवलेल्या पदार्थाचे वर्णन आहे.
नवीन पण मस्त माहिती.
<<श्रीगजानन विजय पोथीत
<<श्रीगजानन विजय पोथीत चिंचवणी नावाचा चिंचेपासुन बनवलेल्या पदार्थाचे वर्णन आहे<< हो हो..
मला वाटतं ते चिंचेचं सारच असावं.
<<या दिवशी कान्हवले केले जातात इ. त्याचे प्रत्यक्ष दर्शन या लेखात झाले.<<नि३जी... गव्हाची खीर, कान्हवले खान्देशात नागपंचमीला करतात खरं तर! त्या दिवशी काही कापत्,चिरत नाहीत, तवा ठेवत नाहीत ना म्हणुन! कान्हवले म्हणजे कणकेच्याच पातळ पोळ्या लाटुन त्या त्रिकोणी घडी घालुन कुकरमधे चाळणीवर वाफवुन घेतात.
वा सुंदर, आर्याताई
वा सुंदर, आर्याताई तुमच्यामुळे खानदेशात अक्षयतृतीया कशी साजरी करतात ते कळले आणि गाण्यांचा गोडवाही आमच्यापर्यंत पोचला.
आर्याबहीन, यु रॉक!
आर्याबहीन, यु रॉक!
मस्त लिहिलेस ग
मस्त लिहिलेस ग
मस्त लिहीलयंस आर्यातै..
मस्त लिहीलयंस आर्यातै..
मस्त लिहीलस. इतका मोठा सण
मस्त लिहीलस. इतका मोठा सण तिकडे साजरा करतात माहितच नव्हत. गाणी पण गोडच आहेत.
मस्त्च आर्याजी हे ही वाचा
मस्त्च आर्याजी
हे ही वाचा आपल्याला आवडेल
http://www.maayboli.com/node/34494
मस्तच!
मस्तच!
वरदा +१ त्या गाण्यांचे
वरदा +१
त्या गाण्यांचे थोडक्यात मराठीत अर्थ लिहाल का? सगळे शब्द कळत नाहीयेत.
आर्या..किती गोड लिहिलंयस..
आर्या..किती गोड लिहिलंयस.. गाणी पण मस्त आहेत..
बाई चांगला लेख लिखा बरं
बाई चांगला लेख लिखा बरं तु.
माल्हे ते गैर्हा आवडना बरं !
काल दिनच पुरणपोया न आंबाना रस हाणी मारा. तेन्हा संगे रसोइ,भात बाकीनभी करेल होतं.
आर्या, तु खानदेशी
आर्या, तु खानदेशी एनसायक्लोपेडिया आहेस
ते बु ग चि तेवढं बघ की.
वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे
वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहावे इतकं सहज सुंदर लिहिलंयस..
मस्त !
मस्त !
व्वाह! आर्याताई मस्त लिहिलंय
व्वाह! आर्याताई मस्त लिहिलंय सगळं माझे वडील मालेगावचे, पण ३०वर्षांहून अधिक काळ ते नाशिकमध्ये स्थायिक झालेत. पण आई-वडील दोघांना अहिराणी बोलता येते. माझा जन्म नाशिकचा त्यामुळे बोलणं फार नाही जमत पण थोडं थोडं आणि समजतंही बर्यापैकी.
<<<आजपासुन आंबे खायला सुरवात करतात>>> यावरून आठवलं.
मागच्याच आठवड्यात मी नाशिकला गेलो असतांना घरी हापूस आंबे घेऊन गेलो, खाल्ले आणि दुसर्या दिवशी आईच्या लक्षात आलं की अक्षय्य तृतीया झाल्याशिवाय आंबे खाल्ले. तिला खूप वाईट वाटलं की पित्रांना जेवू घातल्याशिवाय आंबे खाल्ले.
बाकी तुमच्या या लेखामुळे बर्याच गोष्टी नव्याने कळल्या. धन्स
मस्त लेख आर्या
मस्त लेख आर्या
Pages