मंडळी, आता हा लेख पूर्ण झाला आहे. अर्धवट लिखाणाला सुध्दा तुम्ही प्रतिसाद दिलात. त्यामुळे हुरुप आला. खूप खूप धन्यवाद. आत्ता फोटो टाकतानाही नंदनने तातडीने मदत केली त्याबद्दल त्याचे आभार.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.
----------------------------------------------------------------------------------------
२०१२ चा उन्हाळा आम्हाला खूप महिन्यांपासून खुणावत होता. आमच्या कंपनीमधे Sabbatical vacation ची सुविधा आहे. नोकरीची ७ वर्षे पूर्ण झाली की २ महिन्यांची पगारी सुट्टी मिळते जी १० वर्षे पूर्ण व्हायच्याआत कधीही घेऊ शकतो. जर नाही घेतली तर ती बाद होते. आम्ही दोघेही या सुट्टीसाठी पात्र झालो होतो. अर्थातच जवळजवळ गेलं वर्षभर अगदी आतुरतेने तिची वाट पाहात होतोच. यात अमृतयोग म्हणजे मुलीच्या शाळेची उन्हाळी सुट्टी!! मग काय, आमची गेल्या ६ महिन्यांपासून जोरात तयारी चालू होती. युरोपमधे इटलीतील काही ठिकाणे आपली आपण पहायची, मग १५ दिवसांची एक समुद्रसफर करायची, त्यानंतर भारतात जाऊन आई-वडिल, आप्तेष्टांना भेटायचे आणि मग काही दिवस परत घरी येउन अगदी निवांत आराम करायचा असा एकंदरीत बेत होता. त्याप्रमाणे तिकीटे, माहिती मिळवणे, प्रवास वर्णनांचे वाचन, Travel guides इ. इ. सुरु झालेच.
यातील इटलीचा प्रवास थोड्याफार फरकाने इथे बर्याच जणांनी वर्णन केल्याप्रमाणे झाला. त्यामुळे त्याबद्दल फार काही लिहित नाही, पण क्रुझ याविषयी मात्र भरभरून बोलावसं वाटतंय म्हणून हा लेखनप्रपंच.
आम्ही Princess Cruises तर्फे चालविण्यात येणार्या Crown Princess ने Venice to Rome असा प्रवास करायचे ठरवले. ग्रीक बेटे हे प्रवासाचे मुख्य आकर्षण होते. याशिवाय Croatia आणि Turkey या देशांमधील काही ठिकाणे होती. परतीच्या मार्गावर परत इटलीतील २ ठिकाणे होती. असा एकंदरित ४ देशांचा प्रवास होता. त्याचे बुकिंग कोणताही एजन्ट न घेता online Princess वरच केले. विसासाठी Italian Consulate मधून Schengen visa घेतला. त्यामुळे कायदेशीर बाबी सर्व पार पडल्या. Turkey मधे over-night stay नव्हता त्यामुळे आणि US चे GC असल्यामुळे विसाची गरज नव्हती. cruiseline ने गेल्या ६ महिन्यांपासुन ही सर्व तयारी करण्यास सांगितले आणि आवश्यक सुचनाही दिल्या. प्रवास महिन्यावर आला असताना ही सर्व माहिती तपासून घेतली. आमचा पहिलाच समुद्रप्रवास होता हा. मला समुद्र आवडतो पण दिवसेंदिवस असं समुद्राच्या मध्यात राहणं कितपत झेपेल ही शंका/भीती होती - शरीराचं एक वेळ ठीक होतं कारण मोशन-सिकनेसचा वगैरे फारसा त्रास होत नाही पण त्याहून महत्त्वाचे म्ह्णजे ४ फुटात कसेबसे पोहता येणार्या मला काही emergency आली तर काय ही थोडी भीती होतीच. त्याबद्दलचा एक किस्सा पुढे समजेलच.
तर ११ जुलैला दुपारी १ वाजाता आम्ही Venice मधून निघून २३ जुलैला सकाळी रोमला परत येणार होतो.
प्रचि १: प्रिंसेस कडून साभार.
प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे असे होते - Venice (Italy - overnight stay), Dubrovnik (Croatia), Corfu (Greece), Katakolon/Olympia (Greece), Athens (Greece), Mykonos (Greece), Kusadasi (Turkey), Santorini (Greece), Naples (Italy), आणि Rome (Italy). प्रत्येक ठिकाणी सकाळी साधारण ६ किंवा ७ ला पोहोचून संध्याकाळी ५ ला निघायचे. दिवसभर त्या त्या ठिकाणची सफर करायची. ही सफर Princess तर्फे घेऊ शकतो किंवा आपली आपण करू शकतो. पण त्यांच्याकडून घेण्यात बराच फायदा होता म्हणून आम्ही त्याप्रमाणे बुकींग केले. काही ठिकाणे अर्धा दिवस तर काही पूर्ण दिवस घालविण्यासारखी होती. त्यानुसार आधी बरेच वाचन, online research करून काय काय पहायचे ते ठरवले. इथे माबोवर मीना प्रभूंच्या पुस्तकांबद्दल बरीच चर्चा झाली होती. या निमित्ताने त्यांची रोमराज्य (दोन्ही भाग) आणि ग्रीकांजली वाचून झालं. साहित्यिक दृष्टीकोनातून खूप आवडली नाहीत ही पुस्तके आणि ट्रिपसाठी Travel Guide म्हणून पण फार काही उपयोग झाला नाही. त्यापेक्षा Rick Steves ची पुस्तके खूपच उपयुक्त वाटली. त्याची Pocket books तर सर्व महत्त्वाच्या पर्यटक स्थळांची इत्थंभूत माहिती पुरवतात. आपल्याकडे असलेल्या कमीतकमी वेळेत भरपूर बघता येतं आणि त्यासाठी तिकिटे, लोकल गाड्या, रस्ते, यांची नीट माहिती मिळते. त्याच बरोबर कुठे काय खावे, प्यावे, प्रवासात काय सावधगिरी बाळगावी असे बरेच धडे मिळतात, असो.
माझी मुलगी ८ वर्षांची आहे, तिच्यासाठी काय बरे पडेल, कोणती excursions निवडावीत याचाही विचार झाला. तिच्यासाठी cruise ship वर day-care/kid-sitting ची सोय असेल की नाही याची चौकशी केली नव्हती पण प्रत्यक्ष बोटीवर गेलो आणि तिच्यासाठी असलेल्या विविध गोष्टी पाहून तिनेच जाहीर केले की मी कोणत्याही Port वर कोणताही किल्ला (खंडहर ), संग्रहालय, किंवा इतिहासातील वास्तू/गोष्टी पहायला येणार नाही. आधीच ८ दिवस केलेल्या इटली ट्रिपचा तिला ओव्हरडोस झाला होता (आणि नवर्यालाही इतकी वर्षं BC आणि तितकी वर्षं AD या टर्मस तर तो पुढचं वर्षभर ऐकणार नाहीये. :)). आणि इथे शिपवर तिच्यासाठी kid-sitting ची उत्तम सोय आणि हजारो activities दिमतीला होत्या. पहिल्याच दिवशी तिला निरनिराळ्या देशातले मित्रमैत्रिणी भेटले आणि मग काय ती खुशीत आणि आम्ही पण मिनी-हनीमूनच्या थाटात भटकायला मोकळे!!
Venice ला ज्या हॉटेलमधे उतरलो होतो तिथून check-out केल्यावर त्यांच्याच मदतीने बंदरापर्यंत water-taxi केली. बंदराचा एक भाग फक्त मोठ्या cruise ships साठी राखीव आहे. तिथे टॅक्सीने सोडले. मग एक-दीड ब्लॉक सर्व सामानासकट चालावे लागणार होते. २ मोठ्या बॅगा, ३ छोट्या बॅगा, अखंड गडबड/बड्बड करत चालणारी मुलगी यांना घेऊन Harbor वर Princess Dock शोधत निघालो. सुरुवातीला खूपच निर्मनुष्य वाटला तो भाग. टॅक्सीवाल्याने चुकीच्या ठिकाणी तर सोडले नाही ना असे वाटले. मग आमच्यासारखीच काही मंडळी प्रिंसेस, प्रिंसेस करत दिसली तेव्हा जरा बरे वाटले. शेवटी डॉक मिळाला, चेक-इन झाले, आणि आम्ही बोटीवर जायची वाट पाहात बसलो. आमच्या ग्रुपचा नंबर आला तसे आम्ही शिपवर चढलो. दाराशीच embarkment च फोटोसेशन होतं. आमचा हा सगळा पहिलाच अनुभव आणि त्यात भर उन्हात बॅगा खेचत आलो होतो त्यामुळे अर्थातच हे कोणत्या ग्रहावरून आलेत असे वाटण्याइतपत सुंदर फोटो आला. म्हणुन तो काही विकत घेतला नाही. पण मग बोटीवर जसजसे एक एक मजले करत आमच्या खोलीत आलो तेव्हा आनंदाने आणि आश्चर्याने फुलुन गेलो होतो. प्रचंड अवाढव्य प्रकरण होतं हे.
प्रचि २:
२००६ मधे बांधलेली १९ मजली बोट. बोट कसली एक प्रचंड मोठं हॉटेलच होतं ते!! प्रवासी ३५००, कर्मचारी १२०० होते. बोटीचं वजन ११३५६१ टन, एकंदरित ९०० फूट लांबी आणि १२० फूट रुंदी. हे सगळे आ़कडे अगदी तंतोतंत बरोबर नाहीत तर जवळपासचे आहेत. जगप्रसिद्ध टायटॅनिकच्या तुलनेत हे प्रकरण ३ पट मोठं होतं!!! आमची खोली ८ व्या मजल्यावर होती. ६ आणि ७ व्या मजल्यांवर muster stations होती म्हणजे आपत्कालीन व्यवस्था. emergency मधे इथे जमा होउन कसे लाईफ जॅकेट घालायचे, आपत्कालीन बोटींवर कसे जायचे यांचा एक सराव पहिल्याच दिवशी झाला. ८ ते १४ व्या मजल्यांवर मुख्यत्वेकरून प्रवाशांच्या खोल्याच होत्या. त्यात 5 मुख्य प्रकार - Suite, mini-suite, balcony, ocean-view, आणि interior. नावाप्रमाणेच त्यांच स्वरुप होतं. आम्ही ३ जण होतो त्यामुळे मिनी-सुट घेतला होता. त्याला एक बाल्कनीपण होती. छान प्रशस्त खोली होती आमची. छोटसं कपड्यांच कपाट, शेजारी वॉर्डरोब, टब-शॉवर असलेली बाथरुम, मास्टर-बेड, एक सोफा-कम्-बेड जो दिवसभर सोफा आणि रात्री मुलीसाठी बेड असायचा, २ टीव्ही, फोन, अशी सुसज्ज रुम होती. गॅलरीमधे दोन आरामखुर्च्या आणि एक टेबल होते.
आमच्या समुद्रातल्या घराचे हे काही फोटो.
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
आल्यावर आमच्यासाठी सुस्वागतमचे पत्र होते आणि मुलीसाठी एक मोठी फाइल ज्यामधे प्रत्येक दिवशी काय अॅक्टिव्हीटीज आहेत याची माहिती होती. वेडुबाई एकदम खुशीत होत्या. जेवण क्रुझच्या रक्कमेत included असतेच पण त्यातही दोन प्रकार असतात - Traditional dining and Anytime dining. Traditional dining मधे ठराविक वेळा ठराविक ठिकाणी जेवण घेता येते तर Anytime dining मधे नावाप्रमाणेच कधीही, कोठेही खाता येते अर्थातच Traditional च्या जागा सोडून. आणि याशिवाय specialty dining जागा होत्याच जिथे थोडा cover charge भरावा लागे आणि reservation/dress code सुध्दा होता. आम्ही Anytime dining च घेतले होते. लहान मुले असणार्यांसाठी हाच उत्तम पर्याय आहे. Traditional dining बर्यापैकी ज्यांच्या जेवणाच्या वेळा अगदी ठरलेल्या असतात किंवा पाळाव्याच लागतात आणि ज्यांना dress code आवडतो त्यांना बरंय. आम्ही २-३ वेळा नटून थटून गेलो होतो पण अगदी casual अवतारात जाऊन unlimited buffet वर आडवा हात मारण्यात जाम मजा असते. ती आम्ही बर्याचदा अनुभवली.
प्रचि ११:
बहुतेक सर्व restaurants ची सजावट अशाच प्रकारची होती.
बोटीवर ३ स्वीमिंग पूल होते. १२०० माणसांच सुंदर आणि भव्य Princess थिएटर होतं.
त्या थिएटरचे हे फोटो.
प्रचि १२:
प्रचि १३:
एक आउट्डोअर सिनेमागृह होतं - Movies under the stars असं नाव होतं त्याचं. तिथे आरामखुर्च्यांमधे पडून पॉपकॉर्न खात सिनेमा बघायला मजा यायची.
प्रचि १४:
प्रचि १५:
प्रचि १६:
एक भव्य Attrium होतं. तिथे छतावरचे दिवे, गोलाकार आकाराचे जिने आणि आसपास गजबजलेली दुकाने असं छान, चैतन्यमय वातावरण होतं. अतिशय कलात्मक पध्दतीने सजलेलं, नटलेलं हे विशाल जहाज पहिल्याच भेटीत मनाला भावून गेलं.
प्रचि १७:
या प्रचिमधे जहाज एखाद्या इमारतीसारखं दिसतंय ना!!
प्रत्येक दिवशी रात्री ८ पर्यन्त दारावर एक पत्रक दिले जाई. त्यात दुसरे दिवशीचा पूर्ण आराखडा असे. काय काय कार्यक्रम आहेत, सादरकर्ते कोण, वेळा काय, shopping, spa च्या काही स्पेशल ऑफर्स, कोणते सिनेमे किती वाजता, दुसर्या दिवशीच्या Port विषयी माहिती. अस छान माहितीपत्रक मिळालं की दिवसाची रुपरेषा ठरवत असु. जे दिवस आम्ही excursions बुक केली होती त्यांची तिकिटे मिळाली, त्यासाठी कुठे भेटायचं वगैरे माहिती पण व्यवस्थितपणे मिळत होती. excursions च्या वेळेनुसार 10 min आधी child-care चालु होई. मग मुलीला तिथे सोडून आम्ही आमच्या ग्रुपमधे जात असू. पूर्ण दिवसांची ट्रिप असेल तर दुपारचे जेवण Princess तर्फेच उत्तम प्रतीच्या restaurants मधे असे. गाईड सुध्दा सुविद्य आणि बोलके निवडलेले होते. त्यामुळे माहिती तर उत्तम मिळत होतीच पण ट्रिप हसतखेळत होत असल्यामुळे मैलोन्मैल उन्हात चालण्याचा त्रास जाणवत नव्हता. जवळपास प्रत्येक ठिकाणी भक्कम बंदर होते जे cruise ship साठी design केल आहे. पण Mykonos आणि Santorini ला टेंडर बोट लागणार होती. टेंडर बोट म्हणजे लहान ६०-७० माणसांची बोट जी खोल समुद्रात थांबलेल्या cruise ship वरून माणसांची ने-आण करते. मोठ्या बोटीवर खिडकीतून पाहिलं नाही तर समुद्र जाणवतही नाही पण या टेंडर बोटींवर पाय ठेवताक्षणी त्या अफाट दर्याची जाणीव होते. आणि छान घुसळत घुसळत आपण किनार्याला येतो. Santorini तरी बरं होतं कारण खूप वारा नव्हता, Mykonos मधे एक लहानसे वादळ नुकतेच झाले होते त्यामुळे प्रचंड वारा आणि उसळणार्या लाटा यांनी घाबरवलं होतं. पण बोटीच्या कप्तानाने फार कौशल्याने जहाज घट्ट रोवून ठेवलं होतं.
तुम्हाला सफरीच्या तिसर्याच दिवशी घडलेला थोडा भीतीदायक किस्सा सांगते. कदाचित नेहमीनेहमी समुद्र प्रवास करणार्यांसाठी तो भीतीदायक नसेलही, पण मला मात्र जाम घाबरवलं होतं या प्रसंगाने. सफरीच्या पहिल्याच दिवशी नियमाप्रमाणे आपत्कालीन सूचनांचा सराव झाला होता. त्यावेळी एक धोक्याची घंटा ऐकवून आमची मानसिक तयारी करून घेतली होती. तिसर्यादिवशी एक बोलक्या बाहुल्यांचा खेळ होता. त्यासाठी आम्ही दोघे ६-७ या मजल्यावर असलेल्या सभागृहात बसलो होतो. मुलगी १७ व्या मजल्यावर नव्या मैत्रिणीबरोबर Day-care मधे खेळत होती. शो मस्त चालू झाला. १५ मिनीटातच ती धोक्याची घंटा वाजली. कप्तानाने सांगितले की ८ व्या मजल्यावर emergency आहे. कर्मचार्यांनी तयार राहावे. प्रवाशांनी घाबरू नये. त्यांच्यासाठी काहीच फरक नाही. पण असं ऐकून शांत कसं राहणार? जहाज समुद्राच्या मध्यावर, आम्ही एकीकडे जहाजाच्या सुरुवातीच्या भागात ७व्या मजल्यावर आणि लहान मुलगी जहाजाच्या एकदम मागे असलेल्या १७ व्या मजल्यावरच्या child-care मधे आमच्यापासून लांब. जीवाचा थरकाप उडाला. नवरा नेहमीप्रमाणेच अतिशय शांत होता. शो चालूच होता. मला मात्र तिथे बसवेना. म्हणलं बास आता. चल, काय झालंय ते पाहू आणि मुलीला जवळ घेऊ. तेव्हढ्यात अजून सूचना, "८व्या मजल्यावर लहानसा इलेक्ट्रीक अपघात झालाय, धुरामुळे घाबरू नका, आम्ही परिस्थिती आटोक्यात आणायचा प्रयत्न करतोय." माझी तर भीतीने गाळणच उडाली. दोघे सरळ उठलो आणि जिन्याच्यादिशेने निघालो. आमच्यासारखेच २५-३० जण दिसले. मग पुढे अजून माणसे धावपळ करताना दिसली. लिफ्ट घ्यायची नाही हे जाणून सरळ जिन्याने १७ व्या मजल्यावर जायचे ठरवले. तर ७व्याच मजल्यावर कर्मचार्यांनी अडवले की इथून तुम्हाला जाता येणार नाही. ८ वा मजला बंद केला आहे. म्हणलं की माझी लहान मुलगी वर आहे. मग त्यांनी जहाजाच्या मध्यावर असलेल्या जिन्याने वर जाण्यास सांगितले. तो भाग ८व्या मजल्यावर खुला होता. धापा टाकत आम्ही १७ व्या मजल्यावर गेलो, मुलीला ताब्यात घेतलं आणि परत खाली आपत्कालीन व्यवस्थेप्रमाणे जमण्यासाठी आलो. तोवर मधून मधून सूचना येतच होत्या आणि परिस्थिती नियंत्रणात आहे हे समजत होतं. मी खूप घाबरले होते. माझ्यासारख्या अनेकजणी होत्या. छोट्या तान्ह्या बाळांना घेऊन आलेल्या काहीजणी होत्या, खूप सारे आजी-आजोबा होते, अनेक जणांना इंग्रजीमधून देण्यात येणार्या अपडेटस समजत नव्हत्या. पण १५ मिनिटातच सर्व काही सुरळित झाले आणि कप्तानाने सर्व खुलासा केला. मग इतर भाषांमधूनही अपडेट दिली. ८व्या मजल्यावर शॉर्टसर्कीट होऊन छोटी आग लागली होती, कदाचित केसांचा ड्रायर किंवा शेव्हर चुकीच्या प्लगमधे घातल्यामुळे असेल, काय माहित?? पण बोटिवरचे स्प्रिंकलर्स चालू झाले आणि आग विझून धूर झाला. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला. आवश्यक त्या सगळ्या टिमस जमल्या होत्याच. नंतर हे सर्व समजले आणि हायसे पण वाटले. पण घाबरून १६-१७ मजले चढताना जाणवणारा थरकाप भयानक होता. एक सुरक्षिततेची भावना पण या प्रसंगाने दिली की आपण एकटे नाही आहोत. ही सर्व Crew मंडळी धीराची आणि जाणकार आहेत. बिन्धास्त राहू शकतो इथे. नंतर काही दिवस त्या आगवाल्या रुमजवळून जाताना प्रचंड घाण वास यायचा. पण तिथल्या लोकांची सोय लगेचच चांगल्या ठिकाणी त्यांनी केली. असो.
तर अशा गमतीजमती घडत आमचा प्रवास चालू होता. आता Ports चे काही फोटो टाकते पण सविस्तर माहिती तुम्हाला Google/wiki वर मिळेलच.
कोणत्याही बंदरातून निघताना एक छोटी पण दमदार बोट हे मोठं जहाज ओढत असे. त्याला tug-boat म्हणतात.
प्रचि १८:
Venice मधून निघताना त्या टग बोटीकडे पाहताना अस्मादिक.
त्यानंतर असं सुंदर Venice दर्शन झालं.
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
दुसर्यादिवशी Dubrovnik-Croatia ला आलो. नितांत सुंदर जागा आहे ही.
प्रचि २२:
तिथल्या टूरमधे आम्हाला स्थानिक लोकांनी सादर केलेली लोकनृत्येही पाहायला मिळाली.
प्रचि २३:
प्रचि २४:
डोक्यावर रणरणार्या उन्हाचा या कलाकारांनी विसर पाडला.
दिवसभर भटकून परत आल्यावर बोटीचे कर्मचारी दारातच थंड पाण्यात भिजलेले टॉवेल देऊन स्वागत करत असत. काय मस्त गार गार वाटायचं!!
या पुढच्या प्रचि मधे ते दिसतायत बघा.
प्रचि २५:
आम्ही Dubrovnik हून निघून Corfu-Greece च्या दिशेने लागलो. मग ही ग्रीक बेटे दर्शन देऊ लागली.
प्रचि २६:
प्रचि २७:
हे चित्र तर हमखास दररोजच थोड्याफार फरकाने दिसायचे.
प्रचि २८:
प्रचि २९:
एकदा ही दिसली मग आम्ही मुलीला उगीचच बघ, Pirates आले म्हणून भीती घातली. त्यासाठी पण मुलगी खूशच होती.
वाटेतला एक सुंदर किल्ला.
प्रचि ३०:
प्रचि ३१:
Corfu हून आम्ही Katakolon किंवा Olympia आलो. हे Olympics खेळांचे उगमस्थान आहे. मुख्य खेळपट्टी बंदराहून लांब असल्यामुळे थोडी जास्त दगदग होणार होती. आधीच्या दिवसांचा शिणवटा आणि प्रचंड उकाडा यामुळे आम्ही टूर रद्द करून सरळ निवांत राहायचे ठरवले. गावातून एक छोटा फेरफटका मारून आलो इतकच.
प्रचि ३२:
प्रचि ३३:
प्रचि ३४:
प्रचि ३५:
मग आम्ही निघालो ग्रीसची राजधानी अथेन्सला. कोणत्याही प्रमुख शहरासारखंच हे गजबजलेलं होतं. सगळीकडे पर्यटकांची नुसती गर्दी होती. आणि जोडीला नेहमीचाच उकाडा. दिवसभर रणरणून जीव कावला. त्यात तिथले मुख्य आकर्षण असलेले पार्थेनान दुरुस्तीसाठी बंद होते. म्हणजे आम्ही ते पाहिले पण समोर सगळी मशिन्स, क्रेन्स होत्या त्यामुळे फोटो देत नाही.
प्रचि ३६:
प्रचि ३७:
प्रचि ३८:
प्रचि ३९:
प्रचि ४०:
अथेन्सहून मीकोनोजला जातानाच कप्तानाने त्या छोट्या वादळाची कल्पना दिली, आणि जहाजाचा वेग कमी केला. ते वादळ निघून गेल्यावरच बोट मीकोनोज ला पोहोचेल अशा बेताने प्रवास केला.
प्रचि ४१:
हा पेलिकन आलाच वेलकम करायला.
प्रचि ४२:
प्रचि ४३:
खूप तहानलेला होता बिचारा!!
प्रचि ४४:
किती विविध छटा दिसत होत्या पाण्याच्या आणि खूप वारा!!
प्रचि ४५:
प्रचि ४६:
गावातले सगळे रस्ते असेच लहान लहान. रमत गमत २ तासांत गाव भटकून झालं.
प्रचि ४७:
मिकोनोजच्या पवनचक्क्या सगळीकडे दिसत होत्या.
प्रचि ४८:
घरांचा निळा आणि पांढरा रंग डोळ्यांना गारवा देत होता.
प्रचि ४९:
या बोगनवेलीने भारताची आठवण आलीच.
आता इथून पुढे टर्कीच्या हद्दीत शिरलो आणि Ephasus ला आलो. इथे बरेच जुने अवशेष उत्खननात सापडले आहेत. ग्रीक आणि तुर्की साम्राज्य फार पूर्वी एकच होतं त्यामुळे एकमेकांमधे अतूट असा बंध आहे.
प्रचि ५०:
हे काय आहे ते ओळखलं का? वैद्यकीय क्षेत्रात सध्या वापरात असलेले हे चिन्ह पण याचा उगम प्राचीन ग्रीक संस्कृतीत होता. आणि इथे कोणे एके काळी दवाखाना होता याचा हा पुरावा पण आहे.
प्रचि ५१:
प्रचि ५२:
जुने थिएटर.
प्रचि ५३:
हे जुने अवशेष किती प्रेमाने आणि आदराने जपले आहेत युरोपमधे. आपल्याकडचा विचारच करू नये.
पुढचा टप्पा होता सँटोरिनी. अतिसुंदर आणि निसर्गाने लयलूट केलेली जागा. आसपास एवढा समुद्र असला तरी मुख्य बेटावर गोड्या पाण्याचा स्त्रोत नाही. अजूनही आजुबाजूच्या गावातून टँकरने पाणी येते. आणि तुटपुंज्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन केले जाते. एवढी ओरड असूनही पर्यटन उद्योग जोरात आहे.
प्रचि ५४:
प्रचि ५५:
प्रचि ५६:
प्रचि ५७:
प्रचि ५८:
प्रचि ५९:
प्रचि ६०:
प्रचि ६१:
प्रचि ६२:
हजारो डॉलर प्रतिदिन रेट असलेले एक हॉटेल आहे हे. स्विमींग पूल पाहिला का?
प्रचि ६३:
इथे राणी मुखर्जी-शाहरुखच्या कोणत्या तरी सिनेमाचे शूटिंग झाले होते म्हणे.
आता परतीचा दौरा सुरु झाला. पुन्हा इटलीला आलो आणि नेपल्सला थांबलो.
प्रचि ६४:
अमाल्फि किनारा देखील खूप रमणीय होता.
प्रचि ६५:
प्रचि ६६:
प्रचि ६७:
प्रचि ६८:
या लेखनाचा मुख्य उद्देश क्रुझची माहिती आहे. त्यानुसार तिथल्या जेवणांबद्दल सविस्तर लिहिलेच पाहिजे. तिथे अक्षरशः तिनत्रिकाळ लोक खाताना दिसायचे. वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे प्रकार होते. ५-कोर्स जेवण सकाळ संध्याकाळ गरमागरम मिळत असे. भारतीय पध्दतीचे अन्न खूपवेळा नाही मिळालं पण इटालियन, ग्रीक पध्दतीच्या अतिशय स्वादिष्ट नजाकती खायला मिळाल्या. नेहमीच अमेरिकन जेवण तर होतंच. आम्ही तिघेही पट्टीचे मांसाहारी आहोत त्यामुळे काही अडत नव्हतं. पण शाकाहारी पदार्थ पण बरेच होते. ऊन प्रचंड असल्याने आम्ही भरपूर फळे खात होतो, ज्युस पित होतो. एकदा दोघे वाइन टेस्टींगच्या सेमिनारला पण जाऊन आलो. तिथे पिण्यापेक्षा वेगवेगळी चीजेस खाण्यातच मला मजा आली. खूप खाऊन नंतर व्यायामासाठी जिम होतंच.
प्रचि ६९: प्रिंसेसवरून साभार.
तिथे योगा, झुंबा, बॉक्सिंग वगैरेचे क्लासेस होते. नेहमीची मशिन्स तर होतीच. आम्ही रोज एखाद्या क्लासला जायचो. एक सुंदर स्पा पण होती. वाचनालय पण छोटेखानी आणि छान होत.
बोटीचे व्यवस्थापन एक क्लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे हे समजत होतंच. पण सगळा कर्मचारीवर्ग अतिशय हसतमुख आणि कष्टाळू होता. बोटीवर behind-the-scenes ची एक टूर होती ज्यात हे व्यवस्थापन कसे केले जाते हे पहायला मिळाले असते. पण माणशी १५० डॉलर तिकीट आणि ४ तासांचा वेळ हे गणित बसेना मग विचार सोडून दिला. तरी शेवटच्या दिवशी फक्त एका भटारखान्याची सहल आणि प्रमुख शेफ आणि Maitre D'Hotel (प्रमुख होस्ट??) यांची भेट असा एक कार्यक्रम होता. तो मी आवर्जून पाहिला. शेफने काही रेसिपी दाखवल्या आणि मग जमलेल्या सर्व प्रवाशांना भेटून हस्तांदोलन केले. या टूरची ही प्रचि.
प्रचि ७०:
प्रचि ७१:
प्रचि ७२:
प्रचि ७३:
प्रचि ७४:
या कार्यक्रमात ऐकलेले काही नंबर्स असे होते - २५० टन अन्न बोटीवर भरलं होतं. याशिवार पिण्याच्या पाण्याचा साठा वेगळाच होता. इथला डिप फ्रिझर (फक्त मांसासाठी) अॅव्हरेज अमेरिकन घरापेक्षा मोठा होता. साधारण २७० स्वयंपाकी (प्रमुखापासून असिस्टंट बुचरपर्यंत) आणि २५० वाढपी हा अखंड चालणारा अन्नयज्ञ सांभाळत होते. त्यात सर्वात जास्त फिलिपिनो होते, त्या खालोखाल भारतीय, मग इटालियन, आणि मग पूर्व युरोपियन होते. आम्हाला खूप भारतीय स्टाफ भेटत होता. त्यात कितीतरी मराठी, गोव्याचे होते. त्यामुळेच या नंबरांचे कुतुहल होते.
तर अशा उत्तमरितीने सांभाळलेल्या समुद्रसुंदरीबरोबर आमचे १२-१३ दिवस कसे गेले ते समजलंच नाही. शेवटच्या दिवशी disembarkment process आणि परतीची trasport process सुध्दा व्यवस्थित होती. बोट सोडताना घर सोडतानाचे भाव मनात होते. पण मन तृप्त झालं होतं. रोमला ट्रेव्ही कारंज्यात मनोभावे नाणे टाकले होतेच तेव्हा परत येऊ आणि परत या सुंदरीला पाहू असा विचार ठरवूनच आम्ही परतलो.
पुढे काय झाल ?
पुढे काय झाल ?
oops. हे लिखाण अपूर्ण आहे.
oops. हे लिखाण अपूर्ण आहे. असं कसं प्रकाशित झालं??
मदत हवीय.
अॅडमिन प्लिज मदत करता का?
अॅडमिन प्लिज मदत करता का?
धनश्री 'अप्रकाशित' सुविधा
धनश्री 'अप्रकाशित' सुविधा सध्या बंद आहे.
धन्यवाद नंद्या. आता असंच थोडं
धन्यवाद नंद्या. आता असंच थोडं थोडं करत लिहिणार आहे.
कदाचित लिखाण वर्ड मधे सेव्ह करून ठेवेन आणि मग सगळं झालं की प्रकाशित करावं हाच मार्ग दिसतोय.
धनश्री लवकर लिहा बर का. छान
धनश्री लवकर लिहा बर का. छान वाटतंय वाचायला
वॉव धनश्री, तू कधी आलीस
वॉव धनश्री, तू कधी आलीस मायबोलीवर!? ( मला ओळखलं नसशील तर प्रोफाइल बघ. )
लिही पुढचे लवकर! मजा येईल वाचायला!!
अरे वा, वन्सबाई नमस्ते. हो मी
अरे वा, वन्सबाई नमस्ते. हो मी तशी नवी माबोकर आहे गं. आता मला गाईड कर लेखनासाठी.
मंडळी, वेळ मिळेल तसे लिहीत आहे. कृपया समजून घ्या. खरंतर हे लेखन पूर्ण स्वरूपात प्रकाशित करायची इच्छा होती. पण हे ही माझ्यासाठी खूप आहे. मी फोटोपण टाकणार आहे पण या धाग्याला ३-४ दिवसांनीच भेट द्या. प्लीज.
मस्त सुरवात. लवकर लिहा.
मस्त सुरवात. लवकर लिहा. होतकरू तुमच्या लेखाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.
वा सुंदर सफर सुरू आहे. येऊ
वा सुंदर सफर सुरू आहे. येऊ दे पटापट..
Cruises बद्दल खूपच कुतूहल होतं. तुम्ही केलेल्या सुंदर वर्णनाने त्यात आणखीनच भर पडतेयं..
छान लिहीताय.
छान लिहीताय.
सही लिहितीयेस. क्रुझ भन्नाटच
सही लिहितीयेस. क्रुझ भन्नाटच दिस्तेय.. मध्ये मी इंटरेस्टींग प्लेसेसचे फोटो पाहात होते, तेव्हा ग्रीसचे समुद्रकिनारे प्रचंड सुंदर प्रकरण वाटले. फोटो नक्की व भरपुर टाक!
( तुला आणि गाइड मी करायचे? कैतरी काय. सूर्यासमोर काजवा वगैरे.. )
पुढच्या भागाच्या
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
असं वाटतंय की प्रचि फारच मोठी
असं वाटतंय की प्रचि फारच मोठी झालीयेत. वेळ मिळाला तर लांबी-रुंदी जरा कमी करेन पण हे लिहून खूप छान वाटतंय. धागा सार्वजनिक केला आहे तरी नवीन लेखन भागात का दिसत नाही कुणास ठाऊक!!
सुंदर प्रचि आणि
सुंदर प्रचि आणि वर्णन!
आवडले!
इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद!
सुंदर फोटो. अगदी उद्या जावंसं
सुंदर फोटो. अगदी उद्या जावंसं वाटायला लागलं. पण सोमवार पर्यंत थांबावं लागणार
फार सही फोटोज आहेत !! तुम्ही
फार सही फोटोज आहेत !! तुम्ही सगळ्यांनी, स्पेशली माझ्या भाच्चीबाईने प्रचंड धमाल केली असणार ते कळतेच आहे! अमेझिंग!
(नवर्याला दाखवावं आता हे सगळं! )
लिहीत राहा अजुन!
छान वर्णन आणि प्रचि. आवडलं.
छान वर्णन आणि प्रचि. आवडलं. पुढच्या सफरींचे वृत्तांतही जरूर लिहा.
सुंदर फोटो आणि वर्णन !
सुंदर फोटो आणि वर्णन !
मस्त वर्णन आणी फोटोही. फोटो
मस्त वर्णन आणी फोटोही. फोटो खूप छान आले आहेत. मोठेच राहुदेत.
बस्के...नवर्याला दाखवावं आता
बस्के...नवर्याला दाखवावं आता हे सगळं! ++++१००००
मी पण असाच विचार करत आहे......
खुप सुंदर फोटो आहेत....मस्त सफर झाली तुझ्यामुळे............:)
व्वाव ! समुद्रावरचम तुमचं घर
व्वाव !
समुद्रावरचम तुमचं घर सहीच ! प्रचि ४८ मधे निळ्या पांढ-या घरांच्या पार्श्वभूमीवर तुमचं क्रुझ प्रचंड वाटतंय. ज्या स्थळांना भेटी दिल्यात तिथली प्रचि खूप सुंदर टिपलीत. ही सर्व स्थळं प्रसिद्ध आहेतच, पण प्रत्येक प्रचिखाली त्यांचं नाव, ठिकाण आणि तुमची कॉमेण्ट असती तर आणखी मजा आली असती.
एकंदरीत प्रवासवर्णन आपल्याला तर आवडलं ब्वॉ !
मस्त वर्णन, झकास फोटो.
मस्त वर्णन, झकास फोटो.
मस्तच फोटो ! वर्णनही छानच !
मस्तच फोटो ! वर्णनही छानच !
आहाहा... फोटो मोठे असल्याने
आहाहा... फोटो मोठे असल्याने अजूनच आवडले..... ब्यूटिफुल..
सुंदर सुंदर सुंदर... मस्त प्रवास..
सगळ्याच फोटोना
सगळ्याच फोटोना
"ओ..................... माय................................... गॉड......................"
किंवा
"आ........ई....................श............प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प.............त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त"
हे एकच एक्सप्रेशन योग्य आहे.
क्रुझ लक्झरीयस आहे. स्पेशल ट्रीटमेण्ट हॉलिडे अगदी.
ड्रीम हॉलिडे म्हणल तरी हरकत नाही...
मी फोटो बघताना नंबर लक्षात
मी फोटो बघताना नंबर लक्षात ठेवायला सुरवात केली हा स्पेशल म्हणून,,
नंतर नंतर किती लक्षात ठेवणार म्हणुन सोडुन दिल
राणी आणि शारुखच्या तो "चलते चलते" असेल बहुतेक.
अमेझिंग काय फोटो काढलेत, एकदम
अमेझिंग काय फोटो काढलेत, एकदम मस्तच, झक्कास, सॉलीड..........
कोणता कॅमेरा वापरलाय, मॉडेल नंबर काय आहे?
फोटोचा आकार असाच राहु दे, तुझे फोटो बघुनच माझी देखील समुद्र सफर घडली बघ
खरच खुप छान आलेत फोटो.
खरच खुप छान आलेत फोटो.
ड्रीम ट्रीप..
किरण ४८व्या प्रचि बद्दल अगदी
किरण ४८व्या प्रचि बद्दल अगदी अगदी! सगळ्यात आवडलाय तो फोटो मला..
Pages