मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.
वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.
वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.
वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.
-----
गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."
"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.
"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"
"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."
बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"
कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"
कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.
"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.
इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.
तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.
रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.
स्वप्ना ही ही हे ही ह्ओ हो हो
स्वप्ना
ही ही हे ही ह्ओ हो हो
लय मस्त...
लय मस्त...
शैलजा, स्वप्नवीणा, रेव्यु,
शैलजा, स्वप्नवीणा, रेव्यु, अखी धन्स
'गैर' म्हणजे काय रे
'गैर' म्हणजे काय रे भाऊ?
वि.सू. - पिक्चर (अजूनही) पाहिला नसेल आणि (अजूनही) पहायची इच्छा असेल तर पुढील पोस्ट वाचू नका. रहस्यभेद आहे.
खरं तर मला हा पिक्चर पहायची काहीच गरज नव्हती. "अगदीच वेळ जात नसेल तर पहा" हा मौलिक सल्ला मला मिळालेला होता. पण माणसाचं कसं असतं ना, अमुक एक गोष्ट करू नको म्हटलं की करावीशी वाटते. त्यातून माझा स्वभाव घरच्यांचा भाषेत सांगायचं तर ’खड्डा आहे असं सांगितलं तर ऐकणार नाही. खड्ड्यात जाऊन पडली की मग मानणार की खरंच खड्डा होता" असा एकूण. त्यातून विकेन्डला उरकायची म्हणून ठेवलेली अनेक कामं रविवार संध्याकाळ आली तरी पेन्डींग होती. म्हटलं ती करता करता पाहू पिक्चर. पिक्चर बघताना कुठे डोकं लावायला लागतंय? त्यामुळे हा पिक्चर तुकड्यातुकड्यात पाहिला. थॅन्क गॉड फॉर स्मॉल मर्सिज. अर्थात त्यामुळे स्टोरी सलगप्णे नीट कळलीच असं नाही. थोडी गडबड होऊ शकते.
पिक्चरच्या सुरुवातीलाच २ खून पडले. सुरुवात वेगळी वाटली. काम थोडं बाजूला ठेवलं. मग एक प्रेस कॉन्फ़रन्स. त्यात एक कोणी बडा बिझनेसमन समीर श्रॉफ़ (संदीप कुलकर्णी) बोलत होता. काम बाजूला ठेवल्याने माझं डोकं चालू लागलं. श्रॉफ़ नावाचा माणूस चक्क अस्खलित मराठीत बोलत होता. म्हटलं पत्रकार परिषदेत म्हणून बोलत असेल तर घरी पण आईशी मराठीत बोलला. मन कसं भरून आलं हो. खरं सांगायचं तर ती बाई समीरची आई आहे हे त्याने तिला 'आई' म्हणेपर्यंत मला कळलंच नाही. काय आहे? ती ट्रेडमार्क पांढरी बट किंवा पांढरी साडी नव्हती ना? मुलाच्या मानाने आईच तरुण दिसत होती.
मग त्या श्रॉफ़च्या शेजारी २ पार्टनर्स आले. त्यातली एक छान दिसणारी मुलगी. बिन्गो. ह्या दोघांचं लफडं असणार. लगेच पत्रकारांपैकी कोणीतरी (अरे, हा तर आपला माप्रिप्रिकमधला जय!) समीरला लग्नाबाबत विचारतं. समीर आपलं एक अफ़ेअर चालू असल्याचं सांगतो. ती मुलगी कपाळावर आठ्या घालते. पत्रकार मसाला मिळणार म्हणून लेखण्या सरसावतात. काय राव! आम्ही काय काल जन्माला आलोय होय? ’आता हा आप्लं आपल्या कामाशी अफ़ेअर असल्याचं सांगणार". माझ्या मनात हे वाक्य पूर्ण होतंय तोच पडद्यावर समीर तेच बोलतो. श्रीमंत व्यक्तीच्या कुठल्याही पीजेवर पब्लिक हसतं तसे सगळे हसतात. मग त्याला एक फ़ोन येतो. बोलून झाल्यावर तो लगेच आपण लग्न करणार असल्याचं सगळ्यांसमोर जाहिर करतो. हायला, ही तर त्या बॉबी देओल, अक्षय खन्ना, अमिशा वाल्या 'हमराज'ची स्टोरी. मी खूष.
समीरचं लग्न होतं. आणि मग समीरसारखाच दिसणारा एक माणूस आधी त्याच्या ओळखीच्या एका 'बावा' बाईला, मग त्याच्या एका एम्प्लॉयीला दिसतो पण तो ह्यांना ओळखत नाही. त्याचे मॅनेरिझम्स पण समीरपेक्षा वेगळे. अरे, विसरलेच! समीरचा तो एम्प्लॉयी 'समीरसर कुठे आहेत?" म्हणून क्लायन्ट मिटींगमध्ये येतो तेव्हा त्याचा सहकारी लॅपटॉपवर मी काम पूर्ण करतो असं म्हणतो पण कॅमेराला फेसिंग असलेला त्या लॅपटॉपचा स्क्रीन आपणा प्रेक्षकांना मात्र चांगदेवाच्या पाटीसारखा कोरा दिसतो. काय हे राजवाडे! निदान एक वर्ड डॉक किंवा एक्सेल तरी ओपन करून ठेवायची. शोनाहो....
मग एके दिवशी हा माणूस समीरच्या बायकोला, नेहाला दिसतो. ती समीर समजून त्याचे फोटो काढते. तो हिला ओळख देत नाही. इथे आपण विचार करतो - ही 'हमराज'ची स्टोरी तशीच्या तशी नाहिये. पण समीरला बायकोला वेडंही करायचं नसणार कारण नाहीतर तो इतर लोकांना दिसला नसता. समीरला स्प्लिट पर्सनॅलिटी असावी वगैरे येडचाप विचार आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न होतो. त्या फोटोचं नंतर काय होतं देवालाच ठाउक.
मध्यंतरी समीर आणि नेहाने कुलदैवताच्या दर्शनाला कधी जावं ह्यावर काश्मीरबद्दल भारत-पाकिस्तानात होणार नाही एव्हढी चर्चा झालेली असते. शेवटी ह्याची पंचवार्षिक योजना होते का काय असं आपल्याला वाटतं. मग एके दिवशी पुण्याला मिटिंगला गेलेला समीर अचानक ती कॅन्सल झाली म्हणून घरी येतो. त्याच्या सवयी त्याच्या आईला आणि बायकोला संशयास्पद वाटतात. पण तो त्यांना पटेल असं स्पष्टीकरण देतो. कुठलीही बाई ती मिटिंग कॅन्सल झाली का असं ऑफिसात फोन करून विचारेल की नाही? पण तसं काही होत नाही कारण स्टोरी आपण प्रेक्ष्कांनी लिहिलेली नसते. त्या पापाचं फळ म्हणून आपल्याला नेहा आणि समीर ह्यांचं बेडरूममधलं गाणं पहावं लागतं. इथे मला टीव्हीला रिमोट असल्याबद्दल प्रचंड आनंद झाला. संदीप कुलकर्णीला जिथे प्रत्येक शॉटमध्ये हिरो म्हणून पहाताना प्रचंड त्रास होत होता तिथे बेडरूममधे गाणं म्हणताना पाहणं केवळ अशक्य (कोणी त्याचे भक्त असतील तर मला माफ करा प्लीज). त्यावेळी बाकीच्या सगळ्या चॅनेल्सवर "अर्धा चेहेरा शाहरूखचा आणि अर्धा आमिर खानचा' असं चित्र दाखवून हे कोण आहेत असे विचारणारे ते प्रोग्रॅम (१२ नंतर लागतात ते) दाखवले असते ना तर तेसुध्दा मी आनंदाने पाहिले असते
गाणं संपलं आहे ह्याची खात्री होताच मी पुन्हा चॅनेल बदललं. समीर बायकोला द्यायला एक चिठ्ठी आईकडे देऊन जातो त्यावरून तो जो कोणी होता तो समीर नव्हता एव्हढं तिला कळतं. तिला शॉक वगैरे बसतो. मग मात्र तिचे वडिल समीरच्या विरोधाला न जुमानता पोलिसांना बोलावतात. एन्टर इन्स्पेक्टर अभिजीत सरदेसाई उर्फ अंकुश चौधरी. तुम्हाला खरं सांगू? मला ना पिक्चर बघताना सारखं वाटत होतं की ह्या पिक्चरात संकु च्या ऐवजी सोमणांचा मिलिंद आणि अंकुशच्या जागी धर्माधिकारींचा समीर एकदम झक्कास शोभून दिसले असते. ** एक उसासा **
तर, इन्स्पेक्टर अभिजीत सरदेसाई नेहा सोडून सगळ्यांची मुलाखत घेतात कारण समीरने नेहाला भेटायची परवानगी नाकारलेली असते. मग नेहाला एक फोन येतो. त्यात 'तो' तिला भेटायला बोलावतो. मग इन्स्पेक्टर अभिजीत आणि नेहा एका सुनसान इमारतीत जातात. तिथे नेहाबाई इतक्या जोरजोरात ओरडतात की मला वाटलं आमच्या घराच्या दारखिडक्यांच्या काचा फुटणार. अरे, काय ही ओव्हरअॅक्टींग? मग कुठूनशी एक गाडी येते. प्रखर हेडलाईटस्मुळे आत कोण आहे ते कळत नाही. पण अभिजीतला पाहून ती गाडी मागे जाते. अभिजीत समीरला फोन लावतो तेव्हा समीर फोनवर 'व्हॉट्स हॅपनिंग" असं ओरडत रहातो. अभिजीत फोनवर त्याचा आवाज ऐकून चमकतो. हा कसला इन्स्पेक्टर? गाडीत कोण आहे ते दिसलं नाही. समीरच नसेल कशावरून? अर्थात हा प्रश्न फक्त आपल्याला पडतो.
मग 'त्याला' ट्रॅप करायला एक प्रोग्रॅम अरेन्ज केला जातो. तिथे 'तो' येऊन सर्वांसमक्ष स्टेजवर नाचून जातो पण इन्स्पेक्टरच्या हाती लागत नाही. चिडलेला इन्स्पेक्टर एकच माणूस एकाच वेळी २ ठिकाणी कसा असू शकतो हे समीरची पार्टनर असलेल्या त्या मुलीवर खोटा हल्ला करून दाखवतो.
जाऊ देत. आता ह्यापुढचं रामायण सांगत नाही. पण शेवटचा रहस्यभेद (!) काही पटला नाही. ३-३ वेळा प्लॅस्टिक सर्जरी? कैच्या कै. असं केलं तर चेहेरा मायकल जॅक्सनसारखा नाही दिसणार? २ इन्स्पेक्टर्स असं एखाद्या अॅड कंपनीत काम करतात? काही पूर्वानुभव नसताना? त्यांना कोणीही ओळखत नाही? आणि ती Ferrari वगैरे कोणाच्या पैशाने? Our tax money at work?
हे म्हणजे हिंदी पिक्चरची स्टोरी तर घ्यायची पण त्याला ट्विस्ट पण हवा म्हणजे हवा ह्या विचारातून रचलेलं कथानक वाटलं. माझ्या मनात रहस्यभेद असा होता - समीरलाच ते २ खून करायचे होते पण कोणी आपल्याला ते करताना पाहिलंच तर तो आळ दुसर्यावर जावा ह्यासाठी त्याने आपल्यासारख्या दिसणार्या दुसर्या माणसाचा आभास निर्माण केला होता.
संवादांबद्दल काय सांगावं? समीरची आई अष्टविनायकाला जाऊन नातू मागायच्या गोष्टी करते. ओ आजी, सगळ्यांनीच नातू मागितले तर तुम्ही काही वर्षांनी आपल्या नातवाचं लग्न दुसर्या एखाद्या आजीच्या नवसाने झालेल्या नातवाशी लावणार काय? आणि नातू असे देवाला नवस करून होतात? ऐकावं ते नवलच! एके ठिकाणी समीरसाहेब 'व्हॉट सावली?' असं धेडगुजरी मराठीत विचारतात. मग पुढे रहस्यभेदाच्या वेळी 'कल्चरल सून' पाहिजे होती असा उल्लेख आहे. 'कल्चरल' प्रोग्रॅम असतात हो, माणसं 'कल्चर्ड' असतात!
असो. पूर्ण पिक्चरमधली एक काय ती 'Ferrari' च लक्षात राहिली. आणि हो, 'गैर' ह्या शब्दाचा हिंदीत अर्थ 'परका/अनोळखी' पण मराठीत 'चुकीचा' (गैरसमज वगैरे) असा होतो. मला वाटतं मराठीतलाच अर्थ ह्या पिक्चरला जास्त लागू होतो कारण पोस्टरवरून पिक्चर पाहण्यालायक असेल हा आप्ला समज शेवटी 'गैर' समजच ठरतो.
त्या फोटोचं नंतर काय होतं
त्या फोटोचं नंतर काय होतं देवालाच ठाउक.
>>>
अगदी अगदी स्वप्ना. मलाही हाच प्रश्न पडला होता. नेहा पुरावा म्हणून संकु चे तिने काढलेले फोटो का लोकांना दाख्वत नाही?
पाहिला हो sssssssssssssss
पाहिला हो sssssssssssssss "गैर"
मग पुढे रहस्यभेदाच्या वेळी
मग पुढे रहस्यभेदाच्या वेळी 'कल्चरल सून' पाहिजे होती असा उल्लेख आहे. >>
बापरे, तुकड्यांत तुकड्यांत मूव्ही पाहिला म्हणतेस तरी असे बारीक सारीक तपशील तुझ्या मेंदूत रजिस्टर होतात. धन्य आहेस.
३-३ वेळा प्लॅस्टिक सर्जरी? कैच्या कै. असं केलं तर चेहेरा मायकल जॅक्सनसारखा नाही दिसणार? >> मलाही असाच प्रश्न पडला.
२ इन्स्पेक्टर्स असं एखाद्या अॅड कंपनीत काम करतात? काही पूर्वानुभव नसताना? त्यांना कोणीही ओळखत नाही? आणि ती Ferrari वगैरे कोणाच्या पैशाने? Our tax money at work? >>> असे प्रश्न आपल्या सारख्या सामान्य जनतेलाच पडतात. मूव्हीज मध्ये असे अ. आणि अ. बरेच काय काय असते.
आता समीर आणि नेहा लग्नही करतात असं दाखवलंय त्यात. मग ते खोटं खोटं असतं की खरं खरं? खरं असेल तर रेजिस्टर पण करावे लागते लग्न! आपल्याकडचे पोलिस आपली ठरलेली बायको सोडून सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय (इति सचिन खेडेकर - सिनेमाच्या शेवटी) असे करायला तयार होतात??? बिचार्या उदय टिकेकर चा पैसा, कॉन्टॅक्ट्स, वेळ सगळंच उपयोग करून वाया घालवतात. उद्या त्याने सरकार विरुद्ध केस ठोकली तर??
>>तुकड्यांत तुकड्यांत मूव्ही
>>तुकड्यांत तुकड्यांत मूव्ही पाहिला म्हणतेस तरी असे बारीक सारीक तपशील तुझ्या मेंदूत रजिस्टर होतात.
चुका काढायलाच बसले होते ना?
>>सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय (इति सचिन खेडेकर - सिनेमाच्या शेवटी)
तरी मी म्हणते शेवटी क्रेडिटस मध्ये सचिन खेडेकरचं नाव का आलंय म्हणून.
नेहा, अभिजीत आणि तो तिसरा
नेहा, अभिजीत आणि तो तिसरा पार्टनर हे इतके सराईत आणि मोठे गुन्हेगार असतात का की त्यांना पकडण्यासाठी १ वर्षभर उदय टिकेकर च्या कंपनीत पार्टनर्शिप वगैरे (ते ही खोट्या नावाने) करून समीर श्रॉफ नावाच्या बिसिनेसमन ची हवा निर्माण करतात. इतका पैसा पोलिस खाते प्रोव्हाईड करते का?
शिवाय जर का ते इतके सराईत आणि हुशार गुन्हेगार असतात तर समीरच्या डुप्लिकेटने नेहाला लिहिलेल्या पत्रावरील अक्षर नमुना समीरच्या अक्षराबरोबर ताडून बघण्याचा साधा सोपा उपाय त्यांना सुचत नाही?
इतके तर आप्ल्या सारख्या सामान्य जनतेलाही समजते.
शिवाय नेहाचे फिंगर प्रिंट्स आधीच्या २ खुनां च्या फिंगर प्रिंट्स बरोबर मॅच झालेले असताना सगळा सिनेमा त्यांना रेड हँड पकडण्याचा खेळ करण्यासाठी कशाला घालवला? आधीच त्यांना फिंगर प्रिंट्स जुळल्याच्या पुराव्यावरून ताब्यात घेता येत नव्हते का? म्हणे, अंकुश चौधरी हा मिसिंग लिंक होता. तो कोण आहे हे समोर येण्यासाठी हा सगळा खटाटोप. पण तो समोर आला तरी तिथेच ता तिघांना पकडून सिनेमा संपत नाही. शेवटचे गाणे प्रेक्षंकांच्या माथी मारायला सिनेमा तिथपर्यंत कसातरी रेटला पाहिजेच ना!
बघ ना. म्हणजे स्टोरी बेतायची
बघ ना. म्हणजे स्टोरी बेतायची हिंदी सिनेमावर. पण त्याला ट्विस्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. ह्या अट्टाहासापायी हे कथानक रचलंय. म्हणजे उद्या लोकांनी म्हणायला नको 'कैच्या कै. आम्हाला शेवट आधीच कळला होता".
मी काल गैर पाहिला... का
मी काल गैर पाहिला... का पाहिला :राग:.... याची काही कारणे:-
१. ३ वेळा प्लॅस्टिक सर्जरी करुनही छान दिसणार्या अमृता खानविलकरचे किंचाळणे व तिची अॅक्टिंग मला खूप आवडते.
२. जगात आत्तापर्यंत कोणीच ठेवली नसेल अशी संकु ची दाढी मला आवडते.
३. मला हेलिकॉप्टर आवडते.
४. अमिता खोपकर पोलिस कॉन्स्टेबल म्हणून खूप छान वाटते.
५. संकु चा ड्यान्स मला आवडतो.
सतीश राजवाडे-संकु-अंचौ-अखा.... म्हणजे काहीतरी भारी बघायला मिळेल अशी आशा ठेवली की असं होतं. पुन्हा
तरी बरं ऑफिसमधून उशीरा आल्यामुळे शेवटचा १-१.५ तासच बघता आला!
>>तरी बरं ऑफिसमधून उशीरा
>>तरी बरं ऑफिसमधून उशीरा आल्यामुळे शेवटचा १-१.५ तासच बघता आला
वाचलात तुम्ही! असंभव, अग्निहोत्र आणि गैर ह्या ३ धक्क्यांनंतर मी राजवाडेची 'गुंतता हृदय हे' पहात नाहिये ह्याचा प्रचंड आनंद होतोय.
अरे अता मी इथे एक पोस्ट
अरे अता मी इथे एक पोस्ट केलेली पण ती गायबली.
मला या चित्रपटा फक्त उदय टिकेकर आवडला कारण बरेच दिवसानी त्याला रडण्याव्यतिरीक्त काहीतरी करायला मिळाल. तेच एक कॅरेक्टर खर होत आणि त्याने कुठलाही आव न आणता चोख निभावल.
बाकी इला भाटे म्हणजे असंभव अग्निहोत्र च फुटेज वापरल असत तरी चालल असत.
आम्ही डोंबिवली कट्ट्याचे सहा सात जण स्वखर्चाने हा चित्रपट पहायला गेलो.
अशक्य एंजॉय केला. आमचा सगळा गृप वेड्यासारखा हसत होता. स्वप्नाने केलेल्या तशाच कॉमेंट्स तिथे होत होत्या. आमच ऐकून वैतागलेली लोकही नंतर आमच्या बाजुने झाली आणि एंजॉय करू लागली.
सुरवातीलाच् टॅक्सीतून उतरल्यासारखा संकु फरारीमधुन उतरताना पाहून. एक मैत्रीण ई!!!!!!! करून ओरडली.
शेवटची संकु अचौ ची मारामारी पहाताना तर गडाबडा लोळायचे बाकि होतो. तिथे मला अकारण अशीही बनबा बनवीत लक्ष्यावर विजु खोटे हात टाकतो तो प्रसंग आठवला.
तिथे मला अकारण अशीही बनबा
तिथे मला अकारण अशीही बनबा बनवीत लक्ष्यावर विजु खोटे हात टाकतो तो प्रसंग आठवला.>>>> कृपया अशी ही बनवाबनवी या सिनेमाची कुठल्याच सिनेमाबरोबर तुलना करु नका...
कारण अशी ही बनवाबनवी हा एक महान सिनेमा होता. डायलॉन नी डायलॉग पाठ आहेत....असा सिनेमा पुन्हा होणे नाही !
हिलरीबाईंचं विमान उतरलं
हिलरीबाईंचं विमान उतरलं म्हटल्यावर त्यांचं स्वागत करायला जमलेली मंडळी 'अटेन्शन' मध्ये उभी राहिली. १० मिनिटं झाली, १५ मिनिटं झाली पण हिलरीबाई काही बाहेर येईनात.
फॉरेन सेक्रेटरी निरुपमा राव अस्वस्थ झाल्या - "काय करतेय काय ही बाई? लास्ट मिनिट मेकअप करतेय का काय आता?"
"तर काय हो? इथे उष्म्याने आमचा मेकअप धुतला जातोय त्याचं काय म्हणे? लवकर येईल पीडा तर बरं" भारताच्या अमेरिकेतल्या राजदूत मीरा शंकर म्हणाल्या.
"अहो, तिला सांगा इथे रात्र आहे आता, दिवस नाही म्हणावं. कोण बघणार आहे तिच्याकडे एव्हढं निरखून ह्या वयात. काय तरी बाई काही काही बायका असतात" राव पुन्हा चडफडल्या.
एव्हढ्यात विमानाचा दरवाजा उघडला आणि काळा चष्मा लावलेला एक सिक्रेट सर्व्हिस एजन्ट बाहेर पडला.
"घ्या आता. हा आला करुणानिधीचा वंशज. रात्री कसला तो काळा चष्मा लावायचा?" मीरा शंकर पदराने वारा घेत म्हणाल्या.
सिक्रेट सर्व्हिस एजन्ट त्या दोघींजवळ आला. "Madam, The secretary of State has asked me to inform you that she has decided to cancel her visit. We are returning to the States now" तो निरुपमा रावना म्हणाला.
उपस्थित लोकांची धाबी दणाणली. विमानतळापर्यंत येऊन बाईंनी दौरा रद्द केला म्हणजे त्यांचा इथल्या सुरक्षाव्यवस्थेवर विश्वास नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं हसं होणार. आता काय करायचं?
निरुपमा रावांनी प्रसंगावधान राखलं "We respect her decision. But if it has got anything to do with the security arrangements over here, I can assure you that they have been impeccable."
सिक्रेट एजन्ट त्याच्या सिक्रेट माईकमध्ये काहीतरी बोलला. मग रावांना म्हणाला "If you don't mind Madam, can you please come with me? The The secretary of State would like to explain the situation to you personally"
"Sure, sure, why not?" राव धावतच निघाल्या.
हिलरीबाई कसल्यातरी फायली चाळत होत्या. त्यांनी तोंड भरून हसून रावांचं स्वागत केलं.
"Before you say anything, let me assure you that my decision has nothing whatsoever to do with security arrangements in India. I had come here to meet a specific person and I have been just informed that he is no longer in India."
राव बुचकळ्यात पडल्या. कोण हा माणूस ज्याला भेटायला हिलरीबाई तिथून इथपर्यंत आल्या? बिलमहाशयांना माहित आहे का हे? विचारावं का विचारू नये? पण फॉरेन सेक्रेटरी झाल्या म्हणून काय झालं? शेवटी त्या एक स्त्रीच. त्यांना थोडंच गप्प बसवतंय? त्यांनी विचारलंच.
"If it's not confidential, may I ask who this person is?"
"Oh sure, his name is Mr. Anirudh Raje. And I have been told that he just now left for States for good." हिलरीबाई हसत म्हणाल्या.
अनिरुद्ध राजे कोण?
अनिरुद्ध राजे कोण?
स्वप्ना, पोस्ट नीट एडिट कर
स्वप्ना, पोस्ट नीट एडिट कर ना. काही काही भाग रीपीट झालाय.
शैलजा, संचायामा वर नस्तेस
शैलजा, संचायामा वर नस्तेस का?? अगं, एकदा डोकव तिथे लग्गेच. कळेल हा अनिरुद्ध राजे कोण ते
शैलजा माप्रिप्रीक नावाच्या
शैलजा माप्रिप्रीक नावाच्या महान केकता सिरीयल मधला हा महान एनाराय माणूस हाय..
बाकी अजून डीटेल्स तुला स्वप्ना_राज देतीलच
ओह, ओके. स्वप्नाटी,
ओह, ओके. स्वप्नाटी, धन्यवाद.
आता तुला स्वप्नाटी आणि तिला स्वप्नाआर म्हणावे बहुधा
म्हण की चालेल मी मध्यंतरी
म्हण की चालेल
मी मध्यंतरी आयडी बदलण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला पण जाऊदे आता ते टीआणि आर छान जमलंय बघ
निंबुडा, एडिटलंय बघ आता.
निंबुडा, एडिटलंय बघ आता. सॉरी. शैलजा, अनिरुध्द राजे म्हणजे माप्रिप्रिकमधल्या शमिकाचे वडिल.
वोक्के, धन्यवाद सगळ्या.
वोक्के, धन्यवाद सगळ्या. ज्ञानप्राप्तीसाठी मंडळ आभारी आहे
स्वप्ना या मालिकांबद्दलच्या
स्वप्ना या मालिकांबद्दलच्या तुझ्या कमेंटस तू एखाद्या दैनिकात लिही ना. कसल्या भन्नाट कमेंट्स असतात. _____/\______
स्वप्ना ...आता माप्रिप्रिक
स्वप्ना ...आता माप्रिप्रिक संपणार्...तु बंध रेशमाचे बघ ना प्लीज्...मी फक्त त्यातल्या हिरोसाठि बघते ती.....तु पण बघ ना...रोजच्याला पोस्ट्मार्टेम लैच भारी मिळेल.
तु बंध रेशमाचे बघ ना
तु बंध रेशमाचे बघ ना प्लीज्...मी फक्त त्यातल्या हिरोसाठि बघते>>>>> मी सुद्धा......
OMG ...स्वप्ना राज तुम्ही
OMG ...स्वप्ना राज
तुम्ही खरच अचाट आणि भन्नाट लिहिता... सॉलिड !!!
"महाराज आहेत का?" बिभिषणाने
"महाराज आहेत का?" बिभिषणाने दरवाज्यावरच्या पहारेकर्याला विचारलं.
"आहेत महाराज. पण तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. ते कॉन्फ़रन्समध्ये आहेत" पहारेकर्याने नम्रतेने सांगितलं.
"कॉन्फ़रन्समध्ये आहेत? कोणाबरोबर?" बिभिषणाने आश्चर्याने विचारलं.
पहारेकर्याच्या चेहेयावर क्षणभर असे भाव आले की त्यात "काय राव, सक्काळ सक्काळ चढवून आले काय?" ही प्रतिक्रिया बिभिषणाला स्पष्ट दिसली.
"स्वत:बरोबर".
"स्वत:बरोबर?"
"हो, स्वत:बरोबर".
"ह्म्म्म्म.....पण कशाबद्दल?"
"ते आता मला सेवकाला काय हो ठाऊक? पण दर रविवारी सकाळी अस्ते ही कॉन्फ़रन्स" पहारेकरी, पुन्हा नम्रतेने वगैरे.
चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन बिभिषण माघारी गेला.
इथे आत रणकंदन माजलं होतं.
"तुला कोणी सांगितलं होतं संजयला वेडं करायचं स्क्रिप्टमध्ये लिहायला?" रावणाचं एक डोकं दुसया डोक्याला तावातावाने विचारत होतं.
"तुला कोणी सांगितलं होतं त्याला बरं करायला?" दुसरं डोकं तेव्ह्ढ्याच त्वेषाने म्हणालं.
"त्या आठवड्यात स्क्रिप्ट लिहायची जबाबदारी माझी होती"
"मग ह्या आठव्ड्यात स्क्रिप्ट लिहायची जबाबदारी माझी आहे. मला काय पाहिजे ते करेन, समजलास?"
"ए, भैरवीच्या शरीरात बिराई देवीने काशीचा आत्मा घातला असं कथानक मी लिहिलं होतं ना? मग तिने पैश्यासाठी कामिनीकाकूबरोबर संगनमत करून हा बनाव घडवून आणला ही वेडपट कल्पना कोणाच्या डोक्यातून निघाली रे?" शोलेतला ठाकूर बलदेवसिंग ’गब्बर’ म्हणून ओरडतो तसं तिसरं डोकं ओरडलं.
"माझ्या डोक्यातून निघाली. काय म्हणणं आहे? माझी कल्पना वेडपट काय? म्हणे एकाचा आत्मा दुसयाच्या शरीरात घालता येतो. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? " पाचवं डोकं डोळे वटारत म्हणालं.
"तर काय? म्हणे त्या कार अॅक्सिडेन्टमध्ये मेली ती बबली होती. मग धबधब्यात उडी टाकून मेली ती कोण? आणि 'विश्वजीत स्टाईल' गिटार बडवून संजयने काशीला कुठलं गाणं म्हणून दाखवलं होतं ते त्या भैरवीला कोणी सांगितलं? कामिनीकाकूने? कैच्या कै" चौथ्या डोक्याने नको तिथे आप्लं डोकं घातलं.
"तू गप्प बस रे. तुला डोकं नाही अजिबात. त्या बबलीला आणायची आयडिया तुझीच होती" सहावं डोकं वैतागलं.
"हो का? मग काशीच्या आईसारखी, त्या भाविणीसारखी दिसणारी ही तमाशातली बाई कामिनीकाकूने आणली ही तुझी आयडिया ओरिजिनल आहे का? ती कामिनीकाकू हलत नाही कुठे वाड्यातून. तिने काय फ़ेसबुकातून शोधलं होय तिला?" चौथ्या डोक्याने वचपा काढला.
"अरे असं नका डोक्यात राख घालून घेऊ. लंकाधिपतींचं आपलं बरं आहे. त्यांच्यासारखा दिसणारा कधीच दुसरा सापडायचा नाही. खी खी खी" सातव्या डोक्याने दात काढले.
"ए गप रे. तू काय रामसेबंधूच्या पिक्चरमध्ये आहेस काय? प्रेक्षक घाबरून बेशुध्द वगैरे पडतील असं समजून तिथे मधेमधे सतीश शाह, राजेन्द्रनाथ वगैरे येऊन कॉमेडी करून जायचे तसं बोलतो आहेस. पण एक विसरलास, प्रेक्षक त्यांचे विनोदाचे सीन्स सोडून बाकीच्या सिन्सनाच पोट धरून हसायचे. हे रामसेबंधूना कुठे माहित होतं? त्यासाठी त्यांना स्वत:चे पिक्चर पहावे लागले अस्ते ना" आठवं डोकं बोलण्यात ’डोकेबाज’.
"रा्मसेचे पिक्चर्स परवडले रे. ह्या सातव्याने लिहिलेलं स्क्रिप्ट नको बाबा. ह्याने त्या ओरिजिनल काशीला जिवंत ठेवलंय. वर तिच्याबरोबरीने कोणी एक सिनियर सिटिझन जोडपं आहे. साला, कटी पतंगच्या स्टोरीतून काटाकाटी करून त्यांच्या नातवाची बायको म्हणून आणली आहे तिला. तिची म्हणे स्मृती गेली आहे. आणि तो नातू असल्याचं सोंग कोण करतंय माहित आहे का? तो बापाचा खून करून पळालेला त्या भाऊकाकाचा पुतण्या ’काका’ जो आधी त्या काशीच्या मागे लागला होता"
"भाउकाकाचा पुतण्या का भाउकाकाचा काका?"
"भाउकाकाचा पुतण्याच रे पण त्याचं नाव ’का्का’ आहे."
"पुतण्याचं नाव काका? मग काकाचं नाव काय आहे? पुतण्या? ही कोणाची आयडिया"
"ह्या नवव्याची"
"आयला, व्हॉट अॅन आयडिया ’सर’जी"
"ए, माझं डॊकं फ़िरवू नका हं सांगून ठेवतोय. काका हे नाव काय फ़क्त राजेश खन्ना किंवा तो कोण फ़ूटबॉल खेळणारा आहे त्याचंच असू शकतं? आहे भाउकाकाच्या पुतण्याचं नाव ’काका’. काय म्हणणं आहे तुमचं?" नवव्याचं डोकं फ़िरायला लागलं होतं
ह्यावर बाकीची सगळी डोकी एकदम बोलायला लागली. त्याच गदारोळात गाणं वाजू लागलं "दस बहाने करके ले गयी दिल" - रावणाचा मोबाईल.
’चूप बसा रे. बोलू द्यात." दहाव्या डोक्याने दटावलं पण काही उपयोग नाही.
"हॅलो, कोण आहे?" दहाव्या डोक्याने ओरडून विचारलं.
"मी भाग्यलक्श्मीच्या सेटवरून बोलतोय. सोमवारच्या एपिसोडचं स्क्रिप्ट तयार आहे का?"
"काम चालू आहे. झालं की फ़ोन करतो." दहाव्या डोक्याने फ़ोन खाली ठेवला तरी गदारोळ चालूच होता.
"ए, आता गप बसता का फ़ोडू एकेकाचं डोकं? वैताग आणलाय नुसता. आज पूजेला बसलॊ की सांगणार आहे भगवान शंकरांना पुन्हा सगळी डोकी तोडून त्यांना अर्पण करायची वेळ लवकरच येणार आहे म्हणून" दहावं डोकं संतापाने आपलं कपाळ बडवून घेत म्हणालं.
मामी, sumedhav, साक्षी३६९,
मामी, sumedhav, साक्षी३६९, जान्हवी धन्स
भारी विनोदी बीबी आहे हा, अगदी
भारी विनोदी बीबी आहे हा, अगदी विनोदात देखिल आमच्या सगळ्ञा दु:खान्ना वाचा फोडतो!
स्वप्ना, तुम्ही त्या कलर्स्/स्टारप्लस वगैरे वरील मालिका बघत नाहीका? तस नै, बघू नकाच!
माझ्या वाट्याला मात्र त्या मालिका बघण्याचा कम्पलसरी ताप आहे.
Pages