मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.
वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.
वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.
वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.
-----
गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."
"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.
"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"
"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."
बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"
कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"
कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.
"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.
इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.
तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.
रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.
स्वप्ना मस्त अपडेट दिलास
स्वप्ना मस्त अपडेट दिलास माप्रिप्रिक चा. उग्गीच १/२ तास डोकं शिणवायची गरज नाही.. देव तुझं भलं करो!
शमिकाच्या सख्ख्या वडिलांची मुलगी म्हणजे शमिकाची कि रियाची बहिण ते कळल का? (काय पण प्रश्न आहे! :D)
सही.....म्या पामराला
सही.....म्या पामराला माप्रिप्रिक पाहण्याचे भाग्य लाभत नाही..तरी त्या घामट अभि आणि गोंडस जयचे काम कोणि केले आहे म्हणे?
अभि = अभिजीत खांडकेकर. जयचं
अभि = अभिजीत खांडकेकर.
जयचं नाव प्रसाद.
शमिका = मॄणाल दुसानीस
रिया = स्नेहा कुलकर्णी.
हे पहा....
http://www.youtube.com/watch?v=TtX6Bp7AhXI
अमरप्रेम चक्क उद्या संपतेय
अमरप्रेम चक्क उद्या संपतेय आणि तिच्या जागी सोमवारपासून पिंजरा मालिका येतेय
"नारायण, नारायण" शब्द कानी
"नारायण, नारायण" शब्द कानी येताच सिंहासनावर चिंताक्रांत होऊन बसलेल्या इंद्राने मान वर करून पाहिलं.
"प्रणाम मुनिवर" त्याने नमस्कार केला.
"कल्याणमस्तु देवाधिराज, बरेच काळजीत दिसताय. आता कलियुगात पृथ्वीवरच सिंहासनासाठी एव्हढी चढाओढ चाललीय की तुमच्या सिंहासनाकडे कोणाचं लक्ष जायची सुतराम शक्यता नाही. मग हया काळजीचं कारण काय?"
"काय सांगू मुनिवर, ऋषी विश्वामित्र आमरण उपोषणाला, आपलं तपश्चर्येला बसलेत. वाटाघाटींना पाठवलेल्या शिष्टमंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावून परत पाठवलंन."
"मग त्या वाटाण्याचं काय केलंत?"
"काय करणार? वाटाणे त्यातल्या त्यात गरीब देवांना कमी दरात उपलब्ध करून द्या असा धोशा लागला होता. आताशा असे देव कमीच झालेत. जिकडे पहावं तिकडे सोन्याच्या पादुका, मुकुट, हार. असो. तरी पण जे देव अजून दारिद्र्यरेषेखाली आहेत त्यांना दिले उपलब्ध करून. पण प्रश्न तो नाहिये. प्रश्न हा आहे की ऋषी विश्वामित्रांना कसं समजवायचं?"
"त्यात काय कठीण आहे देवाधिराज? स्वर्गातून अप्सरा द्या पाठवून ."
"अप्सरा? अहो पण मुनिवर, स्वर्गात अप्सरा आहेतच कुठे?"
"स्वर्गात अप्सरा नाहीत? कुठे गेल्या?" नारदांचा आपल्या कानांवर विश्वास बसेना.
"आजकाल त्या ट्वेन्टि-ट्वेन्टी सामन्यांसाठी त्या चिअरलिडर्स लागतात ना. रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, सगळ्या सगळ्या आयपीएलच्या टीम्सबरोबर करार करून बसल्यात. आजकाल ऋषीमुनींचा तपोभंग करायला जाणार नाही म्हणतात. उगाच भस्म वगैरे व्हायचा ताप नकोय म्हणे त्यांना."
’हम्म. खरंच कठीण झालंय सारं." नारद विचारात पडले.
"देवाधिराज, एक सांगा. स्वर्गात अप्सरा नाहीत हे ऋषी विश्वामित्रांना माहित आहे?"
"अर्थात. सगळ्यांना ठाऊक झालंय ते मुनिवर. तुम्हाला माहित नाही ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला."
"गेले काही महिने पृथ्वीवर इतकी उलथापालथ झालीय की तिथेच अडकून पडलो होतो त्यामुळे कल्पना नव्हती मला.असो. विश्वामित्रांना हे माहित असेल तर तुमचं काम सोपं आहे देवाधिराज. मग तर नुस्ती तुम्ही अप्सरा पाठवताय एव्हढी आवईच पुरे आहे"
"मी समजलो नाही."
"तुम्ही मी सांगतो तसं करा आधी"
मग मात्र इंद्राने अधिक खोलात न शिरता तशी व्यवस्था केली आणि अहो आश्चर्यम! विश्वामित्रांनी तात्काळ उपोषण मागे घेतल्याचं त्याला कळलं.
"मुनिवर, हा काय चमत्कार हो. आपण महान आहात. आता तरी ह्यामागचं रहस्य सांगा."
"रहस्य कसलं देवाधिराज? स्वर्गात अप्सरा नाहीत तरी तुम्ही अप्सरा पाठवताय म्हणजे ह्या अप्सरा झी मराठीवरच्या "एकापेक्षा एक अप्सरा आली’ मधल्या अप्सरा असणार आहेत हे विश्वामित्रांच्या लक्षात आलं. त्यांचा नाच बघणं नको म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतलं" नारदांनी हसत खुलासा केला.
मूळ शेर: तू पासभी हो तो दिल
मूळ शेर:
तू पासभी हो तो दिल बेकरार अपना है
के हमको तेरा नही, इंतजार अपना है
शायराची माफी मागून बदललेला शेरः
तू पासभी हो तो दिल बेकरार अपना है
के हमको तेरा नही, इंतजार रिमोटका है
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना,
स्वप्ना,

(No subject)
आज खूप दिवसांनी माप्रिप्रिक
आज खूप दिवसांनी माप्रिप्रिक पाहिलं.........त्यात एका मख्ख चेहेर्याच्या मुलीच्या बांगड्या/मेंदी ..तत्सम कार्यक्रमात अभी आणि शमिका एकदम "मुंडाकुडी" डान्स सुरू करतात. अरे आपल्या म्हर्राटी लग्नात या कुड्या आणि हे गलीके मुंडे कुठे घुसले? काही ओरिजिनॅलिटीचं पहा राव...............!
झीच्या अप्सरा!
झीच्या अप्सरा!
धन्स मंडळी. किल्लेदार मधल्या
धन्स मंडळी.
किल्लेदार मधल्या "किल" ला जागून निरनिराळे किल्लेदार एकमेकांना मारत सुटलेत. तुम्हाला कदाचित आठवत नसेल की खूप खूप आधी नरसिंहाने जानकीशी लग्न करायला तिच्या मित्राला मारलं होतं. मग नरसिंहाच्या सांगण्यावरून परशूने आर्यनला संपवलं. आता आधी सुमित्राचा नंबर लागला. आणि मग अहिल्येने जानकीचं बाळ मारायला परशूकरवी दुधात विष घातलं. (तिने भाग्यलक्ष्मी पाहिलं असावं का?) ते दूध बिचारं जानकी, सुगंधा दोघींना खो देऊन दिवाणखान्यातल्या टेबलावर जाऊन बसलं होतं. नेमकं अमृताने ते घेतलं, त्यात तिचं बाळ गेलं. हे भविष्य त्या भवानीमायला दिसलं नव्हतं का? चला, आता तिचा तिच्या बाळासकट स्विकार करायला तयार असणारा महापुरुष दाखवायची पटलेखकाला गरज नाही. अमृतासाठी एखादा दुसरा आर्यन (किंवा आर्यनसारखा दिसणारा दुसरा कोणीतरी!) लवकरच दाखल होईल. तो नरसिंहाला सोडवायला मदत करणारा शीख मेजर कुठे गेला बरं?
भाग्यलक्ष्मीत "सीता और गीता" सुरू झालंय. रच्याकने, ह्या दुसया काशीच्या म्हणजे बबलीच्या आईचं नाव म्हणे "सुगंधा पुणेकर"! ती आंधळी कशाला दाखवलेय कोणास ठाऊक? बहुतेक नंतर कोणीतरी तिला ढकलून देईल आणि तिची दृष्टी येईल. किंवा खरी काशी मेली नसेल तर बबली काशी म्हणून गेल्यावर योगायोगाने हिच्या घरी येईल आणि तिला लोक बबली समजतील. त्या भविष्य सांगणार्या बाईने बबलीला "तुम्हारी एक जुडवा बहन थी" असं कसं सांगितलं नाही? इथे त्या काशीच्या नवर्याची म्हणजे संजयची आधीची आयटम त्याच्या घरी येऊन बसलेय आणि त्याला धमकी देतेय की "तुझं माझ्यावर प्रेम नाही ना. मग तुला मी चॅलेन्ज करते की मी तुझ्याशीच लग्न करणार. मोहिते घराण्याची सून होणार. चित्रा संजय मोहिते." हरे राम! ह्या बायांना स्वाभिमान नावाची गोष्ट ऐकून तरी माहित आहे का रे?
"अगले जनम मोहे बिटियाही किजो" मध्ये त्या लालीच्या नवर्याच्या पहिल्या बायकोने म्हणजे सिध्देश्वरीने म्हणे घरातून हाकलून दिल्यावर आत्महत्या केली. मग तिची एक बहिण डॉक्टर बनून आली आणि तिने सिध्देश्वरीच्या आत्म्याला लालीला झपाटायला मदत केली. मग लाली सिध्देश्वरीसारखी वेशभूषा करायला लागली. थॆट "भुलभुलैय्या" मधे विद्या बालनची कशी "मोंजोलिका" होते ना तश्शीच. शेवटी विद्या बालनने कसं शायनीच्या पुतळ्याला तो राजा समजून मारलं तसंच लालीने आपल्या नवर्याच्या पुतळ्याला मारलं.
सिध्देश्वरीच्या बहिणीने हवेलीला आग लावली. तेव्हा लालीच्या नवर्याच्या आत्येभावाने बायकोला वाचवायच्या आधी लालीच्या धाकट्या बहिणीला वाचवलं. त्यावरून ते दोघे "एक दूजे के लिये" बनलेत ह्याचा त्याच्या बायकोला साक्षात्कार झाला. तिने त्या दोघांचं लग्न लावून दिलंय - तिने त्या नवर्याला घटस्फ़ोट दिला की नाही ते आपण विचारायचं नाही. अजूनही ती ह्याच कुटुंबाबरोबर रहातेय, काय नात्याने ते माहित नाही.
हवेली तर जळून खाक झाली. पण हे सगळे ठाकूर, भाड्याच्या घरात थोडेच रहाणार? त्यांना कोणीतरी एक हवेली तात्पुरती रहायला दिलीय. ह्या लोकांकडे बर्या "स्पेअर हवेल्या" असतात. हे सगळं रामायण झाल्यावर लालीची सासू तीर्थयात्रेहून आली ती थेट ह्या नव्या घरात. वर लालीच्या बहिणीचं तिने कौतुक केलं. तिला काय ट्विट करून नवयाने हे सगळं कळवलं का? भगवानजी, अगले जनम मोहे दर्शक ना किजो!
काल अचानक सर्फ़िंग करताना "फ़ूड फ़ूड" नामक नवं चॅनेल दृष्टीस पडलं. हे संजीव कपूरचं चॅनेल आहे का कारण २४ तास फूडचे प्रोग्राम्स दिसताहेत. रोशनी चोप्राने अॅन्कर केलेला एक बोरिंग फ़ूड शो पाहून चॅनेल चेन्ज करणार एव्हढ्यात संजीव कपूर (संजीव कपूर्स किचन) अवतरला आणि मागोमाग "मिर्च मसाला" चा राकेश सेठी. मग काय? मी बसले डायरी घेऊन रेसिपिज लिहायला
११:३० ला लागलेला "टर्बन तडका" मात्र जाम वैतागवाणा वाटला. शेफ़ हरपाल सिंग सोधीने प्लॉवरचा पराठा दाखवला पण प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी "भई" ऐकून ऐकून वैताग आला. त्यामुळे मी पुढचं काही पाहिलं नाही. आता तो सरदार आहे हे त्या टर्बनवरून कळतं ना, काय ते पंजाबीपणा दाखवायचा सोस. तरी बरंय, मधेमधे भांगडा करून दाखवला नाही. मै बडी बोअर भई 
घरची गृहिणी दुपारी
घरची गृहिणी दुपारी वामकुक्षीसाठी आडवी झाल्याची खात्री होताच स्वयंपाकघरातल्या वस्तूंना कंठ फ़ुटला.
"काय तरी बाई ही माणसं. आपल्या भांडणात आपल्याला का मधे खेचतात देवाला ठाऊक." एक उसासा सोडून चाळणी म्हणाली.
"काय झालं? कोणी काही बोललं का तुम्हाला?" उलथण्याने विचारलं.
"मला थेट नाही हो बोललं कोणी. पण सकाळी अमितला शाळेत जायला तयार करताना त्याची आई कालच्या अभ्यासातलं काहीबाही विचारत होती. बिच्चारं पोर! झोपेत होतं हो. त्याला काही आठवेना. तेव्हा म्हणते कशी ’डोकं आहे का चाळणी रे? काल एव्हढं घोकून घेतलं आणि रात्रीत सगळं वाहून गेलं वाटतं’. काळजाला घरं पडली हो ऐकून"
"हो ना, काल रात्री अमितची आई त्याच्या बाबांना जेवायला वाढताना सासूची तक्रार करत होती. काल दुपारी अमितची आजी आली होती ना. बोलताना ’चांगली झालेय हो प्रकृती तुझी सूनबाई" असं बोलून गेली. झालं! अमितची आई त्याच्या बाबांना म्हणते कशी ’आपला तो बाब्या आणि दुसयाचं कारटं तश्यातली गत ग बाई. माझी तब्येत चांगली झालेय काय, आणि स्वत:ची मुलगी एव्हढी बरणी झालेय फ़ुगून ती न दिसायला मोतीबिंदू झालेत काय डोळ्यात?" लोणच्याच्या बरणीने आपली व्यथा मांडली.
"अमितचे बाबा काही कमी नाहीत हं. काल ऑफ़िसमधल्या कोणाला प्रमोशन मिळालं तर म्हणतात कसे ’आम्ही बॉसची चमचेगिरी करत नाही ना म्हणून आमचं नाव डावललं जातं नेहमी’. घ्या लेको! आपण काम नाही करायचं आणि वर आम्हाला बदनाम करायचं" चमचा चडफडला.
हे सगळे बोलणं शांतपणे ऐकत कोपर्यात बसलेल्या मातीच्या माठातून अचानक पाणी झिरपायला लागलं. "अरे, तुझ्या डोळ्यांना का बाबा धारा लागल्या?" पळी, कढई आणि परात एकदम म्हणाले.
"काय सांगू बाबांनो, आज सकाळी अमितच्या आईला तिच्या कोणा मैत्रिणीचा फ़ोन आला होता. दोघी टीव्हीवरच्या सिरियल्सबद्द्ल भरभरून बोलत होत्या. अमितची आई म्हणते कशी ’त्या माप्रिप्रिकमध्ये बघतेयस ना काय चाललंय ते. त्या शमिकाच्या नाकावर टिच्चून तिची ती सावत्र आणि दत्तक दोन्ही बहिणी कारस्थानं करताहेत. अभिला प्रिया आपल्यात आणि शमिकात फ़ूट पाडतेय ह्याचा गंध नाही. आणि जयने ’मुझसे दोस्ती करोगे’ विचारताच आशूदी ’हो’ म्हणून मोकळी झाली. कैच्या कैच, एव्हढे माठ कुंभारवाड्यात पण नसतील!’
"उगी, उगी, जास्त त्रास करून नको घेऊस. तडकशील उगाच" सगळ्या वस्तू एकदम म्हणाल्या.
मूळ शेर: तकदीर क्या लिखू
मूळ शेर:
तकदीर क्या लिखू मुकद्दरके सामने, उसने कत्ल कर दिया मेरे घरके सामने
सारी बस्ती जलती तो अफ़सोस ना होता, सिर्फ़ मेरा ही घर जला समंदरके सामने
शायराची माफी मागून बदललेला शेरः
तकदीर क्या लिखू मुकद्दरके सामने, उसने कत्ल कर दिया मेरे घरके सामने
झी, सोनी बंद हो जाते तो अफ़सोस ना होता, सिर्फ़ ट्रॅव्हल लिव्हिंग ही बंद हुआ मेरे आखोके सामने
स्वप्ना
स्वप्ना
काही अनुत्तरित
काही अनुत्तरित प्रश्नः
कु़ंकू
१. जानकीचा मित्र आणि आर्यन ह्यांचा थंड डोक्याने काटा काढणारा नरसिंह त्या म्हातार्याला का मारत नाही? आणि ते पण राजकारणी असून? नॉट हॅपनिंग!
२. एक मुरलेला राजकारणी असून एका सोम्यागोम्याच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवतो? आणि त्यासाठी घर सोडून जायला निघतो? राजकारणी एव्हढे सज्जन कधीपासून झाले?
भाग्यलक्ष्मी:
१. स्वतःच्या नवर्याला त्या चित्राबरोबर पाहून काशी निघून का जाते? ती एकटी असली तर बाब वेगळी पण कोणतीही गरोदर स्त्री अश्या वेळी आपल्या बाळाचा विचार करणारच.
२. संजय चित्राला मी वेडा झालो होतो तेव्हा कुठे मेली होतीस असा प्रश्न का विचारत नाही?
३. चित्राची मामी नेहमी चष्म्याखालून का पहाते? ती वेडी आहे का? नसेल तर वेड्यासारखी का हसते?
४. लोकांना बेशुध्द करून त्यांना आपल्या तालावर नाचवणारे असं कुठलं औषध आहे? कुठे मिळतं?
५. भाऊ बबलीला काशीच्या घरातल्या सगळ्यांचे फोटो दाखवतो, ते फोटो कोणी,कधी आणि मुख्य म्हणजे कशासाठी काढलेले असतात? भाऊ ते खिशात घेऊन फिरत असतो का?
६. बबलीला तू भाग्यलक्ष्मी होणार हे सांगणारी ती बाई स्ट्रार ट्रेक मध्ये लोक बीमअप होतात तशी गायब कशी होते? ती नेहमी शून्यात का पहात असते?
माप्रिप्रिकः
१. शमिका आणि अभिला आपली गाडी देऊन तो तिच्या वडिलांनी तिच्यासाठी निवडलेला मुलगा (अमर प्रेमवाला) घरी कसा जातो? हे लोक नेहमी अमेरिकेहूनच का येतात? जगात दुसरे देश नाहीत का?
२. अभि आणि शमिका ह्यांना ती म्हातारी बाई ते अनोळखी असून असं घरात कसं घेते?
३. तिच्या सून आणि मुलाचे कपडे अभि आणि शमिका ह्यांना एव्हढे फिट्ट कसे बसतात? आम्हाला चांगले पैसे मोजून विकत आणलेले कपडे एकतर घट्ट होतात नाहीतर सैल. हे नशीबाचे भोग म्हणून सोडून द्यायचं का?
४. अमेरिकेत वाढलेल्या मुली आणि देशातल्या मुली ह्यावरची कमेन्ट खरंच हवी होती का? का वेळ भरून काढायचा म्हणून काहीही संवाद द्यायचे?
५. ह्या मालिकेला लेखक आणि दिग्दर्शक आहेत का? असल्यास ते प्रत्येकी किती किलो गांजा ओढतात ही माहिती आरटीआय खाली मिळू शकेल का?
अगले जनम मोहे बिटिया ही किजो
अगले जनम मोहे बिटिया ही किजो शेवटी एकदाची संपली. आदल्या दिवशीपासुन "ललियाकी विदाई" ह्या कॅप्शनसोबत एक गोळीचा आवाज आणि लालीच्या तोंडावर उडालेलं रक्त ह्यामुळे लाली मरणार ह्याबद्दल मातृदेवतेची खात्री झाली होती. पण लाली गरोदर असल्याने मरणार नाही ह्या भूमिकेवर मी ठाम. मालिकेच्या शेवटच्या काही मिनिटात झालेला संवाद येणेप्रमाणे:
तो कालू का कोण तो गुंड लालीसमोर आणि तिच्या दिराच्या मुलीसमोर उभा. लालीच्या हातात पिस्तूल आहे पण तिला प्रसववेदना (लेबर पेन्स!) सुरू झाल्याने तिला ते नीट धरता येत नाहिये. तिचा चेहेरा वेदनेने पिळवटला आहे.
मातोश्री: आता तो ते पिस्तूल काढून घेणार आणि तिला गोळी मारणार. त्याने पिस्तूल घेतलेलं दाखवलंय आणि लालीच्या अंगावर रक्त उडालेलं पण दाखवलंय.
अस्मादिकः अग, पण तिचंच रक्त तिच्याच तोंडावर कसं उडेल?
मातोश्री: तिच्या पोटात लागली असेल गोळी.
अस्मादिकः (करुणेने पाहत) अग न्यूट्न त्याच्या कबरीत लोळत असेल हे ऐकून. गुरुत्त्वाकर्षणाचे नियम घोकून घेतले ना होतेस आमच्याकडून. असं रक्त वर कसं उडेल? हा काय "Kill Bill" चालू आहे? मी सांगते तुला. लालीचा सासरा मागून येऊन त्या कालूला मारणार. त्याने म्हटलं होतं ना तसं.
एव्हढ्यात कालू पिस्तूल हिसकावून घेतो आणि लालीवर रोखतो. तिला चेहेरा आणखी वेडावाकडा करणं अशक्य. ती दिराच्या मुलीला पळून जायला सांगते. एव्ह्ढ्यात गोळीचा आवाज येतो आणि लाली खाली पडते. कालू अजून उभा आहे.
मातोश्री: (विजयी मुद्रेने पहात) - बघ, लागली ना तिला गोळी.
अस्मादिकः तिला नाही लागली म्हणून तर ती खाली पडली आहे. कालूला लागलेय म्हणून तो उभा आहे.
मातोश्रीं काळजीने पहातात - अस्मादिकांकडे.
लाली जमिनीवर पडलेय, तिला सगळं आयुष्य डोळ्यांसमोर चमकून जातं. अस्मादिकांना आपण चुकलो की काय असं क्षणभर वाटतं.
मातोश्री: बघ, कोणी असतं तर आलं असतं ना आत्तापर्यंत तिला उचलायला.
अस्मादिकः पण अग ती कशी मरेल? ती हिरॉईन आहे ह्या सिरियलची. आणि तिचा सासरा कालूला मारेल असंम्हणला होता त्याचं काय?
कालूवर कॅमेरा, तो स्लो मोशनमध्ये खाली पडतो. तेव्हा मागे बंदूक घेऊन उभा असलेला लालीचा सासरा दिसतो. लाली विव्हळल्यावर त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. आणि तो बायकोच्या नावाने ओरडतो.
अस्मादिक विजयी मुद्रेने पहातात.
मूळ शेरः कोई आके जैसे चला
मूळ शेरः
कोई आके जैसे चला गया, कोई आके जैसे गया नही
मुझे अपना घरभी घर लगा तो खयाल तेरी तरफ़ गया
शायराची माफी मागून बदललेला शेरः
कोई आके जैसे चला गया, कोई आके जैसे गया नही
मुझे अपना घरभी पागलखाना लगा, जो खयाल झी मराठीका आया
मी काल यूट्युबवर "हम दोनो"
मी काल यूट्युबवर "हम दोनो" (ब्लॅक अँड व्हाइट) बघत होते. माझं खूप लाडकं गाणं आहे त्यात म्हणून, तर "अभी ना जाओ छोडकर.." सुरु झालं आणि मला हाच का.चू. वाला अभी आठवला!!
तरी मी या सगळया मालिका (म्हणजे माप्रिप्रीक आणि कुंकू) यूट्युबवर बघते. कट्-शॉर्ट असतात एपिसोड्स ते. झटपट खतम होतो मामला. :ड
स्वप्ना.. अशक्य आहेस तू!
स्वप्ना.. अशक्य आहेस तू!

>>स्वप्ना.. अशक्य आहेस
>>स्वप्ना.. अशक्य आहेस तू!
मातोश्रींचंही हेच मत आहे माझ्या जन्मापासून.
>>तर "अभी ना जाओ छोडकर.." सुरु झालं आणि मला हाच का.चू. वाला अभी आठवला!
अगदी, अगदी.
अभिला पाहून मला आणखी एक ओळ आठवते "अभी अभी एक हवाका झोका याद तेरी ले आया". कारण तो वार्याच्या झुळकेनेसुध्दा उडून जाईल इतका बारीक आहे.
शमिका आणि अभिच्या "प्यारका
शमिका आणि अभिच्या "प्यारका आशियाना" मधे प्रेमाची सकाळ उगवली. शमिकाबाई अभिला भांडयातून कपात गरम पाणी ओतून देताना पाहून हा आता दाढी करणार असं आपलं मला वाटलं. तर तिने चक्क चहा म्हणून ते पाणी त्याला दिलं. म्हटलं येशू ख्रिस्ताने पाण्याचं वाईनमध्ये रुपांतर केलं तसा काही ’चिमित्कार’ शमिकाबाईंनी केला की काय. प्रेमात माणसं काय काय करतील काही सांगता येत नाही. अभिबाळानेसुध्दा प्रेमाने चहा घेतला, वर चहा शेअर करण्यावरून त्यांची "गोड तक्रार" सुध्दा झाली. मला तर काही कळेचना.
मग मातोश्रींना माझी दया आली - "अग, गरम पाणी चहा समजून घेताहेत दोघं."
"हा, हा, म्हणजे लहानपणी आम्ही भातुकलीच्या खेळात करायचो तसे" हे ओठांवर आलेलं वाक्य मी पोटात ढकललं. "तमाम जमीजायदादसे बेदखल" व्हायचं नाहिये मला - निदान इतक्यात तरी.
"पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे" मातोश्री पुढे म्हणाल्या.
"का? शमिकाला माहित होतं ती घर सोडून जाणार आहे ते. पैसे घेऊन नाही का पळता आलं? " पुन्हा ओठातलं पोटात.
एव्ह्ढ्यात तिथे शमिकाबाईंना पैसे मिळवण्याचा एक मार्ग सुचला. आणि दोघे मार्केटच्या दिशेने रवाना झाले तरी त्या चहा केलेल्या चुलीखालचा जाळ आपला चालूच. काय हे! आग लागली म्हणजे मग?
बरं, पैसे मिळवण्याचा मार्ग काय माहित आहे? एका मडकी बनवण्याकडे गेले आणि त्याची मडकी रंगवून, त्यावर नक्षी काढून देण्याचं काम घेतलंय. २ माठांकडून रंगवून घेण्याची घटना मडक्यांच्या इतिहासात प्रथमच घडली असावी.
गळक्या माठांभोवती देसी मालिकेला आकार
केकते तू वेडी कुंभार
कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे
कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आपल्या नागवाडीतील रहिवासी श्रीयुत तक्षककुमार नाग ह्यांचे काल सकाळी अपघाती निधन झाले. घटनास्थळीची पाहणी आणि प्रत्यक्षदर्शींच्या जाबजबाबानुसार हाती आलेली माहिती अशी:
श्रीयुत तक्षककुमार नाग नेहमीच्या शिरस्त्यानुसार सकाळी जंगलात फ़ेरफ़टका आणि न्याहारीसाठी गेले होते. नेहमीच्या वाटेने नागवाडीकडे परतत असताना अकस्मात त्यांच्या डावीकडे एक तरुण आणि उजवीकडे एक तरुणी असे दोन मनुष्यप्राणी अवतीर्ण झाले. ते दोघे फ़क्त एकमेकांकडेच पहात असल्याने त्यांचे श्रीयुत तक्षककुमार यांजकडे लक्ष नव्हते. त्यांचे लक्ष जाऊ नये म्हणून आहे तिथेच थांबण्याची चूक श्रीयुत तक्षककुमार यांनी केली. अचानक त्या तरुणाने तरुणीच्या दिशेने जायला सुरुवात केली. हा तरुण मनुष्यप्राण्याच्या भाषेत सांगायचं तर "पाप्याचं पितर" ह्या गटात मोडणारा होता असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे तरीसुध्दा आपण त्याच्या पायाखाली येणार अशी बहुधा श्रीयुत तक्षककुमार ह्यांना भीती वाटली असावी. तो जवळ येताच स्वभावानुसार त्यांनी त्याला दंश केला. तरूण भोवळ येऊन खाली पडताच तरुणीने त्याला जवळ घेऊन "अभि अभि" असा आक्रोश सुरु केला. ते पाहून श्रीयुत तक्षककुमार ह्यांनी तिथून काढता पाय (!) घेतला. थोडं अंतर चालून गेल्यावर त्यांना भोवळ येऊ लागली. डोळ्यांसमोर अंधारी पसरली. जवळच असलेल्या काही सापांनी त्यांना इस्पितळात नेईतो वाटेतच त्यांचं तडफ़डून प्राणोत्क्रमण झालं.
त्यांच्यामागे आईवडिल, पत्नी, २ मुले आणि असंख्य मित्र व शुभचिंतक असा परिवार आहे. एक हरहुन्नरी आणि सर्वांना मदत करण्यास तत्पर असं धडाडीचं व्यक्तिमत्त्व हरपल्याने नागजगतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळीच थांबलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनुसार तरुणीचा ओरडा ऐकून तेथे आलेल्या काही माणसांनी झाडपाला लावून त्या तरुणाला वाचवलं. माणसांना दंश केल्याने सापच मेल्याची ही पहिलीच घटना असल्याने नागजगतात कमालीची खळबळ उडाली आहे. झाडपाल्याची माहिती असणार्या सापांना ह्याबाबत तातडीने संशोधन करण्यास सांगण्यात आलं आहे. "हाफ़किन इन्स्टिट्यूट"च्या धर्तीवर एक संस्था स्थापन व्हावी असा आग्रह मूळ धरू लागला आहे.
तरी खबरदारीचा उपाय म्हणून मनुष्यजगतातील कोणत्याही राजकारणी किंवा त्यांच्या सहकार्यांच्या वाटेला न जाण्याची सूचना "नाग"रिकांना करण्यात आली आहे.
मूळ शेरः कितनी अजिब थी
मूळ शेरः
कितनी अजिब थी दास्ता-ए-मुहोबतकी
एक आंख समंदर, और दुजी प्यासी थी
शायराची माफी मागून बदललेला शेरः
कितनी अजिब थी दास्ता-ए-टीव्हीकी
एक आंख सोनीपर, एक ट्रॅव्हल लिव्हिंगपर थी
स्वप्ना
स्वप्ना
गळक्या माठांभोवती देसी
गळक्या माठांभोवती देसी मालिकेला आकार
स्वप्ना U R ग्रेट!
केकते तू वेडी कुंभार>>>>>
नूतन, प्रसिक धन्स! समोरच्या
नूतन, प्रसिक धन्स!
समोरच्या समुदायाकडे बघत निवेदक घोषणा करतो "And now the nominations for the Best Actress category".
Annette Bening, “The Kids Are All Right”
Sally Hawkins, “Made in Dagenham”
Jennifer Lawrence, “Winter’s Bone”
Lesley Manville, “Another Year”
Natalie Portman, “Black Swan”
Halle Berry, “Frankie and Alice”
Michelle Williams, “Blue Valentine”
Nicole Kidman, “Rabbit Hole”
"May I call catherine zeta-jones on stage to announce the winner". catherine zeta-jones लांबलचक झग्याचा घोळ सावरत येते. हातात बंद Envelope. प्रेक्षकांकडे बघून मंद स्मित. मग हळूच Envelope उघडते. चेहेर्यावर भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह. गोंधळून इथेतिथे पहाते. निवेदकाला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. तो तिच्याजवळ जातो. दोघांत काही खलबत होतं. समोरच्या प्रेक्षकात आणि देशविदेशातून अॅकॅडमी अॅवार्डसचा प्रोग्राम पहाणार्या लोकांत चुळबूळ. निवेदक पुन्हा एकदा Envelope मधला पेपर वाचतो आणि catherine zeta-jones कडे पाहून होकाराथी मान हलवतो.
catherine zeta-jones स्वतःला सावरते आणि प्रेक्षकांकडे बघून पुन्हा हसते. "And the award goes to......बबाली....ऑफ...बहा..बहा...ग्या...ला...बहाग्याला...कशामी" एक लहानसा सुस्कारा "फॉर हर आउटस्टॅन्डींग परफॉर्मन्स अॅज....कॅशी". चेहेर्यावर "सुटलो बुवा"चे भाव.
समोरचे आणि देशोदेशीचे प्रेक्षक गोंधळलेले. फक्त भारतभूमीतल्या "राकट देशा, कणखर देशा" तल्या लोकांच्या आनंदाला पारावार उरत नाही.
मुंबईतल्या एका घरात एक मुलगी आपल्या आईकडे बघते आणि म्हणते "बघ, तुला म्हटलं नव्हतं, काशीला कधीही प्रत्यक्ष न पहाता, तिची वेषभूषा आणि लकबींसकट तिची बेमालूम अॅक्टींग करणार्या बबलीचा परफॉर्मन्स ऑस्करच्या तोडीचा आहे म्हणून?"
टाईम्स ऑफ मालिका: आमच्या
टाईम्स ऑफ मालिका:
आमच्या प्रतिनिधीकडूनः
कुंकू
१. किल्लेदार घराण्याचे प्रमुख नरसिंह हे मुळात किल्लेदार आहेत की नाही ह्या प्रश्नावरून किल्लेदारांच्या टोलेजंग वाड्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. हे गुपित उघड करणार्या म्हातार्याला पैसे देऊन आपण गुपित बदललं असल्याचा दावा परशूराम किल्लेदाराने नुकताच अहिल्येकडे केल्याने तिच्या पायाखालची जमिन सरकली आहे. तरी सध्या वामन किल्लेदार बायकोच्या तालाने चालत असल्याने जानकी, आत्याबाई आणि अमृता हैराण आहेत. नेहमीप्रमाणे नरसिंहाला ह्याबाबत काहीही सांगितले गेले नाहिये. जानकीची तब्येत थोडी नाजूक असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले. डीएनए चाचणीचा निकाल काय येणार? म्हातार्याला ठाऊक असलेलं गुपित काय होतं? जानकी व्यवस्थित प्रसूत होणार की नाही? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काळच देईल
२. भाग्यलक्ष्मी:
सूर्याने बिघडवलेली संजयची गाडी काशी उर्फ बबलीने दुरुस्त करून दिल्याने तो ठरल्याप्रमाणे काशीच्या मावशीच्या गावी रवाना झाला. यथावकाश मावशीची भेट होऊन प्रताप हा काशीचा मावसभाउ होता आणि काशी त्याच्याबरोबर पळून गेली हा कामिनीकाकूचा आरोप धादांत खोटा होता हे त्याला कळून चुकलं आहे. काशीवर आपण केलेल्या अन्यायाची जाणीव होऊन तो धाय मोकलून रडलादेखील.
इथे बबलीच्या घरी अचानक गुरुमाय अवतरली. तिने बबलीच्या आईला बबली म्हणजे काशीला चार देवीच्या यात्रेला घेऊन जायला सुचवलं आहे. तिथे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळंणार आहेत आणि तिच्या नशिबात सुख असणार आहे असा तिने आशिर्वाद दिला आहे.
आता वाड्यावर परत आल्यावर संजय काय करणार? चित्रा आणि मामीचं भविष्य काय असणार? काय होईल चार देवीच्या यात्रेत? बबलीच्या आईची दृष्टी परत येईल? तिला आपल्याला २ मुली झाल्या होत्या ह्याचा साक्षात्कार होईल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काळच देईल
३. माप्रिप्रिक
शमिकाने शब्द टाकल्याने आपल्याला नोकरी लागली हे लक्षात येताच स्वाभिमानी अभिबाळाने ती लाथाडली. त्यामुळे जयच्या चुगलीवरून पेंडशांच्या घरी अभिचा पाणउतारा करायला आलेल्या शमिकाच्या बापाचं नाक चांगलं ठेचलं गेलं. त्याने असल्या उठाठेवी करण्यापेक्षा आपल्या बिझिनेसकडे लक्ष द्यावं नाहीतर त्याला हातात (शमिकाने रंगवलेला) कटोरा घ्याय्ची वेळ येईल अशी संतप्त प्रतिक्रिया कॉलेजच्या कट्ट्यांवर ऐकू येत आहे. "सत्यमेव जयते" ह्या भारतमतेच्या ब्रीदाला जागून अभिला लगेच दुसरी नोकरी मिळालीदेखील. पण त्यातून माहे एक लाख प्राप्ती नसल्याने त्याने आणखी एक पार्टटाईम जॉब करण्याचा विचार केला आहे. तरी तुमच्या कंपनीत व्हेकन्सी असल्यास जरूर कळवावी ही विनंती. आत्याच्या फार्मास्युटिकल कंपनीत जॉब, मग शमिकाच्या बाबांच्या कंपनीत नोकरी असा फॅमिली बिझनेसचा तगडा अनुभव अभिच्या गाठी आहे. तसंच माठ रंगवून विकणे ह्या अत्यंत अनोख्या व्यवसायाचाही त्याने अनुभव घेतला आहे. तरी एका मराठी माणसाला अन्नाला लावल्याचे पुण्य पदरात बांधून घ्यायला अनेक मराठी माणसं पुढे येतील अशी आशा अभिला वाटत आहे.
४. लज्जा
ऐनवेळी कोर्टात वकिल कुठून आणायचा ह्या विवंचनेत पडलेल्या मनूला अॅडव्होकेट "मीरा पटवर्धन" ह्यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांनी २ वर्षांपूर्वीच वकिली शिक्षण पूर्ण केलं असल्याने त्यांना म्हणावं तितका अनुभव नसला तरी त्यांची बाजू सत्याची असल्याने त्यांचाच विजय होणार हे नक्की अशी प्रतिक्रिया समाजाच्या सर्व थरातून व्यक्त होत आहे. केस हाती घेतल्या घेतल्या त्यांनी मंगेशच्या वकिलाला भर कोर्टात चार खडे शब्द सुनावल्याने मंगेश आणि कंपनीचे धाबे दणाणले आहे. पण तरी मनूच्या घरात मंगेशचा जासूस जोवर आहे तोवर तिची बाजू लंगडीच रहाणार हे नक्की.
इन्स्पेक्टरने मीराला जपून रहायचा सल्ला दिल्यावर "मी शेळी नाही, वाघीण आहे" असं सांगणार्या मीराचा आदर्श पोरीबाळींनी समोर ठेवावा असं आवाहन सर्व क्षेत्रातल्या स्त्री व्यक्तिमत्त्वांनी केलं आहे.
व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल
व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफ़िसमध्ये स्मशानवत शांतता पसरली होती. ओबामा आणि त्यांचे सहकारी लिबिया प्रश्नावर विचार करकरून थकले होते.
"काहीच उपाय नाहीये का? तिथे यादवी युध्द भडकलं तर अमेरिकन हितसंबंधांचं काय होणार?" ओबामांनी शांततेचा भंग करत विचारलं.
"आणि तिथल्या जनतेचे हाल होतील ते वेगळेच" एकाने आठवण करून दिली.
"अं? हो, हो, तेही आहेच" ओबामा गडबडीने म्हणाले. काही वेळाने प्रेस कॉन्फ़रन्स होती त्यात हा मुद्दा विसरून चालणार नव्हतं नाहीतर घरचे आणि दारचे दोघांकडून आहेर मिळाला असता.
एव्हढ्यात दारावर टकटक झाली. दार उघडलं तेव्हा सिक्रेट एजन्ट मायबोलीकर बाहेर होता. त्याने काही न बोलता दरवाजा उघडणार्याच्या हातात एक कॅसेट दिली आणि पुन्हा मागे झाला. पुढची १० मिनिटं खोलीतलं कोणीही काहीही बोललं नाही. मग ओबामांच्या सांगण्यावरून मायबोलीकराला आत बोलावण्यात आलं.
"कोण आहे हा कॅसेटमधला माणूस?" ओबामांनी त्याला सवाल केला.
"लिबया प्रश्नावर उभ्या जगात फ़क्त हा एकच माणूस तोडगा काढू शकतो मिस्टर प्रेसिडेन्ट, सर, टेक माय वर्ड फॉर इट" मायबोलीकर गळ्याला चिमटा काढत उत्तरला.
"धिस इज मॅडनेस मिस्टर प्रेसिडेन्ट, सर. यू कान्ट टेक धिस सिरियसली" सीआयएच्या प्रमुखाने निषेध नोंदवला. बाकीच्या डिप्लोमॅट्सनी माना डोलावल्या.
"वी डोन्ट हॅव एनी अदर ऑप्शन. आय अॅम विलिंग टू टेक धिस रिस्क" ओबामा म्हणाले.
थोड्याच वेळात व्हाईट हाऊसकडून एक अधिकृत निवेदन प्रसिध्द होणार असल्याची बातमी प्रेसला लागली. पण आश्चर्य म्हणजे व्हाईट हाऊसच्या अधिकृत प्रतिनिधीऐवजी एक कोणी दुसराच माणूस बोलत होता. "मिस्टर मुअम्मर गदाफ़ी, मी व्हाईट हाऊसतर्फ़े बोलतोय पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून नाही तर तुमचा मित्र म्हणून. लिबयात जे काही चाललं आहे त्याने मला फ़ार दु:ख होत आहे. पण हे सगळं तुमच्या अधिपत्याखाली चाललंय ह्यावर माझा विश्वास बसत नाहिये. तुम्ही विसरलात का ते दिवस जेव्हा राजे इद्रिस ह्यांना सत्तेवरून खेचायला तुम्ही बंड केलं होतंत? जनता हलाखीत असताना हे राजेरजवाडे मजेत जगायचे हे पाहून तेव्हा तुमचा किती तीळ्पापड झाला होता. पण सत्ता हातात आल्यावर तुम्ही तसंच वागायला सुरुवात केलीत. का? का?" इथे त्या माणसाच्या चेहेयावरचे भाव पाहून ह्याच्या पोटात दुखतंय की काय अशी शंका काही प्रेसवाल्यांना आली. पण तो माणूस बोलतच होता "बंद करा हा मृत्यूचा खेळ. जनतेला तिचे हक्क द्या. उदार मनाने सत्तेवरून पायउतार व्हा. आपल्याच देशबांधवांच्या रोषाचे धनी होण्यापेक्षा त्यांचं प्रेम मिळवायचा प्रयत्न करा. पहा तर त्यात किती मजा आहे ते."
निवेदन संपलं तरी प्रेसचे तमाम लोक आ वासून बसले होते. ओव्हल ऑफ़िसमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. ओबामा आपला सिगरेट न ओढण्याचा पण विसरून सिगरेट शोधत होते. पण सगळ्या सिगरेटस बाकीच्या लोकांनी आधीच संपवल्या होत्या. सीआयएच्या प्रमुखाने मायबोलीकराची गचांडी धरली "यू फ़ूल, डू यू नो व्हॉट यू हॅव डन? धिस इडियट ऑफ़ युअर्स हॅज मेड अमेरिका द लाफ़िंग स्टॉक ऑफ़ द वर्ल्ड. दे मस्ट बी लाफ़िंग लाईक क्रेझी इन मॉस्कॊ. गॉड हेल्प अस ऑल." तो मुंडी कापलेल्या कोंबडयासारखं थैमान घालत असताना मायबोलीकराने "रेकमेन्ड" केलेला माणूस आत आला. म्हटल्यावर सीआयएच्या प्रमुखाने त्याच्याकडे मोर्चा वळवला.
"व्हॉट द **** मॅन? व्हॉट वेअर यू थिंकिंग? डू यू इव्हन नो द एबीसी ऑफ़ इंटरनॅशनल पॉलिटीक्स? यू विल गो डाऊन इन हिस्टरी अॅज द फ़ूल हू स्टार्टेड वर्ल्ड वॉर थ्री" त्याच्या तोंडातून फ़ेस तेव्हढा यायचा बाकी होता. ओबामांना कुठूनतरी एक सिगरेट मिळाली होती पण खुप टेन्शन आल्यामुळे ती न शिलगावता ते नुस्तेच चावत बसले होते. आत आलेला माणूस पार गांगरून गेला होता. त्यामुळे त्याच्या आधीच "बापुडवाण्या" चेहेर्यावर आणखीन दीनवाणे भाव आले होते. ह्या सगळ्या गोंधळात मायबोलीकर मात्र शांतपणे भिंतीला टेकून हाताची घडी घालून उभा होता.
पुन्हा दारावर टकटक झाली. दार उघडताच एक एजन्ट धावतच आत आला आणि "मिस्टर प्रेसिडेन्ट, सर, यू शुड सी धिस" असं म्हणत त्याने ऑफ़िसमधला टीव्ही लावला. लिबियाहून थेट प्रक्षेपण सुरू होतं. स्वत: मुअम्मर गदाफ़ी बोलत होते. त्यांनी आपले डोळे उघडल्याबद्दल अमेरिकेच्या प्रतिनिधीचे सर्वप्रथम आभार मानले. मग खुल्या दिलाने आपली चूक कबूल केली. हिंसाचारात बळी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांची माफ़ी मागितली. त्यांना नुकसानभरपाई जाहिर केली. आपल्या गुन्ह्यांसाठी लिबियाची जनता जी शिक्षा देईल ती भोगण्याची तयारी दर्शवली. स्विस बॅन्केत असलेला आपला पैसा मायदेशात आणून जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याचं जाहिर केलं आणि सर्वात कळस म्हणजे ह्यापुढे लिबया लोकशाहीच्या मार्गाने जाणार असल्याची घोषणा केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी पुन्हा अमेरिकेच्या प्रतिनिधीचे आभार मानले आणि त्याला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. लिबयाच्या शहराशहरांतून आनंदाने बेभान होऊन नाचत असलेल्या नागरिकांवर कॅमेरा स्थिरावताच ओबामांनी टीव्ही बंद केला.
आता खोलीतल्या सगळ्या माणसांचे डोळे "त्या" माणसावर होते. सगळे त्याच्याशी हस्तांदोलन करायला धडपडू लाग्ले. हे सगळं पाहताच सीआयएच्या प्रमुखाने खोलीतून काढता पाय घेतला.
ओबामांच्या ओठांतून सिगरेट खाली पडली. "त्या" माणसाजवळ जात त्यांनी त्याला मिठीच मारली. "यू आर सो गुड अभि, आय लव्ह यू मॅन"
अर्जुनाचं सुभद्रेवर आणि
अर्जुनाचं सुभद्रेवर आणि सुभद्रेचं अर्जुनावर मन जडलं होतं. दोघांनीही विवाह करायचं ठरवलं. पण "मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी" ही म्हण बापड्या बलरामदादाला माहित नव्हती. त्यामुळे त्याची ह्या लग्नाला संमती नव्हतीच. पण "संमती देत नाही जा" असं अर्जुनाला ठासून सांगण्याऐवजी त्याने एक अट घातली "एका महिन्यात स्वकमाईने एक लाख सुवर्णमुद्रा आणून दिल्यास तर तुझं लग्न सुभद्रेशी लावून देईन". बिचारा अर्जुन! करतो काय? झाला तयार.
कृष्णाचा आशिर्वाद घ्यावा म्हणून त्याच्याकडे गेला. सगळी कहाणी ऐकून कृष्ण गालातल्या गालात हसला. मग बासरीची एक हलकी लकेर छेडत म्हणाला. "तू खरंच ही अट पूर्ण करणार?" अर्जुन म्हणाला "माझ्याकडे दुसरा पर्याय नाही वासुदेवा. मी काहीही करेन. धनुर्धारींसाठी असलेल्या स्पर्धांतून भाग घेईन, राजकुमारांना धनुष्यविद्येचं शिक्षण देईन पण एक महिन्यात एक लाख सुवर्णमुद्रा बलरामदादाला आणून देईन, मग ते सुभद्रेचा हात माझ्या हातात देतील"
कृष्ण पुन्हा एकदा हसला "तुझी खात्री आहे बलरामदादा खरंच असं करतील?" अर्जुन गोंधळला. "म्हणजे? काय म्हणायचंय तुला वासुदेवा?"
"तू अभि-शमिकाची कहाणी ऐकली आहेस का?" कृष्णाने विचारलं.
"अभि-शमिका? कोण आहेत ते?" अर्जुनाने विचारलं.
"कलियुगात एक प्रेमी युगुल होऊन गेलं. त्यांचंही एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. शमिकाच्या २ बहिणींचंही अभिवर जीवापाड प्रेम होतं. सुभद्रेला बहिणी नाहीत ते तुझं नशीब. असो. तर शमिकाच्या वडिलांना अभि-शमिकाचं लग्न पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांनी बलरामदादासारखीच एक लक्ष रुपये, म्हणजे, कलियुगातलं चलन बरं का, तर एक लक्ष रुपये एक महिन्यात स्वकमाईने मिळवून आणायची अट अभिला घातली. तो ही तयार झाला. काय नाही केलं बिचार्याने. २-२ नोकर्या केल्या. शेवटी एका जीवघेण्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाला. पण देवाच्या दयेने, कलियुगात तोवर देवाकडे थोडीफार दया शिल्लक होती बरं का,तर देवाच्या दयेने त्याला त्याच्या कचेरीतून उत्तम सेवा केल्याचं पारितोषिक मिळालं, तेही नेमकं एक लक्ष रुपये!"
"मग? झालं ना त्याचं शमिकाशी लग्न?" अर्जुनाने अधीर होत विचारलं. अभि-शमिकाविषयी त्याला एव्हाना आपुलकी वाटू लागली होती.
"इथेच चुकतो आहेस तू पार्था" मान हलवत कृष्ण म्हणाला. मुकुटावरचं मोरपीस हिंदकळलं. "शमिकाच्या वडिलांनी त्या दोघांचं लग्न करून द्यायला नकार दिला."
"नकार दिला? मग पुढे काय झालं?" अर्जुनाने विचारलं.
"अभि-शमिकाने शमिकाच्या बहिणीचा खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी अभिने शमिकाच्या बहिणीशी लग्न करायला तयार असल्याचं दाखवावं असं ठरवलं. पण ते तितकंसं महत्त्वाचं नाहिये कारण सुभद्रेला बहिण नाही. ह्यातून हाच बोध घे की तू ही अट पूर्ण केलीस तरी दादा तुझं सुभद्रेशी लग्न लावून देतीलच असं नाही."
"मग, मी काय करू" अर्जुनाने व्याकूळ होत विचारलं.
"सुभद्राहरण" कृष्ण ठामपणे म्हणाला.
आणि म्हणून महाभारतात सुभद्राहरण झालं!
Pages