मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.
वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.
वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.
वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.
-----
गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."
"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.
"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"
"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."
बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"
कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"
कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.
"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.
इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.
तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.
रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.
स्वप्ना भन्नाट गं... एकदम
स्वप्ना भन्नाट गं... एकदम सुसाट...
>>ते दोघे हनीमूनला गेलेत
>>ते दोघे हनीमूनला गेलेत म्हणजे मालिकेतून गायब झालेत की अख्ख युनिट घेउन हनीमूनला गेलेत.
मालिकेत आहेत ना. त्या अर्चनाच्या बहिणीचा नवरा आहे ना तो एक गुजराती माणूस त्याची आधीची बायको आणि मुलगा पुण्यात आहेत आणि त्यांची आणि मानव-अर्चनाची नेमकी गाठ पडली आहे. आता दादोजी कोंडदेव पुतळा वाद मिटवायला मानव-अर्चनाने मध्यस्थी केलेली सुध्दा दाखवतील. काही नेम नाही.
सगळ्यांना प्रतिसादाबद्द्ल धन्स!
"महाराज, सेवकाचा प्रणाम
"महाराज, सेवकाचा प्रणाम स्वीकारावा"
"कोण? संजय? आज इतक्या रात्री? सगळं क्षेम आहे ना?"
"होय महाराज, चिंता नसावी. महाराणी गांधारीदेवींनी निरोप पाठवला म्हणून आलो. यायला अंमळ उशीर झाला"
"महाराणीने निरोप धाडला? मला काही बोलली नाही ती" असं धृतराष्ट्र म्हणतो आहे तोवर तिथे गांधारी येते.
"महाराणी, प्रणाम. यायला उशीर झाला त्याबद्दल माफ़ी असावी."
"माफ़ी आहे पण कृपा करून उद्या उशीरा येऊ नका. ७ आणि ७:३० च्या सिरियल्समध्ये आज काय झालं कळलं नाहिये. उद्या चुकायला नको"
"म्हणजे? अग नक्की कशासाठी बोलावलं आहेस तू संजयला?"
"इश्श, अहो असं काय करताय? २ दिवसांपासून सगळ्या हस्तिनापुरातलं केबल ट्रान्समिशन बंद नाही का झालंय. चैन पडत नाहिये मला. सारखं आपलं वाटत रहातं - जानकीची तब्येत ठीक असेल ना? काशीला त्रास द्यायची काय नवी युक्ती तिचा दीर, जाऊ आणि सासू शोधून काढत असतील? अभि दुबईला गेला असेल का? मनूची साक्ष कशी झाली असेल? अर्चना आणि मानव पुण्याला नीट पोचले असतील ना? नीता व्हॊल्वोने गेले म्हणजे काळजी नाही म्हणा. असो. तर संजय असले म्हणजे कुठल्या मालिकेत काय चाललंय ते कळेल म्हणून त्यांना म्हटलं केबल ट्रान्समिशन परत चालू होईतो रोज संध्याकाळी ७ ते ९:३० आमच्याकडे रहा आणि एकदम जेवूनच जा"
"अरे देवा!" धृतराष्ट्र एव्हढंच बोलू शकतो कारण गांधारी त्याला "आता जरा मला शांतपणे ऐकू द्या नाहीतर शकुनीकडे जाउन बसा द्यूत खेळत" असं दटावते.
"नको, नको, त्यापेक्षा मी इथेच बरा आहे"
"हं संजय, करा सुरू"
"पेंडश्यांचं घर. घरातली सगळी मंडळी दिवाणखान्यात जमली आहेत. अभिची आई त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभि त्याच्या बाबांकडे काळजीने पहातोय. अभिची आजी त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. शमिका अभिच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभिची मोठी बहिण त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभिच्या मोठ्या बहिणीचा नवरा अभिच्या बाबांकडे काळजीने पहातोय.अभिची धाकटी बहिण त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभिचा मित्र....."
"कळलं रे, पुढे सांग की.." धृतराष्ट्र वैतागून म्हणतो.
"तुम्ही चूप बसा हो. त्यांचं काही ऐकू नका तुम्ही संजय. संध्याकाळी बातम्या ऐकताना आज ह्या मंत्र्याने पैसे खाल्ले, उद्या त्याने पैसे खाल्ले हे ऐकताना ह्यांना कंटाळा येत नाही. पण महालातली सगळी कामं आटोपुन मी सिरियल्स पहाते म्हटलं की ह्यांच्या "डोळ्या"त येतं लगेच. तुम्ही जा बरं शकुनीकडे"
"राहिलं" धृतराष्ट्र हताश होऊन.
"अभिचे बाबा सांगताहेत ’मी हे घर गहाण टाकलंय’. अभिची आई त्याच्या बाबांकडे अवाक होऊन पहातेय. अभि त्याच्या बाबांकडे अवाक होऊन पहातोय. अभिची आजी त्याच्या बाबांकडे अवाक होऊन पहातेय. शमिका अभिच्या बाबांकडे अवाक होऊन पहातेय. अभिची मोठी बहिण...."
"परत अडकली का रेकॊर्ड तुझी?"
"महाराज, माझ्या दिव्य दृष्टीला जे दिसतंय तेच सांगतोय हो" संजय व्याकूळ होऊन म्हणतो.
"अगबाई? घर गहाण का टाकलं अभिच्या बाबांनी? पुढे सांगा हो लवकर"
"अभिची आई बाबांना विचारते्य ’अहो, असं का केलंत?’. अभि बाबांना विचारतोय ’बाबा, असं का केलंत?’. अभिची आजी त्याच्या बाबांना...."
"देवा रे! केबल बंद पडलं तेव्हा मी किती खूश होतो. आता वाटतंय की मी आंधळा असण्याऐवजी बहिरा असायला हवा होतो." धृतराष्ट्र महालातून निघून जाता जाता म्हणतो.
मूळ शेरः यू तो सरे राह चलते
मूळ शेरः
यू तो सरे राह चलते कितने लोग मिलते है
जिसके लिये घरसे निकले, कोई ऐसा भी तो हो
शायराची माफी मागून बदललेला शेरः
अर्ज किया है......
यू तो केबलपर कितने चॅनेल्स आते है
जिसके लिये चॅनेल लगाये, कोई ऐसा प्रोग्राम भी तो हो
स्वप्ने मी आजच महाभारत पहात
स्वप्ने मी आजच महाभारत पहात होते स्टार उत्सववर
बी. आर. चोप्रांच्या ऐवजी तुझे डायरेक्शन आणि डायलॉग वाजत होते कानात 
शप्पे तु पण लिहि ना, भारी
शप्पे तु पण लिहि ना, भारी भारी.
स्वप्ना_राज- जबरी लिहिता तुम्हि, हसुन हसुन पोट दुखायला लागते. हापिसात बसुन वाचायची काही सोय नाही
स्वप्ना, मी वाचतोय.
स्वप्ना, मी वाचतोय. मालिकेंबद्दल बित्तंबातमी मिळवायला माझ्याकडे दुसरे कुठलेच साधन नाहि.
माया (मुग्धानंद) , मला
माया (मुग्धानंद) , मला लिहायचा आणि टायपायचा भारी कंटाळा आहे तुला ठाऊक आहेच ना...!!नको पुन्हा त्या लिखाणाच्या आठवणी काढू
"कुठे अडकले हे चौघे जण? किती
"कुठे अडकले हे चौघे जण? किती वेळ झाला. थोड्या वेळाने सूर्यास्त देखील होईल" अस्वस्थपणे येरझाया घालत युधिष्ठीर स्वत:शीच उद्गारला.
तहान लागल्यामुळे पाणी शोधायला सगळ्यात आधी सहदेव गेला होता. तो परत आला नाही म्हणून त्याला शोधायला नकुल, मग भीम आणि सर्वात शेवटी अर्जुन गेला. बराच वेळ झाला तरी चौघातील एकही जण परत न आल्यामुळे युधिष्ठीराची काळजी वाढत चालली होती. शेवटी त्याने स्वत:च जाऊन पहायचा निश्चय केला. जंगलातून थोडं अंतर कापताच एक सुंदर तळं द्रृष्टीपथात आलं. पण जवळ जाऊन बघतो तर काय, त्याचे चारही भाऊ काठावर निपचित पडलेले. युधिष्ठीराला दु:खावेग आवरेना. तळ्याचं पाणी पिऊन त्यांचं मरण ओढवलं असेल तर तेच पाणी आपणही प्यावं असा विचार करून तो तळ्याच्या पाण्यात उतरला तोच त्याला शब्द ऐकू आले.
"थांब युधिष्ठीरा, तुला ते पाणी पिता येणार नाही"
"कोण आहे? काय झालंय माझ्या भावांना? समोर येऊन बोला"
"मी ह्या तळ्याचं रक्षण करणारा यक्ष. तुझ्या भावांनी माझ्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांना आपले प्राण गमवावे लागले" उत्तर आलं.
"कसली सूचना?"
"माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाहीत तर ह्या तळ्याचं पाणी तुम्हाला प्राशन करता येणार नाही. तसं केल्यास म्रृत्यू ओढवेल. नाही ऐकलं त्यांनी. तू देशील माझ्या प्रश्नांची उत्तरं? दिलीस तर तू सांगशील त्या २ भावांना मी जिवंत करेन"
"विचारा."
यक्ष प्रश्न विचारत गेला आणि युधिष्ठीर उत्तरं देत गेला.
शेवटी यक्ष म्हणाला "शाबास युधिष्ठीरा, आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू अचूक दिलीस. आता शेवटचा एकच प्रश्न. तीच तीच न संपणारी कथानकं असूनही टीव्हीवर लागणाया मालिका चालतात तरी कश्या?"
"अरे देवा!" युधिष्ठीर कपाळाला हात लावून म्हणाला "ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही आणि कधी सापडेल असंही वाटत नाही"
तात्पर्य काय तर ज्या प्रश्नाचं उत्तर युधिष्ठीराला सापडलं नाही त्याचं उत्तर तुम्हाआम्हाला काय मिळणार? आपण फक्त आशा करू शकतो की २०११ मध्ये काही चांगलं पहायला मिळेल. क्योंकी उम्मीदपे दुनिया कायम है!
इसी बातपे एक शेर हो जाये: मूळ
इसी बातपे एक शेर हो जाये:
मूळ शेर:
अर्ज किया है......
हमसे पूछनी है तो सितारोकी बात पूछो
ख्वाबो की बात तो वो करते है जिन्हे नींद आती है
शायराची माफी मागून बदललेला शेरः
अर्ज किया है......
हमसे पूछना है तो झी और सोनीकी बात पूछो
डिस्कव्हरी, नॆटजिओ की बात तो वो करते है जिनके पास रिमोट होता है
प्रतिसादाबद्द्ल सगळ्यांना धन्स! आता भेटू यात २०११ मधे!
स्वप्ना..................खूप
स्वप्ना..................खूप वेळा लिहिलंय ...तरी परत...........
तू अशक्य आहेस!
धन्स मानुषी! एक साड्यांचं
धन्स मानुषी!
एक साड्यांचं दुकान. नवरा-बायको आत शिरतात. दुकानदार प्रेमाने स्वागत करतो (तो मराठीच असतो हं!).
"या, या, काय दाखवू"
"तुमच्याकडे नऊवारी साड्या आहेत का हो?"
इथे नवरा दचकतो. "नऊवारी? अग सुभाषच्या लग्नात तू नऊवारी नेसून फिरणार आहेस?"
"का काय झालं? मी काय बिकीनी मागितली का एव्हढं दचकताय ते? चांगलं मराठमोळं नऊवारी नेसणार आहे. तुमच्या आईला सांगा, निदान सुनेची एक तरी गोष्ट पसंत पडेल त्यांना" मानेला झटका देते. नवरा मौनव्रत धारण करतो. दुकानदार त्याच्याकडे सहानुभूतीचा एक कटाक्ष टाकून मोर्चा बायकोकडे वळवतो.
"हो, हो, आहेत की. दाखवतो हा"
दुकानदार आतून गठ्ठा घेऊन येतो. खूप वेळ रंग, पोत वगैरे सोपस्कार पार पाडल्यावर एकदाचं बायकोला एक नऊवारी पसंत पडतं. "हं, हे छान आहे."
नवर्याने टाकलेला निश्वास दुकानदार ऐकतो. दुकानदाराने टाकलेला निश्वास नवरा ऐकतो. बायको नऊवारी उघडून बघते.
"अगबाई, हे नाही पुरायचं. स्मॉल साईझ आहे वाटतं. ह्यात मिडियम साईज आहे का?"
"ऑ?" दुकानदार आ वासून बघतो.
"मिडियम साईज" बायको ठासून सांगते.
"अहो वहिनी, नऊवारीत स्मॉल, मिडियम, लार्ज असं काही येत नाही" बाईचा नवरा सीतेप्रमाणे धरती दुभंगायची वाट पहात असतो.
"कसं येत नाही? कालच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये ती डॉली बिन्द्रा काय ह्या साईजचं नऊवारी नेसली होती का मग?"
नवर्याने टाकलेला निश्वास
नवर्याने टाकलेला निश्वास दुकानदार ऐकतो. दुकानदाराने टाकलेला निश्वास नवरा ऐकतो.:D
लार्ज नऊवारी?:D
स्वप्ना , खिचडीमध्ये जयश्री आणि हंसानी एका नव्या फॅशन डिझायनरच्या साड्यांचा फॅशन शो करण्यासाठी अतिविशाल महिलांना मॉडेल म्हणून घेतले होते. त्यातल्या काही तर दोन किंवा अधिक साड्या गुंडाळून आल्या आहेत असे वाटले होते.
भरत काल डॉलीला पाहून मला
भरत
काल डॉलीला पाहून मला अगदी हेच वाटलं.
"काय भेंडे, झाला का आमचा
"काय भेंडे, झाला का आमचा चष्मा रेडी?" विश्वासरावांनी दुकानात गेल्या गेल्या विचारलं.
भेंडे पेपरातून डोकं वर काढून बघताहेत तोच एक बाई घाईघाईने दुकानात शिरली.
"तुमच्याकडे चश्म्याचा नंबर तपासून मिळेल का हो?"
"मिळेल की."
"पण नीट तपासता ना तुम्ही? नाही म्हणजे त्या दृष्टी ऑप्टिक्स, तिरोडकर किंवा भंगर ऑप्टिशियन्सकडे चांगला अनुभव नाहिये माझा"
"तुम्ही दृष्टी, तिरोडकर, भंगर सगळ्यांकडे जाऊन आलात?" भेंड्यांनी अविश्वासाने विचारलं.
"तर काय, गेले २ दिवस तेच तर करतेय. सगळे आपले सांगतात तुमचा नंबर बरोबर आहे. वैतागलेय नुस्ती."
भेंड्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बाईला विचारलं "तुम्ही झी मराठी बघता का हो?"
"अय्या, तुम्हाला कसं माहित?"
"आणि माझिया प्रियाला प्रीत कळेना?"
"माझी आवडती सिरियल, तुम्ही काय चेहेर्यावरून हे असं ओळखता की काय?"
"तसंच समजा हवं तर. पण मग मी खात्रीने सांगतो की तुमचा नंबर अगदी बरोबर आहे. आमच्याकडे टेस्ट करूनही तुम्हाला हाच निष्कर्ष मिळेल."
"ते काही नाही, मला टेस्ट करायची आहे."
"बरं मग, जा आत" भेंडे हताश होऊन म्हणाले.
ती बाई आता जाताच मात्र विश्वासरावांना रहावेना "भेंडे, आहे काय ही भानगड? चश्म्याच्या नंबरचा आणि झी मराठीच्या त्या सिरियलचा काय संबंध?"
"सांगतो, सांगतो, अहो गेल्या २ दिवसातली ही १० वी बाई. सगळ्यांची हीच तक्रार. चश्म्याचा नंबर वाढलाय का पहा. चेक केलं तर नंबर बरोबर. पहिल्या ४ केसेसनंतर हैराण झालो आम्ही. शेवटी पाचव्या बाईला कारण विचारलं तर म्हणते कशी - अहो त्या 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधल्या 'जय' ला सोडून सगळ्या मुली 'अभि'च्या मागे लागताहेत. आधी शमिका, मग रिया, मग आशू आणि आता प्रिया. मला वाटलं की मलाच अभिचा चेहेरा नीट दिसत नाहिये. म्हणून आले चेक करायला"
एव्ह्ढ्यात आत गेलेली बाई मोबाईलवर बोलत बाहेर आली "अहो, इथे पण तेच सांगताहेत. तुम्ही एक काम करा, त्या टीव्ही मेकॅनिकला बोलावून घ्या. म्हणावं चित्र नीट स्पष्ट दिसत नसावं बहुतेक. बघू त्याच्याकडून काही होतं का नाहीतर विजय सेल्स्मध्ये नवा टीव्ही पाहू ह्या विकेन्डला"
वि.सू. - प्रेम हे फक्त चेहेर्यावरच करता येत असं नाही तर अंगच्या गुणांमुळेही एखादी सुमार चेहेर्याची व्यक्ति समोरच्याला प्रेमात पाडू शकते हे एकदम कबूल. पण त्यासाठीही बर्याचदा काही काळ जावा लागतो. त्यामुळे दिसेल ती मुलगी पहिल्या १-२ भेटीतच अभिच्या प्रेमात पडते "ये बात कुछ हजम नही हुई".
स्वप्ना चष्म्याची गरज 'त्या'
स्वप्ना चष्म्याची गरज 'त्या' मुलींना आहे.
किंवा बुबुळावरचे पडदे साफ करून घेण्याची लेझर ट्रीटमेंटची
मस्तच नेहमीप्रमाणे
मस्तच नेहमीप्रमाणे
अगदी अगदी स्वप्ना प्रेम हे
अगदी अगदी स्वप्ना प्रेम हे इतकं आंधळं असतं यावर विश्वासच नाही बसत..त्या गोंडस जयला सोडून त्या घामट (हो हो घामट ...मला नेहमी तो आला की असे वाटते की नाकावर रुमाल ठेवावा नाहितर तिथेच भोवंड येईल...मला )अभिमध्ये काय पहातात या मुली कोण जाणे:(
मस्तच लिहिलय...
मस्तच लिहिलय...
अरे कोणीतरी आवरा या बयेला काय
अरे कोणीतरी आवरा या बयेला काय सुटलेय...
अगं स्वप्ना राणी हापीसात गडाबडा नाही लोळता येत...
घरी नेट घेते... मग लोळता येईल (नवरा "त्यापेक्षा टिव्ही घेतो, झी मराठी बघुयात" असं कुजकट बोलेल ती वेगळी गोष्ट!) अशक्य आहेस गं बाई तू...
ते नऊवारी चं अशक्य हसलेय गं बाई माते तुला कोदं सादं नैवेद्य जे काय हवं ते... तुस्स्सी ग्रेट हो!!!
घामट??? अगदी अगदी
घामट??? अगदी अगदी स्वप्ना_तुषार!! पिंपल्स कित्ती हैत नै चेहर्यावर...!!! चौघींपैकी एकही त्याला क्लीन अँण्ड क्लीअर वापरायला का सांगत नाही ती केकताच जाणे!!!!
सही आहेस तु स्वप्ना... लिहित
सही आहेस तु स्वप्ना...
लिहित रहा.. आणि आम्हाला हसवत रहा...
आई शप्पत! कसलं भन्नाट
आई शप्पत! कसलं भन्नाट लिहिलयं!
अशक्य गं ......! मज्जा
अशक्य गं ......!
मज्जा येतेय.लिहिती रहा
स्वप्ना
स्वप्ना
मंडळी धन्स यहासे पचास पचास
मंडळी धन्स
यहासे पचास पचास कोस दूर गावमे जब बच्चा रातको रोता है तो सीमा परिहार कहती है "बेटा सो जा, सो जा नही तो डॉली बिन्द्रा आ जायेगी"
पोखरणची चाचणी यशस्वी झाल्यावर
पोखरणची चाचणी यशस्वी झाल्यावर एक संदेश पाठवला गेला. तो होता ’आणि बुध्द हसला’. ह्या ऐतिहासिक घटनेप्रमाणेच एक घटना माप्रिप्रिकमध्ये काल घडली - आणि आशूदी बोलली. नाही, नाही, तिला आपल्याला कोणी ढकललं ते नाही आठवलं. तिला बालपणीची एक घटना आठवली आणि ती एकदम हिस्टेरिकल झाली. "ममा नको ना" असं १०० एक वेळा ओरडून झाल्यावर डॉक्टर नर्ससहित अभिच्या घरात अवतरले आणि त्यांनी तिला एक इंजेक्शन दिलं. मग अभिबाळने शेजारी साक्षात शमिका असताना चक्क आशूदीच्या कपाळावर हात ठेवून तिला शांत व्हायला सांगितलं. अरे बहिण कोणाची? तुझी का तिची? पण अभिबाळ हिरो असल्याने त्याचा हेतू शुध्द आहे हे मायबाप प्रेक्षकांनी समजून घ्यायचं. असो. तर शमिकाने सुध्दा शांत व्हायला सांगितल्यावर आशूदी शांत झाली. अभिबाळाने तिला शांतपणे सगळं सांगायला सांगितलं. असं सगळं "ओम शांति ओम" झाल्यावर अभिने डॉक्टरकडे पाहिलं. डॉक्टरने नर्सकडे पाहिलं. ती बाहेर गेली पण डॉक्टर रूममध्येच. रूमचा दरवाजा बंद करायची कोणी तसदी घेतली नाही. ते का ते चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलं असेलच.
तर आशूदी सांगू लागली की ती लहान असताना (साधारण ९-१० वर्ष) कॅमेरातले फ़ोटो पहात असताना ममा (सॅन्डी) आणि तिच्या वडिलांचं भांडण झालं. ममा रियाला घेऊन घर सोडून जायला निघाली. तिच्या वडिलांनी रियाला द्यायला नकार दिला, तिला शमिकाशेजारी नेऊन झोपवलं आणि ममाला घराबाहेर जायला सांगितलं. ममाने लगेच पिस्तूल काढलं. आशूदी सोफ़्यामागे बसून हे पहात होती. ममाने पिस्तूल रोखलं आणि एकदम वडिलांना गोळी लागली. तो कॅमेरा कुठे गेला ते म्हणे आशूदीला माहित नाही. तो कशाला हवाय ते मला माहित नाही. त्यात फ़ोटो अस्तील बहुतेक. आता आशूदी २७-२८ आहे म्हटली तरी जवळजवळ २० वर्षांपूर्वीचा कॆमेरा आता कुठे शोधणार आणि तो आता चालत असेल का हे प्रश्न आपण विचारायचे नाहीत. गोळी लागलेल्या माणसाच्या शरीरातून रक्ताचा टिपूस नाही. का ते आपण विचारायचं नाही.
शमिका आशूला सांगते की डॅडी जिवंत आहेत. आशूचा विश्वास बसत नही. शमिका आणि अभि उठणार एव्हढ्यात रियाचा आवाज येतो "ममा". दरवाजा उघडा असल्याने ममाने सगळं ऐकलंय. मग २ मिनिटं कॅमेरा अभी, शमिका, ममा सगळ्यांच्या चेहेयावर आळीपाळीने फ़िरला.
आता ममाला जाब कोणी विचारायला हवा?
अ. शमिका.
ब. रिया.
क. अभि.
शमिकाच्या सख्ख्या वडिलांना रियाच्या सख्ख्या आईने मारलंय त्यामुळे उत्तर अ किंवा ब हवं, बरोबर? चूक. उत्तर आहे क. अभि हॉलमध्ये ममांना जाब विचारतोय. ते पण त्याच्या घरच्यांसमोर. शमिका आणि रिया गप्प. मग ममा म्हणतात ’पण अनिरुध्द (म्हणजे शमिकाचे वडिल) जिवंत आहे’. अभि म्हणतो ते तुम्हाला मी सांगितल्यावर कळलं. अभिचा चेहेरा नेहमीप्रमाणेच "कायमचूर्ण" ची गरज असल्यासारखा. आपण ममांना शमिकाचे वडिल जिवंत आहेत हे सांगून गाढवपणा केला होता हे त्याच्या गावीही नाही.
हे लोक रुमचा दरवाजा लावत नाहीत तसंच घराचा दरवाजा पण लावत नाहीत त्यामुळे शमिकाचे वडिल दरवाज्यात दत्त म्हणून उभे रहातात. आता पुढल्या एपिसोडमध्ये हॉलमध्ये असलेल्या सगळ्यांच्या चेहेयावरून कॅमेरा फ़िरेल आणि मग कमर्शियल ब्रेक होईल. जय हो बालाजीकी!
>>>> "पेंडश्यांचं घर. घरातली
>>>> "पेंडश्यांचं घर. घरातली सगळी मंडळी दिवाणखान्यात जमली आहेत. अभिची आई त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभि त्याच्या बाबांकडे काळजीने पहातोय. अभिची आजी त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. शमिका अभिच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभिची मोठी बहिण त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभिच्या मोठ्या बहिणीचा नवरा अभिच्या बाबांकडे काळजीने पहातोय.अभिची धाकटी बहिण त्याच्या बाबांकडे काळजीने पहातेय. अभिचा मित्र....."
<<<
अशक्य पोस्ट आहेत या! प्रचन्ड हसलो (मनातल्यामनात)
हे अस्ले पुतळे ज्यात्या सिरियलमधे पाहिले की मस्तकाची शीर तडातडा उडते, पण काय करणार? कुटुम्बकबिला (मेन्दू गहाण ठेऊन) अगदी तन्मयतेने या सिरीयल्स पहात अस्तो!
मस्तच...
क्लासिक...अगदी कायमचूर्ण
तुम्ही खरच सॉलिड आहात..हे वाचले की खरच एपि बघायची गरज भासत नाही..
Pages