गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मत्स्यगंधा ते महानंदा सगळी गाणी पं जितेंद्र अभिषेकींची आहेत का?
कैवल्याच्या आणि सर्वात्मका सर्वेश्वरा....
बोलायला काही नाही.

महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात नाट्यसंगीतांनी फार मोठा हातभार लावला आहे (अनेक नाट्यगीतांबद्दल मी सविस्तर लिहिले होते, इथेच) प्रत्यक्ष रंगमंचावर गाणे आणि तेच गाणे एखाद्या मैफिलीत गाणे, यात फरक असतो. आणि मैफिलीत हे कलाकार जास्त खुलतात. पुर्वी बुधवारी रात्री साडेदहा वाजता नाट्यपराग असा कार्यक्रम असे रेडीओवर. त्यात अशी प्रत्यक्ष आकाशवाणी च्या केंद्रावर रेकॉर्ड केलेली गाणी असत.
नाट्यगीते रसिकांना इतकी आवडत की शास्त्रीय संगीत गायक देखील मैफीलीत काहि नाट्यपदे गात असत. असतात. माझ्याकडे अनेक शास्त्रीय कलाकारांनी गायलेली नाट्यपदे आहेत. या कलाकारांनी, क्वचित भुमिका केल्याही असतील, पण प्रमाण कमीच.
मालिनी राजूरकर, भीमसेन जोशी, भार्गवराम आचरेकर (हे कट्यार काळजात घुसली मधे भुमिका करायचे) प्रभाकर कारेकर, माणिक वर्मा, कुमार गंधर्व, आशा भोसले, नीलाक्षी जूवेकर,शोभा गुर्टु असे अनेक कलाकार आहेत.
आशा खाडिलकर आणि अजित कडकडे सारखे काहि कलाकार तर नाट्य कलाकार म्हणून आले आणि पुढे शास्त्रीय गायक म्हणून जास्त यशस्वी झाले.
ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार, राम मराठे हे तर दोन्ही आघाड्या एकाचवेळी संभाळत असत.
योगेशला मी एक नाट्यगीत पाठवले आहे, (हो अगदी खास आहे) त्याला मिळाले असेल, तर बाकिच्यांनी घ्या त्याच्याकडून..

अरुपास पाहे रुपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरुनी राहे अनादी अनंत..

गीष्म रक्त पेटविणारा
शिशीर आग गोठविणारा
मनोगते मेळविणारा
फुलारी वसंत.. अनादी अनंत..

कुशीमध्ये त्याला घ्यावे
मिठीमध्ये त्याच्या जावे
शाश्वतात विरुनी जावे
सर्व नाशवंत..अनादी अनंत..

श्रीकृष्ण पारगावकर यांनी गायलेलं हे गाणं, चाल ,अर्थ दोन्ही छान आहेत्.आकाशवाणीवर नेहेमी लागायचे.याचे बहुतेक पहिले कडवे मी विसरतेय,कुणाला माहिती आहे का? संगीतकार कोण?

मत्स्यगंधा ते महानंदा सगळी गाणी पं जितेंद्र अभिषेकींची आहेत का?>>>> होय, सगळीच गाणी अभिषेकी बुवांची आहेत.

दा, धन्यवाद अधिक माहितीबद्दल आणि नाट्यगीताबद्दल.

योगेशला मी एक नाट्यगीत पाठवले आहे, (हो अगदी खास आहे) त्याला मिळाले असेल, तर बाकिच्यांनी घ्या त्याच्याकडून..>>>> धन्यवाद दा. Happy मी ऐकुन प्रतिसाद देतो.

के अंजली...

छान गाणं 'जागं' केलंत...
मुळात हे गाणं चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलय, जे रेडिओवर सक्काळि-सक्काळि लागयचं...
श्रीकांत पारगावकर (श्रीकृष्ण पारगावकर नव्हे), यांची गाणी वेगळिच आहेत...

माझ्या अंदाजा प्रमाणे अरुपास पाहे रुपी तोच भाग्यवंत या गाण्याचे संगितकार बाळ बर्वे आहेत... चु. भु. दे. घे...

याचं पहिलं कडवं: - (आठवतंय तेव्हढं लिहितोय)
कधी पावसाच्या धारा,
भणाणता केव्हा वारा,
पहाटेस होऊन तारा,
उजळी आसमंत... अनादी अनंत...

पं कुमार गंधर्वांनी गायिलेली भावगीते
१) अजूनी रुसून आहे -
२) प्रेम केले काय हा झाला गुन्हा
३) कोणा कशी कळावी वेडात काय गोडी
४) आज अचानक गाठ पडे
पं वसंतराव देशपांडे
१) बगळ्यांची माळ फुले
२) राहिले ओठातली ओठात वेडे शब्द माझे
३) वाटेवर काटे वेचीत चाललो....(ही गझल आहे ना? आणि गझल गायकीही?)
४) कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा
बालगंधर्व आणि मा. दीनानाथ यांच्या गायकीबद्द्ल फक्त ऐकऊन आणि वाचून. आकाशवाणीवर त्यांची जी गाणी लागतात त्यत ध्वनिमुद्रणामुळे फार काही (माझ्यापर्यंत तरी) पोचले नाही. पण या दोघांच्या गायकीचा आनंद कुमार आणि पं वसंतरावांच्या नाट्यगीत गायनात घेता येतो. कुमारांनी मला उमजलेले बालगंधर्व मांडले.

कुमार गंधर्व आणि वसंतराव.. दोघांचीही भावगीते अतिशय ग्रेट आहेत. फक्त तेच गाऊ शकतात.

वसंतरावांची कट्यार मधली गाणीही छान आहेत. तेजोनिधी लोहगोल सगळ्यात जास्त आवडते.

वा! भरत,तुमच्याकडे एक से एक गाण्यांचे कलेक्शन आहे!
कुमार गंधर्वांच्या गायकीने नटलेली ही नाट्यपदे खरचं खास आहेत!

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात हे पं. वसंतराव देशपांडे यांचे माझे सर्वात आवडते गाणे. हे गाणे ऐकायला जेव्हढे सोपे वाटते त्यापेक्षा जास्त "गुणगुणायला" कठिण (आम्ही फक्त गुणगुनुच शकतो :)).

"अष्टविनायक" चित्रपटात नायिकेच्या वडिलांचे काम पं. वसंतराव देशपांडे यांनीच केले होते ना? (प्रथम तुला वंदितो).

पं. वसंतराव देशपांडे यांचे जरा हटके गाणे "कोंबड्याची शान, माझ्या कोंबड्याची शान" ऐकले का कुणी. मस्तच आहे. Happy

छान योगेश. कोंबड्याची शानचे संगीत पु लंचे आहे आनि त्यांनीच वसंतरावांना "माझं ठरल्यालं लगीन मोडलं" असं म्हणायला लावलं. आणि इथेच टाका तंबू असंही सुचवलं. १९५०-६० या काळात वसंतरावांनी पार्श्वगायन केलेले दिसते.
त्यांचे भीमसेन जोशींबरोबर : टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग.

योगेश, आपण वसंतरावांना ऐकले ते थोडे उतारवयातच. त्यांचा तरुणपणीचे गायन ऐकायला पाहिजे. (वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, भार्गवराम आचरेकर, माणिक वर्मा आणि पुलं, अश्या सगळ्यांनी सजवलेल्या मैफिलींचा चार सीडींचा संच उपलब्ध आहे. ) त्यांनी गायलेला, त्या काळातला बरवा, हा राग माझ्याकडे आहे.
खरे तर काही मोजकेच गायक गायिका जास्त ऐकण्यात आले. (छोटा गंधर्वांनी काहि मराठी चित्रपटात पण गायन केले आहे. गणरायाला करु मुजरा हे गाणे त्यांचेच. अत्यंत लडीवाळ आवाज होता त्यांचा. रंगल्या रात्री अशा, चित्रपटात पण त्यांनी, पतित पावना हा अभंग गायलाय.)
वसंतराव देशपांड्यानी (बहुतेक) संगीत वरदान या नाटकाला संगीत दिले होते. त्यात सुमती टिकेकर (आरती अंकलीकरच्या सासुबाई ) यांनी काही छान गाणी गायली होती. अनामिक नाद उठे गगनी, असे एक पद होते.
गोखल्यांनी मंदनाची मंजिरी हे नाटक खास कान्होपात्रा किणीकर या अत्यंत देखण्या अभिनेत्रीसाठी लिहिले होते, या नाटकात काहि हिंदि गाणीही होती (ये मौसम है रंगीन) यांच्याच आवाजात, त्या मदनमनोरम रुपी, मन माझे गुंतून गेले, असे एक छान पद आहे, (मला नीट आठवत असेल, तर हे गाणे धन्य ते गायनी कळा या नाटकातले आणि त्याला संगीत पं भीमसेन जोशींनी दिले होते. )
गोखल्यांनी स्वरसम्राज्ञी हे नाटक खास किर्ती शिलेदार साठी लिहिले होते, नीलकंठ्बुवा अभ्यंकर यांचे संगीत होते. हे नाटक म्हणजे संगीताची मेजवानी होते. फडाची लावणी (इथे मांडिला इष्कबाजीचा डाव, टुमदार कुणाची छान ) बैठकीची लावणी ( उडवू रंग रंग रंग, कशी केलीस माझी दैना) टुमरी (राधिके तूने कैसे जादू किया ) शास्त्रीय चिजा ( आजा रे मनमोहन श्याम, बलमा आये रंगीले) भावगीत (एकलीच दीपकळी ) असे अनेक प्रकार त्यात होते.

ज्योत्स्ना मोहिले, पण अत्यंत तयारीच्या गायिका होत्या. प्रितीसंगम आणि हे बंध रेशमाचे ही त्यांची नाटके.
त्यांचे किती पांडूरंगा साहू संसाराचा भार, आणि विश्वनाथ बागूल बरोबर आज आपुल्या प्रथमप्रीतीचा संगम हा झाला ही दोन्ही प्रितीसंगम मधली, तर जायचे इथून दूर हे पद, हे बंध रेशमाचे मधले.

क्षमा बाजीकर हे नाव मी फक्त हे बंध रेशमाचे, याच नाटका संबंधात ऐकले, त्यांत त्यांचे,
दिवस आजचा असाच गेला, उद्या तरी याल का
अन राया अशी जवळ मला घ्याल का

असे सुंदर गाणे आहे (हे गाणे इथे पुर्ण लिहिलेले आहे मी.)
रामदास कामंताचे, अनवट चालीतले, संगीत रस सुरस मम जीवनाधार, हे पण यातलेच.

दिनेशदा, संगीतरस सुरस शांताबाईंनी लिहिले व संगीत अभिषेकींचे म्हणजे बहुधा बंध रेशमाचे मधले. क्षमा बाजीकरांचे 'दिवस आजचा' ऐकायला मिळते पण 'मन पापी मानत नाही' दुर्लभ आहे.
वीज म्हणाली धरतीला चे संगीत वसंतरावांचे (चार होत्या पक्षिणी त्या, स्मरशिल यमुना)

अनामिक नाद ऐकून बरीच वरषे झाली, पण शब्द आठवताहेत
अनामिक नाद उठे गगनी
येते का कुणी खाली उतरुनी
उजळाया अवनी
दैव येई की येती भगवान
शाप येई की येते वरदान
अंधारावर सुवर्णरेषा लखलखते भुवनी.
हे लिहिता लिहिता नाचत ना गगनात नाथा आठवले : अभिषेकी -राम गणेश गडकरी -नाटक पुण्यप्रभाव?

भरत्/दिनेशदा धन्यवाद.
दिनेशदा वर उल्लेखलेले एकही नाट्यगीत मी ऐकले नाही Sad या धाग्याच्या निमित्ताने भरपुर माहिती मिळत आहे.
अजुन येऊ द्यात Happy

त्यांचे भीमसेन जोशींबरोबर : टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग.>>> हे गाणे "साधी भोळी" चित्रपटातले आहे का?

भोळी भाबडी...: टाळ बोले चिपळीला.>>> येस्स्स्स!!!
याच चित्रपटा "किती करशील लाडिक लाडिक चाळा" हे गाणेसुद्धा आहे ना?

या चित्र्पटातले नसणर, कारण हे गाणे बाबुजी अर्थात सुधीर फडक्यांच्या आवाजात आहे, तर भोळी भाबडीचे संगीत राम कदमांचे आहे. याच चित्र्पतातले वसंतरावांचे सावधान होई वेड्या

या चित्र्पटातले नसणर, कारण हे गाणे बाबुजी अर्थात सुधीर फडक्यांच्या आवाजात आहे>>> हो ते "पाहुणी" या चित्रपटातले आहे (ओम गुगलाय नमः), या चित्रपटालासुद्धा संगीत राम कदम यांचेच आहे.

दिनेश, स्वरसम्राज्ञी मधले ' रे तुझ्यावाचुन काही, येथले अडणार नाही' हे कीर्तीचे गाणे कसे विसरलात? आजही लागते रेडीओवर

या रविवारच्या लोकसत्तात तिच्यावर लेख आलाय. जरा ओवरअ‍ॅक्टींग करायची, पण अतिशय तळमळीने गायची, त्यामुळे मी तिच्या ओवरअ‍ॅक्टींगकडे दुर्लक्ष करायचे. गोखल्यांनी नाटके छान लिहिली. त्यांचे लोकसत्तातले रविवारचे अग्रलेख मी कधीच चुकवायचे नाही. संस्कृत काव्याच्या अभ्यासाबरोबर त्यांचा उर्दू शायरीचाही जबरदस्त अभ्यास होता.

वसंतरावांबद्दल पुलंनी फार छान लिहिले आहे. त्यांच्या मातृभक्तीबद्दलही लिहिले आहे, तसेच संगिताबद्दलही. संगितातले ब्रम्हकमळ असाच उल्लेख केलाय त्यांचा. सुरवातीच्या काळात, वसंतराव तबल्यावर आणि पुल गायला असा प्रकार पुणेकरांच्या नशिबी काही काळ लादला गेला, पण लवकरच त्यात सुधारणा केली गेली, असा गंमतीदार उल्लेखही त्यांनी केलाय..

दे हाता शरणागता हे माझ्या वडलांचे अतिशय आवडते पद होते. त्यांनी ते माझ्याकडुनही घोटून घेतलेले Happy

कोंबड्याची शानचे संगीत पु लंचे आहे आनि त्यांनीच वसंतरावांना "माझं ठरल्यालं लगीन मोडलं" असं म्हणायला लावलं.

हे मी हल्लीच कुठेतरी ऐकले.. कुठे ते व कोणाच्या तोंडी ते आठवत नाही, पण खुप आवडलेले...

ह्म्म्म... सारेगामात पुष्कर का कोण होता त्याने गायलेले बहुतेक...

भरत, साधना, "रात्र काळी घागर काळी..." साठी आणि के अंजली "अरूपात पाहे रूपी..." साठी अनेक धन्यवाद. अनेक वर्षांपूर्वीच्या पहाटे ही गाणी ऐकल्याच्या आठवणी आल्या. रात्र काळी चे शब्द तेव्हा नीट कळाले नव्हते.

अरूपात... चे संगीत कार बाळ कर्वे म्हणजे 'गुंड्याभाऊ' चा रोल केलेले का?

भरतः पुलंच्या गाण्यात "नाच रे मोरा" आणि "अंगणी गुलमोहर फुलला" ही माझी अत्यंत आवडती आहेत. तुझ्या त्या २-३ पानाआधीच्या लिस्ट मधे ही सुद्धा बसतील. तसेच 'माझे जीवनगाणे' तेथे आहे का नाही लक्षात नाही.

पुष्कर लेले : हा शास्त्रीय संगीत गातो ना..त्याचे वेब पेज आहे. तो कुमारांची गाणी म्हणायचा.

हो तो शास्त्रियच गातो. सारेगामाने स्थापित गायकांना बोलावलेले ना मध्ये ज्यात हृषीकेश जिंकला त्यात पुष्करने हे गाणे गायलेले. त्याने गायलेले हे माझ्या लक्षात राहिले कारण त्यावर सलिलने काहितरी फालतु कमेंट केलेली....

पूर्वी पुणे केन्द्रावर पहाटे ऐकलेली पण नंतर फारशी न ऐकलेली गाणी कोठे मिळतील का?

काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद म्हैसामुखी बोलविले...
विठ्ठला, समचरण तुझे धरिते (लता)
जयवंत कुलकर्णीचे 'वाजे विजय तुतारी रे, तोरण बांधा दारी रे, <मधले शब्द आठवत नाहीत>, जय जय भारत माता' हे ही गाणे सुंदर होते.
जयोस्तुते उषादेवते

'माती सांगे कुंभाराला' तर छान आहेच, पण तसेच हिन्दी ते लक्ष्मीशंकर का कोणीतरी गायलेले 'माटी कहे कुम्हार को तू क्या रूंढे मोहे, एक दिन ऐसा होयेगा मै रूंढूंगी तोहे' (शब्द अचूक आहेत का नाही माहीत नाही), हे ही सुंदर आहे. हे बहुधा सकाळी पावणेसात च्या सुमारास एक दोन हिन्दी भक्तिगीते लागत त्यात लागायचे.

हिन्दी ते लक्ष्मीशंकर का कोणीतरी गायलेले 'माटी कहे कुम्हार को तू क्या रूंढे मोहे, एक दिन ऐसा होयेगा मै रूंढूंगी तोहे'

मी जेव्हा कायम विविधभारतीवर पडलेली असायचे तेव्हा १२.३० ते १ च्या दरम्यान गैर्फिल्मी गीत्/भक्तीगीत अश्या काही कार्यक्रमात हे गाणे असायचे. तसेच दोन बंधुंचे 'सुरज की गर्मी से तरसे हुये तन को मिलजाये तरुवर की छाया...' हेही असायचे बरेचदा.. गोविंदप्रसाद जयपुरवाले यांची सुंदर भजने आणि गीते याच वेळी असायची.

Pages