गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे गाणं माझ्या अनेक आवडत्या गाण्यापैकी एक. लग्नाला उभ्या राहीलेल्या नवर्‍या मुलीच्या भावना किती छान आणि गोsssssssड शब्दात मांडल्यात.. वाह!

शब्द थोडे इकडे तिकडे होतील कारण बर्‍याच दिवसांत ऐकलं नाहीये.. विविधभारती वर नेहमी लागायचं..

शालु हिरवा, पाचु नि मारवा,वेणी तिपेडी घाला, साजनीबाई येणार साजन माझा..
गोर्‍या भाळी चढवा जाळी, नवरत्नांची माळा, साजनीबाई येणार साजन माझा..

चुल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं
लुटुपुटुच्या संसाराची संपत आली वेळ गं
रेशीमधागे ओढिती मागे व्याकुळ जीव हा झाला..
साजनीबाई..

सुर गुंफिते सनई येथे, घडे चौघडा दारी
वाजत गाजत मितवत येइल घोड्यावरुनी स्वारी
मी वरमाला घालीन त्याला, मुहुर्त जवळी आला
साजनीबाई..

मंगलवेळी, मंगलकाळी डोळा का गं पाणी
साजन माझा हा पतिराजा, मी तर त्याची राणी
अंगावरच्या शेलारीला, बांधुन त्याचा शेला..
साजनीबाई..

माझी अत्यंत आवडती गाणी...

१> दूर जाऊनी कुठवर जाशिल, या धरतीला सीमा आहे... गायकः- चंद्रशेखर गाडगीळ, संगितकारः- बाळ बर्वे... आकाशवाणी व्यतिरिक्त कुठेच उपलब्ध होत नाही...
२> क्षणोक्षणी रात्रं-दिन, तुला आळविन... गायकः- चंद्रशेखर गाडगीळ, संगितकारः- बाळ बर्वे, गीतकारः सुधीर मोघे...आकाशवाणी व्यतिरिक्त कुठेच उपलब्ध होत नाही...
३> संगितकार श्रीनिवास खळेंनी स्वर-बद्ध केलेली सर्वच गाणी आवडतात, तरी देखिल त्यात आवडणारी विशेष गाणी म्हणजे: * जाहल्या काही चुका...
* नीज माझ्या नंदलाला...
* या चिमण्यांनो, परत फीरा रे घराकडे अपुल्या...
४> गायिका देवकी पंडीत यांची दोन गाणी:-
*रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा..
*माझी उदास गीते, तू ऐकशील का रे?...
दोन्ही गाणी cooltoad.com वर उपलब्ध...
५> संगीतकारः- अशोक पत्की, गायकः- सुरेश वाडकर, गाणे:- काळोख दाटूनी आला, पालखी उतरुनी ठेवा... अल्बमः सप्तसूर माझे
६> गायक व संगीतकारः- श्रीधर फडके, गीतकारः- सुधीर मोघे, गाणे:- मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा...

मी थोरलीचा गाण्यांबद्दल लिहिले असली, तरी धाकटी जास्त जवळची वाटत आलीय नेहमीच.
पुर्वी कॅसेट भरुन घ्यायची पद्धत होती, त्यावेळी तिच्या मराठी चित्रपटगीतांसाठी मी खुप शोध घेतला होता. आता सुदैवाने बरीच गाणी उपलब्द्ध आहेत.
तिचा ऋतु हिरवा, म्हणजे थंडगार सुखद शिरवा आहे. त्या काळात अनेक मराठी गाणी येत होती, आणि त्या सगळ्या भावगर्दीत हा संग्रह लक्षवेधी ठरला. काव्य, संगीत आणि गायन सगळ्याच बाबतीत अव्वल आहे हा संग्रह
भोगले जे दु:ख त्याला
घन रानी घन रानी
जय शारदे वागेश्वरी
झिणीझिणी वाजे बीन
माझिया मना
फुलले रे क्षण माझे
ऋतु हिरवा
सांज ये गोकुळी

हि गाणी पहिल्यांदा ऐकली त्यावेळी देखील खुप परिचयाची वाटली होती, हेच तिच्या गाण्यांचे वेगळेपण आहे.
याचा दुसरा भाग येणार असे वाचले होते, आला का तो ?

ह्या झिणीझिणीला मी खूपदा ऐकायचा प्रयत्न केला, पण मध्येच लक्ष उडते.

भोगले जे दु:ख अप्रतिम आहे. भटांचे शब्द अन आशाची गायकी. केवळ.

मयेकर बरोबर. चुकीने ते दुसरीकडे टाकले.

आता आवडत्या नाट्यासंगीताची बारी ...

१. प्रिये पाहा
२. राधाधर मधूमिलिंद जय जय
३. अर्थशून्य भासे मज
४. कशी या त्यजु पदाला
५. युवति मना दारुन रण
६. काटा रुते कुणाला
७. सुरत पिया की छिन बिसराये
८. तेजोनिधी लोहगोल
९ वद जाऊ कुणाला
१० घेई छंद मकरंद
११ विकल मन आज
१२ उगवला चंद्र पुनवेचा
१३. लागी करेजवा कटार Happy

यादी अपूर्णच राहणार - तरी ह्यात साधारण आवडणारी गाणी घातली नाहीत. Happy

भक्तीसंगीत
सर्वात आधी बुवांचे नाही पुण्याची अन किशोरी आमोनकरांचे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल.

नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी - काय सुंदर शब्द आहेत.
जिने गंगौघाचे पाणी
जिने गंगौधाचे वानी

कश्याचा न लागभाग
कश्याचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नामरुप
आम्ही आकाश स्वरुप
जसा निळा निळा धुप
नाही पुण्याची ...

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
नाही पुण्याची ...

वा ! केवळ सुंदर

किशोरी आमोनकरांच्या रंगी रंगला श्रिरंग मध्ये बोलावा विठ्ठल हे गीत आहे, चाल एकदम वेगळी, ठावं घेणारी. एकदा ऐकून समाधान न होणारी. भिमसेनांनी म्हणले बोलावा विठ्ठल पण मला आवडते, पण किशोरींच सही वाटतं.

बंधनापासोनी उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश ......

बुवांचेच
अबिर गुलाल
कैवल्याचे चांदने
सर्वात्मका सर्वेश्वरा हे पण आवडत्या मध्येच.

बुवांचे शिष्य अजित कडकडे ह्यांचे अभंग गायन पण मला आवडते.
हृदयाचा तालावर नाचे गणेशू
रुणूझुणू घुमवित घुंगूरवाळा
ॐ गं गणपतेय नमः
ही गाणी खास.

सुरेश वाडकरांना विसरले तर मारतील भांजेराम. त्यांचे ओंकार स्वरुपा हे केवळ उच्च. केवळ तेच गाऊ शकतात.
वाडकरांच्या "तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला" व "चिंब पावसाने" ह्या दोन गाण्यांना विसरता येणार नाही. ऑलटाईम बेस्ट. Happy

संगीतकार मानस मुखर्जी म्हणजे आजचा आघाडीचा पार्श्वगायक शान याचे वडील.
म्हणुनच कि काय या गाण्यात बंगाली संगीताचा प्रभाव जाणवतो. त्यांचं उषाताईंनीच गायलेलं एक गाणं इथे देण्याचा मोह मला आवरत नाही. शांताबाईंनी अतिशय नादमधुर पण अर्थवाही शब्दांनी एका कष्टकरी मुलीचं भावविश्व ताकदीनं उभं केलंय आणि त्याच ताकदिने उषाताईंनी गायलं आहे (जयवंत कुलकर्णी यांचा देखील आवाज यात आहे.)

भास एक स्वप्नातला, रंग हळदीचा ओला

नवरी मी सजुन अशी, निघाले कोण्या देशी ?
घेउनी मला कुठे पालखी चाले कशी ?

चांद उतरला खाली, रात पहाटेला आली
वारा वाहे झुळूझुळू, पालखी चाले हळू
वर खाली वाट वळे, गोंडा रेशमी झुले
दूर का गाती प-या ? स्वर ते कानी आले
पालखी हाले डुले !

हळू हळू सांज झाली, पालखी उतरे खाली
भुलूनी गेले डोळे भिरभिर भवताली !

थोर नगरीत वसे, सात तालांचा हसे,
वाडा सामोरा उभा कुण्या राजाचा दिसे !
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे !

तनूलागी कंप सुटे! बाई मी आले कुठे ?
डवरला घाम भाळी, लवले डोळे खाली !
अवचित कोणी आला, वरमाला घाळी गळा
हातची कधी हाती दिला, नाही कळते मला

हनूला धरून माझ्या काहीसे बोले राजा
वाटे मजला भीती; ऊर धडधडे किती
नजरेसी मिळे नजर, नकळत ढळे पदर
घडली जादू अशी, झाले ग वेडीपिशी !

ऊठ पोरी ऊठ आता (काय सारं स्वप्नं होतं ?)
ऊठ पोरी ऊठ आता, जायचे नं शेतावरी
जागवीत बाबा होते, स्वप्न सरलेले होते !

चला बिगीबिगी चला,
शेत नांगराया चला
डोईवर दिसं आला !

गीत - शांता शेळके
संगीत - मानस मुखर्जी
स्वर - उषा मंगेशकर

असेच उषाताईंचे अजुन एक वेगळ्या चालीचे गाणे, संगीत दिले आहे "मीना मंगेशकर" यांनी आणि गीत पुन्हा एकदा आपल्या शांता शेळके यांनी लिहिले आहे. गाण्याचे संगीत मला थोडे पहाडी वाटते (बर्‍याच वेळा भुपेन हजारिका यांचे गाणे ऐकताना जाणवते तसेच) आणि त्यामुळेच त्यात जास्त गोडवा जाणवतो. मीना मंगेशकर यांनी फार कमी गाण्यांना संगीत दिले आहे.

कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय

म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासरा रे
उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे
हाती राहे खीर लोणी कोण दुजे खाय ?
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय

डोळ्यांतली बाहुली तू राजा सोन्या रे
ओंजळीत आला जणू चैत चांदवा रे
सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय !
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय

श्रीधर फडक्यांचे

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारावरी, भक्ती तोलणार नाही..

मला अतिशय आवडते. कुसुमाग्रजांचे शब्द आणि त्याला यशवंत देवांचे संगीत.

मेघ सावळा जांभळा, राही नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला, कधी कळणार नाही...

तुझ्या कृपाकटाक्षाने, झालो वणव्याचा धनी
परी निखा-यात त्याच्या, तुला जाळणार नाही..

(कडवी वरखाली झाली असतील.. मी ब-याच दिवसांत ऐकले नाही, त्यामुळे पुर्ण आठवत नाहीये.)

जवळपास २० वर्षांपुर्वी, टीवीवर एका सांगितीक कार्यक्रमात यशवंत देवांबरोबर, श्रीधर आणि अजुन दोन्-तीन संगीतकार आले होते. देवांनी हे गाणे दिले सगळ्यांना आणि चाल लावायला सांगितली. सगळ्यांनी वेगवेगळ्या पण सुंदर अशा चाली लावल्या होत्या. सरतेशेवटी देवांनी लावलेली चाल श्रीधर गायला होता.

अर्चना कान्हेरे यांचे

हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा... हेही मला खुप आवडते.

तसेच

मी राधिका..... मी प्रेमिका

हे आरती अंकलीकरचे गाणेही भारी आवडते.. तिने खुप लडीवाळपणे गायलेय हे. दिनेश तुम्ही प्लिज या दोन गाण्यांबद्दल लिहा.. Happy

आशा व अरुण दाते एकत्र गायले नसावेत फारसे, मी तरी खालचे एकच गाणे सोडून बाकी काही ऐकले नाही

सर्व सर्व विसरु दे, गुंतवु नको पुन्हा..
येथ...... , हाच असे गुन्हा

बहुतेक सुरेश भटांचे आहे. घरी जाऊन शोधते हे गाणे.

योगेश : कान्हु घेउन जाय आणि भास एक स्वप्नातला मूळ बांग्ला गीतांचा शांताबाईंनी चालीवर केलेला अनुवाद आह्ते. आहे की नाहे कमाल.
शांताबाई -मानस मुखर्जी- उषा मंगेशकर यांची ही २ गीते पण तशीच मूळ बांग्ला
१)ना ना न ना नाही नाही नाही ग
आता पुन्हा मजसी येणे नाही ग
२) तुजसी मी प्रीत सख्या आज करणार ना
मन माझे अदय प्रिया मुळी झुरणार ना.

भोगले जे दु:ख त्याला बद्दल आशाताई म्हणतात गाणे म्हणताना समोरचे दिसेनासे झाले...डोळ्यात अश्रू तरळले आनि त्यात जणु माझी जीवनकहाणीच समोर दिसत होती.

यशवंत देवांनी शब्दांच्या पलिकडले साठी ही गाणी संगीतबद्ध केली होती.
काही बोलायाचे आहे अरुण दात्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले, सरवस्व तुजला वाहुनी - पद्मजा फेणाणीच्या..पण मला त्या कार्यकर्मात ऐकलेली अनुक्रमे श्रीधर फडके आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातलीच आवडतात.
यातच 'चांद मातला मातला साथी देवांनी देवकी पंडितला बोलवले होते. ही चाल उंबरठा पेक्षा अर्थात वेगळी.

बाबुजींचे 'अशी पाखरे येती' गाणे .....त्यातील

"हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला |
देवघरातील समयीमधुनी, अजुन जळती वाती"||

ह्या ओळी गातांना बाबुजींचा कांपणारा आवाज .....अक्षरशः काळजात चर्र होते!

योगेश : कान्हु घेउन जाय आणि भास एक स्वप्नातला मूळ बांग्ला गीतांचा शांताबाईंनी चालीवर केलेला अनुवाद आह्ते. आहे की नाहे कमाल.>>> अरे व्वाह!! हे माहितच नव्हते.

भरत अधिक माहितीबद्दल धन्यवाद.

ना ना न ना नाही नाही नाही ग, आता पुन्हा मजसी येणे नाही ग>>>एका छान गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल आभार. (प्रतिसाद लिहिताना तेच ऐकतोय Happy )

ना ना न ना नाही नाही नाही ग
आता पुन्हा मजसी येणे नाही ग

हे ह्याआधी अनेकदा ऐकलेय,. पण परवा रेडिओवर परत ऐकले तेव्हा इथे लिहायचे लगेच असे ठरवलेले... अतिशय गोड लडिवाळ, खट्याळ चालीचे गाणे तितक्याच खट्याळपणे गायलेय...

यशवंत देवांनी शब्दांच्या पलिकडले साठी ही गाणी संगीतबद्ध केली होती
हा कार्यक्रम मी विसरुनच गेले होते. तेव्हा काय कार्यक्रम असायचे दुरदर्शनवर.. आरोही आणि श.प. मी कधीच चुकवायचे नाही. अनुराधा, कविता, पंकज उदास, सुरेश वाडकर.. काय लोक यायचे एकेक गायला आणि गाणीही इतकी सुंदर असायची.

देवकीने सुन्या सुन्या मैफिलीतही गायले होते. मला कित्येक दिवस ते तिचेच वाटत होते.


काही बोलायाचे आहे अरुण दात्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले

हो काय? मी जेव्हाजेव्हा ऐकलेय तेव्हा ते श्रीधरचेच वाटलेय मला... कदाचित दोघांच्याही आवाजात असेल.

हे ह्याआधी अनेकदा ऐकलेय,. पण परवा रेडिओवर परत ऐकले तेव्हा इथे लिहायचे लगेच असे ठरवलेले... अतिशय गोड लडिवाळ, खट्याळ चालीचे गाणे तितक्याच खट्याळपणे गायलेय...>>>> अगदी अगदी

ना ना ना ना नाही नाही नाही ग !
आता पुन्हा मजसि येणे नाही ग !

घन भरुन भरुन झरे गगन वरुन
कुणि साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवि सये बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

बोलति चुडे किण किण किण, कलशि जल गाते ग !
नूपुर बोले छुन छुन छुन, पाउल पुढे जाते ग !
नवल घडे अहा अहा अहा
हृदय धडधडे कि उडे पदर सये बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

गहन वन झाले ग शीतल वारा
भिजलि तनु सारी ग झेलून धारा
पवन वाजे सण सण सण, वेढुन मज घेतो ग
भ्रमर बोले गुण गुण गुण, साजण साद देतो ग !
नयन झरे अहा अहा अहा
अधर थरथरे कि झुरे आतुर मन बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

नाही सुचत काम नाही रुचत धाम
मनमोहन श्याम मज दिसे कि हसे
सजण ठायि ठायि ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

वाव. मी आताच इथे बसुन गायला लागलेय.. काय विलक्षण गेयता आहे ह्या गीताला.. चाल शब्दामागुन धावतेय की शब्द चालीमागुन धावताहेत तेच कळत नाही..

शांताबाईंना सप्रेम नमस्कार..

योगेश, उषाचे हे गाणे तूला माहीत आहे ? खुप जूने आहे ते. पण ज्यावेळी ते पहिल्यांदा रेडीओवर वाजायला लागले त्यावेळी लोकांना आवडले नव्हते. बंगाली संगीताची ओळख नव्हती ना,

अर्चना कान्हेरे आणि आरती अंकलीकर दोघींची शास्त्रीय गाण्याची बैठक पक्की आहे त्यामूळेच या अवघड चालीची गाणी त्यांनी लिलया पेलली आहे.

आरती माझ्याबरोबर कॉलेजला होती (मला ज्यूनियर ) पण त्या काळापासून तिचे गाणे ऐकतोय. पहिल्यांदा तिच्यावर किशोरी अमोणकरांच्या गायकीचा खूपच प्रभाव होता, पण आता तिने स्वत:ची वेगळी शैली तयार केली आहे. पण तशी मराठी गाणी फार कमी गायली आहेत तिने.

हे सूरांनो चंद्र व्हा च्या जोडीने आठवतो तो एक अभंग
कैवल्यांच्या चांदण्याला भूकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर

राग नेहमीचा भैरवी आहे पण अभिषेकींनी अगदी उत्कट चाल लावली आहे. (नाटक संत गोरा कुंभार )

किशोरी अमोणकरांचा, रंगी रंगला श्रीरंग हा बर्‍याच कालावधीनंतर आला. (मला त्यातले जनी जाय पाणीयासी, मागे धावे ऋषिकेशी, हा अभंग जास्त आवडतो.)
त्यापुर्वी त्यांनी दोन मराठी गाणी गायली होती

जाईन विचारीत रानफूला, भेटेल तिथे ग सजण मला

भग्न शिवालय, परिसर निर्जन, पळसतरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतील गर्द झुला, भेटेल तिथे..

कूंज पुकारील मोर कारणी, निळ्या ढगातून भरेल पाणी
लहरे ती विजेची सोनसळा, भेटेल तिथे,,

वाहत येईल पूर अनावर, बुडतील वाटा आणि जूने घर
जाईल बुडून हा प्राण खुळा, भेटेल तिथे ..

आणि दूसरे

हे शामसुंदर राजसा, मनमोहना
विनवुनी सांगते तूज, जाऊदे मला परतुनी

दोन्ही सुंदर होती, दुसर्‍याची चाल तर खुपच अवघड आहे.

आणि नाट्यपदांबद्दल मला डिवचू नका रे, आवरणे कठीण होईल मला.

योगेश, तू जी गाणी पूर्ण लिहितो आहेस, ती आपल्या डेटाबेसमधे पण टाकत जा रे.

उषा ची मला आवडणारी गाणी

केळीचे सुकले बाग,
असुनीया पाणी
कोमेजली कवळी पाने
असुनी निजरानी

(बहुतेक अनिलांची आहे हि कविता )

आणि दुसरे

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी, उभा राहे हरी

मनात मी घाबरले, कशीबशी सावरले
अचानक तोच हाय, कोसळल्या सरी

आभाळात ओले रंग, चिंब चिंब माझे अंग
काय उपयोग आता, सावरुन तरी

अगदी थोडक्या शब्दात किती नेमके सांगितले आहे.
बहुदा पाडगावकरांचे आहे काव्य.

योगेश, उषाचे हे गाणे तूला माहीत आहे ? >>>मी जेंव्हा हे गाणे पहिल्यांदा ऐकले त्याक्षणापासुनच आवडायला लागले. (त्यावेळी मी उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याचा संग्रह करत होतो :)).

भरतने उल्लेख केलेले "तुजसी मी प्रीत सख्या आज करणार न" हे गाणे माझ्या संग्रहात नाही Sad सध्या त्याचा शोध सुरु आहे :).

योगेश, तू जी गाणी पूर्ण लिहितो आहेस, ती आपल्या डेटाबेसमधे पण टाकत जा रे.>>> नक्की, ह्या http://vishesh.maayboli.com/marathi-gani लिंकमध्येच ना?

उषाताईंची माझ्या आवडीची आणि माझ्या संग्रहात असलेली काहि गाणी Happy

१. वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजुन, माझ्या प्रीतीच्य फुला

२. प्राण विसावा लहरी सजन कुणी दावा
फिरून घरी यावा, पावसाची हवा
ओढ लावी जीवा, शितळ शिडकावा

३. साजणी सई ग, साजणी सई ग
साजण नाही घरी, सुकली जाई ग

४. थांब रे घना... घना, थांब रे घना
जा निरोप घेऊनी, सांग मोहना

५. जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेऊनी गेले

६. जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथीची विसावा
देवा सांगु सुखदु:ख देव निवारील भुक

उडत्या चालींची गाणी

१. धुंदित गंधीत होऊनी सजणा, प्रीतीत रंगुनी जाऊया
छेडित ये प्रीत संगीत सजणा, प्रीतीत रंगुनी जाऊया
ये सजना....

२. चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते
नेशील तेथे येते, सखया नेशील तेथे येते

३. ससा तो ससा कि कापुस जसा, त्याने कासवाशी पैज लावली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ हि शर्यत रे आपुली

दिनेशदा तुम्ही 'जाईन विचारिन रानफुला' इथे चिकटवलेय का कुठून?
उंच पुकारिल मोर काननी
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा.

योगेश ,मानस मुखर्जींची गाणी आणखी कुणाला माहित आहेत आणि आवडतात हे वाचून मला पण आनंद झाला. 'केळीचे सुकले बाग' आणि 'वेळ झाली भर माध्यान्ह' दोन्ही अनिलांची आणि पाण्याहून जात होते ही गवळण पाडगावकरांचीच.
उषा मंगेशकर-पाडगावकर यांचा हा अभंग ऐकलाय का?
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो
फुलांचे केसरा घडे चांदण्याच संग
आज अवघे अंतरंग ओसंडले हो
मिटूनही डो़ळे दिसू लागे आकाश
आज सारा अवकाश देऊळ झाला हो
काही न बोलता आता सांगता ये सारे
आतली प्रकाशाची दारे उघडली हो.

तुजसी मी प्रीत सख्या आज करणार ना
मन माझे अदय प्रिया मुळी झुरणार ना
अनुदिन मोहित करुन करुन करिसी वंचना
भुलविति वचने तुझी खोटे खोटे हसणे रे
भोळीखुळी प्रीत माझी पुन्हा पुन्हा फसणे रे
आसवांत नाहुन नाहुन सतत साहुन विरहवेदना
मधुमय जीवन हसे मधुर मधुमास हा
तनुवर लहरत ये हरित मधुर भास हा
भिरभिर वाहतो, हा पवन मजसी बाहतो,
साद त्या देईन, दु:ख ना साहीन, हसत राहीन पुसुनि लोचना
हृदया! हसत रहा हसत रहा सारखा!
बघतो वळुन पुन्हा तो सुखास पारखा
नित नित सूर नवे, नवे क्षितिजही हवे!
कधि न झुरेन, स्वैर मी फिरेन, तुला न स्मरेन, ऐक साजणा

उषाताईंची २ नाट्यगीते -नाटक देवाचे पाय -आरती प्रभू संगीत बहुधा विश्वनाथ मोरे
भिडं भिडं लाडं लाडं मला वो पावनं बोलता येइना
येडंपिरं नाचं तसं हातोहात रातोरात कस ते डोलता येईना

आणि तुमचं माझं जमायचं नाही साजणा
तुम्ही देवाघरचे पाहुणे मी बंदिवान मैना.

गोरा कुंभार वरून मला फैयाज यांची आठवण झाली. त्यांची कोणकोणती गाणी कोणाला आठवतात आणि आवडतात?

धन्यवाद भरत!!

उषा मंगेशकर-पाडगावकर यांचा हा अभंग ऐकलाय का?>>> हो, ऐकला आहे हा अभंग.

फैयाज यांची आठवण झाली. त्यांची कोणकोणती गाणी कोणाला आठवतात आणि आवडतात?>>>फैयाज यांचे घरकुल चित्रपटातील एकच गाणे "कोन्यात झोपली सतार" मी ऐकले आहे Sad
गदिमांचे शब्द अंगावर अक्षरशः काटा आणतात.

कोन्यात झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? - गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलते ओठी.

साधता विड्याचा घाट, उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भाव स्वरांचा योग,
घमघमे, जोगिया दंवांत भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.

मी देह विकुनिया मागुन घेते मोल,
जागविते प्राण हे ओपुनिया अनमोल
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुन तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गे वनमाली
लाविते पान तो निघून गेला खाली.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
मम प्रीती आहे जडली तुजवर राणी

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार;
हासून म्हणाल्ये, दाम वाढवा थोडा
या पुन्हा, पान घ्या निघून गेला वेडा

राहिले चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत,
वळुनी न पाहता, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा जोगिया रंगे.

असेच एक सुरेश भट, ह्रुदयनाथ मंगेशकर आणि महेन्द्र कपूर या त्रयींचे गाणे. ज्याचे शब्द ऐकल्यावर मी सुन्न होतो Sad

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही
गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे लोचने आता मिटावी

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी

दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी
आसवे सा-या फुलांची रोज खाली ओघळावी

कोण मी आहे मला ठाऊक नाही नाव माझे
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी

हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी

काय सांगावे तुला मी काय मी बोलू तुझ्याशी
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी

गोरा कुंभार वरून मला फैयाज यांची आठवण झाली. त्यांची कोणकोणती गाणी कोणाला आठवतात आणि आवडतात?

काय गाणी आहेत त्यातली.... फैयाजचा आवाजही मस्त लागलाय त्यात..

निर्गुणाचा संग धरीला जो आवडी,
तेणे केले देशोधडी , आपणयासी मायबापा

हा त्यातलाच आहे काय? मला आता नीटसे आठवत नाहीय..

(विविधभारती लावायला पाहिजे रोज. सकाळी ८-८.१० नाट्यसंगित असते. कोणे एके काळी मी उठल्यावर आधी रेडिओ चालु करायचे... आई अजुनही आठवण काढते - मला सक्काळीसक्काळी डोळे उघडायच्या आधी रेडिओ लागतो म्हणुन किती ओरडायची त्याची Sad )

जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथीची विसावा
देवा सांगु सुखदु:ख देव निवारील भुक

माझा अतिशय आवडता अभंग... योगेश प्लीज पाठवा ना मला.. सखुबाईचा आहे ना?? मी हंसा वाडकरचा (???? तीच होती का?? आठवणी पार पुसट झाल्यात आता, १५-१६ ची होते तेव्हा पाहिलेत हे चित्रपट, तेव्हाचे दुरदर्शन किती चांगले होते ते आज कळतेय...) संत सखु पाहिलेला.

जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेऊनी गेले

हे फारसे ऐकायला मिळत नाही, पण मी ऐकलेय..

ते 'घागर काळी, यमुना काळी' असे काहीतरी गाणे आहे ना? त्याचे शब्द कोणाला ठाऊक आहेत का? आणि ते कोणी गायलय? कधीतरी सारेगमप मध्ये ऐकले होते पण आता जराही आठवत नाहिये.

योगेश गदिमांची जोगिया ही कविता पूर्ण दिल्यबद्दल आभर.
घरकुल मधे त्यातली : झुंबरी ,हळुवार ,त्या अधरफुलांचे ही कडवी नाहीत.
सी रामचंद्रांनी मराठी चित्रपट संगीतावर आपला ठसा उमटवण्यासाथी का हा चित्रपट काढला होता? मलमली तारुण्य माझे (गझल), जोगिया(कविता), हे राष्ट्र देवतांचे )राणी वर्मा) ही माइलस्टोन गाणी आहेत. शांता बाईंची नंबर फिफ्टीफोर आणि पप्पा सांगा कुणाचे हे तर नवीन प्रयोग. यात प्रमिला दातार, अरुण सरनाईक यांचे आवाज.

फैयाज बद्दल उद्या, तोपर्यंत कोणाला आणखी काय आठवते बघू.

आणि योगेश कुछ शेर फकत उनके लिए तशी काही गाणी फक्त उनके लिए का?

रात्र काळी घागर काळी यमुनाजळही काळे वो माय

Pages