अवघी विठाई माझी (१०) - र्‍हुबार्ब

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

rh0.jpg

आज एका अनोख्या भाजीची ओळख करुन घेऊया. या भाजीची पाने विषारी असतात. अगदी मृत्यूस कारणीभूत व्हावी इतकी. म्हणून हिचे फ़क्त देठच वापरतात. देठात पण हे विष असतेच, पण त्याची मात्रा अत्यल्प असल्याने, त्याने काहि अपाय होत नाही.

मूळात ही भाजी आहे का फ़ळ आहे, (खरे तर देठ आहे) हा वाद अगदी अमेरिकेतल्या न्यायालयात गेला होता.आणि कोर्टाने निवाडा दिला, कि हे फ़ळ आहे. या भाजीचे नाव आहे र्‍हुबार्ब.
(उच्चारायला थोडा कठिण शब्द आहे हा, याच शब्दाचा अर्थ, नाटकातील कलाकारांनी, नाटक चालू असताना स्टेजवर केलेली कूजबूज असाही आहे.)

या भाजीचे देठच सहसा बाजारात विकायला असतात. मस्त क्रिमसन रंगाचे हे देठ दिसायला अगदी सुंदर दिसतात.
तसे याचे हिरवे देठ पण असतात, आणि ते जास्त मोठेही असू शकतात, पण या रंगामूळे लाल देठच जास्त लोकप्रिय आहेत.
हे कच्चे देठ चवीला खुप आंबट लागतात, पण तरीही गोड पदार्थात ते जास्त करुन वापरले जातात. साखरेशी संयोग केल्याशिवाय हे खाणे जवळजवळ अशक्य आहे. जाम, टार्ट, क्रंबल, सरबत, वाईन यासारख्या पदार्थात याचा वापर होतो. आणि याच कारणामूळे कोर्टाने असा निवाडा दिला असावा.

हे देठ घेताना, चमकदार रंगाचे असे बघून घ्यावेत. हे देठ सहसा पाण्यात ठेवलेले असतात. पाने असलीच तर ती ताजी व ताठ असावीत. पाने मात्र पूर्णपणे कापून टाकावीत. देठाच्या जमिनीकडच्या भागाला जर माती लागली असेल, तर तेवढा भागही कापून टाकावा लागतो.

rh1.jpg

देठावरचे साल जर चिवट असेल तर ते काढून टाकावे. पण खरे तर त्यामुळेच
पदार्थाला सुंदर रंग येतो, त्यामुळे काढले नाही तरी चालते. आणि मग देठाचे तूकडे कारावेत.
अगदी थोडेसे पाणी घालून हे तूकडे शिजायला ठेवावेत.थोड्याच वेळात हे तूकडे मऊ शिजतात. पाण्याशिवायही मंद आचेवर हे शिजवता येतात, कारण या देठात भरपूर पाणी असते. मऊ शिजल्यावर ते जरा घोटून घ्यावेत. यावेळी देठाचा एखादा न शिजलेला तूकडा दिसला, तर तो काढून टाकावा. मग त्यावर आवडीप्रमाणे साखर घालून, ते परत शिजवावे.

rh2.jpg

हा झाला बेसिक प्रकार. साखर घालताना किलोभर देठाला एक कप साखर घालावी लागते. याला असा सुंदर रंग येतो. आणि चवीला मस्त आंबट गोड लागतो. हा पदार्थ जाम म्हणून वापरता येतो. पण या देठात पेक्टीन नसल्याने हा जाम सेट होत नाही. सेट होण्यासाठी, त्यात वरुन पेक्टीन किंवा पेक्टीन असलेली फ़ळे घालावी लागतात.

क्रंबल करण्यासाठी. कोरड्या कणकेला लोणी चोळून ती रवाळ करावी. मग त्यात (शक्यतो डिमेरारा) साखर घालून हे मिश्रण कोरडेच, वरील मिश्रणावर पसरावे, आणि मग १८० से तपमानाला १० ते १५ मिनिटे बेक करावे. हे कोरडे मिश्रण, बेसिक मिश्रणातला ओलावा शोषून घेते. या क्रंबलबरोबर पुडींग किंवा आईस्क्रीम घेता येते.

देठ जरा कमी शिजवून, हे मिश्रण टार्ट फ़िलींग म्हणूनही वापरता येते.

र्‍हुर्बाब काही नवीन नमस्पती नाही. चीनी वैद्यकात तिचा वापर हजारो वर्षांपासुन होतोय, तरीची खाद्यपदार्थ म्हणून ती अलिकडेच लोकप्रिय झालीय. (पूर्वी साखर इतक्या प्रमाणात आणि इतकी स्वस्त उपलब्ध नव्ह्ती.)

र्‍हुबार्ब हे नाव व्होल्गा नदीच्या ग्रीक नावावरुन आलेय. या नदीच्या काठी हि भाजी (?) भरपूर
उगवत असे, पण त्या काळात वाहतुकिच्या सोयी नसल्याने, इतर मसाल्याच्या पदार्थाप्रमाणेच
हि फ़क्त श्रीमंतांची चैन होती. हिचे शास्त्रीय नाव Rheum rhabarbarum

यात कॅल्शियम आणि पोटॅशियम असतेच.शिवाय सी आणि के जीवनस्त्व आढळते.
शीत हवामानापेक्षा उष्ण हवामानात हिचे पिक चांगले येते. पण आपल्याकडे हिचा वापर
दिसत नाही. याला काहि भारतीय नाव असल्यास, ते मला माहित नाही.

चीनमधे हिचा वापर लॅक्सेटिव्ह म्हणून होत आला आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी पण
हिचा वापर होत असे. याच्या मूळांच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोज कमी होते, असे उंदरावरील
प्रयोगात आढळले होते.

पाने विषारी असल्याचा उल्लेख मी केला आहे. तो विखार त्यातील ऑक्झॆलिक अ‍ॅसिड मूळे
येतो. (तसे ते अळूच्या पानातही असते.) जीवावर बेतण्यासाठी याची साधारण पाच किलो
पाने खावी लागतील, पण विषाची परिक्षा का घ्या ? याच्या पानात इतरही विषारी द्रव्ये
असल्याचे मानले जाते. पूर्वी काही अपघात घडल्याने, हि पाने खाल्ली जात नाहीत. पण
चिनी वैद्य, पानांचाही औषधात वापर करत असत. (सूक्ष्म प्रमाणात विष हे औषध असते,
आणि अतिप्रमाणात अमृत हे विष असते !!)

या देठाचे भांडी घासण्यापासून केस रंगवण्यापर्यंत बरेच उपयोग आहेत. पण मला तरी
याच्या जामची चव आणि रंग खूप आवडला.

विषय: 
प्रकार: 

मस्त माहिती ! मी नेहेमी बघते हे देठ बाजारात. फूड नेटवर्क वरच्या शो मध्ये एकदोनदा बघितल्याचे आठवते पण तरी चवही माहीत नसल्याने आणि कशी शिजवायची ह्याची कल्पना नसल्याने आणली नाही कधीच.
ह्याची पानं विषारी असतात तर मग बाजारात विकायला कशी येतात ? Uhoh
मी आत्तापर्यंत फक्त देठच विकायला पाहिले आहेत इथे. फळांच्या सेक्शनजवळ असतात. स्ट्रॉबेरी बरोबर पदार्थात वापरल्याचेही पाहिले आहे.

असं असतं rhubarb ? इंग्रजी पुस्तकांतून rhubarb treacle/ tart/ pudding प्रकरण वाचलं होतं. आत्ता तुमच्यामुळे कळालं.
धन्यवाद. Happy

व्वा! दिनेशदा, मस्त नाविन्यपूर्ण माहिती! काय अफलातून रंग आहे ह्या भाजीचा! निसर्गाचीही कमाल आहे!

अगदी बिटासारखा रंग दिसतोय.

दिनेशदा अजुन एक नविन माहीती दिलीत.

इन मीन तीन, धागा वर काढल्या बद्दल धन्यवाद .

किती छान माहिती लिहिली आहे . जामचा रंग पण फार सुंदर दिसतोय.

इन मीन तीन, धागा वर काढल्या बद्दल धन्यवाद +११११११११११. रेसिपी आणि माहीती दोन्ही छान. दिनेशदा . पण भारतात मिळतात का हे देठ?

पाहिली आहे ही भाजी पण काय करायचे माहित नसल्याने मी आणली नाही कधी. आता आणेन. नाव मस्त आहे भाजीचे.

>>>>या देठाचे भांडी घासण्यापासून केस रंगवण्यापर्यंत बरेच उपयोग आहेत- ईंटरेस्टिंग!