असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय...

Submitted by ऋयाम on 11 June, 2010 - 21:41

हो. असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय.

कारण.... बरीच वर्षं झाली आता, रामसे बंधु रिटायर झालेत... नवा पिक्चर काढतच नाहीयेत... म्हणजे एखादा "शैतान का ... ", नाहीतर "खुनी ... " किंवा "प्यासी ... "? काहीच नाही तर नुसतंच "आ~"? अमिताभच्या "पा~" सारखं?

बर चित्रपट सोडा. एखादा "झी हॉरर शो" तरी बघितला असता? तिथं तर दर आठवड्याला नवं भुत, त्याचं नवं "भुतडं"! "भुताचं रुप म्हणजे भुतडं" असं म्हणता येईल का हो?? त्यातुन त्यांना (म्हणजे आदरणिय रामसे बंधुंना) बरी गोष्ट मिळाली तर मग दोन भाग! फुल्ल भारी! या आठवड्यात भुत बघायला गेलं, की "आयला! याला कुठं तरी पाहिलंय... थांब आठवतो... सांगु नकोस. आठवेल .. हां! "मास्तर.." नाही.. "पी एम"... नाही.. " "आयला, हे तर आपलं लास्ट वीकचं भुत!" पण आजकाल "झीवर हॉरर शो" ही नशिबात नाही. तिथं "झीटीव्ही"वर "मिल्या" फेम "काय रे देवा सारेगमप" चालु असतं. आता "आपल्या पल्लवी" ला कोणी "म्हातारी" म्हटलं असतं तर त्याचा खुन प्यायला मी भाड्यानं भुतं पाठवली असती, पण तिचे ते ड्रेसेस हॉरर आहेत असं कोणी म्हटलं मात्र मोदकच पाठवीन...

बाकी मग "सागर बंधु"ही सुट्टीवर गेलेत... त्यांचा "हॉरर शो" नसला, तरी "भुतंखेतं" होतीच की त्यांच्या राज्यात. म्हणजे आपली "अलिफ़ लैला!"
"अलिफ लैला", "अलिफ लैला", "अलिफ लै ए ए ए ए ला"
एका एका एपिसोड मधे पन्नास पन्नास राक्षस. त्यांच्या राक्षशीणी. (इथं एकास एक प्रमाण नव्हतं बहुतेक... )
तर ते राक्षस! त्यांच्या मोठ्या मोठ्या भिवया. काळे कुरळे वीग आणि सुटलेली पोटं. राक्षसांची जीन्स कुठली बघायला हवं पण. नाहीतर सगळ्या राक्षसांचे केस काळेच कसे असतात? आणि एकदम घनदाट वगैरे... खुद्द सिंदबाद काय कमी हॉरर होता??

भुतंच हवी तर मग थोडंसं "ब्योमकेश बाबु" चं "ब्योमकेश बक्षी" बघितलं असतं. त्यातही मधुन मधुन भुतं असत. पण ते तर बंदच पडलंय... हाट.

काल रात्री घरी आलो, आणि युट्युब बघितलं. तिथं बरेच दिवसांपुर्वी त्यावर एक चित्रपट पाहिला होता.. "फ्रँकेन्स्टाईन्स कॅसल ऑफ फ्रीक्स"! रामसे बंधुंनी कुठुन प्रेरणा घेतली असावी याचा अंदाज आला. पण तो चित्रपट पाहिल्यापासुन एकुणच आपल्या भारतिय भुतांची फारच आठवण येत होती. पण पर्याय नव्हता. वरचं सगळं आठवलं आणि गदगदुन, भरभरुन आलं.

म्हणुन मग मला वाटु लागलंय. मनात आलंय. आणि असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय.
नाव सुचवा : -
१. राखी की हवेली.
२. राखी इन भुतांची फॅक्टरी. ( हो. मराठी मधे. कक्षा रुंदावुया की इथेही. आणि आपली राखी शेवटी मराठीच आहे ना. (कशीही असली तरी असं मी अजिबात म्हटलं नाही! ) ) आणि
३. "रा~" (बरोबर. पा~ सारखं.)
* हाट. "राखी का स्वयंवर" आधीच गेलं Sad

बरोब्बर. आपली हिरॉईन फिक्स आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तिनही भाषेत चित्रपट बनवायचाय. या तिनही भाषा अस्खलित येणारी, सुंदर, केवळ भुमिकेच्या गरजेपोटी "अं" प्रदर्शन करणारी, छान डांस करणारी एखादी हिरॉईन हवी होती. आपली राखीच काय वाईट आहे? म्हणुन ती फिक्स आहे.
तिची धाकटी. बर मोठी. मोठी बहिण म्हणुन "आपल्या पल्लवी" ला घेऊ. पण केवळ ती सारेगमप मधील वार्डरोब मधे येणार असेल तरच! आणि एक हिरो हवा आहे. सापडेल.... हिरोचं काही महत्त्व नसतं हॉरर चित्रपटात... Light 1

आणि हां... लोकेशन उटीमधे. ती जागा "सावन कुमारनं" सोडली म्हणतात. तर तिथं एखादी हवेली शोधीन म्हणतो. हवेलीत लाईट्स नसावेत. सगळीकडे झुंबरं मात्र हवीत. आणि मेलेल्या वाघांचे "आ~" केलेले ... "काय म्हणतात त्याला??" टेबल क्लॉथ? तर ते वाघाचे टेबल क्लॉथ.. आणि ढाली-तलवारी हव्यात. मग एक? नाही ३. ३डॉबरमॅन कुत्रे. हवेलीत एखादा कुबड असलेला, कंदिल घेतलेला नोकर घ्यायचाय. त्याची मुख्य भुमिका आहे, राखीनंतर. तोच तिला घाबरवणार आहे. कॉमेडियन्स लागतील ४-५. त्याशिवाय रिलीफ कसा मिळणार! बाकी म्युझिक बॉप्पीदा. डान्स डायरेक्टर "सुबल सरकार". गायक चालेल कोणीही.

आणि हां! एक पाद्री हवाय... अन्नु कपुर काय करतो हल्ली? मराठी येतं त्याला. सचिन-लक्षा-अशोक सराफच्या चित्रपटात होता कुठेतरी. आपल्या चित्रपटात पहिला बळी त्याचाच! कुबड्या नोकर मात्र मरणार नाही. पुढे..... पुढे..... पुढे काही सुचत नाहीये हो... पण सुचेल. काही सुचलं नाही तर "भुमिकेच्या गरजेपोटी" राखीची दोनचार गाणी टाकु. भिती वाटवायला "पल्लवीला" अजुन दोनचार ड्रेस बदलायला लावु. अगदीच काही नाही, तर एखादा नवा हॉलिवूड चित्रपट पाहु.

आणि हो. विसरलोच होतो. मुख्य भुमिका भुताची! तुमच्या आजुबाजुला कोणी होतकरु भुतं असतील, तर माझ्या विपु मधे डोकवायला सांगा. "दिवसा"च. हो. हो. दुसरं योग्य भुत मिळालं नाही, तर मीच भुत होईन म्हणतो. मीही परफेक्शनीस्ट आहे. Light 1 बाकी, भुतांसाठी "रा बंदु आणि सा बंधु"शीही संपर्क साधला आहे. त्यांचं उत्तर आलं, की लग्गेच डिटेल स्टोरी लिहायला घेणार आहे. स्टोरीचं होईल काहीतरी, पण तुर्तास सांगणे इतकेच, की ह्या लाईन वरती असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेकप साठी शाहनाझ हुसैन ला पर्याय नाही.>>>>>>>>कशाला मेक अप करायचे आहे ना? मग एम .एफ हुसैनच ठिक आहेत.......रंग तर फासायचा आहे आणि त्यात राखीला.....(भारत माता आठवतेय ना)

चला.. कोणालातरी हिरो ची आठ्वण झाली.
आपण मोठ्ठी टेस्ट ठेवुया पणः) आणि डायलॉग रायट्र कोण? कादर खान Uhoh ? मी परवाच त्याचा हॉरर पिच्चर पाहिला. उमर पचपन, दिल बचपन. आरारारारारा...

व्वा! विशालदा.. ष्टोरीमधेही काही ट्विष्ट्स सुचवा वेळ मिळेल तसा.. आपल्याला फॅमिलीप्रधान अ‍ॅक्शनपट काढायचाय... आणि गाणी चित्रणासाठी दिनेशदा आहेत. गाणी लिहायला मुटेदांकडे साकडे घातलंय. पण त्यांनी 'बिपाशाच लुगडं चे हक्क महेश भटटाच्या पुढच्या पिच्चरला दिली अशी खबर आहे. Sad ). भुतावरचा उतारा भुटॉल म्हणुन नवा फॉर्म्युला आहे म्हणे... मंजो-लाजो-निंबो कं. शी संपर्क साधायचाय... ही शेवटची कं. लबाड आहे म्हणे. काळजी घेतोच मी. Happy

राखी ही एक सात्विक स्त्री असते. सर्व प्रकारचे उपासतपास, व्रतवैकल्ये यात तिचा हात त्रिखंडात कुणी धरत नसतो. तिच्या नव-याला अर्धांगवायू, रक्तदाब, अर्धशिशी, मधूमेह आणि त्वचाविकार या आजारांनी ग्रासलेले असते. त्यासाठी ती जे कुणी सुचवेल ते उपाय करत असते. यासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी तिने एका हॉटेलात कॅब्रे डान्सरची नोकरी धरलेली असते. ( मध्यमवर्गीय विचारसरणीच्या जुनाट कक्षा रुंदावून पाहीलंत तर पतीच्या आरोग्यासाठीच केलेलं खडतर व्रत आहे हे पटेल). ( आठवा घातक मधील मीनाक्षी शेषाद्री, तेजाब मधील माधुरी आणि असंख्य बॉलिवूडी गाथा )

मोहन जोशी हा एक मांत्रिक असून त्याची वाईट नजर राखीवर असते. शिवाय तिचं व्रत त्याला सहन होत नसल्याने ते त्यास मोडायचं असतं. त्याला सिद्धी प्राप्त करून घ्यायची असते पण हजारो वर्षे भटकणा-या एका भुतिणीने त्यास राखीच्या व्रताच्या तेजोमंडलाने आम्हास रात्रीबेरात्री फिरणे अशक्य झालेले आहे तेव्हां आधी तिचा तेजोभंग कर असे सुचवलेले असते. म्हणून मोहन जोशीनेच तिच्या नव-याला आजार दिलेले असतात. या नव-यास कण्हणे हे प्रमुख काम असल्याने भरत जाधवसाठी हा रोल फिक्स आहे. भरत जाधव ला फसवून खाऊ घालण्यासाठी त्याला एक मित्र हवा. हा मोहन जोशीचा असिस्टंट असतो हे सस्पेन्स शेवटी उलगडतं. मोहनरावांना असिस्टंट म्हणून विश्वासू माणूस हवा असल्याने ते जितेंद्र जोशीची निवड करतात. अशा रितीने जोशींचा कंस झाल्यावर (जितेंद्र, मोहन) भरत जाधवला जेरीस आणतात. नेहमी उभ्याने करायचा अभिनय आडवा होऊन करायला लागल्यावर तो अधिक नैसर्गिक वाटू लागतो.

जेव्हां राखीला हे समजतं तेव्हां ती मोहन जोशी आणि भूतमंडळींचा समाचार घेण्याचा निश्चय करते .. Proud
आगे......????
क्रमशः

नुसती इस्टोरी का? गाणी का नकोत? रिमिक्स घाला की.

झुम झुम ढलती रात( कोहरा) देखो वो आगया ( कारवां ) गुमनाम है कोई( गुमनाम) नाहीतर नवीन ढिंचॅक राखी टाईप गाणी. हवेली बदनाम हुई राखी तेरे लिए, राखी, राखी की कहानी.:फिदी:

ओह रश्मीजी... आपने सही पहचाना, यहां पे गाना होना चाहीये !!!

राखी पांढ-या साडीत न्हाऊन तुळशी वॄंदावनाला फे-या मारत पहाटे साडे नऊ वाजता गाणं म्हणत असते. रात्री कॅब्रेडान्स रंगल्याने चांगलाच उशीर होत असतानाही सगळी आण्हिकं उरकून इतक्या भल्या पहाटे आरती म्हणावी तशी राखी गोड गळ्याने गाणं म्हणत असते.

आ आ आ आ आ आ आ आ
लुळा पांगळा आहे, रोगट जरी
माझा पती आहे देवता तरी

हेच गीत आदल्या रात्री नाईट क्लब मध्ये तिने असं गायलेलं असतं

कोरस : उ उ तारा तारा तारा तारा रा रा रा रा तारारारारारारा
लुळा आहे हा हा हा हा हा
पांगळा आहे हा हा हा हा हा
माझा पती माझा देवता आहे
हा हा हा हा हा हा

मोनिका
तू खरी खरी पतिव्रता
डिंग डांग डांग डांग डिंग डांग डांग डांग
डा डा डा
हा

आगे...

Pages