चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीकॉकवर ब्रॅडली कूपर, रॉबर्ट डी नेरो, ॲबी कॉर्निश यांचा 'लिमिटलेस' पाहिला. सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे पण भरपूर मारामारी आहे. ब्रॅडली हा एक रायटर्स ब्लॉक आलेला, महत्त्वाकांक्षी नसलेला एडी मोरा नावाचा अपयशी- दिशाहीन पूर्वी एक औट घटकेचे लग्न होऊन घटस्फोट घेतलेला लेखक आहे. त्याची लिन्डी नावाची सध्याची गर्लफ्रेंड पण त्याला सोडून जातेय.

या अशाच दिशाहीन काळात त्याला एक्स बायकोचा भाऊ मार्केट मधे आलेले आणि क्लिनिकल ट्रायल न झालेले नोआट्रॉपिक प्रकाराचे ड्रग देतो. नोआट्रॉपिक -कॉग्निटिव्ह क्षमता वाढवणारे. सगळीच इंद्रिये धारदार करून टाकणारे. एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निरीक्षणशक्ती यासहित सगळेच आयक्यू चार आकडी होऊन जाणारे. सगळ्या भाषा यायला लागतात, कुठल्याही विषयात नैपुण्य मिळवायला काही क्षणांचे निरीक्षण पुरायला लागते.

पुढे या NZT नामक गोळ्यांनी तो सुपरह्यूमन होऊन ट्रेड आणि स्टॉक मार्केटची अंदाज घेत झटपट कुठल्याकुठे जातो. पण या गोळ्यांचे विथड्रॉवल सिम्पट्म्स  dissociative fugue यायला लागतात म्हणजे आपण कुठे होतो आणि काय केले हे काही काळासाठी मेमरीतून अदृश्य होऊन जाते. अशा टाईम स्किपच्या काळात त्याच्या हातून खून होतो.

झटपट श्रीमंत होण्यासाठी- गुंतवणूक करण्यासाठी तो एका शेडी गुंडाकडून लाखभर डॉलर उसणे घेतो. नंतर तो गुंड पैश्यासाठी नाही पण NZT साठीच याच्या जीवावर उठतो. रॉबर्ट डी नेरो एक बिझनेस टायकून ह्याच्या वेगळ्या क्षमतेमुळे याला आपल्या कंपनीत घेतो. नंतर त्यालाही ह्या एनहॅन्सड एबिलिटीज नॉर्मल नाहीत हे लक्षात येते. हळूहळू NZT बद्दल बऱ्याच जणांना कळतं.

ह्यातील पाठलागाचे सीन्स, टाईम स्किपचे सीन तो सुपरह्यूमन झाल्यावर जे फिश आय लेन्सने सगळं जग बघू शकतो, दूरवरचे ऐकू शकतो, लहानपणी टिव्हीवर पाहिलेली ब्रूसलीसारखी मारामारी करू शकतो, ओव्हरॉल तो सगळ्या मानवी मर्यादा ओलांडून लिमिटलेस होतो हे स्थित्यंतर खूप मस्त दाखवलं आहे.

वेगवान तर आहेच पण एक 'व्हिज्युअल पनाश' (panache) आहे सिनेमाला. रिफाईन्ड वाटतात सगळ्या हालचाली. शिवाय पार्श्वसंगीत फारच चपखल आणि तितकेच सायकेडेलिक वाटते. मला आवडला. ब्रॅडली कूपरचे डोळे अगदी खोल डोहासारखे निळे दिसतात. रॉबर्ट डी नेरो त्याला हे जे तू सगळं शॉर्ट कटने मिळवलं आहेस ते मी अनुभवाने जिंकले आहे म्हणत त्याचा आत्मविश्वास घालवण्याचा प्रयत्न करतो, ज्यात तथ्यही असतंच. ते संवादही आवडले. शेवटी दोघेही ओव्हर ॲम्बिशस होतात आणि अहंकार आडवे येऊन वेगळे होतात पण हा तोवर unstoppable होऊन बसलेला असतो. सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. तरीही ब्रॅडलीच लक्षात राहतो. आता हे अती प्रकरण मेल्याशिवाय संपणार नाही असे वाटतानाच खूपच सकारात्मक शेवट होतो, अविश्वसनीय वाटावा इतका. ब्रॅडलीला या सगळ्या क्षमता कायमस्वरूपी बाळगून या गोळ्यांपासून स्वतःला मुक्त करता येते.

मस्त लिहीले आहेस. ३-४ वर्षांपूर्वी हा पिक्चर पाहिला होता आणि आवडला होता हे लक्षात आहे. ब्रॅडली कूपर इन जनरल आवडतोच.

पाहायला लागेल लिमिटलेस.
उलझ मलापण ठीक ठाक वाटला.ती एव्हडी हुशार असते तर सुरुवातीला मंदपणा का करते याचं आश्चर्य वाटतं. जान्हविची सो सो अँकटिंग असूनही पिच्चर चांगले मिळतात लीडवाले.

रानभूली,तू बोलतेस तो कोणता पिच्चर आहे ते माहीत नाही पण टायगर 3 मध्ये पण पाकिस्तानी प्राईम मिनिस्टर असलेली साऊथ ऍक्टरेस सिमरन हीला वाचवतात सलमान कतरिना पण ते पाकिस्तानात, भारतात नाही.

३ टायगर नाही. मुंबईवर अ‍ॅटॅक होणार असतो. सेम स्टोरी आहे.

स्पॉयलर :
पाकिस्तानी अतिरेक्याला पळून जायला मदत केलेल्या पोलिसांना गुप्तहेर संघटनेत एव्हढ्या की पोस्टस कशा काय मिळतात ?
ते पण त्या घटनेची चर्चा झालेली असते असे संवाद आहेत नंतर. गुप्तहेर खात्यालाच माहिती नाही का ?

जान्हविची सो सो अँकटिंग असूनही पिच्चर चांगले मिळतात लीडवाले.
>>>>>

कारण ती नेपोकिड आहे. घरचा चित्रपट व्यवसाय आहे.

मी तिचा आजवर एकही चित्रपट पूर्ण पाहिला नाही. मला तिचा अभिनय आणि पडद्यावरचा वावर नाही झेपत. पण ती वैयक्तिक आवड झाली. यापेक्षा वाईट अभिनय असलेले कित्येक जण आहेतच ज्यांचे चित्रपट बघितले जातात.

यावरून आठवले,
गेल्या आठवड्यात ढोल चित्रपट पाहिला. गोलमाल आणि धमाल यांच्या पठडीतील आहे. म्हणजे चार टवाळ मित्र वगैरे. एकदा बघायला छान आहे नक्कीच. पण त्यातली हिरोईन. तनुश्री दत्ता. बापरे. तिला अभिनय काही म्हणजे काहीच येत नव्हता. ना संवाद ना चेहऱ्यावरचे हावभाव. पूर्ण चित्रपटभर तिला नुसते लपवत होते. सलग असा दहा सेकंदाचा सीन तिला देत नव्हते. बाकीचे सारे उत्स्फूर्त कलाकार असल्याने आणि चित्रपटाचा फोकस त्यांच्यावरच असल्याने ती लपून गेली म्हणा, पण एखादी चांगली अभिनेत्री घेतली असती तर तिचे सीन आणखी खुलवता आले असते.

थॅंक्यू फा, रमड आणि सिमरन. Happy
'उलझ'च्या नादाला लागले नाही अजून. जाह्नवीमुळेच..!

काल 'देवा' पाहिला. चांगला आहे. कुठे कुठे अतिरंजित वाटतो पण पोलिसपट आहे. शिवाय हिरो पोलिस असला की थोडा सुपरहिरो होता. ॲक्शन सिक्वेन्सचा जो कोणी डिरेक्टर आहे त्याने पुष्कळ लकबी साऊथच्या सिनेमाच्या शैलीतील उचलल्या आहेत. फाईटिंग बघताना पुष्पाची आठवण यावी असे. हिरो मारताना नेहमी फास्ट आणि अनरिअलिस्टिक हालचाली करतो. पण एरवी हिंदी चित्रपट वाटतो. कुठे कुठे पकड सुटते, तरीही बऱ्यापैकी एंगेजिंग आहे. शेवटी शेवटी रहस्य कळालं किंवा स्मृतीभ्रंशाचा घाट का घातला असावा कळालं. सगळ्यांची कामं बरी आहेत. पूजा हेगडेला फार काही कामच नाही. गाणी आठवत नाहीत, त्या कोरिओग्राफी वर सुद्धा साऊथचा प्रभाव आहे. शाहिद कपूर चांगलाच नाचतो. केस बारीक केलेले असले की सिरियस रोल (हैदर), केस नॉर्मल असले 'नाचे वही वो हिरो' असतं याचं. Happy

त्याने पुष्कळ लकबी साऊथच्या सिनेमाच्या शैलीतील उचलल्या आहेत. >>> मी ५-१० मिनिटेच पाहिला आहे पण तसेच वाटले.

पाताल लोक मधला "अन्सारी" आहे ना यात? याचा मित्रच वाटतोय पण नियमानुसार जाणारा वगैरे. जितके पाहिले त्यातून असे वाटले.

याचा मित्रच वाटतोय पण नियमानुसार जाणारा वगैरे. Lol हो त्याच्यावरच पिच्चर आहे आणि सस्पेंसही.

तो अन्सारी वाटतो, त्या दोन्ही कॅरेक्टर्समधील साधर्म्यामुळे पण नाही. शिवाय अन्सारी जास्त क्यूट होता. Happy हा कुणीतरी पवैल गुलाटी दिसतोय, पाताललोक मधे ईश्वाक सिंह होता.

काल तब्बुचा 'खुपिया' बघितला. चान्गल्याकथेचि माती केली. उगाच सेक्स सिन्स उत्तानपणा.... नाहि पहिला चालेल.

लापता लेडीज चांगला वाटला. असेच काहि चित्रपट असल्यास सुचवावे.

>> पाताल लोक मधला "अन्सारी" आहे ना यात? याचा मित्रच वाटतोय
तो नाहीय. पवैल गुलाटी आहे. त्याची आणि सयामी खेर ची सोनी लिव वर फाडू म्हणून एक सिरिज आहे. चांगला अभिनय केलाय आणि ती सिरिज ही वन टाईम वॉच आहे.

>>काल 'देवा' पाहिला. चांगला आहे. कुठे कुठे अतिरंजित वाटतो पण पोलिसपट आहे. शिवाय हिरो पोलिस असला की थोडा सुपरहिरो होता. ॲक्शन सिक्वेन्सचा जो कोणी डिरेक्टर आहे त्याने पुष्कळ लकबी साऊथच्या सिनेमाच्या शैलीतील उचलल्या आहेत. फाईटिंग बघताना पुष्पाची आठवण यावी असे.>>

'देवा' हा रोशन अँड्र्यूज नामक दिग्दर्शकाने २०१३ सालच्या आपल्याच 'मुंबई पोलीस' ह्या मल्याळम चित्रपटाचा हिंदीत केलेला रिमेक असल्याने "पुष्कळ लकबी साऊथच्या सिनेमाच्या शैलीतील" आणि "फाईटिंग बघताना पुष्पाची आठवण यावी" असे होणे अगदी स्वाभाविक आहे. पृथ्वीराज सुकुमारनची मुख्य भूमिका असलेला मूळचा मल्याळम चित्रपट खूप आधीच पाहून झालेला असल्याने 'देवा' बघायची इच्छाच झाली नाही.

२००० सालचा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलच्या धमाल भूमिकांमुळे प्रचंड गाजलेला 'हेराफेरी' हा प्रियदर्शनचा चित्रपट बघत असताना बरोबर असलेला मल्याळी मित्र "अरे ये तो 'रामजी राव स्पिकिंग' फिल्मका रिमेक हैं" असे म्हणाला होता. तेव्हापासून साउथचे सिनेमे बघण्यात रुची निर्माण झाली. सुरुवातीला तिथल्या मोजक्याच चित्रपटांच्या हिंदी डब्ड आवृत्त्या उपग्रह वाहिन्यांवर बघायला मिळायच्या पण पुढे गोल्डमाईन्स, सूर, पेन, आरकेडी व तत्सम मंडळींच्या कृपेने युट्युबवर आणि मग विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर भरपूर साऊथ डब्ड सिनेमे पाहायला मिळू लागले आणि एवीतेवी ह्यांचेच पुढे पाच-सहा वर्षांनी येणारे सलमान, अक्षय कुमार, अजय देवगण वगैरेंना घेऊन केलेले रिमेक्स पाहण्यापेक्षा 'वरिजनल' चित्रपट पाहण्यातच मजा यायला लागली.

आता वरील वयस्कर अभिनेत्यांची जागी 'शाहिद कपूर', 'वरूण धवन' वगैरे दिसू लागलेत एवढाच काय तो बदल. 'बेबी जॉन' न पाहण्यामागेही हे प्रमुख कारण (वरूण धवन हे आणखीन एक 😀) आणि अ‍ॅटलीचा २०१६ सालचा 'विजय'ची मुख्य भूमिका असलेला 'थेरी' हा मूळ तामिळ चित्रपट आधीच पाहिला होता (आणि आवडला नव्हता) हे दुसरे महत्वाचे कारण!

आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या 'सिकंदर' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या एआर मुरुगादास ह्यांचे 'गजनी' आणि 'हॉलिडे' हे त्यांच्याच मूळच्या तामिळ चित्रपटांचे, त्यांनीच केलेले हिंदी रिमेक्स आणि 'स्पायडर' ह्या तेलगू सिनेमाची हिंदी डब्ड आवृत्ती असे त्यांचे तीन चित्रपट आधी पाहिले आणि आवडलेही असल्याने आणि सिकंदरच्या बाबतीत उलटी गंगा वाहिली असल्याने (आधी ढिसाळ स्वरूपात हिंदीत आलाय, आता मुरुगादास योग्य ते बदल करून तामिळ किंवा तेलुगूत आणतील असा अंदाज असल्याने) हा मात्र आल्या आल्या लगेच दुसऱ्याच दिवशी पहिला.

नुकताच आलेला मोहनलालचा 'एल २ एम्पूराण' (ल्युसीफरचा दुसरा भाग) हा बिग बजेट चित्रपट वादात सापडल्याने आक्षेपार्ह प्रसंग/संवाद/पात्राचे नाव बदलून तो पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचे कळल्यावर घाईघाईत हा (फालतू) चित्रपटही बघीतला आणि इतका टुकार पण बिग बजेट सिनेमा 'बॉक्स ऑफिस बॉम्ब' ठरू नये म्हणून केलेला हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे जाणवले. प्रमुख भूमिकेत मोहनलाल आणि अभिनेता-दिग्दर्शकाच्या रूपात पृथ्वीराज सुकुमारन ह्या माझ्या आवडीच्या दोन्ही कलाकारांनी साफ निराशा केली. बहुतांश तामिळ आणि मल्याळम सिनेमे हे प्रचंड प्रोपगंडाधारीत असतात ह्यात काहीच शंकाच नाही आणि एल २ एम्पूराण हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे संघ-भाजपवाल्यांनी त्यावर आक्षेप घेणे अगदी स्वाभाविक आहे (आणि तो घेता यावा ह्याची निर्माता-दिग्दर्शकाने मेहनतपूर्ण तजवीजही केली आहे.)

परंतु हा राजकीय भाग बाजूला ठेऊन केवळ एक चित्रपट म्हणून जरी ह्याकडे पाहिले तरी हाती काहीच लागत नाही. नुसते मोठे बजेट, तगडी स्टारकास्ट आणि 'द वर्ल्ड इज नॉट इनफ' म्हणत अनंत देशांत केलेल्या चित्रीकरणातुन चांगला सिनेमा बनत नाही, कथानकही खूप महत्वाचे असते हे हा चित्रपट पाहिल्यावर पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.

मलाही वरुण धवन विशेष वाटत नाही. मर्यादित अभिनय क्षमता आहे. त्यापेक्षा आयुष्मान, राजकुमार राव, विकी कौशल कितीतरी सरस आहेत. वरच्या पोस्ट मधील प्रियदर्शन+ नीरज वोरा ह्यांचे ओरिजनल साऊथचे पण हिंदी रिमेक्स आवडलेले आहेत, तेवढं माहिती होतं. बऱ्याच चित्रपटांचे हिंदीकरण छान जमले होते.

संजय भावे छान पोस्ट.

अर्थात याला दुसरी बाजू देखील आहे.
म्हणजे मूळ साऊथ पिक्चर हिंदी रिमेकपेक्षा जास्त चांगला असला तरी एखादा चित्रपट न समजणाऱ्या भाषेत सबटायटलसह बघणे किंवा हिंदी डब बघणे यापेक्षा जे आपले ओळखीचे आणि आवडीचे कलाकार आहेत त्यांना घेऊन आपल्या भाषेत केलेले चित्रपट कित्येकांना जास्त आवडतात.

त्यामुळे गाजलेल्या साऊथ चित्रपटांचे रिमेक बनतात हे सुद्धा चांगलेच. कारण इतर भाषेतील चित्रपट आवडीने बघणे आणि त्याच्याशी कनेक्ट होणे हे सर्वांनाच नाही जमत.

Pages