निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर चेरी blossom चा फोटो आलाय. नेमका आजच चालायला गेले असताना चेरी ब्लाँसमचे फोटो काढले आणि लगेच घरी येऊन झटपट स्केचिंग केलं, निसर्गनोंद डायरीत. Daffodils पण बहरात आहेत. ती पण कुणाच्यातरी फ्रंट यार्डात barrels मध्ये लावलेली आवडली म्हणून फोटो काढून त्यांनाही स्केचमध्ये रूपांतरीत केलं.20250320_230245.jpg

फोटो जरा काळोखात आलाय...

ममो काकडीच आहे. काकडी वर्गातल्या फळांवर काटे असतात
तसे यावर आहेत. तवसे असावे बहुतेक.

हा घ्या अबोलीला झब्बू

अबोलीचे रंग चार...!
सोनसळी
IMG-20250321-WA0008.jpg
पिरोजा / फिरोझी
IMG-20250321-WA0004.jpg
मलाई
IMG-20250321-WA0005.jpg
कनकांबरा /अबोली
IMG-20250321-WA0012.jpg

अबोलीचे रंग चार !
बहुत खूब.

फक्त शेवटचा रंग प्रत्यक्ष बघितला होता. अन्य नव्हते पाहिले.

खूप छान रंग आहेत मनिम्याऊ
मलाई रंग पहिल्यांदाच पाहिला.
बाकी रंग पाहिलेत पण आता कुठलंच झाड नाही माझ्या कडे

2 आणि 3 यांना कोरांटी म्हणतात ना?

मी 3 नंबरचा रंग नव्हता पाहिला. बाकी बघितले आहेत. 1 नंबरवाली म्हणजेच रतन अबोली का?

अबोली निळी आणि पांढरी नव्हती पाहिली. खूप छान फोटो. पहिली आणि नॉर्मल वाली होती माहेरी. अजून एक होती - अबोली रंग आणि सेंटरला लाल ठिपका असलेली. ती इतक्यात पाहिली नाही कुठे.

@रायगड, तुझं कौतुक करायला खास वेगळी पोस्ट. सुंदर उतरवला आहेस फुशिया कागदावर. आणि चेरी ब्लॉसम तर अप्रतिमच!
पेन्सिल स्केचिंग आहेत ही?
डॅफोडिल्स पण मस्त दिसतायत.
आणि विशेष विशेष कौतुक हमिंगबर्डच्या स्केचचं. माझ्या बाल्कनीत हमिंगबर्डस् साठी खाऊ लावलाय त्यामुळे जवळून पाहता येतात. अगदी परफेक्ट रंग उतरवले आहेस.

2 आणि 3 यांना कोरांटी म्हणतात ना...>>>
नाही मामी. कोरांटी वेगळी. ती सोनसळी, पांढरी, जांभळी आणि गुलाबी रंगात असते. सोनेरी रंगाच्या कोरांटी ला काटे असतात म्हणून ती काटे कोरांटी. संस्कृत नाव वज्रदंती..

एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्यांना रोज काटेकोरांटीची फुले वाहून बालकृष्णाची उपासना करायला सांगतात (सहज परंपरा म्हणून सांगितलं कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही.)

साधारण दिवाळी ते संक्रांती या दरम्यान कोरांटी बहरात असते. माझी एक तमिळ मैत्रीण कोरांटी ला. डिसेंबर फ्लॉवर म्हणते.
हा आजचाच फोटो
IMG-20250321-WA0019.jpg
(माझ्या कडे सध्या सगळंच बेमोसम उमलतंय बघ. )

आह! ओके. दोन्हीच्या फुलं येतात त्या भागाच्या रचनेत फरक आहे. पानंही वेगळी आहेत. धन्यवाद. आज एका ज्ञानकणाची प्राप्ती झाली.

रायगड
चेरी ब्लॉसम काय सुंदर रेखलय. अप्रतिम.
आणखी काही असतील तर नक्की पोस्ट करा इथे हळूहळू.
मणिम्याउ, भाग्यवान आहात. Happy
माझ्याकडे सोनसळी (पहिला रंग) नाही. बाकी सगळे आहेत.
कोरांटी पण मस्तच.
दापोलीच्या कृषी विद्यापीठात अनेक रंगांच्या कोरांट्या वाण उपलब्ध आहे. फोटो शोधून टाकतो.
मस्तच माहिती. फोटो.

साधना, रमड, ऋतुराज - धन्यवाद!!

रमड..>@रायगड, तुझं कौतुक करायला खास वेगळी पोस्ट.>> Awww..special thanks!
>पेन्सिल स्केचिंग आहेत ही? > फुशिया आणि हमिंगबर्डस् पेन्सिल स्केचेस् आहेत. चेरी blossom जलरंगात आहे.

ऋतुराज टाकत जाईन इथे अधून मधून माझी स्केचेस.

मी हिरव्या अबोलीला दशमुळी समजत होते. माझी चुक.

ही हिरवी अबोली आमच्या जंगलात ढिगानी दिसते. मलई कधी पाहिली नाही.

मामी रतन अबोली डार्क अबोली रंगाचीच असते पण फुले पुर्ण उघडत नाहीत. अर्धवट कळी राहते. माझ्याकडे आहे पण सध्या फुले नाहीत.

रायगडची स्केचेस खूपच सुंदर .
अबोल्या आणि कोरांटी छान आहेत. मलई अबोली प्रथमच पाहिली. माझ्याकडे रतन अबोली फुललेय .

IMG-20250322-WA0001.jpg

सुप्रभात लोकहो.
मस्त अबोली, जयु
@रायगड, खरंतर एक वेगळा धागा काढ तुझ्या स्केचेस चा.

इथे तुझ्या बागेचे फोटो टाक ना.>>>>> ११११

# Harbinger of Hope>>>> so nice.

सध्या पिंपळाला सोनेरी पालवी दिसतेय.

… पिंपळाला सोनेरी पालवी दिसतेय.….

हो.

पिंपळाची नवीन पालवी = किसलय.

@ अनिंद्य... फोटो बघून तुकोबांच जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ आठवलं ...

पण अशी उगवलेली रोपं सहसा काढून टाकतात.

.. जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ… ❤

मोठ्या झाडाची पाने फार सुंदर दिसतात वारा असेल तर. पिंपळ- स ळ स ळ Rhyme पण होते छान.

फोटोतला हॉस्पिटलच्या कंपाउंड वॉलवर उगवलाय. तिथल्या रुक्ष उदास रडतोंड्या पार्श्वभूमीवर ही नवीन आनंदी पालवी बघून धडधड कमी झाली, मन शांतावले. म्हणून फोटो काढला.

पिंपळाच्या झाडाबद्दल एक पंजाबी phrase आहे..

कोई रुख पीपल दा होय..
जिसनु पूजेता हर कोय...
जिसदी फसल किसे ना बोय...
घर वी रख्ख सके ना कोय...

एखादी व्यक्ती असते अशी पिंपळाच्या झाडासारखी.. फार उंचावर असलेली. तिची सावली तर सर्वांना हवी पण .... Sad

Pages