मभागौदि २०२५.. निसर्गायण.. कोकणातली मनोहारी पहाट.. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 27 February, 2025 - 10:14

कोकणातील पहाट अनुभवण्याचा स्वर्गीय अनुभव नक्की वाचा.

कोकणातली मनोहारी पहाट

मी काही रोज आवडीने पहाटे उठणारी व्यक्ती नाही. उलट पहाटेची झोप मला अतिशय प्रिय आहे. मात्र मी कोकणात गेले की तिथली पहाट अनुभवण्यासाठी मोबाईल मध्ये गजर लावून रोज पहाटे उठते. थंडीत तसं ही उशीरा उजाडत असल्याने फार लवकर उठावं लागत नाही. पण उन्हाळ्यात मात्र पहाट बघायची असेल तर फारच लवकर उठावं लागतं. कोकणातल्या आमच्या घरची पहाट ही खरं तर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा विलक्षण अनुभव शब्दबद्ध करणं खूप कठीण आहे पण बघते प्रयत्न करून. जे काही अनुभवते त्याच्या एक शतांश जरी शब्दात उतरवता आलं तरी मी स्वतःला धन्य मानेन.

पहाटे गजर झाला की खोलीत बसणं अशक्यच होतं मला. पावलं आपसुकच खोलीला लागून असलेल्या व्हरांड्याकडे वळतात. बाहेर पाऊल टाकता क्षणी वातावरणात भरून राहिलेला ताजेपणा आणि हवेतला गारवा मनाला एक वेगळाच तजेला देतात. बाहेर अजून ही मिट्ट काळोखच असतो. तरी ही त्यात अंधुकपणे दिसणाऱ्या आगारातल्या माडा पोफळीच्या आऊट लाईन्स फारच आकर्षक दिसतात. कधी कधी आकाशात चांदण्यांचा अक्षरशः खच पडलेला असतो. सर्वत्र निःशब्द शांतता असते. कधी मधी तिचा भंग होतो ते मांडवावर पडणाऱ्या दवाच्या टप टप आवाजाने. अर्थात ती टपटप कानाला अजिबात बोचत नाहीच उलट आसपासच्या शांततेला निश्चितपणे कॉम्प्लीमेंटच करत असते.

सभोवतीची शांतता, काळोख भान हरपून मनात साठवून घेत असताना मी भानावर येते ती सूनबाईनी माझ्यासाठी आणलेल्या आलं घातलेल्या चहाच्या वासाने. काही बोलले तर शांतता भंग पावेल म्हणून नजरेनेच तिला थँक्यु म्हणते आणि आलं घातलेल्या, गरम, गोडसर, दुधाळ, चहाचा कप हातात घेऊन मी चहा प्यायला पुढच्या खळ्यात येऊन बसते. तिथे मात्र मी एकटी नसते. कायम माझ्या पायाशी मोती बसलेला असतो. माझा मूड जणू काही त्याला ही समजतो. तो ही शांतपणे काही आवाज न करता बसून असतो. अजूनही सर्वत्र काळोखच असतो. पण लांब असलेल्या गोठ्याच्या दाराच्या फटीतून येणारी प्रकाशाची तिरीप तेवढी त्या काळोखाला छेद देत असते.

काळोखव असल्याने काही अपवाद वगळता बहुतांश कळ्यांचे डोळे मिटलेलेच असतात. आदल्या रात्री फुललेल्या फुलांचा सडा प्राजक्त जरी खळ्यात नि:शब्दपणे घालत असला तरी त्याचा सुवास ती वर्दी देतोच मला. तसेच रात्री उमललेल्या कुमुदिनींचा मंद सुगंध ही खळ्यात भरून राहिलेला असतो. मोहोराचे दिवस असतील तर त्या गोड वासाने वेडं व्हायला होतं. परंतु ह्या सगळ्या संमिश्र सुवासांfवर कडी करतो तो मागील दारी पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या चुलीच्या धुराचा वास. अंधारात ही मला ओळखून “ वैनीनू, एकल्याच बसल्यासां का “ असं काही तरी विचारून गडी गोठ्यात धारा काढायला जातो. अंधारात न ओळखल्याने मोती मात्र त्याच्यावर जोरजोरात भुंकायला लागतो. मग थोड्याच वेळात गोठ्यातून गायींच, वासरांच हंबरण भोवतालच्या शांततेचा भेद करत कानात जातं.

आपण फारच नशिबवान असलो तर कधी कधी आकाशात अस्ताला जाणारी चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी आपल्या तेजाने चमकणारी शुक्राची चांदणी बघण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. आता अंधुक अंधुक दिसायला लागतं. हळू हळू अंधाराच साम्राज्य विरत जातं. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होतो. मे महिना असेल तर कोकिळा आळपायला लागते. ( आमच्याकडे कोकणात कुहू कुहू, कूजन वगैरे पुस्तकी शब्द न वापरता कोकिळेच आळपणं हा
शब्द वापरला जातो ज्यात मंजुळ वैगेरे अभिप्रेत नसून ओरडणे, केकाटणे हे अभिप्रेत आहे. अति परिचयात अवdnya , दुसरं काय ? ) हळू हळू सगळा परिसर ही दृग्गोचर होत जातो.

संधिप्रकाश आणि उजाडणे ह्यातली सीमा रेषा फारच धूसर असते. किती ही लक्ष ठेवून राहिले तरी तो क्षण माझ्या हातातून कायम निसटत आला आहे. कारण दोन पाच मिनटातच लख्ख दिसायला लागत. दैनंदिन व्यवहार सुरू होतात. शाळकरी मुलं गणवेश घालून शाळेला निघतात. सुनबाई तुळशीची पूजा करायला तबक घेऊन खळ्यात येते. कामाला आलेल्या गड्या माणसांची गजबज वाढते. स्वयंपाक घरातून ही भांड्यांचे आणि बोलण्याचे आवाज वाढतात. ओटीवरच्या झोपाळ्याच्या कड्या कुरकुरु लागतात. दिवस उजाडल्याची खात्री पटते. मनाच्या एक अतीव समाधानाची भावना घेऊन मी ही भानावर येत माझी नित्य कर्मे करण्यासाठी खळ्यातून घरात येते.

मिट्ट काळोख , संधिप्रकाश आणि लख्ख उजेड हा सारा फार फार तर अर्ध्या तासाचा खेळ पण त्यामुळे मनाला जी प्रसन्नता येते ती शब्दात वर्णन करणे कठीण. मी मुंबईत असले आणि कधी उदास वाटलं तर ह्या पहाटेची नुसती आठवण ही मन ताजतवानं करते. रोजची आव्हाने पेलण्याचं सामर्थ्य देणारी … रोज नवी भासणारी… नित्य नवा आनंद देणारी .. कोकणातल्या आमच्या घरातली पहाट..

हेमा वेलणकर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर वर्णन.
मलाही कोकणातली, घरची सकाळ फार आवडते. सगळ्या सुवासांसहित (चुल्याच्या धुराच्याही).
(तुम्ही लिहिलंय तितक्या पहाटे मी फक्त दिवाळीच्या दिवशी किंवा पुण्यामुंबईला जाण्यासाठी एसटी पकडायची असेल तरच उठले आहे Wink )
रच्याकने, कुत्रा वासावरून नाही का ओळखत नेहमीच्या माणसाला?

मस्त. कोकणात इतक्या सकाळी उठल्याचं आठवत नाही. इथे थंडीत फायरप्लेसचा वगैरे वास आला की एकदम कोकणात चुलीवर पाणी तापत असतं त्याचीच आठवण येते.

स्वाती, झकासराव, वावे, पराग, अमितव, मै, सामो , सायो धन्यवाद...

रच्याकने, कुत्रा वासावरून नाही का ओळखत नेहमीच्या माणसाला? >> कधीतरी ओळखतो कधी तरी नाही. Happy

सुंदर वर्णन. आवडले. Happy

संधिप्रकाश आणि उजाडणे ह्यातली सीमा रेषा फारच धूसर असते. किती ही लक्ष ठेवून राहिले तरी तो क्षण माझ्या हातातून कायम निसटत आला आहे.
>>>> अगदी, अगदी. पोचले हे.

वा! खूप सुरेख. लहानपणी अनुभवलेलं दापोली आठवलं.

........... मोहोराचे दिवस असतील तर त्या गोड वासाने वेडं व्हायला होतं. ह्या सगळ्या संमिश्र सुवासावर कडी करतो तो मागील दारी पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या चुलीच्या धुराचा वास. >>>>> हा वास जाणवलाच. वेगळंच रसायन असतं ते.

सुंदर अनुभव.. शब्दचित्र!
झोपाळ्याची किरकिर, प्राजक्ताचा सडा, सुवास, ओल्या गवताचा वास, पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या चुलीच्या धुराचा वास
मला आमच्या गावच्या सकाळी घेऊन गेला...
ओटीच्या पायरीवर बसून सकाळच कोवळ ऊन खात बसणे, डोक्यावर दुधाच्या चरव्या घेऊन येणाऱ्या गवळणी... ह्यांची थोडी भर.

मस्त!! फिरुन आले पहाटेच्या कोकणात.

मिट्ट काळोख , संधिप्रकाश आणि लख्ख उजेड >>> संधिप्रकाशाचा उल्लेख मी कायम संध्या़काळच्या प्रकाशासाठी ऐकला होता.

सुंदर वर्णन.
कोकणातली पहाट नाही अनुभवली कधी, पण लहानपणी खेड्यातली अनुभवली आहे.

आता मात्र शहारातच कुमार गंधर्व चं 'उठी उठी गोपाला..' लावून मी बरेचदा पहाटेच्या शांत वेळी अंधार संपतोय... हळू हळू उजाडत जातं हे अनुभवते घराच्या जवळपास फिरायला जात.
काय सुंदर वर्णन आहे त्या गाण्यात पहाटेच...

अप्रतिम .. अप्रतिम !! मी पोहोचलो गावाला..
बरेच आठवणी जाग्या झाल्या..
बायकोला एकदाच नेले होते आईच्या गावाला. तेव्हा असेच किंचितसे उजाडताच फेरफटका मारायला बाहेर पडायचो. अर्धा तास चालून एक ठिकाणी चहा आणि
वडे मिसळ वगैरे छान मिळायची तिथवर जायचो. खाऊन गप्पा मारून ते वातावरण अनुभवून परत यायचो.. परतीचे अर्धा तास चालणे सुद्धा जीवावर यायचे नाही कारण प्रवासातच सुख होते. आजही ती आठवण काढते त्या गणपतीच्या चार पाचच दिवसांची आणि त्या फिरण्याची..
आईचे गाव कणकवली.

अस्मिता, मामी, हार्पेन, केया, प्रज्ञा, छन्दिफन्दि , शशांक, नताशा, शर्मिला, ऋ सर्वांना धन्यवाद...
संधिप्रकाशाचा उल्लेख मी कायम संध्या़काळच्या प्रकाशासाठी ऐकला होता. >> नताशा मी नेहमी सकाळच्या प्रकाशाला ही संधी प्रकाशच म्हणते त्यामुळे लिहिताना जाणवलं नव्हत. पण तुझं बरोबर आहे. सकाळच्या प्रकाशाला काय म्हणतात कोणाला माहिती आहे का ?
काय सुंदर वर्णन आहे त्या गाण्यात पहाटेच... >> फारच सुंदर आहे वर्णन.
ऋ, मस्त आठवण.
छन्दिफन्दि >> छान लिहिल आहेस.

नताशा मी नेहमी सकाळच्या प्रकाशाला ही संधी प्रकाशच म्हणते त्यामुळे लिहिताना जाणवलं नव्हत. पण तुझं बरोबर आहे. सकाळच्या प्रकाशाला काय म्हणतात कोणाला माहिती आहे का ?>>>

नाही तुमच बरोबर आहे.. ते म्हणतात की सूर्योदय सूर्योदया वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी जो नारंगी कुसुंबी रंग येतो तो संधी प्रकाशसंधी

इंग्लिश मध्ये कसे डस्क आणि डॉन दोन शब्द आहेत पण मराठीत बहुतेक शब्द आहे संधिप्रकाश...

वा! काय सुंदर वर्णन केलंय ,अगदी डोळ्यासमोर आली कोकणातली पहाट .अजून लेख मोठा असता तरी चाललं असतं .आता उठून कोकणात जावेसे वाटते इतकं सुंदर वर्णन केलाय .तुमच्याकडे एखादा या वर्णनाचा काढलेला फोटो असेल किंवा कोणताही तर टाकाल का.मला तर कोकणाचे फोटोज बघायलाही आवडते.

छन्दिफन्दि , सिमरन धन्यवाद.

नाही तुमच बरोबर आहे.. ते म्हणतात की सूर्योदय सूर्योदया वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी जो नारंगी कुसुंबी रंग येतो तो संधी प्रकाश >> ओके.

सिमरन पहाटेचा फोटो नाहीये. हा फोटो चांगला काढता येणं अशक्य आहे म्हणून मी त्या वाटेलाच जात नाही. पण कोकणाचे अनेक फोटो मी वेगवेगळ्या धाग्यांवर अपलोड केले आहेत.

नितांत सुंदर वर्णन!

सकाळच्या प्रकाशाला काय म्हणतात कोणाला माहिती आहे का ?>>> अरुणोदय मला वाटते. सकाळी सुर्य उगवण्या आधी जी लालीमा पसरते तो खरतर. बाकी दोन प्रहरांना जोडणारा संधीकाल - संधी प्रकाश पण बरोबर आहे.

chaan lekh ! sorry for english typing
नताशा मी नेहमी सकाळच्या प्रकाशाला ही संधी प्रकाशच म्हणते त्यामुळे लिहिताना जाणवलं नव्हत. पण तुझं बरोबर आहे. सकाळच्या प्रकाशाला काय म्हणतात कोणाला माहिती आहे का ?>>> tambad phutane, zunjumunju hone ?

सकाळच्या प्रकाशाला काय म्हणतात कोणाला माहिती आहे का. >>> संथीकाल/प्रकाश दोन्हीसाठी वापरू शकतो खरंतर कारण दोन्ही वेळेस दिवस आणि रात्र यांची संधी होत असते.

सकाळच्या सूर्योदयाआधीच्या प्रकाशाला उष:प्रभा अथवा
झुंजूमुंजू झालं असं म्हणतात. संध्याकाळला सायंप्रभा म्हणतात. सकाळी सूर्याआधी उषा येते तर मावळताना सूर्यास्तानंतर संध्या येते.

नंतर सुर्योदयाला स-काळ (हा मूळ संधीकालपासूनच छोटा झाला का माहिती नाही. असावा कदाचित) आणि संध्याकाळ हा शब्द केवळ संध्याकाळसाठी वापरला जातो. (काय वाक्य आहे)

Pages