मभागौदि २०२५.. निसर्गायण.. कोकणातली मनोहारी पहाट.. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 27 February, 2025 - 10:14

कोकणातील पहाट अनुभवण्याचा स्वर्गीय अनुभव नक्की वाचा.

कोकणातली मनोहारी पहाट

मी काही रोज आवडीने पहाटे उठणारी व्यक्ती नाही. उलट पहाटेची झोप मला अतिशय प्रिय आहे. मात्र मी कोकणात गेले की तिथली पहाट अनुभवण्यासाठी मोबाईल मध्ये गजर लावून रोज पहाटे उठते. थंडीत तसं ही उशीरा उजाडत असल्याने फार लवकर उठावं लागत नाही. पण उन्हाळ्यात मात्र पहाट बघायची असेल तर फारच लवकर उठावं लागतं. कोकणातल्या आमच्या घरची पहाट ही खरं तर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा विलक्षण अनुभव शब्दबद्ध करणं खूप कठीण आहे पण बघते प्रयत्न करून. जे काही अनुभवते त्याच्या एक शतांश जरी शब्दात उतरवता आलं तरी मी स्वतःला धन्य मानेन.

पहाटे गजर झाला की खोलीत बसणं अशक्यच होतं मला. पावलं आपसुकच खोलीला लागून असलेल्या व्हरांड्याकडे वळतात. बाहेर पाऊल टाकता क्षणी वातावरणात भरून राहिलेला ताजेपणा आणि हवेतला गारवा मनाला एक वेगळाच तजेला देतात. बाहेर अजून ही मिट्ट काळोखच असतो. तरी ही त्यात अंधुकपणे दिसणाऱ्या आगारातल्या माडा पोफळीच्या आऊट लाईन्स फारच आकर्षक दिसतात. कधी कधी आकाशात चांदण्यांचा अक्षरशः खच पडलेला असतो. सर्वत्र निःशब्द शांतता असते. कधी मधी तिचा भंग होतो ते मांडवावर पडणाऱ्या दवाच्या टप टप आवाजाने. अर्थात ती टपटप कानाला अजिबात बोचत नाहीच उलट आसपासच्या शांततेला निश्चितपणे कॉम्प्लीमेंटच करत असते.

अमावास्या जवळ आल्याने पहाट झाली तरी पूर्व क्षितिजावरच रेंगाळणारी चंद्रकोर

काळोखात दिसणाऱ्या माड पोफळी

सभोवतीची शांतता, काळोख भान हरपून मनात साठवून घेत असताना मी भानावर येते ती सूनबाईनी माझ्यासाठी आणलेल्या आलं घातलेल्या चहाच्या वासाने. काही बोलले तर शांतता भंग पावेल म्हणून नजरेनेच तिला थँक्यु म्हणते आणि आलं घातलेल्या, गरम, गोडसर, दुधाळ, चहाचा कप हातात घेऊन मी चहा प्यायला पुढच्या खळ्यात येऊन बसते. तिथे मात्र मी एकटी नसते. कायम माझ्या पायाशी मोती बसलेला असतो. माझा मूड जणू काही त्याला ही समजतो. तो ही शांतपणे काही आवाज न करता बसून असतो. अजूनही सर्वत्र काळोखच असतो. पण लांब असलेल्या गोठ्याच्या दाराच्या फटीतून येणारी प्रकाशाची तिरीप तेवढी त्या काळोखाला छेद देत असते.

काळोखच असल्याने काही अपवाद वगळता बहुतांश कळ्यांचे डोळे मिटलेलेच असतात. आदल्या रात्री फुललेल्या फुलांचा सडा प्राजक्त जरी खळ्यात नि:शब्दपणे घालत असला तरी त्याचा सुवास ती वर्दी देतोच मला. तसेच रात्री उमललेल्या कुमुदिनींचा मंद सुगंध ही खळ्यात भरून राहिलेला असतो. मोहोराचे दिवस असतील तर त्या गोड वासाने वेडं व्हायला होतं. परंतु ह्या सगळ्या संमिश्र सुवासांfवर कडी करतो तो मागील दारी पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या चुलीच्या धुराचा वास. अंधारात ही मला ओळखून “ वैनीनू, एकल्याच बसल्यासां का “ असं काही तरी विचारून गडी गोठ्यात धारा काढायला जातो. अंधारात न ओळखल्याने मोती मात्र त्याच्यावर जोरजोरात भुंकायला लागतो. मग थोड्याच वेळात गोठ्यातून गायींच, वासरांच हंबरण भोवतालच्या शांततेचा भेद करत कानात जातं.

आपण फारच नशिबवान असलो तर कधी कधी आकाशात अस्ताला जाणारी चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी आपल्या तेजाने चमकणारी शुक्राची चांदणी बघण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. आता अंधुक अंधुक दिसायला लागतं. हळू हळू अंधाराच साम्राज्य विरत जातं. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होतो. मे महिना असेल तर कोकिळा आळपायला लागते. ( आमच्याकडे कोकणात कुहू कुहू, कूजन वगैरे पुस्तकी शब्द न वापरता कोकिळेच आळपणं हा
शब्द वापरला जातो ज्यात मंजुळ वैगेरे अभिप्रेत नसून ओरडणे, केकाटणे हे अभिप्रेत आहे. अति परिचयात अवdnya , दुसरं काय ? ) हळू हळू सगळा परिसर ही दृग्गोचर होत जातो.

संधिप्रकाश आणि उजाडणे ह्यातली सीमा रेषा फारच धूसर असते. किती ही लक्ष ठेवून राहिले तरी तो क्षण माझ्या हातातून कायम निसटत आला आहे. कारण दोन पाच मिनटातच लख्ख दिसायला लागत. दैनंदिन व्यवहार सुरू होतात. शाळकरी मुलं गणवेश घालून शाळेला निघतात. सुनबाई तुळशीची पूजा करायला तबक घेऊन खळ्यात येते. कामाला आलेल्या गड्या माणसांची गजबज वाढते. स्वयंपाक घरातून ही भांड्यांचे आणि बोलण्याचे आवाज वाढतात. ओटीवरच्या झोपाळ्याच्या कड्या कुरकुरु लागतात. दिवस उजाडल्याची खात्री पटते. मनाच्या गाभाऱ्यात एक अतीव समाधानाची भावना घेऊन मी ही भानावर येत माझी नित्य कर्मे करण्यासाठी खळ्यातून घरात येते.

उजाडल्यावर दिसणारं खळं

मिट्ट काळोख , संधिप्रकाश आणि लख्ख उजेड हा सारा फार फार तर अर्ध्या तासाचा खेळ पण त्यामुळे मनाला जी प्रसन्नता येते ती शब्दात वर्णन करणे कठीण. मी मुंबईत असले आणि कधी उदास वाटलं तर ह्या पहाटेची नुसती आठवण ही मन ताजतवानं करते. रोजची आव्हाने पेलण्याचं सामर्थ्य देणारी , रोज नवी भासणारी आणि नित्य नवा आनंद देणारी , कोकणातल्या आमच्या घरातली पहाट..

हेमा वेलणकर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुंजूमुंजू चांगला पर्याय आहे.

पण टेक्निकली संध्या = संधी हे बरोबर, म्हणूनच तिन्हीसांजा (यात सूर्य कलायला लागतो ती माध्यान्हही आली) किंवा त्रिकालसंध्या असंही म्हणतात. संधिकाल हा transition period अशा अर्थाने.

संथीकाल/प्रकाश दोन्हीसाठी वापरू शकतो खरंतर कारण दोन्ही वेळेस दिवस आणि रात्र यांची संधी होत असते. >>>
साधणारा तो संधी.. वाह!

उषःकाल, उष:प्रभा,

तांबड फुटणे... >>
जास्त जवळच आणि चित्रमय वाटते

आहाहा सुरेख.

हल्लीच नोव्हेंबरमध्ये माहेर सासर कोकण दौरा केल्याने रिलेट केलं. माहेरी तर पूर्ण रात्र बालपण जागवत एकटीच बागडले. माडीवर गेले, झोपाळ्यावर झोके घेतले, सर्व घर झोपलेलं. सासरीही पहाटे उठून अनुभूती घेतली.

चित्रदर्शी वर्णन केलंत, ममो!
सुमारे वीसेक वर्षांपूर्वी सगळा ग्रूप मिळून एका मित्राच्या मामांकडे दापोलीला गेलो होतो, तेव्हा अनुभवलेल्या पहाटेची आठवण आली.

मस्त लेख ममोताई.
नेहमीप्रमाणे चित्रदर्शी वर्णन. मलाही पहाटे लवकर उठून अंधारातून प्रकाशाकडे जाताना होताना परिसरातील बदल पाहायला आणि त्या शांततेतून हळूहळू बदलत जाणाऱ्या आवाजाना ऐकायला आवडते.
खेड्यात, जंगलात हे बदल फारच नितांतसुंदर आणि श्रवणीय असतात.
चुलीच्या वासाबद्दल तर अगदी अगदी झाले.
सूर्योदयाच्या वेळेस होणारा सूर्याच्या रंगासाठी "उदितारूणसंकाशम" असा स्पेसिफिक शब्द शरदिनी डहाणूकर यांनी वापरला आहे.

इंद्रधनुष्य, निकु, मनकर्णिका, मामी, स्वाती, छंदिफंदी, अंजू, rmd, ऋतुराज धन्यवाद.
संधिप्रकाश माहिती खूप छान. आता बदलत नाही पण स्वाती म्हणाली आहे तसं झुंजू मंजू हा शब्द मला बेस्ट वाटतोय सगळ्या पर्यायांमध्ये. असो.
इंद्रधनुष्य, फोटो अप्रतिम आला आहे. लेखाला पूर्णत्व मिळालं फोटो मुळे त्यासाठी डबल थँक्यु.
ऋतुराज खूप छान लिहिल आहे. "उदितारूणसंकाशम " हा शब्द ही छान आहे.

सध्या कोकणात आहे आणि ही रम्य पहाट रोज अनुभवते आहे. काही फोटो अपलोड करते आहे.
सध्या अमावास्या जवळ आल्याने पहाट झाली तरी चंद्र पूर्व क्षितिजावरून पुढे आला नव्हता. चंद्र आहेच आकाशात पण उगवतीचा लालिमा ही थोडा थोडा फाकलेला दिसतोय.

Pages