शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चर्चा.
मग lie detector मध्ये डोळ्यांशी निगडित बाबींचा काही विचार करतात का?
गुलजार साहेबांनी तर डोळ्यांना सुवास देखील दिला आहे.
हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम ना दो

अवांतराबद्दल क्षमस्व.

मग lie detector डोळ्यांशी निगडित बाबींचा काही विचार करतात का?>>>> एक अडवेंचर नोवेल आहे.त्यात लिबियाचा गडाफी अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देणार असतो. तेव्हा त्याचे डोळे मॉनिटर करायचा बेत असतो. की त्याच्या धमकीत किती तथ्य आहे. पण गडाफी काळा चष्मा घालून TV वर येतो. Fifth Horseman.
नो मोर अवांतर.

उत्तम चर्चा.

the eye region is considered a key indicator of genuine emotion >> अच्छा. अधिक माहितीबद्दल धन्यवाद.

उत्तम चर्चा. वाचतोय.
माणसाचा भंपकपणा व माकडांच्या वर्तनापासून लाय डिटेक्टरचा मुद्दा हे सर्व आवडले !
. . .
सत्यान्वेषण चाचणीमध्ये डोळ्यांच्या खात्रीशीर विशिष्ट हालचाली होतात का, हा बराच वादग्रस्त मुद्दा दिसतोय. संबंधित अभ्यासकानेच त्यावर मत दिलेले बरे.

इथे (https://www.allaboutvision.com/resources/human-interest/can-eyes-give-aw...) एक मजेदार वाक्य मिळाले :
. . . researchers believe that our understanding of lying eyes may be a lie in itself.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी वाङ्मयकोशाचा दुसरा खंड तयार झाला असून तो आज प्रकाशित होण्याची शक्यता आहे. यामध्ये सन 1960 ते 2000 दरम्यान दिवंगत झालेल्या अनेक मराठी साहित्यिकांच्या अधिकृत नोंदी आहेत.

(पहिला खंड २२ वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता).

या कुंभ मेळ्याच्या वेळी आस्था शब्द भक्ती या अर्थाने अनेकदा ऐकला.
आस्था का कुंभ वगैरे.
तर आस्था म्हणजे मी आपुलकी समजत होते.
हिंदीत वेगळा अर्थ होतो का?

चर्चा “आस्थेने” वाचली वरची Happy

आस्था च्या विरुध्दार्थी “अनास्था” नेहेमीच वाचतो आपण. मी एकेजागी विशेषण म्हणून “अनास्थ” शब्द वाचला. तो चुकीचाच आहे अशी खातरी होती पण ……

अनास्थ हा योग्य शब्द आहे.

अर्थ = आस्था नसलेला, निष्काळजी, बेफिकीर

१०० ₹ ची बेट हरलो Happy

आस्था असलेला 'आस्थ' ? …

हे नक्की नाही माहित. पण अनास्थ बद्दल खातरी आहे, त्यापायी १०० ₹ गेले ना Happy

Lol

अवरोध शब्दाचा अडथळा, आडकाठी, प्रतिबंध हा अर्थ सगळ्यांनाच ठाउक आहे.
पण त्याचा दुसरा अर्थ पाहुन अचंबित झालो.
जनानखाना, राणीवसा (राण्यांचे अथवा स्त्रियांचे निवासस्थान).

संस्कृत मधुन आलेला तत्सम शब्द व अर्थ आहे.

रामायणात हा शब्द वापरला आहे. हनुमान सीतेला भेटुन परत येतो आणि तिथले काय काय वर्णन करतो हे सांगताना :
दर्शनं रावणस्यापि पुष्पकस्य च दर्शनम् ।
आपानभूमिगमनमवरोधस्य दर्शनम्॥ १.३.२९

आपानभूमिगमनम् = मद्य प्राशनाची (आणि पिउन जमिनीवर पडण्याची?) जागा
अवरोध = राणीवसा
यांचे दर्शन.
काय व्युत्पत्ती असावी याची?

रोचक !
अवरोध = अवष्टंभ ( शब्दरत्नाकर)

अवष्टंभ = A prop or stay (मोल्सवर्थ).
stay (टेकू>>> टेकणे ) हा 'वसा' या अर्थाने घेता येईल का ?

Interesting!

>>> आपानभूमिगमनम् = मद्य प्राशनाची (आणि पिउन जमिनीवर पडण्याची?) जागा
Lol

अवरोध = राणीवसा
पूर्णपणे नवीन माहिती. 👍

आपानभूमिगमनम् = मद्य प्राशनाची (आणि पिउन जमिनीवर पडण्याची?) जागा !!!
हे धमाल आहे. 👌

अपान / अपानवायु माहित होते, याचे शब्दकोषांतले रेफरंसेस वाचून प्रचंड हसू येते, दाखल्यांच्या मोकळ्याढाकळ्या भाषेमुळे 🤣

आपान चा अर्थ मात्र “मो़क्ष” असा दिलाय. मद्यपान आणि मोक्षाचा संबंध एवढा obviously मान्य झालेला असेल असे कधी वाटले नव्हते 😀

इथे आपानचा अर्थ मद्याची मेजवानी (drinking party) असा आहे.
आपानभूमि(:) = मद्यशाळा म्हणता येईल.
आपानभूमिगमनम् अवरोधस्य दर्शनम्
मद्यशाळेत जाणे (आणि) राणीवसेचे दर्शन.

आधी मी तो सगळा समास समजून शेवटी फक्त अवरोधची षष्ठी केली आहे असे समजलो.

मद्याची मेजवानी (drinking party)… मद्यशाळेत जाणे (आणि) राणीवसेचे दर्शन.…

मदिरा + मदिराक्षी ; फुल ऑन पार्टी दिसते आहे Happy

अवरोध = राणीवसा >>> रोचक.

@मानव, पण त्या श्लोकाचा अर्थ नाही पटला.

पहिल्या ओळीत जे बघितले त्याची षष्ठी आहे तर दुसर्‍या ओळीत पण तसंच असणं जास्त योग्य वाटतं (असलंच पाहिजे असे नाही.)
रावण किंवा राजपरिवारातल्या कुणाचाही राणीवसा असा प्रसिद्ध नव्हता की "तो बघितला" याचा उल्लेख करावा. आणि असला तरी हनुमानासारखा ब्रह्मचारी तो बघेल आणि तो बघितला हे आवर्जून सांगेल हे कायच्या काय वाटतं.

आपल्या राजाची राणी पळवली असताना दुसर्‍या राजाचा राणीवसा बघितला असे सांगून त्याच्या दु:खावर डागण्या देणार्‍यातला हनुमान नक्कीच नव्हता.

पहिल्या ओळीत रावण आणि पुष्पक ही दोन प्रसिद्ध नावे आली आहेत त्याच्या तोडीचे काहीतरी दुसर्‍या ओळीत हवे. लंकेचा राणीवसा आणि मद्यालय हे त्यांच्या तोडीचे नक्कीच नव्हते.

आपानचा एक अर्थ दुकान / बाजारपेठ असाही होतो. आणि लंकेसारख्या समृद्ध आणि श्रीमंत देशाची बाजारपेठ नक्कीच रावण आणि पुष्पक यांच्या तोडीची असणार.

मग दुसर्‍या ओळीचा अर्थ बाजारपेठेभोवतीची तटबंदी (हा सैन्याकरता महत्वाचा मुद्दा ठरतो) बघितली असा होइल का?

Āpāna (आपान).—1 A drinking party, banquet; Mṛcchakaṭika 8; आपाने पानकलिता दैवेनाभिप्रचोदिताः (āpāne pānakalitā daivenābhipracoditāḥ) Mb.

https://www.wisdomlib.org/definition/apana
Banquet - भोजनगृह?

हे वरच्या दुव्यावर सापडले.

आपण म्हणजे दुकान किंवा बाजारपेठ.
आपानभूमिः = एकत्रितपणे मद्यप्राशनाची जागा, मधुशाला
मध्ये गमनम् आहे हे सुद्धा लक्ष्यात घ्यायला पाहिजे.
आणि अवरोध म्हणजे राणीवसा हा स्पष्ट अर्थ आहे.

आता मधुशाळा आणि राणीवसा बघितल्याचे त्याने सांगितले एवढेच त्या ओळीत नमुद केले आहे.
यात दुःखावर बोट ठेवण्यासारखे अथवा ब्रह्मचाऱ्याने न बघण्यासारखे काय आहे?

अस्मिता, तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये रामायणात आपानचा अर्थ एकत्रीत मद्यप्राशनाची जागा असा दिला आहे.

आपण म्हणजे दुकान किंवा बाजारपेठ. >>> ओके. म्हणजे मी लावलेला अर्थ चुकीचा आहे.

तुमच्या बाकीच्या मुद्द्यांशी मात्र असहमत Happy

हो, दिला आहे. Happy
मी काही तरी खरडायचे म्हणून 'भोजनगृह'नी भर घालता येते का बघत होते. Happy

हे बालकांडातील पहिल्या अध्यायातील अति थोडक्यात वर्णन आहे. यात नारदमुनी थोडक्यात रामायण वाल्मिकींना सांगतात. पण पुढे सुन्दरकांडात विस्तृत वर्णन सुद्धा आहे अध्याय ११ वाचा. यात मद्यशाळेत कुठले कुठले मद्य तो पहातो, कुठले अन्न पाहतो, मद्य पिणाऱ्या स्त्रिया इत्यादि वर्णन आहे. इतर वर्णन सुध्दा अध्याय ९, श्लोक ३४ ते ६५ आहे ते वाचा.
असो, अवांतर थांबवतो आता.

परंपराशील
एरवी वरील अर्थाने आपण पारंपरिक हा शब्द वापरतो. परवाच्या साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणात
‘परंपराशील शहाणपण’
असा शब्दप्रयोग ऐकला.

एक विचार मनात आला की..
मराठी भाषेने मारवाडी, सिंधी, गुजराती, तेलुगू, कन्नड आदी भाषांना किती आपलेसे केले आहे?
म्हणजे मराठीवर या भाषांचा कितपत प्रभाव राहिला आहे?
की मराठीने अगदी ताठरपणा दाखवून या भाषांतील शब्दांचा अस्वीकार केला आहे?

कुठे विचारावे ते न समजल्याने इथेच विचारते आहे.

काकपक्ष
म्हणजे कृष्णपक्ष नव्हे. कावळ्याचे पंख असा अर्थ होऊ शकतो, कदाचित यावरुनच याचा अर्थ "कानांवरील झुलुपे" असा होत असावा, मराठी शब्दकोशात हा शब्द आहे.

Pages