शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषांतर/अनुवाद ?
एखाद्या लेखकाने एखाद्या भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत नेले असता त्याला वरीलपैकी नक्की काय म्हणावे हा एक अभ्यासाचा मुद्दा आहे.
त्याचा उत्तम उहापोह अरुण नेरुरकर यांनी त्यांच्या, ‘भाषा : हरवलेल्या . . .’ या पुस्तकात केला आहे.

भाषांतराच्या प्रक्रियेत लेखनाचे अंतरण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत होत असल्याने त्यासाठी भाषांतर हा शब्द जास्त समर्पक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

असेच मत विलास सारंग यांनी ‘भाषांतर आणि भाषा’ या प्रबंधात तर स गं मालशे यांनी ‘साहित्य-सिद्धांत’मध्ये व्यक्त केले आहे.

  • भाषांतर = translation or version. (वझे शब्दकोश)
  • अनुवाद = मूळ विचाराला धरून केलेले भाषांतर ( इति नेरुरकर);

पुनःपुन्हा स्पष्टीकरण; स्पष्टीकरणार्थ पुनरुक्ती. (ल.) वर्णन.
(मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लहानपणी हे एक गाणं ऐकलं होतं त्यात 'लागी' शब्द होता.

कावळा म्हणे मी काळा, पांढराशुभ्र तो बगळा, दिसतसे
वाहवा तयाची करीती, मजलागी धिक्कारिती, लोक हे
मग विचार त्याने केला
पैशाचा साबू अणिला
लाविला सर्व शरीराला
दगडाला घाशीत बसला, बहुबळे
रक्त त्यामुळे, वाहू लागले
घाबरा झाला, शेवटी बिचारा मेला

इथे 'लागी' चा अर्थ 'मात्र' असावा.

मामी मस्त आठवण काढलीस.

कावळा म्हणे मी काळा,
पांढराशुभ्र तो बगळा,
दिसतसे ||१||
वाहवा तयाची करीती,
मजलागी धिक्कारिती,
लोक हे ||२||
मग विचार त्याने केला
पैशाचा साबू अणिला
झडकरी||३||
फासुनी सर्व शरीराला
खडकाशी घाशित बसला
नदीवरी ||४||
घाशिले अंग बहु बळे
रक्त त्यामुळे, वाहू लागले
घाबरा झाला,
बापुडा शेवटी मेला ||५||

- रा देव

लागीं —शअ. १ करितां; साठीं; प्रत. 'तुजलागी; तेथ कीजैल प्रबंधु । मुनिजनालागि ।' -भाए ३६. २ जवळ; लगत. ३ ला; स. 'किती शिकवूं तुजलागीं । मनारे प्रीतिधरी हरीपाईं ।

भाषांतर/अनुवाद

फरक समजला.
पद्यासाठी “भावानुवाद” असतो. तोही शब्द योग्य वाटतो.

* “भावानुवाद” >> +१
. . .
अनुवादणे या क्रियापदाचे दोन अर्थ वर उल्लेख केलेल्या पुस्तकात दिलेत :
१. कठीण लेखन सुबोध करून सांगणे, किंवा
२. दुसऱ्या भाषेतील ग्रंथाचे आशयानुसारी भाषांतर करणे.

भाषांतर/अनुवाद
“भावानुवाद”
खूप छान चर्चा.
बरीच माहिती मिळाली

* “भावानुवाद” >>>
यावरून एक आठवले . . .

ज्ञानेश्वरीला जो पर्यायी शब्द आहे : भावार्थदीपिका
तो फार गोड असून मला आवडतो !

भावार्थदीपिका.. तो फार गोड असून मला आवडतो>> +१.

मजलागी >> "मजला/मला" असा अर्थ मजलागी लागला. वरती भरत यांनी तो दिलेला आहेच.

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे । तयालागी हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवें वस्ती कीजे ।।

हरिणीचे पाडस | व्याघ्रे धरियेले | मजलागी जाहले | तैसे देवा ||

सुखालागी करिसी तळमळ । तरी तू पंढरीसी जाय एक वेळ।। मग तू अवघाची सुखरूप होसी । जन्मोजन्मींचे दु़ःख विसरसी ।।

>>>>>जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे । तयालागी हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवें वस्ती कीजे ।।
सुरेख उदाहरण हपा. दिवस छान सुरु झाला. आज आंघोळ करुन, मनाचे श्लोक म्हणते.

रोचक
या शब्दाचा विशेषण म्हणून असलेला अर्थ सर्वपरिचित आहे. परंतु नाम म्हणून त्याचा एक मजेदार अर्थ सापडला.
जरा विचार करून बघा आणि मग खाली जा
. . .
. . .
. . . .

= पादेलोण.
(दाते शब्दकोश)

Lol

रोचक मीठ रेचक असतं वाटतं.

चला मंडळी,
त्या रोचकामुळे छानपैकी (वि)रेचन झाले !

(वि)रेचन Happy

यावरून “विरोचन” आठवला. मात्रेचा फरक. आमच्या एका स्नेहींचे नाव.

ते नावाचे दोन अर्थ सांगतात :

- प्रकाशमान, चकाकदार, चमकणारा

- चंद्रमा

* विरोचन >>> छान.
कोशात अशी ओवी मिळाली :
‘तुझा पिता तरी विरोचन । तो आमुचा अंगलग जाण ।’ – कथा २·६·८८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

(अंगलग = नातेवाईक; स्नेही)

विरोचन चंद्राला तसेच सूर्याला सुद्धा म्हणतात. (पृथ्वीवर प्रकाश देणारे हे दोन(च) ग्रह/तारे म्हणुन असावे. म्हणजे तेवढे प्रकाशमान म्हणुन.)

रुच् - रोच् याचा अर्थ प्रकाशणे, चमकणे असाही आहे.
त्याला ल्युट् प्रत्यय लागुन, वि उपसर्ग लागुन बनला असावा का हा शब्द? ( हर्पा?)

एक छान हिंदी कविता आली आहे मला फॉरवर्ड म्हणून!
भरताला जेव्हा हे कळले की कैकेयी ने त्याच्या अनुपस्थितीत, दोन वर मागून रामा ला चौदा वर्षे वनवास आणि त्याला राज्याभिषेक करण्याचा घाट घातला आहे, तेव्हा त्याने कैकेयीची जी निर्भत्सना केली, त्यावरुन.
तर त्यात, कैकेयी ला एकदा 'त्रिये' असे संबोधले आहे. म्हणजे दशरथाची तिसरी राणी, असे का?
मग 'प्रिये' म्हणजे पहिली पत्नी हे योग्य राहील! Happy

तिसरी (स्त्रीलिंगी क्रमवाचक) म्हणजे तृतीया.
त्रिया म्हणजे तिसरी नसावे.
त्याचा अर्थ स्त्री असा दिला आहे. बहुतेक स्त्री शब्दापासुन त्रिया शब्द आला असावा, तसे काही ठिकाणी नमूद केले आहे. त्रिया - हे त्रिये.

Pages