कभी खुशी कभी गम - एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 19 August, 2024 - 14:40

कभी खुशी कभी गम या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा "माझा" धागा नाही. सर्वांनी लिहा. "तुम्ही जर या काळात हे विकत घेतले असेल तर या क्लास अ‍ॅक्शन सूट मधे तुम्हाला सामील होता येईल" अशी आवाहने असलेली मेल येते तसे समजा. ज्यांनी हा पिक्चर कधी पाहिलेला आहे त्यांना त्यांचा वैताग चॅनेल करायला चांगली संधी आहे. गेल्या २-३ दिवसांत चित्रपट बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सहज मित्रांबरोबर गप्पा मारताना बाजूला टीव्हीवर कभी खुशी कभी गम लावला होता. काय रडकथा आहे! मधला हृतिक लंडनला येतो त्यातला अर्धा तास सोडला तर सतत सगळे रडत असतात. जया, काजोल, करीना सतत हातात पूजा की थाली घेऊन फिरत असतात. करीनाचे यात नावच पूजा असल्याने तिच्या हातातले तबक तर अनेक अर्थाने पूजा की थाली असते. अमिताभ मख्खपणे तेच परंपरा अनुशासन वगैरे टाइप बोलत राहतो. जया नेहमीप्रमाणे वैतागलेली. शाखा तुफान हॅम करतो. स्प्रिंग लावलेल्या बाहुलीच्या डोक्यासारखी मान अनेकदा हलवतो. काजोल ओव्हरअ‍ॅक्टिंग करते. हृतिक-करीना पकवतात. हे सर्व (ओके - यातले बहुतेक) एरव्ही प्रचंड ताकदीचे कलाकार आहेत याचा विसर पडेल इतके बोअर करतात.

आलोक नाथ मधेच रॅण्डमली मरतो. एखाद्याच्या मरण्याचे काहीही कारण तयार न करता त्याला मारल्याची उदाहरणे क्वचितच असतील.

अमिताभने वाकल्याशिवाय किंवा जयाने चौरंग्/स्टुलावर उभी राहिल्याशिवाय अमिताभच्या कपाळावर तिला टीका का काय लावता येत नाही हे ती त्यांची रोजची रिच्युअल असून सुद्धा त्यांना लग्नानंतर काही वर्षांनी समजते. भावाला शोधायला लंडनला गेलेला हृतिक तेथे पोहोचल्यावर आधी करीनाच्या कॉलेज मधे जातो. भाऊ बिऊ नंतर. काजोल तिच्या मुलाला मनोजकुमार ऑन स्टिरॉइड्स करण्याच्या प्रयत्नात सतत देशभक्तीचे डोस पाजत असते पण तिची बहीण कॉलेजात त्याच्या टोटल विरूद्ध वागत असते. ती एका व्हाइट्स-ओन्ली कॉलेज मधे शिकत असते - म्हणजे त्या बिल्डिंगसमोर नाचत असते. ट्राफलगार स्क्वेअर मधली आर्ट गॅलरी हे त्यांचे कॉलेज असते.

काजोलच्या मुलाचे दुसरी-तिसरी टाइप यत्तेतील कल्चरल फंक्शन हे $२०० डिनर सारख्या फाइन डायनिंग सेटिंग मधे असते. तो सगळ्या अनसस्पेक्टिंग लंडनवासी पालक व विद्यार्थ्यांसमोर एकदम जन गण मन सादर करतो. फक्त शेवटची ओळ विसरतो. म्हणजे लंडन मधे जन्मलेल्या पोराला "द्राविड उत्कल वंग" किंवा "विंध्य हिमाचल यमुना गंगा" वगैरे लक्षात राहायला काही अडचण येत नाही. पण शेवटी "जय हे, जय हे" झाल्यावर पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो.

एक मुलगा घराबाहेर असला तरी तो येत आहे हे "माँ सेन्स" ने ओळखणार्‍या जयाला दुसरा मुलगा मागून येऊन हाताने टॅप करून लक्ष वेधून घेईपर्यंत पत्ता लागत नाही.

हा रायचंद नक्की काय बिझिनेस करतो, शाखाला बेदखल केले म्हणजे नक्की काय केले, त्याने त्याच्या बिझिनेस मधे किंवा शाखाच्या जीवनात नक्की काय फरक पडला, शाखा लंडनला जाउन नक्की काय करतो हे मला अजूनही समजलेले नाही.

आणि सकाळी आवरून बाहेर पडलेल्यांना लंडनमधेच "आत्ता ओव्हलवर मॅचची शेवटची ओव्हर सुरू असेल" हे ठामपणे माहीत असू शकेल असे टायमिंग असणारी क्रिकेटची मॅच नक्की कोणत्या फॉर्ममधली, हे ही.

मी या धाग्यावर चित्रपटाची न खेचता कौतुक केले तर चालेल का? जेण्युईन ली विचारत आहे. कारण आमच्या घरी खरेच हिट आहे हा पिक्चर. बोले तो आमचा सुर्यवंशम आहे हा. कधीही चॅनल सर्फ करताना दिसला की तिथून पुढे बघायला सुरुवात करतो. सोनी सेटमॅक्स वर वरचेवर लागायचा हा. सगळे डायलॉग तोंडपाठ आहेत. शेवटची दहा मिनिटांची अमिताभ जयाची रडारड सोडली तर फुल्ल टाईमपास आणि रिपीट व्हॅल्यू पिक्चर आहे. आणि मुख्य म्हणजे शाहरूखला जास्तीत जास्त स्क्रीन टाईम आहे.

पण यातला मेन शॉट आहे तो शाहरूखची एन्ट्री.. तो हेलिकॉप्टर शॉट.. आणि शाहरूखचे धावत येणे.
बदाम बदाम बदाम.. (कुछ कुछ होता है मधील समर कॅम्पला तो अशीच धावत एन्ट्री मारतो) पण ही कदाचित बॉलीवूड इतिहासातील आजवरची बेस्ट फटा पोस्टर निकला हिरो एन्ट्री असावी. मला तर एवढी क्रेझ होती की मी तेव्हा वीजेटीआयला होतो. धावत येऊन खांद्यावरची बॅग सावरत आणि एक बोट नाचवत क्लासमध्ये तशीच शाहरूख स्टाईल एन्ट्री मारणे हा आवडीचा उद्योग होता Happy

बाकी लॉजिक गंडलेले आहे हे मान्य.. पण ते तसेही कुठल्या टिपिकल शाहरूख पिक्चर मध्ये असते. त्याचे पिक्चर लॉजिकवर नाही त्याच्या मॅजिकवर चालतात Happy

कुठे सुरू असलेला दिसला तर पटकन डोकं बाजूला काढून ठेवायचं. बाजूला म्हणजे पार दुसर्‍या खोलीत. किंवा तळघरात. किंवा अ‍ॅटिकमध्ये!
मग त्या हरिद्वारला फाइव्ह स्टार मेडिटेशन रीट्रीटमध्ये राहणार्‍या विहिणी, ती व्यॅव्यॅव्यॅव्यॅ काजोल, ते अयायाया बाबूजी, तो पॅपॅपॅपॅ शाखा, तो घोडा झाला तरी शूलेसेस बांधता न येणारा हृरो, ती 'मेरा बाबा' म्हणत त्या घोड्याच्या शूलेसेस बांधणारी फरीदा जलाल, ती पू, कसला कसला त्रास म्हणून होत नाही.
Proud

मी या धाग्यावर चित्रपटाची न खेचता कौतुक केले तर चालेल का? >> या पिक्चरसंबंधित काहीही चालेल Happy

व्यॅव्यॅव्यॅव्यॅ काजोल, ते अयायाया बाबूजी, तो पॅपॅपॅपॅ शाखा >>> Lol बाबूजी म्हणजे "बावजी" ना? Happy

कमालीचा रिग्रेसिव्ह आहे हा पिक्चर एकूण स्त्रियांच्या बाबतीत.

आणि अमिताभचा पहिला पिक्चर जो बघताना मी डुलक्या मारत होतो Happy मी सुद्धा उपाय म्हणून दीवार/काला पत्थर मधले सीन्स पाहिले नंतर यातला मख्ख व शुध हिंदीवाला अमिताभ डोक्यातून वाइप आउट करायला.

वरच्या मजकुरातील नियम फारच 'कडक' आहेत. फक्त तेवढेच वाचूनही हसू आले. Lol

अमिताभच्या कपाळावर तिला टीका का काय लावता येत नाही हे ती त्यांची रोजची रिच्युअल असून सुद्धा त्यांना लग्नानंतर काही वर्षांनी समजते. >>>> पोलिओचा द्यायचा मग 'टीका' , एरवी अमिताभ 'टीके' वाटतच असतो. दो बुंद जिंदगी के वो भी बिना स्टूल के. 'मेन्टल एज' तेवढीच असल्यागत वागतो अमिताभ.

माँ सेन्स"
यात नावच पूजा असल्याने तिच्या हातातले तबक तर अनेक अर्थाने पूजा की थाली
ओके - यातले बहुतेक>>> हे लिहिले नसते तर मी शब्दांत पकडलेच असते Lol
मनोजकुमार ऑन स्टिरॉइड्स
ट्राफलगार स्क्वेअर मधली आर्ट गॅलरी हे त्यांचे कॉलेज असते.
जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो.
आत्ता ओव्हलवर मॅचची शेवटची ओव्हर सुरू असेल
>>>>> Lol
----------

पण यातला मेन शॉट आहे तो शाहरूखची एन्ट्री.. तो हेलिकॉप्टर शॉट.. आणि शाहरूखचे धावत येणे.
>>>>
निरूपा रॉयही आपल्या मुलांवर हरवून जाण्याइतके प्रेम करायची, तिला ह्या चकाकाक मातृत्वापुढे हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वाऱ्याने उडवून लावू नका. ती काही जया बच्चनपेक्षा कमी नाही आणि हिचा मुलगाही हरवलाच की. लंडनला जाऊन मोठा होऊन हरवला हा तर Lol

पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो >>> त्यापुढचे ह्रितिकने शिकवलेले चिमखडे बोल बरे लक्षात राहतात आणि! Proud

शाखा लंडनला जाउन नक्की काय करतो हे मला अजूनही समजलेले नाही >>> त्यांच्याकडे लंडनला जायची एक आपली जनरल परंपरा आहे (म्हणजे परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन मधलीच असावी ती). मग शिकायचं असेल तरी लंडनला, घर सोडून रहायचं असेल तरी लंडनला वगैरे.
रच्याकने, मला अजूनही राणी मुखर्जीशी शाखा ने लग्न न केल्याने परंपरेचा भंग कसा होतो ते समजलं नाहीये Proud

मला अजून ती पत्ता शोधून देणारी वेबसाईट चेक करायची आहे Wink
बाकी पण असंख्य रत्नं आहेत यात, का सोडलीस फा?

हा पिक्चर बघताना बरेच प्रश्न पडले होते. आठवतील तसे लिहिते. पण वानगीदाखल - लहानपणी काळे असलेले ह्रितिकचे डोळे मोठेपणी अचानक घारे कसे होतात? अमिताभच्या ऑफिसमधे त्याचे वडिल म्हणून कोणाचा फोटो असतो? ह्रितिक जेव्हा लंडनला जातो नेमके तेव्हाच तिरंग्याच्या रंगांचे कपडे घालून ललनांचे घोळके का वावरत असतात? पूऽ एकाच वेळी दोघींना कॉल कसा लावत असते? खरंतर पू हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय असायला हवा आहे. ती नेमकी किती वर्षं शिकते आहे? प्रॉमला जाण्यासाठी ती एलिजिबल तरी असते का? प्रॉमला जाताना दोन वेगवेगळ्या प्रकारचे शूज घालून निघालेल्या पू चे शूज नाचताना अजून वेगळेच पण समान कसे होतात? इ.इ.

'बेटे का फर्ज', परंपरा या विषयांची व्याख्या तुझ्या लेखात अपडेट होऊदे, फा, या निमित्ताने Proud

मला वाटतं हा ओपनिंग सीन आहे: लास्ट बॉल सिक्स वाला. मॅचच्या शेवटच्या बॉलवर षटकार मारून मॅच जिंकून देतानाही मॅच सुरू होण्याआधी असणारी लकाकी त्या रेड चेरी वर असते.

“ ती नेमकी किती वर्षं शिकते आहे? प्रॉमला जाण्यासाठी ती एलिजिबल तरी असते का?” - त्यात परत ती ‘हर साल कीं तरह, इस साल भीं, मेरें साथ प्रॉम जानें कें लिए’ डेट शोधत असते.

या पिक्चरना अमिताभचे पिक्चर बोलणे हा त्यावर अन्याय ठरेल. यात अमिताभ फक्त वापरला जातो. हे पिक्चर शाहरूखचेच असतात. जर त्याने अमिताभच्या दीवार, त्रिशूल मध्ये काम केले तर त्याचे जे होईल तेच इथे अमिताभचे शाहरूख करतो.

पण यातला मेन शॉट आहे तो शाहरूखची एन्ट्री.. तो हेलिकॉप्टर शॉट.. आणि शाहरूखचे धावत येणे.
बदाम बदाम बदाम +१११११
इतकाही वाईट नाहीये हा चित्रपट.
दोष कुणात नसतात Proud
संवाद आवडले होते मला.
उदा :
केह दिया ना बस केह दिया
कौन है वो जिसने दोबारा मुडकर मुझे नही देखा? Who r u?
.
लंडन मधल्या कॉलेज life मध्ये खंबाच्या इमारतीसमोर नाचतात.
हे एक अगाध ज्ञान प्राप्त झाले होते.
तसेच तिथे जाऊनही संस्कृती विसरू नये, साडी मोठं मंगळसूत्र वगैरे परिधान करावे, सकाळी ओम जय जगदीश हरे गावे, हे कोणी शिकवलं असतं आपल्याला???

हे लिहिले नसते तर मी शब्दांत पकडलेच असते >>> Lol मी लिहीताना थबकलो ते याचकरता असेल Happy

‘हर साल कीं तरह, इस साल भीं, मेरें साथ प्रॉम जानें कें लिए’ >>> Lol त्या लकाकी बद्दल. हे लोक इतके गडगंज असतात की प्रत्येक डिलीव्हरी ही नवीन चेंडू घेउन करत असतील Happy हा सुभाष घई किंवा बडजात्याचा पिक्चर असता तर एक्स्ट्रॉ कलाकारांची फौज तेथे बघायला असली असती. नवीन बॉल घासून जुना करून द्यायला नोकर असले असते Happy

बाकी पण असंख्य रत्नं आहेत यात, का सोडलीस फा? >>> सोडलेली नाहीत. मला सहज दिसले ते लिहीले आहे. तुम्हीही भर घाला Happy यातून नवीन उत्साहाने मग मी पुन्हा पाहीन आणि लिहीन काही नवीन सुचले की Happy

बाकी त्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेही नाहीत. तसेच शाखाला शोधायला इतका प्रयत्न करणारा हृतिक करीनाचे कॉलेज कोठे आहे हे कोणीही न सांगता कसे ओळखतो? करीनाने करवा चौथला "मैत्रिणिच्या भावाकरता" उगाचच उपास करणे हे काय आहे याचाही प्रश्न काजोल, फरिदा जलाल किंवा इतर कोणालाही कसे पडत नाहीत? काहीतरी बहाणा करून अमिताभच्या सुनांनी त्याचे पाय धरणे हे कॉमन दिसते. सूर्यवंशममधेही ती करते.

तुम्हाला तुमच्या घरी एखाद्या अनोळखी व्यक्तीला राहायला येऊ दे असे आई वडील किंवा कोणालातरी पटवायचे आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीच्या अपरोक्ष आधी ती पटवापटवी कराल किंवा त्या व्यक्तीला तुमच्याबरोबर घेउनच कराल. पण रायचंद फॅमिलीत असे होत नाही. करीना तो सीन करते. आणि मग ते पटल्यावर सिनेमात एण्ट्री मारल्यासारखा हृतिक भिंतीपलीकडून येतो. म्हणजे हे सगळे चालू असताना त्याला तिकडे भिंतीपलीकडेच उभा करून ठेवला होता असे दिसते.

तिकडची कमेंट इकडे…..
(मेरी नजरसे) कभी खुशी कभी घम (स्पेलिंग त्यांनी केलंय. मला नका विचारू)
करीनाचे नाव पूजा असले तरी तिने लंडनमधे ‘पू’ नाव धारण केलेले असते. तिच्या भुमिकेला एवढे सुटेबल दुसरे नाव सापडले नसते.
लहानपणीचा चब्बी मुलगा मोठेपणी एकदम चिझल्ड हृतिक होतो. करीअर, सेटल होणे वगैरेची चिंता नसल्याने बिछडलेल्या भावाला शोधणं हाच त्याच्या आयुष्याचा पर्पज असतो.
आलोकनाथ रॅंडमली मरत नाही. शाहरुख परंपरेच्या नावाखाली काजोलबरोबर ब्रेकऑफ करायला येतो तेव्हा (मिठाईवाला, नॅचरली तुपकट बाऊजी (दुसरं कोण?)) आलोकनाथ मेल्यामुळे काजोलचा आधारवड बनून तिच्याशी लग्नच करून टाकतो. तेव्हा जे काय प्रेमाचे २-४ क्षण दाखवलेत तेवढेच. अदरवाईज आग और पानी में जेवढी केमिस्ट्री असेल तेवढीच केमिस्ट्री शाखा-काजोलमधे आहे. पण न पाहिलेल्या बाईने करवा चौथसाठी सरगी पाठवल्यामुळे तिला भरून वगैरे येतं.
एरवी काजोल ‘तुम मुझे चांदनी चौक से बाहर निकाल सकते हो, पर मेरे अंदर से चांदनी चौक कैसे बाहर निकालोगे?’ मोडमध्ये वावरते.
मुळात त्यांना दिल्ली सोडून लंडनला का जावं लागतं समजत नाही. नालासोपारा/भिवंडी/विजयवाडा/तिरुचिरापल्ली इथेही राहू शकले असते. रायचंद थोडाच जाणार होता शोधायला? ‘जन गण मन’लाही प्रॉब्लेम आला नसता. पण करण जोहरचा पिक्चर….
तिसरी चौथीत असलेला हृतिक पार ग्रॅज्युएट झाला तरी एका पोराचे आईबाप असलेले का-शाखा क्रायोजेनिकली फ्रीज केल्यासारखेच दिसतात. शाखा नॉर्मल जॅकेटमधून सुटमध्ये व का सलवारसुटमधून साडीत येवढाच फरक. परंपरेने हाकलवले तरी का पारंपारिक पोशाख काही सोडत नाही. साउथ हॉलमधल्या पंजाबिणी एकवेळ वेस्टर्न कपडे घालतील पण केजोच्या लंडनमधल्या पंजाबिणी मात्र दिल्लीत दिवाळी पार्टी करत असल्यासारख्या वावरतात.
मध्येच २ आज्या एकदम पांढऱ्या शुभ्र कपड्यात पॉश आश्रमात का कायश्याश्या ठिकाणी भेटतात आणि एक आज्जी मरून जाते. (असले आश्रम कुठे असतात? तिथे कपडे एवढे छान कोण धुवून देतं? डेथ सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम नाही का होत?) म्हणून समस्त रायचंद कुटुंब तिथे भेटतं व तिथे जया भादुरी एक ड्वॉयलॉक मारून रिबेल करते. आधी का करत नाही कोण जाणे? किंवा बापाने घराबाहेर काढलं तर आई-मुलाने एकमेकांशी संवाद न ठेवण्याचं कारण काय?
राणी मुखर्जी हुश्शार. या दलदलीत पाय घातला नाही. काठावर उभं राहून तिने मस्त डान्स केला. थोडक्यात निसटली.

धमाल Happy
मला आता फार आठवत नाहीये.पण कह दिया, बस कह दिया आठवलं आणि पू चा तो कधीही तटकन खांद्यावरून बंद तुटेल असा लाल टॉप यु आर माय सोनिया गाण्यातला.(यावरून आठवलं, मोहब्बते मध्ये शामिता शेट्टी ने पण असाच मागे अगदी एका हुक वर लटकणारा टॉप घातलाय पैरो मे बंधन है गाण्यात.मला हे असे ड्रेस मेंटेन करणाऱ्या कपडेपट टीम ची दया आली.)

फारेण्डचा पहिला प्रतिसाद धमाल आहे.
काय रडकथा आहे! एव्हढे सोडून. कारण फारेण्डच्या प्रतिसादात कधीही वैताग दिसत नाही. त्यालाही वैताग आणला असा चित्रपट आहे यावर शिकामोर्तब झाले.

करीनाचे यात नावच पूजा असल्याने तिच्या हातातले तबक तर अनेक अर्थाने पूजा की थाली असते. >>> Lol
जया नेहमीप्रमाणे वैतागलेली. >>> Happy सध्या जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन संबंधांवर मीम सारखे फॉर्वर्ड दिसतात. सध्या सलमान जया पंगा पण गाजतोय. एके काळची जया भादुरी गोड आणि नैसर्गिक अभिनेत्री होती. तिने एक रेखा आखून स्वभावदोष काढून टाकावेत.

आलोक नाथ मधेच रॅण्डमली मरतो. >> Lol हाच तो दिग्दर्शकीय टच. प्रेक्षक मरण्याच्या कारणांची अपेक्षा करत असताना धक्का देणे.

अमिताभने वाकल्याशिवाय किंवा जयाने चौरंग्/स्टुलावर उभी राहिल्याशिवाय अमिताभच्या कपाळावर तिला टीका का काय लावता येत नाही हे ती त्यांची रोजची रिच्युअल असून सुद्धा त्यांना लग्नानंतर काही वर्षांनी समजते. >>> Lol

लंडन मधे जन्मलेल्या पोराला "द्राविड उत्कल वंग" किंवा "विंध्य हिमाचल यमुना गंगा" वगैरे लक्षात राहायला काही अडचण येत नाही. पण शेवटी "जय हे, जय हे" झाल्यावर पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो. >>>> Lol

हा रायचंद नक्की काय बिझिनेस करतो, शाखाला बेदखल केले म्हणजे नक्की काय केले, >>> Lol

बाकीचे सगळे पण मस्त लिहीताय. वाचतोय.
थोड्या उशीराने येईन , तेव्हां महागाथा बनलेली असेल.

के३जी चे मायबोली रोस्ट झाले नाही हाच धक्का आहे. कुफेहेपा ? Lol
एव्हढे दिग्गज असताना ? शोनाहो Lol

त्यामुळेच कदाचित हा सिनेमा चांगला असावा असा समज होऊ शकतो बाहेरच्या जगात.

“तिने एक रेखा आखून स्वभावदोष काढून टाकावेत.” - त्या ‘रेखा’मुळेच तर बरेच स्वभावदोष निर्माण झालेत ना! बरं, त्यातही, स्वभावदोष हीचे आणि ‘रेखा‘ नवर्याची असलं तिरपागडं समीकरण आहे.

फेफ Lol
PosterMaker_06082024_131134.jpg

अरे, काय हे.... वरचा फोटो Rofl Rofl Rofl
फोटोत जया ब.च्या साडीला मॅचिंग बांगड्या रेखाने घातल्यात.... हीच ती फ्रेन्डशिप!

बाकी, K3G रोस्टच्या धाग्यावर 'सिलसिला'ला हात लावायाचं काम नाय !!
("म्हैशीला हात लावायाचं काम नाय....." या चालीवर)

र.आ. Lol कसली खतरनाक मीम जमली आहे ती. पण मी खरोखरच वैतागलो होतो हा पिक्चर बघताना.

के३जी चे मायबोली रोस्ट झाले नाही हाच धक्का आहे. कुफेहेपा ? >> मलाही आश्चर्य वाटले. मी समजत होतो कोणीतरी नक्की लिहीले असेल.

(स्पेलिंग त्यांनी केलंय. मला नका विचारू) >>> Lol

आलोकनाथ मेल्यामुळे काजोलचा आधारवड बनून तिच्याशी लग्नच करून टाकतो >>> Happy हो आणि तेथेच सिंदूर वगैरे लावतो ना?

साउथ हॉलमधल्या पंजाबिणी एकवेळ वेस्टर्न कपडे घालतील पण केजोच्या लंडनमधल्या पंजाबिणी मात्र दिल्लीत दिवाळी पार्टी करत असल्यासारख्या वावरतात. >>> Happy टोटली

किंवा बापाने घराबाहेर काढलं तर आई-मुलाने एकमेकांशी संवाद न ठेवण्याचं कारण काय? >>> हे प्रश्न मलाही पडले होते पाहताना.

जबरी पोस्ट आहे माझेमन Happy

("म्हैशीला हात लावायाचं काम नाय....." या चालीवर) >>> Lol

यावरून आठवले. सिलसिलाच्या पोस्टरवर जयाच्या बाजूला अमिताभ खिशात हात घालून उभा आहे असा एक फोटो आहे. के३जी मधे ऑल्मोस्ट तसाच एक सीन आहे.

खूप हासले
स्वाती आंबोळे तुझी कमेंट तर खतरनाक आहे, लोळले वाचून .
मी अनु तू पण खुसखुशीत लिहिलंयस.

फा ची पोस्ट तर मस्त च आहे. र्म्ड & माझेमन ने पण मस्त पोस्टी टाकल्यात.
हा चित्रपट १ ही जांभई न देता बघणार्यांना सलाम. काजोल तर काजोल, ती करीना तर पार डोक्यात जाते, लचकत चालताना पाय मुरगळावा तिचा अशी वाईट इच्छा होते.
जया- रियल लाईफ मधे अमिताभ ने इतकं दरार्यात ठेवलं असतं तर Wink ... तिचे पत्रकार्/फॅन्स ना हिणवणे, मंत्रालायात वाट्टेल ते बरळने वगैरे मीम बघावे लागले नसते.
नालासोपारा/भिवंडी/विजयवाडा/तिरुचिरापल्ली इथेही राहू शकले असते. रायचंद थोडाच जाणार होता शोधायला? >>> होना. पुणे, बँगलोर, हैद्राबाद, कलकत्ता, चेन्नई कुठे ही जाऊन कडमडले असते की Wink

ते जन गण मन वाला सीन तर अगदीच केजो छाप आहे.. जय जय जय जय हे ही ओळ विसरतो Lol

माझे मन , मी अनु धमाल प्रतिसाद आहेत. अजून येऊ द्यात.
स्वाती आंबोळे Lol

फोटोत जया ब.च्या साडीला मॅचिंग बांगड्या रेखाने घातल्यात.. >> याला म्हणतात निरीक्षण Lol

अमिताभच्या ऑफिसमधे त्याचे वडिल म्हणून कोणाचा फोटो असतो?
<<<<< हो, हा प्रश्न मलाही आहे. Proud
देवानंदने सिंडी क्रॉफर्डचा फोटो सावत्र आई म्हणून लावला होता. कदाचित इथे टॉम क्रूझचा लावला असेल फोटो, त्यामुळेच हाय खाऊन तो अजूनही स्वतःचे खतरनाक स्टंट्स स्वतःच करतो.

हा सिनेमा मी पूर्ण बघू शकलो नाही. डोकं भणाणत होतं.
ते सारखं आ आ आ आ आ आ आ कभी खुशी कभी गम वालं ट्यून इतकं डोक्यात बसलेलं आहे कि कानाचा कॅन्सर होईल असं वाटलं होतं.
झुम झुम ढलती रात या गाण्यातला पहिला आलाप आहे तो आ आ आ आ आ आहे.
एखादी अप्रिय आठवण विसरून जावं तसं हा सिनेमा विसरलो आहे तरी पण ती ट्यून काही डोक्यातून काढून टाकता येत नाही.
तिचं एव्हढं गारूड आहे कि शेवटी त्यामुळे जो त्रास होतो तो सर्वांना व्हावा म्हणून हा धागा काढला होता.
https://www.maayboli.com/node/85377
लाभ ताप घ्यावा.

यात रायचंदचं घर दिसतं. आजूबाजूला किमान शंभर किमी मधे मनुष्यवस्ती नसावी. जंगलात ते ही डोंगररांगात याचं घर आहे.
Picture1_0.png

अमिताभच्या नावावरून तरी माणिकचंद जर्दाने जो रायता फैलाया है उसको रायचंद कहते है असं वाटतं. अशा मार्गाने पैसे कमावून लोक शक्यतो शेवटी पाप फेडायला जंगलात साधना करायला जात असतात.
अशा नो मॅन्स लॅण्ड वर राहून हा एव्हढा मोठा बिझनेस करतो ते करतो, त्याच्या घरी रिक्षाने, कॅबने येऊन लोक डान्स सुद्धा करत असतात.
फार पूर्वी जॉनी वॉकर म्हणून गेला आहे.. जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा.

आणखी एक त्रासदायक प्रकार म्हणजे शाहरूखच्या एण्ट्रीचा
https://www.youtube.com/watch?v=r5_idg1zvm4

यातही घराचा एक्स्ट्रा लाँग व्ह्यू आणि एरीयल व्ह्यू दिसतो. जवळपास साधं पंक्चरचं दुकान पण नाही. ही सगळी व्यवस्था घरातच करावी लागली असणार.

शाखा हेलिकॉप्टरमधून बाहेर येतो तेव्हां जया भागदौडी घराच्या बाहेर स्कुटीचा आवाज व्हावा अशा शांतपणे चमकून बाहेर बघते. साहजिकच आहे. अशा ठिकाणी लोक काँकर्ड विमाने घेऊन येत असतील, लाँड्रीवाला बोईंग मधून येऊन "कपडे है क्या मेमशाब " म्हणून विचारणा करत असेल. दूधवाला वरून पाकीटं टाकत असेल. भाजीवालीचं ड्रोन घिरट्या घालून खाली पार्सल टाकत असेल. यावरूनच जांभळं, करवंदांच्या पार्सलला द्रोण म्हणायचा प्रघात पडला असेल. शेजारच्या जंगलातल्या कपूर आंटी एअरबस घेऊन लसूण किंवा कोथिंबीर निवडता निवडता गप्पा मारायला येत असतील. सुनांची बुराई करता करता वेळ कसा गेला हे न समजल्यावर " उनके जेट का टाईम हुआ, वख्त कैसे बीत गया बातों मे पता ही नही चला , है ना ?" " जी हां, बाते मीठी " असं जया आंटी मराठीतल्या "गप्पा गोड" च्या चालीवर म्हणत असणार.

या सगळ्या आवाजांपुढे चॉपरचा आवाज तो काय ?
बरं उतरल्यावर जया आंटी बाहेर शाखाकडे पाहतात, शाखा जया आंटीकडे बघतो. त्यावरून घराचा प्रशस्त हॉल, हॉलचा प्रशस्त दरवाजा त्या पुढे शंभर एकरचं छोटंसं आंगण आणि त्यात हेलिपार्किंग हे एकाच रेषेत असावं असा समज होतो.
पण ती वर दिलेली क्लिप नीट बघा. शाहरूख खान पळत येतो तो सरळ रेषेत प्रवेश करत नाही.
तो घरात काटकोनातून प्रवेश करतो. जया आंटी समोर बघत होत्या तिथे भिंत आहे. प्रवेशद्वार काटकोनात आहे. म्हणजे या बयेला भिताडातून आर पार बघण्याची शक्ती आहे का ? उगाच नाही सिमेंटरेखा ओलांडून नवर्‍याला रंगेहाथ पकडलं !
त्यातून बया बंगाली म्हणजे तिखट. बच्चन धर्मेंद्राच्या नशीबावर जळत असेल. कुछ लोग बाहर का और अंदर का खटला कैसे मॅनेज करते होंगे ?
आपला महानायक एव्हढा कमनशिबी कसा ?

शाखा आत येताना दीपक तिजोरी ने हात डोळ्याच्या रेषेत उपडा करून मुंगी चावल्यासारखा हलवल्याने तमाम फिमेल वर्ग चित्कारला होता म्हणून याने पण " आ आ आ तूच ना ?" या अर्थाने तर्जनी दीति स्टाईल हलवली आहे. किती व्यवधान ठेवतो हा ? धावत यायचंय, ओव्हरकोट पायात येऊ द्यायचा नाही, त्यात काटकोनात वळताना वेग कमी होऊ द्यायचा नाही, त्याच स्पीड मधे आई शोधून काढायची आणि हा बॅलन्स सांभाळता सांभाळता " तूच ना तूच ना" अर्थी तर्जनीनृत्य करायचं....

दोघांच्या डोळ्यात ग्लिसरीन.
तो विचारतो कि " मां, तुम्हे मेरे आने से पहले कैसे पता चलता है ?"

कप्पाळ !
कणेकर असते तर चेकाळले असते. अरे तू काय सायकलवर आलाहेस का तिला ऐकू न यायला ? कि तुझी माता दिव्यांग पक्षी बहिरी आहे ?
एव्हढं मोठं हेलिकॉप्टर आणलंस ना रे ? कि सायलेन्सर बसवलंय पंख्याला ?
संझगिरी म्हणाले असते "बहुतेक बॅटरीवर चालणारं हेलिकॉप्टर असावं "

खतरनाक आचार्य

काय लिहिलंय, बऱ्याच दिवसांनी माबोवर आल्याचे सार्थक झालं Happy

सगळ्यांचे पंचेस पण फुल्ल धमाल

अत्यंत डोक्यात जाणारा सिनेमा

Happy अशक्य सिनेमा आहे हा. रायचंद परिवारातील पुरुष सदस्य हे अगम्य लॉजिक वापरतात.

(१) तुमच्या थोरल्या मुलांचे लग्न आपल्या मित्राच्या मुलीशी करायचे असे तुम्ही ठरवले आहे. पण तिच्या सोबत तासभर देखील पार्टीत न थांबता तो घरी परत आलाय. योगायोगाने तुमच्या आईने तुमच्या लग्नाच्या आणि वडिलांनी मुलांचे लग्न ठरवण्याच्या परंपरेचा विषय काढला आहे. तर तुम्ही काय कराल?

मी तुझ्या साठी माझ्या मित्राच्या मुलीला पसंत केली आहे हे मुलाला न सांगता फक्त सगळ्यांसमोर बायकोला वेग दमदाटी कराल. नंतर मुलाने तुमच्या मनाप्रमाणे लग्न केले नाही म्हणून त्याला तर घरातुन हाकलुन द्यालच शिवाय बोनस म्हणून लहान मुलगा जो हॉस्टेल मध्ये राहुन शिकतो त्याला तिथेच ठेवाल, भरीस भर म्हणून आईलाही कुठे तरी दुर एखाद्या आश्रमात पाठवुन द्याल आणि १५ वर्षांनंतर रागावलेल्या बायको समोर, " मैं कितना अकेला हो गया हुं" असे रडगाणे गाल.

(२) एक मुलगी तुम्हाला आवडली आहे. तुम्हाला तिच्याशीच लग्न करायचे आहे. पण तुमचे वडिल परवानगी देणार नाहीत अशी शक्यता त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या संभाषणातून व्यक्त झाली आहे. अशातच योगायोगाने ती मुलगी घरी आलीय (आणि बॅकग्राऊंड म्युझिक वरुन) तिने आपल्या सो कॉल्ड उद्धट आणि वेंधळेपणा ची माफी मागुन तिने वडिलांच्या मनात जरा सॉफ्ट कॉर्नर निर्माण केला आहे तर तुम्ही काय कराल?

तिच्या बोलण्यात व्यत्यय आणुन वडिलांना ही मुलगी वेडीबिडी आहे का हा विचार करायला भाग पाडाल. नंतर वडिलांनी परवानगी दिली नाही म्हणून डायरेक्ट अज्ञातवासात जाल.

(३) भावाला आपण कोण आहोत हे सांगण्याची वेळ आली आहे, असे तुम्हाला वाटतेय. त्यासाठी पुतण्याकडुन राष्ट्रगीत आणि त्याचे कौतुक होईल हे गृहीत धरून नंतर त्याने म्हणायचा लांबलचक डायलॉग तुम्ही पाठ करून घेतलाय. अशावेळी योगायोगाने तुम्हाला लहानपणापासून जिने वाढवलं त्या वृद्ध स्त्री ने तुम्ही कोण आहात ते ओळखले तर तुम्ही काय कराल?

पहिले स्वतः ची ओळख मान्य करायला नकार द्याल आणि ती उघड झाल्यानंतर तुमचे संभाषण ऐकणाऱ्या वहिनीला कुणाला सांगू नकोस अशी विनंती कराल. जेणे करून तासभर आधी ही गोष्ट तुमच्या भावाला कळणार नाही. आणि त्याला कळणे/न कळणे हे ५-६ वर्षांच्या पुतण्याच्या पाठांतरावर अवलंबून राहील.

Pages