एका मोटारीचे गझली आत्मवृत्त

Submitted by हरचंद पालव on 30 August, 2023 - 04:58

(निशिकांत यांच्या 'भार झाले' गझलेवरून ही सुचली. त्यांची मूळ गझल छानच आहे. ह्यातला काफिया की रदीफ की काय म्हणतात तो सोडला, तर बाकी तसा ह्या गझलेचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा गझल लिहिण्याचा काहीच अनुभव नाही, त्यामुळे ह्याला गझल म्हणत नसतील तर कृपया दुसर्‍या ठिकाणी हा धागा हलवावा ही विनंती.)

जन्म माझे फार झाले
अन् भुईवर भार झाले

जन्मत: होते खटारा
आज मी मोटार झाले

छान होता जाड पत्रा
तेच माझे दार झाले

वितळुनी लोखंड-तुकडे
लांबवीता 'तार' झाले

चाक रबरी फाटलेले
'काडिचा आधार' झाले

तापले बॉनेट माझे
पावसाने गार झाले

गंजुनी पाण्यात धातू
दो दिसांनी क्षार झाले

का 'रथा' पुल्लिंग जोडी?
कार परि मी 'नार' झाले?

मी दिला धक्का जयांना
तेच मजवर स्वार झाले

तोडिता बिन्धास्त सिग्नल
पोलिसी व्यापार झाले

आरसे जे तीन होते
ते फुटोनी चार झाले

चकचकी राखावयाचे
स्वप्न माझे ठार झाले

चुंबुनी आकाश घेण्या
लोक अंती घार झाले

कार झाले, क्षार झाले, गार झाले, घार झाले
नार झाले, ठार झाले, हेच माझे सार झाले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>तुला मीटर आणि म्याटरची जाण आहे ऑलरेडी - आता खर्‍याखुर्‍या गझलदेखील लिही.>>>+१

Lol Proud

सामो,
पंक्चर झाले की टायरमधे तिथे छोटी काडी खुपसून ठेवतात, ते वाटलं मला. र्‍हस्व लिहिण्याचं कारण म्हणजे मीटर मध्ये बसवण्यासाठी काही तरी मात्रांचा हिशोब असावा.
आता हर्पा सांगतील हे बरोबर आहे की नाही. Happy

बुडत्याला काडीचा आधार असतो तसं ह्या मोडकळीला आलेल्या मोटारीला फाटक्या रबरी चाकाचा आधार आहे.

बाकी,
र्‍हस्व लिहिण्याचं कारण म्हणजे मीटर मध्ये बसवण्यासाठी >> सही जवाब

विशेषतः हपांनी काडी हा शब्द र्‍हस्व लिहावा? >> या पातकाबद्दल क्षमा करा, सामो. अश्या बर्‍याच चुका मी करत असतो. _/\_

फार आर्त गझल आहे ही >> Lol Lol

गावातल्या म्हशीच्या धक्क्यातून सावरणार्‍या एष्टीला जवळून बघणार्‍या माणसाला मोटारीच्या आर्त भावना कळणं फारसं अवघड गेलं नाही.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद लोकहो!

तुला मीटर आणि म्याटरची जाण आहे ऑलरेडी >> इथेही मी यडपटपणे 'धन्यवाद' म्हणणार होतो, पण पुढचं "आता खर्‍याखुर्‍या गझलदेखील लिही." वाचल्यावर लक्षात आलं की ती आधीची शालजोडी होती. Happy

ज्या गाडीचे बाद होण्याचे वय ( मरण्याचे वय १५) जवळ आले आहे तिचा आर्तनाद किंवा टाहो कसा असेल? अशा गाड्यांमधल्या एकीला हरीपाटर सिनेमात शेवटचे दाखवायचे भाग्य लाभेल. बाकीच्यांना शेवटची इच्छा तरी मिळेल का हातोड्याखाली जाण्याअगोदर?

पंधरा भागांची मालिका पंधरा ओळीत मांडलीय. भारी. यातून नवे धागे काढणारे बोध घेतीलच.
अशा कविता आमच्या शालेय जीवनात का नाही मिळाल्या? "भंगारात जाणाऱ्या गाडीचे आत्मवृत्त" लिहून पंधरा पैकी बारा गुण (हस्ताक्षराचे तीन गुण कापून) नक्की मिळाले असते ना.

Srd, जबरी प्रतिसाद! तुमचं निरीक्षण अचूक आहे.
१५-१५चं गणित वाचून मला सुफला १५-१५-१५ खताच्या रेडिओ जाहिरातीची आठवण झाली.

>>> आधीची शालजोडी होती
नाही नाही Lol
एक आपली मित्रत्व/वडीलकीच्या नात्याने दिलेली कानपिचकी फारतर. Happy