*** म्हणजे देवघरची फुले!

Submitted by छन्दिफन्दि on 6 July, 2023 - 03:25

आता मात्र मी अगदी रडकुंडीलाच आलेले. "हे धरणीमय मला पोटात घे" असा मनातल्या मनात सीतामाई प्रमाणे धावा सुरूच होता.
त्याच झालं अस होत, माझ्या मुलाची शाळा (वय वर्ष ५) नेहेमी दुपारी बाराला असायची पण दहावी बारावी च्या परीक्षा असल्या कि २०-२५ दिवसांसाठी शाळा सकाळी नऊला भरायची. त्याला थोडा दमा असल्यामुळे रात्री / पहाटे खोकला वगैरे यायचा , मग थोडी झोपमोड, गरम पाणी, मध पाणी घेऊन परत झोपायच. एकदा झोपमोड झाली की सकाळी उठायला उशीर, ज्याचा एरवी काही फरक नाही पडायचा पण आता सकाळची शाळा असली कि भलतीच घाई व्हायची. मग हमखास स्कुल व्हॅन निघून जायची . मग दुसरी रिक्षा पकडून शाळेत जायचं, उशीर झालाच म्हणून समजा. त्या आठवड्यात नेमका २ वेळेला उशीर झाला होता. झालं! आज बुलावा आया है! बाईंचा निरोप "शाळेमध्ये येऊन भेटा "
शाळा संपून (माझी स्वतः ची )इतकी वर्ष झाली तरी (कुठल्याही ) बाईंशी बोलायचे म्हणजे माझ्या पोटात भयंकर मोठा गोळा येतो. आता तर खात्री होती, नक्की काहीतरी गडबड आहे. पण करणार काय ? सगळा धीर एकटवुन गेले शाळेत. तर चक्क मुख्याध्यापिकांकडेच पाठवले. स्वागताला त्याच्या क्लास टीचर आणि मुख्याध्यापिका !
"बसा " "शाळेत उशीरा येतो "
"हो जरा एक दोन दिवस झाला उशीर. "
"हे फक्त आताच नाही ये , गेले काही दिवस मी बघत्ये "
आता ओठांना कोरड पडायला लागलेली. "अं अं हो जरा काही दिवस शाळेचं वेळापत्रक बदललाय ना, त्यात त्याला जरा रात्रीचा, पहाटेचा खोकला येतो, झोपमोड झाली त्याची कि मग सकाळी थोडी गडबड होते ..." इकडे माझी सारवा सारवी सुरु झाली. तसं बाईंनी एकमेकींकडे बघितलं. आता पोटातला गोळा थोडा थोडा मोठा होऊ लागला.
"तो तर म्हणाला, आईला उठायला उशीर होतो म्हणून त्याला शाळेत यायला उशीर होतो."
मी अवाक होऊन बघतच राहिले. रात्रीची (कधी मधी होणारी) जागरणं, सकाळचे वाफारे, औषध, दूध , आवराआवरी ह्यासाठी होणारी धावपळ, मारामारी सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. पण ह्यावर उत्तर काय द्यावे हे काही सुधरेना.
इकडे दोघींच्या डोळ्यात "काय आई आहे, स्वतः ला उठायला उशीर होतो तर खुशाल मुलाच्या आजारपणाची कारणं पुढे करते. किती तो बेजबाबदारपणा .. वगैरे वगैरे " मला काही त्यांच्याकडे बघवेना
"अहो इतका छोटा मुलगा, तो काय स्वतःच्या मनचं सांगणारे का?" बाई पुढे बोलायला लागल्या. आणि तेव्हा मात्र वर सांगितल्याप्रमाणे धरणी मातेलाच साकडं घालायला लागले. कारण खरं सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नाही आणि शिवाय आपल्या पिल्लाला कसं खोटं पाडणार. गुपचूप त्यांनी केलेली कानउघडणी मूग गिळून ऐकली आणि घरी आले.
"अरे तू टीचर ना असं का सांगितलंस कि आईला उठायला उशीर होतो म्हणून तुला शाळेत यायला उशीर होतो ?" घरी आल्या आल्या माझी सरबत्ती
" उशीर झाला आणि टीचर ओरडू नये म्हणून मग मी आई उशिरा उठते सांगितलं, मला काय माहित टीचर तुला शाळेत बोलावेल आणि विचारेल.?"
गाल फुगवून त्याचं उत्तर . मी फक्त कपाळावर हात मारून घेतला.
****
त्यांची शाळा प्ले वे पद्धती प्रमाणे चाले, तर मुलांना स्नायू बळकटीसाठी छोटी छोटी कामे देत. जसं छोट्या शिशूत रुमालाच्या घड्या घालणे वगैरे.
मोठ्या शिशूत एक दिवस घरी आला " आज टीचर ने त्यांच्या नवऱ्याचे कपडे शाळेत आणले होते आणि आम्हाला घड्या घालायला सांगितल्या."
मला हसू आवरेना " अरे ते काही त्यांच्या नवऱ्याचे कपडे नव्हते . गेल्या वर्षी तुम्ही छोटे होतात म्हणून छोट्या कपड्यांच्या घड्या घालायला दिल्या , म्हणजे रुमाल वगैरे, आठवतं ना! आता तुम्ही मोठे झालात ना म्हणून मोठे कपडे दिले. "
" नाही! त्यांच्या नवऱ्याचा शर्ट वगैरे आणलेले त्यांनी, त्यांचेच कपडे होते " तो त्याचा (लॉजिकल) पॉईंट काही सोडेना.
माझा नवरा गमतीने म्हणतो कसा "आता बाईंना जाऊन हि गोष्ट सांग, आणि विचार एवढा छोटा मुलगा काय स्वतःच्या मनाचं बोलणारे ?"
आणि आम्ही दोंघही हसत हसत (आजकालची) "इनोसंट मुले " ह्या विषयावर गप्पा मारू लागलो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Innocent kids..
आमच्याकडे कोणे एके काळी, लेकीच्या आत्त्याने छोले भटुरे केले होते, आता लेक मला म्हणतेय तु करत नाहीस, तुला रेसिपी माहित नाही का.. काल खुप ओरडली. 6 वर्षाची लेक...

छान किस्सा. टीचरवरून एक माझ्या मुलीचं observation सांगावस वाटतंय.
यावर्षी मुलगी पहिलीत गेलीय. तिची वर्गशिक्षिका एक बिहारी मुलगी आहे. तर माझ्या मुलीला तिच्या उच्चारांमधे सतत दोष दिसत असतात. रोज घरी आली की कुरकुर चालू असते. की आई बघ न आमच्या टीचर मॅथ्स ला मैथ्स म्हणतात. कॉम्प्युटर ला कोंपूटर. काल तर खूपच चिडचिड करत होती. कारण टीचर तिला म्हणाली की "विजयालक्ष्मी, इट युअर स्नेक्स् क्विकली" हा हा....

इट युअर स्नेक्स् क्विकली <<<< Biggrin Biggrin Biggrin
.. काल खुप ओरडली. 6 वर्षाची लेक..<<< Bw

ShitalKrishna, मनीमोहोर, मनिम्याऊ प्रतिसादासाठी धन्यवाद!

तिची वर्गशिक्षिका एक बिहारी मुलगी आहे. तर माझ्या मुलीला तिच्या उच्चारांमधे सतत दोष दिसत असतात.>> तिला समजावुन सांगा. ती टीचर मुलगी प्रिविलेज्ड बेक ग्रौंड मधून आलेली नसेल. फार मेहनतीने ती अनेक बंधने पार करुन आर्थिक सामाजिक ह्या नोकरी परेन्त पोहोचली असेल तर बी काइंड टु हर . ती जे ज्ञान देते आहे त्यावर कॉण्सन्ट्रेट करावे. आपलेही उच्चार इतरांना सदोष वाटू शकते.

लहान मुलगी आहे नसते पूर्वग्रह तयार होउ नयेत म्हणून लिहिले इग्नोअर केले त तरी चालेल.

हा हा ! भारी किस्सा ..
त्यावरून मुलं लाजवतात तेव्हा हा धागा आठवला.>> मी अगदी हेच लिहायला आलेले भरत.

अमा >> +१११११११११
आणि जे लोक इतरांच्या उच्चाराला हसतात ... कुणाचे उच्चार बरोबर आहेत हे कोण ठरवणार?

<<<तिला समजावुन सांगा. ती टीचर मुलगी प्रिविलेज्ड बेक ग्रौंड मधून आलेली नसेल. फार मेहनतीने ती अनेक बंधने पार करुन आर्थिक सामाजिक ह्या नोकरी परेन्त पोहोचली असेल तर बी काइंड टु हर . ती जे ज्ञान देते आहे त्यावर कॉण्सन्ट्रेट करावे. आपलेही उच्चार इतरांना सदोष वाटू शकते.

लहान मुलगी आहे नसते पूर्वग्रह तयार होउ नयेत म्हणून लिहिले इग्नोअर केले त तरी चालेल.>>>

मुलीला मराठी आणि हिंदी वर्णमालेतील फरक समजावून सांगितला. हिंदीत ॲ आणि ऑ असे उच्चार नसल्याने सर्वात जवळचे म्हणून ए आणि ओ असे उच्चारण करतात. हे देखील समजावून सांगितले. आता तिची काही तक्रार नाहीय.

मुलीला मराठी आणि हिंदी वर्णमालेतील फरक समजावून सांगितला. हिंदीत ॲ आणि ऑ असे उच्चार नसल्याने सर्वात जवळचे म्हणून ए आणि ओ असे उच्चारण करतात. हे देखील समजावून सांगितले.>> भारीच !!
मला नसते हे सुचले

लीला मराठी आणि हिंदी वर्णमालेतील फरक समजावून सांगितला. हिंदीत ॲ आणि ऑ असे उच्चार नसल्याने सर्वात जवळचे म्हणून ए आणि ओ असे उच्चारण करतात. हे देखील समजावून सांगितले.>>>> वा!
भारीच !!
मला नसते हे सुचले>> कदाचित मलाही

भरत आणि anjali_kool प्रतिसादा साठी आणि योग्य धागा सुचविण्यासाठी धन्यवाद,!

मी त्या धाग्यात ही गोष्ट घालते.

हिंदीत ॲ आणि ऑ असे उच्चार आहेत की! फक्त ते लिहिताना ऐ आणि औ असे लिहितात. पण जाऊ दे, मुलीला पटलं आणि ती खिल्ली उडवत नाही ना, मग ठीक आहे.

ता.क. पण हिंदीच्या काही बोलिंमध्ये - अवधी, मैथिली वगैरे, हे उच्चार नसावेत. ते लोक ऐ आणि औ चे उच्चार आपण मराठीत करतो तसेच करतात. त्यामुळे त्यांचं हिंदी ऐकायला वेगळंच वाटतं. त्या शिक्षिका अश्या भाषिक पट्ट्यातल्या असाव्यात.

हिंदीत ॲ आणि ऑ असे उच्चार आहेत की!...

पहिल्या वर्गाच्या हिंदीवर्णमालेच्या मूळाक्षरांच्या अभ्यासक्रमात ॲ आणि ऑ नाही आहे पण मराठीच्या पुस्तकात आहे. म्हणजे तसं बघितल्यास हिंदीत बाराखडी आणि मराठीत चौदाखडी आहे. म्हणून तिला तसं समजावलं आहे. Happy
बाकी हा किस्सा इथे शेअर करण्यामागे उद्देश हाच होता की लहान मुले कसं आणि किती निरीक्षण करतात. यात मला कोणाला हसायचं किंवा टीका अजिबात करायची नाही आहे.

हिंदीतली वर्णमाला मला माहित नाही पण चांगल्या प्रिविलेज्ड घरातुन आलेले बिहारी पण स्नेक्स बोलतात. गुज्जु पण असेच बोलतात. हल्लीच माझ्या टिममध्ये एक बिहारी आलाय, तो काय बोलतोय हे कळण्यासाठी मला कानात प्राण एकवटुन त्याचे उच्चार ऐकावे लागतात, तरी अर्धे निसटुन जातात. उच्चारांवरुन व्यक्तीच्या जातीपर्यंत पोचणे जरा जादाच वाटले.

बर्‍याच वर्षांपुर्वी माझ्या घरच्या फुलाला, तेव्हा वय वर्षे पाच, घेऊन मॉलमध्ये गेले होते, नुसता विन्डो शॉपिन्गचा बेत होता. तर आमच्या फुलाला जे दिसेल ते विकत घ्यावेसे वाटत होते आणि मी नको, पैसे नाहीत म्हणत खो घालत होते. शेवटी फुल चिडुन हाताने एटिएम कार्ड स्वाईप करायची अ‍ॅक्शन करत म्हणाले, एटिएम नाही का तुझ्याकडे..

बाकी हा किस्सा इथे शेअर करण्यामागे उद्देश हाच होता की लहान मुले कसं आणि किती निरीक्षण करतात. यात मला कोणाला हसायचं किंवा टीका अजिबात करायची नाही आहे.>>> जाऊ द्या हो इतकं मनावर घेऊ नका.

स्नॅक्स आणि स्नेक्स वरती कितीतरी सिरीयल / शो मध्ये कॉमेडी करतात.

ती तर छोटी मुलगी आहे.

इकडे मूळ मुद्दा बाजूला ठवून भलत्याच गोष्टीचा किस पाडायची पद्धत बघितलीये. सिलेक्टिव्हली वाचायचं.

आणि कितीतरी जण तुम्हाला उपदेश करतील पण स्वतः दुसऱ्या धाग्यांवर जाऊन "न" च "ण " केला म्हणून इतरांना नाव ठेवतील. जोक्स करतील. जागो जागी डबल स्टँडर्ड्स आढळतात. अशा लोकांना त्याच्या दुनियेत राहू द्यावं.

णि कितीतरी जण तुम्हाला उपदेश करतील पण स्वतः दुसऱ्या धाग्यांवर जाऊन "न" च "ण " केला म्हणून इतरांना नाव ठेवतील. जोक्स करतील. जागो जागी डबल स्टँडर्ड्स आढळतात. अशा लोकांना त्याच्या दुनियेत राहू द्यावं>>>>

सही पकडे है….. माबोवर खुप आहे हे.. Happy

"आणि कितीतरी जण तुम्हाला उपदेश करतील पण स्वतः दुसऱ्या धाग्यांवर जाऊन "न" च "ण " केला म्हणून इतरांना नाव ठेवतील. जोक्स करतील. जागो जागी डबल स्टँडर्ड्स आढळतात. अशा लोकांना त्याच्या दुनियेत राहू द्यावं." Sahi sahi

शेवटी फुल चिडुन हाताने एटिएम कार्ड स्वाईप करायची अ‍ॅक्शन करत म्हणाले, एटिएम नाही का तुझ्याकडे..>>> Lol Lol Lol

गल्या प्रिविलेज्ड घरातुन आलेले बिहारी पण स्नेक्स बोलतात. गुज्जु पण असेच बोलतात>>> सारा भाई व्स सारा भाई मधे पण असे पन्चेस आहेत.

आमच्या वर्गात दोन काश्मिरी मुलेन्होती. आमचे मास्तर यूपी चे.
ते एकदा आम्हाला म्हणाले - हे दोघे सक्रु का म्हणतात? इस्क्रु म्हणायला पाहिजे ना?
आमचे केमिस्ट्री चे मास्तर कॅनिझ्झारो ला सी येयन्यनाय हिस्झेड हिस्झेड ये आर वो असे म्हणायचे.

प्रतिसादातील किस्सेही भारी. >> सहमत

सी येयन्यनाय>>> आमच्या एक गणिताच्या नायर मिस होत्या त्या पण असच म्हणायच्या.

मुलीला मराठी आणि हिंदी वर्णमालेतील फरक समजावून सांगितला. हिंदीत ॲ आणि ऑ असे उच्चार नसल्याने सर्वात जवळचे म्हणून ए आणि ओ असे उच्चारण करतात. हे देखील समजावून सांगितले. आता तिची काही तक्रार नाहीय.>>>>

तुम्ही तुमच्या स्तरावर मुलीला समजावून प्रश्न सोडवलात पण चुकीचे उच्चार असलेल्या शिक्षिकेला कामावर ठेवणे ही खरेतर शाळेची चूक आहे. कारण पहिलीतील विद्यार्थी म्हणजे त्यांचे उच्चार शिकण्याचेच वय आहे. या वयात चुकीचे उच्चार आत्मसात झाले तर भविष्यात ते योग्य पद्धतीने उच्चारणे अवघड होईल. कृपया मुलीच्या 'व' आणि 'श' अक्षर असणाऱ्या शब्दांच्या उच्चाराकडेही नीट लक्ष द्या. बरेचसे हिंदी भाषिक 'व' या अक्षराचा उच्चार 'ब' असा तर 'श' चा उच्चार 'स' असा करतात. उदा. बिस्वजीत (विश्वजित), बेदान्तिक (वेदांतिक)

<<पहिलीतील विद्यार्थी म्हणजे त्यांचे उच्चार शिकण्याचेच वय आहे. या वयात चुकीचे उच्चार आत्मसात झाले तर भविष्यात ते योग्य पद्धतीने उच्चारणे अवघड होईल.>>>>
खरं आहे. हा प्रॉब्लेम आलाच आहे. जरी माझी मुलगी समजदार असली तरी तिच्याच वर्गातली इतर काही मुले पालकांचं ऐकत नाहीत. शिवाय या वयात टीचर सांगते ते सगळंच बरोबर असतं अशी मुलांची समजूत असते. त्यामुळे आम्ही काही पालकांनी मिळून ही गोष्ट शाळा प्रशासना समोर मांडली आहे.
शिवाय हा एकच मुद्दा नाही. इंग्लिश व्याकरणाबद्दल पण आनंदी आनंद आहे. (शाळा पुण्यातील नामांकित cbse board ची आहे. पहिल्या वर्गाची फी 1.28L. Sad )

ॲ आणि ऑ व्यतिरिक्त च, छ, ज, झ चा पण प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठीत या अक्षरांचे दोन प्रकारे उच्चार होतात. उदा चमचा आणि चंद्र, जहाज आणि जग यातील उच्चार वेगवेगळे आहेत. किंवा मराठीत आणि हिंदीत ' झुला ' हा एकच शब्द वेगवेगळ्या तऱ्हेने उच्चारला जातो. मुलांना याच वयात हे समजणं गरजेचं आहे असं मला वाटत. असो छंदीफंदी यांच्या धाग्यावर हे फारच अवांतर होतय तरी रहावलं नाही म्हणून...

बिहारी लोकांचे उच्चार आपल्याहून वेगळे आहेतच. पण दाक्षिणात्य लोकांचेसुद्धा वेगळे आहेत.

Pages

Back to top