*** म्हणजे देवघरची फुले!

Submitted by छन्दिफन्दि on 6 July, 2023 - 03:25

आता मात्र मी अगदी रडकुंडीलाच आलेले. "हे धरणीमय मला पोटात घे" असा मनातल्या मनात सीतामाई प्रमाणे धावा सुरूच होता.
त्याच झालं अस होत, माझ्या मुलाची शाळा (वय वर्ष ५) नेहेमी दुपारी बाराला असायची पण दहावी बारावी च्या परीक्षा असल्या कि २०-२५ दिवसांसाठी शाळा सकाळी नऊला भरायची. त्याला थोडा दमा असल्यामुळे रात्री / पहाटे खोकला वगैरे यायचा , मग थोडी झोपमोड, गरम पाणी, मध पाणी घेऊन परत झोपायच. एकदा झोपमोड झाली की सकाळी उठायला उशीर, ज्याचा एरवी काही फरक नाही पडायचा पण आता सकाळची शाळा असली कि भलतीच घाई व्हायची. मग हमखास स्कुल व्हॅन निघून जायची . मग दुसरी रिक्षा पकडून शाळेत जायचं, उशीर झालाच म्हणून समजा. त्या आठवड्यात नेमका २ वेळेला उशीर झाला होता. झालं! आज बुलावा आया है! बाईंचा निरोप "शाळेमध्ये येऊन भेटा "
शाळा संपून (माझी स्वतः ची )इतकी वर्ष झाली तरी (कुठल्याही ) बाईंशी बोलायचे म्हणजे माझ्या पोटात भयंकर मोठा गोळा येतो. आता तर खात्री होती, नक्की काहीतरी गडबड आहे. पण करणार काय ? सगळा धीर एकटवुन गेले शाळेत. तर चक्क मुख्याध्यापिकांकडेच पाठवले. स्वागताला त्याच्या क्लास टीचर आणि मुख्याध्यापिका !
"बसा " "शाळेत उशीरा येतो "
"हो जरा एक दोन दिवस झाला उशीर. "
"हे फक्त आताच नाही ये , गेले काही दिवस मी बघत्ये "
आता ओठांना कोरड पडायला लागलेली. "अं अं हो जरा काही दिवस शाळेचं वेळापत्रक बदललाय ना, त्यात त्याला जरा रात्रीचा, पहाटेचा खोकला येतो, झोपमोड झाली त्याची कि मग सकाळी थोडी गडबड होते ..." इकडे माझी सारवा सारवी सुरु झाली. तसं बाईंनी एकमेकींकडे बघितलं. आता पोटातला गोळा थोडा थोडा मोठा होऊ लागला.
"तो तर म्हणाला, आईला उठायला उशीर होतो म्हणून त्याला शाळेत यायला उशीर होतो."
मी अवाक होऊन बघतच राहिले. रात्रीची (कधी मधी होणारी) जागरणं, सकाळचे वाफारे, औषध, दूध , आवराआवरी ह्यासाठी होणारी धावपळ, मारामारी सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. पण ह्यावर उत्तर काय द्यावे हे काही सुधरेना.
इकडे दोघींच्या डोळ्यात "काय आई आहे, स्वतः ला उठायला उशीर होतो तर खुशाल मुलाच्या आजारपणाची कारणं पुढे करते. किती तो बेजबाबदारपणा .. वगैरे वगैरे " मला काही त्यांच्याकडे बघवेना
"अहो इतका छोटा मुलगा, तो काय स्वतःच्या मनचं सांगणारे का?" बाई पुढे बोलायला लागल्या. आणि तेव्हा मात्र वर सांगितल्याप्रमाणे धरणी मातेलाच साकडं घालायला लागले. कारण खरं सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नाही आणि शिवाय आपल्या पिल्लाला कसं खोटं पाडणार. गुपचूप त्यांनी केलेली कानउघडणी मूग गिळून ऐकली आणि घरी आले.
"अरे तू टीचर ना असं का सांगितलंस कि आईला उठायला उशीर होतो म्हणून तुला शाळेत यायला उशीर होतो ?" घरी आल्या आल्या माझी सरबत्ती
" उशीर झाला आणि टीचर ओरडू नये म्हणून मग मी आई उशिरा उठते सांगितलं, मला काय माहित टीचर तुला शाळेत बोलावेल आणि विचारेल.?"
गाल फुगवून त्याचं उत्तर . मी फक्त कपाळावर हात मारून घेतला.
****
त्यांची शाळा प्ले वे पद्धती प्रमाणे चाले, तर मुलांना स्नायू बळकटीसाठी छोटी छोटी कामे देत. जसं छोट्या शिशूत रुमालाच्या घड्या घालणे वगैरे.
मोठ्या शिशूत एक दिवस घरी आला " आज टीचर ने त्यांच्या नवऱ्याचे कपडे शाळेत आणले होते आणि आम्हाला घड्या घालायला सांगितल्या."
मला हसू आवरेना " अरे ते काही त्यांच्या नवऱ्याचे कपडे नव्हते . गेल्या वर्षी तुम्ही छोटे होतात म्हणून छोट्या कपड्यांच्या घड्या घालायला दिल्या , म्हणजे रुमाल वगैरे, आठवतं ना! आता तुम्ही मोठे झालात ना म्हणून मोठे कपडे दिले. "
" नाही! त्यांच्या नवऱ्याचा शर्ट वगैरे आणलेले त्यांनी, त्यांचेच कपडे होते " तो त्याचा (लॉजिकल) पॉईंट काही सोडेना.
माझा नवरा गमतीने म्हणतो कसा "आता बाईंना जाऊन हि गोष्ट सांग, आणि विचार एवढा छोटा मुलगा काय स्वतःच्या मनाचं बोलणारे ?"
आणि आम्ही दोंघही हसत हसत (आजकालची) "इनोसंट मुले " ह्या विषयावर गप्पा मारू लागलो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी इतरांच्या भाषा, accent आणि उच्चारांना हसत असे. असाच मित्राबद्दलचा एक किस्सा घरी रंगवून सांगत असतांना आई पटकन म्हणाली- if he has an accent, he knows at least one more language that you don’t !

आजवर मी ते शब्द विसरु शकलो नाहीये !

लेखातील अनुभव भारी आहे.

हिंदीत दोन मात्रांचा उच्चार मराठीतल्या ऐ असा न होता अय्ss असा होतो.
"मै आया"आधील मै चा उच्चार जसा मैत्रीतल्या मै सारखा न करता मय्ss असा करतात तसा.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

उच्चारावरून कधी कुणाला चिडवू नये हे अगदी खरं आहे.. आपले उच्चारही बाहेरील देशातील लोकांना कितीतरी वेगळे वाटतात.
शाळेत असताना मात्र येवढं शहाणपण नव्हतं.

पण वेगेवेगळ्या उच्चारवरून कधी कधी परिस्थितीजन्य विनोद तयार होतो हे ही तेव्हढच खर आहे.

Pages