फ्रेंडशिप डे - अनुभव आणि किस्से

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 August, 2023 - 05:35

फ्रेंडशिप डे आणि फ्लर्टींगचे नाते द्वापारयुगापासून आहे. नक्की कुठल्या वर्षाची गोष्ट हे आता आठवतही नाही. पण तेव्हा मी दक्षिण मुंबई परिसरातील मोस्ट एलिजिबल बॅचलर होतो इतके आठवते.

नुकतेच माझी कांदिवलीची पहिली नोकरी सोडून कोपरखैरणे, नवी मुंबई येथील रिलायन्स कंपनीत जॉईन झालो होतो. सिंगलच असल्याने नजरेने सतत शोध घेणे चालूच होते. कोणाचा ते कळले असेलच. पण नजरेने आपले काम केल्यावर जेव्हा पुढे तोंड उघडायची वेळ यायची तेव्हा बोंब होती. अश्यावेळी सोशल मीडिया मदतीला धावून यायचा. तिथे बोलताना माझा लाजरा न बुजरा स्वभाव आड यायचा नाही.

ऑर्कुटचा शेवटचा काळ होता तो. तरी माझी चॅटिंग आणि डेटिंग फुल्ल फॉर्मात होती. अश्यातच सालाबादाप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे आला.

तसे हे फ्रेंडशिप डे कॉलेजला असतानाही यायचे. पण तेव्हा रिबीन बांधताना मुलीच्या हाताला आपल्या बोटांचा स्पर्श झाला तरी अंगावर काटा यावे इतके लाजाळूचे झाड होतो मी..
पण आता ऑनलाईन मुलींशी बोलताना ती भीड चेपली आहे तर या दिवसाचा फायदा उचलत जिथे नवीन जॉब लागला आहे त्या नवी मुंबईत देखील काही ऑनलाईन मैत्रीणी जोडाव्यात असे ठरवले. जेणेकरून तशीच घनिष्ट मैत्री झाली तर त्या भेटायलाही येतील असे वाटले.

काही निवडक प्रोफाईल्सना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. अर्थात हे निवडक प्रोफाईल निवडण्याचा निकष हा आकर्षक प्रोफाईल फोटो ईतकाच होता हे वेगळे सांगायला नकोच. तसेच नवीन फ्रेंडस जोडताना छान छान मैत्रीणी’च हव्या होत्या कारण मित्रांची आयुष्यात कमी नव्हती.

जवळपास ४० ते ५० सुंदरींना "हॅपी फ्र्यांडशिप डे" चा मेसेज पोस्ट केल्यानंतर ३० ते ३५ निर्दयींनी सरळ इग्नोर मारले, तर १२ ते १५ अखडू मुलींनी औपचारीकता म्हणून "सेम टू यू" बोलून परतवले. पण मी देखील नेटाने किल्ला लढवत त्यांचे नाव-गाव-फळ-फूल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यात परत ८ ते १० मुली कटल्या आणि ज्या ४-५ शिल्लक उरल्या त्यांचेही त्रोटक त्रोटक रीप्लाय आले.

ज्यांचे रिप्लाय आले नाहीत त्यांच्या नशीबी आपली मैत्री नव्हतीच असा सकारात्मक अर्थ काढून उरलेल्या मुलींकडे खर्‍याखुर्‍या मैत्रीचा हात पुढे केला. त्या चार-पाच जणी आणि माझा मैत्रीचा एकच हात, किती वेळ प्रत्येकी एकेक बोट पकडून तग धरणार होत्या. त्यांचा एकेक हात निसटत गेला आणि माझ्या एकेका बोटावरील भार कमी होत गेला.

शेवटी एक आणि एकच उरली जिच्याशी माझी आयुष्यभराची अशी ट्युनिंग जमली की ती झाली माझी आजवरची सर्वात बेस्ट ऑर्कुटफ्रेंड, माझी बेस्टेस्ट बेस्ट नेटफ्रेंड आणि माझ्या खर्‍याखुर्‍या आयुष्यातील देखील माझ्या आईनंतरची माझी सर्वात सुंदर मैत्रीण Happy

...

आज इतके वर्षांनी देखील दर वर्षी फ्रेंडशिप डे च्या दिवशी आम्ही न चुकता त्या मनहूस क्षणांची आठवण काढून आपल्याच नशिबाला दोष देतो Proud
पण मग दोन गोड पोरांकडे पाहून चला इतकेही काही वाईट झाले नाही म्हणून मनाची समजूत काढतो Happy

तर, या फ्रेंडशिप डे उत्सवाने तुमच्या ही आयुष्यात असे काही किस्से घडवले असतील तर जरूर शेअर करा.

सर्व मायबोलीकर मित्र मैत्रीणीना,
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Asl please?
Age/sex/location ना?
त्या काळात नव्हतो मी..