चाफा

Submitted by स्वान्तसुखाय on 16 April, 2023 - 13:31
चाफा chafa भारतीय वृक्ष पर्यावरण

मागे वळून पाहताना , मी चाफा आधी पाहिलाय की नर्मदा आत्या ते नेमकं आठवणार नाही. कारण आई म्हणते नर्मदा आत्याने तुला पाळण्यात घातलं. आणि काकू सांगते ..असा धो धो पाऊस तुझ्या बारशात.. कसली फुले आणि कसली सजावट..आणि या गावंढ्या गावात कुठून आल्यात झिरमिळ्या आणि क्रेप पेपरच्या पट्ट्या.. मग चाफाच मदतीला आला. दत्तूने ढीगभर फुले गोळा केली आणि पाळणा सजवला. माळा, फिरकी सगळं चाफ्याचं! तेव्हापासून चाफ्याशी नातं जुळलं असावं.

ओसरगावात होतो तोवर चाफ्याचे हे दृष्टीसौख्य रोजचेच. झाडावरही तेवढीच फुलं आणि खाली जमिनीवरही तेवढीच. सकाळी उठून पायरीवर येउन बसावे तर अंगणात चाफ्याची मऊशार पखरण. नर्मदा आत्याला ही फुले झाडून लोटून टाकायला जीवावर यायचं. झाडू आणि परडी घेऊनच ती अंगणात उतरायची. अंगण छान सारवलेलं. हिरवट शेवाळी बोटांचे सरकटे उमटलेलं..जुन्या दुमजली छोट्या वाड्यासारखं घर..आजूबाजूला झाडं...समोर अंगण आणि भोवतीने कुंपण. त्याच कुंपणाला हा चाफा नेमका कोणी लावला कुणास ठाऊक. बाबा म्हणायचे त्यांच्या वडिलांनी की काकांनी, कुणी तरी कुठूनसा आणला होता आणि कुंपणाला टोचून दिला. त्याची काही कुणी खास काळजी घेतली नाही. सडा-सारवणानंतर उरलेलं पाणी त्याच्या मुळाशी कोणी फेकलं असेल तर ते तेवढंच ! पण तो आपला बिनबोभाट, बिनतक्रार वाढला. उन्हातानात ताठ उभा राहिला.. वाऱ्यापावसात भिजला.. थंडी गारठ्यात थिजला. कुंपणापाशी आहे की नाही हे न कळणारं हे झाड हळूहळू घराच्या ओटीवरनं दिसण्याइतपत उंच झालं. त्याच्यामागचा चंद्र ओटीवर खेळणाऱ्या मुलांना खुणावू लागलं. जेवणवेळेला त्याच्यावरचे काऊ चिऊ मुलांच्या ताटातला शीतभात पाहू लागले...मधल्या काही वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या..चांगल्या वाईट !…लहान मुले तरुण झाली…तरुण प्रौढ झाले…प्रौढ वयस्क आणि वयस्क पलीकडच्या प्रवासाला लागले…याच दरम्यान कधीतरी चाफा मोठा झाला असावा कारण आता त्याची फुले माडीवरच्या खिडकीतून दिसू लागली. पाडव्याच्या माळेला खास टवटवीत फुले हवी असली की दत्तू माडी चढे आणि टोकाची ताजी पांढरी फुले उतरवी. अंधार वेड्यावाकड्या पावलांनी घरात येऊ लागला की आई तुळशीपाशी दिवा लावीत असे. पण त्या अगोदरच चाफ्याने पुष्पांजली अर्पण केलेली असायची.

IMG-20230416-WA0010.jpg

अंगण झाडताना फुलांना झाडू लागू नये म्हणून नर्मदा आत्या खूप काळजी घ्यायची. जुनी कोमेजून गेलेली फुले आधी गोळा करून परत झाडाच्या मुळाशी ठेवून यायची. टवटवीत फुले परडीत. वाळली पाने आणि इतर कचरा कुंपणा बाहेर. मग पाण्याचा सडा , कडेने लावलेल्या झाडांना पाणी घालणं…सुबक छोटीशी रांगोळी..जुन्या सिनेमाच्या फ्रेम्स हळू हळू बद्दलव्यात तसे अंगणाचं रूप बदलत जायचं. रांगोळी झाली की तिच्या मध्यावर ती एक चाफ्याचं फुल ठेवी आणि मग परडीतल एक शेलकं फुल केसात माळी…पायरीवर बसून मी हा सोहळा रोज पाही.

IMG-20230416-WA0030.jpg

घरात पूजेच मोठं प्रस्थ असे.. भला मोठा शिसवी देव्हारा.. त्यात देव ओळीने मांडून ठेवलेले.. काही देवांची नावे तर अद्यापही माहित नाहीत..घंटा शंख, समई..रामरक्षा, अथर्वशीर्ष, स्तोत्र सहस्त्र आवर्तन सतत सुरू. सोमवारी शंकराला नेटक्या निर्व्यंग बेलाची सुबकशा त्रिदळं, पांढरा शुभ्र अनंत, तगर…,मंगळवारी गणपतीला जास्वंदीची लालभडक फुले नी हिरव्यागार सारख्या लांबीच्या दुर्वा…गुरुवारी दत्ताला पिवळी फुले…आणि बाळकृष्णाला निळा गर्द गोकर्ण. तुळशीच्या मंजिऱ्या.. या एवढ्या लवाजम्यात चाफ्याला कोण विचारते. पण पूजा आटोपली की नित्यनेमाने आत्या देव्हाऱ्याच्या भोवतीने चाफाच्या फुलांची आरास करी. समईच्या मंद प्रकाशात आणि धुप अगरबत्तीच्या संथ दरवळात ही फुले फारच दैवी दिसत.. माझे हात आपोआप जोडले जात..!

IMG_20200308_190949_1.jpg
देव आणि अस्तिकतेच्या माझ्या कल्पनेत आताशा पराकोटीचा बदल झाला.. मोह आणि व्यापांनी मनाला इतके पोखरले की पूजा प्रार्थना दुबळ्या होऊन गेल्या..आता त्या पूर्वीसारख्या आकाशाला भिडतील की नाही ही शंकाच आहे..पण आजही चाफ्याचे फुल पाहिले की मनाला अगरबत्तीचा सूक्ष्म गंध जाणवतो. घंटा वाजतेच हृदयात आणि मनोमन आत्मा नतमस्तक होऊन जातो. वस्तू, व्यक्ती नश्वर असतात ..काळाच्या ओघात झिजून, बदलून, संपून जातात..पण आठवणींचे तसे नाही…एखाद्या अनवट रेल्वेस्टेशन वर अचानक भेटणाऱ्या बालमित्राप्रमाणे त्या कधीही कुठेही भेटतात ! कितीही जुन्या असल्या , एखादया वेळेस नकोशा वाटल्या तरीही मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसतात. आपला त्यावर ताबा नसतो..चाफ्याचाही नसावा…!

IMG-20230416-WA0029.jpg

ओसरगावात चाफा सगळीकडे दिसे. घराच्या कुंपणाला.. शाळेच्या मागे..रस्याच्या कडेला.. पण त्याचं खास अस्तित्व देवळाच्या समोर.. तळकोकणातल्या बहुतांश जुन्या देवळांसमोर चाफा असायलाच हवा.. देवळासमोरच्या तुळशी वृंदावनासमोर किंवा दिपमाळेच्या शेजारी त्याच्याइतकाच जुना, जाणता आणि ज्येष्ठ चाफा नसेल तर चुकल्याचुकल्यासारखे वाटेल…

IMG-20230416-WA0020.jpg

गावातल्या शाळेमागचा चाफाही भरभरून फुलायचा.. गांधी, नेहरू, टिळक यांची फुलांची वैयक्तिक आवड काहीही असली तरी त्यांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांच्या फोटोवर रुळायचा..झेंडू-गोंडे फक्त दसऱ्याला फुलायचे दिवस होते ते!...ते ही फारच थोडे ..इतर वेळेला परसात असलेल्या फुलांवरच गोड मानून घ्यावे लागायचे..चाफ्याच्या फुलांचा शाळेच्या दाराला हार व्हायचा..कुणी खास पाहुणे आले तर पुष्पगुच्छ ही चाफ्याचाच! असेच कधीतरी वरच्या वर्गातल्या रेवतीने चाफ्याच्या फुलाची पाकळ्या मुडपून अंगठी करायला शिकवली होती. रेवतीला तिच्या वयाच्या मानाने बरीच पुढची समज होती. ती बऱ्याच गोष्टी सांगायची..चांगल्या की वाईट…आंबट की गोड..हे नाही सांगता यायचं..पण गोड गुदगुल्या करणाऱ्या तिच्या सुरस आणि चमत्कारिक कथा चोरून ऐकायला आवडायचं हे मात्र खरच..! हे थोडं फिक निळं साहित्य ते दिवस गडद गुलाबी करून गेलं.. दहावीच्या निरोप समारंभाला प्रशांतला चाफ्याची अंगठीं दिली. दहा बारा अंगठ्या बनल्या होत्या मनाजोगती अंगठी साधेपर्यंत! तो गोड हसला ती अंगठी पाहून..हे जीवघेणं स्मरण ओघाने आलंच मग चाफ्यासोबत..!

IMG-20230416-WA0012.jpg

चाफा मूळचा भारतीय नाही…सातासमुद्रापराच्या मेक्सिको मधून पाहुणा म्हणून येऊन तो भारतात स्थायिक झाला. इथल्या मातीत रुजला, इथल्या हवेत सजला. इथल्या संस्कृतीचा एक भाग बनून गेला. चाफा जिथे वाढेल तिथल्या सारखा होत असावा. देवळा समोरचा सात्विक, शांत आणि निर्विकार , कुंपणाशी लावलेला ताठ खंबीर आणि वाडीवरच्या छोट्या शाळेमागचा उत्साही सतत फुलणारा …प्रार्थनेला अंगणात मुले उभी राहिली कि स्वयंप्रेरणेने हलके हलके बरसणारा ! गावाच्या पूर्वेला मोठ्या कौलारू घरात मोहनकर काका काकू दोघंच राहायचे. खूप उपचार केले, देवधर्म झाले पण त्यांना अपत्य नव्हतं म्हणून झुरत असायचे. त्यांच्या कुंपणाला केवढा थोरला चाफा होता. त्याचा बुंधा जून.. पानेही मोठी मोठी गडद हिरवी नी थोराड होती .हे झाड एवढे जुने होते कि त्याच्या मोठ्या जीर्ण फांद्यांना म्हाताऱ्याच्या दाढी सारख्या लांबलांब पारंब्या होत्या पण फुले मात्र अभावानेच. कुठेतरी टोकाला एखाददुसरे. या झाडाच्या लांब लांब पारंब्यामुळे वाडीत सगळे त्याला दाढीवाला चाफा म्हणायचे ! ते एवढे थोरले झाडही मोहनकर कुटुंबासारखे दु:खाच्या ओझ्याने वाकलेले , चिंतेने पोखरलेले वाटायचे…”चाफा खंत करी..काही केल्या फुलेना” ची आठवण करून देणारे. पण केव्हा केव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही घडतात. एका चैत्रात मोहनकरांना मुलगा झाला. उतारवयात झालेले हे मुल काका काकुना चांगलेच दमवू लागले. त्याला पाय फुटले तसे ओट्यावरून पडवीत, पडवीतून अंगणात धडपडू लागले. मग सगळ्या घरालाच पाय फुटले . डबे, बरण्या, तांब्या, पेले गडगडत खाली येऊ लागले. हे बाळ दाराशी येणाऱ्याजाणाऱ्याला आवाज देऊ लागले …शेजारीही येताजाता त्याच्याशी बोबडे बोलू लागले. इतके दिवस शांत, स्तब्ध, उदास असणारे मोहनकरांचे घर गजबजून गेले आणि त्या वर्षी त्यांच्या जुन्या जीर्ण चाफ्यालाही भलताच बहर आला. जुनाट पारंब्यांचे ओझे सांभाळणाऱ्या थोराड फांद्या कोमल, सतेज, ताज्या, टवटवीत सफेद गुच्छांनी भरून गेल्या. दाटीवाटीने फुलणाऱ्या फुलाततून कळ्या पुढे येण्याची घाई करू लागल्या. हिरव्या पानांमध्ये लुडबुडू लागल्या.मोहनकरांचा वृद्ध चाफा त्या बाळलीलांनी मोहनकरांसारखाच कृतकृत्य होऊन गेला.

IMG-20230416-WA0018_0.jpg

चाफा मुळचा मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. मात्र भारतात तो घरच्यासारखा स्थायिक झाला. इथले सणसमारंभ, सुखदु:खाचा एक भाग बनून गेला. अनेक आशियाई देशात चाफ्याने आपले बस्तान बसवले आहे. तिथल्या सांस्कृतिक अधिष्ठानाचा तो अविभाज्य घटक आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या सफेद चाफ्याचे शास्त्रीय नाव प्लुमेरिया आहे. प्लुमेर या वनस्पतीशास्त्रज्ञानं या झाडासंदर्भात केलेल्या संशोधनाचा सन्मान म्हणून या झाडाचे शास्त्रीय नाव प्लुमेरिया असे ठेवण्यात आले. या झाडासंदर्भात काही लोककथाही आहेत. एका लोककथेनुसार प्लुमेर नावाच्या एका गृहस्थाला आपल्याकडे खूप धनदौलत असावी असे वाटे. त्याला सोन्याची नाणी देणारे झाड हवे होते. ज्योतिषाने त्याला असे झाड कोठे सापडेल हे सांगितले. त्याच्या सल्ल्याप्रमाणे शोध घेत घेत प्लुमेर भारतातील एका मंदिराजवळ येऊन पोचला. पौर्णिमेच्या रात्री त्याला शुभ्र सफेद व पिवळ्या छटा असणाऱ्या फुलांनी बहरलेले चाफ्याचे झाड फारच रम्य दिसले. त्याच्या मंद सुगंधाने तो मोहित झाला. जेव्हा त्याने चाफ्याच्या फांद्या हलवल्या तेव्हा त्या चमकदार फुलांचा वर्षाव त्याला सोन्याच्या नाण्याप्रमाणेच भासला.झाडावरून ओघळणारी ती दैवी फुले प्लुमेर भारावून पाहतच राहिला. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश, अथांग आकाश, चाफ्याची हलके हलके बरसणारी सौम्य, सुगंधी फुले पाहून त्याचा धन दौलतीचा , ऐहिक सुखाचा मोह पुरता विरून गेला. निसर्गाने भरभरून दिलेल्या या स्वर्गीय सुखात त्याला त्याचा आनंद सापडला.

सफेद चाफ्याचे इंग्रजी सामान्य नाम फ्रॅन्गीपानी आहे. फ्रेंच भाषेत फ़्रन्गिपनिएर हा दुधाचा एक प्रकार आहे. चाफ्याच्या खोडातून बाहेर पडणारा चिक किंवा डिंक हा या दुधासारखा दिसतो म्हणून या झाडाला फ्रॅन्गीपानी हे नाव पडले असावे. दुसऱ्या एका संदर्भानुसार मार्किस फ्रॅन्गीपानी या इटालीयन गृहस्थाने एक अत्तर तयार केले होते. हे अत्तर फार लोकप्रिय होते. नंतर जेव्हा चाफ्याच्या झाड इटलीत आणले गेले तेव्हा त्याच्या फुलाचा सुगंध लोकांना फ्रॅन्गीपानी अत्तरासारखाच वाटला म्हणून या या झाडाला फ्रॅन्गीपानी म्हटले जाऊ लागले.

IMG-20230416-WA0013.jpg

भारतात सफेद चाफा देवळासमोर लावला जातो. त्यामुळे त्याला देवचाफा हे नाव आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये चंपा किंवा चंपक ह्या नावानी चाफा ओळखला जातो. बौद्ध संस्कृतीतही सफेद चाफ्याच्या फुलांना महत्व आहे. फिलिपिन्स, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी आशियायी देशात जन्म, मृत्यू, विवाह, स्वागत अशा प्रसंगी चाफ्याच्या फुलांचा वापर करण्याची परंपरा आहे. चाफा कठीण, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चिवटपणे जिवंत राहतो. त्याच्या तुटलेल्या फांदीलाही फुले येतात. ह्या चिरंतन अस्तित्वाच्या गुणधर्मामुळे काही देशात चाफा पुनर्जन्माच्या आशेने स्मशानभूमीजवळ लावला जातो. चाफा कुठे प्रेमाचे प्रतिक आहे तर कुठे अमरत्वाचे, कुठे सात्विकतेचे तर कुठे शृंगाराचे, कुठे भक्तीचे तर कुठे मुक्तीचे ! चाफ्याला कुठलीच भावना वर्ज्य नाही !! तुम्ही ज्या अपेक्षेने त्याच्याकडे याल ते तो तुम्हाला भरभरून देतो . तुमच्या ओंजळीत पडताना चाफ्याच्या पाच पाकळ्यांची ओंजळही दातृत्वाच्या समाधानाने काठोकाठ भरून जाते. एकाद्या देवाचे लाडके फुल म्हणून त्याची ओळख नाही. वेणी, गजरा, हारात कुणी त्याला आवर्जून सामावून घेतल्याचे दिसत नाही. बाजारात, फुलवालीकडे कधीच ही फुले विक्रीला नसतात. पण तरीही जिथे दिसतील तिथे थोडा वेळ आपणाला गुंतवून ठेवतातच.

देवचाफा, म्हणजेच सफेद चाफ्याचा शुभ्र सात्विक रंग देवत्वाकडे झुकणारा. मध्यातून निघणारा पिवळा ओघ. जसा काही सफेद मंदिराचा पिवळी जर्द सोनसळी गाभारा. हलक्या तपकिरी-गुलाबी रंगाचा देठ. देवचाफ्याची कळी म्हणजे तासून तासून कोरलेला संगमरवरी कंगोरा. खोड जेवढे राखाडी, राकट, जुनाट, खडबडीत फुल तेवढेच नाजूक, कोमल, मोहक ! पाने लांबट जाड आणि गडद हिरव्या रंगाची. भारतात चाफ्याच्या झाडाला शेंगा येत नाहीत. फांदी लावून त्याची लागवड केली जाते. मात्र इतर काही आशियाई देशात या झाडाला शेंगा धरतात. औषधी गुणधर्मामुळे या झाडाला आयुर्वेदातही महत्त्व आहे. भारतात चाफ्याच्या अनेक जाती आढळतात. काही रंगरूपात साधर्म्य राखणाऱ्या तर काही पूर्णत: वेगळ्या. लालचाफा देव चाफ्यासारखाच पण लाल आणि गडद रंगाच्या मधाळ छटा असणारा. लाल चाफ्याचा सुगंधही अधिक मादक असतो. पाकळ्या रेशमी, तलम.

IMG-20230416-WA0024.jpg

सोनचाफा ही भारतीय खासियत…सुगंध चिरकाल टिकणारा. पिवळा सोनसळी रंग. ओसरगावात परबांच्या घरामागे सोनचाफ्याचे झाड होते. ही फुले फार उंचावर फुलत. काठीनेच पाडावी लागत. परबअण्णा स्वभावाने कडक होते. मनात असले तर फुले घेऊ देत नाहीतर ‘आज फुललाच नाही चाफा’ असे बिनदिक्कत खोटे सांगत. त्यांचा सोनचाफा पण तसलाच. राग मनात नी फुले पानात दडवून ठेवणारा. आई म्हणे, फाsssर सुंदर वास आहे. मला मात्र त्या फुलांच्या गंधात कोवळा तिखटपणा जाणवे…कच्चे नागकेशर, दालचिनी किंवा लवंगाला असावा तसा. हा ‘अण्णा’ इफेक्ट असावा कदाचित. परबअण्णांच्या घरात सोनचाफ्याची फुले बाटलीत भरून ठेवली होती. ओटीवरच्या लाकडी फळीवर एक जुनी सरस्वतीची मूर्ती, बाजूला कसलेतरी ग्रंथ आणि त्याच्या बाजूला ही सोनचाफ्याची बाटली, खाली आरामखुर्चीत बसलेले परब अण्णा. ही फ्रेम जशीच्या तशी आजही आठवते…मला त्या बाटलीतली फुले इतके दिवस कशी टिकून राहतात याचे फार कुतूहल वाटे. आणि नुसते पाहूनच सोनचाफ्याचा सुगंध जाणवे. वर्षामागून वर्षे गेली..त्या घरात बर्याच सुधारणा झाल्या. काळाच्या ओघात परबअण्णा गेले…ते झाड गेलं…सरस्वती गेली..ग्रंथही गेले… सोनचाफ्याच्या बाटलीच काय झालं हे विचारलं नाही..! आता तिथे कुणीही नसलं तरी अण्णांचं ‘फुललाच नाही आज’ हे उत्तर आणि पाठोपाठ सोनचाफ्याचा सूक्ष्म तिखट गंध जाणवतोच! आठवणी नुसत्या रंगीत नसतात त्या गंधितही असतात.

IMG-20230503-WA0004.jpg

अजून एक असतो - कवठी चाफा . कवठाच्या फळाला पिकल्यावर येतो तसाच गोड गुळमट वास त्याला येतो. फुल अंड्यासारखे गोल मिटलेले असते. सुगंधाच्या चढत्या क्रमबद्ध्तेत सर्वोच्च स्थान हिरव्या चाफ्याचे. या फुलाचा रंगच हिरवा असल्यामुळे ते पानात बेमालूम लपून जाते. पण त्याचा सुगंध मात्र लपवता येत नाही. फुल फुलले की तो परिमळ परिसरात दरवळू लागतो. असे म्हणतात की या वासाने मोहित होऊन साप या झाडाखाली येतात. याशिवाय पिवळा चाफा , नागचाफा, भुईचाफा याही चाफ्याच्या प्रसिद्ध जाती आहेत. भुईचाफ्याला थेट जमिनीवरच फुले येतात. फांदी, खोड वगैरे प्रकरण नाही. हलक्या जांभळ्या गुलाबी रंगाच्या नाजूक फुलांचा गंध मन मोहवुन टाकतो.

IMG-20230416-WA0021.jpg

भक्ती आणि विरक्ती, शृंगार आणि आसक्ती चे अद्वैत साधणारा हा चाफा कवींना भुरळ न घालेल तर नवलच ! कित्येक कवितांमधून ,गाण्यांमधून चाफा बरसतो . कवी बींच्या अजरामर ‘चाफा बोलेना ..चाफा चालेना’ कवितेमधून मधून तो अध्यात्म आणि परमार्थ याचे अद्वैत सुचवतो. ‘शुद्ध रसपान’ साधण्यासाठी परमात्म्याची आस धरावयास सांगतो. अखेर ते अद्वैत, ती मुक्ती सापडल्याचा आमोद, आनंद एवढा, की चाफा दिशा आटून जाव्यात एवढा फुलून येतो. लतादीदींच्या दैवी स्वरांनी चाफ्याची ती खंत..ती आस..अथांगाचा शोध..धडपड…आणि अखेरीस एकात्मस्वरूपात विलीनीकरण एकाच गाण्यात जिवंत केले आहे. बालकवींच्या “गर्द सभोंती रान साजणी, तू तर चाफेकळी !’ मधून चाफा यौवन आणि सौंदर्य प्रतीत करतो. गदिमांच्या “लपविलास तू हिरवा चाफा..सुगंध त्याचा छपेल का?” मधे चाफा हिरवा असला तरी गाण्यातल गुपीत मात्र गुलाबीच आहे. पद्मा गोळेंच्या कवितेतून त्यांचं चाफ्याशी केलेलं हितगुज वाचकालाही साद घालून जातं.
चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दुःख नाही उरलं माझ्या मनात ! असं म्हणत पद्माताई चाफ्याला पूर्वी दिलेली वचने पाळायला सांगतात.
कधी प्रिय सखा , अभिसारीका किंवा विरहिणी, कधी नतमस्तक व्हावे असा गुरु, तर कधी तारुण्य , सौंदर्य बनून चाफा कथा कवितांमध्ये आपणाला भेटतो. पण टागोरांना चाफा दिसतो तो बाल्यावास्थेताला… खोडकर मुलाच्या रूपातला..!
“Supposing I became a champa flower, …
just for fun, and grew on a branch high up that tree, …
and shook in the wind with laughter…
and danced upon the newly budded leaves,....
would you know me, mother?”
हा टागोरांच्या कवितेतल्या मुलाचा प्रश्न चाफ्याला खोड्या करायला , आईला भंडावून सोडायला भाग पाडतो. चाफ्याच फुल बनून या मुलाला काय काय करायचं आहे ? तर त्याला खळखळून हसायचं आहे..
ओलेते केस पाठीवर सोडून झाडाखालून चालणाऱ्या आईला आपल्या सुगंधान भारावून टाकायचं आहे..रामायण वाचत पहुडलेल्या आईच्या पुस्तकावर आपली इवलुशी सावली टाकून तिला सतवायचं आहे..आणि दरवेळेला तू मला ओळखशील का ग आई अस विचारायचं देखील आहे ! हे सगळ चाफाच करू जाणे ! याच धर्तीवरील कुसुमाग्रजांची ‘चाफा’ ही बालकविता प्रसिद्ध आहे.

चाफा रस्त्यावर , देवळासमोर , बागेत, कवितेत , गाण्यात जिथे भेटेल तिथे त्याच्या सावलीत बसून पायथ्याशी पडलेली पांढरी पिवळी पखरण पाहत आपण जर त्याचे एखादे फुल सहज उचलले तरी मन मंदिरात चाफा फुलून येईल. तो बोलू लागेल, चालू लागेल ..आणि मग विश्वाचे आंगण ओंजळीत यायला वेळ लागणार नाही.

IMG-20230416-WA0009.jpg

-- गौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! सुगंध इथवर आला! तुमची भाषा सुंदर आहे, सहज आणि ओघवती! खूप आवडला लेख! निर्व्यंग बेल काय शब्द वापरला आहे! कमाल!

लेख आवडलाच. प्रचि ही मस्त आहेत! लाल रंगाचा देवचाफा पहिल्यांदा. पाहिला तेव्हा फार अप्रूप वाटलं होतं.

सर्वांचे मनापासून आभार!
चाफ्याचे गारुडच एवढे होते की लेखणी, रंग आणि कॅमेरा एकदमच हातात घ्यावे लागले.

@ ज्येष्ठागौरी..
निर्व्यंग हा शब्द बिल्वपत्रांच्या बाबतीत कधीतरी ऐकला आहे. न किडलेली , त्रिदळ नेटके असणारी नाजूक बेलाची पाने, हिरव्यागार, ताज्या दुर्वा, लाल भडक जास्वंद , तुळशीच्या जांभळ्या मंजिऱ्या असे पूजेचे तबक तयार करणे हा माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे....

चाफ्याचा सुगंधी दरवळच जणू तुमच्या लिखाणाला आलाय असे वाटते. अतिशय सुंदर भाषाशैली, ओघवते आणि मनस्वी लेखन.

धन्यवाद...
@वर्षा
((पांढरा चाफा व लाल चाफा लहानपणापासून परिचयाचा ))
हो आता सुशोभीकरणासाठी हे झाडे वसाहती मध्ये लावली जातात ..पूर्वी कुंपणाला असायची.

शब्द आणि रेखाटने अगदी हातात हात घालून बागडत आहेत जणू..
खूप खूप सुंदर लेख आणि चित्रे तर अतिशय लयबद्ध.. ती बॅलेरिना कोणत्याही क्षणी हस्तमुद्रा बदलेल इतकी जीवंत चितारलीय.

बॅलेरिना कोणत्याही क्षणी हस्तमुद्रा बदलेल इतकी जीवंत चितारलीय......+१.

लेख वाचायचा आहे.वर वर चाळला.वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे चित्रे अतिशय सुरेख आहेत.

सुंदर लिहिलं आहे. चित्रं आणि फोटोही छान!
आमच्या घराच्या समोरच गावदेवीचं देऊळ आहे. एक चाफा देवळासमोर, एक आमच्या कुंपणाला, एक घराच्या मागे, असे तीन देवचाफे एका सरळ रेषेत होते. अलीकडे कुंपणाला असलेला चाफा गेला. एक सोनचाफा अंगणात आहे. कवठीचाफा परसात आहे.

गुढीसाठी हार करायला आम्हीही चाफ्याचीच फुलं वापरतो.
सोनचाफ्याच्या फुलांची बाटली आमच्या घरीही आहे Happy किंवा होती तरी.
देवचाफ्यावर फुलं नसतात तेव्हा तुकतुकीत पानंसुद्धा काय सुंदर दिसतात.
बंगलोरला मी पांढरा सोनचाफा पहिल्यांदाच बघितला. संपिगे म्हणतात त्याला. अगदी आपल्या नेहमीच्या सोनचाफ्यासारखाच, पण पूर्ण पांढरा.

छान लेख व फोटो. चाफ्याच्या सुगंधांना अगरबत्ती बिझनेस मध्ये फार मागणी असते. आमच्या बिल्डिन्ग मध्ये पण हे चाफे लॉबी लेव्हलला लावले आहेत. व बेसमेंटात फिरताना वरुन पुष्प वृष्टी होत राहते. मी एखादे रोज उचलून आणतेच. लाल गुलाबी चाफा पण सध्या फुलतो आहे.

अप्रतिम लेख, अप्रतिम चित्रे आणि फोटो.
चाफ्याच्या फुलांत किती विविधता! प्रत्येकाचा स्पर्श - रंग -गंध वेगळा. हिरवा चाफा आणि कवठी चाफा त्यातल्या त्यात स्पर्शाला दडदडीत. देव चाफा मुलायम. सोन चाफा आणि नागचाफा नाजूक. भुई चाफा तर चाफ्याच्या भावकीत कसा शिरला कोण जाणे!
पण दोन जाती मनात विशेष ठसल्या. आवडल्या. Magnolia Gradiflora आणि Magnolia Sieboldii. ह्या भव्य फुलांची तशीच भव्य आणि सुंदर आरास स्री लंकेमध्ये प्रत्येक बुद्धमंदिरात केलेली असते. हे दोन प्रकार स्री लंकेमध्ये अतिशय पवित्र आणि बुद्धप्रिय मानतात. कुठे कुठे गंगाळात ही फुले तरंगत ठेवलेली आणि त्यात नाजुकसे दिवे लावलेले. तिकडे बुध्दाच्या मूर्तीसुद्धा भव्य असतात.आणि त्यांना ही शुभ्र भव्य आरास शोभून दिसते.
असो. ह्या सुंदर चित्रलेखाला माझे ठिगळ नको.
खरंच सुंदर लेख आणि अगदी अनुरूप चित्रे, फोटो.

Pages