मी खोलीत प्रवेश केला, खोली कसली एखादे छोटे सभागृहाचं म्हणा ना ! आतमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थी बसलेले, मी आजूबाजूला एक नजर फिरवली तर खोलीत तणाव जाणवला. काही विद्यार्थी त्यांच्या नोट्सची उजळणी करत होते, इतर एकमेकांशी कुजबुजत होते; नजर सारखी त्यांच्या मनगटाकडे जात होती.
कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेआधी परीक्षाहॉ लच्या बाहेर साधारण असच चिंताग्रस्त वातावरण असतं.
मी आत जाऊन माझ्या खुर्चीत बसताच पिन ड्रॉप शांतता पसरली. होय, कारण मी त्यांच्या तोंडी परीक्षेची परीक्षक होते. सगळ्यांच्या डोळ्यांत निरनिराळ्या भावना आणि चेहऱ्यावर अनेक भाव दिसत होते त्यात अविश्वास, शंका, गोंधळ, कुतूहल, वैताग काय नव्हतं ? काहींच्या चेहऱ्यावरची नापसंती तर मला उघडपणे जाणवत होती; काही विद्यार्थी शांतपणे भुवया उंचावत, माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करत होते. पण मी मात्र एकदम शांत होते. थोडे पाणी पिऊन मी तोंडी परीक्षेला सुरूवात केली.
त्या खोलीत मी दिसायला आणि वयाने सर्वात लहान व्यक्ती होते; बावीस वर्षांची, अगदी किरकोळ देहयष्टी असलेली, कोणत्याही गर्दीत हरवून जाईल असे नगण्य व्यक्तिमत्व भासणारी मुलगी. याउलट, माझे सर्व विद्यार्थी होते पन्नाशीच्या आतबाहेर असणारे, बहुतेक माझ्या वडिलांच्या वयाचे, मोठ्या दाढी आणि मिशा असलेले प्रौढ पुरुष.
ते 2१ व्या शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांनी संगणकीकरण सुरू केले होते. आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट संगणक अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे घेणे अनिवार्य केले होते. एका बाजूला ज्यावेळी ‘तंत्रज्ञान’ हा शब्दच फारसा रुढ नव्हता त्यावेळी पूर्ण-वेळच्या नोकऱ्या, घरगुती किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि वयामुळे येणाऱ्या अडचणी सांभाळत नवीन संगणकाचे तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटणारे मध्यमवयीन स्त्री-पुरुष तर दुसरीकडे, संगणक शास्त्राचे अद्ययावत ज्ञान घेतलेली, पदवीधर, सर्व आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त जबाबदाऱ्या नसलेली, कुठलेही आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली मी.
जसजशा मुलाखती पुढे गेल्या, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले आणि अधिक सकारात्मक होऊ लागले. शंकेची जागा कुतूहलाने, अविश्वासाची जागा माफक हास्याने घेतलेली मला जाणवत होती.
आता तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगते, तेव्हा मला जरी त्यांबद्द्ल सहानभूती वाटत होती किंवा मी तस दाखवत होते तरी आत खोलवर कुठेतरी माझ्यातली खट्याळ आणि नाठाळ मुलगी त्यांच्या डोळ्यातली ती भीती, त्यांचं मनातल्या मनात सोपा प्रश्न येऊ दे म्हणून प्रार्थना करणं, कठीण प्रश्नाचं (त्यांच्यासाठी पण माझ्या दृष्टीने अगदीच सोपा )उत्तर देतानाच अडखळणं मस्त एन्जॉय करत होती.
कारण काही वर्ष त्यांच्या खुर्चीत बसल्यावरच मग मी ह्या खुर्चीत बसले होते ना !
"पोस्ट ऑफिस उघडं आहे " ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
तुमचे अल्याडचे किंवा पल्याडचे असे काही किस्से असतील तर जरूर लिहा!
** हा उतारा आधी एका "On The Other Side..." , medium.com ह्या लेखत प्रसिद्ध झाला आहे. "सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण " ह्या कल्पनेशी सम्ब्नधित उतारा त्यातून घेतला आहे.
***शीर्षकात चुकून एकविसाव्या
***शीर्षकात चुकून एकविसाव्या च्या ऐवजी विसाव्या लिहिले गेले आहे>> ते संपादित करता येते.
ते 20 व्या शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांनी संगणकीकरण सुरू केले होते. आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट संगणक अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे घेणे अनिवार्य केले होते. एका बाजूला ज्यावेळी ‘तंत्रज्ञान’ हा शब्दच फारसा रुढ नव्हता त्यावेळी पूर्ण-वेळच्या नोकऱ्या, घरगुती किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि वयामुळे येणाऱ्या अडचणी सांभाळत नवीन संगणकाचे तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटणारे मध्यमवयीन स्त्री-पुरुष तर दुसरीकडे, संगणक शास्त्राचे अद्ययावत ज्ञान घेतलेली, पदवीधर, सर्व आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त जबाबदाऱ्या नसलेली, कुठलेही आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली मी.>> इथे पण विसावे शतक आले आहे . संपाद न करता येइल का?
मी पार २८६ ३८६ पासून आत्ताच्या ए आय परेन्त काम केले आहे. त्यात स्पेस डि ग डग पॅक मॅन अश्या गेम्स अगदी काळ्या पां ढर्या स्क्रीन वर पण खेळ ल्या आहेत नॉट अॅन इशू.
वरील परिच्छेदात लिहिले आहे त्या मध्यमवयीन लोकांनी जीवनातील इतर आव्हाने चांगल्या प्रतीने झेलली ही असतील. आय टी आले नाही म्हणजे फेल्युअर काही कमी पणा असे नस्ते.
त्या काळाच्या दहा-एक वर्षे
त्या काळाच्या दहा-एक वर्षे आधीची - १९९० - एक घटना आठवली. अशाच सरकारी कार्यालयातले कर्मचारी स्वखर्चाने कोबोल शिकायला आले होते. त्या काळी लोकांना या तंत्रज्ञानची फारच धास्ती होती. आपली नोकरी, चांगलं पोस्टींग वगैरे टिकवण्यासाठी संगणकाचं जुजबी का होईना, ज्ञान असणं आवश्यक वाटायचं. गेला बाजार, साहेबाला सर्टिफिकेट दाखवलं तरी काम भागेल अशी अटकळ असायची.
तर मी स्वतः शिकत असतानाच अशा छोट्या शिक्षण संस्थांमध्ये शिकवायला सुरुवात केली होती. माझ्यासमोर आयुष्यभर लेजरमध्ये एन्ट्र्या करून आकडेमोड केलेली मंडळी होती. त्यांचा हेतू स्तुत्य असला तरी वाटचाल दूरची होती. आमची पीसीशी कुस्ती चालली होती. DOSच्या कमांड दाखवत होतो. एका भल्या गृहस्थाने अत्यंत कुतूहलानं प्रश्न विचारला, "काय हो, हे स्क्रीनवरचं हे वरती वरती कुठं जातं हो?" आजही मला या प्रश्नाचं नीट उत्तर देता आलेलं नाही.
एका भल्या गृहस्थाने अत्यंत
एका भल्या गृहस्थाने अत्यंत कुतूहलानं प्रश्न विचारला, "काय हो, हे स्क्रीनवरचं हे वरती वरती कुठं जातं हो?" >>>
DOSच्या कमांड >>>> मला कधीतरी ९०च्या दशकातील आठवतंय, कॉम्प्युटरच कुतूहल तर होतं, पण बाबा लगेच वही पेन घेऊन यायला सांगायचे, आणि त्या कमांड्स लिहून घ्यायला सांगायचे. तो काळ पांढरा स्क्रीन पण एकदम बोअर वाटायचा. कमांड लिहून घेण्यापरीस कॉम्पुटर नको अस व्हायच.
जगासोबत रहायचं म्हणून
जगासोबत रहायचं म्हणून आवश्यकता नसणारे सुद्धा खूप होते की. त्या वेळी घरी संगणक जोडता येतो याचा अभिमान वाटायचा. डीबेस, वर्डस्टार शिकलं की मोठ्ठं काम व्हायचं. जर डीबेस प्रोग्रँइंग, लॅन आलं, ऑफीस ऑटोमेशन साठी त्याचा वापर करता आला, बॉस सुद्धा प्रोत्साहन देणारा असला कि आपण जगाच्या एक पाऊल पुढे असल्याचा अभिमान वाटायचा.
पण बघता बघता डॉस गेलं, विंडोज आल्या, डीबेस जाऊन फॉक्सप्रो मग व्हिज्युअल फॉक्सप्रो आलं.. ते शिकून घेऊन बदल करेपर्यंत लॅन गेलं, आउटडेटेड झालं. ओरॅकल आलं... ऑटोकॅड जाऊन सॉलीडवर्क्स , कॅटीया आले.
मग आपलं नेहमीचं काम सोडून याच्या मागे लागणं अव्यवहार्य वाटू लागलं. इतक्यात याच क्षेत्रात पदव्या घेतलेली पिढी आली आणि सगळंच बदलत गेलं. सतत होणार्या बदलांना त्यांना सुद्धा जमवून घेताना दमछाक होत असल्याचं दिसायचं.
ज्यांना संगणकफोब्या होता त्यांचे हाल तर समजण्यासारखे होते.
***शीर्षकात चुकून एकविसाव्या
***शीर्षकात चुकून एकविसाव्या च्या ऐवजी विसाव्या लिहिले गेले आहे>> ते संपादित करता येते>> केले
वरील परिच्छेदात लिहिले आहे त्या मध्यमवयीन लोकांनी जीवनातील इतर आव्हाने चांगल्या प्रतीने झेलली ही असतील. आय टी आले नाही म्हणजे फेल्युअर काही कमी पणा असे नस्ते.>>>> अगदी
मला पुसटसं आठवतंय त्याप्रमाणे तेव्हा बहुदा त्यांच्या नोकऱ्या, बढत्या ह्या ही प्रशिक्षण , सर्टिफिकेट मिळविण्यावर अवलंबून होत्या. महाराष्ट्र शासनाने तेव्हा काहीतरी MSCIT (नक्की आठवत नाहीये ) कोर्सेस काढले होते वाटत.
त्यावेळचे बँक कर्मचारी किंवा LIC मधले लोकं ह्याविषयी जास्त माहिती देऊ शकतील.
मीसुद्धा अमांच्या बशीत
मीसुद्धा अमांच्या बशीत (बसमध्ये) . विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकाला सुरुवात होण्याआधी २८६ ,३८६ कॉम्प्युटर वापरलेत. DOS . floppy disc, dot matrix printer . माउस नसे. वर्ड, एक्सेल , फॉक्सप्रो यांचे तेव्हाचे जे कोण आईबाबा असतील ते. . हे सगळं ऑफिस जॉइन केल्यावर काहीच दिवसांत ऑन द जॉब शिकलो. आमच्या नंतरच्या बॅचला ऑफिसने एक आठवड्याचं कॉम्प्युटर ट्रेनिंग दिलं. ते घेऊन आलेल्या एका सहकार्याने Erase *.* अशी कमांड दिली . Are you sure? Yes. मग एक आठवडाभर बॅकप किती लेटेस्ट आहे ते बघून डेटा पुन्हा क्रिअट करावा लागला.
त्यावेळी बँकांची लेजर्स, पासबुक हाताने लिहिलेली असत. स्टेट बँकेत स्टेटमेंट्स टाइप करीत किंवा त्याचं वेगळं काहीतरी मशीन असावं. बँकांचं संगणकीकरण होताना पाहिलं.
मग युनिक्समध्ये काम करायचीही वेळ आली. मोजक्या कमांड्स शिकून घेऊन काम होत होतं. हे काम सर्व्हरवर होत असे आणि बॅक अप टेप्सवर घेत असू. पुढे ऑफिसने अॅप्टेकमध्ये याचा एक आठवड्याचा सर्टिफिकेट कोर्स करवला.
स्वतःच शिकून फॉक्स्प्रो मध्ये प्रोग्रामही लिहिले.
Y2K ची भीती स्कायलॅब पडण्याच्या भीतीपेक्षा जास्त होती.
भारतात म्युच्यल फंडसमध्ये सॅप पहिल्यांदा आमच्याकडे आलं आणि आमची ब्रँच पायलट ब्रँच होती. त्यामुळे त्याचं ट्रेनिंग कम टेस्टिंग केलं.
त्यावेळी एक सिनियर मॅडम आमच्याबरोबर होत्या. त्या आता मी यात कशी जाऊ असं विचारायच्या.
त्या वेळी घरी संगणक जोडता
त्या वेळी घरी संगणक जोडता येतो याचा अभिमान वाटायचा.>>> खर आहे
सतत होणार्या बदलांना त्यांना सुद्धा जमवून घेताना दमछाक होत असल्याचं दिसायचं.>>खरं आहे जनरली त्यांना सतत शिकत राहावं लागत.
माउस नसे. >>> माउस नसलेला
माउस नसे. >>> माउस नसलेला कॉम्पुटर नाही बघितला कधी
आमच्या नंतरच्या बॅचला ऑफिसने एक आठवड्याचं कॉम्प्युटर ट्रेनिंग दिलं. ते घेऊन आलेल्या एका सहकार्याने Erase *.* अशी कमांड दिली . Are you sure? Yes. >>>
भरत तुम्ही संगणक प्रवास एकदम छान सांगितलात.
मायक्रोप्रोसेसर 8080 आणि
मायक्रोप्रोसेसर 8080 आणि संगणक मी पण २८६ पासुन वापरले आहेत. संगणक बंद करण्यापूर्वी पार्क कमांड देऊन संगणकाचे हेड पार्क करावे लागे.
तेव्हा बेसिक, फोर्ट्रान, पास्कल, कोबोल आणि सी शिकावे लागे.
एक मेहनतीने लिहलेला प्रोग्रॅम सव्वापाच इंची फ्लॉपीवर होता. हॉस्टेलला जात असताना वहीतुन निसटून फ्लॉपी रस्त्यावरील पाण्यात पडली. लगेच उचलली रुमालाने पाणी हलकेच टिपून घेतले. परत लॅब मध्ये जाऊन चेक केली रीड होई ना.
मग हॉस्टेल रूम वर फ्लॉपीचे वरचे कव्हर उचकटून काढले आणि आतली डिस्क तेवढी अलगद गादीवर ठेवून दोन्ही बाजू पंख्या खाली अर्धा अर्धा तास वाळवून घेतल्या. कव्हरही कपड्याने पुसून वाळवून घेतले. दुसऱ्या दिवशी डिस्कवर कव्हर बसवुन गेलो आणि रीड झाली. लगेच त्यावरील फाईल्स नव्या फ्लॉपीवर कॉपी करून घेतल्या.
पण ती पाण्यात पडलेली फ्लॉपी नंतरही व्यवस्थित चालली.
तेव्हा आमच्या कॉलेज मधील संगणकांमध्ये असलेला सर्वात प्रसिद्ध गेम होता पॅराट्रूपर्स. एक सर होते ते गेम खेळल्याने कॉम्प्युटर मध्ये व्हायरस येतो असे सांगायचे त्याचे हसू यायचे, काय बालवाडीतले मुलं समजतात काय आपल्याला म्हणुन.
मलापण दहावीनंतर Aptech मध्ये
मलापण दहावीनंतर Aptech मध्ये केलेला महिनाभराचा प्रॉडिजी हा कोर्स आठवतोय..... संगणक कसा वापरायचा याची दहाबारा गुळगुळीत पुस्तके दिली होती त्याचे पण किती आकर्षण
संगणक खऱ्या अर्थाने अगदी जवळून हाताळला तो त्या कोर्समध्ये!! मज्जा नुसती
@मानव पॅराट्रूपर्स आणि
@मानव पॅराट्रूपर्स आणि प्रिन्स हे माझे आवडते गेम होते. अजूनही खेळायला आवडतील. कॉलेजला असताना fortran शिकत होतो. त्यावेळी लॅबमध्ये कॉप्युटर मिळाला की हे खेळायचो. एकदोनदा प्रोफेसरांनी पकडले पण होते पण ते स्वतःच हे खेळायचे त्यामुळे आम्हाला काही जास्त बोलायचे नाहीत. तेवढ्यापुरते ओरडायचे. त्याकाळी म्हणजे १९९४ ला हे प्रोफेसर कॉप्युटर गेम ही एक मोठी इंडस्ट्री होणार असे सारखे म्हणायचे. त्यावेळी पटले नाही पण ४-५ वर्षात हे खरे झाले.
१९६५ ला एका मेकॅनिकल कंपनीत नोकरीला लागलो. कंपनीत संगणक फारच कमी होते. मी R&D असल्याने डिझाईनसाठी संगणक असायचे. तिथल्या बर्याच लोकांपेक्षा मला थोडेफार जास्त समजत असल्याने माझा भाव नवीन असूनही वधारला होता. त्यावेळी windows 3.1 होते व आमच्या कडे काम करणारे draftsman त्यात त्याकाळातले गेम खेळायचे. तेव्हा नुकताच आम्हाला alt+tab चा शोध व बरोबर कसे वापरायचे हे समजले असल्याने कोणी वरीष्ठ आल्यावर alt+tab करून कामाची खिडकी उघडायचो. एकदा एका draftsman मुळे गंमत झाली होती. त्याच्या मागे काही काच असल्याने त्याच्या संगणकाचे प्रतिबिंब त्यात पडायचे. बॉसला तो काहीतरी खेळतो हे दिसायचे पण जवळ गेल्यावर कशी काय कामाची खिडकी चालू असते हे कळायचे नाही. पण प्रतिबिंबात त्याला गेम खेळताना दिसते हे बॉसने सांगितले नाही. एकदा दोन-चार वेळा मागे पुढे ये जा केल्यावर बॉसला alt+tab ची गोष्ट लक्षात आली व त्या प्रतिबिंबामुळे आमचे बिंग फुटले.
१९९७ ते २०१६
१९९७ ते २०१६
संगणक प्रशिक्षक अर्थात Core Faculty IT
286, 386 , wordstar, lotus 123, dbase, foxpro, ते PLSQL, Oracle D2k, Idea(Interactive Data Extraction & Analysis) SAP, hardware n networking, Novell Networking असे सगळे झाले....
मग CISA ( Certfied information Systems Auditor, ISCA international मधून) केले..
Information systems Audit शिकवले.
काही CA students, MBA student, College students आणि Indian Audit Department staff, Bank Managers असे विद्यार्थी असत.
Introductory training मध्ये post office उघडं आहेत दाखवलेली धमाल उडायची. File गायब होणं, माऊस घाबरत पकडणं हे सगळे प्रकार व्हायचे...
Programing मध्ये infinite looping, hardware मधे प्रोसेसर उडाला , Improper user rights , Analysis मध्ये हवा तो डेटा न मिळणं असले किरकोळ प्रकार होत. परीक्षेत file सेव न होणं...
विद्यार्थी जसा तसा अनुभव...
एक मेंटेनन्स संबंधित अनुभव....
एका प्रतिथयश कंपनीचं मल्टीपल हार्ड डिस्कचं server .... Oracle D2k installation ठरलेल्या मुदतीत झालं नाही. कारण हार्डवेअर समस्या. बॅंक गॅंरटी inhoke करायला लिहिले. बॅंक म्हणाली क्लायंटला विचारतो. दम भरला . बॅंक गॅरंटीचे पैसे घेतले आणि जुन्या server च्या बदल्यात नवा server पैसे न देता मिळाला.
फारच छान विषय. तुमचा तो अनुभव
फारच छान विषय. तुमचा तो अनुभव अर्धाच लिहिलात असं वाटलं. अजून विस्ताराने वाचायला आवडलं असतं.
मला आय टी चा अनुभव नाही, पण आम्हा आयटीआयवाल्यांना नवीन संगणकीय प्रणालींचंही ज्ञान असायला पाहिजे असा विचार आमच्या एका दूरदर्शी मुकादमाने केला आणि आम्हाला ऑटोकॅडची शिकवणी लावली, तो प्रसंग आठवला. शिकवणीत पहिल्या दिवशी आम्हाला त्या सॉफ्टवेअरची सवय व्हावी म्हणून बाईंनी रेषा काढणे, वर्तुळ काढणे इत्यादी गोष्टी दाखवून आजच्या दिवस तुम्हाला काय पाहिजे ते रेखाटा असं सांगितलं. त्यात कुठल्याही आयकॉनवर माऊस हॉवर केला तर ते बटण कसलं आहे ते नाव पॉप अप होत असे. आम्ही आपलं गीच्मिड चित्रे काढत बसलो. आमच्या एका दोस्ताने त्यात एका फटाक्याच्यासारख्या दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक केलं. ते करताना 'explode' असं पॉप अप झालं. ह्याला वाटलं की आता हा संगणक स्फोट होऊन फुटणार. त्याने क्षणात धावत जाऊन पूर्ण वर्गाचा मेन स्विच ऑफ करून टाकला. बाईंनी डोक्याला हात लावला आणि आम्हाला त्याला अनेक वर्षे वेड्यात काढायला विषय मिळाला.
डेस्कटॉपवर असलेली एक फाईल
डेस्कटॉपवर असलेली एक फाईल मित्राला देण्याच्या उद्देशाने, फ्लॉपी हाताशी नसल्यामुळे, एक जण मॉनिटर उचलून घेऊन आला होता - हा ही एक असाच किस्सा.
मस्तच किस्से आहेत. मी लाइफ
मस्तच किस्से आहेत. मी लाइफ लाँग स्पेस व पॅक मॅन फॅन. त्या शिवाय त्याका ळा त जसे इंटर्नेट आले तेव्हा खूप फ्रेश वातावरण होते. ऑर्कुट मी बघितले नाही. पण मेसेंजर, याहू चाट स्काइप वर भरपूर धमाल केलेली. एका बाजूला काम करत स्टंबल अपॉन करत बसे. खूप छान साइट सापडत. वाय टु के नंतर जेव्हा क्रॅश झाला तेव्हा अनेक कंपन्या डुबल्या. फ*ड कंपनी नावाची साइट होती त्यावर प्रत्येक कंपनी चालवताना व बंदपडताना काय घपले झाल्ते ते मस्त पैकी लिहि त. इंटरनेट ह्युमर नावाचा एक खास प्रकार सापडला व फार मजेशी र वाटला. २००८ मध्ये गौरी देशपांडे बद्दल सर्च करताना माबो सापडली. रेस्ट इज हिस्टरी. माबो वर एक जुना पाली संबंधात विनोदी लेख होता तो फार भारी होता ,तसेच अनेक किस्से होते त्यात भरपूर मेकप कमी कपडे वाली एक बाई बद्दल काहीतरी मजेशीर होते. त्याचा शॉर्ट फॉर्म भ मे क क असा खास माबो स्टाइल होता.
१९९६ - ९७ मध्ये मी घरी सिस्टिम हवी म्हणून हप्त्याने घेतली होती. तेव्हा तेच पैसे एसी घेतला अस्ता तर जास्त उपयोगी पडले असते असे नंतर वाटले. थोडे कॉपीराइटिन्ग चे फ्रीला न्स काम ही मिळाले.
कलर मॉनिटर आल्या वर तर मला हर्ष वायूच झाला होता. सीडी घालून सिनेमे बघायचे गेम्स खेळायचे वॉव काय फन. रिकॉइल माझी फेवरिट गेम तर इतकी खेळली की फायनल लेव्हलला पोहोचे परेन्त सीडीच क्रॅक झाली. अब वो अगले जनम पे गया.
लेकीला लहान पणी खूप सीडी घेतलेल्या शैक्षणिक व करमणुकीसाठी. नवर्याची बोलणी खाल्ली. ती थोडी मोठी झाल्यावर पूर्ण अॅपल इकोसिस्टिम मध्ये वाढली. आयफोन टॅब व मॅक.
Dos commands
Dos commands
जसे Deltree, Del, Copy, Move बरेच काम वाढवायचे
Config sys, io.sys files delete करायचे...
Windows sys file delete केल्यावर ११ फ्लाॉपी सेट लागायचा win3.1 install करायला.
Attrib ने Attributes change करायचे. Hidden aatribute केले की file गायब.
Ctrl+Z .... undo ला पोरं आंडूपांडू म्हणत.
जो दुस-याला मदत करायला पुढे त्याला F1 म्हणत कारण F1 ही हेल्प की ...
Programing मध्ये set Bell on, set Bell off , set talk on, set talk off पटकन लक्षात राहयचं. कुणाला गप्प करायचं तर set talk off म्हणायचं. Veriable names मधे धमाल नावं...
Dos prompt बदलणे असले प्रकार नवशिक्याला घाबरून टाकत.
बॅंकात एखादा कर्मचारी दुस-या शाखेत गेला तरी त्याच्या पासवर्डने आधीच्या शाखेत काम चालायचे.
मस्त किस्से.
मस्त किस्से.
आय.टी.क्षेत्राला वलय प्राप्त होण्यापूर्वीच्या दिवसांतली मी आय.टी.वाली.
कॉम्प्युटर सायन्सचं पदवी शिक्षण घेतेय असं कळलं की घरीदारी सगळ्यांच्या चेहर्यांवर जे विस्मयकारक भाव उमटायचे त्याची मजा वाटायची. आपण काहीतरी 'पेश्शल' करतोय असं फीलिंग यायचं.
पास्कल, कोबोल, सी प्रोग्रामिंग, लोटस १-२-३, त्यातले मॅक्रोज - हे करायला मजा यायची. पास्कलमध्ये जुजबी बिगिनर्स ग्राफिक्स पण शिकलो होतो. एट क्वीन्स प्रॉब्लेम, टॉवर्स ऑफ हनोइ - हे हाइप्ड प्रोग्राम्स होते तेव्हा.
रिकर्शन, अॅरेज, क्यूज, लिफो, फिफो - याची थिअरी फार किचकट वाटायची.
डॉस आणि थोडंफार युनिक्स- त्यावर अकाउंट नेम, पासवर्ड या गोष्टी पहिल्यांदा वापरल्या होत्या.
काळे-पांढरे स्क्रीन्स, छोटे कीबोर्ड.
कॉम्प्युटर 'लॅब', तिथे चपला बाहेर काढून ठेवायच्या, एसी कम्पल्सरी.
बूट फ्लॉपी टाकून कॉम्प्युटर सुरू करावा लागायचा. एकदा मी आणि माझ्या पार्टनरने त्यावरची कमांड डॉट कॉम फाइल ओपन केली. काही न कळल्याने बंद केली. पुढच्या वेळी त्या फ्लॉपीने कॉम्प सुरू होईना. तेव्हा इन्स्ट्रक्टरने झापलं.
कॉलेज संपल्यानंतर काही महिन्यांनी एका कामासाठी पुन्हा कॉम्प.लॅबमध्ये गेले असताना तिथे एच.ओ.डी.च्या केबिनमध्ये कलर मॉनिटर आला होता. तेव्हा फार अचंब्याने त्याकडे पाहिल्याचं आठवतंय.
नंतर २ वर्षं एक छोटी नोकरी केली. सॉफ्टवेअर डेवलपमेंट, लहान लहान टेलरमेड पॅकेजेस, फाइल मॅनेजमेंट सिस्टीम्स, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम्स, हेच मुख्य काम होतं.
तिथल्या बॉसचं मायक्रोफोकस कोबोलवर प्रेम होतं. हजार-दोन हजार ओळींचे प्रोग्राम्स लिहायचो, ते तेव्हा भारी वाटायचं. (त्यात फार काही मैदान मारणं नव्हतं. कोबोलमध्ये नमनालाच घडाभर तेल ओतावं लागतं.)
तिथेच डीबेस३, डीबेस३+, वर्डस्टारशी ओळख झाली. Ctrl-KB, Ctrl-KC, Ctrl-KV हे तेव्हाचे कॉपी-पेस्ट.
त्या ऑफिसमध्येही मोनोक्रोम मॉनिटरच होते. माऊस नव्हते. पण ३८६, ४८६ प्रोसेसर्स आले होते. त्यांचा स्पीड तेव्हा जबरदस्त वाटायचा.
रिपोर्ट जनरेशनचा प्रोग्राम लिहिताना डॉट मॅट्रिक्स प्रिंटरच्या पेपर सेटिंगप्रमाणे एक-एक कॅरेक्टर मोजत कॉलम डिझाइन वगैरे करायचो. आडवा पेपर म्हणजे एका ओळीत १३२ कॅरेक्टर्स, उभ्या पेपरचा (ए-४ साइझ) आकडा आठवत नाही.
तेव्हाचं प्रोग्रामिंग पुढे कोडिंग झालं.
त्यानंतर तब्बल १० वर्षांनी परत एकदा कॉम्प्युटर समोर आला. तेव्हा डॉस भूतकाळात गेलं होतं. विंडोज, कलर मॉनिटर, मोठे कीबोर्ड, डायल-अप इंटरनेट - सगळंच अनोळखी. परत एकदा अचंबा!
झकास धागा !
झकास धागा !
अनेकांचं स्मरणरंजन होतंय एका वेगळ्याच विषयावर.
जय हो !
अरे वा! स्टंबलअपॉन चा मी पण
अरे वा! स्टंबलअपॉन चा मी पण फॅन होतो. त्याचं फायरफॉक्स प्लगइनपण होतं मला वाटतं
१९९७-९८ ला पहिला कॉम्प्युटर वापरलेला. तो पेंटिअम होता. व्हिएसएनएलचं डायल-अप कनेक्शन होतं ते घ्यायला ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायला लागे की काय असं पुसटसं आठवतं. टेक्स्ट बेस्ड इ-मेल क्लाएंट वापरायचो तेव्हा. पाईन मला वाटतं.
याहू, अल्टाव्हिस्टा ही सर्च इंजिन. मग दोन-तीन वर्षांनी गूगल अवतरलं.
हे इव्होल्युशन प्रत्यक्ष बघितल्याची आज फार मौज वाटते. आपल्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीच्या हातात एकदम इव्हॉल्व्ड इंटरनेट पडलं त्यामुळे त्या दोन्ही पिढ्यांत अनुक्रमे इंटरनेट एटिकेट्स आणि त्याची किंमत नाही असा एक प्रौढ विचार ही सारखा मागे झटकुट टाकावा लागतो.
दुकानदारांना माझे Foxpro
दुकानदारांना माझे Foxpro पॅकेज व मित्राचा एक पीसी असे बंडल विकत असू. एका दुकानदाराला पटवून देत होतो की बघा अमचा काँप्युटर कुणाकडे किती उधारी आहे, गेल्या महिन्यात किती दूध विकले, गेल्या वर्षात किती? अशा प्रश्नांची पटकन उत्तरे देतो, तुमच्या मुनिम ला जमेल का हे ? तर तो दुकानदारा म्हणाला ते राहु द्या हो, पण आमचा मुनीम दोन चहा सांग रे असे सांगताच पटकन शेजारच्या हॉटेल मध्ये जाऊन चहा सांगू न येतो, कोंप्युटर हे करेल ?
किती वर्षांनी फ्लॉपी, पास्कल,
किती वर्षांनी फ्लॉपी, पास्कल, कोबोल वगैरे शब्द कानावर पडतायत!
मी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये मास्टर्स केली तेव्हा आमच्या 'लॅब'मध्ये युनिक्स बॉक्स आणि डम्ब टर्मिनल्स होती. दोन की तीनच विन्डो पीसी होते. अगदी हॅन्डफुल लोकांकडेच घरी स्वतःची मशीन्स होती. ग्रूप प्रोजेक्टसाठी ती मशीन्स वापरायला नंबर लावावा लागत असे. आमचा ग्रूप प्रोजेक्ट (डीबेसवर केला होता असं आठवतंय) करण्यासाठी आम्ही माझ्या चुलतभावाच्या ऑफिसमधला पीसी वापरला होता आणि त्या'बदल्या'त त्यांची इन्व्हेन्टरी सिस्टीम सेटअप करून दिली होती - अर्न अॅन्ड लर्नची अशीही सुरुवात.
मात्र त्या लॅबमुळे शेल स्क्रिप्टिंग, ऑक, ग्रेप, व्हीआय एडिटर वगैरेवर भारी कमान्ड आली, जिचा अजून उपयोग होतो.
पुस्तकं मोठाली आणि महाग असायची त्यामुळे कॉलेजजवळच्या झेरॉक्सवाल्याचा धंदा तेजीत होता.
लाइन प्रिंटर्स होते तेव्हा - दोन्ही बाजूंना पंच केलेले ते मोठेमोठे लाइन्ड कागद. त्याच्या वापरावर एचोडीची नजर असायची.
मात्र त्या लॅबमुळे शेल
मात्र त्या लॅबमुळे शेल स्क्रिप्टिंग, ऑक, ग्रेप, व्हीआय एडिटर वगैरेवर भारी कमान्ड आली, जिचा अजून उपयोग होतो. >> एकदम! कितीही भारी आयडीई आल्या तरी व्हिमला एस्केप नाही. अजुनही तोच एडिटर आवडतो आणि वापरला जातो. नव्या पोरांना मॅजिक दाखवायला पण उपयोगी पडतो
किती वर्षांनी फ्लॉपी, पास्कल,
किती वर्षांनी फ्लॉपी, पास्कल, कोबोल वगैरे शब्द कानावर पडतायत! >+ १
मी कॉलेजात असताना फक्त डॉस आणि युनिक्स होते. पुण्यात गुरुवारी लाईट जात त्यामुळे त्या दिवशी प्रॅक्टिकल्स नसत. लॅब बाहेर चपला आणि एसीत थंडी वाजते म्हणून स्वेटर. आख्ख्या वर्गासाठी पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपीज ऑर्डर करणे चाले. डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचे पाठकोरे कागद (रद्दी) किलोच्या भावाने विकत मिळत. ते आम्ही मॅथ, स्टॅट च्या सरावासाठी वापरत असू.
>>उभ्या पेपरचा (ए-४ साइझ)
>>उभ्या पेपरचा (ए-४ साइझ) आकडा आठवत नाही.<<
७२-८०. हा पेपर (इझि-रीड) बहुतेकदा सिंपल लिस्टिंग करता वापरला जायचा. खरी कसरत प्रिप्रिंटेड स्टेशनरी (चेक्स, डिविडंट वारंट्स इ.) वर प्रिंट करताना लागायची...
तो पेपर दोन लेयरचा मध्ये
तो पेपर दोन लेयरचा मध्ये कार्बन असा पण असायचा/अजूनही मिळतो.
एका प्रिंट मध्ये दोन कॉपीज.
आणि बँकेचे चेक्स वगैरे साठी मागल्या बाजूला मिरर प्रिंट येण्यास उलट कार्बन शीट लावलेला पण यायचा.
मेडप्लस फार्मसी वाले गेल्या वर्षा पर्यन्त डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरायचे.
एट क्वीन्स प्रॉब्लेम, टॉवर्स
एट क्वीन्स प्रॉब्लेम, टॉवर्स ऑफ हनोइ - हे हाइप्ड प्रोग्राम्स होते तेव्हा.
रिकर्शन, अॅरेज, क्यूज, लिफो, फिफो - याची थिअरी फार किचकट वाटायची. >> हे आठवले. चपला काढणे पण आठवतेय. नॉर्टन टूल्स नि पीसी टूल्स असणे हॅकिंङ ची परमावधी असायची. एकदा कुठला तरी बूट सेक्टर व्हायरस एका पीसीवर आल्यावर पीसीटूल्स मधे बूट सेक्टर उघडून दुसर्या सारख्या पिसीवर तेच बघून बीट बाय बीट टाईप करून टाईप करून मग फ्लॉपी मधून बूट करून स्कॅन करून बूट सेक्टर क्लीन केला होता. डॉस व चा केळॅ फेकणारा गोरिला नि स्नेक आठवत नाही का कोणाला ?
पास्कल, कोबोल , Foxpro नव्हत
पास्कल, कोबोल , Foxpro नव्हत केला कधी. वाचयला मजा येतेय.
लॅब बाहेर चपला>>> क्लासिक
पण आमचा मुनीम दोन चहा सांग रे असे सांगताच पटकन शेजारच्या हॉटेल मध्ये जाऊन चहा सांगू न येतो, कोंप्युटर हे करेल ?>>>>
झेरॉक्सवाल्याचा धंदा तेजीत >>> २५ पैसे पान वाल्या रॉकेल च्या झेरॉक्स
थोडे दिवसांनी ती शाई उडायला लागायची . त्याच्यावरून पण एक किस्सा आहे
दिवाळीत prep लिव्ह असायची. एक भाऊ म्हणे तू कालपासून कोरे कागद काय वाचत बसलीये.
त्याला जवळ नेऊन दाखवलं कि त्या नोट्स च्या झेरॉक्स होत्या ... इतक्या पुसट
२००० च्या नंतर बरेच सायबर कॅफे ही आले. ती पण एक वेगळीच मजा होती.
मी पण 10 वी नंतर सुट्टीत
मी पण 10 वी नंतर सुट्टीत फॉक्सप्रो आणि डिबेस3 शिकले आहे,क्वेरी साधारण ओरॅकल sql सारख्याच आहेत.त्यावेळी आमच्यातली जरा यो मुलं सी आणि सी ++ प्रोग्रामिंग शिकायची.आता पब्लिक डाटा सायन्स आणि पायथॉन शिकतं तसं.
आम्हांला कॉलेजात एक वर्ष
आम्हांला कॉलेजात एक वर्ष कॉम्प्युटर सायन्स होतं. बहुतेक आमचीच पहिली बॅच होती. मेठ्स स्टॅट्स्च्या प्रोफेसर्सनी शिकवलं. हार्डवेअरची ओळख, बायनरी, फ्लोचार्ट, बेसिक, कोबोल.
तळमजल्यावर एका कोपर्यात कॉम्प्युटर रूम होती. तिथे जाऊन सगळ्यांना कॉम्प्युटर पाहता आला. आणि कीबोर्डवर एकेक ओळ टाइप करायला दिली. एंटर मारायला दिलं होतं का आठवत नाही.
फॉक्स्प्रो इन्स्टॉल करायला १.४४ फ्लॉपी डिस्कचा एक सेट होता.
एकदा आमच्या ऑफिसच्या कॉम्प्समध्ये व्हायरस शिरले होते. फॉर्मेट करण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा सगळ्या पीसीजचा बॅक अप घ्यावा लागला. पीसी फॉर्मॅट करू़न सुरू केला रे केला की लॅनमार्फत व्हायरस घुसत असे. शेवटी सगळे इन्फेक्टेड पीसी लॅन मधून काढून क्लीन केल्यावर मग लॅनला जोडले.
एका व्हायरसचं नाव चंगूमंगू होतं. ते कळा यच्या कितीतरी आधीच आम्ही हे नाव आमच्या सेक्शनच्या ऑफिसर द्वयीला ठेवलं होतं. ते व्हायरसचं नाव आहे हे कळल्यावर आणखीनच मजा वाटली होती.
एंटर मारायला दिलं होतं का
एंटर मारायला दिलं होतं का आठवत नाही. >>>
Pages