काल गप्पांच्या पानावर झालेल्या एका चर्चेत संत ज्ञानेश्वरांच्या 'पांडुरंगकांती' अभंगाचा विषय निघाला होता, त्यावरून हे स्फुट लिहिण्याचं धाडस करत आहे.
चंद्राते आंगवणे | भोगुनि चकोर शाहाणे | परि फांवे जैसे चांदणे | भलतयाही ||
तैसे अध्यात्मशास्त्री इये | अंतरंगचि अधिकारिये | परि लोकु वाक्चातुर्ये | होइल सुखिया ||
(जसा अंगभूत गुणांमुळे चकोर चंद्राचा उपभोग घेऊन शहाणा ठरतो, पण चांदण्याचा आस्वाद कोणालाही घेता येतो, तद्वतच अंतर्मुख होऊ शकलेले लोक या ग्रंथातील अध्यात्मशास्त्राचे अधिकारी असले, तरी यातील वाग्विलासाचा आनंद कोणीही घेऊ शकतो!)
असं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे.
अध्यात्म हा माझा विषय नाही, माझी उडी 'वाक्चातुर्ये सुखिया' होण्याइतकीच आहे. तेव्हा काव्य म्हणून त्यातलं जितकं माझ्या आवाक्यात आलं तितक्याबद्दल लिहायचा प्रयत्न करते. आज 'जागतिक काव्यदिन' आहे हा एक सुखद योगायोग!
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचां डोळां पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥
सगुणाच्या प्रेमात पडण्यापासून निर्गुणाचा वेधू लागण्यापर्यंतचा प्रवास या अभंगात दिसतो मला.
पांडुरंग हे कर्नाटकातून आलेलं सगुण दैवत वारकरी सांप्रदायाने विष्णूचं रूप म्हणून स्वीकारलं. संसारात राहून सन्मार्गावर चालत राहण्याच्या प्रयत्नात हा 'बाप रखुमादेवीवरू' त्यांना सोयरा वाटला. ज्ञानोबांनीही त्याचा वसा घेतला आणि मधुराभक्तीरसात विराण्या, अभंग लिहिले.
त्यांचा कानडाविठ्ठलु कसा आहे? सांवळा सुंदरु आहे, त्याने कांसे पितांबरु परिधान केलेला आहे, तो लावण्यमनोहरु आहे. त्याची कांती इतकी दिव्य झळाळती आहे की डोळे दिपावेत, ती दीप्ती दृष्टीत सामावू नये, तहान भागू नये आणि पुनःपुन्हा त्याला पाहण्याची आस लागावी. तो खुणावतो आहे, जवळ बोलावतो आहे अशी कल्पना पल्लवित होत राहावी.
पण मग इतका जिवलग आहे, तर आपण त्याची आळवणी केली तर तो त्याला प्रत्युत्तर का बरं देत नाही (आळविता न-देई सादु)? की हे रूप, ही दीप्ती, हीदेखील वोखटी मोहमायाच आहे? या रूपाची खोळ बुंथी (अवगुंठन) पांघरून लपला आहे तो कोण आहे मग? त्याच्या ओढीचे धागे मनाचिये गुंती कसे गुंतियेले गेले? सतत माझ्या नेणिवेत त्याच्याशीच संवाद सुरू राहतो तो का? आणि संवाद तरी कसा? ये हृदयींचे ते हृदयी! त्याला शब्दांच्या माध्यमाची आवश्यकता नाही, आणि तो शब्दबद्ध करता येणं शक्यही नाही. शब्देविण संवादु! परावाणीच्या* पुढे हा संवाद जात नाही, वैखरी तो उच्चारू शकत नाही.
भक्तीभावाने त्याच्या पाया पडू गेलं, तर पावलंच सापडत नाहीत. जो स्वयंभू आहे, तो भूमीतलावर, विटेवर कशाला पाऊल टेकवेल? मुळात त्याचं पाऊल म्हणजेतरी काय? जो सार्या चराचरात भरून आहे, त्याला चेहरामोहरा, पाठपोट असणार आहे का? त्याला प्रेमभराने क्षेम** (आलिंगन) देईन म्हणावं तर कवेत काहीच येत नाही! मी एकटीच इथे ठक (थक्क/स्तंभित) होऊन उभी आहे!
संवाद साधला तर तो माझा माझ्याशीच घडावा, आलिंगन द्यावं तर बाहू माझ्याचभोवती वेढले जावेत, म्हणजे मी आणि तो निराळे नाहीतच का? मीच व्यष्टी, मीच समष्टी? मीच थेंब, मीच महासागर? मी तोच आणि तो मीच? अहम् ब्रह्मास्मि?!!
विटेवरच्या मूर्तीला सोयरा समजण्यापासून निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार आपल्याच अंतरात होण्याचा हा सुरस अनुभव! रूप ही माया, ते रूप पाहणारे डोळे (ज्ञानेंद्रियं) ही माया, ते जाणणारे मनबुद्धी ही माया, मी-तो, आत-बाहेर हे द्वैत ही माया!
हा अनुभव झाला आणि सगळा मोहरा फिरला! जणू दृष्टीचाही डोळा दिसला! निजरूपाचा साक्षात्कार झाला!
-------***-------
* परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी या चार (चत्वारवाचा) वाणीच्या पायर्या आहेत. एखाद्या विचाराचं बीज नेणिवेत रुजणं ही परावाणी. ते जाणिवेला 'दिसणं' ही पश्यंति, त्याला शब्दरूप मिळणं ही मध्यमा आणि त्याचं प्रकट उच्चारण म्हणजे वैखरी. या अभंगात ज्ञानेश्वरांनी ज्या संवादाचं वर्णन केलं आहे, तो असा नेणिवेच्या पातळीवर अव्याहत सुरू आहे.
** क्षेम याचा अर्थ मी अनेक वर्षं कुशल/खुशाली असा समजत होते. पण त्याचा एक अर्थ 'आलिंगन' असाही आहे. हे कळल्यावर त्या 'क्षेमालागी उतावीळ' होण्यातली आर्तता अधिकच भिडते! मोठ्या विरहानंतर एखाद्या जिवलगाची भेट व्हावी, त्याला उराउरी आलिंगन द्यावं, त्या स्पर्शातील असोशीतून, कणाकणाने उमलत जाणार्या गात्रांतून आणि क्षणाक्षणाने विसावत जाणार्या श्वासांतून परस्परांचं क्षेम - आणि प्रेम - व्यक्त व्हावं, शब्दांची, प्रश्नोत्तरांची आवश्यकताच भासू नये! किती सुंदर श्लेष!
आणखी एक गंमत त्या 'शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु'ची! 'अनुवादु' का? कारण सहसा संभाषण हे वरकरणी एकाच भाषेत होत असलं तरीही ऐकणारा त्याच्या समजुती, अनुभव आणि कुवतीनुसार ऐकलेल्या वाक्यांचा 'अनुवाद' करून ते समजून घेत असतो! त्यामुळेच तर स्पष्टतेसाठी शब्द वापरावेत तरी पुन्हा गैरसमजांना वाव उरतोच! मानवी मनोव्यापार आणि परस्परसंबंधांची किती सखोल आणि क्षमाशील जाणीव दिसते यात! उगाच नाही त्यांना ज्ञानियांचा राजा म्हणत!
हपा, सुंदर प्रतिसाद.
हपा, सुंदर प्रतिसाद.
आपल्याकडे आलिंगनातून शक्तिपाताद्वारे दीक्षा देण्याची परंपरा आहे. जेव्हा अशी दीक्षा मिळते तेव्हा शिष्य/ भक्त अपर विश्वातून परविश्वात जातो. लौकिकातून अलौकिक बनतो., पारलौकिक बनतो. त्या चैतन्याशी त्याचे मिलन होते आणि अपार, अशारीरिक असा सहज आनंद त्याच्या ठायी विलसू लागतो. हेच प्राप्तव्य आणि साध्य असते. हे एकदा मिळाले की आणखी काही मिळवण्यासाठी धावणे धडपडणे थांबते. भक्तांचे सोने तर होतेच पण तो स्वतःच परीस -गुरू बनतो. अविकारी बनतो. सर्व लौकिक दु:खांतून मुक्त होतो. सूफी तत्त्वज्ञान ह्याच संकल्पनेवर आधारित आहे. आणि नाथ पंथीयांतला एक प्रवाहही.
सहीच हपा. पण दुसऱ्या ओळीत
सहीच हपा. पण दुसऱ्या ओळीत 'क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली' चा अर्थ लागत नाही मग. त्याला क्षेम म्हणजे मिठी असा अर्थ घ्यावा लागतो.
म्हणवूनि स्फुरताति बाहु
म्हणवूनि स्फुरताति बाहु यावरून क्षेम म्हणजे इथे आलिंगन हा अर्थ योग्य वाटतो.
अमित, पॉइंट आहे.
अमित आणि भरत, पॉइंट आहे.
या अभंगात आलिंगन हाच अर्थ
या अभंगात आलिंगन हाच अर्थ सयुक्तिक वाटतो, पण हे क्षेम > किमया कनेक्शन फार इंटरेस्टिंग आहे! धन्यवाद, हपा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हीरा, तुमची पोस्टही मस्त. ‘युगांत’मध्ये इरावतीबाईंनी पिता आणि पुत्र यांच्यातल्या अशाच काहीशा विधीचं वर्णन दिलं आहे (विदुर आणि युधिष्ठिराच्या संदर्भात), त्याची आठवण झाली.
काय मागावे आणिक
काय मागावे आणिक
उभे ठाके मोक्ष सूख
उभे ठाके मोक्ष सूख
समचरण सुंदर
कांसे ल्याला पीतांबर
धन्य झाली माझी भक्ती
वोळंगिल्या चारी मुक्तीf
पसरोनि दोन्ही बाहू
आलिंगिला पंढरी राऊ
आलिंगिला पंढरी राऊ
किंवा,. मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयास
उद्बोधक चर्चा सुरू आहे.
उद्बोधक चर्चा सुरू आहे.
लेख व चर्चा आवडते आहे.
लेख व चर्चा आवडते आहे.
अतिशय सुंदर लेख /संवादु आहे..
अतिशय सुंदर लेख /संवादु आहे.. तुमचं असंच आणखी रचना/ विराण्यांवरही चिंतन वाचायला आवडेल.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
"दुजेविण अनुवादु" पाशी गाडी नेहमी अडायची, ती तुमच्या विवेचनामुळे पुढे गेली. अगदीच पटलं ते!
मला यातल्या "अगणित लावण्य" बद्दल कायम प्रश्न पडतो. >>> लावण्य हे लक्षणांनी बनले असते (रंग, आकार, पोत इत्यादी). एखादे लक्षण एका वस्तूला लावण्य देत असेल तरी तेच लक्षण दुसर्या वस्तूला लावण्य देईलच असे नाही. त्यामुळे वस्तूच्या लावण्याच्या लक्षणांवर मर्यादा असते पण ज्ञानेश्वरांना जाणवलेली विठ्ठलाच्या लावण्याची लक्षणे अमर्याद होती - मधुराष्टकात जशी श्रीकृष्णाची प्रत्येक गोष्ट मधुर असल्याचे वर्णन आहे तसेच ज्ञानेश्वरांना विठ्ठलाचे प्रत्येक लक्षण सुंदरच दिसले. अगणीत लक्षणांनी बनलेले लावण्य म्हणून अगणीत लावण्य !
कर्नाटकु आणि कानडा ही प्रांताशी संबंधीत नामे नसावीत. कर्नाटक प्रांत ज्ञानेश्वरांच्या उकारान्त भाषेत कर्नाटकु होइल. पण मग कर्नाटकातला / कर्नाटकातून आलेला या अर्थाकरता कर्नाटकुच्या जवळचा पण वेगळा शब्द हवा (जसे पंजाब हा प्रांत आणि तेथे राहणारे किंवा तेथून आलेले लोक ते पंजाबी). पण इथे वेगळा शब्द नाही, म्हणून 'कर नाटकु' अधिक बरोबर वाटते. गुजराथीत कानुडो शब्द आहे आणि त्याचे अर्थ श्रीकृष्ण आणि कळायला अवघड असे आहेत. त्याच्याशी मिळत्या जुळत्या कानडाचे पण तेच अर्थ असावेत. कर्नाटकातल्या हंपीतून विठ्ठल पंढरपूरात आला असे मानले तरी हंपीचे देउळ १४००++ मध्ये बनले. त्यानंतरच तो कधीतरी पंढरपूरात येऊ शकतो, आधी नाही. पण ज्ञानेश्वरांचा जीवनकाल त्याच्या आधी दोन शतके होता. त्यामुळे त्यांना कानडा म्हणजे कानडी प्रांतातून आलेला हा अर्थ अभिप्रेत नसावा.
हा यासंदर्भातला मायबोलीकर
धन्यवाद, माधव.
हा यासंदर्भातला मायबोलीकर पुरातत्वसंशोधक वरदाचा लेख मुळातूनच जरूर वाचा असं सुचवेन.
सुमारे हजार वर्षांपूर्वीपासून
सुमारे हजार वर्षांपूर्वीपासून आजच्या महाराष्ट्रातल्या आणि आजूबाजूच्या दख्खन पठारावर मिश्र भाषकांची सत्ता होती. अगदी होयसळ ते चालुक्य, राष्ट्रकूट आणि सेऊणा यादवांपर्यंत संस्कृत आणि कन्नड ह्या भाषा त्यांच्या त्याकाळच्या रूपात प्रचलित होत्या. महाराष्ट्राची विशेषत: दक्षिण महाराष्ट्राची सीमारेषा कानडी आणि मराठी अशी ठळकपणे वेगळी बनली नव्हती. बोलीभाषांची सरमिसळ होती. कानडी भाषा समृद्ध होती, तिने कानडी अशी स्पष्ट ओळख मिळवली होती. पण त्याकाळच्या मराठीचे तसे नव्हते. दक्षिण महाराष्ट्रात मिरज सोलापूर, विशेषत: पंढरपूर भागात त्यावेळच्या कानडीचे वर्चस्व होते. म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी विशेषत: मध्य - उत्तर महाराष्ट्रातील नगर, नेवाश्यातल्या लोकांसाठी हा भाग कर्नाटकुच होता.
(प्रतिसाद अर्धवट आहे, काही वेळाने पूर्ण करीन किंवा नवा लिहीन.)
गुजरातीत कान्हुडा म्हणतात जो
गुजरातीत कान्हुडा म्हणतात जो कान्हाचं लाडकं रूप आहे. कान्हा कृष्ण वरून आला असावा.
हो. कृष्ण म्हणजे प्राकृतात
हो. कृष्ण म्हणजे प्राकृतात अथवा बोली भाषेत कण्ण, कण्णन, कन्ह, कन्हैया, कान्हा, कान्हो -जी, कान्हु - जी, कान्हुडा वगैरे.
बांका म्हणजे वक्र, वाकडा, बांके, समचरण नसलेला, त्रिभंगी मुद्रेतला, देहुडा, bent, crooked. शिवाय वाकडेपणाने खोड्या काढणारा,वाकुल्या दाखवणारा, कोणतीही गोष्ट सरळपणे न करून दुसऱ्याला चकवणारा वगैरे.
त्या काळात मराठी भाषा स्थिरावली नव्हती. व्याकरण सिद्ध झालेले नव्हते आणि प्रमाणीकरणही नव्हते. त्यामुळे ' कर्नाटकातील ' हा अर्वाचीन विभक्तीप्रत्यय असलेला शब्द यादव काळातही सररास वापरात असावा हा तर्क आणि अपेक्षा तितकीशी रास्त नाही.
कान्हा (उत्तरेत) = कण्णन
कान्हा (उत्तरेत) = कण्णन (दक्षिणेत) = कृष्ण
कानडा आणि कान्हुडा हे एकच आहेत का ते माहीत नाही. ही ओवी सोडून आणखी कुठे या अर्थाने तो शब्द वापरला गेला आहे का?
कानडा विठ्ठल - संत एकनाथ
कानडा विठ्ठल - संत एकनाथ
क्षेम-आलिंगन वाचताना मलाही
क्षेम-आलिंगन वाचताना मलाही पटकन विदुर-युधिष्ठिर आठवले.
बाकी सगळीच चर्चा समृद्ध करणारी आहे. __/\__
कान्हा हा शब्द बाल कृष्णासाठी
कान्हा हा शब्द बाल कृष्णासाठी बहुतेक वेळा वापरला गेला आहे. विठ्ठल हा थेट कृष्ण नव्हे. विठू आणि विष्णू ह्यातील साम्यावरून ( आणि इतर काही मुद्द्यांवरून)विठ्ठल हा विष्णूचा अवतार असे काही लोक मानतात. कृष्ण आणि बाकी अष्ट अवतार हे विष्णूचे. पण म्हणून राम, परशुराम हे कृष्ण नव्हेत. त्या विष्णूच्या विभूति, प्रकृती, स्वभाव, भाव. अवतार. त्यामुळे कृष्णाला लागू पडणारी विशेषणे रामाला आणि इतर अवतारांना लागू पडत नाहीत. विठ्ठलाच्या बाबतीत कानडा हे कानडी ह्या अर्थानेच असावे हे माझे मत. विठ्ठल हे मध्ययुगीन विशाल कर्नाटकातील दैवताचे उन्नयन असावे. आणि कालौघात त्याचे वैष्णवीकरण झाले असावे. शैवांतील तांत्रिक अंग आणि कर्मकांड (कश्मिरी कौलमत, ईशान्येतील शाक्तमताचा प्रभाव असलेले शैवपंथ इ.) वाढू लागल्यावर कुठल्यातरी साम्य आणि समन्वयवादी पंथाची आवश्यकता वाटू लागली किंवा कट्टर शैवपंथाचे आकर्षण कमी होऊ लागले तेव्हा भक्तिमार्ग अथवा पंथ निर्माण झाला. ह्याचा उगमही दक्षिणेत आहे. अलवार/अळवार ह्याचे अर्थ आणि व्युत्पत्ती बाजूला ठेवल्या तरी गाढ भक्ती हेच त्यांचे मुख्य सूत्र होते आणि त्यांनी वेदीय कर्मकांडे नाकारून अथवा दूर सारून भक्तिमार्ग रूढ केला जो थोड्याफार फरकाने पुढे विशाल कर्नाटकात, पर्यायाने महाराष्ट्राच्या काही भागात पसरला आणि वारकरी रूपात वाढला. म्हणून विठ्ठल हा कानडाच असावा.
प्रज्ञा ९, " बाकी सगळीच
प्रज्ञा ९, " बाकी सगळीच चर्चा समृद्ध करणारी आहे. __/\__"
अगदी सहमत.
मूळ लेखही उत्तम असून चर्चेला प्रवृत्त करणारा आहे.
देवळात मूर्तीची प्रतिष्ठापना
देवळात मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याच्या आधी बराच काळ विठ्ठल हे दैवत म्हणून जनमानसात प्रतिष्ठित झाले असावे आणि मग ते विग्रह रूपात आले असावे असे मानण्यास जागा आहे.
बाकी सगळीच चर्चा समृद्ध
बाकी सगळीच चर्चा समृद्ध करणारी आहे +१
सुरेख लेख- निरूपण.
सुरेख लेख- निरूपण.
प्रतिसाद सुद्धा बावन्नकशी.
@ स्वाती ,
@ स्वाती ,
सुंदर लेखाबद्दल धन्यवाद ! प्रतिसादही आवडले.
तुमची शब्दसंपदा, काव्यार्थ उलगडून सांगण्यातली हातोटी वादातीत आहे!
>> एका चर्चेत संत ज्ञानेश्वरांच्या 'पांडुरंगकांती' अभंगाचा विषय निघाला होता, त्यावरून हे स्फुट लिहिण्याचं धाडस करत आहे.>> असं धाडस (कोणत्याही चर्चेविना :स्मित ! ) तुमच्याकडून वारंवार होवो ही सदिच्छा आणि पुलेशु!
कानडा'वर चर्चा सुरू आहे
कानडा'वर चर्चा सुरू आहे म्हणून
लावण्यतेज हा एक शब्द धरला तर
लावण्यतेज हा एक शब्द धरला तर अगणित हे विशेषण योग्य वाटते.
तसाच क्षेम हा शब्द.
तसाच क्षेम हा शब्द.
संस्कृत भाषेत क्षेम म्हणजे खर्च.
आपल्या जवळील (पैसे ,वस्तू, भावना , कौशल्य,) विना मोबदला आत्मीयतेने , ममत्वाने, प्रेम भावाने, दुसऱ्याला देणे , अर्पण करणे म्हणजे क्षेम असाही अर्थ होऊ शकतो.
लावण्यतेज हा एक शब्द धरला तर
लावण्यतेज हा एक शब्द धरला तर अगणित हे विशेषण योग्य वाटते.-- +1
>>> लावण्यतेज हा एक शब्द धरला
>>> लावण्यतेज हा एक शब्द धरला तर अगणित हे विशेषण योग्य वाटते
इन्टरेस्टिंग! तसंही असू शकेल. कोणी मूळ मसुदा पाहिला असेल तर कृपया सांगा.
>>> संस्कृत भाषेत क्षेम म्हणजे खर्च
हीदेखील माहिती मला नवीन आहे, तीसाठी धन्यवाद.
पण त्याअर्थी क्षेम देऊ करण्यासाठी बाहू स्फुरण्याचा ताळमेळ इथे बसत नाही असं वाटतं.
क्षेमकुशल पुसणे/विचारणे.
क्षेमकुशल पुसणे/विचारणे.
अप्रतिम रसग्रहण!
अप्रतिम रसग्रहण!
अतिशय वाचनीय चर्चा.
Pages