वैखरी कैसेंनि सांगें!

Submitted by स्वाती_आंबोळे on 21 March, 2023 - 12:36

काल गप्पांच्या पानावर झालेल्या एका चर्चेत संत ज्ञानेश्वरांच्या 'पांडुरंगकांती' अभंगाचा विषय निघाला होता, त्यावरून हे स्फुट लिहिण्याचं धाडस करत आहे.

चंद्राते आंगवणे | भोगुनि चकोर शाहाणे | परि फांवे जैसे चांदणे | भलतयाही ||
तैसे अध्यात्मशास्त्री इये | अंतरंगचि अधिकारिये | परि लोकु वाक्चातुर्ये | होइल सुखिया ||

(जसा अंगभूत गुणांमुळे चकोर चंद्राचा उपभोग घेऊन शहाणा ठरतो, पण चांदण्याचा आस्वाद कोणालाही घेता येतो, तद्वतच अंतर्मुख होऊ शकलेले लोक या ग्रंथातील अध्यात्मशास्त्राचे अधिकारी असले, तरी यातील वाग्विलासाचा आनंद कोणीही घेऊ शकतो!)
असं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे.

अध्यात्म हा माझा विषय नाही, माझी उडी 'वाक्चातुर्ये सुखिया' होण्याइतकीच आहे. तेव्हा काव्य म्हणून त्यातलं जितकं माझ्या आवाक्यात आलं तितक्याबद्दल लिहायचा प्रयत्न करते. आज 'जागतिक काव्यदिन' आहे हा एक सुखद योगायोग!

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥

पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥

बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचां डोळां पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥

सगुणाच्या प्रेमात पडण्यापासून निर्गुणाचा वेधू लागण्यापर्यंतचा प्रवास या अभंगात दिसतो मला.

पांडुरंग हे कर्नाटकातून आलेलं सगुण दैवत वारकरी सांप्रदायाने विष्णूचं रूप म्हणून स्वीकारलं. संसारात राहून सन्मार्गावर चालत राहण्याच्या प्रयत्नात हा 'बाप रखुमादेवीवरू' त्यांना सोयरा वाटला. ज्ञानोबांनीही त्याचा वसा घेतला आणि मधुराभक्तीरसात विराण्या, अभंग लिहिले.
त्यांचा कानडाविठ्ठलु कसा आहे? सांवळा सुंदरु आहे, त्याने कांसे पितांबरु परिधान केलेला आहे, तो लावण्यमनोहरु आहे. त्याची कांती इतकी दिव्य झळाळती आहे की डोळे दिपावेत, ती दीप्ती दृष्टीत सामावू नये, तहान भागू नये आणि पुनःपुन्हा त्याला पाहण्याची आस लागावी. तो खुणावतो आहे, जवळ बोलावतो आहे अशी कल्पना पल्लवित होत राहावी.

पण मग इतका जिवलग आहे, तर आपण त्याची आळवणी केली तर तो त्याला प्रत्युत्तर का बरं देत नाही (आळविता न-देई सादु)? की हे रूप, ही दीप्ती, हीदेखील वोखटी मोहमायाच आहे? या रूपाची खोळ बुंथी (अवगुंठन) पांघरून लपला आहे तो कोण आहे मग? त्याच्या ओढीचे धागे मनाचिये गुंती कसे गुंतियेले गेले? सतत माझ्या नेणिवेत त्याच्याशीच संवाद सुरू राहतो तो का? आणि संवाद तरी कसा? ये हृदयींचे ते हृदयी! त्याला शब्दांच्या माध्यमाची आवश्यकता नाही, आणि तो शब्दबद्ध करता येणं शक्यही नाही. शब्देविण संवादु! परावाणीच्या* पुढे हा संवाद जात नाही, वैखरी तो उच्चारू शकत नाही.

भक्तीभावाने त्याच्या पाया पडू गेलं, तर पावलंच सापडत नाहीत. जो स्वयंभू आहे, तो भूमीतलावर, विटेवर कशाला पाऊल टेकवेल? मुळात त्याचं पाऊल म्हणजेतरी काय? जो सार्‍या चराचरात भरून आहे, त्याला चेहरामोहरा, पाठपोट असणार आहे का? त्याला प्रेमभराने क्षेम** (आलिंगन) देईन म्हणावं तर कवेत काहीच येत नाही! मी एकटीच इथे ठक (थक्क/स्तंभित) होऊन उभी आहे!

संवाद साधला तर तो माझा माझ्याशीच घडावा, आलिंगन द्यावं तर बाहू माझ्याचभोवती वेढले जावेत, म्हणजे मी आणि तो निराळे नाहीतच का? मीच व्यष्टी, मीच समष्टी? मीच थेंब, मीच महासागर? मी तोच आणि तो मीच? अहम् ब्रह्मास्मि?!!

विटेवरच्या मूर्तीला सोयरा समजण्यापासून निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार आपल्याच अंतरात होण्याचा हा सुरस अनुभव! रूप ही माया, ते रूप पाहणारे डोळे (ज्ञानेंद्रियं) ही माया, ते जाणणारे मनबुद्धी ही माया, मी-तो, आत-बाहेर हे द्वैत ही माया!
हा अनुभव झाला आणि सगळा मोहरा फिरला! जणू दृष्टीचाही डोळा दिसला! निजरूपाचा साक्षात्कार झाला!

-------***-------

* परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी या चार (चत्वारवाचा) वाणीच्या पायर्‍या आहेत. एखाद्या विचाराचं बीज नेणिवेत रुजणं ही परावाणी. ते जाणिवेला 'दिसणं' ही पश्यंति, त्याला शब्दरूप मिळणं ही मध्यमा आणि त्याचं प्रकट उच्चारण म्हणजे वैखरी. या अभंगात ज्ञानेश्वरांनी ज्या संवादाचं वर्णन केलं आहे, तो असा नेणिवेच्या पातळीवर अव्याहत सुरू आहे.

** क्षेम याचा अर्थ मी अनेक वर्षं कुशल/खुशाली असा समजत होते. पण त्याचा एक अर्थ 'आलिंगन' असाही आहे. हे कळल्यावर त्या 'क्षेमालागी उतावीळ' होण्यातली आर्तता अधिकच भिडते! मोठ्या विरहानंतर एखाद्या जिवलगाची भेट व्हावी, त्याला उराउरी आलिंगन द्यावं, त्या स्पर्शातील असोशीतून, कणाकणाने उमलत जाणार्‍या गात्रांतून आणि क्षणाक्षणाने विसावत जाणार्‍या श्वासांतून परस्परांचं क्षेम - आणि प्रेम - व्यक्त व्हावं, शब्दांची, प्रश्नोत्तरांची आवश्यकताच भासू नये! किती सुंदर श्लेष!

आणखी एक गंमत त्या 'शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु'ची! 'अनुवादु' का? कारण सहसा संभाषण हे वरकरणी एकाच भाषेत होत असलं तरीही ऐकणारा त्याच्या समजुती, अनुभव आणि कुवतीनुसार ऐकलेल्या वाक्यांचा 'अनुवाद' करून ते समजून घेत असतो! त्यामुळेच तर स्पष्टतेसाठी शब्द वापरावेत तरी पुन्हा गैरसमजांना वाव उरतोच! मानवी मनोव्यापार आणि परस्परसंबंधांची किती सखोल आणि क्षमाशील जाणीव दिसते यात! उगाच नाही त्यांना ज्ञानियांचा राजा म्हणत!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आवडता अभंग…. छान लिहिलेय.

कानडा विठ्ठलु, कर्नाटकु.. हे कर नाटकु आहे असे आशा भोसलेना बोलताना कुठेतरी ऐकले/ वाचले असल्याचे आठवतेय. भक्तांशी नाटके करणारा कानडा विठ्ठल…

सुरेख लिहिले आहे स्वाती. माझे सासरे वारकरी आहेत. त्यांना देखिल आवडला लेख.
त्यांचं ईथे अकाउंट नाहीं म्हणून ही पोच देत आहे.

मला फक्त " शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु " चा परिच्छेद नीट कळला नाही म्हणजे त्या ४ ओळीचा अर्थ.

आज 'जागतिक काव्यदिन' आहे हा एक सुखद योगायोग!>> अरे मस्तच.ह्याहून परिपूर्ण काव्य काय असणार!
फार मनापासून लिहीलं आहे,आणि "आपुलाच वाद आपणासी" अश्या टोन मधे वाटलं,त्यामुळे अजून आवडलं

सुंदर लिहीले आहे! असे लेख अजून आवडतील वाचायला.

मला यातल्या "अगणित लावण्य" बद्दल कायम प्रश्न पडतो. मोजता येणार्‍या गोष्टींच्या बाबतीत आपण अगणित शब्द वापरतो. संख्येने न मोजता येणार्‍या गोष्टींच्या बाबतीत नाही (शाळेत इंग्रजी शिकताना Many/Much मधला फरक असा शिकवायचे). पण ज्ञानेश्वरांनी सौंदर्याच्या बाबतीत इथे वापरला आहे.

दुसरे म्हणजे "कर्नाटकु" चा उल्लेख. सध्या आपण ज्याला कर्नाटक राज्य/भाग म्हणतो त्याच अर्थाने ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावे का? पूर्वी त्या भागाला तसे नाव होते की नाही माहीत नाही. कन्नड भाषा बोलणारा भाग तेव्हाही होताच. पण अगदी सोलापुरातही कन्नड भाषा बोलतात. मग पांडुरंग "कर्नाटकातून आला" असे जे म्हंटले जाते ते शब्दशः तसेच, की पंढरपूरही जवळपास त्याच कन्नडभाषिक भागात, अशा अर्थाने "कर्नाटकु"? तेव्हाच्या भाषिक सीमारेषा काय होत्या कोणास ठाउक.

कर्नाटकु ची दुसरी फोड साधनाने दिली आहे ती ही ऐकली आहे.

>> कानडा विठ्ठलु, कर्नाटकु.. हे कर नाटकु आहे असे आशा भोसलेना बोलताना कुठेतरी ऐकले/ वाचले असल्याचे आठवतेय. भक्तांशी नाटके करणारा कानडा विठ्ठल…>> राम शेवाळकरांनी म्हटलं आहे.
छान लिहिलं आहे स्वाती.

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार! Happy

‘कानडा’ आणि ‘कर-नाटकु’ यांचे इथल्या चर्चेत आलेले अर्थही रोचक आहेत. शेवाळकरांचं निरूपणही ऐकते आता.

इथे म्हटल्यानुसार ‘कानडा = अगम्य’ हा अर्थ ‘मी काय कानडी बोललो काय हो तुमच्याशी’ यावरूनच आला आहे असाही मतप्रवाह दिसला. Happy
तसंच कर्नाटक प्रांताचा संबंध असलेले दुवेही आंतरजालावर सापडतात. मायबोलीवरच वरदाच्या एका लेखातही त्याबद्दल वाचल्याचं आठवतं, त्याचा दुवा सापडला तर देते इथे.

बाकी मरहट्टे जसे काटक आणि भांडकुदळ म्हणून ओळखले जात तसे कर्नाटकी लोक नाटकी होते की काय याचा अभ्यास व्हायला हरकत नाही. Happy Light 1

फा, ‘अगणित’ यासंदर्भात वाचताना ऑड वाटतो खरा. त्यांना मॅथ्सपेक्षा स्टॅट्स (लाखांत एक वगैरे पर्सेन्टेज / पर्सेंटाइल / टॉप एन किंवा तत्सम) अभिप्रेत होतं की काय कोण जाणे! Happy

फार फार सुंदर लेख! चत्वार वाचांची माहिती उत्तम. क्षेम याचा आलिंगन हा अर्थ माहीत नव्हता. तो लावून ही ओवी फारच भावते. शिवाय मला आशा भोसलेंनी गायलेलं हे कडवं विशेषतः आवडतं. पूर्ण गाण्याचा तो उच्च बिंदू आहे.

कानडा आणि कर्नाटकू चर्चेत अजून एक भर - आपल्या संतांप्रमाणे कर्नाटकातही पुरंदर दास वगैरे संत होऊन गेले, ज्यांनीदेखील विठ्ठल भक्ती केली आहे. पण गंमत म्हणजे ते सर्व संत मध्वाचार्य प्रणित द्वैत परंपरेचे होते. आपण मात्र आपल्या मराठी संतांना अद्वैतवादी समजतो. हा भेदु कैसा उपजियेला हे बघायला पाहिजे. विठ्ठलु हा कर्नाटकु न राहता मऱ्हाटु झाल्यावर अद्वैतवादी झाला काय? (रा चिं ढेरे यांचं पुस्तक कुणी वाचलं असल्यास प्रकाश टाकावा)

धन्यवाद!

ह.पा., तुम्ही दिलेली माहिती नवीन आहे माझ्यासाठी. Happy

जाई., सॉरी, तुम्हाला उत्तर द्यायचं राहिलं.
शब्देविण संवादु… या ओळींत ते परतत्वाशी जुळलेल्या अनुसंधानाचं वर्णन करताहेत. संवाद घडतो आहे, पण तो ‘बोलून’ नव्हे, नेणिवेतच होतो आहे. बोलणारा एक आणि ऐकणारा दुसरा असा भेद उरलेला नाही. परावाणीच्या पलीकडे हा संवाद जात नाही (परे-परते बोलणे खुंटते). अशा संवादाचं वर्णन वैखरी कशी करणार! तो शब्दांत मांडणं अशक्य आहे!
तुकोबा म्हणतात तसा ‘तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचि वाद आपणांसी’.
- हे आता थोडं आणखी स्पष्ट झालं का?
तुमच्या सासरेबुवंचेही अनेक आभार! Happy

सुरेख लिहिलंय.
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥ या ओळींचा अर्थ माहीत नव्हता, तो कळला. इतर ओळींचा अर्थही अधिक स्पष्ट झाला.
अभंगाताला प्रवास द्वैताकडून अद्वैताकडे आहेच, पण शारीर किंवा भौतिक अर्थानेही त्याच्या अधिकाधिक जवळ जाताना दिसतो. प्रथम दुरून दर्शन, तेवढ्याने डोळे दिपणे, त्याची ओढ लागणे , त्याच्याशी संवाद साधू पाहणे, पाया पडणे आणि मग आलिंगन देणं. आधी देवळात, थेट गाभार्‍यात गेल्यासारखं वाटतं.

का नडतोस? नाटक करतो असा अर्थ हृदयनाथांनी लावला आहे, शेवाळकरांना तो मान्य नाही. त्यांच्यामते साध्या भाजीभाकरीच्या नैवेद्याने खुष होणारा हा साध्या सामान्य लोकांचा देव . तो कानडा - अनाकलनीय कसा असेल ? नाटकी अवतार संपवून तो इथे आला आहे.
सारेगम मराठी कारवां मध्ये अभंगांच्या जोडीने शेवाळकरांचे निरुपण आले आहे. (पण ते फारच रेकून बोलतातरा)

राम शेवाळकर कानडाउ विठ्ठलु

रात्र काळी घागर काळी या गाण्यातही बुंथ शब्द येतो.
बुंथ काळी, बिलवर काळी
गळामोती एकावळी काळी हो माय !

>>> प्रथम दुरून दर्शन, तेवढ्याने डोळे दिपणे, त्याची ओढ लागणे , त्याच्याशी संवाद साधू पाहणे, पाया पडणे आणि मग आलिंगन देणं. आधी देवळात, थेट गाभार्‍यात गेल्यासारखं वाटतं.
वा! ही संगतीही आवडली. Happy

मामी, हो खरंच की. Happy

इथल्या उद्बोधक चर्चेबद्दल खरंच सर्वांचे आभार. Happy

सुरेख लिहिलं आहे. /\

हपा, ही गोष्ट वाचल्यासारखी वाटतेयं. मी आठवून- शोधून इथे लिहेन. मूळात हे बदललं कसं ह्याची मलाही उत्सुकता वाटतेयं.

भरत यांच्या प्रतिसादावरून हे सूफी-हिंदी गाणं आठवलं.
पिया मिलेंगे

आत्ता एके ठिकाणी वाचलं -

मराठीत kṣēma (क्षेम).—n A friendly embrace. >> असा अर्थ आहेच, तुम्ही म्हणता तसा (भेटीलागी जीवा लागलीसे आस = क्षेमालागी जीव उतावीळ); पण रसशास्त्रात
"Kṣema (क्षेम, “foundation”) - The science of kshema or khema deals with transformation of base metals into gold. The term khema has been contracted into the Persian “kimia” or al-chamia." असंही आहे.

आता 'क्षेमालागी जीव उतावीळ माझा'चा आणखीनच वेगळा अर्थ लागतो. गुरु- किंवा भगवत्कृपा लाभणे ह्याला अनेक ठिकाणी परिसस्पर्शाची उपमा दिली गेली आहे, त्यामुळे क्षेमालागी उतावीळ म्हणजे भगवत्कृपा लाभण्यास / परिसस्पर्शास उतावीळ असाही अर्थ लावता येऊ शकेल.

Pages