आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी मनावर गेली पन्नास वर्षे तरी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदाची मोहोर ठसवून हसवत ठेवणाऱ्या अशोक सराफ या नटवराला नमन करावेसे वाटले. यंदा पंच्याहत्तरी गाठलेल्या त्यांना खरंतर आदराने, मानाने नटवर्य म्हणावे लागेल पण त्यांच्या खट्याळ विनोदी भूमिकांचा विचार करता 'नटवर' च जास्त जवळचे वाटेल. त्यांचा जन्म कधी कुठे झाला , मग शिक्षण नोकरी आणि रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास ही अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळूच शकते त्यामुळे त्या तपशीलात न जाता या लेखात मी फक्त मला भावलेला अशोक सराफ शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
दर शनिवारी की रविवारी संध्याकाळी ४. ३० ते ७. ३० या वेळेत मराठी चित्रपट टीव्हीवर लागण्याच्या काळात ओळख झाली या चेहऱ्याची. दिसायला सामान्य किंवा 'अती सामान्य' म्हणता येईल
असा, हेअर स्टाईल पण काही विशेष नाही,कपडेही अगदी आजूबाजूची इतर चार माणसे वापरतात तसलेच साधे तरीही हा आमच्या सिनेमाचा हिरो. नायक किंवा नायिका ही खरंतर प्रत्येकाच्या मनातली एक स्वप्नप्रतिमा असते आणि नाटक सिनेमात जे दिसतं त्यावरून ती आणखीच स्वप्नवत होत जाते. हिंदीच काय, मराठी सिनेमातही देखण्या नायकांची कमी नव्हती. रमेश देव, अरुण सरनाईक, विक्रम गोखले यांसारखे अनेक मातब्बर जेव्हा मराठी नायक होऊन मिरवून गेले तेव्हा प्रेक्षक चांगलाच 'तयार' झालेला होता. तेव्हा पुढे येऊन आता मी तुमचा नायक म्हणणे खरोखरीच धाडसाचे होते. अगदी स्पष्ट लिहायचे तर लौकिकार्थाने चित्रपटाचा नायक म्हणजे कसा तर तरुणींच्या मनात घर करणारा, रुबाबदार देखणा, जावई म्हणून ओळख करून देताना अभिमान वाटावा असा. पण हे सर्व मापदंड मोडून काढत शर्टाची वरची दोन बटणे उघडून हा साधा माणूस निधड्या छातीने रुपेरी पडद्यावर उभा राहिला तो कधी न पडणाऱ्या विनोदाचे रूपक होऊनच. बघता बघता त्याने प्रेक्षकांना रंग रूप स्टाईल या पलीकडचा नायक दाखवला. नायक म्हणजे कुणी आभाळातून पडलेला सफेद घोड्यावर स्वार होऊन येणारा , दैवी शक्ती असलेला राजकुमार नसून, तो तुमच्या आमच्या सारखाच साधा,गरीब, रोजची लढाई हरत हरत जिंकणारा सामान्य माणूस असतो, त्याची या अडचणींना तोंड देण्याची हिंमत आणि त्यावर मात करण्याची हिकमत म्हणजे त्याचं नायकपण हे शिकवलं. काल्पनिक दुनियेत कुठेतरी आठ दहा दांडगोबा गुंडाशी एकटा मारामारी करणारा , अंगावर गोळया झेलल्या तरी शेवटी हसत हसत हिरोईन ला मिठीत घेणाऱ्या हिरोपेक्षा; त्या गुंडांना घाबरणारा , युक्तीने चकवणारा, वेळीच पळ काढणारा हा हिरो लोकांना खरा, जास्त जवळचा वाटू लागला. त्या काळात ग्रामीण बाज आणि लावण्यांनी गजबजलेल्या मराठी सिनेमात थोडा शिकला सवरलेला, मध्यमवर्गीय चाकरमानी मराठी माणूस हरवत चालला होता. एकीकडे लावण्या आणि दुसरीकडे दादा कोंडके, राजा गोसावी या दिग्गजांनी आधीच वापरून गुळगुळीत केलेला विनोद . त्यामुळे आता नवं काय देणार प्रेक्षकांना असा प्रश्न असताना अशोक सराफ हे नाव पुढे आले. रोजच्या आयुष्यात करावी लागणारी धडपड, घरगुती संवादात केलेली नर्म विनोदाची पखरण या दोनच गोष्टींनी त्याने त्याच चाकोरीत थोडासा उत्साह आणला. लोकांचा
मराठी सिनेमा पाहायचा कंटाळा कमी होऊ लागला. अशोक सराफ हे नाव प्रेक्षकांना सिनेमाकडे आकर्षित करू लागलं.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे जोडीचे कित्येक चित्रपट हा निव्वळ आनंदाचा ठेवा आहे. लक्ष्याच्या विनोदाची विशिष्ट शैली होती. त्याच्या शेजारी उभं राहून फक्त संवाद फेकीवर आपला चाहता वर्ग टिकवणे सोपे नसणारच. मात्र, लक्ष्याच्या अंगविक्षेपी विनोदाच्या बेफाम घोड्याला जेव्हा अशोकच्या वाचिक विनोदाचे लगाम खेचतात तेव्हा ती घोडदौड प्रेक्षणीय ठरते हे सिद्ध झालं आणि हा नवा फॉर्म्युला सुपरहिट झाला. भल्या भल्या निर्मात्या दिग्दर्शकांना हा मोह आवरता आला नाही. आणि नंतर तर सचिन आणि महेश कोठारे यांनी अशा एकापेक्षा एक सिनेमांचा धूमधडाकाच लावला. त्यातही अनेक नवनवे प्रयोग केले गेले. कधी मराठी भाषेचा लहेजा बदलून, कधी वेशभूषा बदलून कधी स्वतः गाणे गाऊन तर कधी एकदम किशोर कुमारचा आवाज घेऊन. वख्ख्या विखखी वुकख्खु सारखे निरर्थक शब्द अजरामर केले या माणसाने. आज गोवा म्हटले कि आपल्याला जरी समुद्र किनारे आणि फिरंगी लोक डोळ्यासमोर दिसत असले तरी जेव्हा प्रत्यक्ष गोव्यात जातो तेव्हा तिथली माडांची झाडं झाडांची झाडं बघताना प्रोफेसर धोंड आठवल्याशिवाय राहत नाहीत. जिकडे तिकडे स्त्री स्वातंत्र्याचे वारे फिरत असताना "सौदामिनी, आधी कुंकू लाव" असा वारंवार हुकूम सोडूनही कुठल्याही टीकेला पात्र न होण्याची हातोटी अजब पात्र कॅप्टन रणगाडे शिवाय आजवर कुणालाही जमलेली नाही. "त्याच्या निरोपाला मेहुणी द्यायची होती", "वाकडोजी धने", "गाडीत डेडी - डेडात बॉडी - गाडीत डेड बॉडी पडलेली आहे", "मी ब्लॅक लीडर गँगचा टायगर बोलतोय सॉरी सॉरी परत , मी ब्लॅक टायगर गॅंग चा लीडर बोलतोय" यासारखे जिभेला वळसे देणारे संवाद फक्त आणि फक्त अशोक सराफचेच. नुसतं संवाद नाही, तर त्याची गाणीही तितकीच हिट आहेत. प्रियतंमा असो की अग अग म्हशी असो निखळ करमणूक. नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं बघायला मनोरंजक आहे तितकेच फक्त ऐकतानाही ते आपल्या रुसलेल्या गोडुलीला हसवते ते अशोक सराफनं ज्या प्रकारे आवाजाचे वैविध्य त्यात दाखवलं आहे त्यामुळेच. अनेक नायिकांना खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळाले नाव मिळाले जेव्हा त्या अशोक सराफ सोबत पडद्यावर झळकल्या. "धन्य धन्य तो धान्य वडा", "जाळीदार अनारसे", "लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत लिंबाचं मटण", "बंदुकीत भजी घालू नका" म्हणत स्वतः सारख्याच साध्या, सामान्य वाटणाऱ्या या पदार्थाना एक वेगळच ग्लॅमर देऊन गेला हा नायक. इतकं, की आजही हे उल्लेख आल्याशिवाय त्याची आठवण पूर्ण झाली असं म्हणता येत नाही. थोडक्यात काय, तर या मिडास राजाने ज्याला ज्याला स्पर्श केला त्याचं सोनं झालं.
हावभाव, संवादफेक आणि अभिनयाचे नाणे खणखणीत असेल तर तेच नटाची ओळख बनते. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावे लागत नाही. परंतु त्यावेळी अगदी हिंदी चित्रटसृष्टीतील दिग्गज नायकांनाही मोह झाला होता स्वत:ची वेगळी इमेज बनवण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी सिग्नेचर स्टाईल म्हणून वापरण्याचा. तो प्रकार मराठीतही येऊ पाहात होता. पण हे सर्व समज मोडीत काढत, फक्त चोख भूमिका वठवता आली तर पांढरे बूट, लटकणारी नाडी, नायकाचे ठराविक नाव असल्या कुबड्यांची गरज नसते हे त्याने स्वतःच्या मेहनतीने सिद्ध केले. इतकेच नव्हे, तर मराठी विनोदी नटाला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका मिळण्याचा शाप असताना अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका अशोकने स्वतःच्या अभिनय कौशल्याने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्या. मग तो नखशिखांत पांढरे कपडे घातलेला (काळं) भूत असेल, गाव बोंबलत फिरणारा बिनकामाचा नवरा असेल, किंवा सत्तर रुपये वारले असं बिनदिक्कतपणे सांगणारा धनंजय माने असेल. बॉस समोर पदर पाडून त्याला भुरळ पाडणारी स्टेनो कथा कादंबऱ्यात सिनेमात सवयीची झालेली असताना तिथे समोरच पडलेला स्तेपलर उचलून त्या पदराचा कायमचा बंदोबस्त करणारा बॉस अशोकने पहिल्यांदा दाखवून दिला. बायकोच्या स्वयंपाक प्रयोगांनी गांजलेला, बाहेर हजारो गुन्हेगारांना पकडणारा पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा घाबरतच जेवायला घरी जातो तेव्हा "आज काय वाढून ठेवलंय" असं म्हणतच एंट्री घेतो तिथं मराठी भाषा गालात हसते. कुणी म्हणेल की हे सर्व श्रेय त्या दिग्दर्शकाचे, पटकथा संवाद लेखकाचे. मान्य! पण तीच वाक्यं दुसऱ्या कुणी बोलली असती , ती भूमिका दुसऱ्या कुणी केली असती तर इतकी गाजली असती का, मला शंकाच आहे. हम पांच मधला पाच मुली आणि दोन बायकांनी वेढलेला त्रस्त तरीही प्रेमळ गृहस्थ अशोक शिवाय कुणी त्या सहजतेने उभा केला असता का? संजय जाधव नेहमी म्हणतो , conviction का पैसा है बॉस! ते मला नेहमी अशोक सराफला पाहूनच खरं वाटतं.काय कमाल संवादफेक. तुम्ही जे बोलताय ते आधी तुम्हाला पटतंय का, ते पात्र त्यावेळी नेमके कसे बोलेल हे जर तुम्हाला समजले तरच तुम्हाला ते हुबेहूब दाखवता येईल. आणि ही समज भल्या भल्यांना नसते. आज बघितले तर अशोकला मिळालेले संवाद हे काही एकदम "ढाई किलो का हाथ" किंवा " मैं आज भी फेके हूए पैसे नंही उठाता" प्रकारचे लार्जर दॅन लाईफ अजिबात नव्हते. तरी आज ते अजरामर झाले आहेत. "उद्या जर हे काम पूर्ण झाले नाही तर आम्हाला ऑफिसात घेऊ नका", "हा माझा बायको", "ज्याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच", "आपल्या ऑफिसात झुरळे तशी कमीच आहेत नाही? " केवळ आणि केवळ conviction. "उभं आयुष्य गेलं तिकीट फाडण्यात" हे जर अशोक शिवाय कुठल्याही कंडक्टर ने म्हटले असते तर ती मजा आलीच नसती. ' उभं' वरचा श्लेश पुस्तकांपेक्षा जास्त खात्रीने शिकवला त्या संवादफेकिने. मराठी भाषेची जेव्हा अशी गंमत सिनेमातून कळायला लागते तेव्हा अशा बोलता बोलता कोट्या करायला हुशारीच लागते ते समजते.
पण अशोक सराफ म्हणजे नुसता दंगा, विनोद असं समीकरण नाहीये. फक्त विनोदी नायकाच्या नव्हे तर नकारात्मक, खलनायकाच्या भूमिका करतानाही त्याचा हात कुणाला धरता आला नाही. मग तो वाट पाहाते पुनवेची मधला कपटी दीर असेल किंवा अरे संसार संसार मधला भुजंगराव असेल किंवा वजीर मधला सी एम भाऊसाहेब मोहिले असेल आणि अगदी हिंदीतला "ठाकूर तो गियो" म्हणत पळत सुटणारा मुनशीजी असेल. प्रत्येक भूमिकेवर अशोकच्या नावाचा अमिट ठसा उमटलेला दिसतोच. वय वाढले तसे वेगळ्या प्रकारचे रोल करायलाही त्याने मागे पुढे पाहिले नाही. वाजवा रे वाजवा मधला पोरांच्या कटात सामील होणारा जबाबदार बाप असेल किंवा अगदी अलीकडचा एक डाव धोबीपछाड असेल कितीही कलाकारांची जंत्री असली तरी त्यातही ठसठशीतपणे लक्षात राहतो तो अशोक सराफ. चौकट राजा आणि आपली माणसं मधलं त्याचं काम पाहिलं तर काळजाचं पाणी पाणी होतं. अशोक सराफ पाण्यासारखाच आहे खरंतर, जी भूमिका करतो तोच वाटतो. एका नटाला यापेक्षा दुसरे काय जमायला हवं?!
एके काळी लौकीर्थाने अजिबात हिरो मटेरीयल नसताना, विनोदी भूमिकांतच अडकून पडून संपून जाण्याचे भय असताना आणि आता जेव्हा सगळीकडे सोशल नेटवर्किंग मधे रिल्स आणि पोस्टच्या द्वारे प्रसिध्दीचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही तेव्हाही हा आपला नटसम्राट अशोक स्वतःचा आब राखून आहे. लोकांना हसवण्याच्या नादात त्याने कधीही स्वतःचे हसे होऊ दिले नाही. आपल्या चाहत्यांच्या मनातली प्रतिमा कधीच ढासळू दिली नाही याबद्दल खरंतर एक सच्चा प्रेक्षक म्हणून आभारच मानायला हवे. आपण बरं आणि आपलं काम बरं एवढं सूत्र अवलंबत जाता जाता या अवलियाने किमान पंचवीस वर्ष तरी मराठी सिनेमाला उचलून धरलं. निशाणा तुला दिसला ना म्हणत हसत हसत लोकांना वार झेलायला शिकवलं. आपल्या मंगलासाठी स्वप्नात का होईना पण बंगला बांधायचा, तिला नऊवारी नऊवारी पैठणी घेऊन द्यायची अशी मराठमोळी स्वप्नं दाखवली. आणि मग अग म्हशी तू मला कुठं नेशी म्हणत संसाराला लागल्यावर हातात झाडू आला तरी आनंदाने नाचत माहेरी गेलेल्या बायकोची आठवण काढायची. चुकी झाली माझी चुकी झाली म्हणत तिची समजूत काढायची तर कधी बहिणीच्या कळत नकळत, मोडलेल्या संसाराला सावरायला मदत करायची. साध्या साध्या आयुष्यांच्या साध्या गोष्टी आणि त्यांचे साधेसेच प्रश्न. ते सोडवणारा हा साधाच नायक बघता बघता महानायक झाला. लोकांचं अमाप प्रेम मिळाले , अफाट कीर्ती, प्रसिद्धी, यश, पुरस्कार प्राप्त करून मराठी मनामनात स्वतःचं असं अढळपद निर्माण केलं. त्यानंतर झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच! नावाप्रमाणेच मनामनातला शोक दूर सारत चार क्षण निखळ मनोरंजनाचे वाटत जाणारा हा वेषांतर केलेला कुणी दूतच असावा असं आता वाटतं. वरकरणी पु लं चा नारायण भासणारा हा कलाकार खरंतर उत्स्फूर्त विनोद आणि अभिनयाच्या राज्यातला नवकोट नारायण आहे! त्याला आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा. वॅख्या विख्खी वूख्खु!
आशूडी, तुम्हांला लेख मराठी
आशूडी, तुम्हांला लेख मराठी भाषा गौरव दिन या उपक्रमात लिहायचा आहे ना?
हे वाचा
https://www.maayboli.com/mabhagaudi/2023
उपक्रमाच्या विषयात हा बसत
उपक्रमाच्या विषयात हा बसत नव्हता, म्हणून तिथे टाकला नाहीय. शब्द खुणात दिले आहे मराठी भाषा दिवस असे.
कसलं मस्त लिहिलंय!
कसलं मस्त लिहिलंय!
मला त्यातल्या त्यात सचिनच्या चित्रपटांमधला अशोक सराफ महेश कोठारेच्या चित्रपटांपेक्षा जास्त आवडतो!
एक डाव धोबीपछाडमध्ये सुरुवातीला थोडा वेळ जेव्हा तो खरोखरच 'दादागिरी' करतो तेही काम नंतरच्या विनोदी कामाइतकंच भारी झालंय.
'हम पांच' माझीही आवडती मालिका होती.
आशुडी >>> खूप धन्यवाद!
आशुडी >>> खूप धन्यवाद!
येतील बहू, झालेही बहू, पण यासम हाच (अशोक सराफ)
छान लिहिलंय
छान लिहिलंय
कित्येक वाक्याला अगदी अगदी झालं
नाकावरच्या रागाला गाण्यात मुलात मूल होणारा, रुसवा काढणारा, आणि मध्येच बहिणीला इतकं साधं होतं हे लूक देणारा अशी खूप व्हरायटी.
मुद्दाम बघावे ते गाणे.
खुप खुप आवडला हा लेख.
खुप खुप आवडला हा लेख.
लक्ष्या आणि अशोक सराफ ही जोडगोळी ऑल टाइम फेवरेट.
अशोक सराफ च्या वाट्याला विविध भूमिका आल्या आणि त्याने त्यांचे सोने केले.
वकूब असतानाही लक्ष्याच्या नशिबात हे नव्हते.
छान जमलाय लेख.
छान जमलाय लेख.
छान लिहिलं आहेस आशू.
छान लिहिलं आहेस आशू.
एक डाव भुताचा विसरलीस बहुतेक. किंवा मी मिसलं
अशोक सराफ माझा पण आवडता. लक्ष्या त्याला सिनिअर हे नव्हतं माहिती.
छान लिहिलं आहेस आशूडी.
छान लिहिलं आहेस आशूडी.
मस्त ग : )
मस्त ग : )
मास्तुरेऽऽ राहिला का ग, कि मी मिसला
वा खुप छान लिहिलंय
वा खुप छान लिहिलंय
खूप छान लिहीलेयं. शब्दानी
खूप छान लिहीलेयं. शब्दानी शब्दाशी सहमत...
काही चित्रपटात खलनायकी भुमिका अशोक सराफ यांनी अशी केली आहे की टोकाचा राग आला यांचा. उदा: देवघर, पंढरीची वारी वगैरे. बर्याचश्या हिंदी चित्रपटात पण विनोदी भुमिका मस्त केल्यात. उदा. गुप्त, येस बॉस. पण हिंदीत लक्षाप्रमाणेच दुय्यम भुमिका मिळत गेल्या त्यामुळे तिथे ते जास्त रमले नाहीत.
खूप छान लिहीले आहे.. माझ्या
खूप छान लिहीले आहे.. माझ्या आईचा आवडता नट..
अशोक सराफचं ७५ वय आहे हे
अशोक सराफचं ७५ वय आहे हे खरंच वाटत नाही!
आशूडी, लक्ष्या पेक्षा अशोक सराफ कितीतरी सिनियर, तू बहुधा चुकून उलट लिहिलेस का? अशोक सराफ अर्ली ७० पासून काम करत्तोय आणि लक्ष्या ८०ज मधे आला.
बाकी लेख छान.
हो मैत्रेयी, थोडी गल्लत झाली
हो मैत्रेयी, थोडी गल्लत झाली वाटतं.
धन्यवाद सर्वांना. काही संदर्भ माझ्याकडून लिहायचे राहून गेले असतील. तुम्हीही भर घाला लोकहो.
आशूडी, मस्त लिहिलंयस ग. पूर्ण
आशूडी, मस्त लिहिलंयस ग. पूर्ण लेख पटला आणि आवडला. मला 'शेजारी शेजारी ' चा केशवराव प्रचंड आवडतो. सध्या सरळ आणि सभ्य माणूस तसाच आमच्यासारखे आम्हीच चा भूपाल - बनेल वाटणारा पण प्रामाणिक. आत्मविश्वास मधला ' झेंडे आहेत का झेंडे ' हा सीन तर अप्रतिम केलाय अशोकने! आणि तू उल्लेखलेला ' धान्य वडा' तर एक नंबर आवडता आहे
या लेखासाठी खूप धन्यवाद.
आवडला लेख. मला वाटतं दादा
आवडला लेख. मला वाटतं दादा कोंडकेंच्या पांडु हवालदार आणि तुमचं आमचं जमलं या चित्रपटांपासूनच अशोक सराफ यांचं नाव झालं.
कसलं मस्त लिहिलंयस आशुडी!!
कसलं मस्त लिहिलंयस आशुडी!! बऱ्याच दिवसांनी लिखाण.
अशोक सराफ ची वाक्यं अगदी त्याच्या(त्यांच्या वयानुसार म्हणायला हवं, पण मनाने जवळचं वाटतं म्हणून त्याच्या) आवाजातच ऐकू आली.
छान लेख.
छान लेख.
हल्ली बरीच नाटकं पण आली अशोक सराफची ना? गेल्या ट्रिप मध्ये निर्मिती सावंत बरोबरीचं (व्हॅक्युम क्लिनर बहुतेक) बघितलेलं. ते अर्थात अगदीच यथा तथा होतं. पण त्याचा हा कम बॅक आवडलेला.
माझ्या वरच्या पोस्ट मध्ये
माझ्या वरच्या पोस्ट मध्ये भुताचा भाऊ मधल्या एका सीनचा उल्लेख राहिला ज्यात अशोक सराफला एक मुलगी आणि तिचे वडील पहायला येतात. तो सीन त्याने हाफ टिकट मधल्या किशोर कुमारच्या सीनच्या तोडीचा केला आहे. माझा अतिशय आवडता सीन आहे तो.
लेख झकास जमलाय.
लेख झकास जमलाय.
छान लेख. बिन कामाचा नवरा या
छान लेख. बिन कामाचा नवरा या चित्रपटात ही मस्त काम आहे.
छान लेख लिहिला आहे.
छान लेख लिहिला आहे.
नवरा माझा नवसाचा मधील कंडक्टरही विशेष लक्षात राहतो.
कोण कोणाचं तिकीट काढतो आपल्याला सगळं माहितीये
कोण पाहिजे? बाई पाहिजे...
मी माझ्या बापाचे नाही तुमच्या बापाचे पैसे उधळले...
कोणी जीवाभावाचं भेटलं तर त्याच्या हातूनचं नवस पूर्ण करीन ह्याच्यानंतरची ॲक्टिंग तर कमालच!
जितकं विनोदी तितकंच हृदयाला भिडणारे काम.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
मला प्रामुख्याने 'हम पांच'
मला प्रामुख्याने 'हम पांच' मालिकेतील 'आनंद माथूर' हा पाच मुलींचा हतबल बाप आणि 'आयत्या घरात घरोबा' ह्या चित्रपटातील 'गोपूकाका' ह्या अशोक सराफांच्या दोन भूमिका प्रचंड आवडतात.
एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सची 'हम पांच' ही बहुधा पहिलीच निर्मिती होती आणि तरीही अशोक सराफांसारख्या कसलेल्या अभिनेत्याने मालिकेत काम केले होते. त्यानंतर ते बालाजीच्या इतर कोणत्याही निर्मितीत झळकले नसले तरी पक्की व्यावसायिक असलेली एकता कपूर अजूनही अनेक मुलाखतींत अशोक सराफांनी तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आवर्जून उल्लेख करते. झी टीव्हीवर १९९४-१९९९ दरम्यान ही मालिका टेलिकास्ट होत असतांना माझ्या घरी केबल टीव्ही नसल्याने मला एखाद दुसराच भाग बघता आला. मात्र पुढे You tube (आणि आता Zee5) चे दालन घडल्यावर मी 'हम पांच' अनेकदा बघितली आहे. मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या हिंदीवर वरणभाताचा वास येतो म्हणून टीका केली जाते पण अशोक सराफांनी 'आनंद माथूर' हे हिंदीभाषिक पात्र ज्या कायिक व वाचिक अभिनयाने निभावले आहे, त्यावरून ते मराठी आहेत असे कुठेही वाटत नाही. ज्या रीतीने पाच मुली व दोन बायका त्यांची फजिती करतात आणि ते कधी हतबल, तर कधी चिडून सामोरे जातात ते केवळ अशक्य आहे. त्यांच्यासारखा 'आनंद माथूर' कुणीही रंगवू शकला नसता असे माझे ठाम मत आहे. ज्यांनी ही मालिका बघितली असेल त्यांना कदाचित आठवेल की ५० व्या भागात सौरभ शुक्ला आनंद माथूरच्या भूमिकेत दिसले होते, पण दुर्दैवाने ती जमली नाही.
तसेच माझा अशोक सराफांचा 'आयत्या घरात घरोबा' हा सर्वाधिक आवडता चित्रपट आहे. बालपणी जेव्हा ह्या चित्रपटाच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये बघत असे तेव्हा हा सचिन पिळगावकरांच्या (दिग्दर्शक) इतर चित्रपटांसारखा विनोदी असावा असे वाटत असे. त्यावेळी जरी आम्ही नागपूरशेजारच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असलो तरी तेथे दोनच टॉकीज असल्याने मोजकेच चित्रपट झळकत असत, त्यामुळे हा चित्रपट कधीही बघण्यात आला नाही. मात्र पुढे कधीतरी दूरदर्शनवर हा चित्रपट बघण्यात आला आणि प्रचंड आवडला. विशेषतः चित्रपटाच्या क्लायमॅक्सला एकीकडे अशोक सराफ आपले चंबू गबाळे उचलून तीन महिन्यांची सुट्टी घालवायला पुढच्या वर्षी पुन्हा ह्याच बंगल्यावर येईल असे मनोरथ रचत गर्दीत हरवतो आणि दुसरीकडे सचिन सुप्रियाला (केदार व मधुरा कीर्तिकर) 'जगातील सर्वात आनंदी (सुखी) माणूस जात आहे' असे सांगतो आणि तेव्हाच 'पुढच्या वर्षी लवकर या' असा संदेश स्क्रीनवर झळकत असतो, ते हृदयाचा ठोका चुकवून जाते. जसे गणपतीबाप्पा दरवर्षी १० दिवसांसाठीच येतात पण आपल्या कोमजलेल्या, थकलेल्या व मरगळलेल्या मनाला टवटवीत करून जातात, अगदी तसेच काहीसे फीलिंग येते.
ह्याशिवायही अशोक सराफांचे अनेक अनेक आवडते चित्रपट आहेत. माझ्या मते त्यांनी कॅरीअरच्या सुरुवातीपासूनच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून जी व्हर्सालीटी दाखवली तिला तोड नाही; कारण इतर अनेक अभिनेत्यांनी (विशेषतः हिंदी) पडता काळ आल्यानंतरच वैविध्यपूर्ण भूमिका स्वीकारणे सुरु केले.
आज मराठी भाषा दिनाच्या
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा. वॅख्या विख्खी वूख्खु!
सगळंच खूप भारी लिहिलंय। स्पीचलेस।
एक डाव भुताचा मधील भूत बनलेले
एक डाव भुताचा मधील भूत बनलेले अशोक मामा दिलीप प्रभावलकरांना "मास्तुर्डे " म्हणतात ते आमच्या आईला फारच आवडायचे
मी हे सम्राट अशोक वर असावं
मी हे सम्राट अशोक वर असावं म्हणून निवांतपणे वाचायला ठेवलं होतं
शोक केल्यामुळे तो शांतीचा प्रसार करू लागला त्या संदर्भात काहीतरी असावं असं वाटत होतं
पण हा लेख पण मस्त आहे
अशोक सराफ यांचे गाजलेले रोल कित्येक आहे पण ज्याला कल्ट चा बहुमान मिळाला असा अशी ही बनवाबनवी च्या धनंजय माने ला तोड नाही
70 रु वारले पासून हा माझा बायको
सगळेच संवाद अक्षरशः अफलातून टायमिंग असल्यानेच हिट झालेत
मस्त लेख. अगदी पटला.
मस्त लेख. अगदी पटला.
हावभाव, संवादफेक आणि अभिनयाचे नाणे खणखणीत असेल तर तेच नटाची ओळख बनते.>>> एकदम करेक्ट!
मस्त जमलाय लेख, आशुडी.
मस्त जमलाय लेख, आशुडी.
Pages