शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

' सेपीयन्स' पुस्तकाच्या मराठी भाषांतरात film साठी कचकडे हा शब्द वाचला आणि त्यातून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
एकेकाळी चित्रात दाखवलेल्या कचकडयाच्या वस्तूंची रेलचेल असायची :

kachakade.jpg

कचकडे हे सेल्युलोज नायट्रेट व कापूर यांच्या मिश्रणापासून बनवतात.

हो का? मी चित्रं पाहिली नाहीत, पण अनेक ठिकाणी उल्लेख असत. एकदम तकलादू वस्तू असा अर्थ वाटे.
पण लोकसत्तेतल्या शब्दकोड्यांत कचकडा हा शब्द अनेकदा असतो. त्यावरून कळलेला अर्थ
१ कांसवाची पाठ, हाड; कासवाचा खवला. २ गव्याचें शिंग वगैरें; ज्यापासून फण्या वगैरे करतात तो. ३ इंग्रजी सेल्युलाइडला प्रतिशब्द. [स. कच्छ + कृति; प्रा. कच्छकड]
शब्दकोडं सोडवताना फक्त पहिलाच अर्थ पाहिला होता आणि मला वाटायला लागलं की कचकड्याच्या वस्तू म्हणजे कासवाच्या पाठीपासून बनवलेल्या वस्तू.
तुमचा प्रतिसाद पाहिल्यावर कळलं दोन (तीन?) वेग वेगळ्या गोष्टी आणि अर्थ आहेत.

कांसवाची पाठ,,
वेगवेगळ्या गोष्टी आणि अर्थ आहेत.
>>>
होय ना !
हीच तर गंमत आहे शब्दांची...

कच्छकड >>> सुंदर .

एखाद्या कुटुंबाने नियंत्रित केलेल्या अवाढव्य औद्योगिक साम्राज्यासाठी इंग्लिश भाषेने कोरियाच्या भाषेतून एक शब्द स्वीकारलेला आहे तो म्हणजे
chaebol

मूळ jaebeol = jae (wealth) + beol (faction or clan)

सॅमसंग हे कोरियातले chaebol चे उत्तम उदाहरण आहे

toco या शब्दाची गंमत पहा.
त्याचा पहिला अर्थ म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक पक्षी

दुसरा अर्थ : ठोकणे , मारणे .
हा आपल्या हिंदी "ठोको" वरूनच इंग्लिशमध्ये गेलेला आहे.

entertainment हा तर अगदी मनोरंजक शब्द !
त्यातला tainment हा प्रत्यय वेगळा काढून अन्य काही शब्दरूपांशी जोडल्यानंतर अनेक मजेदार जोडशब्द तयार झालेले आहेत:

infotainment
edu …
eater…
irri …
shopper….

ते आता बऱ्यापैकी वापरात आहेत.

literature हा अगदी परिचित शब्द.
= कुठलेही साहित्य.

परंतु तो एखाद्या वाक्याच्या मध्ये असताना देखील त्याचे पहिले अक्षर मोठ्या लिपीतले घेतल्यावर त्याचा अर्थ काहीसा बदलतो:

Literature = ज्या वाचनातून आपल्याला ज्ञान मिळते ते साहित्य.
https://liberalarts.oregonstate.edu/wlf/what-literature-definition-examp....

>>koala, parliament >>> दोन्ही मस्त .
माहितीपूर्ण धागा .

>>koala, parliament >>> दोन्ही मस्त .
माहितीपूर्ण धागा .

आजचे शब्दकोडे सोडवताना रसरंग हा शब्द आला. याचा हा अर्थ मला माहीत नव्हता. या नावाचे चित्रपटविषयक नियतकालिक होते.

रसरंग-पु. मकरसंक्रांतीचे दिवशीं कुंकु आणि गूळ हीं दोन पात्रांत भरून ब्राह्मणांस, सुवासनीस देतात तो; संक्रातीचें हळदीकुंकू. [रस आणि रंग]

काल इंग्रजी शब्दकोड्यात नर माशी असा क्लु होता. शब्द होता drone.
नवतंत्रज्ञानातील adobi, oracle या शब्दांनी त्यांचे जुने अर्थ पुसून टाकल्यात जमा आहे.
ड्रोनचा वरचा अर्थ शब्द कोशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. हा शब्द पाहताना केंब्रिज शब्दकोशात शब्दांच्या प्रकारासाठी नवे वर्गीकरण आणि आद्याक्षरे दिसली. c - countable noun ; s - singular noun पूर्वी नुसता n असे.

रसरंग >>>
या शब्दावर आपली कोविड -काळात शब्दरंजन धाग्यावर छान चर्चा झाल्याचे आठवते
. .. ..

कोणी मला algorithm या शब्दासाठी समर्पक व सोपा मराठी शब्द सुचवेल का ?
एखादी सारणी ??

इथले शब्द रुक्ष वाटले :
https://www.khandbahale.com/language/marathi-dictionary-translation-mean...

a set of rules that must be followed when solving a particular problem - आज्ञावली ?
हा शब्द कॉम्प्युटर प्रोग्रामसाठीही हा शब्द वापरतात.
---
मला रसरंगची चर्चा आठवत नाही. शोधतो.

एक मजेदार इंग्लिश शब्द आहे. तो नाम व विशेषण असा दोन्ही वापरला जातो.
नाम म्हणून त्याचे (किमान) ५ तर विशेषण म्हणून दोन अर्थ आहेत. या प्रत्येक अर्थाचा दुसऱ्या अर्थाशी अर्थाअर्थी काही संबंध नाही !

नाम म्हणून अर्थ असे आहेत :
शर्टाची कॉलर/ एक पक्षी/ गाढव/ वाहनातील आसन / वाहनातील विशिष्ट जागा.

काय ओळखू येतोय का हा शब्द ?
करा तर प्रयत्न ..
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या शब्दाला ३ पर्यायी स्पेलिंग्ज आहेत !!
..
..
.. ..
..

dickey, dicky, or dickie

0 ते 999 हे सर्व अंक जर आपण ओळीने इंग्लिशमध्ये अक्षरी लिहून काढले तर एक रंजक बाब लक्षात येईल.
ती म्हणजे,
.. ..
..
..
..

या सर्व अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही a हे अक्षर येत नाही ! (हे विधान वाचनात आले).

पहिला a , आपण One thousand लिहिताना लागतो.
एवढे सर्व अंक मी लिहून पाहिलेले नाहीत. पण प्रत्येक दशकाचा आणि शतकाचा आकडा लक्षात घेतला तर हे पटतंय.

बघा प्रयत्न करून..

>>>.या सर्व अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही a हे अक्षर येत नाही >>> हे भारी आहे.

छान
..
आज एका कोड्यात सहा अक्षरी शब्द जमताना नाकी नऊ आले. पण अखेरीस eureka हे उत्तर मिळाले तेव्हा त्या उद्गारासारखाच आनंद झाला !

आपल्या सर्वांना शालेय जीवनापासून eureka हा शब्द आश्चर्यभरीत उद्गारांसाठी माहीत असतो. परंतु त्याचा दुसरा अर्थ पूर्ण वेगळा आहे :
तांबे व निकेल यांचा मिश्रधातू !

jojoba.jpg

हे झाड आणि त्याची फुले भारतीयांच्या परिचयाची नाहीत. हे झाड मुख्यतः अमेरिकेच्या नैऋत्य भागात येते आणि त्याचे नाव मजेदार आहे :
jojoba

त्याच्या बियांपासून जे तेल काढतात ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. हा शब्द प्रथम उच्चारताना आपल्या “जो जो बाळा रे” या अंगाईगीताचीच आठवण झाली !

handicap या शब्दाचा प्रचलित अर्थ सर्वांना माहित आहे. परंतु 17 व्या शतकापासून ते आजपर्यंत या शब्दाचा झालेला अर्थ प्रवास रंजक आहे :

सन १६५० : hand in cap या नावाचा दोन खेळाडूंमध्ये पैज लावण्याचा खेळ होता त्यामध्ये एक त्रयस्थ पंच देखील असायचा.

१७५४ : त्याचा घोड्यांच्या शर्यती संदर्भात एक वेगळा अर्थ रूढ झाला. (Handy-Cap Match). इथे एक पंच एका घोड्यावर जादा वजन लावण्याचा आदेश काढत असत.

१८९० : पासून दुर्बलता हा अर्थ.

काल सहा अक्षरी वर्डलमध्ये पाचव्या प्रयत्नात अशी अवस्था आली होती
*armic
जाम सुधरत नव्हते. मग शेवटी k टाकून बघितला आणि
karmic
हा शब्द झाला.
karma हा त्यांनी पूर्वीच स्वीकारलेला आहे. परंतु त्याचे हे रूप देखील स्वीकारल्याचे समजले.

IMG-20230222-WA0005.jpg

Pages