शिवाजी महाराज आणि मावळ्यांना बाहुबली बनवू नका

Submitted by आशुचँप on 4 November, 2022 - 05:05

गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?

नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर

हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....

तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?

एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग रायाजी तो भाला पुन्हा वर फेकतो तर तो "येउ द्या" स्टाइलने अजूनही तसाच उभा असल्याने मरतो.
>>>> Lol
हे असं समोरून शस्त्रं येताना त्याला इतरांनी बघत बसणं व ज्याला 'खो' दिलाय त्यानी जवळ येईपर्यंत वाट बघणं, हे अनैसर्गिक रिफ्लेक्सेसचे उदात्तीकरण आहे. शिवाय यांना पेरिफेरल व्हिजनही नाही . आपण माशी आली तर सरकतो, हे मात्र 3D चपळाईने भाला नाकापर्यंत येऊ दिल्यावर शिताफिने(?) पकडतात. हे अबनॉर्मल आहे !!! असे रिफ्लेक्सेस असणारा वीर असणे तर जाऊद्या, गडावर पतंग उडवतानासुद्धा पडून मरून जाईल. Proud

छान लिहिले आहे, आशुचॅम्प व रानभुली ! Happy

आपण माशी आली तर सरकतो, हे मात्र 3D चपळाईने भाला नाकापर्यंत येऊ दिल्यावर शिताफिने(?) पकडतात >>> Lol

सत्या मांजरेकरची मुलाखत बघितली,

वीर मराठा सोडा, तो पुरुष सुद्धा वाटत नाही. टोटल गंडलंय

हो मलाही आला Wink
इंडिगोरूट्स वर टाकलाय कोणीतरी

माझ्याच भावना व्यक्त केल्यात असच वाट्तय. त्यात आणखी त्या त्या सिनेमात काम केलेल्या कलाकारांची गुर्मी आणी,
"कभी कभी लगता हय अपुनीच महाराज हय" हा अ‍ॅटिट्युड.

आशु तुम्ही मनातले बोलला. तानाजी पाहताना अस्वस्थ झाले. महाराजांच्या बालमित्राची मनातली प्रतिमा आणि देवगण काही जुळेना. कितीही अचाट दाखवले तरी थोरले महाराज आहेत म्हणून श्रद्धेने पाहिले. वाटलं हे काय आहे. मग अजून विचार केल्यावर वाटलं प्रत्येकाला महाराज वेगवेगळ्या पद्धतींत दाखवायचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. कोणीतरी येईल अभ्यासू जो दाखवेल वास्तविक काय होते ते. तसाही पोवाड्यामधले, बखरीमधले, पत्रांमधले, शिवभारतातले, कवी भूषण, मोगल तवारीखांमधले महाराज वेगळे तरी विलोभनीय आहेत. राजवाडे, सरदेसाई, मेहंदळे, शेजवलकर, सरकार, डफ, पुरंदरे, इ सगळ्यांची शैली वेगळी.

महाराजांवर बोलायची भीती वाटली नाही पाहिजे कुणाला असा वाटतंय. बहुतेकांना महाराजांची ओळख होतेय. ज्यांना आवड आहे ते अजून खोलात जातील आणि वाचतील. बहुतेकांनी पुरंदरे वाचून सुरुवात केली नंतर हळू हळू खोलात गेलेत. मला वाटतय मुलांना किंवा अमराठी ओळख अजून चांगल्या पद्ध्तीने झाली पाहिजे पण प्राप्त परिस्थितीत पैसे घालवून बनवणारे भालजी नाहीत. एक यादी बनवायला हवी ज्यांनी हे सिनेमे पाहिलेत त्यांनी नेक्स्ट काय पाहिले पाहिजे.

बाकी कळत्या वयात 10 12 वय असणारे आम्ही 4 2 भावंडाना मुद्दाम नेऊन आजोबांनी पसरणीचा घाट दाखवला प्रतापगड पर्यंतचा भूगोल दाखवला. आणि प्रतापगडच्या चढावर शामियान्याची जागा आणि खान वर कसा आला आणि महाराजाणी वर लवकर जाता यावी ती वाट पाहिल्यावर काहीतरी मनात पक्के झाले. 5 शाह्यांच्या समोर 16 वर्षांच्या मुलाचे शककर्ते होणे म्हणजे काय याचा आवाका आजही समजत नाही. पण पुस्तकातला इतिहास आणि वास्तवाची जी सांगड बसवायची सवय लागली ती आयुष्यभर राहिली. कुठेतरी आज तसे आजोबा व्हायचा प्रयत्न करणे हेच हातात आहे.

लेखाशी खूप सहमत. ट्रेलर पाहूनच एकही चित्रपट पाहिलेला नाही. नवीन चित्रपटात मावळ्यांची वेशभूषाही धन्यच!

…तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, संभाजीराजेंचा मराठी दिग्दर्शक-निर्मात्यांना जाहीर इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड होत असल्याने संभाजीराजे संतापले
छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजेंनी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना जाहीर इशाराही दिला.

“छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत. इतिहासाचा गाभा सोडता कामा नये,” असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

>>> चला यांनी तरी किमान काही बोलून दाखवलं
पण आता नुसतं राजकारण होईल आणि मूळ विषय बाजूलाच राहील

सिनेमॅटिक लिबर्टी ही खास टर्म का करावी लागली हेच मला कधी कधी कळत नाही. साहित्यिक स्वातंत्र्य आणि सिनेमॅटिक लिबर्टी यात विशेष असा फरक आहे का, असावा का? >>> मानव यांच्या प्रश्नाला कुणीतरी उत्तर देईल म्हणून वाट पाहिली. हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे खरे तर. पण पुन्हा फिरून वेगळ्ञा धाग्यावर जाण्यापेक्षा आता हाच धागा बहुसमावेशक व्हावा ही श्रीं ची इच्छा !

साहीत्यिक लिबर्टी ही इतिहास / तथ्यांपासून असते. तरीही पुस्तक किंवा मासिक, लेख यातून आपण समोर एखादी वस्तू सिनेमासारखी उभी नाही करत. तिथे कल्पनाशक्तीला वाव राहतो. यावर मायबोलीवर सुद्धा वेगळ्या विषयावर चर्चा झाल्या आहेत. साहीत्यिक स्वातंत्र्य घेत आकाराला आलेली एखादी कादंबरी, समजा श्रीमान योगी आहे. यातले संवाद हे स्वातंत्र्यच आहे. पण जेव्हा या ऐतिहासिक तथ्यांपासून काही अंशी स्वतंत्र पण गाभा न सोडणार्या कादंबरीवर जेव्हां चित्रपट बनवायचा असतो तेव्हां ते माध्यमांतर होते. प्रत्येक माध्यमाची मर्यादाही असते आणि ताकदही. सिनेमा बनवताना कादंबरीबर हुकूम तो बनवता येणे शक्य नसल्यास माध्यमांतरामुळे जे स्वातंत्र्य घ्यावे लागते ती सिनेमॅटिक लिबर्टी.

म्हणून ती टर्म राखीव असावी असे मला वाटते. व्याख्या निरनिराळ्या असतील. नेमके सांगताही येणार नाही. आता मूळ विषयावर बर्यापैकी चर्चा झालेली असल्याने हा विषय भरकटवणारा ठरणार नाही असे वाटते.
सिनेमॅटिक लिबर्टी आणि विषयाचा ताळमेळ पुढच्या प्रतिसादात.

इथे लिहीलेला प्रतिसाद संपतच आलेला. पुन्हा आपोआप सगळे सिलेक्ट होऊन पुढच्या अक्षराने सगळे डिलीट झाले. हे वारंवार होतेय. आता पुन्हा पहिल्यापासून... बापरे !

लंडन इथे महाराजांचे मूळ चित्र आहे. हा संदर्भ सोडून महाराजांची वेशभूषा, चेहरेपट्टी यात विनाकारण बदल करणे याला सिनेमॅटीक लिबर्टीच्या ऐवजी घोडचूक शब्द योग्य होईल. एका शिवकालीन चित्रपटात मिष्टान्नाचे भोजन दाखवले आहे. आजही गावाकडे चटणी भाकरी खाणारी पिढी आहे. थोडे फार धनदांडगे, राजकारणी सोडले तर लग्नात आजही पंजाबी डिशेस ग्रामीण भागात दिसत नाहीत. लाप्शी आणि वांग्यात उसळ घालून केलेली रस्साभाजी हे लग्नातले जेवण असते. निमशहरी भागात बदलले आहे. पण अगदीच संस्कृतीच समजणार नाही इतके काही नामशेष झालेले नाही.

सिंहगड, तोरणा, शिवनेरी इथे स्थानिक, गाईड लोक सांगतात की " राजं मोहीमेवर असताना आपल्यासारखंच भाकरी अन कांदा खायाचं. चटनी भाकर खायाचं". एक म्हातारेसे गाईड सिंहगडला असतात. शाहीर म्हणतात ते स्वत:ला. मला त्यांचे उच्चार कळत नाहीत. पण आपुलकीने सांगतात इतिहास. गाऊन दाखवतात. ते म्हणतात कि आम्ही लहान असताना पिवळा भात (मसाले भात) आम्हाला माहिती नव्हता. आता काय जे उठतंय ते पिवळा भात बनवतंय. आपलं खानं हाय व्हय त्ये ? जे पिकतं तेच खावं मानसानं " शेवटचं पटलं. शिवकालीन खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल समकालीन काही फारसे लिहीलेले नाही. पण महाराजांना कचोरी आवडत असा उल्लेख एका ब्रिटीश अधिकार्याने केला आहे. त्या वेळी महाराष्ट्रात कचोरी असेल का पण ? गुजरातला असावी. असा रिसर्च ऐतिहासिक चित्रपटाला असायलाच पाहीजे. राजांकडे सुग्रास जेवण जे पाहुण्यांसाठी बनत असेल कदाचित. आपणही घरी येणारे पाहुणे विचारात घेऊन मेन्यू बनवतो. त्याप्रमाणे परदेशी पाहुण्यांसाठी कचोरी ऑफर केली असेल...

जिथे हे उल्लेख नाहीत तिथे स्वातंत्र्य घ्यावे लागते आणि ते क्षम्य आहे. पण त्यामागे थोडा वरीलप्रमाणे विचार असावा.
सिनेमॅटीक लिबर्टीचे चांगले उदाहरण म्हणजे संत तुकाराम हा चित्रपट. संत तुकाराम सुद्धा शिवकालीनच. पण त्यांचे एकही चित्र उपलब्ध नव्हते. किमान महाराजांना प्रत्यक्ष समोर बसवून काढलेले चित्र उपलब्ध तरी आहे.

संत तुकारामांची भूमिका विष्णूपंत पागनीसांनी केली. आज संत तुकारामांचे म्हणून जे फोटो प्रत्यक्ष देहूत आहेत ते पागनीसांचे आहे. संत तुकाराम दिसायला कसे होते याची काहीच कल्पना नसल्याने विष्णूपंतांमधे तुकाराम दिसणे ही अत्र्यांची लिबर्टी. ती गरज होती. त्यांचे पागोटे हे त्यांनी तत्कालीन खेडुतांचा अभ्यास करूनच बनवून घेतले होते. ते कसे बोलत असतील, त्यांची शैली कशी असेल हे सर्व सिनेमॅटीक लिबर्टीचे उदाहरण आहे.

त्यामागची भावना चांगली आहे.
इतकी कि या चित्रपटामुळे विष्णूपंत अंतर्बाह्य बदलले. चित्रपटाने धंदा केल्यावर निर्माते जेव्हां मानधन घेऊन पागनीसांकडे गेले तेव्हां त्यांनी सांगितले की तुकारामाने मला जे दिले आहे त्याची भरपाई मी पैसे घेऊन करू ? निर्मोही तुकारामाच्या भूमिकेचे पैसे घेऊ ? त्यांनी नकार दिला. इतकेच नाही तर शेवटपर्यंत त्यांनी तुकारामाचीच वेशभूषा केली. त्यांना मृत्यू आला तो संत तुकाराम नाटकाच्या भूमिकेत असताना वैकुंठगमनाच्या दृश्यात !

छान पोस्ट रानभूली.
तुम्ही माध्यमांतर या दृष्टिकोनातून सिनेमॅटिक लिबर्टी टर्म म्हणजे काय आणि ती का असावी हे उदाहरणासाहित छान समजावले आहे. ती वेगळी टर्म असायला हवी हे पटले.
ती स्वतंत्र परंतु गाभा सोडणारी असली की खटकते.

मानवसर धन्यवाद.
( परत आल्यावर अहो जाहो का करताहेत सगळे?) Lol

रानभूली, तुमच्या सगळ्याच पोस्टी खूप छान आहेत आणि पटल्या.

एक छोटीशी सुधारणा - संत तुकारामांचे पागोटे हे अत्र्यांनी तत्कालीन खेडुतांचा अभ्यास करूनच बनवून घेतले - हे काही खरे वाटत नाही. तत्पूर्वीही अनेक चित्रांत तुकोबांना पागोटे दाखवले आहे, अगदी राजा रवी वर्मा यांच्या चित्रांतही. उलट अत्र्यांनी त्याबरहुकुम व्यवस्थित वेशभूषा निवडली असावी. तुम्ही म्हणता तसे त्याकाळी चित्रपटात शक्य तेव्हढे वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण करणे आणि अभ्यासपूर्ण कलाकृती बनवणे ह्या गोष्टीला लोक महत्त्व देत असत.

तत्पूर्वीही अनेक चित्रांत >>> हपा, संत तुकाराम हा चित्रपट १९३६ साली रिलीज झाला. त्या आधी चार पाच वर्षे त्याची तयारी सुरू असणार.
राजा रवी वर्मा यांचे हे चित्र त्याआधीच असल्याचा उल्लेख आहे का?
१९४५ वा त्या आधी असा उल्लेख तुम्ही दिलेल्या लिंक वर आहे.

बरं, ते माहीत नाही, पण राजा रवी वर्मा १९०६ ला गेले.

http://tukaram.com/english/artgallery.htm इथे १८३२ चा एक उल्लेख आहे (ते चित्र वेगळ्या चित्रकाराचे आहे, पण त्यातही पागोटे आहे).

राजा रवी वर्मा १९०६ ला गेले.> Lol
दुसऱ्या लिंक बद्दल आभार.
( मी नव्हते हो त्या काळात म्हणून तपासून घ्यावं लागतं)

बंडावरून आठवले. सय्यद बंडा जीवा महाला हे नीट वठवले आहेत का अलीकडच्या चित्रपटात की त्यातही अ अ सीन्स आहेत?

जणू मी इकडे १८५७च्या बंडापासून आहे. >>> :हाहा
मला कसं माहीत असेल? एक डाव भुताचा पाहिलाय ना?
मी नव्हते हे चांगलेच ठाऊक आहे. Lol

@लेखातल्या प्रत्येक अन प्रत्येक वाक्याशी १०००% सहमत...
हे असले बाहुबली टाईप ट्रेलर पाहून संताप संताप होतो जीवाचा....
मागे एकदा एका लग्नात मांडवाच्या दारी येणाऱ्या पाहुण्यांच स्वागत करायला मावळ्यांच्या वेशातील काही जण उभे केले होते...येणाऱ्या पाहुण्यांना मुजरा करण हे त्याचं काम.... पाणी आलं होत डोळ्यात ते पाहून...थोडी तरी लाज वाटली पाहिजे अशी हौस असणाऱ्या लोकांना....आणि महाराजांवरील सध्याच्या चित्रपटांवर तर बोलायलाच नको....निव्वळ फालतू गल्लाभरू काम...धड इतिहास माहीत नाही आणि विषयाचं गांभीर्य तर मुळीच नाही....

अगदी !
फारच आचरट प्रकार असतो तो लग्नात दारावर उभे केलेले मावळे म्हणजे. म्हणजे लोकांना सेन्सच नसतो एक मावळा म्हणजे काय याचा. रात्र झाली म्हणून महारांजासाठीही गडाचा दरवाजा न उघडणारा म्हणून मावळ्यांच्या कथा आपण ऐकतो तिथे हे असे..

मागे ईथे वाशीला एका सार्वजनिक गणपतीतही आत महाराज होते आणि दारावर मावळा उभा केला होता. पण तो ऐटीत आपल्या तोर्‍यात उभा केला होता. आम्ही सोबत फोटोही काढले. लेकीला मावळा म्हणजे काय हा आपला ईतिहास अभिमानाने सांगताही आला. पण हे लग्नातले मावळे बघून काय सांगणार ..

लेख खूप आवडला आणि पटला. अगदी मनातले लिहिले आहे असे वाटले. रानभुली व सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. मी तर ह्यातला एकही सिनेमा अजून पहिला नाही. इच्छाच झाली नाही ट्रेलर पाहून. त्यापेक्षा जुने कृष्ण धवल सिनेमे किती तरी पटीने उत्तम आहेत.

मांजरेकरांसारखे मेन स्ट्रीम कमर्शिअल दिग्द्गर्शक/ निर्देशक जे विकतंय ते बळजबरी पिकवून माया जमवायची हाच एक ध्यास घेऊन सिनेमे बनवतात हे आताशा सर्वज्ञात आहे. त्यासाठी चुलीवरल्या भाकरी पिठल्यासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धांना पिझ्झा बर्गर सारखे खमंग, चुरचुरीत, फोटोजेनिक स्वरूपात आपल्या पुढ्यात ठेवतांना, महाराजांचा ईतिहास वारसा लोकांपर्यंत सर्वदूर पोहोचवण्याचा, महाराजांच्या पराक्रमाला, धाडसाला, स्वराज्याच्या स्वप्नाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य हाती घेतल्याची जी मखलाशी करतात आणि मिडीया काल जन्माला आल्यासारखी त्यांचे बोलणे फेस वॅल्यूवर घेत त्याचा सगळीकडे ऊदो ऊदो करते हा सगळाच प्रकार अतिशय चीड आणणारा आहे.

मस्त लेख. पूर्ण पटला.

अक्षय कुमारला महाराजांचा रोल देण्यास तसा आक्षेप नाहीच. पण त्याचे वर्षाला पाच सहा आजिबात पॅशनेट नसलेले सिनेमे काढण्याची सवय डोक्यात गेल्याने कोणत्याही चांगल्या रोलसाठी अक्षय कुमार म्हणलं कि मूड जातो.

Pages