शिवाजी महाराज आणि मावळ्यांना बाहुबली बनवू नका

Submitted by आशुचँप on 4 November, 2022 - 05:05

गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?

नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर

हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....

तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?

एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत! मुळ शिवरायांचे कौशल्य दिसतच नाही यात कुठे. पण शेवटी आपण काय बघायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे असेही वाटतेय! मी तरी यातला एकही सिनेमा अजून पाहिला नाही.. पहावासा वाटत नाही कारण इतिहासाची तोडफोड. शेवटी ज्याची त्याची आवड हा ही मुद्दा आहेच. हे सिनेमे लहान मुलांचे - बालसिनेमे म्हणून घोषित करावेत (ती बाल नाटके नस्तात का सुट्टीत तसे)

सहमत.

हे सिनेमे लहान मुलांचे - बालसिनेमे म्हणून घोषित करावेत (ती बाल नाटके नस्तात का सुट्टीत तसे) +१११११

एकदम मनातलं लिहिलेत . एखाद्या वर्तमान पत्रात हा लेख देता आला तर पहा.
जास्तीत जास्त लोकांनी हा लेख वाचवा असे वाटतंय. व्हॉट्सऍप चा उबग आलाय त्यामुळे तिथे एवढा चांगला लेख पाठवावा असे वाटत नाही.

+७८६ उत्तम लेख !

या लाटेतील एक तान्हाजी पाहिला तेव्हाही हेच वाटले होते. हे काय स्पेशलईफेक्टने सुपरहिरोसारखे चित्रपट बनवले आहेत.
आणि मग कुठला पाहिलाच नाही.

पण हे कुठे बोलायची सोयही राहिली नाही. असे चित्रपट बनत आहेत हे बघूनही लोकांना देशप्रेमाचे भरते यावे अशी जनता अडाणी झाली आहे.
या लेखात जे महाराजांचे पराक्रम लिहिले आहेत ते वाचताना स्फुरण चढणारे जे चित्र आज आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते दुर्दैवाने येत्या पिढीच्या डोळ्यासमोर नसणार Sad

अरे हो, कालच आणखी एक बातमी वाचली. वेडात मराठे वीर दौडले सात. मराठी चित्रपट. ज्यात शिवाजी महाराजांची भुमिका अक्षय कुमार करत आहे. अजून काहीतरी पचवायची मनाची तयारी करून ठेवा Sad

छान विषय आहे. छान लिहीलंत.
चिकवाच्या धाग्यावर थोडक्यात लिहीलेच आहे. अजून काही मुद्दे..

ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत सर्वांच्या जबाबदार्‍या

१, माध्यमे - उगीचच वाद शोधून त्याचा इश्यू बनवणे, दोन समाजात आगी लावणे हे पूर्णपणे बंद व्हायला पाहीजे. ऐतिहासिक चित्रपटांकडे कसे पहावे याचे लोकशिक्षण करायची जबाबदारी मीडीयावर आहे. तशीच सिनेमे बनवणारे पण बेताल होत नाहीत ना हे पाहून परीक्षणात वाभाडे काढण्याचीही. कोणत्याही परिस्थितीत पेटवापेटवी करू नये. ऐतिहासिक चुकीला देशद्रोह, भावना दुखावणे हे स्वरूप देणे पूर्णपणे थांबले पाहीजे.

२. नेते - सामाजिक आणि राजकीय तसेच धार्मिक - बर्‍याच प्रमाणात मीडीयाच्या जबाबदार्‍या यांना ही लागू होतात. पण आपल्या अनुयायांना भावनिक न बनवता कार्यक्रम देणे यांच्याकडून जास्त अपेक्षित आहे. हीच मंडळी चित्रपट, नाटके यांच्या कधी चुका होतात आणि आपल्याला पेटवायला इश्यू मिळतो म्हणून टपलेली असतात.

३. समाजमाध्यमावर उगवलेले स्वयंघोषित समीक्षक - यातले अजेण्डा चालवणारे बंद व्हायला हवेत. कारण यांच्याकडून अपेक्षा ठेवता येत नाहीत. त्यांना कुणी नेमून दिलेले काम असो कि स्वतःच स्वतःला नेमलेले असो, यांचे समीक्षण कधीही नि:ष्पक्ष नसते.

४. प्रेक्षक - सतत भावना दुखावून घेण्यातून लवकर बाहेर पडावे. दा विन्सी कोड वर युरोपातल्या धार्मिक प्रेक्षकांनीही बंदीची मागणी केली नव्हती.
चित्रपटाच्या कथेची मागणी म्हणून येशू आणि मेरी यांच्याबद्दल (आपल्या दृष्टीने) आक्षेपार्ह टिप्पण्या होत्या. असा प्रगल्भ प्रेक्षक घडायला हवा. ऐतिहासिक अचूकतेचा दावा ना लेखक करतो, ना दिग्दर्शक ना प्रेक्षक तसे काही समजतो. तो रूढ अर्थाने ऐतिहासिक नाहीच. पण ऐतिहासिक संदर्भ आपल्या भाषेत मोडून तोडून दाखवले असा आरोप सहज करता येईल.
ऐतिहासिक चित्रपटात सुद्धा दोन ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधले संवाद, प्रसंग हे पदरचे घालावे लागतात. फुटाफुटाला पुरावे मागून हैराण केले तर कुणी त्या वाटेला जाणार नाही.

५. सिनेसृष्टी - सिनेमॅटिक लिबर्टी ही सिनेमाची गरज असेल तर सरळ घ्यावी. प्रेक्षकांशी संवाद साधावा. प्रेक्षक सुद्धा प्रगल्भ होत जातो. आपल्याकडे उलटे होत चालले आहे. पण लिबर्टीची व्याख्या होत नाही याचा अर्थ भारताने ब्रिटनवर साडेतीनशे वर्षे राज्य केले असा ऐतिहासिक चित्रपट बनवावा का याचा सारासार विचार असायला पाहीजे.

संवाद, प्रसंग जरी लिबर्टीचा भाग असतील तरी घोडचुका टाळल्या पाहीजेत. एका जुन्या ऐतिहासिक चित्रपटात घोडे पळताना मागे वीजेचा खांब दिसतो. ही चूक म्हणता येईल.
पण भाषा, त्याकाळाची वाटेल अशी संवादफेक, साधेपणा, वातावरण, पोशाख, खानपान , पेयपान याचा अभ्यास करायला पाहीजे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रंगीत वस्त्रे कितपत वापरत याचा अभ्यास टीमने करायला पाहिजे. कोणती वस्त्रे असत , कापड कोणते, दरबार कसा असेल ? त्यात लाकडी खांब असतील , दगडी भिंती असतील कि कसे हा अभ्यास असावा ही सामान्य प्रेक्षकांची अपेक्षा. दगडी भिंती नुकत्याच रंगवलेल्या थर्माकोलच्या दिसू नयेत. रंग खूपच ताजा काळा वाटतो. नितीन देसाईंचं नेपथ्य लगेच कळून येतं. बिजॉन दास गुप्ता यांनी एका गाण्यापुरतं एक छोटंसं टुमदार गाव उभं केलं होतं. ते खूपच खरंखुरं आणि देखणं होतं. अर्थात गाणं असंल्याने त्याच्या बाजूला नायक, नायिका गावाकडे पाहताना दाखवल्यावर ते टेबलावर बनवलेले स्केल मॉडेल आहे हे समजून आश्चर्य वाटलेल. त्या वेळी व्ही एक्स एफ नसणार.

पुढच्या पोस्टमधे वेगळे मुद्दे.

वाक्या-वाक्याशी सहमत..
कृपया हे लेखन त्या निर्माता- दिग्दर्शक यांच्यापर्यंत पोहोचवा, आणि सर्व शिवराय प्रेमींच्या पर्यंत सुद्धा..

आशुचँप, अक्षरशः प्रत्येक शब्दाला आणी मुद्द्याला अनुमोदन.

पन्नाशीत आभाळाएव्हढं कर्तृत्व गाजवून ह्या जगाचा निरोप घेतलेल्या राजाची किंवा त्याच्या सवंगड्याची भुमिका पन्नाशीपुढले थोराड नट रंगवतात, तद्दन फिल्मी डायलॉग्ज किंवा चालू राजकीय घोषणा देतात, इतिहासातल्या गौरवास्पद लोकांना/घटनांना आचरटपणाच्या पातळीवर आणून बसवतात आणी प्रेक्षकसुद्धा ‘असू दे, त्यामुळे मुलांना/महराष्ट्राबाहेरच्या लोकांना मराठी इतिहास तर कळला‘ अशी दरिद्री मानसिकता दाखवणारी भुमिका घेतात, हे सगळंच प्रचंड उबग आणणारं आहे.

लेख आवडला आणि पटला

सिनेमॅटिक लिबर्टी ही सिनेमाची गरज असेल तर सरळ घ्यावी.
असहमत. उद्या लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवले तर चालेल का? समाजात बरेच लोक वेगवेगळे अजेंडे राबवून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी टपलेले आहेत. अशा लिबर्टीज मुळे त्यांचे फावेल.

महाराजांची सेना म्हणजे अ‍ॅव्हेंजर्स दाखवण्यापेक्षा इतिहासात थरार आणि नाट्याचा बंदोबस्त महाराजांनी करून ठेवलेला आहे. महाराजांवरचा चित्रपट म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाची सोय म्हणून त्याकडे बघणारे आणि ध्रुवीकरणाला विरोध करणारे प्रत्यक्षात त्यातल्या धार्मिक फुटीलाच चर्चेत ठेवत असतात.

अफजलखान म्हणजे गब्बरसिंग असे त्याचे घोडेछाप चित्रण असते. प्राचीन काळच्या भीमाची आणि बकासूराची लढाई असावी तसा रंग या युद्धाला दिला जातो. मुळात यातल्या मुत्सद्दीपणाला समोर आणलेच गेलेले नाही. ज्या ज्या वेळी दोन टीम सारख्याच ताकदीच्या दाखवल्या जातील तेव्हांच विजयाचे महत्व पण दहा पट होते.

अफजलखान आडदांड होता, साडेसहा फूट होता इतकेच आपल्याला माहिती आहे. पण तो धूर्त, मुत्सद्दी, कपटनीतीत हुषारही होता हे दाखवले जात नाही. महाराजांना पकडायला डोंगरावर जायचे नाही तर महाराजांना खाली यायला भाग पाडले पाहीजे ही त्याची रणनीती होती. त्या दृष्टीने त्याने स्थानिक महत्वाकांक्षी लोकांना सल्ल्यासाठी मोहीमेत भरती केले होते. काय केले तर शिवाजी महाराज खाली येतील यावर खलबते होत असत. त्यानुसार आधी प्रजेला त्रास दिला. मात्र त्याने प्रजा बधली नाही. महाराजांच्या विरोधात गेली नाही.

हा वार सपशेल फेल गेल्यावर त्याने महत्वाच्या देवालयांची लूट केली. छोटी मोठी देवळे ध्वस्त करायला सुरूवात केली. गावातले वीरगळ काढून फेकायला सुरूवात केली. शीवेवरचे मंदीर तोडून गावाला भावनिक बनवून महाराजांकडे गार्हाणे घेऊन जावे हा डाव होता. मात्र महाराजांनी हा डाव ओळखून गोसावी, पिंगळे, कुडमुडे आदींच्या माध्यमातून जनक्षोभ नियंत्रित ठेवला. एव्हढी नासधूस होऊनही महाराज येत नाहीत हे पाहून चिडलेल्या खानाने मग लोकांना राजाविरूद्ध उकसवायला सुरूवात केली. मात्र राजांच्या हेरांनी हा डाव सुद्धा हाणून पाडला.

युद्धापेक्षा हा भाग जास्त बुद्धीला चालना देणारा, महाराजांची थोरवी सांगणारा आहे. पण असा प्रसंग महाराजांच्या चित्रपटात येत नाही. भालजींच्या काळाला आता वर्षे लोटली. आताचा प्रेक्षक जास्त प्रगल्भ असायला हवा. पण तसा तो आहे का ? आजचे मेकर्स कला म्हणून चित्रपट बनवतात का ?

सगळेच मुद्दे अनुत्तरीत आहेत.
( संपादन : टंकणदोष होते ते काढलेत फक्त)

वाचून एकदम स्फुरण चढले. खूपच तळमळीने लिहिले आहे तुम्ही। व आजकाल खरंच हे शिवरायांवर आलेले चित्रपट नाही आवडत। जुने सूर्यकांत आणि चंद्रकांत यांचे चित्रपट पाहताना अगदी आपलेसे व खरे वाटायचे अगदी साधीशी ढाल तलवार घेऊन लढली जाणारी लढाई बघताना भले शाबास , वाह असे शब्द आपसूकच निघायचे पण आता तुम्ही म्हणता तसे अचाट साहस दृश्ये मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार बघून शेवटी काय टेक्नॉंलॉजीची कमाल आहे असे वाटते। पण ते इतिहासाशी रिलेट होत नाही।

शब्द अन शब्द पटला.

आताच्या आलेल्या लाटेत फर्जंद बरा वाटला.
अर्थात त्यातही सरळसोट कडा चढताना दाखवलंय. असा कडा पन्हाळा किल्याला एकाच बाजूने आहे. इतर अनेक मार्ग आहेत. त्यातील शत्रू गाफील असणार त्या मार्गाने जाणे इतके बुद्धीचातुर्य महाराज आणि मावळे ह्याकंडे नक्कीच होते.
नंतरचे तर नुसते फुसकी नाट्यमयता दाखवणारे चित्रपट.
तान्हाजी तर काहीही लिबर्टी घेतलेला चित्रपट.
तोफ काय आणि काय काय.

जुने चित्रपट पाहायला अजूनही छान वाटतं.
आता बजेट आहे, कलाकार आहेत, vfx आहे पण जे पोहचवायचं ते पोहचवण्याची कल्पनाशक्ती, creativity आणि ताकद नाहीये का हा प्रश्न पडतो.
अनेक नाट्यमय घटना आहेतच की ह्या अख्ख्या चरित्रात.
त्यात तुमचा फुळकावनी मसाला कशाला?

सिनेमॅटिक लिबर्टी हा आपल्या ईथला आचरटपणा आहे.

आपले दिग्दर्शक/नटनटी मंडळी कायम ईंग्रजीत बोलतात, यांचे आदर्श कायम हॅालिवुडचे श्रेष्ठ दिग्दर्शक व नटनटी असतात पण हे कामाला ऊतरले की यांची सिनेमॅटीक लिबर्टी काय तर मस्तानी व काशीबाई तमासगीर बायांसारख्या साड्या नेसुन झिम्मा घालताहेत, बाजीराव कशी वाट लावली म्हणत थयथयाट
करतोय, पारो व चंद्रमुखी गळ्यात गळे घालुन डोलताहेत. यांची कल्पनाशक्तीही यांच्यासारखी दृष्टीहीन.

असो. यथा राजा तथा प्रजा सारखेच आहे हे. भरपुर अभ्यास करुन चित्रपट बनवायचे कष्ट कोणी घेतलेच तर त्याला लोकाश्रय किती मिळेल ही शंका आहेच…

लेख पटला.
रानभूली यांची पोस्टही पटली.

सिनेमॅटिक लिबर्टी ही खास टर्म का करावी लागली हेच मला कधी कधी कळत नाही. साहित्यिक स्वातंत्र्य आणि सिनेमॅटिक लिबर्टी यात विशेष असा फरक आहे का, असावा का?
मृत्यूंजय हे सुद्धा साहित्यिक स्वातंत्र्यच. दा विंची कोड मध्ये सुद्धा ते आहे. जेव्हा असे स्वातंत्र्य घेऊन चित्रपट बनवला तर त्याला साहित्यिक स्वातंत्र्यच म्हणावे असे वाटते.
त्याला विरोध नसून आचरटपणाला आहे.

कुठेही नाचगाणे घुसवणे याला एक वेगळे नाव हवे असेल तर त्याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणता येईल. त्यालाही हरकत नसेल पण युद्धाच्या आदल्या रात्री जर सदाशिवराव आणि अब्दाली यांच्यात कवालीची जुगलबंदी दाखवली तर तो आचरटपणाच वाटेल ना.

लेख प्रचंड पटला. हल्लीच्या सिनेमांत सहजता दिसत नाही. उगाचच लार्जर दॅन लाइफ दाखवण्याच्या नादात अचाट बनवून बसतात.

रानभुली यांचे प्रतिसादही आवडले.

सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि तुझी लाल करतील.

हा संवाद साधारण असा असता.

समयोचित लेख !
रानभुली यांचे पटले ! विशेषतः "भालजींच्या काळाला आता वर्षे लोटली. आताचा प्रेक्षक जास्त प्रगल्भ असायला हवा. पण तसा तो आहे का ?"

लेखातील वाक्या वाक्याशी सहमत. रानभूली यांची पोस्ट पण पटली. भोंदू फॉरवर्ड पेक्षा हे असे लेखन WhatsApp वर viral व्हायला हवे. आशूचॅम्प तुमची परवानगी असल्यास नावासहित whatsapp ला ढकलते.

यथा राजा तथा प्रजा सारखेच आहे हे. भरपुर अभ्यास करुन चित्रपट बनवायचे कष्ट कोणी घेतलेच तर त्याला लोकाश्रय किती मिळेल ही शंका आहेच…
>>>>>>>>>

साधना +७८६
त्या भडक बटबटीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या क्रेझबद्दल मी जी भिती व्यक्त केलेली तीच ईथेही आहे.
लोकांनाच आता हे आवडू लागले आहे.

रानभुली तुमच्याही पोस्ट आवडल्या

आशूचँप आणि रानभुली मस्त पोस्ट्स! अक्षयकुमार वाली बातमी वाचूनच डोक्याला हात लावला होता. शिवाजी महाराज असो की गांधी , नेहरू , आंबेडकर, सगळ्यांना आपापल्या अजेन्डाचे ब्रँड अँबॅसॅडर करून टाकले जाते हल्ली.

आशुचँप, १००% सहमत. पण मेजॉरिटी पब्लिकला हेच हवं असतं बघायला आणि कुठून का होईना मुलांना इतिहास कळतोय ना हे शेपूटही जोवर लावले जातेय तोवर हे असंच चालणार. बहिष्कार टाकायला हवा असल्या आचरटपणावर.
मध्यंतरी रमा माधव का कोणतातरी मराठी पिक्चर बघायला चालू केला होता. पूर्ण बघायची इच्छा झाली नाही. अशा करामती त्यात नसाव्यात पण साड्या, दागिने ह्यात पूवीच्या काळाशी सुसंगत दाखवणं का कठीण असावं काही कळत नाही.

सहमत.
स्वतःचा विचारच करू न शकणारा अख्खा समाज आपण उभा केलेला आहे. कोणी बहिष्कार टाका म्हटलं की चालले टाकायला, कोणी महाराजांना ग्रेट म्हटलं की चालले सुपर ह्युमन बघायला. रॉ पराक्रम दाखवणं सोपं असतं, डावपेच, कावे हे सिनेमाच्या भाषेत परिणामकारण आणायचे तर तंत्रज्ञान आणि पटकथा या पेक्षा जास्त लेखन/ कथा लिहावी लागते. इतका विचार, इटरेशन्स कोण करणार. कमीत कमी कष्टाचा मार्ग अनुसरा.
परत लोकांना हेच आवडतं हे समर्थन आहेच. आपली लोकसंख्या बघता ५-१०% मंद लोक सापडणे कठीण नाही. त्यात पिक्चर चालून जाईल. (स्वगत: ९०% सापडले तरी आश्चर्य नाहीच)
पुढच्या पिढीला मराठी असे थिल्लर चित्रपट बघून इतिहास समजेल या भीती मुळे असले पिक्चर बनवू नका याला मात्र अजिबात समर्थन नाही. पुढची पिढी सारासार विचार जास्त करते हे मला तरी इथे दिसतं तसं भारतात नसेल आणि झापडबंद पिढी असेल तर ते खड्ड्यात जातीलच. चित्रपट बघा नाहीतर बघू नका.

आशुचँप,
ऑफिसचा laptop reboot होईपर्यंत मायबोली बघू म्हटलं तर हा लेख दिसला आणि प्रतिसाद दिल्याशिवाय राहवलं नाही. तुमच्या प्रत्येक वाक्याशी अनेकवार सहमत ! माझेच विचार मांडले आहेत. अर्थात मला ते इतके मुद्देसूद आणि तपशीलवार लिहिता आले नसते. या विषयाला वाचा फोडल्याबद्दल खूप खूप आभार ! प्रतिसाद सवडीने वाचेन.

Pages