शिवाजी महाराज आणि मावळ्यांना बाहुबली बनवू नका

Submitted by आशुचँप on 4 November, 2022 - 05:05

गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?

नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर

हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....

तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?

एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://youtu.be/xghq-2kTeoo

सुभेदार

तान्हाजी मालुसरे यांच्यावर चित्रपट
ऐतिहासिक लाटेतला अजून एक

पण अजय देवगण पेक्षा अजय पुरकर कैक पटीने सरस वाटतोय
आणि आचरटपणा नाही, विकृत दिसणारा सैफ अली नाही
संवाद मस्त आहेत, बजेटमध्ये मार खाल्ल्याने लढाई प्रभावी वाटत नाही
मृणाल देव आणि जिजाबाई हे कॉन्ट्रॅक्ट किती वर्षांचे आहे?
आणि कायमच असणार आहे का Happy

बजेटमध्ये मार खाल्ल्याने लढाई प्रभावी वाटत नाही >>>>> ते तर खूप आधीपासूनच कमी झालंय.
मृणाल देव आणि जिजाबाई हे कॉन्ट्रॅक्ट किती वर्षांचे आहे? >>>>> हे कितव पुष्प आहे हे? 8 फुलं होईपर्यंत असाव हे contract.

हे कितव पुष्प आहे हे? 8 फुलं होईपर्यंत असाव हे contract. >>> हाहाहा. मलाही असंच वाटतं. हे पाचवे पुष्प असावं .

छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चि मां फिक्स.

> हाहाहा. मलाही असंच वाटतं. हे पाचवे पुष्प असावं .

छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चि मां फिक्स.>>>>>>>>
सुभेदार देखील पडणार हे निश्चित !
लोकं वैतागली आता प्रत्येक भागात चिन्मय आणि मृणाल ला बघून .
त्या लांजेकर ने मराठी प्रेक्षकांना गृहीत धरणे आता बंद करावे .

ऑ? अहो फ्रांचैसी बनवतायत लांजेकर. प्रत्येक भागात वेगळे कलाकार घेऊन कसे चालेल.

माझ्या मते टाळ्याखाऊ बालिश संवाद सोडावेत. जरा चांगले संवाद आणि चांगली स्क्रिप्ट करावी भरपूर सुधारणा होईल...

Pages