चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घोरीला मारले ती कथा पृथ्वी राज रासोमध्ये आहे
त्याचे डोळे काढतातपन तो आवाजाच्या दिशेने लक्ष्यभेद करतो वगैरे
पण रासो हे काव्य आहे आणि ते कित्येक वर्षांनी लिहिलं गेलं आहे

त्यामुळे ते विश्वसनीय नाहीये

पदमावत मध्ये पण विल्हेवाट लावली होती

त्यातही दोन हिंदू राजे एकमेकांना मारून मरतात , खिलजी शेवटी येतो ,पण जोहारचे खापर खिलजीवर फुटले

काल दुपारी केजीएफ-2 पाहिला..केजीएफ वन पण आवडला होता हा पण आवडला. (प्राईमवर)

काल संध्याकाळी आर आर आर पाहिला- भव्य सेटिंग्ज, दोघांचाही अभिनय मस्तच, स्टोरी पण चांगलीच आहे....सिनेमे आम्ही एन्टरटेन्मेंट साठी बघत असल्याने लॉजिकचा विचार डोक्यात येत नाही.. एन्जॉय करनेका भाई Lol आवडला हा पण. (झीफाईववर)

आज दुपारी kuttram kuttrame (crime is a crime) तमिळ बघितला...मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स, इन्वेस्टिगेशं.. चांगला..अनप्रेडिक्टेबल होता.(प्राईमवर)

आज संध्याकाळी ऑक्टोबर-हिंदी बघितला.
ठिक आहे..थोडा संथ आहे.इमोशनल आहे.(प्राईमवर)

पृथ्विराजमधे त्या जौहरच्या सीनची वाट लावली आहे. संयोगिता आणि बाकी स्त्रिया पुरुषी वेश धारण करून 'योध्दा बन गयी मै' म्हणत जोशात नाचतात. एकूण रंग असा की या वीररसयुक्त गाण्याच्या शेवटी त्या शस्त्र धारण करून घोरीच्या फौजेवर आक्रमण करणार आहेत. पण त्यांच्या रणरंगाची इतिश्री धावत जाऊन जौहरकुंडात आगीत उड्या मारण्यातच होते Sad

पद्मावत मधला जौहर निदान त्या काळाशी सुसंगत तरी होता, स्त्रिया लग्नातील सणासुदीचे कपडे, दागिने वगैरे साजश्रुंगार करून कुलस्वामिनीची पूजा करून विधीपूर्वक जौहर करायच्या. पण पृथ्विराज मधे जौहर फेमिनिस्ट (?) दाखवायच्या प्रयत्नात हास्यास्पद झाला आहे.

चर्चगेट स्टेशनच्या बाहेर किंवा पुणे स्टेशन भागात मोलेदिना हॉल बस टर्मिनसच्या बाहेर एक गारूडी जादूचे खेळ दाखवायचा. सुरूवातीपासून त्याला एक जण आडवे लावणारे प्रश्न विचारत असतो. तू हातचलाखी केली असशील, तू पब्लिकला येडं बनवतो. गारूडी कम जादूगार न चिडता नम्रतेने त्याला उत्तरं द्यायचा. हळूहळू पब्लिकला त्या प्रश्न विचारणार्‍या माणसाचा राग यायचा. कारण ते लॉजिक नाहीत बघायचे. ते जादूगाराच्या बाजूने व्हायचे. (कधी कधी गारूड्याचा ऐवजी माकडवाला असायचा).

मग शेवटचा जालीम उपाय जादूगार पोतडीतून काढायचा. माझ्या जादूवार ज्यांचा विश्वास नाही त्यांनी चॅलेंज स्विकारा. मी त्याला मुलाची मुलगी बनवणार. जर मी खोटारडा असेन तर हे चॅलेंज स्विकारायला पुढे या. घाबरून कुणीच पुढे यायचं नाही. सगळे त्या माणसाकडे बघायला लागतात. मग तो माणूस पुढे येतो. " अरे ये झूठा है. कुछ नही होगा. पब्लिक खालीपिली डरती है" . मग जादूगार तीन वेळा त्याला संधी देतो. पण हा हट्टीपणे ठाम राहतो. शेवटी जादूगार म्हणतो कि मी याला तीनदा चान्स दिला. आता मी जबाबदार नाही. आणि तो गिली गिली असा मंत्र म्हणून छू म्हणतो. माणूस हसत असतो. जादूगार म्हणतो. चेक कर. ( इथे त्याचे शब्द देऊ शकत नाही).

तो माणूस चेक करतो आणि मोठ्याने रडायला लागतो. " अरे इसने तो सच्ची मे ................." . मग तो पाया पडतो. जादूगार "अब कुछ नही हो सकता. मै तो झूठा हूं ना " असं म्हणतो. पब्लिक हा खेळ एंजॉय करू लागतं. हसत असतं. त्या माणसाची फजिती बघून त्यांना आनंद होत असतो. सारखं लॉजिक बघत असणार्‍या त्या माणसाचा पब्लिकला राग आलेला असतो. आता चांगला धडा शिकवला असं वाटत असतं.

मग नंतर दया येऊन जादूगार त्याला पुन्हा मुलीचा मुलगा बनवतो. ( इथेही शब्द अर्थात वेगळे आहेत).
खूप वर्षांनी पेपरमधून काही जणांनी भांडाफोड केली कि तो माणूस पण त्याचाच साथीदार असतो. पब्लिक काही लॉजिक बघत नसल्याने त्यांनी एंजॉय केलेलं असतं. ते समर्थांनी ज्या काही विशेष लोकांची लक्षणे सांगितलेली आहेत त्यांच्यात जमा झाल्याची त्यांना खबरही नसते.

जोपर्यंत असं पब्लिक आहे तोपर्यंत सिनेसृष्टीतले गारूडी जादूचे खेळ दाखवत राहणार.

काल भुलभुलैय्या 2 पाहिला. मिक्सड भावना आहेत. (स्पॉयलर आहेत !)

पहिले म्हणजे सिनेमा खूपच मनोरंजक होता. खुप ठिकाणी खळखळून हसू आले. अर्थात एकामागून एक विनोद येत असल्याने काही विनोद फ्लॅट पडले हे सुद्धा ओघाने आलेच. तितके चालायचेच.

कार्तिक आर्यन दिसतो छान. पण त्याचे काम आवडत नाही हे पुनःश्च अधोरेखित झाले या सिनेमात. त्याने जे विनोदी काम केले आहे तसेच इतर बऱ्याच सिनेमात केले आहे. आणि जिथे त्याने भीतीदायक काम करायचे होते तिथे अजिबात भीती वाटली नाही.

कियारा अडवाणी खूपच मोहक दिसली आहे या सिनेमात. डोळ्यांचे पारणे फिटले.

कथा बऱ्यापैकी होती. पण प्रेडीक्ट केले सगळे तसेच झाले. तब्बू ने जुळ्या बहिणींचा रोल केला आहे म्हणल्यावर जी प्रेडिक्शन केलेली ती खरी ठरली. मला वाटलेले सुरवातीला तब्बूला भूत खेचत घेऊन जात असते तेव्हाच स्वीच झाले असणार. तो एक मायनर डिटेल सोडला तर "बहिणींनी जागा स्वीच केल्या" हे बरोबर ठरलं.

च्यामारी, १८ वर्षे मंजुलिकेने किती लळा लावला सगळ्या घराला. (हा नवऱ्याला गच्चीवरून ढकलले आणि काही भोचक लोकांना मारले हा मायनर भाग सोडून देऊया) शेवटी तिची हाडे बिडे अंजुलिका कचाकच तोडत असते, कोणाला काहीच वाटले नाही काय ? निवांत गाड्या घेऊन निघून जातात.

त्यापुढे, जेव्हा अंजुलिकेचं भूत ती अंजुलिका आहे आणि जिवंत तब्बू हीच मंजुलिका आहे सांगते तेव्हा टिपिकल व्हिलनिश फ्याशनमध्ये मंजुलिका सरळ डाव सोडूनच देते, आणि अगदी दुष्ट बोलणे आणि दुष्ट हसणे असे प्रयोग दाखवून भुताचे म्हणणे कसे खरे आहे असे सिद्ध करते. च्यामारी आपण पण थोडा खेळ खेळायचा कि ! म्हणायचं- "लोकहो, हे मंजुलिकेचे भूतच आहे. ते सरतशेवटी एका दुष्ट पाताळयंत्री बाईंचे भूत आहे. ते खोटे बोलणारच. हा गधडा कार्तिक आर्यन लगेच फसला. तुम्ही तरी फसू नका. मी तुमच्यासोबत एक नाही दोन नाही चांगली अठरा वर्षे संसार केला आहे."

बाकी तिच्या नवऱ्याला बोलता येत नाही लिहिता येत नाही ठीक आहे. पण निदान घंटी तरी वाजवता येत असावी ना ? (आठवा- ब्रेकिंग बॅड मधला व्हीलचेअर वाला म्हातारा)
तोंड वेंगांडून का होईना, काहीतरी कम्युनिकेशन येते ना ? मग अठरा वर्षांत त्याने का बुवा कम्युनिकेट केले नाही ?

बाकी ओव्हराल सिनेमाचा पहिल्या सिनेमाशी कसलाही सिनेमा नव्हता. लेखकाने "चांगले भूत सिरीज" मध्ये नवीन कल्पना म्हणून "चांगले भूत वि. तांत्रिक व्हिलन" अशी एण्ट्री लिहिली. त्यात बहिणींची नावे काहीतरी जेनेरिक असावीत- सीता गीता टाईप.
पण प्रोड्युसर म्हणाला- "ए आपण ह्याला भुलभुलैय्या 2 म्हणूया. बहिणींची नावे मंजुलिका आणि...... हा हा, अंजुलिका ठेवूया. बक्कळ पैसे येत्याल. कास्ट आपली आधीचीच राहू दे फक्त पहिल्या सिनेमातले कोणीतरी घेऊया. विद्या बालन नको. अक्षय कुमार परवडत नाही. (आधीच सीजीआयचे बजेट कट करून कार्तिक आर्यन आणि कियारा घेतलीये.) हा ! राजपाल यादव परफेक्ट. त्यालाच घ्या."

सिनेमातले काही विनोद अतिशय टेस्टलेस आणि क्रीन्ज होते. राजपाल यादवचे जवळपास सगळे सिन- खासकरून त्याच्या "बायकोचे".

राजपाल यादवची तीच ती कॉमेडी बोअर मारते आता. कार्तिक आर्यनच्या कॉमेडीसाठी, तब्बूच्या अभिनयासाठी आणि कियाराच्या सौंदर्यासाठी नक्की बघा..

चमन-बहार (नेटफ्लिक्स)

कॉमेडी-ड्रामा. ऑफ-बिट स्टोरी आहे. जितेंद्र कुमारने चांगलं काम केलंय. बाकीचे कलाकारही चांगले आहेत. तरी सिनेमा चांगला होता-होता राहिलाय. कथा आणि स्क्रिप्ट दोन्हींवर आणखी काम करायला हवं होतं.

काही लक्षात राहणारे मोमेन्ट्स/प्रॉप्स आहेत - दुकानातल्या घड्याळातली वेळ, हिरॉइनची चित्रकला, भटका कुत्रा, 'सोनम गुप्ता बेवफा है', बंगला-विरुद्ध-पानाची-टपरी,
त्या-त्या ठिकाणी हळहळले, की आणखी चांगला करता आला असता. 'पंचायत'स्टाइल ट्रीटमेंटचा प्रयत्न आहे, पण एक्झिक्युशनमध्ये कमी पडलाय.

तरी काही ऑफ-बिट बघायचं असल्यास चांगला आहे.
हिरॉइनला एकही डायलॉग नाहीये.

कार्तिक आर्यनच्या कॉमेडीसाठी, तब्बूच्या अभिनयासाठी आणि कियाराच्या सौंदर्यासाठी नक्की बघा..>>> . इतर दोघांचा बाजार उठवायचा असेल तर आपण कोण अडवणारे?
पण तब्बूने काय घोडं मारलंय? चांगली अभिनेत्री आहे, वेगळे रोल लिहितात तिच्यासाठी

केजीएफ टू पाहिलेला नाही. वेळ जात नसेल तेव्हा वेगळ्या अपेक्षा ठेवून पाहीन. हिरोपंती २ प्रमाणेच हा ही निराश करणार नाही असे वाटते.

As per reports, Samrat Prithviraj has seen a massive drop in occupancy over morning shows on its first Monday. In fact, it is being said that the film saw occupancy pegged at just 9% with certain locations also reporting that shows of the film have been cancelled due to no audience. In locations like Akola [Miraj], Raigad [Carnival], Prayagraj [Starworld], Punjab and Satara, theatres have been reporting lack of bookings leading to cancellation of shows.

https://www.bollywoodhungama.com/news/box-office-special-features/samrat...

नवा टॉप गन वीकांता ला पहिला.

फायटर प्लेन्स चे स्टंट्स जोरदार आहेत.

टॉम क्रूझ वयाच्या साठाव्या वर्षीही कमालीचा फिट दिसतो आणि अजूनही सगळे स्टंट्स स्वताच केले आहेत.

बघायचाच असेल तर नक्की थेटर मध्ये जाऊन बघा. टीवी स्क्रीन वर मजा येणार नाही.

मी काल जूना टॅापगन बघितला.. शाळेत असताना बघितलेला, तेव्हा फार कळालाही नव्हता .. पण नविन बघण्याआधी म्हटलं पुन्हा हा बघावा.. हा मुव्ही जरी फायटर प्लेन्सबद्द्ल असला तरी टॅाम क्रूझचं बाईक चालवतानाच पोस्टरच जास्त हिट झालेलं.. आता दुसरा पार्ट थिएटरलाच बघेन

चमन बहार बघताना जरा स्लो वाटला होता पण तरीही इंटरेस्टिंग होता.

लोकांना आता इतिहासातील जगात भारी व्यक्तिरेखांवरच्या पिक्चर्सचा फटीग आला असावा. ४-६ महिन्यांनी एखादा आला तर इंटरेस्ट राहील.

झोंबिवली मस्त आहे गुड सजेशन.
रन वे ३४ पण उत्तम आहे अजय देवगणने छान काम केले आहे.
विमानातील शुटिंग पण मस्त.

चमन बहार भं कस होता .मी लिहिले पुर्वी. संदेशपण चुकीचा आहे सिनेमातला. नुस्ता वेळकाढुपणा केला आहे.पंचायत मुळ खुप अपेक्षा होत्या. अक्षरशः वाया घालवलय चांगल्या कलाकरांना.

केजीएफ २ पाहिला. खूप गोंधळ उडाला आहे. ठराविक अंतराने रॉकीची आई आणि त्याचे लहान असतानाचे प्रसंग येतात. त्याच बरोबर आत्ता रॉकीच्या साम्राज्यातला एक पोरसवदा तरूण , जो मारला जातो त्याच्या आईचेही प्रसंग येत राहतात. दोघीतला फरक लवकर समजत नसल्याने तसेच फ्लॅशबॅक कधी सुरू झाला, कधी संपला, आत्ता आपण कुठल्या काळात आहोत हे कळत नसल्याने बर्‍याचदा लिंक लावून घ्यावी लागतेय.

केजीएफ किंवा पुष्पा या दोन्ही चित्रपटांना खर्‍या घटनांचा आधार आहे. पण त्यावरून जसेच्या तसे काही हे चित्रपट घेतलेले नाहीत. पण एक सशक्त कथा नक्कीच आहे. केजीएफची ट्रीटमेंट वेगळी आहे. इतपत जमेच्या बाजू आहेत. कथेचा डोलारा पडद्यावर उभा करताना मात्र तो साऊथच्या अचाट हिरोईझमच्या अंगाने उभा केला जातो. त्यालाही आक्षेप नाही. पण हिरो एकटाच हजारो लोकांना मारतो, ते ही नि:शस्त्र ! अशा हाणामारीच्या प्रसंगात काहीही वेगळेपणा नाही.

संजय दत्तच्या (अधिरा) अड्ड्यावर हिरोला फसवून आणले जाते. तिथे त्याला शेकडो कमांडोजनी वेढा घातलेला असतो. शेकडो मधला सर्वात पहिला हा शिक्षकांनी वर्गात हजेरी घ्यावी तसा हिरोच्या अंगावर पहिल्यांदा धावून जातो. त्याला एका फटक्यात हिरो गारद करतो. मग दुसरा उजव्या बाजूने येतो. हिरो चालत चालत त्याच्याच शस्त्राने त्याचा गळा चिरतो. हिरो चालताना एक किंवा दोघांनीच अंगावर यायचे असते हा नियम सर्व जण कसोशीने पाळतात. कधी तो दोन्ही हात वापरतो. कधी कंटाळा आला कि डाव्या बाजूने आलेल्याला किंचित कंबर वाकवून डोकं झुकवून वार चुकवून हात उर्फ भुस्काटफोडी शस्त्राने मर्त्य माणसाच्या शरीराची माती वेगळी करत असतो.

हे नियम पाळण्याच्या शिस्तीमुळे आता पाच जण जरी त्याच्या भोवती असतात, तरीही ते एकत्र वार करण्याचा विचार सुद्धा करत नाहीत. येतो तो तिसरा. क्षणात तो हवेत उडतो. मग हिरो खाली वाकून दोन्ही हातांनी धप धप धप असे काही शॉट मारतो. आणि स्लो मोशन मधे सगळेच हवेत उडालेले दिसतात. इथे प्रेक्षकाने हे समजून घ्यायचे असते की हा सर्व प्रकार पापणी लवण्याच्या एक हजाराव्या भागात झालेला आहे आणि त्याच्या एकसामाईक समीकरणाचा परिणाम म्हणून सगळे हवेत उडालेले आहेत. हाणामारीच्या सर्वच दृश्यात सायन्स पाळले जाते हे पाहून समाधान वाटते. एका दृश्यात एक सायन्स, दुसर्‍या दृश्यात दुसरे असा प्रकार नाही इथे. प्रामाणिकपणा आवडला.

यातले एक पात्र तर म्हणते सुद्धा कि फिजिक्स दोन प्रकारचे असते. एक न्यूटनचे आणि दुसरे रॉकीचे !
न्यूटनच्या फिजिक्स मधे सफरचंद खाली पडते पण रॉकीच्या फिजिक्समधे माणसं हवेत उडतात. हेच हिरोपंतीच्या पोस्टवर लिहीले होते. थोडक्यात हा काही चेष्टेचा भाग नाही. साऊथने हे खूप गांभीर्याने घेतलेले आहे. त्यांनी शास्त्रं नव्याने लिहायला घेतलेली आहेत. त्याचे नियम त्यांनी पाठ केलेले आहेत. त्याचप्रमाणे दृश्ये आपल्याला दिसतात. आता आपणही सरावलो आहोतच. फक्त असे सायन्स आहे हे आपल्याला अद्याप ठाऊक नाही. साऊथच्या सिनेभक्तांनी ते केव्हांच आत्मसात केलेले आहे. इतिहास सुद्धा ते स्वतःचा लिहीत आहेत. यात वीरप्पन, रॉकी हे नायक असतात. क्रिमिनल नाही. त्यांना संपवणारे खलनायक असतात.

आता ते गणितं नव्याने लिहीणार आहेत. राज्यशास्त्राचे धडे तर दिलेच आहेत.
संसदेत पंतप्रधानांचे भाषण चालू असताना रॉकी एकटाच गन घेऊन बिल्डरच्या ऑफीसमधे शिरावं तसं शिरतो. ना सिक्युरिटी, ना गार्डस, ना आर्मी. कुणीही यावं आणि टपली मारून जावं अशा पद्धतीने संसद चालते. पंतप्रधान रविना टंडन (होऊ पण शकतं असं) यांना भेटायला रॉकी एखाद्या आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयात जावं तसा जातो. तो आल्यानंतरच रविना टण्डनला त्याचे नाव ऐकून धक्का बिक्का बसतो. तिथे पंतप्रधानांना वेड्यात काढणारे डायलॉग हिरो हाणतो आणि माझ्याविरूद्धची तक्रार मी करतोय ती घ्या असे सांगतो.

त्यावर एक खासदार भयभीत होत ( का ?) ही तक्रार घेऊ नका असे म्हणतो. लगेच दुसरा, मग तिसरा, मग चौथा. असे करत करत पार्टीचा लीडर म्हणतो नका घेऊ तक्रार. त्यावर टणटण विचारते कि " असं का ? " तर तो लीडर म्हणतो कि या सर्वांना रॉकीचा पैसा येतो. आपल्या पार्टीला पण इलेक्शन साठी रॉकीचा पैसा येतो. मला सुद्धा येतो.

यावर रविना टण्डन चा फक्त निर्विकार क्लोज अप घेतला आहे. तिला धक्का बसलाय कि ती नव्याने ऐकतेय कि कसं हे कळलं नाही. पार्टीची सर्वात लोकप्रिय लीडरशिप आणि तिला ह्या गोष्टी माहितीच नसतात. बरं, ७० / ८० च्या दशकात साऊथमधून २०० खासदारांना केजीएफच्या रॉकीकडून पैसा मिळण्याची शक्यताच नव्हती. काँग्रेसला द्रमुकचा तमिळनाडूतून पाठिंबा असे. आंध्र आणि कर्नाटकात मिळून दोनशे खासदार होत नाहीत. युपी, बिहार मधे त्यांचे लोकल बाहुबली स्वतःच्या साम्राज्यातून निवडून येत. तरीही हे मान्य केल तरी तक्रार घ्यायला घाबरणारे आणि उपकृत असणारे दोनशे खासदार असताना टणटण बाई सैन्य काय घुसवते, नेव्हीला मिसाईल्स फायरचा आदेश काय देते तरीही हे दोनशे लोक सरकार पाडत नाहीत. आधीचे सरकार मात्र फालतू मुद्द्यावरून पाडण्यासाठी अविश्वासाचा ठराव आणतात.

हा राज्यशास्त्राचा अभ्यासही नव्या प्रेक्षकांनी करायची गरज आहे. नाहीतर तोंड सताड उघडे ठेवून भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍यांना नव्या नव्या प्रेक्षकांच्या शंका त्रासदायक ठरू शकतात. एका अमानवी जगाचा सराव झाला कि मानवी मर्यादेतले सिनेमे पांचट वाटू लागतात हे समजण्यासारखे आहे.

जर कुठे या सिनेम्यांच्या शास्त्राची पुस्तके मिळाली ( ही पुस्तके पण अमानवी दुकानातच मिळत असतील ) तर मलाही एक कॉपी पाठवून द्या. जग खूपच पुढे गेले आणि आपण बुरसटलेले सिनेमे पाहत दिवस काढतोय. पण आता हे चालणार नाही. आपल्यालाही अपडेट व्हायचे आहे. जगासोबत चालायचे आहे. रॉकीबरोबर तिसरा भाग पाहण्यासाठी सज्ज व्हायचे आहे.

आता पुन्हा पहिला भाग आणि दुसरा भाग सलग पाहून भक्तीरसात चिंब व्हायचे ठरवले आहे. जयहिंद !

शा मा, भयंकर लिहिलं आहे.
ते ओळीने हिरोला एकामागून एक मारायला येणे तर अगदी सहमत.

Lol भारी लिहीले आहे.

त्याच्या मोटरसायकलच्या टॅंकवर Rocky असे लिहीलेले आहे. कॉलेज मधे आपले नाव्/टोपणनाव्/इनिशिअल्स पब्लिकमधे भलतीच लोकप्रिय असून त्यामुळे आपली एक काहीतरी स्टार व्हॅल्यू आहे असे समजणारे पब्लिक असते त्यातला वाटतो हा.

“हाणामारीच्या सर्वच दृश्यात सायन्स पाळले जाते हे पाहून समाधान वाटते. एका दृश्यात एक सायन्स, दुसर्‍या दृश्यात दुसरे असा प्रकार नाही इथे. प्रामाणिकपणा आवडला.” - Lol क्या बात हैं शांमा!!

जबराट, तुम्ही वेगळे धागे काढत जावा शांमा

ही रत्ने गर्दीत हरवता कामा नये

श्रद्धा, फारेंड, पायस आणि आता तुम्ही

दंडवत स्वीकारावा....जबराट लिहीलं आहे

काल 'Everything Everywhere All at Once ' पाहिला. धमाल मूवी आहे. सुरुवातीला वेळ लागतो काय चालले आहे ते कळायला. पूर्णपणे वेगळा आहे Marvel च्या multiverse पेक्षा.
Michelle Yeoh ने फारच छान काम केले आहे. ६० वर्षे वय असूनही कुंग फु सीन्स मस्त आहेत. तिचे कुंग फु फिल्म्स लहानपणी पाहिले होते जेट ली आणि जॅकी चॅन बरोबरचे.

तिच्या मुलीचे, नवऱ्याचे आणि वडिलांचे कामही छान आहे. Jamie Lee Curtis was a pleasant surprise Happy

हपा, अमा, मी अनु, फारएण्ड, पेफ, जाई सर्वांचे आभार.

फारएण्ड - बरोबर. परवा दादरला एका इव्हेण्ट मधे दादूस असे नाव लिहीलेली एक एसयुव्ही दिसली. त्यातून सोन्याचे दागिने घातलेला एक जण उतरला. लोक त्याच्यासोबत सेल्फी काढून घेऊ लागले. मी एकाला विचारलं कि कोण आहे हा ? तर त्याने रागाने पाहिले. " बिग बॉस मधे होता. माहिती नाही का ? दादूस नाव आहे ".

राधे श्याम पाहिला ... प्रभास आणि पूजा ने कसा काय एक्सेप्ट केला कळले नाही... चित्रपट म्हणजे फार फार तर 20 मीन्स ची एक शॉर्ट स्टोरी होऊ शकली असती इतका लांबवला आहे...
पिक्चराय झेशन सुंदर आहे.. पूजा ला ड्रेसेस मस्त दिले आहेत ...
पण पाच मिन चीच कथा आहे...

Pages