हायवे-रनवे

Submitted by पराग१२२६३ on 18 September, 2021 - 02:01

आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हवाईदलाच्या सी-130 जे सुपर हर्क्युलिस विमानातून या महामार्गावरील धावपट्टीवर लँडींग करून त्याचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय आणि जग्वार लढाऊ विमानांनीही या महामार्गावर उतरण्याची प्रात्यक्षिके सादर केली. या आपत्कालीन धावपट्टीवर हवाईदलातील सर्व प्रकारची विमाने उतरू शकणार आहेत.

महामार्गाचा वापर लढाऊ विमानांसाठी धावपट्टीप्रमाणे करण्याची भारतातील पहिली चाचणी 21 मे 2015 रोजी यमुना एक्सप्रेस वेवर मथुऱ्याजवळ करण्यात आली होती. त्यावेळी मिराज-2000 हे लढाऊ विमान आधी झपाट्याने १०० मी.पर्यंत खाली आले आणि नंतर पुन्हा हवेत झेपावले. काही मिनिटांनी पुन्हा हे विमान खाली येऊन एक्सप्रेस वेला स्पर्शून लगेच हवेत झेपावले. ही चाचणी केवळ Touch and Go स्वरुपाची होती. नोव्हेंबर 2016 आग्रा-लखनौदरम्यानच्या यमुना एक्सप्रेसवेवर घेण्यात आलेल्या चाचणीत हवाईदलाची सहा विमाने प्रत्यक्षात उतरली होती. त्यावेळी सी-130 जे विमानातून गरुड या हवाईदलाच्या विशेष कृती दलाच्या कमांडोंना अशा धावपट्टीवर उतरवण्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बंगारमऊ येथे चाचणी घेण्यात आलेली होती. मात्र त्या चाचणीतही लढाऊ विमानांनी Touch and Go प्रात्यक्षिके पार पाडली.

युद्धाच्या काळात हवाईतळ हे शत्रुच्या हल्ल्यांचे मुख्य लक्ष असतात. त्यामुळे हवाईतळ नष्ट झाल्यास विमानांना उतरण्यासाठी पर्यायी धावपट्टी म्हणून आसपासच्या परिसरातील महामार्गाचा वापर करता येऊ शकतो. महामार्गाचा धावपट्टी म्हणून पहिल्यांदा प्रयोग दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने केला होता. त्यानंतर झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, पाकिस्तान, चीन, पोलंड येथेही असे प्रयोग केले गेले. या देशांबरोबरच सध्या स्वीडन, दक्षिण कोरिया, तैवान, फिनलंड, स्विट्झर्लंड या देशांकडेही अशा धावपट्ट्या उपलब्ध आहेत.

हवाईदलातील वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांना आपत्कालीन काळात पर्यायी धावपट्टीची गरज भासू शकते. त्यामुळे हवाईदलाकडून निश्चित करण्यात आलेल्या महामार्गांच्या रचनेत पायाभूत सुधारणा केल्या जात आहेत. अशा प्रकारे महामार्गाला धावपट्टीप्रमाणे वापरता येण्यासाठी तो किमान अडीच किलोमीटरपर्यंत वळणविरहीत असणे बंधनकारक असते. तसेच त्यावर चढउतार नसणे महत्वाचे असते. विमानाचा भार सहन करण्याइतपत महामार्गाचा थर जाड असावा लागतो. मात्र मालवाहू विमानांना उतरवायचे असेल, तर तो थर जास्तच जाड ठेवावा लागतो. त्यामुळे जेथे असे निकष पूर्ण होतात, त्या ठिकाणाची हायवे-रनवेसाठी निवड केली जाते. अशा महामार्गाचा धावपट्टीप्रमाणे वापर करता येण्यासाठी तेथे तात्पुरता हवाई नियंत्रण कक्ष, विमानासाठीचा इंधनसाठा व दारुगोळा, रुग्णालय इत्यादी ठेवण्याची, तो तातडीने तेथे पोहचविण्याची सोय करता येऊ शकेल, अशा ठिकाणी हायवे-रनवे निर्माण केला जातो.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/09/blog-post_18.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्याप्रमाणे हवाईतळ शत्रूच्या हल्ल्यांचे मुख्य लक्ष असतात त्याचप्रमाणे हे तयार केलेले राष्ट्रीय महामार्ग / हायवे-रनवे शत्रूच्या यादीमधे रहातीलच. आजच्या काळांत , गुगल मॅपवर घरासमोर पार्क केलेली गाडी, अंगणांतली पाटी, घराचा क्रमांक, पानांचा कचरा अगदी कुणीतरी रस्त्यात टाकलेला tissue paper आदी बारकावे सहज दिसतात तर हे देशातले २-३ कि मी चे मार्ग शत्रूच्या नजरेतून नक्कीच सुटणार नाही. ते इकडेही बाँब टाकतील.

याने काय साध्य होणार आहे तर आपण अनेक पर्याय तयार करणार आहोत एव्हढेच. देशांत दहा विमानतळ असतील तर अशा २५ मार्गांची त्यात भर पडेल- यामुळे शत्रू ला जास्त 'लक्ष्य ' मिळतील आणि त्यांची शक्ती विखुरली जाईल.

पण तयार केलेल्या मार्गांची सतत देखभाल (maintenance) करणे आणि त्या मार्गाला सर्वकाळात खड्डे मुक्त ठेवणे या गोष्टी आव्हानात्मक आहेत.

यापेक्षा शत्रूचे कुठलेही विमान / ड्रोन देशाच्या सिमेच्या आंत (पुर्व परवानगीशिवाय) येणारच नाही याची १०० % खात्री असणारी बहुस्तरीय ( multi layered) व्यावस्था सदैव कार्यरत राहिल अशा स्थितीमधे ठेवावी.