तो ही माणूस निघाला ! (विधाता)

Submitted by गणक on 8 May, 2021 - 05:59

तो ही माणूस निघाला !

"चव" घेता तेव्हा कळले "तो" कडवट ऊस निघाला !
मी माणव समजत होतो तो ही "माणूस" निघाला !

शब्दांच्या बाजारी ना मन माझे विकले गेले
किंमत मोठी होती की ग्राहक कंजूस निघाला !

लोकांना दिसली माझी झोळी मोठीच सुखाची
उचलून जरा ती घेता हलका कापूस निघाला !

क्षण आनंदाचा कुठला चिरकाल कधी ना टिकला
श्रावण माझा हा सरला अन् तो ताऊस निघाला !

"संत्रीची" घेत जराशी बोलून खरे ते निजले
मी जागा, हाती माझ्या संत्रीचा ज्यूस निघाला !

लावून मुखोटे मजला नुसतेच लुबाडत होते
वर दिसण्या तांबुस पिवळा खोटा हापूस निघाला !

जे उत्तर शोधाया मी भटकंती अगणिक केली
तो प्रश्नच मागे हटण्या मज देण्या फूस निघाला !

सुर्याची कणखर दृष्टी ढग काळे अडवत होती
अन् इंद्रधनुष्यालाही धरण्या पाऊस निघाला !

वृत्त - विधाता ( गागागागा गागागा ×2 )
( काही सूचना असल्यास नक्की सांगा.)

Group content visibility: 
Use group defaults