पुरस्कार

Submitted by पराग र. लोणकर on 5 May, 2021 - 02:23

पुरस्कार

फोनची रिंग वाजली तसं आचार्य सरांनी त्यावरील नाव पाहिलं.

फोन प्रथमेशचा होता. प्रथमेश त्यांचा विद्यार्थी आणि आताचा प्रकाशकही!

``सर, तुमची प्राक्तन कादंबरी राज्य पुरस्कारासाठी पाठवली आहे. सर, ही तुमची आत्तापर्यंतची सर्वात अप्रतिम कादंबरी उतरलेली आहे. याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे राज्य पुरस्कार नक्कीच मिळेल असं वाटतंय.``

सर यावर काहीच बोलले नाहीत. प्रथमेशच पुढे म्हणाला,

``एक महत्वाची माहितीही मी काढलीये. आपल्यासाठी आणखीन एक सुंदर योगायोग म्हणजे यावर्षी ज्या तीन परीक्षकांपुढे पुस्तकं निवडीसाठी येणार आहेत, त्यात दोन तुमचेच विद्यार्थी आहेत– प्रतिक जोशी आणि चिन्मय कुडाळकर. त्यामुळे कादंबरी विभागात अगदी तुमच्या तोडीस तोड एखादी कादंबरी आली जरी ना, तरी निवड प्राक्तनचीच होणार...``

काही क्षण सरांची काहीच प्रतिक्रिया न मिळाल्यानं प्रथमेशनं विचारलं,
``सर, ऐकताय ना?``

``प्रथमेश, एक करू शकतोस? मला प्रतिक आणि चिन्मयचा फोन नंबर मिळवून देऊ शकतोस?`` सर भानावर येऊन त्याला म्हणाले.

``सर... खरं तर तशी मला गरज वाटत नाहीये. पण तरीही तुम्ही एकदा त्या दोघांशी बोललात तर अगदी पुरस्कारावर शिक्कामोर्तबच होऊन जाईल. चालेल. मी लावतो शोध. आज दिवसभरातच नंबर देतो तुम्हाला. ठेवू फोन?``

प्रथमेशनं फोन ठेवला आणि सरही त्यांच्या काही इतर कामांना लागले.

दिवसभरात फोन करतो म्हटलेल्या प्रथमेशचा तासाभरातच फोन आला. त्यानं त्या दोघांचेही नंबर सरांना दिले. त्यांनीही प्रथमेशचा फोन ठेवताच लगेच दोघांना conferrence call लावला. त्यांच्या नातवाने नुकताच हा प्रकार त्यांना शिकवला होता.

``अरे... आचार्य सर... तुमचा फोन... बोला ना सर...`` आचार्य सरांचा फोन म्हटल्यावर हे त्यांचे दोघेही विद्यार्थी खूपच खूष झाले.

``प्रतिक, चिन्मय, आत्ताच मला प्रथमेशचा फोन आला होता. प्रथमेश आपल्याच शाळेतला विद्यार्थी. अर्थात तुम्हाला ज्युनिअर. पण तो एक प्रकाशक असल्यानं तुम्ही बहुदा ओळखतच असाल त्याला. माझी `प्राक्तन` ही कादंबरी त्यानं प्रकाशित केलीय. ही कादंबरी त्यानं राज्य पुरस्कारासाठी पाठवली आहे. या वर्षीच्या राज्य पुरस्कारांच्या परीक्षक मंडळात तुम्ही दोघे आहात असे त्याने सांगितलेय...``

सरांचा या संदर्भात आलेला फोन पाहून प्रतिक आणि चिन्मय विचारातच पडले. काय उद्देश असावा सरांचा हा फोन करण्याचा? जो उद्देश वाटतोय, त्या उद्देशानं आचार्य सर फोन करतील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. जर आपल्याला वाटतोय तो उद्देश असेल तर आपल्या मनात आचार्य सरांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्या प्रतिमेला...

काही क्षणात त्या दोघांच्याही मनात असे विचार येऊन गेले. दोघांच्याही तोंडातून मात्र काहीच बाहेर पडलं नाही.

``ऐकताय ना रे...?`` सरांनी विचारलं.

``हो हो सर, ऐकतोय.`` दोघेही एकदम म्हणाले.

``हे बघा... माझं एक काम करा. कादंबरी विभागातील पुस्तकं जेव्हा निवडीसाठी समोर घ्याल, तेव्हा प्लीज माझं प्राक्तन पुस्तक बाजूला ठेवून द्या.``

``म्हणजे?`` प्रतीकनं न समजून विचारलं.

``अरे... म्हणजे तुम्हाला नंतर वाचायचं असेल तर जरूर वाचा, पण तुमच्या पुरस्कारासाठी त्याचा अजिबात विचार करू नका?``

``पण का सर?`` पुन्हा प्रतीकनंच विचारलं.

``आणि सर, sorry, पण तुम्ही म्हणता तसं आम्हाला करता येणार नाही. कादंबरी विभागात निवडीसाठी आलेल्या सर्व कादंबऱ्याचे परीक्षण आम्हाला करावेच लागेल. आणि तुम्ही असं का म्हणालात ते माझ्या लक्षात आलंय. आम्ही तुम्हाला खात्री देतो, की सर्व कादंबऱ्यांचं परीक्षण करून जी कादंबरी आम्हाला सर्वोत्तम वाटेल तिचीच आम्ही पुरस्कारासाठी निवड करू. अजिबात पक्षपात करणार नाही...`` चिन्मय म्हणाला.

``खरं सांगू, तुम्ही कोणताही पक्षपात करणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. शेवटी तुम्ही माझेच विद्यार्थी आहात रे! पण तरी... मी काय म्हणतो ते प्लीज समजून घ्या. मी आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याला माझ्यासाठी काहीही करण्याची गळ घातलेली नाही. आज पहिल्यांदाच मी हे करतोय...`` सर काकुळतीनं म्हणाले.

``पण सर, चिन्मयनं तुम्हाला आश्वासन देऊनही तुम्ही असं का म्हणताय? तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? आणि आमच्यावर शासनाने सोपवलेले काम इमाने-इतबारे करणे हे आमचे कर्तव्य आहे सर. त्यामुळे आम्ही आमच्या समोर निवडीसाठी ठेवलेल्या पुस्तकांतून एक पुस्तक बाजूला काढून कसं ठेऊ शकतो? तेही नैतिक दृष्ट्या अयोग्य होणार नाही का? हे पुरस्कार लेखकासाठी असले तरी ते मिळणे ही त्या त्या प्रकाशकासाठीही भूषणावह गोष्ट असते. मग तुम्ही म्हणता असं आम्ही केलं, तर तो त्या प्रकाशकावरही अन्याय होणार नाही का?`` प्रतिक म्हणाला.

``मला तुमचं दोघांचंही म्हणणं पटतंय. तुमच्यावर विश्वासही आहे. तुमच्या समोर आलेल्या कादंबऱ्यांमध्ये माझ्याहूनही चांगलं लेखन असलेल्या कादंबऱ्या नक्कीच असू शकतात. मग अर्थातच तुम्ही त्यातील सर्वोत्तम कादंबरीची निवड कराल यावर माझा विश्वास आहे. पण मला एक सांगा, समजा अशी परिस्थिती आली की तुम्ही सर्व पुस्तकांवरून नजर टाकल्यानंतर तुमच्या पुढे अंतिम निवडीसाठी दोन-किंवा तीन अश्या कादंबऱ्या आल्या, ज्यात माझीही कादंबरी असेल, आणि या पुस्तकांत डावं-उजवं करायला तुम्हाला अवघड जाऊ लागलं, तर तुमचं झुकतं माप माझ्या कादंबरीच्या पारड्यात पडणार नाही याची तुम्ही खात्री देऊ शकाल?``

सरांच्या या सडेतोड प्रश्नानं दोघंही काही क्षण शांत झाले.

``काय पटतंय ना?`` सरांनी विचारलं.

`सर... तुम्ही दुसरं काहीही आम्हाला करायला सांगा, पण हे आम्ही करू शकत नाही. तुमचं पुस्तक आम्ही बाजूला काढून ठेऊ शकत नाही. आम्ही अगदी नि:पक्षपातीपणे पुस्तकाची निवड करू इतकं वचन मात्र आम्ही दोघंही तुम्हाला देतो...`` चिन्मय म्हणाला.

सरांनी परत दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला.
``खरं सांगू, तुम्ही म्हणता त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण प्लीज लक्षात घ्या. यावेळी जर माझ्या या कादंबरीला शासनाचा पुरस्कार मिळाला, तर असा तुमच्यावर विश्वास असूनही मला या पुरस्काराने काडीचाही आनंद होणार नाहीये. उलट या झुकत्या मापाच्या संशयानं आयुष्यभराची खंत मला वाटत राहील. असं झालं तर तुम्हा दोघांना आवडेल? आणि प्रथमेशचं म्हणाल, तर पुरस्कारासाठी परीक्षक कोण आहेत याचा त्यानं जेव्हा शोध घेतला ना, त्याच क्षणी या पुरस्कारातून मिळू शकणाऱ्या प्रतिष्ठेवरील त्याचा हक्क संपलाय. त्याच्या बाबतीत माझे संस्कार नक्की कमी पडलेत. आणखी एक सांगतो आणि मी थांबतो. माझं पुस्तक बाजूला काढून ठेवण्यात तुम्हाला त्या तिसऱ्या परीक्षकामुळे अवघड जात असेल, तर मी माझ्या हस्ताक्षरात `माझ्या पुस्तकाचा पुरस्कारासाठी विचार केला जाऊ नये,` असे नमूद करणारे अधिकृत पत्रच तुम्हाला देतो. मग तर काही अडचण नाही ना...``

सरांचं बोलणं दोघांनीही शांतपणे ऐकून घेतलं आणि सरांना नाराज करायला नको म्हणून, ``ठीक आहे सर, आम्ही विचार करतो,`` असं त्या दोघांनीही म्हटल्यावर ते संभाषण संपलं.

दुसरा दिवस उजाडला आणि दुपारी बाराचे सुमारास सरांचा फोन परत किणकिणला. फोन प्रथमेशचाच होता.

``सर, त्या प्रतिक आणि चिन्मयनं परीक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं कळलंय. हा मूर्खपणा त्यांनी का केलाय तेच कळत नाहीये. तुमचं त्यांच्याशी काल बोलणं झालं होतं का?``

सरांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

``सर ऐकताय ना? तुमचं झालं होतं का काल त्यांच्याशी बोलणं?`` प्रथमेशनं पुन्हा विचारलं.

सरांनी मग काल त्या तिघांचं झालेलं सारं संभाषण प्रथमेशला सांगितलं. ते पुढे म्हणाले,
``किती ग्रेट आहेत बघ ते दोघे. राज्य पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून निमंत्रण मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. या दोघांचं साहित्य क्षेत्रातील काम, अनुभव, पात्रता पाहूनच इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. अशी नियुक्ती होणे हा त्यांच्यासाठी बहुमान होता, त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब होती. पण काल मी त्यांना ज्या धर्मसंकटात टाकलं, त्यामुळे केवळ माझ्यासाठी त्यांनी या सगळ्यावर पाणी सोडून देणं पसंत केलं. पुस्तक निवडीत माझ्या पुस्तकासही न्याय मिळावा आणि पुढे माझ्या पुस्तकाची निवड झाल्यास कोणतीही संशयाची सुईही माझ्या मनात निर्माण होऊ नये यासाठी त्या दोघांनी हा निवडलेला मार्ग आहे. खूप मोठं मन लागतं असे निर्णय घ्यायला... आणि हे बघ प्रथमेश, ते दोघे परीक्षक असताना मला हा पुरस्कार मिळाला असता ना, तर माझी आयुष्यभराची साधना धुळीला मिळाली असती. या दोघांनी कितीही नि:पक्षपातीपणे निवड करायची ठरवली असती ना, तरीही आपोआप झुकते माप माझ्या पारड्यात पडले असते. निदान मला तरी तसं आयुष्यभर वाटत राहिलं असतं. प्रथमेश, तू मला किती वर्षे ओळखतोस... अश्या प्रकारे पुरस्कार मिळून मला कणमात्र तरी समाधान मिळाले असते का रे... तसे ते समाधान, आनंद तुलाही मिळणे योग्य होते का रे... हे बघ, माझे तुला आशीर्वाद आहेत. प्रामाणिकपणे काम करत राहा. तू प्रकाशित केलेल्या एकाच काय, अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळतील. पण त्या त्या वेळी परीक्षक कोण आहेत, याचा अजिबात शोध घेऊ नकोस. तरच मला तुझा अभिमान वाटेल. चल, ठेऊ फोन?...``

प्रथमेशकडे आता बोलायला काहीच नव्हतं. आपल्या या ऋषितुल्य आचार्य सरांचं म्हणणं त्याला पटत होतं. आपली चुकही त्याच्या लक्षात येत होती. पण तरीही अगदी सहज, हाता-तोंडाशी आलेला पुरस्काराचा घास सरांनी असा गमावल्याचीही भावना एकीकडे वाटत होतीच. आपण ते परीक्षक कोण आहेत, वगैरे बाबतीत सरांशी बोललोच नसतो तर बरं झालं असतं असंही त्याला वाटून गेलं. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्यानं जड अंत:करणानं फोन खाली ठेऊन दिला...

तीन-चार महिने उलटले. आज राज्य शासनाचे पुरस्कार वर्तमानपत्रांत जाहीर व्हायचे होते. त्याप्रमाणे त्यांची बातमी पेपरमध्ये आली आणि सर ती चाळत असतानाच प्रथमेशचा फोन आला. तो कमालीच्या उत्साहात होता.

``सर, आपल्या प्राक्तन कादंबरीला राज्य शासनाचा सर्वोत्तम कादंबरी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन! प्रतिक आणि चिन्मय तिथे परीक्षक म्हणून नसूनही आपल्याच पुस्तकाची निवड झाली...``

प्रथमेश भरभरून आणि प्रचंड उत्साहात बोलत होता आणि आचार्य सरांच्या डोळ्यापुढे त्यांचे ते दोन विद्यार्थी उभे राहिले होते. या पुरस्काराच्या आनंदापेक्षा या त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यावेळी उचललेल्या पावलाचे त्यांना जास्त कौतुक वाटत होते, समाधान वाटत होते.

आपण आदर्श शिक्षक आहोत की नाही ते माहीत नाही, पण आपले हे दोन विद्यार्थी मात्र निश्चित आदर्श माणूस बनले आहेत या विचाराने सरांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता दाटली होती...

**

Group content visibility: 
Use group defaults

खूप सकारात्मक कथा.
आता हा प्रामाणिकपणा जणू नाहीसा झालाय आपल्यातून.

मस्त.
खूप सकारात्मक कथा.>> + 1